श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – तेथे नाही उरो आले अवतार… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
☆
तेथें नाही उरों आलें अवतार /
ते पामर जीव किती//१//
*
विषयाचे झणी व्हाल लोलिंगत /
चेवलिया अंत न लगे मग //२//
*
वाहोनिया भार कुंथसील ओझे /
नव्हे तेचिं माझें थीता त्याग //३//
*
तुका म्हणे कैसी नाही त्याची लाज /
संती केशीराज साधिकेला//४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
येथे धरतीवर अवतार घेऊन आलेले भले भले देव दानवही कायमचे टिकले नाहीत.मग पामरांची तरी येथे काय गनती. विषयसुखात कायमचे गुंतून पडाल तर अंतकाळ वाट्याला येणार हे ठरलेलेच आहे. मग तेच ओझे पाठीवर वहात कुंथत बसाल. खरेतर ते ओझे तुम्हाला पेलण्या सारखे नाही. त्याचा तर तुम्ही त्यागच करायला पाहिजे.
येथे मोठमोठ्या व्यक्ती, दानव,देव,इतकेच नव्हे तर देवानी घेतलेले दशावतारही टिकले नाहीत. त्यांचे नाव तरी त्यांच्या मागे किती काळ टिकले? मग तुम्हीच सांगा त्यांच्या समोर सरळ साध्या भोळ्या जीवांची ती कथा काय,?
तेथे किती आले आणि किती गेले. कसे गेले. याची मोजदाद तरी आहे काय? हेच येथले खरे सत्य आहे हे लक्षात ठेवावे. विषय सुखात आणि विषय उपभोगात गुंतण्यासाठी काही कष्ट पडत नाहीत आणि त्याला फारसा वेळही लागत नाही. तेथे गुंतल्यावर दुसरे काही करणेही सूचत नाही. सत्कर्मे करण्यासाठी वेळच मिळत नाही. विषयसुखांचे जडशीळ ओझे अंगावर पडल्यामूळे तेथेच तुम्ही कुंथत बसता. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सामान्य माणसाने जेवढे ओझे पेलेल तेवढेच उचलावे. जे जमेल तेवढेच करावे, शोभेल तेच ल्यावे. व पचेल तेच खावे. असा मोलाचा सल्ला तुकाराम महाराज आपल्याला आवर्जून देताना दिसतात.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







