प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ देव हृदयात आहे… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
☆
देव हृदयात आहे, वेड्या मना शोध, पाहे
देव मनात तनात नसानसात तो राहे..
देव हृदयात आहे…
*
श्वास चालतो चालतो, देव जाताच थांबतो
हृदयाचा एक ठोका देव आहे त्यात चोखा
देव अनंत अनंत देवा वाचून आहे काय?
देव हृदयात आहे..
*
देव श्रीमंतीचे वाण, देव शेतातले धान
बीज अंकुरत नाही नसे देव तया ठायी
देव म्हणजे चैतन्य देव जीवातला प्राण…
देव हृदयात आहे…
*
जीवाशिवाचे मिलन आहे विश्वाचे चलन
एकरूप एकप्राण माणसा तू जाण जाण
देव नाही अशी जागा मना शोघून तू पाहे..
देव हृदयात आहे..
*
देव विश्वाचे कोंदण दिले माणसा आंदण
देव बिल्लोरी आरसा त्यात तुमचाच ठसा
देव पहावा स्वत:त हृदयाच्या रांजणात
मनी आणता देवाने सारे विलयात जाये..
देव हृदयात आहे…
☆
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





