श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “युद्ध, इतिहास, आणि मी …” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
युध्द म्हंटल कि ते करण्यापूर्वी, आणि झाल्यावर त्याचा अभ्यास होतो, नाहीतर करावा लागतो. अगोदर युध्द करायचं का, कसं, कधी असा विचार करणारे अभ्यास करतात. आणि नंतर झालेलं युध्द का, कसं, किती दिवस झालं आणि त्याचे परिणाम याचा अभ्यास विचारवंत करतात. पण विद्यार्थ्यांच तस नसतं. त्यांना मात्र दोघांनी केलेला अभ्यास अभ्यासावा लागतो. युध्दाचे चांगले वाईट परिणाम नंतर दिसतातच. पण वाईट परिणाम मात्र बर्याच काळापर्यंत चांगलेच दिसतात. चांगल दिसणं, आणि वाईट परिणाम चांगलेच दिसणं यातला फरक स्पष्ट होतो.
माझ्या जन्माअगोदर, नंतर, मला समजायला लागेपर्यंत नक्की किती युध्द झाली हे सांगता आलं नाही तरी शाळेत वरच्या वर्गात जात होतो तस छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या युध्दापासून दुसर्या महायुद्धाचा अभ्यास होता. जसजसं वरच्या वर्गात जात होतो तसतशी लुटुपूटूची लढाई घनघोर युध्दाच रुप धारण करायची. बर्याचदा यांच्या सनावळी, तह, आक्रमण, आपापसात ठरलेल्या काल्पनिक रेषा यांचा वास्तवाशी संबंध वाटलानाही तरीही युध्दपातळीवर अभ्यास केला होता.
निजामशहा, आदिलशहा, शाहिस्तेखान, अफझलखान यांच्या काळात घोडदळ, पायदळ, तलवार, भाला, दाणपट्टा, गनिमीकावा यांच्या सहाय्याने खेळलेलं युध्द, नंंतर विमानाने हिरोशिमा, नागासाकीवर केव्हा बाॅॅम्ब टाकून गेले ते लक्षातच आलं नाही.
पेशव्यांनी अटकेपार झेंडा फडकवला असेल, पण आम्ही इतिहासात पास झालो की आमचा झेंडा डौलायला लागायचा आणि वर्ष पार पडायचं.
या व्यतिरिक्त दोन युध्द, यांचा अभ्यास करावा लागला नाही तरी अभ्यासाइतकेच प्रश्न त्या बाबतीत विचारले जायचे. ही युध्द म्हणजे अर्थातच रामायण आणि महाभारत. रामायणात प्रभु श्रीराम व रावण यांच्यात, म्हणजे दोन वेगवेगळ्या राजांमधे युध्द झाल होतं. पण महाभारतात झालेलं युध्द मात्र नातेवाईकांमधलच होत. आणि इतिहासात कमी मार्क मिळाले की त्या कमी मिळालेल्या मार्कांवरुन घरात वाक् युध्द सुरु व्हायचं. म्हणजे इतिहासावरुनच घरात महाभारत घडायचं. थोडक्यात महाभारतातली आपसात लढाई करायची परंपरा कमी मिळणार्या मार्कांमुळे पुढे घरात सुरुच राहिली. युध्दात सामान्य जनता विनाकारण होरपळते तसंच यांच्या युध्दाचा आमचा अभ्यास कमी झाल्याने शाब्दिक चटके बसायचे. यानंतर धर्मयुद्ध, गृहयुध्द, वाक् युध्द, शीतयुद्ध असे युध्दाचे उपप्रकार असतात हे लक्षात आलं.
मावळ्यांंनी लढाईत झालेले वार अंगावर झेलले. आम्ही इतिहासामुळे झालेले वार पाठीवर झेलले. पाठीवर वार करणं भ्याडपणाच लक्षण समजल जात असेल, पण आमच्या बाबतीत सगळेच निधड्या छातीने सहसा पाठीवरच वार करायचे. आणि त्यात कोणालाही म्हणजे वार करणारा आणि झेलणारा यांना भ्याडपणा वाटालाच नाही. आता आपल्या पाठीवर वार होणार हे समजायचं. मावळ्यांकडे वार चुकवायला ढाल असेलही. पण आमची पाठ मात्र ढोल वाजवल्यासारखी बदडली जायची. थोडक्यात इतिहास शिकवला तेव्हा आम्ही कुंभकर्णासारखे झोपलो होतो. आणि जाग आली तेव्हा इतिहास घडून गेला होता, आणि मिळालेले मार्क आमचा अभ्यासाचा इतिहास सांगायला सिध्द होते.
रामायण, महाभारत यात वाली, सुग्रीव, अंगद, जांबुवंत, बिभीषण, द्रोणाचार्य, भिष्म, विदुर, शकुनी, युधिष्ठिर, दुर्योधन, दुश्यासन आणि इतर… यांच्या नावाचा गोंधळ व्हायचा. तर नंतर जर्मन, ईटली, पोलंड, रशिया, अमेरिका, जापान, चिन या देशांपैकी मित्र कोण आणि शत्रु कोण याच्यात गोंधळ व्हायचा. याच गोंधळामुळे आम्ही एक वेगळा इतिहास तयार करायचो आणि त्यावर परत मार मिळायचा.
युध्द म्हंटल की वैर हिच भावना लक्षात येते. पण आमचे सर म्हणायचे तुमच्या अभ्यासासाठी दुसरं महायुद्ध फक्त तोंडओळख आहे. युध्दाची तोंडओळख करायची काय गरज. नंतर काय आपसात चहापाण्याचा कार्यक्रम करायचा होता… पण ही तोंडओळखसुध्दा जुलूमाचा रामराम केल्यासारखी वाटायची. पण यातली दोस्तराष्ट्र ही संकल्पना जवळची वाटली. कारण असेच कमी मार्क मिळालेले आम्ही काहीजण एकत्र आलो, आणि नंतर एकमेकांचे दोस्त बनलो. आणि ही दोस्ती कायम राहिली. आजही गोलमेज परिषदेसारखं चर्चा करायला आम्ही टेबलवर एकत्र येतो. चर्चा वेगळ्या गोष्टींवर असली तरी त्यात शाळेचा इतिहास व सध्या सुरु असलेली युध्द हा विषय डोकावतोच.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




