श्री विश्वास विष्णु देशपांडे
✈️ मी प्रवासी ✈️
☆ उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास… भाग- ५ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
आजचा आमच्या सहलीचा सहावा आणि अखेरचा दिवस. आज सकाळीच जिम कॉर्बेटच्या सफारीसाठी निघायचे होते. सकाळी साडेचारलाच उठलो. तयार होऊन बसमध्ये बसलो. जिम कॉर्बेट अभयारण्यापासून आमचे हॉटेल साधारण दहा किमी लांब होते. बरोबर पाच साडेपाचच्या सुमाराला जिम कॉर्बेटच्या धनगरी गेटजवळ पोहोचलो. तिथे सफारी जीप्स तयारच होत्या. तेथील अधिकाऱ्यांनी आमची आधार कार्ड्स ओळखीसाठी मागितली. जिम कॉर्बेट पार्कमध्ये मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मोबाईल गेटजवळ असलेल्या लॉकर्समध्ये जमा करावा लागतो. सफारी संपल्यावर आपल्याला तो परत मिळतो. वनाधिकाऱ्यांच्या परवानगीने कॅमेरा नेता येतो.
जिम कॉर्बेट हा भारतातील सर्वात जुना आणि पहिला व्याघ्रप्रकल्प आहे. इंग्रज वंशीय भारतीय शिकारी जिम कॉर्बेट यांचे नाव या अभयारण्याला देण्यात आले आहे. नामशेष होत चाललेल्या बंगाली वाघांचे संरक्षण करणे हा या पार्कचा प्रमुख उद्देश होता. त्यामुळे या प्रकल्पात वाघ हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असतेच. आजमितीला जवळपास दोनशे पन्नास वाघ या अभयारण्यात आहेत अशी माहिती आमच्या गाईडने दिली. त्याशिवाय हत्ती, अस्वले, विविध वन्य प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या विविध प्रजातींनी हे जंगल समृद्ध आहे.
जिम कॉर्बेटमध्ये जाण्यासाठी अनेक प्रवेशद्वारे आहेत. धनगरी किंवा धनगडी या प्रमुख गेटवरून आम्ही जीप सफारी घेतली. एका जीप सफारीसाठी साधारणपणे ७५०० रू एवढे शुल्क आकारले जाते. एका जीपमध्ये सहा व्यक्तींना परवानगी आहे. या जीप्स उघड्या असतात. त्यामुळे जंगलाचे सौंदर्य मनसोक्त पाहता येते. उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी साडेपाच ते साडेआठ किंवा सहा ते नऊ वाजेपर्यंत या जंगल सफारी चालतात. संध्याकाळी तीन ते सहा अशी साधारण वेळ असते. उन्हाळा किंवा हिवाळा या ऋतूंप्रमाणे वेळा थोड्या बदलतात.
गेटवरील सर्व सोपस्कार आटोपून आमची जीप सफारी ढिकला क्षेत्रात जाण्यासाठी निघाली. सकाळची वेळ होती. प्रसन्न वातावरण होते. वातावरणात सुखद गारवा होता. गाडी लवकरच घनदाट जंगलात शिरली. रस्ते कच्चे आणि खडकाळ होते. पण सकाळच्या वेळी जंगलातील वातावरण पाहून मन अगदी हरखून गेले. इतके सुंदर जंगल एवढया सकाळी कधी पाहिले नव्हते. सकाळबरोबरच जंगलातील वातावरणही जणू उमलतं. एक नवी कोरी सकाळ तुम्हाला बघायला मिळते. जंगलातील झाडांचा गंध काही वेगळाच असतो. आपल्या रोजच्या शहरी वातावरणात हा गंध आपल्याला कधी अनुभवायला मिळत नाही. हवा अतिशय शुद्ध होती. ही हवा मी मनसोक्त फुफ्फुसात भरून घेत होतो. थोडेसे अंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला हरणांचे कळप दृष्टीस पडले. आता या जंगलातील प्राण्यांना बहुधा माणसांची सवय झाली असावी. त्यामुळे जीप पाहूनही त्यांना काही फरक पडला नाही. ते आपले मजेत चरत होते. माकडांच्या टोळ्याही ठिकठिकाणी होत्या. विविध रंगीबेरंगी पक्षी आपल्या मधुर आवाजाने सकाळची भूपाळी गात होते. आणखी काही अंतर पुढे गेल्यानंतर पूर्ण पिसारा फुललेले मोर दृष्टीस पडले. जंगलात मधून मधून मुंग्यांच्या वारुळासारखी घरे दृष्टीस पडत होती. परंतु ती वाळवीची घरे आहेत असे आमच्या गाईडने सांगितले. ही घरे फारच सफाईदार पद्धतीने बांधलेली असते. त्यात अगदी शेवटपर्यंत हवा खेळती राहते. त्यामुळे या छोट्या जीवाचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. वाळवीचे आणखी एक वैशिष्ट्य गाईडने सांगितले की ती हिरव्या किंवा जिवंत झाडाला कधीच लागत नाही. वाळलेले लाकूड हे तिचे खाद्य! त्यामुळे लाकडाचे लवकर विघटन होऊन पर्यावरणात ते मिसळून जाते. अशा रीतीने वाळवी पर्यावरणासाठी सहायक ठरते.
या अभयारण्यात प्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. अशाच एका नाल्यात आम्हाला एक झाड पडलेले दिसले. त्या झाडाच्या एका फांदीलगत एक घोरपड दृष्टीस पडली. मध्येच रानडुकरांच्या काही टोळ्या आमच्यासमोरून गेल्या. भव्य अशा गरुड पक्ष्याचे दोन तीन वेळा दर्शन घडले. हा सरपन्ट ईगल आहे अशी माहिती आम्हाला मिळाली. जंगल नैसर्गिक आणि स्वच्छ राहण्यात इथले वनाधिकारी, गाईड आदी लोक महत्वाची भूमिका बजावतात. आपल्याजवळील खाद्यपदार्थांचे वेष्टन, कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या आदी गोष्टी ते जंगलात टाकू देत नाहीत. प्राण्यांना माणसांपासून कमीत कमी त्रास किंवा उपद्रव व्हावा याची काळजी ते घेतात.
जंगल सफारीचा वेळ आता संपत आला होता. बरेच फिरल्यावर देखील आम्हाला वाघ किंवा हत्ती वगैरे दिसले नाहीत. आमचा गाईड म्हणाला की वाघ दिसणे हा नशिबाचा भाग आहे. आमच्यातील काही मंडळी वाघ दिसला नाही म्हणून जरा नाराज झाली होती. पण मी त्याबद्दल फार काही वाटून घेतले नाही. याची दोन कारणे होती. एक म्हणजे वाघाचे दिसणे जरा दुर्मिळ आणि नशिबाचा भाग आहे हे मी जाणून होतो. आणि चंद्रपूरजवळील ताडोबाच्या अभयारण्यात मी वाघांना गाडीजवळून जाताना पाहिले होते. दुसरी गोष्ट म्हणजे मी केवळ वाघ पाहण्याच्या उद्देशाने गेलो नव्हतो. पहाटेच्या वेळी जंगल पाहणे आणि अनुभवणे हा माझा उद्देश होता. तो सफल झाला होता. जंगल पाहून मी ताजातवाना झालो होतो.
सफारीनंतर आम्ही हॉटेलवर परतलो. फ्रेश होऊन नाश्ता घेतला. थोडा आराम केला. परत धनगरी कॉर्बेट म्युझियम पाहण्यासाठी निघालो. जिम कॉर्बेट अभयारण्यातील वन्यजीवांची माहिती, मगर, वाघ, सांबर, हत्ती आदींचे जतन केलेले अवशेष इथे बघायला मिळतात. वन्य जीवांची माहिती आणि जिम कॉर्बेट अभयारण्याचा इतिहास या ठिकाणी आपल्याला जाणून घेता येतो. याच ठिकाणी एक सुवेनिर शॉप आहे. तिथे जिम कॉर्बेटबद्दल आणि वन्य जीवांबद्दल माहिती देणारी पुस्तके, हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेल्या विविध वस्तू आपण खरेदी करू शकतो.
दुपारी जेवणासाठी आम्ही पुन्हा हॉटेलवर परतलो. सुग्रास भोजनाचा आस्वाद घ्यायला मिळाला. विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. जेवणानंतर थोड्या वेळाने आम्ही पुन्हा जिम कॉर्बेट यांचे निवासस्थान असलेल्या काळाढुंगी येथे गेलो. आपल्याला कल्पना असेल की जिम कॉर्बेट हे इंग्रज वंशाचे पण भारतीय शिकारी होते. ते केवळ शिकारी नव्हते तर वन्यजीवांचे अभ्यासक, एक उत्तम लेखकही आणि संशोधकही होते. त्यांनी ज्या शिकारी केल्या त्या केवळ नरभक्षक वाघांच्या केल्या. त्यांच्या या निवासस्थानाचे रूपांतर आता संग्रहालयात करण्यात आले आहे. इथे जिम कॉर्बेट यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू, चित्रे, पेंटिंग्ज, त्यांची हस्तलिखिते आदी गोष्टी पाहता येतात. १९२२ मध्ये बांधलेला त्यांचा हा बंगला सुस्थितीत जतन करण्यात आला आहे. बंगल्याचा परिसर विशाल आणि निसर्गरम्य आहे.
आजचा आमच्या सहलीचा हा अखेरचा दिवस होता. रात्री आम्ही याच द बनियन रिट्रीट या हॉटेलमध्ये विश्रांती घेतली. सकाळी नाश्ता करून आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. बसने दिवसभर प्रवास करून आम्ही संध्याकाळी दिल्लीला पोहोचलो आणि पहाटेच्या सुमारास पुण्यात विमानाने परत आलो. आमच्यासोबत आमच्या सामानासोबतच होत्या या सहलीच्या साऱ्या रम्य आठवणी.
– समाप्त –
©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे
चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







