श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६७ आणि ६८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ६७ – –
घनःश्याम हा राम लावण्यरूपी ।
महा धीर गंभीर पूर्णप्रतापी ।
करी संकटी सेवकाचा कुडावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६७।।
अर्थ – – पावसाळी मेघाप्रमाणे श्यामल वर्ण हा राम अत्यंत सुंदर आहे. तो महा धैर्यवान आणि गंभीर असा असून अत्यंत पराक्रमी आहे. संकटात आपल्या भक्ताचे तो रक्षण करतो. अशा या श्रीरामाचे पहाटे चिंतन करावे.
(कुडावा – रक्षण)
विवेचन – – मनाच्या श्लोकांमधील श्लोक ६६ ते ७६ हा दहा श्लोकांचा एक वेगळा गट आहे. याचे वैशिष्ट्य असे की या श्लोकांमध्ये समर्थ रामाच्या सगुण रूपाचे वर्णन करतात. आपल्याला त्याचे ध्यान करायला सांगतात. परमेश्वराची निर्गुण भक्ती ही श्रेष्ठ आणि सूक्ष्म मानली जाते. परंतु सगुण भक्ती आपल्यासारख्या सामान्य साधकांसाठी सुलभ आहे. म्हणून सुरुवात करायची झाली तर ती सगुण भक्तीपासून करावी. या पृथ्वीवर आपण देह धारण करून आलो आहोत. परमेश्वर देखील जेव्हा जेव्हा या धरतीवर अवतीर्ण झाला तेव्हा तेव्हा त्याने देह धारण करूनच आपले कार्य केले. त्यामुळे परमेश्वराच्या सगुण रूपाची कल्पना करणे आपल्याला सोपे जाते. म्हणूनच समर्थ या दहा श्लोकांच्या माध्यमातून श्रीरामाचे (परमेश्वराचे) सगुण रूप आपल्यासमोर ठेवताहेत.
श्रीरामाचे रूप कसे आहे? तर पावसाळी मेघाप्रमाणे सावळा. ‘ सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी… ‘ त्या सावळ्या रंगात विलक्षण सौंदर्य आहे. वेद आणि पुराणात वर्णिल्याप्रमाणे आपले बहुतेक देव सावळेच आहेत. विष्णू, विठ्ठल, श्रीराम हे सावळेच आहेत. ‘ सावळे सुंदर, रूप मनोहर. राहो निरंतर हृदयी माझ्या… ‘ असे संत तुकाराम म्हणतात. तेच समर्थ आपल्याला सांगत आहेत. श्रीरामाचे रूप वर्णन करताना समर्थांनी राम सुंदर आहे असे न म्हणता लावण्यरूपी असे म्हटले आहे. ‘ लावण्य ‘ या शब्दात आणखी खोल, गहन असा अर्थ आहे. त्यात माधुर्य आहे. म्हणून संतांनी देखील विठ्ठलाला लावण्याचा गाभा असे म्हटले आहे.
या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत समर्थ श्रीरामाचे गुण वर्णन करताना म्हणतात, ‘ महा धीर गंभीर पूर्णप्रतापी. ‘ ‘ महा ‘ हे विशेषण धीर आणि गंभीर या दोन्ही शब्दांसाठी लागू होते. तो अत्यंत धैर्यशाली आहे. तसेच तो अत्यंत गंभीर देखील आहे. इथे गंभीर या शब्दाचा अर्थ शब्दशः घ्यायचा नाही. तर जीवनातील सर्व संकटांचा सामना करताना जे धैर्य आणि गांभीर्य लागते, त्या अर्थाने हा शब्द इथे आला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर श्रीरामांचे धैर्य आणि शौर्य सागराप्रमाणे अपार आहे. सागराजवळ अमर्याद जलसाठा आहे. पण तरीही तो आपले गांभीर्य म्हणजेच आपली मर्यादा सोडत नाही. तसेच सर्वगुणसंपन्न श्रीराम आहेत. ते पूर्णप्रतापी आहेत म्हणजे अत्यंत पराक्रमी आहेत. श्रीराम म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य, धैर्य आणि गांभीर्य, पराक्रम! असे अनेकविध गुण त्याच्या ठिकाणी वसतात.
अशा या धीर गंभीर आणि पूर्णप्रतापी श्रीरामांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या सेवकाच्या संकटात धावून जातात, त्याचे रक्षण करतात. ते भक्तवत्सल आहेत. ज्या ज्या भक्तांनी संकटकाळी त्यांचा धावा केला, त्यांच्या साहाय्याला ते तात्काळ धावून गेले आहेत. पण परमेश्वरावर दृढ श्रद्धा हवी. त्यासाठी परमेश्वराची अनन्यभावाने भक्ती करावी लागते. अनन्यभावाने म्हणजे ‘ हे परमेश्वरा, मला तुझ्याशिवाय कोणी त्राता नाही. तूच माझे सर्वस्व आहेस. ‘ अशा प्रकारची वृत्ती हवी. श्रीरामांचे किंवा श्रीकृष्णाचे भक्त हे अशा प्रकारचे होते. हनुमंताला तर एका रामाशिवाय दुसरे काहीच नको होते. अशा या रामाचे (भगवंताचे) पहाटे चिंतन करायला समर्थ आपल्याला सांगत आहेत.
रात्रीची शांत निद्रा आटोपली की पहाटेच्या वेळी आपले मन एखाद्या नदीच्या डोहासारखे शांत असते. पाणी जर स्वच्छ आणि शांत असेल तर त्यात आपले प्रतिबिंब दिसते. त्याचा तळ दिसतो. पहाटेच्या वेळी अशा शांत आणि इतर विचारांची गर्दी नसलेल्या मनात रामाचे चिंतन करावे. त्याचेच प्रतिबिंब आपल्या मनात पडावे. सकाळ जर अशी पवित्र आणि सुंदर झाली तर दिवसही चांगला जाईल. आपण जेव्हा त्याचे चिंतन करू तेव्हा त्याचे रूप आणि गुण आपोआपच आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. आपली सकाळ मोबाईल, टीव्ही किंवा वर्तमानपत्रांच्या बातम्याने बऱ्याच वेळा होते. त्यातील अपघात, खून, दरोडे, अत्याचार, राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप इ. नकारात्मक बातम्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात न करता श्रीरामाच्या चिंतनानेच करावी.
स्वसंवाद – –
१) माझ्या दिवसाची सुरुवात कोणत्या विचारांनी होते? चिंतेने की चिंतनाने?
२) पहाटेच्या शांत वेळेत मी स्वतःसाठी आणि भगवंतासाठी काही क्षण राखून ठेवतो का?
३) संकटसमयी माझी भिस्त भगवंतावर असते का?
४) मी दिवसभरात जास्त कोणत्या गोष्टी मनात साठवतो? नकारात्मक बातम्या की सकारात्मक चिंतन?
५) रामाचे धैर्य, गांभीर्य आणि करुणा हे गुण माझ्यातही यावेत असे मला वाटते का? (क्रमशः)
=====
श्लोक क्र. ६८ – – –
बळे आगळा राम कोदंडधारी ।
महां काळ विक्राळ तोही थरारी ।
पुढे मानवा किंकरा कोण केवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६८।।
अर्थ – – धनुष्य धारण केलेला राम हा पराक्रमाने आगळावेगळा आहे. सर्व प्राणिमात्रांचा विनाश घडवून आणणारा महाकाळ सुद्धा या रामापुढे थरथर कापतो. तर अशा या रामापुढे (भगवंतापुढे) सामान्य माणसाची काय कथा? म्हणूनच प्रभात समयी रामाचे चिंतन करावे.
(कोदंडधारी – धनुष्य धारण केलेला, महाकाळ – काळाचाही काळ जो अखिल विश्वाचा विनाश घडवून आणतो, किंकर -दास/सेवक, केवा – महत्व)
विवेचन – – समर्थ या श्लोकाची सुरुवात करताना ‘ बळे आगळा राम कोदंडधारी ‘ असे म्हणतात. श्रीरामाने कोदंड म्हणजे धनुष्य धारण केले आहे. त्याच्या धनुष्याचा टणत्कार ऐकल्यावर काळाचा देखील थरकाप होतो. सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी श्रीरामाने धनुष्य धारण केले आहे. समर्थांच्या काळात जेव्हा मोगलांचे आक्रमण झाले होते, तेव्हा सगळा समाज दुर्बल झाला होता. गुलामगिरीची वृत्ती निर्माण झाली होती. अशा वेळी समर्थांनी या धनुर्धारी श्रीरामाचा आदर्श समाजापुढे ठेवला. तेव्हा साहजिकच श्रीरामाची केवळ पूजा न करता त्याचे गुण देखील अंगी बाणवणे आवश्यक ठरते. म्हणूनच तर ‘ प्रभाते मनी राम चिंतीत जावा ‘ असे समर्थ म्हणतात.
श्रीराम महापराक्रमी तर आहेच पण तो ‘ बळे आगळा का? ‘ तर ज्याची भिती कळीकाळालाही वाटते असा राम आपल्या शक्तीचा उपयोग सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी करणारा आहे. ज्यांच्याकडे शक्ती, सामर्थ्य आहे असे बरेचसे लोक अनादिकालापासून आपल्या शक्तीचा दुरुपयोग करताना दिसतात. रावणाजवळही सामर्थ्य होते, पण त्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग केला. महाभारतात देखील कंसाने आपल्या शक्तीच्या साहाय्याने समाजातील सज्जनांना त्रास दिला. आज समाजात ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि शक्ती आहे अशी बरीचशी मंडळी आपल्या शक्तीचा दुरुपयोग करताना दिसतात. म्हणून श्रीराम ‘ बळे आगळा ‘ आहे.
जो जन्माला आला त्याला मृत्यू निश्चित आहे. काळ हा सर्वशक्तिमान आहे. सामान्य माणसासाठी यम म्हणजे काळाचेच एक रूप. सामान्य माणूस यमाचे नुसते नाव जरी काढले तरी घाबरतो. पण ज्याला सर्वच घाबरतात असा काळ देखील भगवंतापुढे थरथर कापतो. तर सामान्य माणसाची त्यापुढे काय कथा? म्हणून आपण जर अनन्यभावाने भगवंताची आराधना केली तर अशा सर्वशक्तिमान काळाच्या कचाट्यातून, मरणाच्या भीतीतून देखील तो आपल्याला मुक्त करील. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका करील. मग काळाचा प्रभाव आपल्यावर राहणारच नाही. तेव्हा हे मना, प्रभात समयी श्रीरामांच्या गुणांचे चिंतन कर.
स्वसंवाद – –
१) मी श्रीरामाची भक्ती करताना केवळ पूजा करतो, की त्याच्या गुणांचे अनुकरण करण्याचाही प्रयत्न करतो?
२) माझ्याकडे असलेली शक्ती, ज्ञान, पैसा, पद किंवा अधिकार मी इतरांच्या हितासाठी वापरतो का?
३) माझ्या जीवनात “बळ” म्हणजे काय? इतरांवर प्रभाव टाकणे की स्वतःवर संयम ठेवणे?
४) माझ्या दिवसाची सुरुवात प्रभाती सकारात्मक चिंतनाने होते का?
– क्रमशः श्लोक श्लोक ६७ आणि ६८.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






