सुश्री वर्षा बालगोपाल
चित्रकाव्य
चहा…
सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
सकाळी सकाळी मला लिहिताना पाहून
हळूच आई गेली, पुढ्यात चहा ठेऊन
त्या वाफाळत्या गंधाने तरतरी येऊन
कितीतरी पाने झाली नकळत लिहून
जरा स्थिर झाले मन आणि पाहिले समोर आळोखा देऊन
आईचा चहा तसाच गेला होता कपात निवून ||१||
*
सकाळी सकाळी मला लिहिताना पाहून
झटकन तो आला माझ्यासाठी चहा घेउन
मला जरा लिहू दे म्हटले मी त्याला
बरं म्हणून हसून तो पुढ्यातच बसला
मी लिहीत गेले तो निरखत राहिला
लिहून झाल्यावर त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला
मला चहावर साय आवडत नाही म्हणून तो ढवळत राहिला ||२||
*
सकाळी सकाळी मला लिहिताना पाहून
मुलगा आला गरमागरम कॉफी घेऊन
लिहितेच आहेस तू म्हणून सांगतो म्हणाला
नंतर निवांत लिही की, आधी नाश्ता दे मला
वास्तवता लगेच लक्षात येऊन
झटक्यात कॉफी घेतली मी पिऊन||
*
सकाळी सकाळी मला लिहिताना पाहून
आता कोणीही देत नाही मला चहा कॉफी आणून
लिहिण्याआधीच मी माझ्यासाठी चहा करते
उसनी तरतरी आणून लिहायला बसते
चहाच्या वाफेसारखे विचार रहातात भरकटत
मी मात्र बसते वहीची पाने रखडत ||४||
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





