कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

✈️ मी प्रवासी ✈️

☆ “ओह मॅन ! …” भाग – ६ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

‘Thousand Nights’ कँम्पच्या समोर आमची गाडी थांबली आणि वाळवंटात अचानक समोर दिसलेले ते ‘रिसेप्शन लाउंज’ पाहून गंमतच वाटली. आजच्या जमान्यात प्राणवायूइतकेच अत्यावश्यक झालेले ‘वाय-फाय’ कनेक्शन इथे उपलब्ध आहे म्हटल्यावर ‘हुश्श’ झाले. काउंटरवरची मुलगी ‘वाय-फाय’चा पासवर्ड सांगू लागताच, तिच्या उच्चारांची ढब मला ओळखीची वाटली. सहजच मी तिच्याकडे पाहून म्हटले, “अरे वा! सोप्पा पासवर्ड आहे” त्यावर डोळे विस्फारत ती शुद्ध मराठीत म्हणाली, “हो SSS ! अगदीच सोपा आहे!” ती नाशिकची ईशा नावाची मुलगी होती. तिच्याच शेजारी असलेला, नाशिकचाच हर्षवर्धनही लगबगीने पुढे आला. ओमानच्या वाळवंटी रिसॉर्टमध्ये आमच्या चक्क मराठीत सुरू झालेल्या गप्पा आवरत्या घेणे भाग होते, कारण सूर्यास्ताच्या आत आम्हाला वाळवंटातले काही विशेष अनुभव घ्यायला जायचे होते.

खास वाळवंटात चालणाऱ्या स्कूटरवरून किंवा उंटांवरून फेरफटका मारता येणार होता, ‘Dune Bashing Ride’ घेता येणार होती. अर्थात, यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार होते. Dune Bashing म्हणजे काय, तर एका ४ X ४ गाडीत बसवून वाळूच्या टेकड्यांवर रफ राईड! आर्मीच्या नोकरीत असताना, ईशान्य भारतात आणि राजस्थानमध्ये अनेक प्रकारच्या ‘रफ राइड्स’ मी केलेल्या असल्याने, पैसे भरून हाडे खिळखिळी करून घ्यायची मला अजिबात इच्छा नव्हती.

सर्वप्रथम ताजे-तवाने होण्यासाठी आम्ही तंबूत गेलो. त्या वातानुकूलित तंबूमध्ये सर्व पंचतारांकित सोयी होत्या. खोलीला लागूनच संडास-बाथरूम होती. मी आणि गिरीश पाय मोकळे करायला अल नासरसोबत बाहेर पडलो. स्वाती दादांजवळ थांबली. अल नासर सहजच म्हणाला, “चला, आपल्याच गाडीतून तुम्हाला सूर्यास्त पाहायला नेतो. कोणत्या पॉईंटवरून बेस्ट दिसेल ते मला माहिती आहे !”

जो अनुभव पैसे भरून मी घेणार नव्हतो, तो फुकटात (आणि मुख्य म्हणजे आम्हाला हव्या त्या वेगाने) घ्यायला मिळतोय म्हटल्यावर आम्ही आनंदाने निघालो. वाळूच्या टेकडीवर चढायला रस्ता असा नव्हताच, पण घाटामध्ये घेतात तशी वळणे घेत-घेत गाडी सफाईदारपणे चढत निघाली. पण टेकडीवर गेल्यावर मात्र ‘योग्य जागे’च्या शोधात अनेक खड्ड्यांमधून आणि उंचवट्यांवरच्या अरुंद मार्गावरून आमचा बैदू चालक हिंडत निघाल्यामुळे आम्हालाही थोडेफार Dune Bashing करता आले. अर्थात, वेग जास्त नसल्यामुळे हाडे मात्र शाबूत राहिली! गाडीतून अनवाणी पायांनी उतरल्यावर मऊसूत वाळूत पावले लोळवत फिरायलाही मजा आली. अल नसरला अचानक मला ‘शेख’ बनवण्याची हुक्की आल्याने त्याने माझ्या डोक्यावर खास ओमानी पद्धतीचा फेटा बांधून माझा फोटोही काढला!

आसपास चिटपाखरूही नव्हते. वाऱ्यामुळे वाळूच्या टेकडीच्या कपाळावर पडलेल्या सुबक आठ्या मोजण्यात, आणि त्यावरून चालत गेलेल्या किड्यांच्या पायांच्या ठशांचा माग काढता-काढता, माझ्या आयुष्याची अनेक वर्षे नकळतच गळून पडली आणि मी पुन्हा शाळकरी मुलगा झालो! हळूहळू खाली जात चाललेल्या सूर्याकडे पाहत, ‘कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा’ असे म्हणेपर्यंत निघायची वेळ झाली. आम्ही गाडीत बसल्यानंतर अल नसरने घोषणा केली की आता आपण वळणे-वळणे घेत नव्हे तर वाळूच्या उभ्या कड्यावरून सरळ खाली उतरणार आहोत! कड्यांवरून गाड्या चढवण्या-उतरवण्याच्या अशा ‘साहसी खेळां’चे व्हिडिओ मी पूर्वी पाहिले होते, पण अनुभव कधीच घेतलेला नव्हता. जी टेकडी चढायला आम्ही १५ मिनिटे घेतली होती, ती अक्षरशः तीस सेकंदात उतरून आम्ही खाली आलो आणि पुढच्या दोन मिनिटात कँम्पमध्ये परत पोचलोदेखील! तो अनुभव थरारक खरा, पण पुन्हा-पुन्हा घ्यावासा वाटण्यासारखा होता.

वाळवंटातली संध्याकाळ तिथल्या दिवसाच्या तुलनेमध्ये खूपच आल्हाददायक असते, कारण तापमान बरेच खाली येते. रिसेप्शनला लागूनच एक ‘कँम्प फायर’ची जागा होती. तिथे सात वाजल्यापासून शेकोटी पेटवलेली होती. त्या भोवती गोल रिंगण करून गाद्या घातलेल्या होत्या. लोक शांत बसून ‘माहौल’ चा आनंद घेत होते. शेजारी काही बैदू लोक आगीवर भाजलेल्या छोट्या-छोट्या गरम रोट्या खायला देत होते. तिथेच भेटलेल्या मुंबईच्या एका तरुण जोडप्याबरोबर माझ्या छान गप्पा झाल्या. ते नवरा-बायको उत्साही पर्यटक होते आणि आजवर दोघे-दोघेच अनेक देश हिंडलेले होते. आता तर त्यांच्या वर्षभराच्या तान्ह्या मुलाला सोबत घेऊन, स्वतःच भाड्याची गाडी चालवत ओमानमधे सगळीकडे हिंडत होते! 

जवळच जेवणाच्या हॉलमध्ये बुफे लावलेला होता. पंचतारांकित हॉटेलात असतात तशा प्लेट्स, काटे-चमचे आणि सजावट होती. जेवणाचा मेनूदेखील पंचतारांकित आणि भरगच्च होता. तिथे जेवण बनवणारे, बुफे लावणारी मुले आणि तिथला केटरिंग व्यवस्थापक हे सगळे भारतीय व बांगलादेशी होते. त्यामुळे आमची विचारपूस ते अधिक आपुलकीने करीत होते. व्यवस्थापकानेही आवर्जून येऊन आम्हाला काय हवे-नको ते विचारून तशी सोय केली.

जेवण झाल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या एका हेलिपॅडवर गेलो. अहमद नावाचा एक खगोलशास्त्राचा अभ्यासक आमच्यासोबत होता. आसपास मनुष्यवस्ती अजिबात नसल्याने गडद अंधार होता. आकाशदर्शनाची मला तशी फारशी कधी गोडी लागलेली नाही. पण अहमद इतक्या उत्साहाने सगळी माहिती सांगत होता की मलाही त्यात रस वाटला.

अल नासरने रात्रीच्या जेवणानंतर आम्हाला बजावून सांगितले की, “उद्या मस्कतच्या वाटेवर, ‘वादी बिन खालिद’ या जागी आपण थांबायचे आहे. तिथल्या स्वर्गीय अनुभवासाठी तुम्हाला तीन तास देखील कमीच पडतील. त्यामुळे इथून सकाळी लवकर निघू या. ” 

‘वाहिबा सँड्स’ मधल्या ‘Thousand Nights’ कँम्पची सकाळ जराशी थंड होती आणि आसपासचे वाळवंट धुक्याची चादर लपेटून शांत बसलेले होते. स्वाती नेहमीच्या सवयीप्रमाणे बाहेर फिरायला गेलेली होती. पण बराच वेळ ती न आल्याने मला जरा काळजीच वाटू लागली. तिचा फोनही लागत नव्हता. काही वेळानंतर ती परत येताना मला दिसली. चालता-चालता अचानक ‘धुक्यात हरवली वाट’ अशी तिची अवस्था झाली होती. मोकळ्या वाळवंटात दिशाहीन भटकण्याचा थरारही काही काळ तिने अनुभवला होता!

कँम्पमध्ये भरपेट नाश्ता करून आम्ही ‘वादी बानी खालिद’च्या वाटेला लागलो. या वादीमध्ये पाण्याचे बारमाही झरे आहेत. खडकांमधून वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्याची, काही खोलगट भागांमध्ये लहान-लहान तळी झालेली आहेत. ओमानवासीयांसाठी असे ठिकाण म्हणजे पर्यटनाचे एक मोठे आकर्षणस्थळ असल्यास काय नवल?

गाडी मुख्य रस्त्यावर ठेवून, एका उंच-सखल व खडकाळ रस्त्याने, सुमारे चार-पाचशे मीटर चालत झऱ्यापर्यंत जायचे होते.

दोनेकशे मीटरवर जरासे विस्तीर्ण तळे दिसले. “स्थानिक रीती-रिवाजानुसार, संपूर्ण अंगभर कपडे घालूनच तळ्यामध्ये पोहणे अपेक्षित आहे” अशा मजकुराचे बोर्ड तळ्याजवळ लावलेले होते. अल नासरने आम्हाला आधीच सांगितले होते की ज्या स्त्री-पुरुषांना पोहण्याच्या वेषात (Swimming Costumes घालून) डुंबायचे असेल त्यांनी पुढे झऱ्याजवळच्या भागात जावे. त्यामुळे, जराश्या उंचीवर असलेल्या धबधब्याकडे आम्ही चढत गेलो. डोंगरातून पडणारा धबधबा आणि त्याचे स्वच्छ निळेशार पाणी पाहताच आमचे मन उल्हसित झाले.

पाण्याच्या एका बाजूच्या कड्यालगत, एका व्यक्तीला जेमतेम उभे राहून कपडे बदलता येतील इतपत मोठे असे दोन तंबू लावलेले होते. “तंबू वापरल्यास पेटीमध्ये स्वेच्छेने काही पैसे टाकावेत” असे लिहिलेली एक दानपेटी बाहेर ठेवलेली होती. मात्र, कोणीही मनुष्य पैसे-वसुलीसाठी तिथे नव्हता. हे पाहून मला जरा नवलच वाटले.

पाण्याची खोली कडेकडेने पायाच्या घोट्याएवढी, तर प्रवाहाच्या मध्यभागी, काही ठिकाणी ८-१० फुटांइतकी होती. ते निळे पाणी इतके स्वच्छ होते की तळातले सफेद, गुळगुळीत गोटे आणि पाण्यात पोहत असलेले लहान-लहान मासे अगदी सहज दिसू शकत होते.

क्षणार्धात मला जाणवले की अनेक लहान-लहान माश्यांनी माझ्या पावलांना बारीक-बारीक चावे घ्यायला सुरुवात केली होती. आधी जरा विचित्र वाटले खरे, पण थोड्या वेळाने सवय झाली. चावे घेऊन तळपायाची मृत कातडी ते मासे खाऊन टाकतात आणि आपले पाय स्वच्छ होतात. त्या नैसर्गिक ‘पेडिक्युअर’चा लाभ घेत मी बराच वेळ तिथे उभा राहिलो. देशोदेशीचे लोक वादी बानी खालिदमध्ये डुंबायला आलेले होते. एक वयस्कर बाई आणि तिच्यासोबतची काही मंडळी पूर्व युरोपमधल्या लिथुआनिया देशातले होते. एक मध्यमवयीन पुरुष, त्याची पत्नी आणि तरुण मुलगी केरळी हिंदू परिवारातले असावेत असा माझा कयास होता. त्यांच्यासोबत माझा काही जुजबी संवाद झाला. तो मनुष्य मूळचा केरळमधील पालघाट या गावाचा होता (आता त्या गावाला पालक्कड म्हणतात). पण गेली बरीच वर्षे तो ओमानमध्येच स्थायिक होता.

आमच्या जवळच, पंजाबी-मिश्रित हिंदी भाषेत बोलणारी काही मुले लाईफ जॅकेट्स घालून कड्यावरून पाण्यात उड्या टाकत होती. प्राची खोल पाण्यात जायला बिचकत असल्याने त्यातल्या एका तरुणाला, त्याचे जॅकेट थोडा वेळ वापरायला देण्याची विनंती केली. परंतु, “यहाँ बाहर ही किराए पर आपको मिल जायेगा” असे उत्तर मिळाले. नंतर त्याला काय वाटले कोण जाणे? त्याने वरूनच ते जॅकेट टाकले. आम्ही त्याला ‘धन्यवाद” असे म्हणताच तो तरुण प्रसन्नतेने हसला आणि म्हणाला, “हम पाकिस्तान से हैं, पर आप के दुश्मन नहीं है!” 

– क्रमशः भाग ६  

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted