सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 124
☆ तू… ☆
अशी कशी गं तू..
कधी अशी कधी तशी….
अनाकलनीय वाटत असतानाच–
समजतेस ,
बीजगणितासारखी,
सुटतेसही पटापट…..
आणि पैकी च्या पैकी मार्कस् मिळाल्याचा आनंद ही मिळवून देतेस……..
तर कधी मेंदूत भुंगा सोडून देतेस…
अगदी रूक्ष होऊन सांगावंसं वाटतं तुला,
“बाई गं …पण हे सगळं तू मला का सांगते आहेस?”
तू आहेस एक अस्वस्थ जीव…..
तुला काय हवंय हे तुलाच कळत नाही.
तुझं रडणं…तुझं चिडणं…
तुझं हे….तुझं ते….
मधेच जाणवतं तू समंजस झाल्याचं….
आज अचानक आठवली,
काॅलेज मधे असताना वाचलेली…खांडेकरांची ययाती…
कधी तू देवयानी तर कधी शर्मिष्ठा…..
तपासून पहावं म्हटलं तर हाताशी
नसतात कुठलेही संदर्भ ग्रंथ……
आणि तू निसटतेस हातातून पा-यासारखी…
बांधता येत नाही तुला शब्दात…
पण तू नायिका असतेस……
एका अद्भुत… गुढ कादंबरी ची..
जिचा लेखक अजून जन्माला यायचा आहे…..
तो पर्यंत युगानुयुगे अशी च बेचैन… अस्वस्थ….कुठल्याही फ्रेममधे न बसणा-या…..
आकर्षक चित्रासारखी ……
तू अशी तू तशी तू कशी गं……
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
धन्यवाद सर