श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 290
☆ सुजल्या टाचा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
अवघे जीवन झिजले आणिक झिजल्या टाचा
अशा कशा ह्या माझ्यावरती रुसल्या टाचा
*
किती चांगले जीवन होते लग्नाआधी
तारुण होते तेव्हा गोऱ्या हसल्या टाचा
*
जरीकाठची नवीन कोरी होती साडी
पैठणीत ह्या कधी अचानक रुतल्या टाचा
*
हे धोब्याचे काम आमचे काय करावे
सोड्याच्या माऱ्याने होत्या चिरल्या टाचा
*
या मातीवर प्रेम एवढे शेतकऱ्याचे
प्रेमाखातर मातीतच या फसल्या टाचा
*
वेगवेगळ्या मलमाच्या ह्या डब्यासोबती
तोंड पाडुनी औषध चोळच बसल्या टाचा
*
चप्पल सुद्धा पायालाया काचत आहे
चपला म्हणती तुझ्या किती ह्या सुजल्या टाचा
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



