श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ स्वातंत्र्यानंतर केवळ सत्तेसाठी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
☆
प्रहार पाठीवर लाठीचे,
गोळ्या बंदुकीच्या छातीवर
मरण यातना तुरुंगात पण,
हृदयी स्वातंत्र्याचा जागर
*
तोडण्यास त्या दास्यशृंखला
वधस्तंभीही चढले हासत
असे क्रांतीचे शिपाई होते
भारत-मातेसाठी झुंजत
*
अखेर क्षितिजावर तेजोमय
स्वातंत्र्याचा सूर्य उगवला
आल्या क्रांती ऐवजी शूरांच्या
हाती शांतीच्या जप-माला
*
नवा गडी अन् राज्यही नवे
तंत्र नवे लागले कळू
भोग-लालसा भुजंग होऊन
डंख मारती हळूहळू
*
चोरी, अत्याचार, मुजोरी
कायद्याची ना तमा कुणा
मूठ दाबल्याविण फाइल ती
जरा पुढेही सरके ना
*
शतक वयाच्या जुन्या इमारती
उभ्या आजही डौलात
काल बांधले पूल-मनोरे
आज कसे कोसळतात?
*
हे ‘ते’ स्वराज्य नोहे ज्यास्तव
देशभक्त फाशी गेले
इंग्रज गेले, आम्हीच आमुच्या
देशाला पुरते लुटले
*
काबिज करण्या तख्त दिल्लीचे
पक्ष सांगती गर्जून
आम्हीच सक्षम राज्य कराया
द्या आम्हाला निवडून
*
क्रांति-विरांचे ते प्राणार्पण
अन् सत्तेसाठी ‘हे’ रणकंदन
अध:पतन पाहून विलक्षण
तुटती धागे आतुन आतुन
*
तरीही वंदनिय हिंदभूमी ही
मला तिचा अभिमान आहे
फडकत राहो उंच ‘तिरंगा’
तो तर आमुचा प्राण आहे
☆
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



