डॉ. निशिकांत श्रोत्री
📚 क्षण सृजनाचा 📚
☆ गुंता ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆
गुंता
आयुष्य आपण जगू तसे असते या भ्रमात जगत असतांना आजूबाजूला जे काय घडते आहे त्याने गोंधळून जायला होते. आपले बौद्धिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक, वैज्ञानिक, संघटित वा कसलेही सामर्थ्य त्याच्या क्षमतेनुसार योग्य प्रकारे विधायक कारणासाठी न वापरता केवळ तत्कालिन वैयक्तिक लाभासाठी आत्मकेंद्रित वृत्तीने, विध्वंसक कारणांसाठी वापरून वाया घालवले जात आहे. आईसारखी परमेश्वरस्वरूप वत्सल व्यक्ती स्वतःचे करियर, शरीरयष्टी, सौंदर्य, अशा गोष्टींसाठी मातृत्वाच्या नैसर्गिक कर्तृत्वाची पायमल्ली करीत आहे. स्वार्थासाठी प्रदूषणाद्वारे निसर्गावरच माणसाने हल्ला चढविला आहे. या आणि अशा अनेक गोष्टींनी निसर्ग देखील गुदमरून जित आहे. हेच आहे का मानवी जीवनाचे उद्दिष्ट? अपेक्षाभंगाने सुन्न होऊन अभावितपणे ‘गुंता’ ही कविता प्रसविली गेली.
☆ गुंता ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆
साध सरळ जीवन
अनुभवांची गुंतवळ
…
…
…
मध्यरात्र पुनवेची
काजळमिट्ट चांदण
प्रभातच्या सनईवादनातून
भेकराच केकाटण
वैनतेयाच्या पंखांच्या डोलाऱ्याला
कलकलणाऱ्या कोंबडीच्या पंखांची सजावट
उपसलेल्या खड्गाच्या पात्यातून
गोठलेल्या हिमाश्रूंचे थेंब थेंब ठिबकणं
प्रभंजनाच्या थैमानात
भेदरवणारी नीरवता
सण सोहळा उत्सव
रुधिराचा पिंजर प्राणांचे नैवेद्य
तान्हुल्याचा आर्त गडगडाट
मातेच्या स्तनाग्रातून रक्त चिळकांड्या
…
…
…
कुठल्या शाळेच्या बाकावर होईल
या गुंत्याच उबदार अंगड?
☆
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम. डी. , डी. जी. ओ.
कर्वे रस्ता, एरंडवणे, पुणे ४११००४ मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





