श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २१ आणि २२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. २१ – – 

मना वासना चुकवी येरझारा ।

मना कामना सांडि रे द्रव्यदारा |

मना यातना थोर हे गर्भवासी ।

मना सज्जना भेटवी राघवासी |२१ |

अर्थ: हे मना, वासनेमुळे जीव जन्म मरणाच्या फेऱ्यात (येरझारा)अडकतो. त्या वासनेचा त्याग कर म्हणजे जीव जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणार नाही. पैसा आणि स्त्री सुख यांच्याबद्दल मोह बाळगू नकोस. कारण वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो आणि गर्भवासाच्या यातना भयंकर असतात. म्हणून हे मना भगवंताची भेट करून घे.

विवेचन: जन्माआधी आणि जन्माच्या प्रसंगी होणाऱ्या यातना किती भयंकर असतात हे समर्थांनी आधीच्या श्लोकात सांगितले आहे. या श्लोकात ते आपल्याला म्हणतात की वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो म्हणून या वासनांचा त्याग करायला हवा. वासनाच नसतील तर जन्म मृत्यूचा प्रश्नच उद्भवणार नाही. या श्लोकात ‘ चुकवी ‘ हा शब्द वासना आणि येरझारा या दोन्हीसाठी आहे. आपल्याला वासना आणि येरझारा दोन्हीही चुकवायच्या आहेतच. वासना चुकवली तर येरझारा आपोआपच चुकतील.

वासना या निरनिराळ्या प्रकारच्या असतात त्यातही त्यांचे दोन प्रमुख प्रकार सांगता येतील. सद् वासना आणि दुर्वासना. दोन्हींपैकी कोणत्याही प्रकारची वासना असेल तरी पुनर्जन्म हा अटळ आहे. परंतु त्यातल्या त्यात सद्वासना म्हणजे चांगल्या वासना असतील तर पुन्हा जन्म मिळाला तरी हरकत नसते. समाजोपयोगी कार्य करणे, संतांचा सहवास लाभणे किंवा परमेश्वर भक्तीची इच्छा धरणे या सद्वासना आहेत. या सद्वासनांमुळे आत्मिक उन्नती होण्यासाठी मदत होते. षडरिपूंच्या नादी लागून त्या वासना अपूर्ण जर राहिल्या असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. परंतु त्याने शेवटी मनुष्याची अधोगतीच होते आणि मुक्तीपासून तो दूर जातो.

संत तुकाराम महाराजांना संतसंग आणि भगवद्भक्तीची आस होती. ते म्हणतात – – 

न लगे मुक्ती आणि संपदा, संतसंग देई सदा|

तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ||

संतांचा, सज्जनांचा संग म्हणजे सहवास मिळावा, परमेश्वराची भक्ती कायम लाभावी म्हणजे जेणेकरून त्यातील गोडी कायम अनुभवता येईल. म्हणून त्यांना गर्भवास म्हणजे पुन्हा जन्म घेणेदेखील मान्य आहे.

तुकाराम महाराजांसारख्या संतांची ही सद्वासना झाली. परंतु या ऐहिक जीवनात सामान्य मनुष्य एवढा गुंतून जातो की त्याच्या अनेक प्रकारच्या वासनांची पूर्ती कधी होतच नाही. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये जेवढे इंधन घालावे तेवढा तो अधिक प्रज्वलित होतो. तशा या दुर्वासना देखील वाढत जातात आणि अंतकाळी या वासना कायम असतील तर त्या पोटी मनुष्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. सत्ता, संपत्ती आणि स्त्री संबंधित वासना कधी संपतच नाहीत. कामिनी आणि कांचन यांच्या वासना सर्वात जास्त प्रबळ आहेत. त्यांच्यावर मात करणे सोपे नाही. इतर वासना त्यामानाने गौण आहेत. आज जगातील घडणारे बहुतेक गुन्हे आणि वाईट घटना कामिनी आणि कांचनाच्या हव्यासापायीच घडत आहेत. चित्रपटातून आणि टीव्हीवरील विविध प्रकारच्या धारावाहिकांमधून अशाच घटना समोर येतात. त्यापासून बोध घेण्याऐवजी त्यातील वाईट गोष्टींचा प्रभाव समाजमनावर अधिक पडतो. भ्रष्टाचाराच्या घटनांबद्दल तर न बोललेले बरे इतक्या त्या नित्याच्या झाल्या आहेत.

वासना अपूर्ण राहिल्या की पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्माला आल्यानंतर या वासनांचा भोग तर मिळतो परंतु माणसाची अधिकाधिक अधोगती होते आणि त्याने तो मुक्ती पासून दूर जातो.

परद्रव्य कांता पराची पाहता 

स्मरादि रिपु ओढिती मानसाता 

– – असे श्री दत्त स्तुतीत म्हटले आहे. दुसऱ्याचे धन, दुसऱ्याची स्त्री यांची अभिलाषा धरली तर काम, क्रोध यांसारखे शत्रू मनावर आक्रमण करतात आणि शेवटी ते माणसाचा नाश घडवून आणतात.

म्हणूनच जन्म मृत्यूचा फेरा म्हणजेच येरझारा चुकवायचा असेल तर समर्थ वासनेवर मात करायला सांगतात. आणि त्यासाठी ईश्वर प्राप्तीचे पवित्र ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवावे लागते. केवळ ध्येयवादी मनुष्य असा त्याग करू शकतो. माया मोहात अडकलेले मन आपण ईश्वराकडे लावले तर तेच मन आपल्याला (राघवाची) ईश्वराची भेट घडवून देईल.

स्वसंवाद : 

  • माझ्या आयुष्यात कोणत्या वासना मला सर्वाधिक बांधून ठेवतात?
  • कामिनी आणि कांचनाच्या मोहापासून दूर राहण्यासाठी मी सजग आहे का?
  • संतसंग, सत्संग किंवा आध्यात्मिक चिंतनाला माझ्या जीवनात किती स्थान आहे?
  • माझ्या जीवनाचे ध्येय केवळ भोग आहे की ईश्वरप्राप्ती?

– – – – 

श्लोक क्र. २२ – – 

मना सज्जना हीत माझे करावे ।

रघुनायका दृढ चित्ती धरावे ।

महाराज तो स्वामि वायूसुताचा ।

जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ।।२२।।

अर्थ :

हे सज्जन मना, तुला जर तुझे खरे कल्याण करून घ्यायचे असेल तर रघुकुलाचा नायक असलेल्या श्रीरामाला चित्तामध्ये दृढ धारण कर. तो वायूसुत हनुमंताचा स्वामी आहे आणि तिन्ही लोकांचा उद्धार करणारा आहे. म्हणून अशा त्या श्रीरामाला तू घट्ट धरून ठेव—म्हणजेच नेहमी त्याच्या चिंतनात राहून आपला उद्धार करून घे.

विवेचन :

आधीच्या श्लोकांमध्ये जन्माला येताना जीवाला किती यातना सहन कराव्या लागतात हे समर्थ सांगतात. आयुष्य जगताना देखील नाना प्रकारची दुःखे, संकटे आणि क्लेश सहन करावे लागतात. हे सर्व म्हणजे जन्म-मृत्यूच्या अखंड फेऱ्यांमुळे घडणारे आहे. या येरझाऱ्यातून सुटका करून घ्यायची असेल तर माणसाने आपले खरे हीत करून घ्यायला हवे. मग हे हीत म्हणजे नेमके काय आणि ते कसे साध्य करायचे—याचे उत्तर समर्थ या श्लोकात देतात.

हे जग मायेचा एक मोहक पिसारा आहे. त्याला आपण भुलतो, तेच अंतिम सत्य आहे असे मानतो आणि त्यातच अडकून पडतो. नाना प्रकारची प्रलोभने, विकार आणि वासना आपल्या मार्गात अडथळे निर्माण करतात. परिणामी, आपल्या कल्याणाचा जो अंतिम मार्ग आहे—श्रेयसाचा मार्ग, त्याऐवजी आपली वाटचाल प्रेयसाच्या मार्गाने होत राहते.

खरे पाहता मनच आपला मित्र आणि मनच आपला शत्रू असते. तेच आपले हीत किंवा अहित करू शकते. विषयसुख आणि शरीरसुखालाच आपण जीवनाचे अंतिम ध्येय मानतो. कामिनी आणि कांचनाच्या मागे धावत राहतो. परंतु या सर्व गोष्टी म्हणजे मृगजळासारख्या आहेत. मृगजळ दिसते, पण प्रत्यक्षात अस्तित्वात नसते. तसेच हे बाह्य जग—ते सत्य वाटते, पण ते भासमान आहे. आपण त्याच्या मागे धावत राहतो आणि जे अंतिम सत्य आहे—ब्रह्म किंवा परमेश्वर—त्याकडे दुर्लक्ष करतो.

आपली अवस्था कस्तुरीमृगासारखी होते. कस्तुरी स्वतःच्या नाभीत असतानाही तो तिच्या शोधात रानोमाळ भटकत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या हृदयातच असलेल्या आत्मारामाला आपण विसरतो आणि बाह्य सुखांच्या मागे भटकत राहतो.

मानवी जीवनाचे खरे हीत म्हणजे त्या रघुनायकाला दृढ चित्ती धारण करणे. चित्तामध्ये भगवंताला घट्ट धरून ठेवणे म्हणजेच आपले कल्याण करणे होय. एखाद्या वस्तूचा सतत सहवास लाभला तर ती वस्तू आपल्याला प्रिय वाटू लागते. तसेच भगवंताच्या नामाचा आणि स्मरणाचा सतत सहवास लाभला तर भगवंतही आपल्याला प्रिय वाटू लागतो. आणि जेव्हा भगवंत प्रिय वाटू लागतो, तेव्हा समजावे की आपण योग्य मार्गावर चाललो आहोत.

श्रीराम हे वायूसुत हनुमंताचे स्वामी आहेत. हनुमंत म्हणजे शक्ती, युक्ती आणि बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत प्रतीक. तरीही तो स्वतःला रामाचा दास मानतो. भक्ती कशी करावी हे हनुमंताकडून शिकावे. त्याने श्रीरामांना आपल्या हृदयात कायमचे धारण केले आहे. श्रीरामांच्या कृपेने तो चिरंजीव झाला आहे.

शौर्य, धैर्य, औदार्य आणि शरणागताचे रक्षण—हे श्रीरामांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत. ते रघुकुलाचे भूषण आहेत. त्यांचे नाम पापातून मुक्त करणारे आहे, भवसागरातून तारून नेणारे आहे. हजारो वर्षांपासून असंख्य लोकांनी श्रीरामनामाचा आश्रय घेतला आणि या संसारसागरातून तरून गेले.

त्रैलोक्याचा नाथ असलेल्या त्या श्रीरामांनी लोककल्याणाचे व्रत स्वीकारले आहे. म्हणूनच समर्थ अत्यंत तळमळीने आपल्या मनाला सांगतात—

“हे सज्जन मना, त्या श्रीरामांना आपल्या हृदयात दृढ धारण कर; त्यातच तुझे खरे कल्याण आहे. ”

स्वसंवाद : 

  • माझ्या जीवनातील खरे “हीत” काय आहे याचा मी कधी गंभीरपणे विचार केला आहे का?
  • विषयसुख आणि भौतिक यश यांनाच मी जीवनाचे अंतिम ध्येय मानतो आहे का?
  • माझ्या मनाला ईश्वरनाम, सद्गुण आणि सत्कर्म यांचा सहवास मिळतो आहे का?
  • हनुमंताप्रमाणे श्रद्धा, नम्रता आणि सेवाभाव माझ्या जीवनात कितपत आहे?

– क्रमशः श्लोक २१ आणि २२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments