श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४१ आणि ४२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्तिसूत्रे ४१
तस्मिन्स्तज्जने भेदाभावात् ॥ ४१ ॥
अर्थ :भगवंत आणि त्याचे भक्त यामध्ये भेदाचा अभाव असतो. अर्थात भक्त आणि भगवंत वेगळे नसतात.
विवेचन:~ मागील सूत्रात महत्संग दुर्लभ अगम्य अमोघ आहे पण तो भगवत्कृपेने प्राप्त होतो असे सांगितले, तेव्हा भगवत्कृपा व महात्म्या पुरुषाच्या संगती प्राप्तीत कार्य-कारण भाव संबंध कसा अशी शंका कोणी घेईल, त्याचे उत्तर या सूत्रात दिले आहे. येथेही ‘तत्’ शब्दाचा प्रयोग केला आहे तो ‘भगवंत’ वाचक आहे. (म्हणून मागील सूत्रातील ‘तत्’ शब्दही भगवद्वाचकच घेणे योग्य आहे.) त्या भगवंताचा व तज्जन म्हणजे सर्वस्वी त्याचेच झालेले (असलेले) भक्तजन यांचा भेद नाही. शास्त्रामध्ये अन्योन्याभावास भेद म्हणतात. अन्योन्याभावास प्रतियोगि व अनुयोगी लागतात. म्हणजे ज्याचा अभाव तो प्रतियोगी व ज्याचे ठिकाणी अभाव तो अनुयोगी म्हटला जातो. उदाहरणार्थ घट हा पट नाही, या वाक्यात घट हा प्रतियोगी पट हा अनुयोगी आहे. म्हणजे घटाचा अभाव पटाचे ठिकाणी दाखविला जातो. जर पट हा घट नाही अशी वाक्ययोजना केली तर पट हा प्रतियोगी व घट हा अनुयोगी होईल.
दुधामध्ये लोणी असते, ताक घुसळले की त्यातून लोणी आपसूक वर येत असते. या सूत्रानुसार मनुष्याची अंतर्यामी भगवंत असतोच, मनाचा तळ आणि तळाशी असलेला मळ नष्ट झाला की मनांची शुद्धता होते. मग मनाच्या तळाशी असलेला भगवंत नकळत मनात प्रगट होत असतो.
इथे संत मुक्ताबाई यांचा एक अभंग आहे…..
ब्रह्मा दिसे उघडे जगामध्ये |
एकची तंतू नानापरी कपडे ||
धोतर आणि लुगडे || १ ||
*
एकची माती नानापरी भिंती
रांजण आणि सुगडे || २ ||
*
एकची सोने नानापरी दागिने|
लेणे बाळी आणि भूगडी || ३ ||
*
म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा
हरी आणि रोकडे || ४ ||
*
थोडक्यात वरील अभंगातून आपल्या लक्षात येईल की अनेक प्रकारे भगवंत प्रत्येक वस्तूमध्ये असतोच असतो. तो योग्यवेळी प्रगट होतो. अर्थात भक्तांमध्ये भगवंत असतोच, योग्यवेळी तो प्रगट होऊ शकतो.
या सूत्रामध्ये भक्ताकरिता अथवा संत महात्म्याकरिता ‘तज्जन’ हा शब्द वापरला आहे. केवळ संत भक्त भाविक महात्मा या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. श्री नारदांनी अभिप्रेत अर्थ दाखविण्याकरिता ‘तज्जन’ शब्दाचा उपयोग केला असावा असे वाटते.
ही अवस्था प्राप्त होणे ही ‘तज्जन’ होणे आहे. अशा भक्ताचा व देवाचा भेद राहील कसा? उभयतांमध्ये असा तादात्म्य संबंध आहे म्हणूनच मागील सूत्रात सत्संग हा भगवत्कृपेने लाभतो असे नारद म्हणतात.
श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की ज्याच्याकडे जाऊन भौतिक गोष्टी मिळत नाहीत, तरीही त्याच्याकडे जावेसे वाटते. त्याच्याकडे जाऊन आंतरिक समाधान लाभते, त्याला संत म्हणता येईल. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात,
“संत चरण रज लागता सहज, वासनेचे बिज जळूनी जाय । मग रामनाम उपजे आवडी, सुख घडोघडी वाढु लागे । कंठी प्रेम दाटे नयनी नीट लोटे । हृदयी प्रगटे रामनाम हृदयी प्रगटे रामनाम । तुका म्हणे साधन सुलभ गोगटे परी उपतिष्ठे रामनाम ॥”
जय जय रघुवीर समर्थ
—
नारद भक्तिसूत्रे. ४२
तदेव साध्यताम् तदेव साध्याताम् ॥ ४२ ॥
अर्थ : तोच सत्संग साधावा. तोच सत्संग साधावा.
विवरण : मागील चौतिसाव्या सूत्रापासून भक्तिसाधनाचा विचार केला आहे. विषयत्याग, संगत्याग, अव्यावृत भजन, भगवद्गुणश्रवण, कीर्तन इ. साधने सांगितली. नंतर मुख्यत्वाने महत्कृपा हे साधन सांगितले व महत्संग दुर्लभ, अगम्य व अमोघ आहे हेही स्पष्ट केले आणि भगवत्कृपेने सत्संग प्राप्त होतो, तत्त्वतः भगवान व संतमहात्मे यांच्यात भेद नाही. ज्याना भक्तीचा लाभ व्हावा असे वाटत असेल त्यानी महत्संगच साधावा असे आदराने द्विवार सांगितले आहे. याचे कारण मागे सांगितलेली विषयत्याग संगत्याग इ. साधने ही महत्संगाच्या द्वाराच सिद्ध होऊ शकतात. सत्संगच का साधावा? याची कारणे खाली दिली आहेत.
भक्ति सिद्ध होण्याकरिता आवश्यक असा विषयत्याग होण्याकरिता सत्संगतीच पाहिजे. साधकाला भगवंताचे दर्शन व्हावे असे वाटतं असते. त्यासाठी त्याच्या अंतरंगाची शुद्धता होणे अनिवार्य असते. त्यासाठी स्वतःचे दोष कळणे अत्यंत गरजेचे असते. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे की गोंदवल्यात आला आहात, तर माझ्या रामाचे डोळे भरून दर्शन घ्या. त्याचे वैशिष्ट्य असे आहे की तो तुम्हाला तुमचे दोष सांगेल. आपले दोष आपल्याला कळणे ही परमार्थ मार्गातील महत्त्वाची पायरी. थोडक्यात सांगायचे झाल्यास असे सांगता येईल की संत दर्शनाने आपले दोष आपल्याला कळून येतात. (दुसऱ्याने आपले दोष दाखविले तर मनुष्याला रुचत नाहीत…) श्री तुकाराम महाराज म्हणतात, “बैसता संताचे संगती । कळो आले कमळापती । आपुली कोणीच नव्हती । निश्चय चित्त दृढ झाला ॥ १ ॥”
संग म्हणजे आसक्ती. बाह्य विषयात दोषदर्शन होऊन कदाचित तात्कालिक त्याग झाला तरी अंतरातील विषयत्याग म्हणजे संग नष्ट होत नाही. ती आसक्ती नष्ट होण्याकरिताही सत्संगती उपयुक्त आहे.
तिसरे अव्यावृत भजन – जे भजन भोगासाठी होते ते अव्यावृत म्हणजे अखंड कधी होत नाही. अव्यावृत भजनाकरिता संतकृपेचीच आवश्यकता आहे. ध्रुव, प्रल्हाद, वाल्मीकि याचे जे अखंड भजन होत होते भगवंतांच्या कृपेमुळेच. श्रीतुकाराम महाराज म्हणतात, ‘कृपा केली संतजनी । माझी अलंकारिली वाणी । प्रीत हे लाविली कीर्तनी । तुका चरणी लोळतसे ॥’ म्हणून जी साधने मागील सूत्रांतून सांगितली आहेत ती ती सर्व सत्संगतीने सिद्ध होतात. म्हणून ती सत्संगतीच साधण्याचा साधकाने प्रयत्न करावा. त्यायोगे वरील सर्व साधने व साध्य प्राप्तीही अनायासेच सिद्ध होईल.
इथे एकच सूत्र दोनदा सांगितले आहे. माउली आपल्या हरिपाठात सुद्धा हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा असे दोनदा सांगतात. इथे पहिले हरि हे साधन म्हणून आहे तर दुसरे हरि हे साध्य म्हणून आहे असे समजावे. साध्य व ती साधने महत्संगानेच सिद्ध होतात हे सिद्ध करण्याकरिता द्विरुक्ती असावी असे वाटते.
माऊली म्हणतात, तू सतत हरिचे नाम घे. त्याची गणना करू नकोस. मनुष्याला जिवंत राहण्यासाठी श्वसन करावे लागते. मग मनुष्य असे म्हणत नाही की आज मी फक्त पाचवेळाच श्वसन करेन, मला कंटाळा येतो, सारखे श्वसन करण्याचा. तद्वतच मनुष्याने सतत नामस्मरण करावे, हरिचे नाम घ्यावे असे माऊली आपल्याला सांगतात. नामयोगी असलेले माझे सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात,
“नाम सदा बोलावे, गावे, भावे जनासी सांगावे”
मुखात नाम येणे किंवा नामस्मरण करावेसे वाटणे हेच मुळात मोठे पुण्य आहे. मानव देहधारी असलेला जीवच फक्त नाम घेऊ शकतो, बाकी इतर योनींतील जीवांना
ही सुविधा उपलब्ध नाही आणि त्यामुळे नाम घेण्यासाठीच जीवाला मनुष्य देह प्राप्त झाला आहेस असे सर्व संत सांगतात. मनुष्याने हे ध्यानात ठेवून अखंड नाम घेण्याचा प्रयत्न करावा. हेच मोठे पुण्य.
नाम सतत घेतले पाहिजे. वेळ मिळाला की नाम घेतले पाहिजे. असे करता आले तर नामाशिवाय क्षण ही फुकट जाणार नाही. नामस्मरणाला वेळ मिळत नाही ही लंगडी सबब आहे. जेवढा रिकामा वेळ मिळतो तेवढ्या वेळात जरी रोज नामस्मरण केले तरी नामाच्या राशी पडतील. खरोखर आपण रोज किती वेळ फुकट घालवितो.
नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोषहरण करुन नाम त्याला दोषमुक्त करते, म्हणून जड-जीवांना तारणारे नामस्मरणच आहे. एकाच नामस्मरणाची शेकडो-हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो.
म्हणून मनुष्याने पापपुण्याच्या हिशेबात न गुंतता नाम घेणे जास्त हिताचे.
जय जय रघुवीर समर्थ
नारद महाराज की जय!!!
– – भक्ती सूत्र क्र. ४१ आणि ४२.
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





