सुश्री तृप्ती कुलकर्णी

?विविधा ?

☆ सुराचा जयघोष… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

भारतीय सणांच्या पार्श्वभूमीमध्ये संघर्ष ही भावना अटळ आहे. आपले अनेक सण आहेत जे आपण साजरे करतो त्याच्या मागे कसल्या ना कसल्या युद्धाची, संघर्षाची निशाणी दिसते. कधी रणांगणावर झालेली मोठ्या स्वरूपातली किंवा लहान स्वरूपातली. संघर्ष आणि मग त्यानंतर मांगल्याचा, पावित्र्याचा विजय म्हणून सणांचा उत्सव केला जातो. आणि या पारंपारिक संघर्षातले नायक म्हणजे सुर (देव) आणि खलनायक असुर (राक्षस). यातला असुराचा पराजय हा आपल्या सणांच्या साजरीकरणासाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू. ‌

असुर हे नावच मोठं गमतीशीर. यातल्या असुरांचे समानार्थी शब्द राक्षस, दानव हे असले तरीसुद्धा मुळात मला ‘असुर’ या नावाबद्दल जास्त कुतूहल वाटतं.

निसर्गाचा, पृथ्वीचा आपला असा एक सूर असतो, त्याला कंप आहे, नाद आहे, आणि गती देखील आहे. त्या सुराशी, गतिशी, नादाशी जो जुळवून घेत नाही, जो त्यावर अतिक्रमण करतो, जो त्यात अडथळा आणतो तो असुर, या अर्थाने हे असुरत्व व्यापक असावं असं मला वाटतं. केवळ पारंपारिक प्रतिमा आणि प्रतीकांच्या रूपापुरतंच ते मर्यादित नसावं. कारण प्रतीकं, प्रतिमा नाहीशा होतात. बदलल्याही जातात. पण मूळ वृत्ती ही मात्र स्थिर राहते. फक्त तिच्या तीव्रतेचं प्रमाण काळानुसार कमी-जास्त होत राहतं. या दृष्टिकोनातून पाहिलं तर सुर वृत्ती आणि असुर वृत्ती या दोन्हीही पृथ्वीवर अखंड काल नांदत आलेल्या आहेत असंच दिसतं.

जिथे जिथे सुरळीतता, समीपता, सुंदरता, सुनियोजितता, समर्पितता, समरसता आहे तिथे तिथे विघ्न निर्माण करणारे त्याला विध्वंसक वळण देणारे असे असुरत्व आज आपल्याला जागोजागी सापडते. या विध्वंसाची भाषाच वेगळी असते. ती फक्त मद, मोह, अभिलाषा, अहंकार यांनीच व्यापलेली असते. तिला स्थळाकाळाचं कशाचंही बंधन नसतं. मुख्य म्हणजे ती वास्तवाचा विचार करत नाही. वास्तवाशी पूर्णपणे फारकत घेणे, नियतीशी लढणे हेच तिचं उद्दिष्ट असतं. स्वार्थ केंद्रित सत्तेचे अधिष्ठान हाच फक्त त्याचा पाया असतो आणि भवतालाचा अमर्याद, बेसुमार उपभोग, त्यासाठी इतरांची पिळवणूक ही त्याची वृत्ती असते.

सुरुवातीला सुप्त प्रमाणात दिसणाऱ्या या वृत्तीचं जेव्हा मोठ्या प्रमाणावर रूपांतर होतं तेव्हा संघर्षाची बीजं रोवली जातात. आणि सुरांचा जय होतो. जो नैसर्गिक व स्वाभाविक आहे. हा जयघोष आपल्या ध्यानीमनी सतत उमटत राहावा, आशेचा दीप तेवत राहावा म्हणून हे सण!

सध्याच्या जागोजागी आढळणाऱ्या असुरवृत्तीमध्ये आपल्यातलं सुरत्व जपण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात निर्माण होवो. आणि त्यात त्याला यश मिळो याच सदिच्छा!

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted