श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ निराकरण… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
कधीतरी लिहिले मी जे,
वाचशील वाटले होते.
समजून घेशील आशयाला,
असेही वाटले होते.
काळजात दाटल्या मेघांचे ,
मी पाऊस घेउनी आलो.
वेगळ्या सरीत माझ्या ,
भिजशील वाटले होते.
विस्कळीत कवितेची माझ्या,
इतस्ततः झाली पाने.
एकत्र वहीत त्यांना,
बांधशील वाटले होते.
उत्तरे सर्व प्रश्नांची,कधीतरी ,
देशील वाटले होते.
निराकरण संभ्रमाचे माझ्या ,
तुझ्या जे माैनात साठले होते.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




