डॉ. शोभना आगाशे
इंद्रधनुष्य
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १९ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
मागील भागात आपण मधुरा भक्ती विषयी थोडी माहिती घेतली. या भागात भक्तीच्या याच प्रकाराविषयी आणखी काही माहिती घेऊ.
स. रा. गाडगीळ यांच्या मते मानसशास्त्रीय पध्दतीने मधुरा भक्तीचा उलगडा करणे हे चुकीचे आहे. त्यांच्या मते तो पंथ जेथे उदयाला आला, तेथील विशिष्ट परिस्थितीत अगर परंपरेत त्याची मुळे पाहणे आवश्यक आहे. चैतन्यांनंतर बंगालमध्ये विकसित झालेला वैष्णव धर्म आणि वज्रयान बौध्द पंथातून विकसित झालेला सहजिया पंथ यांनी मधुरा भक्तीचा संप्रदाय विकसित केला, असे ते मानतात. स्त्री बनल्याशिवाय खरे प्रेमरहस्य आस्वादिता येणार नाही, अशी सहजिया पंथाची धारणा होती.
पुरूषभक्ताने स्त्रीवेष धारण करण्याच्या कृतीचे स्पष्टीकरण धर्मशास्त्राच्या इतिहासात शोधण्याचे प्रयत्नही झाले आहेत. प्रारंभी मातृप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियाच देवतांच्या पुजाऱ्याचे काम करीत असत. पुढे पुरूष पुजारी बनले परंतु पुजाऱ्याने स्त्री असले पाहिजे, या विचाराचा पगडा समाजमनावर असल्यामुळे पुरूष-पुजारी स्त्रीवेषातच वावरू लागले असावेत. आपल्याकडचे पोतराज वगैरे स्त्रीवेष धारण करतातच. अशा रीतीने पुरूषाने स्त्री बनण्याची कल्पना मातृप्रधान संस्कृतीमधून मधुरा भक्तीच्या संप्रदायात आली असावी, असे एक मत आहे.
जे. जी. फ्रेझर यांनी केलेल्या नोंदीनुसार पिलू बेटांमध्ये देवी आपला पुजारी म्हणून स्त्रीची निवड करण्याऐवजी पुरूषाची निवड करते. त्या पुजाऱ्याच्या अंगात येते आणि तो पुरूष मग स्त्रीसारखा वागू लागतो अशी समजूत आहे. अमेरिकेतील अनेक आदिम जमातींमध्ये असे पुजारी आढळतात. दृष्ट लागू नये म्हणून स्त्रीवेष धारण करण्याची पध्दतही काही ठिकाणी आढळते. याच हेतूने विवाहात वधूवरांनी एकमेकांचा वेष घालण्याची प्रथाही काही समाजांत आढळते.
चैतन्य महाप्रभू हे मधुरा भक्तीचे प्रमुख प्रवर्तक होते. त्यांच्यामुळेच बंगालमध्ये हा संप्रदाय रूढ झाला. आयुष्याच्या अखेरची अनेक वर्षे ते राधारूपातच वावरत होते.
रामकृष्ण परमहंसही काही काळ स्त्रीवेषात वावरले होते. वल्लभाचार्यांच्या पुष्टिमार्गानेही मधुरा भक्तीचा जोरदार पुरस्कार केला होता.
मधुरा भक्तीचा स्वीकार करणाऱ्या विविध भक्तांनी व सांप्रदायिकांनी ललित व ललितेतर अशा दोन्ही प्रकारच्या साहित्याची निर्मिती केली. चैतन्य प्रभूंच्या रूपगोस्वामी, जीवगोस्वामी, सनातनगोस्वामी वगैरे शिष्यांनी मधुरा भक्तीचे एक तत्त्वज्ञान निर्माण केले. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य व माधुर्य या भक्तीच्या पाच प्रकारांपैकी माधुर्यभक्ती सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी मानले. त्यांनी मधुर रसाचे एक साहित्यशास्त्रही मांडले. मधुररस हा तत्त्वत: भक्तीच्या स्वरूपाचा असला, तरी त्याच्यामधील प्रिया-प्रियकर नात्यामुळे त्याची वर्णने मात्र शृंगाररसा सारखी करण्यात आली आहेत.
गुलाबराव महाराजांचा (इ स १८८१-१९१५) अपवाद वगळता, मराठी भक्तीसंप्रदायात मधुरा भक्तीला फारसे स्थान मिळालेले नाही. गुलाबराव महाराज स्वत:ला ज्ञानेश्वरांची कन्या व कृष्णाची पत्नी मानत. तसेच स्त्रीवेष व मंगळसूत्रादि सौभाग्यचिन्हेही धारण करीत असत. अमरावती येथे त्यांच्या संप्रदायाचे ‘श्रीज्ञानेश्वर मधुरा द्वैत सांप्रदायिक मंडळ’ आहे.
भारतातील अन्य प्रांतांतूनही मधुरा भक्तीचा स्वीकार करणारे संत होऊन गेले आहेत. तमिळनाडूमधील नम्माळवार (६ वे शतक) हे त्यांपैकी एक होत. विदर्भातील देवनाथ हे कवी स्वत:ला प्रियकर व परमेश्वराला प्रेयसी मानत असत. भारतातील मूसाशाही सुहाग (१५ वे शतक) हे सूफी साधू परमेश्वराला पती मानत व स्वत: स्त्रीवेष धारण करीत असत. युरोपमधील ख्रिस्ती संतांनी परमेश्वराच्या मधुरा भक्तीचा अनुभव घेतल्याची वर्णने ही आढळतात. मुस्लिम स्त्री संत रबिया (इ स ७१७-८०१) ही परमेश्वराला पती मानून त्याची भक्ती करीत असे.
जन्मत: स्त्री असलेल्या भक्तांनी मधुरा भक्तीचा स्वीकार केल्याची उदाहरणेही आहेत. संत मीराबाई या त्यापैकी प्रमुख होत. त्या स्वत:ला ललिता नावाच्या गोपीचा अवतार आणि कृष्णाला आपला पती मानत असत. आळवार संतांपैकी आंडाळ ही रंगनाथाला म्हणजेच कृष्णाला आपला पती मानत असे. तिने रंगनाथाच्या मूर्तीचे दर्शन घेताच ती रंगनाथाशी एकरूप झाली, असे म्हणतात. दक्षिणेत अजूनही दरवर्षी तिचा व रंगनाथाचा विवाहदिन साजरा केला जातो.
याच प्रकारच्या भक्तिरसाचा अविष्कार आपल्याला ‘गीतांजली’ तील गीत क्र ५२, ५३, ५४, ५६, ५७, ५९, ७२, ७३, ७४, ८९, ९१, ९४, ९९, १०१, १०२ मध्ये कमी अधिक प्रमाणात पहायला मिळतो.
—–
☆ गीत : ५५ ☆
LANGUOR is upon your heart and the slumber is still on your eyes.
Has not the word come to you that the flower is reigning in splendour among thorns? Wake, oh awaken! Let not the time pass in vain!
At the end of the stony path, in the country of virgin solitude my friend is sitting all alone. Deceive him not. Wake, oh awaken!
What if the sky pants and trembles with the heat of the midday sun ⎯ what if the burning
sand spreads its mantle of thirst ⎯
Is there no joy in the deep of your heart? At every footfall of yours, will not the harp of
the road break out in sweet music of pain?
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत:५५ ☆
☆
जागा असशी परी ये भानावर
दूर जायचे तुज असे खरोखर
डोळ्यात झोप, मनात मरगळ
झटकून दे, व्यर्थ जातोय काळ॥
*
काट्यांसंगे गुलाब बहरतसे
वैभवात अन् राज्य करितसे
संकटे झेलण्या तुझेच रे बळ
ध्यानी धरी, व्यर्थ जातोय काळ॥
*
थांबू नको वाट बिकट जराशी
सखा एकटा त्या निर्जन प्रदेशी
वाट पाहे, करी प्रवास सुफळ
भेट न चुको, व्यर्थ जातोय काळ॥
*
झेलुनि रवितापा नभ उरी कंपते
तप्त वाळु भिउनि जळात भिजते
तसा सोसुनि भवताप सकळ
मार्ग आक्रमी, व्यर्थ जातोय काळ॥
*
हर्ष अंतरीचा तुज जाणवेल
चाहूल हरीची जेंव्हा कळेल
सुसह्य होईल वेदनेची कळ
ऊठ ऊठ, व्यर्थ जातोय काळ॥
*
टाक पाऊले त्या वाटेवरती
पदरवातुनि तारा झंकारती
मुक्त हो, त्यागुनि देहाची खोळ
त्वरा करी, व्यर्थ जातोय काळ॥
☆
भावानुवाद ©️ शोभना आगाशे
संपर्क: ९८५०२२८६५८
—–
☆ गीत : ५६ ☆
THUS it is that thy joy in me is so full. Thus it is that thou hast come down to me. O thou lord of all heavens, where would be thy love if I were not?
Thou hast taken me as thy partner of all this wealth. In my heart is the endless play of
thy delight. In my life thy will is ever taking shape.
And for this, thou who art the King of kings hast decked thyself in beauty to captivate my heart. And for this thy love loses itself in the love of thy lover, and there art thou seen in
the perfect union of two.
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत: ५६ ☆
☆
मला पाहता, तुझ्या अंतरी, प्रीत जागते
उतरलास पायरी, ठाऊक तरी तुला सांगते
*
मी नसते तर सांग कुणावर होशी आरक्त
तुला मिळविण्यासाठी मी ही झाले विरक्त
*
जे जे मजला आनंद देई, ते ते निर्मित जाशी
कान्हा, जिंकाया मन माझे रूपे अनेक घेशी
*
सर्वस्व अर्पुनि मजला, आलास हृदयी रिक्त
आनंद मनी दाटला, काय सांगू त्या नसे अंत
*
कळले नाही, तू माझ्यात मी तुझ्यात विरले
दोन मने जुळता, जीव शिव ना अलग उरले
☆
भावानुवाद ©️ शोभना आगाशे
संपर्क: ९४५०२२८६५८
—–
☆ गीत : ५७ ☆
LIGHT, my light, the world-filling light, the eye-kissing light, heart-sweetening light!
Ah, the light dances, my darling, at the centre of my life; the light strikes, my darling, the chords of my love; the sky opens, the wind runs wild, laughter passes over the earth.
The butterflies spread their sails on the sea of light. Lilies and jasmines surge up on the crest of the waves of light.
The light is shattered into gold on every cloud, my darling, and it scatters gems in
profusion.
Mirth spreads from leaf to leaf, my darling, and gladness without measure. The heaven’s river has drowned its banks and the flood of joy is abroad.
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत:५७ ☆
☆
कसे सांगू माझे प्रकाशाशी नाते
तो माझा, फक्त माझाच वाटते
*
डोळ्यांना चुंबतो, हृदयी माधुर्य भरतो
अंतरी नाचतो, हृदयाची तार छेडतो
*
प्रिये, बघ आकाश त्याने उघडले
हास्य किरण धरणीवर उधळले
*
प्रकाश सागरात फुलपाखरांच्या बोटी
तर लाटेवर स्वार पुष्पगंधाची लोटी
*
प्रिये, बघ सोनेरी शिंपल्यात मेघ
भरून, भारून टाकला विश्व परीघ
*
मुक्त हस्ते करतो, रत्नांची उधळण
पानापानांतून आनंदाची पखरण
*
बांध तोडले गंगेने, भरून आला ऊर
अथांग पसरेल आता आनंदाचा पूर
☆
– क्रमशः भाग १९..
मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.
भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







