श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ वसंत बहार… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
प्रथमस्पर्श वसंत हृदयी
प्रेमभाव समजले सखया
तोच वारा, तोच गंध फुलोरा
रहस्य एक कळले सखया.
तुज पहाता ऋतूस भाळले
तुझ्यात मन गुंतले सखया
अन् मी राधा तु कृष्ण गोकुळी
जीवन नवे हसले सखया.
स्वप्नांच्या मैफली नित्य नभात
निद्रानाशी मी फसले सखया
कधी पालवीस, पक्षी बोलांना
प्रश्न मनाशी डसले सखया.
कोण बरे तु राजपुत्र असा
स्पंदन माझे हवसले सखया
याच वसंती हरवून स्वतःला
प्रेमाचे सत्य गवसले सखया.
अजून नजर भिरभिरते हे
श्वास भेटीस असुसले सखया
विरहालाही शपथ विश्वासाची
प्रेम अमर प्रसवले सखया.
तुझे अल्लड अजाण जे छेडणे
दोष मनाचे लहरले सखया
बदनामी होई, ओळख प्रीयाची
तुझ्या वसंती बहरले सखया.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





