श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ पाऊस जर, तारुण्य सर… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
पावसात भिजून झालेनंतर
मन कसे हे तरुण झाले
आयुष्याचे सरलेले ओले क्षण
पुन्हा नव्याने फिरुन आले.
*
घनासारखी मनात झरझर
आठवांचे जळ खळखळ
हिरवे रंग चौफेर डौलदार
त्या दिवसांची तळमळ.
*
आता सुखांना कवेत घ्यावे
सोनेरी उन्हात रमावे
मंद पाउले पळावीत थोडी
डोळ्यात श्रावण जमावे.
*
तरी वेदना शमवी पाऊस
अलगद हृदयी तारुण्य
उगीच हसावे स्वतःशी पुन्हा
कंठ दाटता ऋतू कारुण्य.
*
किलबील ऐकता भाव नवे
प्राण ऊभारी आनंद पावे
पाखरांच्या घरट्यात विसावा
पाऊस उसंती, तृप्त व्हावे.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





छान कविता!