रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? देवबाभळी… चित्र एक.. काव्ये दोन ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(१) -हळद लागली देवबाभळी

(भावगीत – (वर्ण संख्या २०, यति ११ व्या अक्षरावर))

फुले पखरली अंगांगावर कांचन बहरून आला 

हळद लागली देवबाभळी मधुरीम श्रावण झाला ||ध्रु||

*

पानगळीने एकटीच कधी बांधावर उदासवाणी

पावसऋतूत किती देखणी दिसते जणू महाराणी

वैद्यराज बाभूळ बहुगुणी हिज मानाचा शेला घाला 

हळद लागली देव बाभळी मधुरीम श्रावण झाला ||१||

*

लवलवणारी चिमणी पाती काट्यांचे मोहोळ भरले 

सडा टाकण्या मनमोहकसा कनक जणू पाझरले 

लोलक दिसती झुंबरातले किरणात कोवळ्या माला

हळद लागली देवबाभळी मधुरीम श्रावण झाला ||२||

*

वेडी बाभळ, शमीरूकु कधी बावळ म्हणून रूजली

केसुरडी, किंकरात, कोकई, रामकाठी नावे सजली

सोनरुपाचा मम् गीताने काव्य साज देखणा ल्याला 

हळद लागली देवबाभळी मधुरीम श्रावण झाला ||३||

* * * *

(२) बाभळीत या असे दुवा रे*

(वृत्त : वनहरिणी – मात्रा : ८+८+८+८=३२)

*

बांधावरल्या निर्जन जागी अंगावरती काटे सारे

बाभळ सांगे माझ्यामधले सत्व औषधी सारे घ्या रे ||ध्रु||

*

हिरडीसाठी दातखिळीने बळकट करते तुमच्या दाता

माझ्या शेंगा किती बहुगुणी लोणचे तुम्ही बनवा आता

साली पाने शेळ्या खाती डिंक घालुनी लाडवात रे 

बाभळ सांगे माझ्यामधले सत्व औषधी सारे घ्या रे ||१||

*

काटे घेऊन वावरते मी कधीतरी मी पिवळी होते

लाकूड फाटा बहुउपयोगी दारे खिडक्या त्याच्या देते

माझ्या शेंगा माझा पाला खाणाऱ्यांनो काटक व्हा रे 

बाभळ सांगे माझ्या मधले सत्व औषधी सारे घ्या रे ||२||

*

पाने झडली तरिही देते पांतस्थाला दाट सावली

काटे भरली सर्वांगाला आशिष देते होत माउली 

व्याधी वरती औषध साऱ्या बाभळीत या असे दुवा रे

बाभळ सांगे माझ्यामधले सत्व औषधी सारे घ्या रे ||३||

*

पशुपक्ष्यांची चिवचिव सारी माझ्या अंगा खांद्यावरती 

सुगरण खोपे विणतच जाते फांद्यावरती असंख्य घरटी

सुरक्षीत अन् आश्वासकसे बाहू माझे सावरणारे

बाभळ सांगे माझ्यामधले सत्व औषधी सारे घ्या रे ||४||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted