श्री सुजित कदम

 

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #97  ?

☆ पडवी 

हल्ली शहरात आल्या पासून

गावाकडंची खूप आठवण येऊ

लागलीय

गावाकडची माती

गावाकडची माणसं

गावाकडचं घर

अन्

घरा बाहेरची पडवी

घराबाहेरची पडवी म्हणजे

गावाकडचा स्मार्टफोनच…!

गावातल्या सर्व थोरा मोठ्यांची

हक्काची जागा म्हणजे

घराबाहेरची पडवीच…!

जगातल्या प्रत्येक गोष्टीवर इथे

चर्चासत्र रंगतं

आणि कोणत्याही प्रश्नावर इथे

हमखास उत्तर मिळतं

दिवसभर शेतात राबल्यावर

पडवीत बसायची गंमतच

काही और असते..

अन् माणसां माणसांमध्ये इथे

आपुलकी हीच खासियत असते

पडवीतल्या गोणपाटावर अंग

टाकलं की ,

आपण कधी झोपेच्या

आधीन होतो हे

कळत सुध्दा नाही

पण शहरात आल्या पासून ,

ह्या कापसाच्या गादीवर

क्षण भर ही गाढ झोप

लागत नाही…!

घराबाहेरचं सारं जग एकाएकी

अनोळखी वाटू लागलंय….

अन् ह्या चार भितींच्या आत

आज.. डोळ्यांमधलं आभाळं देखील

नकळतपणे भरून आलंय

कधी कधी वाटतं

ह्या शहरातल्या घरांना ही

गॅलरी ऐवजी

पडवी असती तर

आज प्रत्येक जण

स्मार्टफोन मधे डोकं

खुपसून बसण्यापेक्षा

पडवीत येऊन बसला असता…

आणि खरंच

गावाकडच्या घरासारखा

ह्या शहरातल्या घरानांही

मातीचा गंध सुटला असता….!

 

© सुजित कदम

संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments