श्री सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ बाप्पाचा खरा संदेश – लेखक : श्री विनोद नाठे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

आज नाशिकमध्ये द्वारकेवरून नाशिक रोडकडे जात होतो.

द्वारकेच्या थोडं पुढे आलो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गणपती बाप्पांच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या दिसल्या. वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या रूपातल्या सुंदर मूर्ती होत्या.

लोकांची प्रचंड गर्दी होती.

कोणी आपल्या आवडीचा बाप्पा निवडत होतं, कोणी मूर्ती गाडीत बसवत होतं… कुठे वाजंत्री वाजत होती, कुठे ढोल-ताशे होते, तर कुठे बँड-बाजा सुरू होता.

लोक अगदी आनंदाने, उत्साहाने बाप्पांना घरी घेऊन जात होते.

ते सगळं दृश्य पाहून मी गाडी थोडी बाजूला घेतली आणि तिथेच उभा राहून ते सगळं बघत होतो.

 

तेवढ्यात तिथून माझा एक ख्रिश्चन मित्र जात होता.

त्याचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यानेही गाडी बाजूला घेतली आणि माझ्याजवळ येऊन उभा राहिला.

थोड्या इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या.

 

आणि अचानक तो मला म्हणाला,

“नाठे साहेब, तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारू का? ”

 

मी म्हटलं,

“अरे, राग कसला? विचार की! ”

 

तो म्हणाला,

“मला खरंच खूप दिवसांपासून एक प्रश्न पडला आहे. ”

 

मी म्हटलं,

“काय प्रश्न? ”

 

तो म्हणाला,

“हे बघा साहेब… तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना किती वाजत-गाजत घरी घेऊन जाता. एवढा उत्साह असतो… पूजा करता, आरती करता, धूप दाखवता, नैवेद्य दाखवता… दहा दिवस अगदी मनापासून त्यांची सेवा करता. ”

 

“पण माझा एक प्रश्न आहे…”

“दहा दिवस ज्यांना तुम्ही देव मानून एवढ्या श्रद्धेने पूजा करता, त्याच गणपती बाप्पांना अकराव्या दिवशी नदीत, विहिरीत किंवा पाण्यात नेऊन विसर्जित का करता? ”

“म्हणजे मला हेच कळत नाही…”

“ज्यांना तुम्ही देव मानलं, त्यांची पूजा केली, त्यांच्यासमोर डोकं टेकवलं… आणि नंतर त्याच मूर्तीला पाण्यात बुडवता… हे चुकीचं वाटत नाही का? ”

 

त्याचा प्रश्न ऐकून मला खरंच खूप छान वाटलं.

कारण प्रश्न अगदी मनापासून विचारलेला होता.

 

मी त्याला म्हटलं,

“अरे वा! खूप छान प्रश्न आहे तुझा. ”

“आणि तुझ्या या प्रश्नाचं उत्तर तुला मिळायलाच पाहिजे. ”

 

तिथे खूप गर्दी आणि वाजंत्री सुरू होती. म्हणून आम्ही दोघं जरा बाजूला गेलो.

एका चहाच्या टपरीवर बसलो.

दोन चहा मागवले.

चहा घेत घेत मी त्याला म्हणालो,

 

“बघ मित्रा… गणेशोत्सव हा फक्त बाप्पांना घरी आणायचा, पूजा करायची आणि विसर्जन करायचं एवढाच विषय नाही. ”

“यामध्ये आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ”

तो माझ्याकडे बघत होता.

 

मी म्हणालो,

“तो अर्थ म्हणजे जन्म आणि मृत्यू. ”

“या जगात जो जन्माला आला आहे ना, त्याला एक दिवस जायचंच आहे. ”

“माणूस असो, राजा असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असो… कितीही मोठ्या पदावरचा माणूस असो… किंवा अगदी साधा सामान्य माणूस असो…”

– – जन्म झाला आहे म्हणजे मृत्यू अटळ आहे.

 

“पूर्वी काय होतं, माहिती आहे? ”

“आतासारख्या रेडिमेड गणपतीच्या मूर्ती दुकानात मिळत नव्हत्या. ”

“माती आणायची… त्यातून गणपती बाप्पांची मूर्ती स्वतः बनवायची… गणेश चतुर्थीच्या दिवशी तिची स्थापना करायची. ”

“दहा दिवस त्या मूर्तीमध्ये देव पाहायचा. ”

“मग मनापासून पूजा करायची, आरती करायची, नैवेद्य दाखवायचा, सेवा करायची. ”

“आणि दहा दिवस झाल्यानंतर…”

ज्या मातीपासून ती मूर्ती बनली, त्याच मातीत किंवा पंचमहाभूतांमध्ये ती पुन्हा विलीन करायची.

– – “यालाच आपण विसर्जन म्हणतो. ”

“म्हणजे आपण बाप्पांना पाण्यात बुडवत नाही आहोत…”

आपण आपल्याला एक गोष्ट आठवण करून देत असतो — जे आलं आहे, ते एक दिवस जाणार आहे.

 

मी त्याला म्हणालो,

“गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला हेच शिकवते. ”

– – “गणेश चतुर्थीला बाप्पा आले. ”

“दहा दिवस आपण त्यांच्यासोबत आनंदाने राहिलो. ”

“त्यांची पूजा केली, गोडधोड केलं, नैवेद्य दाखवला…”

“आणि मग अकराव्या दिवशी त्यांना निरोप दिला. ”

आपलं आयुष्यही अगदी असंच आहे.

 

“आपण या जगात येतो…”

“काही वर्षं राहतो…”

“घर बांधतो, पैसा कमावतो, मोठं होतो, पदं मिळवतो…”

“कधी सुख येतं, कधी दुःख येतं…”

“कधी आपली माणसं सोबत असतात, तर कधी ती आपल्याला सोडून जातात…”

“आणि शेवटी…”

आपल्यालाही सगळं इथेच सोडून जायचं असतं.

 

– – मग एवढा अहंकार कशाचा?

कशाचा गर्व करायचा?

कशासाठी कोणाचा द्वेष करायचा?

कशासाठी कोणावर राग धरायचा?

आपण या पृथ्वीवर कायमचे राहायला आलोच नाही आहोत.

आपण इथे काही दिवसांचे पाहुणे आहोत.

 

जसं आपण एखाद्याच्या घरी चार दिवस पाहुणे म्हणून जातो…

मस्त राहतो, आनंद घेतो, सगळ्यांशी प्रेमाने वागतो आणि वेळ आली की परत निघून जातो…

तसंच आपलंही आहे.

 

आपण या पृथ्वीवर आलो आहोत, काही ठराविक काळासाठी.

मग जोपर्यंत आहोत…

स्वतः आनंदाने जगा आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू द्या.

 

मी त्याला एक अजून गोष्ट सांगितली – – 

आपल्या ग्रामीण भागात पूर्वी अनेक ठिकाणी स्मशानभूमी गावाच्या जवळ किंवा अगदी गावाच्या मध्यभागी असायची.

त्यामागेही एक विचार होता.

माणसाला मृत्यूचं भान असावं.

रोजच्या रोज ती स्मशानभूमी दिसली की मनात एक गोष्ट यावी—

 

“एक दिवस माझ्याही देहाची माती होणार आहे. ”

मग कशाचा एवढा गर्व?

कशाचा एवढा अहंकार?

 

आज ज्याच्यावर रागावलोय, उद्या त्याच्याशी बोलण्याची संधी मिळेलच असं नाही.

आज ज्याच्याशी भांडलोय, उद्या तो आपल्यात असेलच असं नाही.

 

म्हणून…

मनातलं वैर ठेवू नका.

ज्याच्यावर प्रेम करता, त्याला आजच सांगा.

ज्याच्याशी भांडण झालंय, त्याला शक्य असेल तर आजच माफ करा.

कारण आयुष्य खरंच खूप छोटं आहे.

 

आणि गणपती बाप्पांचं विसर्जन आपल्याला दरवर्षी याच गोष्टीची आठवण करून देतं.

“आलो आहोत, एक दिवस जायचं आहे… म्हणून तोपर्यंत प्रेमाने राहूया. ”

 

मी हे सगळं सांगत होतो आणि माझा मित्र शांतपणे ऐकत होता.

शेवटी काही क्षण तो माझ्याकडे बघतच राहिला.

मग त्याने अक्षरशः हात जोडले आणि म्हणाला,

 

“नाठे साहेब… आज माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ”

 

आणि तो म्हणाला,

“वा… धन्यवाद! ”

मी त्याला म्हटलं,

“मला धन्यवाद देऊ नकोस मित्रा. ”

“हा विचार फक्त माझ्यापर्यंत आणि तुझ्यापर्यंत ठेवू नकोस… पुढे घेऊन जा. ”

 

कारण गणपती बाप्पांचं विसर्जन म्हणजे फक्त एका मूर्तीला पाण्यात विसर्जित करणं नाही…

 

ते आपल्याला जीवनाची जाणीव करून देतं – – 

जन्म आहे, म्हणून मृत्यू आहे.

मृत्यू आहे, म्हणून जगण्याला किंमत आहे.

 

म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे…

प्रेमाने जगा…

आनंदाने जगा…

दुसऱ्याला त्रास न देता जगा…

आणि शक्य असेल तितकं दुसऱ्याच्या आयुष्यातही आनंद निर्माण करा.

 

कदाचित…

हाच गणपती बाप्पांचा आपल्याला दरवर्षी मिळणारा खरा संदेश असेल.

 

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! !

☆

लेखक : श्री विनोद नाठे

भूमिपुत्र फाऊंडेशन  मो  098909 79097

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted