श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १९ आणि २० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. १९ – – –
मना सर्वथा सत्य सांडू नको रे|
मना सर्वदा मिथ्य मांडू नको रे|
मना सत्य ते सत्य वाचे वदावे|
मना मिथ्य ते मिथ्य सोडुनि द्यावे |१९|
अर्थ: हे मना, या जगात केवळ भगवंतच एकमेव सत्य आहे. म्हणून त्याला कधी सोडू नकोस. दृश्य जगत मिथ्या आहे, भासमान आहे. त्याचा पसारा मांडू नकोस. नेहमी बोलताना भगवंताबद्दलच बोल आणि मायेच्या प्रभावाने सत्य वाटणाऱ्या (पण मिथ्या असलेल्या)या भासमान जगाकडे दुर्लक्ष कर.
विवेचन : या जगात सत्य आणि मिथ्य अशा दोनच गोष्टी आहेत. या ठिकाणी सत्य आणि मिथ्य या दोन्ही शब्दांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. साधारणपणे व्यवहारात बोलताना आपण मिथ्य म्हणजे खोटे या अर्थाने तो शब्द वापरतो. परंतु आपण जेव्हा अध्यात्माच्या संदर्भात काही बोलत असतो तेव्हा जे खरे नसून खऱ्यासारखे भासते त्या गोष्टीला मिथ्या म्हटले जाते. थोडक्यात म्हणजे त्या गोष्टी भासमान असतात. वाळवंटात भर उन्हात प्रवास करणाऱ्याला जेव्हा तहान लागते तेव्हा त्याला समोर पाणी असल्याचा भास होतो. वाळवंट हे सत्य परंतु पाणी हे भासमान! ते मृगजळ म्हणजेच भास! हे जगही असेच भासमान आहे. परंतु आपण कायमच या जगात वावरत असल्यामुळे आपल्याला हे दृश्य जग सत्य आहे असेच वाटत असते. त्याचे मिथ्यत्व जाणवत नाही. म्हणूनच ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या असे शंकराचार्य म्हणतात. समर्थ दासबोधत म्हणतात, “प्रकट ते जाणावे असार, अप्रकट ते जाणावे सार. ” हा देह जो प्रकट दिसतो तो असार, अशाश्वत आहे पण त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे, ते सत्य आहे त्याचा शोध घेतला पाहिजे.
आता सत्य या शब्दाचा अर्थ समजावून घेऊया. सत्य हे चिरंतन असते. ते शाश्वत आणि अपरिवर्तनशील असते. सत्य या शब्दाचा दुसरा अर्थ असाही घेता येईल की ज्यामुळे व्यक्तीचे किंवा समाजाचे हीत किंवा कल्याण होते ती गोष्ट म्हणजे सत्य.
सध्याचे वर सांगितलेले दोन्ही अर्थ परमेश्वराला लागू होतात. परमेश्वर शाश्वत आहे, चिरंतन आहे आणि अपरिवर्तनशील आहे. परमेश्वराची आराधना केल्यामुळे मानवाचे कल्याण होते म्हणूनच समर्थ आपल्याला ‘सत्य सांडू नको रे’ असे सांगतात.
आपण या भौतिक जगात वावरत असल्यामुळे तेच आपल्याला खरे वाटते आणि म्हणून त्याचाच पसारा आपण मांडत असतो. मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे असे जे समर्थ सांगतात त्याचा अर्थ हाच आहे. पण आपण आयुष्यभर मिथ्याचाच पसारा मांडण्यात धन्यता मानत असतो. शिक्षण, नोकरी, मुलेबाळे, संसार यातच आपण आयुष्याची इतिकर्तव्यता मानतो. आजच्या सोशल मीडियाच्या युगात तर आपण त्याच्या भ्रमजालात एवढे अडकलो आहोत की लाईक्स, व्ह्यूज, सबस्क्राईबर्स, प्रसिद्धी म्हणजेच सगळे काही असे आपल्याला वाटते. आपल्याला कोणी भगवंताची उपासना करण्यास सांगितले तर आपण म्हणतो की अजून मला वेळ आहे. आत्ताच तर कुठे शिक्षण पूर्ण होत आहे. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी, नंतर लग्न, नंतर मुलेबाळे, संसार… त्यानंतर आपण परमेश्वराकडे लक्ष देऊ असे माणूस मनाशी म्हणत असतो. परंतु असे करता करता संपूर्ण आयुष्य निघून जाते. मिथ्याचा मांडलेला हा पसारा सोडून एक दिवस जावे लागते. लहान मुलगी खेळण्यातली भांडी, चूल बोळकी घेऊन संसाराचा खेळ मांडते. परंतु मोठी झाल्यावर अचानक तो खेळ सोडून तिला जावे लागते तसेच आपलेही होते.
चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ गं
लुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ गं
रेशिम धागे ओढीती मागे, व्याकुळ जीव हा झाला.. ||
या गीतात म्हटल्याप्रमाणेच आपली अवस्था होते. लुटुपुटीच्या संसाराची वेळ संपत येते. पण पाय निघत नाही. मायेचे, मोहाचे रेशीम धागे आपल्याला मागे ओढत असतात.
सत्य आणि असत्याची दुसरी एक बाजू आपण या ठिकाणी समजावून घेऊ या. सत्य बोलणे हा आपला धर्म आहे. लहान मुलांना सुद्धा आपण नेहमी खरे बोलावे असे सांगत असतो. महाभारतातील युधिष्ठिर खरे बोलण्यासाठी प्रसिद्ध होता म्हणूनच त्याला धर्मराज असेही म्हटले जात होते. सत्य केवळ बोलायचे नसते तर सत्यस्वरूप व्हायचे असते याचे तो मूर्तिमंत उदाहरण होता. परंतु आता सत्याची दुसरी एक बाजू समजावून घेऊ. एखादी गोष्ट बोलण्यामागे आपला उद्देश कोणता आहे यावरही त्या गोष्टीचे सत्य असत्य किंवा धर्म – अधर्म या गोष्टी ठरतात. दुसऱ्याचे कल्याण व्हावे या हेतूने बोललेले असत्य देखील हितकारक असते. येथे ते पाप न ठरता पुण्य ठरते. दुसऱ्याला दुखावण्याचा, त्रास देण्याचा किंवा त्याच्या वाईटाचा हेतू मनात ठेवून बोललेले सत्य हे देखील पापास कारणीभूत ठरते. महाभारतात श्रीकृष्णाला युक्तीने वागताना काही वेळा असत्याचा आधार घ्यावा लागला आहे. परंतु असे करण्यामागील त्याचा उद्देश अनितीचे आणि अन्यायाचे राज्य संपून न्यायाचे राज्य यावे, नीतीने वागणाऱ्या पांडवांना न्याय मिळावा हा होता.
संत तुकाराम महाराज म्हणतात, “तुम्ही सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियाले नाही बहुमता… ” केवळ लोक म्हणतात म्हणून एखादी गोष्ट सत्य आहे किंवा असत्य आहे असे मानण्यापेक्षा त्यांनी आपल्या मनाने दिलेला कौल प्रमाण मानला. मनाचा हा कौल म्हणजेच विवेक. या विवेकाच्या सहाय्यानेच संसार किंवा हे दृश्य जग भासमान आहे हे समजून घ्यावे आणि एकमेव सत्य असलेल्या त्या परमेश्वराची कास धरावी असेच समर्थ आपल्याला सांगत आहेत.
स्वसंवाद :
- माझ्या जीवनात मी खरेच काय सत्य मानतो, परमेश्वर की भौतिक यश?
- संसारातील गोष्टींमध्ये गुंतताना त्यांचे क्षणभंगुर स्वरूप मला जाणवते का?
- मी बोलताना सत्य बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो का?
- माझ्या बोलण्यामागील हेतू दुसऱ्याच्या कल्याणाचा असतो का?
- माझ्या आतील विवेकाचा आवाज मी ऐकतो का?
– – – –
श्लोक क्र. २० – – –
बहू हिंपुटी होईजे मायपोटी।
नको रे मना यातना तेचि मोठी॥
निरोधें पचे कोंडिले गर्भवासी।
अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं॥२०॥
अर्थ: आईच्या पोटात असताना बालकाला अतिशय कष्ट भोगावे लागतात. त्या मोठ्या वेदनादायी यातना (हे जीवा)तुला भोगणे नको. मातेच्या गर्भात असताना बालक अधोमूख म्हणजे खाली तोंड करून असते. ते सर्व बाजूंनी कोंडले जाते. गर्भातील उष्णतेमुळे ते उकडून निघते. ही अवस्था अत्यंत वेदनादायी असते.
(हिंपुटी – कष्ट/यातना, मायपोटी – आईच्या उदरात असताना, निरोध प्रतिबंध/अडथळा, पचे – शिजणे/उकडून निघणे, अधोमुख – खाली तोंड करून)
विवेचन :
या श्लोकात समर्थ जीव जन्माला येण्याआधीच्या अवस्थेचे वर्णन करतात. ही अवस्था किती कष्टप्रद असते त्याची जाणीव हा श्लोक वाचला म्हणजे होते. समर्थ स्वतः संसाराच्या बंधनात अडकले नव्हते. परंतु मनुष्य कसा जन्माला येतो? त्यावेळी त्याची अवस्था कशी असते, आणि त्याला किती यातना होतात याची पुरेपूर कल्पना त्यांना होती. आजचे आधुनिक विज्ञान आणि मोठमोठे डॉक्टर्स सुद्धा ही गोष्ट मान्य करतात की गर्भामध्ये असताना आणि जन्माला येताना (मातेबरोबरच) बालकाला सुद्धा यातना सोसाव्या लागतात.
एकदा का या मृत्यू लोकात जन्म घेतला की शैशव, तारुण्य, नाना प्रकारचे आजार, वृद्धत्व आणि शेवटी मृत्यू या गोष्टी अपरिहार्य आहेत. जन्माला येताना तर किती यातना जीवाला सोसाव्या लागतात. आईच्या गर्भामध्ये हा जीव कोंडलेला असतो. त्या वातावरणातील उष्णता त्याला सहन करावी लागते. उष्णतेमुळे त्याची वाढ होते हे जरी खरे असले तरी त्यामुळे तो उकडून निघतो हेही तेवढेच खरे. नऊ महिने तो जीव एवढ्याशा जागेत कोंडलेला असतो. आपण त्याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. जन्माला येताना बालक अधोमुख असते. त्या अत्यंत अरुंद मार्गातून बाहेर पडताना मातेला आणि बालकाला दोघांनाही भयंकर वेदना सहन कराव्या लागतात.
दिवस जाणे, गर्भारावस्था, बाळंतपण आणि त्यात होणाऱ्या वेदना या सगळ्या अपरिहार्य गोष्टी आहेत म्हणून या अवस्थांमधून जायचेच नाही का? या नैसर्गिक गोष्टी आहेत. या होणारच. यांचा त्रास नको म्हणून कसे चालेल असे आजचे काही विज्ञानवादी विचारवंत म्हणतात. व्यवहाराच्या दृष्टीने पाहिले तर हे सगळे बरोबर वाटते परंतु जो मुमुक्षु आहे, म्हणजेच साधक आहे, मोक्ष मार्गावर वाटचाल करणारा आहे, त्याला या गोष्टी लक्षात घ्याव्याच लागतील तरच त्याची पुढील वाटचाल सुकर होईल. म्हणूनच समर्थ या गोष्टींची जाणीव आपल्याला करून देतात.
केवळ जन्मच नव्हे तर संपूर्ण मानवी जीवन हे दुःखाने भरलेले आहे. काही लोक याला निराशावादी विचार म्हणतील. परंतु संतांचा ही जाणीव करून देण्याचा उद्देश वेगळा असतो. संत हे अध्यात्म मार्गावरील दीपस्तंभ असतात. त्यांचे अनुसरण करूनच पुढे जायचे असते. म्हणूनच ते आपल्याला ही जाणीव करून देतात. वारंवार जन्माला येणे, यातना सोसणे आणि मृत्यू पावणे या चक्रात सामान्य माणूस अडकत राहतो आणि हे चक्र सुरू राहते. पण कुठेतरी हे चक्र थांबावे असे वाटत असेल तर पुन्हा जन्म नको. जन्म नसला तर या सगळ्या गोष्टी आपोआप टळतील. म्हणूनच समर्थ जन्माला येताना होणाऱ्या कष्टांची जाणीव आपल्याला करून देतात.
हा देह नाशिवंत आहे. मलमूत्र इ. घाणीने भरलेला आहे. आयुष्यात दुःख आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताएवढे असे तुकाराम महाराज सांगतात. या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव नसते असे नाही. परंतु तरी देखील माणसाला आपल्या देहाचा आणि स्वतःचा केवढा गर्व असतो!
पण एक दिवस हा देह सोडून आपल्याला जायचे आहे. “नाशिवंत देह जाणार सकळ “असे तुकाराम महाराज म्हणतात. पण असे असले तरी हा देह ईश्वर प्राप्तीचे साधन आहे. त्याचा वापर करूनच आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचायचे आहे. आपल्या देहाबद्दल बोलताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मळमुत्राचा बांधा ।
वरी चर्म घातलें रे कर्म कीटकाचा सांदा ॥
रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा ।
स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा ॥
– — असा हा आपल्याला लाभलेला मानवी देह आहे. पण म्हणून त्याचा तिरस्कार करता कामा नये. घेता येईल तेवढी त्याची काळजी आपण घेतले पाहिजे कारण हा नरदेह ईश्वरप्राप्तीचे साधन आहे. त्याच्या माध्यमातूनच आपल्याला उत्तम कर्म करून राघवची प्राप्ती करून घ्यायची आहे. मानवी जीवनातील दुःख नको असेल आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर भगवंताला शरण जाण्या वाचून पर्याय नाही.
स्वसंवाद :
- हे जीवन, हा संसार दुःखमय आहे याची जाणीव मी ठेवतो का?
- जीवनातील दुःखांकडे मी तक्रारीने पाहतो की त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न करतो?
- जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटावे असे मला मनापासून वाटते का?
- त्यातून सुटण्यासाठी संतांनी सांगितलेल्या मार्गावर मी वाटचाल करतो का?
– क्रमशः श्लोक १९ आणि २०.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





