सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्री राजकुमार कवठेकर
💐 अ भि नं द न 💐
आपल्या समुहातील ज्येष्ठ गझलकार श्री राजकुमार कवठेकर यांचा ‘क्लेशवृक्षाच्या छायेत‘ हा दुसरा कवितासंग्रह आज १०मार्च २०२६ रोजी प्रकाशित होत आहे. हा संग्रह कोल्हापूरच्या ‘अक्षरदीप प्रकाशन‘ ने प्रकाशित केला आहे.
ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे श्री. कवठेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
आज प्रकाशित होत असलेल्या संग्रहातील एक कविता –
☆ ☆ ☆ ☆ ☆
कवितेचा उत्सव
☆ “ढगांनी जसे ग्रासिले” ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
☆
ढगांनी जसे ग्रासिले सुर्यबिंबा
क्षणार्धात सर्वत्र सांजावले
चकाकून जाती विजांच्या शलाका
थवे पाखरांचे घरी पातले
*
धुळीचे कुठे लोळ गेले नभाला
पुन्हा शांतले वृक्ष.. वेली.. पिले
भुईचे तसे तापलेल्या छतांचे
उदासीन जे चित्त, आनंदले
*
उभारून बाहो जणू वृक्ष वेली
वरूणास व्याकूळ हाकारती
” पुन्हा यौवनाची अम्हा दे उभारी.. “
तृणांकूर माळासवे प्रार्थती
*
लडीवाळ बाळापरी पावसाच्या
नभाच्या कुशीतून आल्या सरी
झळांचा बने थंडसा मंद वारा
घुमे रानझाडीतुनी बासरी
*
मघा साठले.. दाटले मोकळे हो
पुन्हा ऊन हे कोवळे सांडले
तुझ्या आठवांचे ऋतू जीववेडे
मलाही दिसांनी किती भेटले
☆
© श्री राजकुमार कवठेकर
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






