श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३७ आणि ३८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ३७ – –
सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा |
उडी घालितो संकटी स्वामी तैसा |
हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३७|
अर्थ : चक्रवाक पक्षांना ज्याप्रमाणे सूर्य अंधारापासून मुक्ती देतो किंवा दिशा दाखवतो त्याचप्रमाणे त्याप्रमाणेच परमेश्वर सुद्धा भक्ताच्या संकटात त्वरित धावून जातो आणि त्याची संकटातून मुक्तता करतो. हरीभक्तीचा महिमा पावलो पावली ऐकू येतो. त्याची निशाणी गर्जते आहे. दासाभिमानी असलेला राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.
(मार्तंड – सूर्य, निशाण – एक रणवाद्य/डंका, घाव – त्या वाद्यावरील प्रहार)
विवेचन : भगवंत आपल्या भक्ताला संकटात सहाय्य करण्यासाठी कशाप्रकारे धावून जातो हे सांगण्यासाठी समर्थ आपल्याला या श्लोकात चक्रवाक पक्षाचे उदाहरण देतात.
चक्रवाक पक्षातील नर आणि मादी एकमेकांवर खूप प्रेम करतात. परंतु अंधारामध्ये या पक्षांची एकमेकांपासून ताटातूट होते. अंधारात त्यांना काहीही दिसत नाही. फक्त ते एकमेकांना साद घालतात. त्यांचा आर्त आवाज फक्त एकमेकांना ऐकू येतो. सूर्योदयाची ते वाट पाहत असतात. एकदा का सूर्योदय झाला की त्यांना दिसू लागते आणि विरहाच्या दुःखातून त्यांची मुक्ती होते. अशा रीतीने चक्रवाक पक्षी आणि सूर्य एकमेकांवर अवलंबून असतात.
या चक्रवाक पक्षांसाठी सूर्य ज्याप्रमाणे विरहातून मुक्तीचे कारण ठरतो, त्याप्रमाणेच भगवंत देखील आपल्या भक्तांसाठी धावून जातो आणि त्यांची संकटातून मुक्तता करतो. आपल्या संकटात जर भगवंत धावून यावा असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला त्याच्या भक्तीची ओढ लागली पाहिजे. आधीच्या श्लोकात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्याची अनन्यभवाने भक्ती करायला हवी म्हणजे तो संकटप्रसंगी धावून आपली त्यातून सुटका करतो.
श्रीहरी हा भक्तवत्सल आहे. जसे भक्ताला भगवंताशिवाय होत नाही तसेच श्रीहरीला देखील आपल्या भक्ताची काळजी केल्याशिवाय चैन पडत नाही. जेव्हा भक्त एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा परमेश्वर त्याच्यासाठी स्वतःहून चार पावले पुढे येतो. हरिभक्तीचा महिमा फार मोठा आहे आणि हा महिमा आपल्याला पावलोपावली म्हणजे सर्वत्र ऐकू येतो. त्याची निशाणी म्हणजे त्याचा डंका सर्वत्र वाजतो आहे. वेद, शास्त्र, पुराणे देखील त्याचीच महती गात आहेत.
ज्याप्रमाणे चक्रवाक पक्षातील नर आणि मादी हे दोन जीव एकमेकांसाठी आसुसलेले असतात. त्याचप्रमाणे भक्त आणि भगवंत म्हणजे जीव आणि शिव. जीव शिवापासून म्हणजे आपल्या मूळ रूपापासून दूर गेला आहे. भगवंताची भेट म्हणजे जीवाचे शिवाशी मिलन. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्ती. ईश्वराला मनापासून आवाहन केले तर तो आपल्या हाकेला धावून येतो. ईश्वर म्हणजे या विश्वातील सूक्ष्म आणि सर्वव्यापी अदृश्य शक्ती. ही शक्ती आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर असते. फक्त आपले आवाहन तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खरी तळमळ हवी. २७ व्या श्लोकापासून तर या ३७ व्या श्लोकापर्यंतच्या एकूण अकरा श्लोकांमध्ये परमेश्वर आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही ही गोष्ट समर्थ आपल्या मनावर ठसवतात.
स्वसंवाद :
१) चक्रवाक पक्षाला जशी सूर्याची ओढ असते तशी माझ्या मनात परमेश्वराची आर्त ओढ कधी निर्माण झाली आहे का ?
२) “जीवाचे शिवाशी मिलन” हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे. माझ्या दैनंदिन जगण्यात हे ध्येय मला दिसते का ?
३) हरिभक्तीचा डंका सर्वत्र वाजतो आहे. मला तो खरंच ऐकू येतो का की सांसारिक गोंगाटात तो माझ्यापर्यंत पोहोचतच नाही ?
– – – –
श्लोक क्र. ३८ – –
मना प्रार्थना तुजला एक आहे|
रघुराज थक्कित होऊनि पाहे |
अवज्ञा कदाही येदर्थी न कीजे|
मना सज्जना राघवी वस्ती कीजे|३८|
अर्थ : या श्लोकात समर्थ मनाला प्रार्थना करतात की राघवाला एकवार तू थक्क होऊन पहा (म्हणजेच त्याला समजून आणि जाणून घे). मनाने तू कायम भगवंताजवळच वस्ती कर. माझ्या या विनंतीचा अवमान म्हणजे अवज्ञा कधीही करू नकोस.
(थक्कित – आश्चर्ययुक्त/अद्भुत, येदर्थी – या बाबतीत)
विवेचन : आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये समर्थांनी मनाला उपदेश केला आहे. या श्लोकात मात्र ते मनाला प्रार्थना करतात की हे मना परमेश्वराकडे तू थक्क होऊन पहा. समर्थांचे हे सांगणे सुरुवातीला आपल्याला थोडे विचित्र वाटते. पण त्यात खूप गहन अर्थ भरलेला आहे. एखाद्या गोष्टीकडे आपण थक्क किंवा आश्चर्यचकित होऊन केव्हा पाहतो तर ज्यावेळी त्या गोष्टीचा कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही. आपल्या समजण्याच्या पलीकडे ती गोष्ट असते तेव्हा आपण त्या गोष्टीकडे एखादी अद्भुत गोष्ट म्हणून पाहतो.
ज्यावेळी पहिल्यांदा वाफेवरचे पहिले रेल्वे इंजिन धावले आणि त्याच्या सहाय्याने रेल्वे धावली, त्यावेळी लोकांनी थक्क होऊन तिच्याकडे पाहिले. ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने अद्भुत होती. बैल, घोडे किंवा ओढणारे कोणीही नसताना ही गाडी कशी चालते याचे कोडे सर्वसामान्यांना पडले होते. पण जेव्हा ही गोष्ट त्यांना नित्याची झाली आणि त्यामागील कार्यकारण भाव समजला तेव्हा तिचे आश्चर्य त्यांना वाटेनासे झाले. हळूहळू ते तंत्रज्ञान आपण जाणून घेतले, त्याचा अभ्यास केला. त्यात पुढे प्रगती झाली. विजेवर, डिझेलवर धावणाऱ्या रेल्वे इंजिनांची निर्मिती झाली. त्यासाठी त्या तंत्रज्ञानाच्या सानिध्यात आपल्याला जावे लागते.
तशीच ईश्वराने निर्मिलेली ही सृष्टी अद्भुत आहे. चंद्र, सूर्य, तारांगणे, मेघमाला, निरनिराळे प्राणी, पक्षी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव पाहिले की थक्क व्हायला होते. या गोष्टी एकदा काळजीपूर्वक पाहिल्या की त्याच्या मागील कार्यकारण भाव जाणून घेता येईल. एखादे तंत्रज्ञान जाणून घ्यायचे असेल तर ज्याने ते निर्माण केले आहे त्याच्याजवळ जाऊन आपल्याला ते शिकावे लागते. या सृष्टीचा निर्माता ईश्वर आहे. तिचा कार्यकारणभाव जाणून घेण्यासाठी भगवंताला शरण जावे लागेल.
शरण जाणे म्हणजेच भगवंताच्या जवळ जाणे. त्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आपल्याला त्याच्याजवळ वस्ती केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच भगवंताच्या अस्तित्वाचे ज्ञान आपल्याला प्राप्त होईल आणि या चराचरात तो कसा भरून राहिला आहे त्याचेही ज्ञान होईल. आपले कल्याण कशात आहे हे देखील समजेल आणि मग आपोआपच आपली वाटचाल व्यवहारातून अध्यात्माकडे आणि अध्यात्माकडून मोक्षाकड अशी सुरू होईल. समर्थांचे हे सांगणे आपल्या हिताचे आहे. म्हणूनच ते म्हणतात की याची कधीही अवज्ञा करू नकोस.
स्वसंवाद :
१) मी कधी या सृष्टीकडे खऱ्या अर्थाने थक्क होऊन, आश्चर्याने पाहिले आहे का? की सर्व काही गृहीत धरून जगतो आहे?
२) माझे मन खरोखरच “राघवी वस्ती” करते आहे का, की ते अजूनही बाह्य जगातच भटकत आहे?
३) समर्थांची ही विनंती मी मनापासून स्वीकारली आहे का, की अजूनही दुर्लक्षच करत आहे? (क्रमशः
– क्रमशः श्लोक ३७ आणि ३८.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






