श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ८२, ८३, ८४. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

भक्ति सूत्रे ८२ – – 

गुणमाहात्म्यासक्ति रूपासक्ति पूजासक्ति स्मरणासक्ति दास्यासक्ति सख्यासक्ति वात्सल्यसक्ति कान्तासक्ति आत्मनिवेदनासक्ति तन्मयतासक्ति परमविरहासक्ति रूपाएकधा अपि एकादशधा भवति ॥८२॥”

अर्थ: भक्ती (प्रेमरूप भक्ति) एकच असूनही ती अकरा प्रकारे प्रकट होते. श्रीमहाराज एका ठिकाणी भक्ति बद्दल म्हणतात, “प्रपंचात जशी आसक्ति, तशी भगवंतावर प्रीती, त्या नाव भक्ति. “ प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असल्याने प्रत्येक व्यक्तीची आसक्ति कुठे असेल ते सांगणे कठीण आहे. म्हणून श्रीमहाराज म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याने आपापल्या आसक्तीचा विचार करून, त्या आसक्तीला भगवंताकडे वळविता आले की त्याचे अर्धे काम झाले असे म्हणता येईल. श्रीमहाराज म्हणायचे की भगवंताशी काहीतरी नाते जोडावे. त्याला भाऊ, बहीण, आई, बाबा, पुत्र किंवा अन्य कोणतेही. त्याचा भक्तिमार्गात खूप उपयोग होतो.

आसक्तीचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

  1. गुण माहात्म्यासक्ति :

भगवंताचे गुण, महिमा, दया, करुणा, सौंदर्य, सामर्थ्य इ. श्रवण करून, मनन करून त्याच्यावर प्रेम करणे. नारद मुनी आणि महर्षी व्यास यांची भक्ति वरील प्रकारात मोडते.

  1. रूपासक्ति :

भगवंताच्या सुंदर स्वरूपावर प्रेम करणे. त्याच्या मूर्तीचे, दर्शनाचे, सौंदर्याचे चिंतन करणे. गोकुळातील गोपींची भक्ति या प्रकारची आहे असे मानले जाते.

  1. पूजासक्ति :

भगवंताची सेवा, पूजा, आरती, अभिषेक, अलंकार इत्यादींमध्ये प्रेम वाटणे.

  1. स्मरणासक्ति :

सतत भगवंताचे नामस्मरण, गुणस्मरण, लीला चिंतन करणे हेच जीवनाचे ध्येय मानणे.

  1. दास्यासक्ति :

आपण भगवंताचे सेवक आहोत, ही भूमिका घेत त्याची सेवा करणे.

  1. सख्यासक्ति :

भगवंताशी मित्रभाव ठेवून त्याच्याशी मनमोकळा संवाद साधणे.

  1. वात्सल्यासक्ति :

भगवंताच्या लीलांचे बालरूप धरून त्याच्यावर आई-वडिलांसारखे प्रेम करणे.

  1. कान्तासक्ति :

भगवंतावर पतीप्रेमासारखे गाढ, उत्कट, अनन्य प्रेम करणे.

  1. आत्मनिवेदनासक्ति :

स्वतःचे सर्वस्व भगवंताला अर्पण करणे. “तूच सर्वकाही आहेस, मी नाहीच” असे मनोधारणे.

  1. तन्मयतासक्ति :

भगवंतात इतके एकरूप होणे की स्वतःचा विसर पडणे.

  1. परमविरहासक्ति :

भगवंताच्या वियोगाने अतीव तगमग, विरह, वेदना याचा अनुभव घेणे.

समर्थ रामदास भक्तीचे नऊ प्रकार सांगतात.

भक्ती एकच असते ते भगवंतावरचे प्रेम. पण “व्यक्ती तितक्या प्रकृती” या उक्तीप्रमाणे भक्तीचे अनंत प्रकार होऊ शकतात.

जशी भक्ताची भावना, तशी त्याची भक्तीची अभिव्यक्ती!”

जय जय रघुवीर समर्थ

– – – – 

भक्ति सूत्रे ८३ – – 

इत्येवं वदन्ति जनजल्पनिर्भयाः एकमताः कुमार व्यास शुक शाण्डिल्य गर्ग विष्णु कौण्डिण्य शेषोद्धवारुणि बलि हनुमद् विभीषणादयो भक्त्याचार्याः ॥ ८३॥”

अर्थ : सनत्कुमार, वेदव्यास, शुकदेव, शाण्डिल्य, गर्ग, विष्णु, कौण्डिन्य, शेष, उद्धव, अरुणि, बलि, हनुमत्, विभीषण आदि भक्तीचे आचार्य लोकांच्या निंदा स्तुतीची पर्वा न करता (भीती न बाळगता) एकमताने असेच सांगतात की भक्तीच श्रेष्ठ आहे.

विवेचन : भक्तीमार्ग हा एक प्राचीन, समन्वयपूर्ण आणि अनुभवाधारित भगवंत प्राप्तीचा मार्ग आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नारद मुनींनी ही सूत्रे लिहिली आहेत, ती त्यांच्या अनुभूतीची आहेत. भक्तीची रचना त्यांनी केलेली नाही, त्या आधीच्या ऋषि आणि पूर्वसुरींनी भक्तिशास्त्राची रचना केली. आणि ती परंपरेने आपल्यापर्यंत आलेली आहे. हा मागील कालावधी एका अर्थाने अनंत असा आहे. या भक्तिमार्गाचे काही प्रमुख आचार्य आहेत, त्यांची नावे वरती दिलेली आहेत. आपण या सर्वांना भक्तिमार्गाचे प्रमुख “वारकरी” (वाहक, प्रचारक) म्हणू शकतो. भक्तीच्या या पवित्र मार्गावर चालताना लोकांच्या टीकेची भीती न बाळगता भगवंताच्या प्रेमाला प्राधान्य देत निष्ठेने भक्ती करणे हे जीवनाचे सार आहे.

ज्या प्रमुख वारकऱ्यांचा उल्लेख नारद महर्षींनी केला आहे, त्यांची माहिती संक्षिप्त स्वरूपात आपण समजून घेऊ.

सनत्कुमार:

महाविष्णूंच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने सृष्टि रचनेचा संकल्प केल्यावर प्रथम सनक, सनंदन, सनातन, सनातकुमार हे चार कुमार प्रकट झाले. हे नारद मुनींचे सद्गुरू. भक्तिशास्त्राच्या आचार्यांचे वर्णन करण्याआधी नारद महाराज आपल्या सद्गुरुंचे कृतज्ञता पूर्वक स्मरण करीत आहेत.

व्यास :

महर्षी नारद हे कीर्तन कलेचे उद्गाते आहेत, तसे वेदव्यास हे प्रवचन कलेचे उद्गाते मानले जातात. जिथे कीर्तन केले जाते त्याला नारदाची गादी म्हटले जाते तर जिथे प्रवचन केले जाते त्याला व्यासपीठ असे संबोधले जाते. व्यास हे एक महान ऋषी. त्यांनी अनेक ग्रंथाचे लेखन केलेज संपादन केले. त्यांनी महाभारतादि अनेक ग्रंथ लिहिले. पण इतके सारे लिहून त्यांना समाधान लाभले नाही. मग सद्गुरू नारद मुनींनी महर्षी व्यासांना भगवंताचे गुणवर्णन करणारे भागवत त्यांना लिहायला सांगितले. भागवत लिहिल्यावर त्यांना मनःशांती लाभली असे वर्णन आहे.

शुक :

व्या‍सांचे पुत्र, ते जन्मतःच वैराग्य संपन्न होते. श्रीमद्भागवताचे ते आद्य वक्ते मानले जातात. त्यांनी राजा परीक्षितीला भागवत सांगितले.

शाण्डिल्य :

शाण्डिल्य ऋषींची भक्तिसूत्रे प्रसिद्ध आहेत. नारद मुनींनी त्यांचा उल्लेख 18व्या सूत्रात केला आहे.

गर्ग :

कृष्णाचे नामकरण करणारे ऋषी. यांनी सुद्धा भक्ति सूत्रे लिहिली होती, पण काळाच्या पोटात ती गडप झाली असे म्हणावे लागते.

विष्णु :

हे एक महान ऋषी होऊन गेले. त्यांची अधिक माहिती उपलब्ध झाली नाही.

कौण्डिन्य :

धर्मराजाने अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्याचे प्रमुख कौडिन्य ऋषी होते असा उल्लेख आढळतो.

शेष :

क्षीरसागरात महाविष्णू शेषावर शयन करतात. लक्ष्मणाला शेषाचा अवतार मानले जाते.

उद्धव :

यादव कुळातील हा कृष्णाचा परमभक्त. गोपींनी त्याला भक्ति शिकवली.

आरुणि :

छादोंग्य उपनिषदात यांचा उल्लेख आहे.

बलि :

भक्त श्रेष्ठ प्रल्हाद यांचा मुलगा विरोचन यांचा हा मुलगा. हा महान भक्त होता. वामन अवतारात त्याला पाताळाचे राज्य भगवंताने त्याला देऊ केले.

हनुमान :

एका शब्दांत वर्णन करायचे झाल्यास ते असे करता येईल… रामदास (हनुमान).

बिभीषण : रावणाचा भाऊ. महान भक्त. रामभक्तीने चिरंजीव पद प्राप्त केले.

– – या सर्व महान भक्तांच्या चरित्राचे स्मरण करून प्रत्येकाने या पवित्र अशा भक्तिमार्गावर अनुसरण करायचा प्रयत्न करावा.

जय जय रघुवीर समर्थ

– – – – – 

भक्ति सूत्रे ८४ – – 

य इदं नारदप्रोक्तं शिवानुशासनं विश्वसिति श्रद्धत्ते स प्रेष्ठं लभते स प्रेष्ठं लभत इति ॥ ८४॥”

अर्थ : जो मनुष्य नारदांनी सांगितलेली ही शिवमय, कल्याणकारक शिकवण (भक्तिमार्ग) श्रद्धेने व विश्वासाने स्वीकारतो, तो सर्वोत्तम असलेल्या भगवंताची प्राप्ती करतो.

विवेचन : भक्ति करणे जरी शास्त्र असले तरी भक्ति करायला सांगणे, सुचवणे हा उपदेश नव्हे.

भक्ति हे गुह्य ज्ञान आहे. ते सुलभ साध्य आहे, पण सहजसाध्य नाही. इथे वाचकांचा घोळ होऊ शकतो. निसर्गात हवा आहे आणि ती सर्वांना सुलभ आणि सहज साध्य आहे. पण भक्तीच्या बाबतीत थोडा वेगळा विषय आहे. भक्ति करण्यासाठी कोणतीही अट नाही, पण ती करावी लागते, त्यासाठी काही अथवा किमान नीतीनियम पाळावे लागतात. तसे हवेच्या बाबतीत म्हणता येत नाही. प्रयत्न केले, सांगितलेले नीती नियम पाळले तर भक्तीची प्राप्ती सुलभतेने होऊ शकेल.

“जितकी भक्ति तितकी प्राप्ति” हे सूत्र आपण पाहिले आहे. नारद महाराज स्वतः ठामपणे सांगतात की, जो भक्तीच्या या मार्गावर श्रद्धा ठेवतो, तो “प्रेष्ठं”( सर्वोत्तम गोष्ट) ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकतो.

या जगात आपण नव्हतो, तेव्हा भगवंत होता. आज आपण आहोत, भगवंत आहे. उद्या कदाचित आपण नसू, पण भगवंत नक्कीच असेल. कारण न बदलणारा एकमेव भगवंत आहे. तो आपल्याच नव्हे तर चराचर सृष्टीच्या अंतर्यांमी तो स्थित आहे. त्याला जाणून घेणं हे मनुष्य जन्माचे खरे उद्दिष्ट आहे. आपल्याला नरदेह लाभला आहे तर त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. अन्यथा, आपण जन्ममरणाच्या चक्रात फसलेले आहोत, यातून बाहेर पडण्यासाठी भक्तिमार्गासारखा सुलभ मार्ग नाही.

महर्षी नारद ऋषींनी सामान्य मनुष्याचे दुःख दूर होण्यासाठी, नव्हे तर प्रत्येक मनुष्याला शाश्वत सुखाचा मार्ग मिळावा म्हणून ही परमप्रेमा भक्ति सांगितली आहे.

माझ्या सारख्या अल्पमती मंदबुद्धि असलेल्या मनुष्याने नारद भक्ति सूत्र विवेचनाचे शिवधनुष्य उचलण्याचे धाडस केले ते माझ्या सद्गुरूंच्या आधाराने. हे विवेचन करण्यात जी काही त्रुटी राहिली असेल ती माझी आहे आणि जे काही चांगले असेल तो मात्र माझ्या श्रीमहाराजांचा कृपाप्रसाद आहे अशी माझी श्रद्धा आहे. आपण हा कृपा प्रसाद गोड मानून घ्यावा आणि भक्तीमार्ग आचरावा.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– – क्रमशः भक्तीसूत्रे – ८२, ८३, ८४. (समाप्त)

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments