श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ छोटुली – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

ती पाच वर्षांची छोटुली आहे. मुलीच्या जन्मानंतर, आपल्या मुलीसाठी ‘छोटुली’पेक्षा जास्त चांगलं नाव तिच्या मम्मी-पप्पांना सुचलंच नाही. दिवस-रात्र छोटुली म्हणता म्हणता, तिचं नाव छोटुलीच पडलं. तशी ती लहानच आहे, पण तिचे पाय असे काही थिरकतात, की जसे काही तिचे प्राण नृत्यातच वसलेले आहेत. चेहर्‍यावरचे भाव आणि शब्दांचा ध्वनी एकमेकांशी एकरूप होतात, तेव्हा तिचं नृत्य सुरू होतं. तेव्हा आतूनच उत्स्फूर्तपणे विभ्रम सुरू होतात. त्यासाठी कुठल्या तालमीची किंवा कुठल्या गुरूची आवश्यकता नसते. मम्मी-पप्पा जेव्हा तिला असं नाचताना बघतात, तेव्हा ते स्वत:कडे बघू लागतात. त्यांचा एक पायसुद्धा सुराबरोबर ताळ- मेळ साधत नाही आणि हिच्याकडे बघा. सारं शरीर न थांबता थिरकत रहातं. त्यांच्या शुष्क जमिनीवर हिरवळ पसरणारा हा कुठला नैसर्गिक चमत्कार त्यांच्या घरी उपजलाय. कुठल्याही प्रकारच्या आवाजाने तिच्या शरीरात जी हालचाल होते, ती बेजोड असते.  

शहरापासून दूर गावात राहूनही छोटुलीच्या मम्मी-पप्पांना कळलं की कुठलं तरी टी.व्ही. चॅनेल नृत्याच्या शोसाठी प्रतिभावंतांचा शोध घेते आहे, तेव्हा त्या दोघा पती-पत्नींनी आपल्या मुलीचं, आपलं, भाग्य अजमावण्याचा विचार केला. मग सगळ्याचा शोध घेतला गेला. शहरात जाऊन कुठे तरी पेइंग गेस्ट म्हणून रहाणं शक्य आहे. एक दूरचे नातेवाईक आहेत. रहाण्यासाठी जागा शोधायला ते मदत करू शकतील. प्रयत्न करायला काय हरकत आहे?

 सगळ्या गोष्टी वेळेवर होत गेल्या. रहाण्याची व्यवस्था, येण्या-जाण्याची व्यवस्था. रहाण्यासाठी त्या नातेवाईकाच्या घरीच सोय झाली, तेव्हा त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. अर्थात हे आश्वस्त होणं, शहरात पोचण्यापुरतंच होतं. पुढे अनंत अडचणी होत्या. त्या पार करायला हव्या होत्या, नाही तर मग घरी परतणं होतंचं. पै पै गाठीला जोडून शहरात पोचले तर खरे, पण त्यांना वाटू लागलं आपण खूप मोठी चूक केलीय. त्यांच्या मुलीचं नृत्य पाहून इतक्या मोठ्या शोसाठी कोण तिची निवड करणार? ही कला तिच्या आई-वडलांच्या अंगात नव्हतीच मुळी. तेव्हा आपल्या मुलीकडून याची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे, असंही त्यांना वाटू लागलं होतं, पण मुलीकडे लक्ष जाताच, त्यांना पुन्हा वाटू लागायचं, की काही तरी खास तिच्या नृत्यामध्ये आहे, तिच्या वयापेक्षा मोठं… खूप मोठं.. तिच्या आई-वडलांचे विचार एकसारखेच होते. ‘एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? जास्तीत जास्त काय होईल? तिची निवड होणार नाही. थोडे पैसे खर्च होतील. इतकी काही आपली खालावलेली परिस्थिती नाही की पैशाची  काही व्यवस्थाच करू शकणार नाहीत. होय-नाही करत ते शहरात येऊन पोचले. इथली चमक-दमक, गर्दीच गर्दी, सगळ्यांच्या टवकारलेल्या नजरा जणू म्हणत होत्या, ‘तुम्ही इथे का… तुम्ही इथे कसे… तुमचं इथे काय काम…!’  प्रत्यक्ष कुणीच काही बोलत नव्हतं .त्यांचा स्वत:चाच न्यूंगंड त्यांना पाऊल पुढे उचलण्यापासून परावृत्त करत होता. आस-पास दिसणारे चेहरे वाचायचा ते प्रयत्न करत होते. या सगळ्यातून वर येत, नाव-नोंदणी करून नंबर घ्यावयाच्या रांगेत ते उभे राहिले. त्यानंतर कधी त्यांना बोलावलं जाईल, याची ते प्रतीक्षा करत राहिले. या सगळ्याशी काहीच देणं- घेणं नसलेलेली ती मुलगी आपल्या स्वत:मध्येच मश्गुल होती. या नव्या वातावरणात आपल्या जुन्या, नेहमीच तिच्या बरोबर असलेल्या, टेडी बेअरशी खेळण्यात व्यस्त होती.

संध्याकाळ होऊ लागली होती. निवडीसाठी नृत्य सादर करायची तिची वेळ जवळ येऊ लागली होती. काही झालं, तरी आज निवडीची प्रक्रिया पूर्ण होणारच होती. आजच्या नृत्यासाठी तिला कुणी तयार केलेलं नव्हतं. तिला जसं हवं तसं, जे हवं ते ती करू शकणार होती. तिच्या आई-वडलांना या गोष्टीची खात्री होती की ती गर्दीला घाबरत नाही. जेव्हा सांगावं तेव्हा, जिथे सांगावं तिथे ती आपली नाचू लागते. न सांगताही. तिचं थिरकणारं अंग-प्रत्यांग थांबता थांबत नाही. घरीदेखील गाणं कानावर पडताच, त्याच्या सुर-तालाबरोबर ती नाचू लागते. तिच्या चाहर्‍याचे भाव सुरांच्या आरोहा-अवरोहाबरोबर असे काही बदलत जातात, जसं काही कुणी या बदालाचा रिमोटच तिच्या मेंदूत बसवून ठेवलाय आणि बटण दाबताच एकामागून एक मनमोहक भाव तिच्या चेहर्‍यावर उमटू लागतात.

क्रमश:….

मूळ लेखिका – डॉ. हंसा  दीप 

Contact- Dr. Hansa Deep, 1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON – M2N2W7 Canada

Ph. 001 647 213 1817  Email- [email protected]

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments