श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ महाकवी कुलगुरू : कालिदास ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
आषाढ शुद्ध प्रतिपदा. महाकवी कालिदास दिन, या निमित्त या विश्वविख्यात महाकवीस माझे विनम्र अभिवादन आणि त्यांच्या चरणी ही अल्पशी भावांजली.
प्रास्ताविक
महाकवीकुलगुरु कालिदास हे भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात प्रसिद्ध महाकवी व नाटककार म्हणून ज्ञात आहेत. काव्याच्या ह्या तिन्ही क्षेत्रात (नाटक, खंडकाव्य व महाकाव्य) त्यांच्या योग्यतेचा दुसरा कवी झाला नाही हे सर्वमान्य आहे.
अशा या विश्वकवीच्या जीवनाविषयी मात्र फार थोडी माहिती उपलब्ध आहे. आज त्यांचे चरित्र केवळ जनश्रुतीवरच आधारित आहे.
कालिदास अशिक्षित, अडाणी आणि मूर्ख होते. शारदानंद नावाचा एक राजा होता. त्याच्या मुलीचे नाव होते विद्योत्तमा. ती लावण्यवती होतीच पण विद्वान व सर्वशास्त्रकलानिपुणही होती. तिला तिच्या विद्वत्तेचा अभिमान व गर्व होता. ‘जो मला शास्त्रार्थात पराभूत करेल त्याचाच मी पती म्हणून स्वीकार करेन’ असा पण तिने केला होता. विवाहेच्छुक अनेक विद्वानांना तिने वादविवादात पराभूत केले होते, अपमानित केले होते. तेव्हा विद्वानांनी सूडबुद्धीने एक षड्यंत्र रचले. मूर्ख कालिदासाशी तिचा विवाह घडवून आणला. हा आपला पती मूर्ख आहे हे कळताच तिने कालिदासांचा धिक्कार करून त्यांना अपमानित करून घरातून हाकलवून दिले.
अपमानदग्ध कालिदास भगवती कालीला शरण गेले. तिची उग्र उपासना त्यांनी आरंभिली. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन कालीने त्यांना अपूर्व अशी विद्वत्ता व प्रतिभा प्रसादरूपाने प्रदान केली.
प्रतिभासंपन्न कालिदास विद्योत्तमेच्या घरी परतले. घराची कवाडे बंद होती. त्यांनी दार खटखटवले आणि म्हटले, ‘ अनावृत्तकपाटं द्वारं देहि’ (दार उघड). आतून आवाज आला, ‘ अस्ति कश्चित् वागविशेषः? ‘ (काही वाग् वैभव आहे? ‘) पत्नीच्या प्रश्नार्थक वाक्यातील तीन वाक्ये आरंभी घेऊनच पुढे कालिदासाने तीन महाकाव्ये लिहिली.
१) ‘ अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा ‘ या चरणाने आरंभ होणारे ‘ कुमारसंभव ‘
२) कश्चितकांताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः ‘ या चरणाने आरंभ होणारे ‘ मेघदूत ‘ व
३) ‘ वागर्थाविव सम्पृक्तौ ‘ या चरणाने आरंभ होणारे ‘ रघुवंश ‘
कालिदासांचा जन्म कोठे झाला?
कालिदास कोठे जन्मले, त्यांची जन्मभूमी कोणती याविषयी अनेक मतप्रवाह आहेत. काही विद्वान त्याची जन्मभूमी काश्मीर मानतात तर काही हिमवत् प्रदेश. काहींच्या मते मालव तर काहींच्या मते बंगाल किंवा उडिसा. काहींच्या मते उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गुप्तकाशी जवळील कविल्ठा गावात कालिदास जन्मले. प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. काहीही असो पण त्यांचे बालपण निश्चितच मालवराजधानी उज्जैनीत गेले असावे. विक्रमादित्यही तेथलाच. त्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी कालिदास एक रत्न होते. खेरीज कालिदासाचे उज्जैनीप्रेम त्यांच्या वाङ् मयात ठाई ठाई दिसते.
कालिदास शैव म्हणजे शिवभक्त असावेत. तरीही इतर देव-देवतांविषयी आदर बाळगणारे होते हे त्यांनी केलेल्या विष्णू, ब्रह्मा यांच्या स्तुतींवरून म्हणता येईल.
वेश्यागमन हा कालिदासाच्या चरित्रावरील एक गडद कलंक आहे. श्रीलंकेत एका वेश्येनेच आपल्या घरी कालिदासाची हत्या केली. एका थोर, प्रतिभासंपन्न, शब्दप्रभूची व्यसनाधीनतेतून हत्या व्हावी हे फार क्लेशकारक आहे.
समस्यापूर्ति आणि घात
समस्यापूर्ति ह्या काव्यक्रीडा प्रकारात कालिदास निपुण होते. अनेक समस्यापूर्ति त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत. विस्तारभयास्तव त्या येथे सांगणे टाळतो. तरीही एका कथेचा व समस्यापूर्तीचा उल्लेख अनिवार्य आहे.
एकदा आपला मित्र कुमारदास याला भेटण्यासाठी कालिदास सिंहलद्वीपला गेले होते. तिथेच ते एका गणिकेकडे गेले असता तिच्याकडून त्यांना एक समस्या ऐकायला मिळाली. समस्यापूर्तीसाठी राजाने घवघवीत पारितोषिक घोषित केले होते. दिलेली समस्यापंक्ति अशी होती…
‘कमले कमलोत्पत्ति श्रूयते न तु दृष्यते’
(अर्थः- कमळातून कमळाची उत्पत्ती होते हे ऐकिवात आहे पण पाहिले मात्र नाही आम्ही)
कालिदासाशी मनोविनोद करताना त्या वेश्येने ही ओळ त्यांना सांगितली. ओळ ऐकताच कालिदासांच्या मुखातून पुढील ओळ निघाली..
‘बाले तवमुखाम्भोजात्कथमिन्दीवरव्दयम्’
(अर्थः- हे कन्ये, तुझ्या मुखकमलावर नयनरूपी निलकमले कशी बरे दिसत आहेत मग!)
समस्या क्षणात पूर्ण करणारेआपले हे ग्राहक साक्षात् कालिदास आहेत हे त्या गणिकेला ठाऊक नव्हते. उद्या याने राजाला भेटून ही केलेली समस्यापूर्ति ऐकवली तर आपले पारितोषिक हाच घेऊन जाईल या भीतीने त्या व्येश्येने त्याच रात्री कालिदासाचा कपटाने वध केला.
कठोर चौकशीअंती जेव्हा राजाला हे समजले तेव्हा तो फार चटपटला, विव्हळ झाला. तो त्या वेश्येला म्हणाला, हे लोभी गणिके, क्षुद्र मोहापायी तू ज्याला मारलेस तो कवी कालिदास होता. अगं हत्या करण्यापूर्वी मला सांगितलं असतंस तर मी पारितोषिकाच्या दसपट धन तुला दिलं त्या बदल्यात. काय केलंस हे. जग एका महाकवीला मुकलं ना!
कालिदासाचा काल
कालिदास ब्राह्मणकुलोत्पन्न होते. गुरुकुलातून ते विद्यासंपन्न झाले असावेत. त्यांच्या कालाविषयी मतमतांतरे आहेत. डॉ मिराशींनी इ. स. २५० ते ४५० हा कालिदासाचा काळ असावा असे सिद्ध केले आहे.
ते उज्जैनीचे रहिवासी होते. शककर्त्या चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या पदरी होते. गुप्त व वाकाटक या राजघराण्यांची सोयरीक होती. चंद्रगुप्ताची कन्या प्रभावती ही वाकाटकांच्या रुद्रसेनाची भार्या होती. रुद्रसेनाचे अकाली निधन झाल्यावर प्रभावतीने आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने राज्यशकट चालवायला आरंभ केला. तिच्या सहाय्यार्थ चंद्रगुप्ताने आपले काही अनुभवी अधिकारी वाकाटकांच्या राजधानीला विदर्भातील नंदिवर्धनला, म्हणजेच रामटेक जवळील नंदिग्रामला पाठविले. कालिदासही त्या अधिकाऱ्यांपैकी एक होते.
मेघदूत या खंडकाव्याची रचना तिथेच झाली. मेघदूतातील नायक यक्ष, नागपूरजवळील रामटेक म्हणजेच रामगिरी पर्वतावर कुबेराचा शाप भोगित होता.
कालिदासाने रामायणातील मूळ कल्पनेवर मेघदूताची उभारणी झाली आहे. रामाने मारुतीला दूत नियुक्त करून आपला संदेश सीतेला पाठविला ही गोष्ट मनात ठेवूनच कालिदासाने मेघदूताची रचना केली हे मल्लिनाथाचे म्हणणे सत्य वाटते.
कालिदासाच्या कलाकृती, ग्रंथसंपदा
एकूण अदमासे चाळीस रचना कालिदासाच्या नावावर सांगितल्या जातात.
नाटके
१)मालविकाग्निमित्रम् (राजा अग्निमित्र व मालविका यांची प्रणयकथा)
२) विक्रमोर्वशीयम् (राजा पुरुरवा व अप्सरा उर्वशी यांची प्रणयकथा)
३) अभिज्ञानशाकुंतलम् (राजा दुष्यंत व शकुंतला यांची प्रणयकथा)
महाकाव्ये
१) रघुवंशः (रघुवंशातील वीस कर्तृत्ववान राजांचे चरित्रगान)
२) कुमार संभवः (शिव-पार्वतीपुत्र कार्तिकेयाच्या जन्माची कथा)
खंडकाव्ये
१) ऋतुसंहारः (सहा ऋतुंचे विभ्रमवर्णन)
२) मेघदूतम् (मघाला दूत करून त्याकरवी संदेश पाठविणे)
वरील सात रचना निश्चित कालिदासाच्या मानल्या जातात. याविषयी विद्वानांत एकवाक्यता आहे. याखेरीज अधिक काही रचना अशा आहेत ज्यांच्याविषयी मतभेद आहेत. त्यातील काही रचनांची नावे –
१) उत्तम कलामृतम् (ज्योतिषविषयक ग्रंथ) २) श्रुतिबोधम् ३) शृंगारतिलकम् ४) सेतुकाव्यम् ५) पुष्पबाणविलासम् ६) श्यामा दंडकम् ७) ज्योतिर्विद्याभरणम् इ.
१)कुमार संभवम् २) रघुवंशः ३) मेघदूतम् ह्यांना ‘लघुत्रयी’ म्हणतात. मेघदूत हे खंडकाव्य मात्र विश्वविख्यात झाले आहे. दंडिचे अनुयायी याला महाकाव्य म्हणतात, तर पाश्चात्य विद्वान याला गीतीकाव्य (Lyric) म्हणतात.
मेघदूताचे थोडक्यात कथानक असे
एक यक्ष आपला स्वामी कुबेर याच्या सेवेत चूक करतो. कुबेर त्याला शाप देवून एक वर्षाकरिता अलका नगरीतून सीमापार करतो. आपल्या प्रेयसीपासून वियुक्त झालेला, विरहाने कृश झालेला तो यक्ष रामगिरी पर्वतावर वास्तव्य करतो. आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी तो आकाशात एक नवीन मेघ पाहतो. त्याचे मन अधिकच कष्टी होते. प्रेयसीची आठवण अधिक तीव्र होते. मग तो या मेघालाच आपला दूत बनवितो व अलकानगरीतील आपल्या प्रेयसीकडे निरोप घेऊन जाण्याची विनंती करतो. निरोप काय, तर हे प्रियतमे, थोडा धीर धरून आपले प्राण धारण करून रहा. चारच महिन्यात मी माझी शिक्षा भोगून त्वरित येईन व मग आपण पुन्हा परस्परांच्या सहवासात आनंदाने राहू.
हे छोटेसे कथानक ब्रह्मवैवर्त पुराणातले. पण त्यावर कालिदासाने आपल्या उत्तुंग प्रतिभेने जो भव्य काव्यप्रासाद उभारलाय तो पाहून वाचकाची मति गुंग होते.
मेघदूताचे दोन भाग आहेत.
१) पूर्वमेघ (श्लोक संख्या ६३)
२) उत्तरमेघ (श्लोक संख्या ५२)
एकूण श्लोक संख्या ११३.
या खंडकाव्यासाठी महाकवींनी अत्यंत भारदस्त आणि श्रुतिमधुर अशा ‘मंदाक्रांता’ या वृत्ताची निवड केली आहे.
(गण- म भ न त त ग ग)
पूर्व मेघात मेघाने रामगिरीपासून अलकानगरीपर्यंत कोणत्या मार्गाने जावे, वाटेत काय काय पहावे याचे विस्ताराने मार्गदर्शन केले आहे. उत्तरमेघात अलकापुरीचे, त्याच्या घराचे व प्रियतमेचे वर्णन आहे. बस!
काव्य शास्त्रदृष्टया मेघदूत
कथेतील नायक धीरललित आहे तर नायिका स्वकीया प्रेषितभर्तृका आहे. काव्यरस विप्रलंभ शृंगार. यक्ष नायक, यक्षपत्नी नायिका हे दोन आलंबन विभाव, मेघागमन हे उद्दीपन, विचारशून्यता, मेघयाचना हे अनुभाव ग्लानि, निराशा इ. सहचारी भाव व रति हा स्थायीभाव आहे. माधुर्य व प्रसाद ह्या दोन गुणांनी हे काव्य अलंकृत झाले आहे.
जगातील अनेक भाषांतून मेघदूताचे अनुवाद झाले आहेत. सर्वात प्राचीन अनुवाद तिबेटी भाषेतील आहे.
दीपशिखा कालिदास
कालिदासाने ‘रघुवंश’ काव्यातील नायिका इंदुमतीला दिलेली ही विश्वविख्यात उपमा, ज्यामुळे त्याला ‘ दीपशिखा कालिदास ‘ही पदवी रसिकांनी दिली.
संचारिणी दीपशिखेव रात्रौ
यं यं व्यतीयाय पतिंवरासा।
नरेंद्रमार्गाट्ट इव प्रपेदे
विवर्ण भावं स स भूमिपालः।।
अर्थः- रात्री फिरणा-या दीपज्योतीप्रमाणे ती पतीची निवड करण्यास निघालेली इंदुमती ज्या ज्या राजाला टाकून पुढे गेली, तो तो राजा राजमार्गावरील महालाप्रमाणे काळा ठिक्कर पडला.
कालिदासाचा गौरव करणारे सुभाषित
पुरा कवीनां गणना प्रसंगे
कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः।
अद्यापि तत्तुल्यकवेरभावात्
अनामिका सार्थवती बभूव।।
अर्थः- पूर्वी कवींच्या गणनाप्रसंगी कनिष्ठिकेवर कालिदासाला आधिष्ठित केले. (पण) अद्यापी त्याच्या तोडीचा कवी निर्माण न झाल्यामुळे पुढची अंगुली जी अनामिका ती ख-या अर्थाने अनामिकाच ठरली!
कालिदास स्मृतिदिन
कालिदासाविषयी फार थोडी माहिती इतिहासाला ठाऊक आहे हे वर सांगितलेच आहे. त्याचा जन्मदिन, मृत्युदिन याची कुठेच नोंद नाही. म्हणून कालिदासाचा स्मृतिदिन आषाढ प्रतिपदा हा सर्वानुमते ठरवला गेला. मेघदूताच्या आरंभीच्या दुसऱ्या श्लोकाच्या तिसऱ्या पंक्तीवरून हे ठरविले. तो श्लोक असा..
तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी
नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।
तेव्हा अशा या थोर कविकुलगुरू कालिदासांच्या रम्य स्मृतीस सादर वंदन!!
🙏🏻
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





