श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ घंटा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
(देव प्रिया / कालगंगा)
☆
शांत होती तप्त झाली सूर्य येता सावली
शोधताना का तिला ही माणसे कंटाळली
*
कोणत्या हळव्या व्यथानी भंगलो मी आतुनी
काळजी वाटून माझी शांतता धास्तावली
*
नाव नाही गाव नाही ओळखी ना पाळखी
कोण होते भेटले ते वाट ज्यांनी दावली
*
फाटके आयुष्य होते सोसण्याला यातना
हात हाती घेत माझी लाज तू सांभाळली
*
अंतरी हव्यास होता जिंकण्याचा जिंदगी
वळणवाटा चालताना पावले घोटाळली
*
आठवांची खाण होती अंगणीचे चांदणे
बंद केले दार तेव्हा का मती वेडावली
*
लाभता एकांत थोडा तू कशाला यायचे
मागची घोटीव स्वप्ने विरघळाया लागली
*
सावराया तोल आलो चूक केली कोणती
पावलांना साथ देता ती खुशीने नाचली
*
हे कधी कळलेच नाही काय झाला मामला
आत्मशांती मिळवताना फक्त घंटा वाजली
*
ओठ झाले मूक माझे तेज डोळे बोलले
वाचताना काल पोथी आसवे तू गाळली
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





