सुश्री शीला पतकी
इंद्रधनुष्य
☆ सोलापुरातील राणी लक्ष्मीबाई मार्केट… ☆ सुश्री शीला पतकी ☆
सोलापुरातील राणी लक्ष्मीबाई मार्केट – – अर्थात लक्ष्मी मंडई
सोलापूरकरांचे सर्वात आवडते ठिकाण म्हणजे लक्ष्मी मार्केट या मार्केटचे पूर्वीचे नाव राणी विक्टोरिया मंडई असे होते पण साठ सालानंतर याचे नामकरण राणी लक्ष्मीबाई मंडई असे झाले. गुलामगिरीच्या मुक्ततेला तेरा वर्षे लागली. असो मार्केटची मूळ इमारत पूर्णतः दगडी असून वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांसाठी असणारे ओटे सुद्धा दगडी आहेत. पण आता मात्र दुकानांच्या भाऊ गर्दीत मंडईचे मूळ स्वरूप हरवून गेले आहे.
मंडईतप्रवेश करताना किराणा मालाची भुसार मालाची दुकानं लागत असत आजही ती दुकाने तिथेच आहेत. दुकानाच्या आत मध्ये फळीच्या चौकटीवर बसलेला दुकानदार त्याच्यासमोर ठेवलेल्या पाट्या पोती धान्याने भरलेली असत गिऱ्हाईक त्याच्यासमोर उभारून खरेदी करत असे. लक्ष्मी मार्केटच्या मूळ बिल्डिंग समोरचा भाग नारळ पूजा समान इत्यादीच्या दुकानाने व्यापलेला आहे कॉर्नरच्या बाजूला अजूनही पानाच्या दुरड्या घेऊन बसलेले लोक असतात त्यांच्या दुरड्यामध्ये असलेली विड्याची पाने अत्यंत आकर्षक पद्धतीने मांडलेली असतात एका ट्रे सारख्या कप्प्यात कापडी पिशव्या सुपार्या चुन्याच्या डब्या कातडबी इत्यादी साहित्य मिळते त्या पानाच्या टोकऱ्या व त्याच्या मागे पान विक्रेता उभा. आम्ही लहानपणी पान विकत घेत होतो… म्हणजे घरात काही समारंभ वगैरे असेल तर.. एक आण्याला दोन आण्याला शंभर पाने मिळत व एक पैशाला चुन्याची डबी आता त्या किमती अवघड आहे सांगणे.
पानाच्या बाजारचा कॉर्नर संपला की त्याला जोडून बागवानांचे राज्य सुरू असंख्य बागवान बंधूंची फळांची दुकाने मांडलेली ती वंशपरंपरागत चालू आहेत. दुकानाच्या समोरची जागा उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगडाने व्यापलेले असते असंख्य हिरवीगार कलिंगडे… लहान मोठे वर्गीकरण केलेले… त्या कलिंगडाच्या एका ढिगात वरच्या बाजूला ठेवलेला त्याच्यावर एक भला मोठा सुरा. कलिंगडे खरेदी करताना बागवान हातामध्ये कलिंगड घेऊन त्याला थापटून कानाजवळ नेतो आणि खसखन त्याच्या पोटात सुरी खूपसून एक चीर पाडतो.. गुडघ्यामध्ये धरून गिऱ्हाईकाला ते लाल आहे दाखवतो… घरी आल्यानंतर त्याचा रंग फिकट लाल असल्याचे जाणवते… ही हुशारी त्या बागवानांचीच होती. नेटाने धंदा करणारी ती तरुण पोरे आजच्या पिढीला ही आदर्श आहेत दिवसभर त्या ढीगाऱ्या पाशी ते बसूनच असत.
फळवाल्यांच्या मधून आडव्या बोळातन गेला उजव्या बाजूला बटाटे कांदे वांगे, भोपळा त्यांचे मोठे मार्केट त्याच कोपऱ्यावर डाव्या बाजूला एखादी लाकडी चौकट ठेवून त्याच्यावर फडके अंथरून कोथिंबीर आलं मिरची खोबऱ्याचे तुकडे विकणारी मंडळी! बरोबर त्याच्यासमोर डाव्या बाजूला कांदा लसूण चे कट्टे पिरॅमिड सारखा लावलेला कांदा, कांदा सुंदर आहे हे दर्शवतो लसणाच्या पांढऱ्या शुभ्र ढिगाने कांद्याचे गुलाबी पण ही वाढते.
मग प्रत्यक्ष आतल्या भाजी मंडईत आपण येतो तिथल्या अनेक ओट्यावरती कोबी फ्लॉवर काकड्या ढब्बू मिरची पडवळ गोवारी वांगी असे ढीग असतात. मटकी साठी मात्र स्वतंत्र दालनच असते… मूग मटकी हरभरा वाटाणा अशा कडधान्याच्या स्वतंत्र टोपल्या भरलेल्या दरबारासारख्या असतात मटकीचा पांढरा स्वच्छहिमालय पर्वतासारखा ढीग.. बाजूला कागद आणि वर बांधलेला दोरा… तराजूत मटकी मोजून कागदात बांधून दोरा गुंडाळण्याचे त्याचे कसब आणि घाई आजही डोळ्यासमोर आहे…..!
उजव्या हाताचे ओटे पालेभाज्यांचे! असंख्य पालेभाज्यांचे ढिगारे, भरायच्या मिरच्या कडवंच्या लसणाची पात हे त्या ओट्यावर उपलब्ध असे… ‘! आता त्याच्यापुढे आणखीन मार्केट गेले आहे पण ते अत्यंत अस्वच्छ असते आतल्या मार्केटच्या एका बाजूला लिंबाने आपला वेगळाच पक्ष स्थापन केलेला असतो. तिथे फक्त लिंबू म्हणजे लिंबूच मिळतं लिंबा मध्ये असलेल्या आणि आपल्या तयार न होणाऱ्या सी विटामिन चे वैशिष्ट्य दाखवणारे पिवळ्या धमक आणि हिरव्यागार लहानांपासून मोठ्यापर्यंत अशा लिंबाच्या ढिगार्याने सजलेले तेओटे म्हणजे हिरव्या बांगड्या भरून हळदीची साडी नेसलेल्या नवविवाहीते सारखेच सजलेले असतात.
त्याच्या बाजूचे चार पाच ओटे म्हणजे खतरनाक… हो हो सोलापुरी भाषेत खतरनाक..! तांबडी मिरची मसाला तिखट आणि मसाल्याचेसर्व पदार्थ आकर्षक पद्धतीने मांडलेले असतात त्या ओट्यांच्या भोवती जाणं म्हणजे एक तर नाकाला रुमाल धरून जा किंवा त्याच रूमालाने नाक पुसत पुसत शिंकांनी हैराण होऊन या. मिरची वाल्याला मात्र काहीच होत नाही तो शांतपणे मिरचीचे ढिगाऱ्यात हात घालून ते ढिगारे वर खाली करत असतो तिथे बायकांची गर्दी जास्त असते आणि असायची सुद्धा कारण तो प्रांत बायकांचा
आता परत आलो त्या मार्गाने बाहेर पडलोच तर पुन्हा काही उंची वरची दुकाने मसाला सामान, टागून ठेवलेले भोपळे कोहाळे त्याच्यापुढे जाऊन उजवीकडून बाहेर पडलात की कांदा बटाटा टोमॅटो इत्यादीची घाऊक दुकाने हॉटेल व्यवसाय लागणारा भाजीपाला आणि आजही घेतला जातो. त्याच्यापुढे वरच्या चौकाकडे निघालात की जुन्या हत्यार सामानाची दुकाने लागतात त्यात खुरप कात्री सुरे अडकिते. ते बाग कापायच्या मोठ्या कात्र्या अशा लोखंडी सामानाचे दुकान लागते रस्त्यावरच असे मांडलेले त्याला वळसा घेऊन पुन्हा मंडईच्या दिशेने आलात तेथे भाजी घेऊन बसलेले शेतकरी आढळतात त्यामध्ये काकड्या कणसेंचा आवळे चीगुर हिरव्यागार चिंचा मुळे इत्यादी अस्सल भाजीचा गावरान नमुना तरटावर किंवा काळपट फडक्यावर मांडलेला असतो. इथे मात्र भाजी ढिगार्यावर विकत मिळत असे त्याला खुत्ते हा शब्दही आहे आणि आजही तिथे तशीच भाजी मिळते. इथून पुन्हा मार्केटच्या बाहेर पडायच्या रस्त्यावर डाव्या बाजूला फक्त केळी वाल्यांची जागा आजही आजही पिंपळ तसाच उभा आहे त्याच्या खालचा हनुमान भाजीच्या पिशव्या उचलण्याचे बळ देतो आहे. मार्केट मधील सर्व मंडळी त्याची पूजा करतात रुईच्या पानांचा हार असतो शेंद्राने वर्षातून एकदा तो रंगला जातो ती जागा मात्र फक्त त्याची आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे तो प्रतीकच आहे. हिंदू असो मुसलमान असो हनुमानावर सर्वांची श्रद्धा आहे. हनुमानाच्या समोर उभे राहिलो तर उजव्या हाताला आजही माठा खालचे स्टॅन्ड म्हणजे तिवया दोऱ्याचे शिंके कुलपाच्या किल्ल्यावाली सांडशी चिमटे लोखंडे पाट्या कढई छोटे तवे अशा लोखंडी वस्तू घेऊन बसलेल्या बाया आढळतात. त्याच्याच बाजूला किल्ल्याचे ढीगारे घेऊन बसलेले कुलूप वाले दिसतात आजही तुमचे न उघडणारे कुलूप तिथे उघडून मिळते ह्याला म्हणतात कौशल्य प्रधान एज्युकेशन! केरसुण्या टोपल्या दुरड्या सुपल्या सुप हे विकणाऱ्या बुरुडांची दुकान आहेत तिथेच आहेत मोठे मोठे बांबू ही उभे असतात त्याच्यासमोर उभे राहिलोत की सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन आजही घडते किंबहुना आज ते अधिक चांगले घडते कारण तिथला परिसर व तिथे एक मोठे गेट बांधण्यात आलेले आहे. त्याच लाईनमध्ये सरळ कुंड्या मातीचे डेरे पणत्या परळ खुजे विकणाऱ्या लोकांची दुकाने रस्त्यापर्यंत लावलेले होती आणि आजही आहेत पाठीमागे त्यांची पत्र्याची घरे आहेत आणि तेथून पुढे मात्र जुन्या सामानाची दुकाने लागलेले असतात ते सारं आजही आला तरी जसेच्या तसे दिसेल…. म्हणजे सार्वजनिक संडास बाथरूम महापालिकेने बांधले आहे एवढं सोडलं तर बाकी सारंच आहे तसंच आहे तो परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न महापालिका करते पण ते अवघड आहे
पूर्वी मार्केट मधील सगळे लिलाव त्या पिंपळाच्या झाडाखाली व्हायचे त्यामुळे टोपले वाल्या बायकांची तिथे वर्दळ असायची लिलाव झालेला माल डोक्यावर वाहून नेणे त्यांचे काम त्यापेक्षा वेगळी व्यवस्था म्हणजे छोटा हत्ती रिक्षा वगैरे काही नव्हते त्यामुळे त्या लोकांना काम मिळत होते.
आता मार्केटच्या आजूबाजूला खूप वर्दळ झाली आहे पण भाजी विक्रीच्या जागा जश्याच्या तशाच आहेत. अगदी दहा पंधरा वर्षांनी आलेला माणूस सुद्धा त्याच जागेवर पुन्हा तीच भाजी खरेदी करू शकतो. त्यात काही फरक नाही भाजीचे लिलाव मात्र आता संपले. ते आता व्यापारी यार्डात होतात. फळबाजारच्या पुढच्या बाजूला पालेभाज्याच्या ढिगार्याचे लिलाव आजही चालू असतात आणि किरकोळ विक्री सुद्धा चालू असते. मार्केटचे रेट सकाळपासून दुपारपर्यंत बदलत जातात संध्याकाळी हा भाव अगदीच पडलेला असतो गरीब जनता संध्याकाळी भाजी खरेदी करून घेऊन जात असे
लहानपणी आम्ही लक्ष्मी मार्केटमध्ये भाजी खरेदीला जात असू आठ आण्यामध्ये पिशवी गच्च भरून भाजी येत होती शिवाय एखाद्या पैशाची चिंच विकत घेऊन ती खात खात आम्ही घरी परतत असू.
लक्ष्मी मंडईत फिरून आलात तर भाज्यांचे वैभव त्या काळातही भुरळ पडणारे आणि आजही!
विविध भाज्यांच्या विक्रेत्यांचे ते आवाज…. ” लोटक्यात उड्या मारायची वांगी “… ” लालबुंट तमाटे… हे ओरडणं “पालक शेपू मेथी धा पैसे धा पैसे “हा बेंबीच्या देठा पासून आलेला आवाज… पेंड्या हातात घेऊन नाचवणे.. आजही स्मरणात आहे…!
वर्षानुवर्षे त्या मंडईत गेल्यामुळे सगळ्या विक्रेत्यांशी तयार झालेल नातं हे वेगळंच आहे अगदी मुस्लिम असलेला बागवान सुद्धा “लय दिन मे आप आये नही ताई सब ठीक तो आहे ना? “अशी प्रेमाने चौकशी करतो. कुणाशी तरी काका मामाचं नातं जुळतं कुणीतरी म्हणतात “तुमचीच वाट बघत होतो किती उशिरा आलाव
तुमच्यासाठी कडव्यांच्या बाजूला काढून ठेवल्यात बघा “अशी प्रेमळ वाक्य ही ऐकू येतात. भाजी हे केवळ भाजी विकत घेण्याचे ठिकाण नाही तर माणसा माणसात हिरवकंच नातं तयार करणारी ती छान जागा आहे. किती दिवसांनी तुम्ही गेलात तितक्याच कोवळीकेने तुम्हाला हाका मारतील. ” मॅडम या की वांगी लय चवदार आहेत आपल्या मळ्यातली आहेत “
किंवा आंबे वाला बागवान म्हणतो,.. ” ताई तुम्हारे लिए बाजू मे काढ के रखे है, देखो आज आम बहुत अच्छा है लेके जाओच पैसा आम खाने के बाद कल देना ” ही वाक्य आजही मंडईत ऐकू येतात ही सोलापूरची खासियत आहे. हा आपलेपणा जपणार एकमेव गाव आहे…. पाण्याचा कोरडेपणा असेल पण नात्यातला हा ओलावा मात्र आजही टिकून आहे…! पिशवीत आग्रहान चार काड्या जास्त भाजी भरून देणारी माणसं आजही या मंडईत आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या भुकेल्या पोराला, म्हाताऱ्या माणसाला दोन केळी हातात ठेवणारा भाजीवाला दिसतो.. खेडेगावातून आलेल्या माणसाला भाकरी खाताना आपल्या ढीगातली काकडी जेवायला देणारा भाजीवाला इथेच भेटतो.
सोलापुरात काही नसलंतरौ माणुसकीला मात्र ऊणेपण नाही हेच खरं पैसा खूप नसतानाही समृद्ध असलेले गाव म्हणजे सोलापूर!
ॲमेझॉन वरून ऑर्डर करून कितीही चांगली भाजी येऊ द्या किंवा एखाद्या मॉल मधील आकर्षक पद्धतीने मांडलेली भाजी असू द्या लक्ष्मी मार्केटला जाऊन विकत आणलेल्या, घासाघिस करून चार आणे स्वस्त करून आणलेल्या त्या भाजीची चवच वेगळी कारण त्यात भाजी विकणाऱ्याची माया असते, संवाद असतो, कधी कधी वाद सुद्धा असतो अशीआंबट गोड अविट गोडीची चव त्या भाजीला असते.
मग काय मंडळी चला तर मग लक्ष्मी मार्केटचा फेरफटका मारूयात.. काय म्हणालात या लेखामुळे फेरफटका मारून झाला. ठीक आहे पण उद्या सकाळी मात्र उठून पिशवी हातात घेऊन थेट लक्ष्मी मार्केटला निघायचं बरं..! परगावच्या मंडळींना लेख वाचून फेरफटका मारून आल्याचा फील नक्कीच आला असेल चला तर मग लक्ष्मी मंडईला… निघताय ना?
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






