डाॅ. निशिकांत श्रोत्री
कवितेचा उत्सव
☆ स्थितप्रज्ञ… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
स्थितप्रज्ञ राखी मनासी विशुद्ध
समर्पित जगणे जीवन समृद्ध ||ध्रु||
*
मना कामना न जीवना येतांना
निरागस चित्ता बाधा ना वासना
प्रभा लाभते मग आत्म्यास शुद्ध
समर्पित जगणे जीवन समृद्ध ||१||
*
कर्मास करणे हा देह धर्म
नरजन्माचे हे जाणावे वर्म
फलाशेत गुंतून राही न बद्ध
समर्पित जगणे जीवन समृद्ध ||२||
*
त्यागुनी कामा कर्मा करावे
भगवंत ज्ञाना सदा आचरावे
निरपेक्ष व्हावे होऊनि बुद्ध
समर्पित जगणे जीवन समृद्ध ||३||
*
सेवा करावी गंड नसावा
हीनत्व ना अहंभाव ही यावा
अद्वैत जाणोनी मनी हो निरुद्ध
समर्पित जगणे जीवन समृद्ध ||४||
☆
कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम. डी. , डी. जी. ओ.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



