श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ राजा राणीचा संसार ☆
राजा राणीचा संसार, हवी कशाला भाकर
वीस मिनिटात येतो, आता पिझ्झा दारावर
राजा राणीचा संसार, हवे स्वतःचेच घर
येता जाता रस्त्यावर, माझे असावे माहेर
राजा राणीचा संसार, नको नंदा नको दिर
सासू सासरे देखील, गावी असावेत दूर
राजा राणीचा संसार, नाही मला हात चार
घरकाम करताना, लावेल तो हातभार
राजा राणीचा संसार, खोट्या पावसाचा जोर
शाॕवरच्या खाली नाचो, माझ्या मनातला मोर
राजा राणीचा संसार, नको घामाची ह्या धार
लावू एसी घरामध्ये, उन्हाळा ना सोसणार
राजा राणीचा संसार, का मी खावी चिंचा बोरं ?
एवढ्यात नको आहे, खरंतर मला पोरं
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈