सौ. जयश्री पाटील
कवितेच्या उत्सव
☆ जीवन कोडे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
(वृत्त-पादाकुलक, बालानंद, ८-८, ८-६ अर्ध समजाती)
☆
थकली गात्रे उरला आता
आठवणींचा पाचोळा
त्याच्यासोबत हसणे रडणे
कातरवेळी विरंगुळा
*
अवघड होता प्रवास सारा
मुळीच नाही डगमगलो
यशकीर्तीचे इमले चढलो
आपदेतही ना खचलो
*
कर्तव्यात ना कसूर केला
दिसही केला रात्रीचा
कष्टाला कुठे पर्याय होता
हिशेब नव्हता वेळेचा
*
आपुलकीने जपली सारी
वीण मनोहर नात्यांची
सोबत आली काही तुटली
रक्ताची आणि प्रेमाची
*
पक्षी उडाले घरट्या मधून
पंख घेऊन क्षमतेचे
अधीर होते मन व्याकुळते
कोडे जीवन मार्गाचे
☆
© सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




