श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ श्रावण… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
☆
ओल्या हिरव्या पाऊली, आला आषाढ-श्रावण
आली स्वागतास त्याच्या, उन्हे केतकी न्हाऊन
वारा मातला गंधात, झाले रानवेडे पक्षी
निथळत्या पानांतून, झाली जळभर नक्षी
*
झुले हालती फांद्यांचे, झाली पानांची पैंजणे
तृणपाते इवलेसे, तेही डोले दिमाखाने
ऊन खेळे पावसाशी, तेढ विसरून जुनी
झाली मनांमनांतील, दुःख वेदनांनी गाणी
*
थोडा माझ्या ही देहात, स्वैर वाहू दे हा वारा
आणि मिटल्या मनाचा, धुंद फुलू दे पिसारा
भग्न.. ओसाड जीवाचे गजबजू दे रे गांव
पुन्हा एकदा श्रावणा, ‘जीवलगा ‘स भेटव
☆
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवी / गझलकार
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




