श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ अंदाज… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
मातीत तू स्वतःला पेरून रोज घ्यावे
जपण्यास माणसाला उगवून रोप व्हावे
*
दाता निसर्ग आहे माणूस पोसणारा
देतो उदार हस्ते त्याच्या पुढे झुकावे
*
ज्याच्या मुळे मनाला मिळतो खरा दिलासा
आहेच देव तेथे जाणून हेच घ्यावे
*
पाऊस ऊन वारा उपकार थोर त्यांचे
हे देवदूत सारे त्यानाच तू स्मरावे
*
सांगून संत गेले सर्वत्र देव आहे
जे जे जिवंत त्याला देवत्व देत जावे
*
टाळून अंधश्रद्धा कर्तृत्व दाखवावे
कर्मा सवे श्रमाला कार्यात गुंतवावे
*
जे वाटते मनाला बोलून व्यक्त व्हावे
प्रेमात गुंतताना मन मोकळे असावे
*
निरखून वास्तवाला जगण्यात मोज आहे
अंदाज बांधताना ते नेमके असावे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




