सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “दिस बहीण भावाचा…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
रक्षाबंधनाचा दिस .. दिस बहीण भावाचा
वाट पाहते भावाची .. दिस होईल सुखाचा ……
*
भाऊ गं माझा लांब .. सय दाटे या मनात
आकाशी जरी चंद्र .. तरी भरती सागरात ……
*
वाजे दारात पाऊल .. मन धावे उंबऱ्यात
वाटे भाऊराया आला .. हर्ष मावेना मनात ……
*
दिस सरला सरला .. पाहू गं किती वाट
भाऊराया सये माझा .. गुंतलेला गं कामात ……
*
सांजवात ही लावली .. उजळला गं देव्हारा
जरी दूर भाऊ माझा .. इथे मायेचा उबारा ……
*
सुखी ठेव देवराया .. माझ्या भावाला सतत
इडा पिडा टळो त्याची .. सदा राहो आनंदात ……
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




