डॉ ज्योती गोडबोले
वाचताना वेचलेले
☆ “पिंकीचं इंग्लिश…” – कवी : श्री. मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆
☆
पिंकी इंग्लिश शाळेत जाते,
मी तिला फार भितो…
ती वॉटर ड्रिंक करते,
मी आपला पाणी पितो…
*
जाडे- जाडे इंग्लिश शब्द,
तिच्या तोंडात उठ- सूट,
माझ्या पायात साधी चप्पल,
तिच्या पायात छान बूट…
*
ती म्हणाली, केक या शब्दाला,
मराठी शब्द कुठला..?
आता गप्प बसलास ना,
बघ तुला घाम फुटला…
*
मराठीच्या प्रेमामुळे,
मला गप्प बसवे ना…
इंग्रजीची तिची ऐट,
मला मुळीच ऐकवेना…
*
मी तिला ताडकन म्हणालो,
वरण- भात आणि पिठले,
यांना तुझ्या इंग्रजीत,
सांग बरं शब्द कुठले..?
*
हे ऐकून, पिंकी गप्प,
तिला काही सुचेना…
इंग्रजीत पिठले खाईल,
असा शब्द मिळेना…
*
आता पिंकी घरी गुपचूप,
मराठीत पिठले खाते…
आणि वरण- भातावर,
मराठीतच लिंबू पिळते..!
☆
कवी : श्री मंगेश पाडगावकर
प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




