सूचनाएँ/Information ☆ – ‘स्वयंभू और तुलसीदास रचित रामकथा’ का विमोचन हुआ – ☆ साभार – क्षितिज ब्यूरो ☆

 ☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

🌹– ‘स्वयंभू और तुलसीदास रचित रामकथा’ का विमोचन हुआ –🌹

श्रीराम, भारतीय संस्कृति के शलाका पुरुष हैं। रामकथा कल-कल प्रवाहित होती धारा है। यही कारण है कि भारत में विभिन्न भाषाओं में रामकथा पर आधारित लगभग 300 ग्रंथ हैैं। स्थूल रूप से ये सभी रामायण से अनुप्राणित हैं। आचार्य स्वयंभू का ‘पउमचरिउ’ इनमें अपवाद है। यह जैन दर्शन को केंद्र में रखकर रचा गया है। इसके चलते इस ग्रंथ में वाल्मीकि कृत मूल रामकथा में कई बड़े बदलाव दृष्टिगोचर होते हैं।

इसमें रावण का वध श्रीराम के हाथों ना होकर लक्ष्मण के हाथों कराया गया है। प्रचलित रामकथा के कुछ पात्रों के नाम में परिवर्तन भी इसमें देखने को मिलते हैं। हनुमान जी को ब्रह्मचारी के बजाय गृहस्थ रूप में प्रस्तुत किया गया है। ‘पउमचरिउ’ के रावण का खलनायकत्व भी उसके प्रति सहानुभूति जगाने में सहायक है।

जो भी हो, अपनी-अपनी मान्यता, दर्शन और विश्वास के अनुसार श्रीराम की जीवनगाथा हर मत-मतांतर ने ग्रहण की है। अतः अपने-अपने होकर भी श्रीराम सबके हैं। उदार और सर्वसमावेशी व्यक्तित्व से ही वे श्रीराम हैं।

श्री संजय भारद्वाज

ये उद्गार हिंदी आंदोलन परिवार के अध्यक्ष एवं वरिष्ठ साहित्यकार श्री संजय भारद्वाज ने व्यक्त किए। वे क्षितिज प्रकाशन द्वारा प्रकाशित डॉ. मृणालिनी शहा और डॉ. लतिका जाधव द्वारा संपादित ‘स्वयंभू और तुलसीदास रचित रामकथा’ पुस्तक के विमोचन के अवसर पर बोल रहे थे। यह पुस्तक मूल रूप से स्व. गजानन नरसिंह साठे के शोध पर आधारित है।

कार्यक्रम की अध्यक्षता करते हुए पुणे विश्वविद्यालय के जैन अध्यासन के प्रमुख प्रो. के. के. जैन ने कहा कि ‘पउमचरिउ’ में राम चरित को जैन सिद्धांतों के अनुसार ढाला गया है। विभिन्न समाज महापुरुषों को अपने-अपने ढंग से व्यंजित करते हैं। जैन दर्शन में राम वासुदेव हैं, लक्ष्मण नारायण हैं जबकि रावण प्रति वासुदेव है। दोनों महाकाव्य  का तुलनात्मक अध्ययन करते हुए स्वर्गीय डॉ. साठे ने पूर्ण निष्पक्ष भाव से विवेचन किया है।

डॉ. मृणालिनी शाह ने बताया कि अमेरिका में आयोजित एक रिलिजन कॉन्फ्रेंस में पेपर पढ़ने के लिए उन्होंने जैन रामायण चुनी थी। इस विषय पर काम करते हुए उन्हें डॉ. साठे के शोध का संदर्भ मिला। योगायोग से डॉ. साठे, डॉ शहा के समधी के मामा निकले। उनके शोध को पढ़ने के बाद दोनों संपादकों के मन में उसे पुस्तक रूप देने का विचार आया। फलत: इस पुस्तक का जन्म हुआ।

डॉ. लतिका जाधव ने कार्यक्रम का सुचारु एवं सटीक संचालन किया। श्रीकृष्ण नामजोशी ने अतिथियों का स्वागत किया। अभिजीत शहा ने आभार प्रदर्शन किया। साहिल जाधव का विशेष सहयोग रहा। कार्यक्रम में उल्लेखनीय संख्या में पुस्तक प्रेमी श्रोता उपस्थित थे।

  —

 – क्षितिज ब्यूरो की रिपोर्ट

≈संस्थापक संपादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३४२ ☆ देशभक्तिचे वेड… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३४२ ?

☆ देशभक्तिचे वेड… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

☆

देशभक्तिचे वेड लागले पुजतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

युद्ध खेळणे केवळ नाही काम एवढे

कुठल्याही कामाचे नसते इथे वावडे

पूर वादळा सोबतसुद्धा झटतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

पालन नियमांचे करण्याची सक्ती आहे

देशावरती नितांत कायम भक्ती आहे

म्हणून आम्ही धारातीर्थी पडतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

डोंगर सोडा हिमालयावर चढतो आम्ही

कण वाळूचे तप्त जाळती जळतो आम्ही

देशासाठी आनंदाने भिजतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

या पायांना हिरवळ सांगा कोठे दिसते

ढग युद्धाचे नसतानाही पळपळ असते

ओझे असते पाठीवरती पळतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

विझण्यासाठी आम्ही पेटुन उठतो येथे

देशासाठी बाधा ठरती काही नेते

विचार त्यांचा मनास अमुच्या छळतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

☆

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संत विवेकी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ संत विवेकी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

☆

ऐसीए संगत भक्तास रंगत

संतांची पंगत आत्मसुखी.

*

श्लोकांची आरास ओवींचे तोरण

मुक्तीचे कारण पांडुरंग.

*

अभंग अक्षरे शब्दांचे रोपण

इंद्रिया कुंपण शुध्दभावे.

*

महती त्र्यैलोकी विठ्ठल गजर

भुलोकी पाझर अंतर्यामी.

*

अगंध व्यासंग चौघडा वारीचा

विवेकी स्वारिचा संतसंगी.

 ☆

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संध्यागंध… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

☆ संध्यागंध… ☆ प्रा. भरत खैरकर ☆

दूरवरून गावाकडे बघताना विखुरलेली मातीची घरं.. विस्कटलेल्या माणसांचा समूह.. त्यांच्या जिवंत गाथा. निसर्गाने रचलेली.. काळाने घडवलेली आणि माणसाच्या श्रमांनी सजवलेली भूमी मी जेव्हा गावाच्या बाहेर एका कडेला उभा राहून सभोवताली पसरलेल्या या दृश्यांकडे पाहतो, तेव्हा माझ्या डोळ्यांत आयुष्याचा एक खोल अर्थ उलगडतो.

सकाळी उगवलेला सूर्य जेव्हा संध्याकाळी थकलेल्या पावलांनी डोंगरामागे उतरण्याच्या तयारीला लागतो, तेव्हा गावाला एक खास रूप येतं. शेतांच्या पिकांवर.. घरांच्या कौलारांवर.. पडलेली किरणं सोनेरी शाल पांघरतात. भाताच्या पिकावर चमकणारे सायंतीचे रूप.. बाजरीच्या कणसांवर घरी परतण्याआधी बसलेली पाखरं आणि शेतमजुरांच्या कपाळावरचा घाम.. या साऱ्यांचा मनोहर संगम संध्यागंधात एकरूप होऊन जातो.

गावाभोवतीच्या दऱ्याखोऱ्या काळाने कोरलेल्या खोल खोल गावच्याच ललाट रेषा असल्यासारख्या वाटतात. नदीचं वाहणारं पाणी खळखळाट करीत खाली उतरतं आणि त्या पाण्याच्या सुरेल लयीत गावाची धडधड.. धडपड आणि श्रम मिसळतात. हे सगळं एकाच वेळी भव्य.. आपुलकीचं.. आपलंसं आणि हवहवसं वाटतं.. उन्हाळ्यात याच डोंगररांगा गावपायथ्याशी वारा अन् गार सावली आणतात तर हिवाळ्यात डोंगराची शांतता अंगावर घेत गाव झोपून जातं!

गावाजवळच्या जंगलाचा सुगंध वेगळाच आहे. कडुलिंबाच्या पानांतून येणारा कडसर गंध, आंब्याच्या झाडाखाली पिकलेल्या फळांचा गोड वास, तर कधी करवंदाच्या काटेरी झुडपातून येणारी आंबटसर चव—या साऱ्यात माझ्या बालपणाच्या पाऊलखुणा दडलेल्या आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट हे जंगलाचं गीत आहे. कोकीळेचा स्वर संध्याकाळी दुरून ऐकू आला की मनात एक मृदू आठवण दाटून येते.

आणि मग ती वेळ येते.. गुरंढोरं परतण्याची. हीच गावाची खरी संध्याकाळ. धुळीच्या पडद्यातून चालत येणाऱ्या गायी, बैल, म्हशी; त्यांच्या मानेतल्या घंटांचा झंकार; वासरांचे हंबरणे.. हे सगळं पाहिलं की पेंद्या, सुदामासह कृष्ण गाई राखून परतायचा त्याच ते धुळीचे माखलेलं “पांडुरंग “रूप आठवून गावकऱ्यांचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य ऊमलतं. लेकरं धावत अंगणभर हुंदडतात, “माझं वासरू आलं! ” अशी हाक मारत वासरांचे लाड करतात.. गोंजारतात.. घराघरांतल्या बायकाही हातात पाणी, गवत, वैरण घेऊन गोठ्याशेजारी उभ्या राहतात. गुरं-ढोरं अंगणात शिरली की जणू घरात प्राण फुंकला जातो!

याच वेळी गावावर एक वेगळाच गंध पसरतो. कुठे भाकरी भाजल्याचा, कुठे पिठल्याचा, कुठे खमंग फोडणीचा तर कुठे धुरकट लाकडाचा! सगळ्या घरांत चुली पेटतात आणि त्या धुरात कष्टाचा गोडवा मिसळतो. पुरुष मंडळी शेतावरून परततात, दिवसातील कष्ट आणि रानगप्पा घेऊन. कुणी मुलाला खांद्यावर घेतं, कुणी पत्नीला शेताची हकीकत सांगतं. त्या साध्या बोलण्यातही जीवनाचा गाभा.. मतितार्थ.. दडलेला असतो.

गावची ही संध्याकाळ म्हणजे फक्त एक वेळ नाही, तर तो एक संस्कार आहे! कष्टानंतरची विश्रांती, श्रमांतून मिळणारं समाधान, आणि निसर्गाशी एकरूप झालेलं जीवन आहे. शहरातल्या दिव्यांच्या झगमगाटात मला ही शांतता कधीच दिसली नाही. तिथे माणसं गर्दीतही एकटी वाटतात; पण इथे, या गावात, ती एकमेकांच्या जवळ असतात..

मी डोळे मिटून हा क्षण अनुभवतो. सूर्य डोंगरामागे हरवतो, आकाश गडद होतं, आणि तरीही गावाचा आत्मा उजळून निघतो. या क्षणी मला नेहमीच जाणवतं.. गाव म्हणजे फक्त भौगोलिक जागा नाही; गाव म्हणजे जीवनाची खरी शाळा आहे. आणि हा

संध्यागंध जीवनाची कस्तुरी आहे! त्यामुळे इथलं जगणं सुगंधी आणि मोहमयी होऊन गेलं आहे..

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तप्तपदी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तप्तपदी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

 तप्तपदी – – 

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।

बल्लाळं मुरुडं विनायकमहं, चिंतामणिं थेवरम् ॥

लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं, विघ्नेश्वरं ओझरम् ।

ग्रामोरांजण संस्थितो गणपती, कुर्यात् सदा मंगलम् ॥

॥ शुभमंगल सावधान ॥

भटजींचे मंगलाष्टक सुरु होते. वधू—वरामध्ये अंतरपाट होता. लग्न मंडप वर्‍हाडींनी भरलेला. प्रत्येकाच्या हाती अक्षता. आता थोड्याच वेळात मंगलाष्टके संपून वाजंत्री वाजणार होती. जयमाला एकमेकांच्या गळ्यात घालून दोन जीव मंगल, पवित्र बंधनात बांधले जाणार होते, ही रेशीमगाठी आयुष्यभरासाठी राहाणार होती.

वाजंत्री वाजली, मी जयमाला घातली व एक दीर्घ श्वास घेतला. मे महिन्यातील कडक ऊन, त्यात शालूचा भार, दागिन्यांचा भार, माझ्या कपाळावर घर्मबिंदू जमा झालेले. मी मावशीला इशारा केला. तिने अलगद घर्मबिंदू टिपले. थंड पाणी अंगठा, तर्जनी व माध्यमाच्या साहाय्याने अलगद फवार्‍यासारखे माझ्या चेहर्‍यावर उडविले जेणे करून मला थोडे प्रफुल्लीत वाटले व माझा मेकअपही खराब नाही झाला.

स्टेजवर आम्हां उभयतांना शुभेच्छा देणार्‍यांची गर्दी उसळली. आई, मावशी, मामा व माझे इतर नातेवाईक येणार्‍यांच्या स्वागतात गुंतलेले.

“कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये ” मामांनी तर लाऊड स्पीकरमधूनच अनाऊंसमेंट केली.

चला पुढील विधीसाठी वधूवरांना आणा ” इति गुरुजी. होमपात्रात अग्नि प्रज्वलित केला होता. पाटावर तांदूळाच्या सात राशि एका ओळीत ठेवलेल्या. ” अग्निभोवती एक एक वर्तुळ पूर्ण झाले कि या पाटावरील एक एक राशि पायाच्या अंगठ्याने बाजूला करायची ” गुरुजी मला सांगत होते.

मी (निलांबरी) व अर्णव विवाह बंधनात बांधले जात होतो. अग्नीला साक्षी ठेवून सप्तपदीचे सात फेरे सुरू झाले. प्रत्येक पावलासोबत माझ्या मनात एकच विचार चक्रावत होता—’लग्न म्हणजे फक्त सात पावले एकत्र चालणे की दोन वेगवेगळ्या विचारांना एकत्र बांधणे? ‘

१) इष एकपदी भव सा मामनुव्रता भव।

(अन्न व आरोग्य)

घरात अन्नाची कमतरता भासू नये व दोघांनी कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

वधूने पायाने तांदूळाची एक राशि बाजूला सारावी 

२) ऊर्जे द्विपदी भव सा मामनुव्रता भव।

(ऊर्जा व शक्ती) शारीरिक आणि मानसिक सामर्थ्यासाठी, तसेच संकटांचा सामना करण्यासाठी एकमेकांना ताकद देणे.

मी तांदूळाची दुसरी राशि बाजूला सारली

३) रायस्पोषाय त्रिपदी भव सा मामनुव्रता भव।

(संपत्ती आणि समृद्धी)

प्रामाणिक मार्गाने संपत्ती कमावणे आणि संसाराचा आर्थिक भार समजूतदारपणे सांभाळणे

४) मयोभवाय चतुष्पदी भव सा मामनुव्रता भव।

(सुख आणि समाधान)

संसारात प्रेम, आनंद, परस्पर आदर आणि समाधान टिकवून ठेवणे.

आता पुढील तीन फेर्‍यांसाठी वधू पुढे राहील व वराने तिच्या मागून चालावे

५) प्रजाभ्यः पंचपदी भव सा मामनुव्रता भव।

(कुटुंब आणि संतती)

उत्तम संतती, त्यांचे संगोपन आणि परिवाराचे कल्याण करण्यासाठी एकत्र प्रार्थना करणे.

६) ऋतुभ्यः षड्पदी भव सा मामनुव्रता भव।

(ऋतू आणि जीवनभर साथ)

जीवनाच्या सर्व ऋतूंमध्ये, सुख-दुःखात आणि प्रत्येक प्रवासात एकमेकांची साथ न सोडणे.

७) सखे सप्तपदी भव सा मामनुव्रता भव।

(मित्रता आणि विश्वास)

आयुष्यभर एकमेकांचे सच्चे मित्र, विश्वासू आणि समर्पित जोडीदार राहणे.

सप्तपदी संपली व आम्ही उभयता थोरांचे आशीर्वाद घेऊ लागलो. “नांदा सौख्य भरे ” ” पुत्रवती भव” ” दोघे गुणाने संसार करा “ आशीर्वाद मिळत होते. सप्तपदी चालू असतांना माझे चुलत आजोबा नवपिढीला, तरूणाईला समजावत होते. या सप्तपदीला फार महत्व, त्याशिवाय लग्न झाले मानले जात नाही. नुसती जयमाला घालून उपयोग नसतो.

आम्हांला वधूवराला जेवायला बसविले. एकमेकांना गोडाचा घास भरवतांना अर्णवने थोडी मस्तीही केली.

प्रत्येक मुलीला नकोसा वाटणारा विदाईचा क्षणही आला. सगळेच भावनाशील झालेले, ज्या घरात मी जन्मले, लहानाची शहाणी झाले, आई बाबांच्या छत्रछायेत वाढले, भावंडांशी खेळले, प्रसंगी भांडले, मायेच्या ओलाव्यातही बांधले गेले ते घर मला परकं होणार होतं. माहेर झालं होतं, पाहुणी म्हणूनच मी येथे येणार होते. जणू एक रोपटं उचलून दुसर्‍या जागी लावलं होतं. खूप कठीण क्षण होता माझ्यासाठी.

सासरी आले. काही धार्मिक विधी, सत्यनारायण पूजन, स्वागत समारंभ, नंतर कुलदेवतांचे दर्शन आटोपले. आणि घरात वादाला सुरुवात झाली. माझी जेठाणी म्हणे आमची जवाबदारी संपली आणि तिने काढता पाय घेतला.

असू देत, काही बिघडत नाही. सांभाळू आपण सगळं म्हणत मी कंबर कसली. घर, आँफिस, आजारी सासूची सेवा, सणवार, व्रतवैकल्य सगळं सुरळीत पार पाडत होती. मधूनच माझे दोन्ही

जेठ, तिन्ही नणंदा भावाकडे आर्थिक अडचणी दाखवत पैसे मागायचे. ” आता माझंही लग्न झालंय? मलाही घर संसार आहे? अर्णवने असे म्हणताच, ” आम्ही कोणी नाही का तुझे, तुला एवढा शिकवला, डाॅक्टर केला, त्यात आमचे कष्ट नव्हते काही. ” नणंदेच्या मुलीचं लग्न, दे पैसे, भावाच्या मुलीचं बाळंतपण, दे पैसे, भावाच्या मुलाची अॅडमिशन” दे पैसे, असे वारंवार घडत राहिले व अर्णव पैसे देतच राहिला. ” अर्णव, थांबव हे, काही लिमिट आहे कि नाही ” ” देऊ दे निलांबरी, माझी माणसं आहेत ” ” हो तुझी माणसं आहेत, पण तू केलेली मदत कधी परत मिळते काय? एक तरी पैसा परत आलाय का? ” ” नसेल आला, पण आपल्याला काही कमी पडलंय काय? ” ” कमी पडलंच असतं जर मी कमावती नसते तर. माझ्या पैशांवर घर चालावायचं, तुझा पैसा तिकडे वळवायचा “शब्दाला शब्द वाढला आणि मी न जेवताच झोपले. उद्या आॅफिसला मला एका प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन द्यायचं होतं, डोकं भणभणायला लागलं. स्वतःला कसंबसं कंट्रोल केलं मी.

माझ्या सुख समाधानाला गालबोट लागलं होतं. सप्तपदीतलं हे पाऊल माझ्यासाठी तप्तपदी ठरलं होतं

सासूच्या आजारपणात झालेली सेवा, सूनमुख पाहुन तिने समाधानानं निरोप घेतला.

मला कडक डोहाळे लागलेले, आॅफिसमधील कामाचं प्रेशर, मी प्रोजेक्ट लिडर असल्याने रजाही मिळत नव्हती, अशावेळी सासरची कोणीही मंडळी मदतीला आली नाही, आली माझी आई मदतीला.

प्रथमेशचा जन्म माझ्या जीवनातला सुखदायी क्षण. आनंदाचा क्षण, पण माझे दीर, जाऊ, नणंदा कोणीही बाळाला बघण्यासाठी आले नाही. अर्णवचा वारस, म्हणजे जणू त्यांचा दुश्मनच होता तो.

हळूहळू अर्णवचं सोशल ड्रिंक्सच्या नावाखाली पिणंही वाढू लागलं. रात्री अपरात्री येणं वाढू लागलं, मी काही बोलायला गेले तर पुन्हा वाद. मी तो टाळण्याचा प्रयत्न करायची.

प्रथमेश सहा महिन्यांचा, त्या रात्री खूप किर किर करत होता. तीन वाजायला आले. अर्णवचा पत्ता नाही, फोन उचलत नव्हता. हाॅस्पिटलला फोन केला, तिथे नव्हता, त्याच्या एक दोन मित्रांना फोन केला, त्यांनाही माहित नव्हते. झाले अर्णवचा पारा चढला, हाॅस्पिटलला, मित्रांना फोन करून तू माझी बदनामी केली म्हणत आक्रस्ताळेपणा करू लागला. पायाखालचा हा ही निखारा मला वेदना देऊन गेला.

अर्णव बाथरूममध्ये स्नान करत असतांना अर्णवचा फोन आला. मी घेतला, एका स्त्रीचा आवाज होता, ” हाय स्वीटहार्ट? काय करतोस? ” स्वीटहार्ट? कोण आहेस तू? ” माझा आवाज ऐकताच समोरून फोन कट झाला. अर्णव धावत पळतच बाथरूममधून आलेला. “अर्णव, कोण होती ही तुला स्वीटहार्ट म्हणणारी “. ” मला नाही माहित, राँग नंबर असेल. सोड, तू नको टेंशन घेऊस. “

आता अर्णवचा मोबाईल चेक करणं भाग होतं. अर्णवच्या लक्षात ही गोष्ट येताच त्याने मोबाईलला पासवर्ड लावला. कोणाचा फोन आल्यास बाहेर किंवा एकांतात घेऊ लागला.

त्याचं स्वीटहार्ट प्रकरणही बाळसं धरत होतं. पैशाचा ओघ सासरची मंडळी व स्वीटहार्ट कडे वाढू लागला.

“काय अर्णव आम्ही तुझी माणसं. ये आमच्यात राहायला. सोड तो कैदखाना, मस्त खा, पी, मजा कर. माझे स्वार्थी दीर जाऊ शिकवत होते. आणि माझ्या संसारावर पाणी फेरणारी स्वीटहार्ट तर आगीत तेल ओतत होती. डिव्होर्स पिटीशन दाखल कर म्हणून सारखी मागे लागलेली.

आणि एक दिवस अर्णव गेलाच कि मला व प्रथमेशला सोडून. लग्नात घातलेली सप्तपदी, सात जन्माचं वचन सात वर्षातच कमकुवत होत या पदाला आलेलं होतं.

पण माझ्या बाळासाठी व माझ्या अभिमानासाठी मी सज्ज झाले. बोलणारे लोकं, समाज, नातेवाईंकांचे सल्ले सगळं काही सोसत मार्गक्रमणा करत राहिले.

आणि एक दिवस अतिशय भणंग अवस्थेत अर्णव परतला. ” कोण ” क्षणभर मी ओळखलंही नाही. ” मी तुझा अर्णव? ” ” असं काय घडलं कि तुला आता माझी आठवण यावी ” ” मी चुकलो, तुझ्या आश्रयाला आलोय. सगळ्यांनी मला लुटलं, नातेवाईकांनीही, आणि तिनेही, जिने प्रेमाचं नाटक केलं, प्रेम नव्हतंच तिचं कधी, फक्त हवा होता पैसा, आणि माझ्यासोबत टाईमपास. आज मी खरंच भणंग भिखारी झालोय गं “, ” अर्णव अर्धांगी होती मी तुझी. सप्तपदीची सात वचने दिली होती आम्ही एकमेकांना. पण तू ती वचने धुडकावून लावलीस. तुला तो एक खेळ वाटला रे. पण मी मात्र त्या आगीत होरपळले. आला आहेस आश्रयाला तर राहा, नाही म्हणणार नाही मी. पण त्या प्रेमाची अपेक्षा मात्र करू नकोस. त्या तप्तपदीमध्ये ते केव्हाच खाक झालंय. उरलीय

आता केवळ माणुसकी.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”लीकेज..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “लीकेज..“ ☆ संध्या बेडेकर ☆

“मनातल्या Storage चे leakage थांबवायचा काही उपाय आहे का? ” 

सध्या भरपूर रिकामा वेळ मिळाला आहे. जुन्या जुन्या गोष्टी आठवतात. काल मला माझी आई एक पदार्थ करत असे ‘फाडे’, तो आठवला. ‘फाडे ‘ म्हणजे, …तांदूळ कण्या व भिजलेली चण्याची डाळ यापासून बनणारा हा पदार्थ आहे. मला आठवतंय आई ‘ओक ‘ काकूंकडून शिकली होती. बस झा…ल एवढ आठवलं, आणि माझ्या मनाने माझ्या परवानगीशिवाय तीव्र गतीने भरारी घेतली. क्षणात पन्नास वर्ष मागे गेले मी. फाडे पदार्थ राहिला बाजूला …आणि …

ओक काकू आठवल्या. लगेच त्यांच्या घरचे इतर मेंबर्स आठवले. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या जोशी काकू आठवतात. आम्ही लहान असताना त्यांच्या झोपेच्या वेळेसच खूप मस्ती करत असू. जोशी काका आम्हाला खूप रागवायचे. व ते बघून आम्ही अजून मस्ती करत असू. आज या गोष्टींचे वाईट वाटत. पण तेंव्हा मजा येत असे. …

मग त्यावेळेचे मित्र मैत्रिणी आठवल्या, कोण सर्वात जास्त बदमाश होता व कोण भित्रा होता. कोण अभ्यासात हुषार??? तर कोण हॉकी छान खेळायचा??? कोणाशी भांडण झाले होते??? व खूप दिवस अबोला होता. कोणाला ‘गोटू ‘तर कोणाला ‘बंप्या ‘म्हणत असू. वेगवेगळे देशी खेळ आठवले. शाळा, शिक्षक, सर्व एकानंतर एक आठवत गेले. आठवणीं आठवताना चॉइस नसतो. …

बाप रे!! एका पदार्थांवरून किती गोष्टी आठवल्या. एकानंतर एक गोष्ट आठवतच गेली. ही चेन थांबायचं नावच घेत नाहीये. पूर्वी “जादूगर सरकार ” जादूचा एक खेळ दाखवत असे, “water of India ” भांड्यातून सतत पाणी पडायचे. अगदी त्या प्रमाणे. …

अभ्यासात मात्र तिसऱ्या स्टेप वरच गाडी थांबायची. …बरे असो,

विचार म्हणजे, एकदा सुरू झाले की कोणती दिशा पकडतील सांगता येत नाही. कधी कधी तर पूर्ण स्वयंपाक होऊन जातो. व कसा झाला?? केंव्हा केला?? हे माझंच मला कळत नाही. नंतर मनात येत. अरे! बरोबर मीठ टाकलं ना आपण? काय टाकलं?? आणि काय नाही??? हेही आठवत नाही. पन्नास वर्षांचा स्वयंपाक करायचा अनुभव असुनही स्वतः वरच शंका येते. कधी नव्हे ते एकदा चव बघून घ्यावी का?? असंही मनात येत. सर्व ‘ रामभरोसेच ‘ असतं त्या दिवशी. औषध घेणे तर हमखास विसरायला होतंच. …

प्रत्त्येक उगवणाऱ्या नवीन दिवसाचे भविष्य आपल्या विचारांवरच अवलंबून असते. रात्री पडलेल्या एखाद्या स्वप्नाचा प्रभावही कधी कधी दुसऱ्या दिवशी दिसतो. कधी अगदी एखादे गाणे गुणगुणतच दिवस उगवतो. स्वतः शीच खुदकन हसणे असते, खूप energy असते. किती करू आणि काय करू अशी उर्जा असते. तर कधी खूप अस्वस्थता असते. राग येतो. नेमक काय बिनसलं आहे??? हे स्वतःला व घरच्या इतरांना ही कळत नाही. दिवस मात्र कठीण जातो सर्वांचाच. …

कधी नोकरीचे दिवस आठवतात. व अनेक चेहरे समोर येतात. काही आवडते तर काही नावडते. काही घटना तर अशा आठवतात की त्यांना काहीच महत्व द्यायची गरज तेंव्हा ही नव्हती, आणि आजही नाही. पण आजही त्यावर वेळ घालविणे चालू आहे. राग येणे, रडू येणे सुरूच आहे. म्हणजे आजही ते दुःख कुरवाळण चालूच आहे. एकाच जोकवर आपण पुन्हा पुन्हा हसत नाही. पण एकाच प्रोब्लेम/ गोष्टी वर पुन्हा पुन्हा रडतो असं का??? …

खूप दा आपण आपली शक्ती उगीच अनावश्यक गोष्टींवर खर्च करतो. वेळ व श्रम वाया जातात. विचार करूनही थकायला होत. वाईट वाटत ते वेगळंच. …

या मानसिक कष्टाने मन आनंदी झाले, तरी कुठे तरी काही तरी फायदा झाला म्हणता येईल. पण राग आला, रडू आले, मनात उगीचच तिरस्कार निर्माण झाला तर, तो वेळ नक्कीच वाया गेला. झालेल्या गोष्टी होऊन गेल्या. त्यात आता बदल होणार नाही. विनाकारण स्वतःच स्वतः चे मनस्वास्थ्य खराब करणे उचित आहे का?? हा एक प्रकारचा छंदच आहे जास्त प्रमाणात वाढला तर हा ‘रोग ‘ च म्हणावा लागेल. …

विचार म्हणजे,  न दिसणारे अति सुक्ष्म पण आपल्यावर नियंत्रण ठेवतात. एकदा का आपण विचारांवर नियंत्रण ठेवायला शिकलो तर, मनाचे स्टींअरिंग व्हील आपल्याला आपल्या हातात ठेवता येईल. एकतर मन कुठे आहे?? हे माहीत नाही. मनाचे बटण कुठे आहे? हेही माहीत नाही. जे आवश्यकतेनुसार बंद करता आले, तर किती बरं होईल. किती तरी घटना होणारच नाहीत. …

म्हणजे ‘Alexa ‘ला जसं आपण एखादे गाणे वाजवायला सांगतो. किंवा ‘AC on ‘कर सांगतो. तसेच मनाला ‘ Stop thinking’. म्हणून थांबवण्यासाठी एखादा शोध लागला तर फार बरे होईल. पूढे असे होईलही कदाचित. …

सध्या तरी या सर्व गोष्टी विचारपूर्वक ठरवून आपल्यालाच करायच्या असतात. यावर कुठेही औषध नाही. कोणी तुमच्या मनात शिरून एखादा स्कृ टाईट करेल व मनातल्या storage चे leakage थांबवेल अशी टेक्नॉलॉजी आजपर्यंत तरी नाही. कोणत्या ही सद्गुरूचे, कितीही प्रवचन ऐका, स्वतः प्रयत्न केल्याशिवाय हे बंद होणे नाही. …

ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. चांगल्या का वाईट काहीही असू दे. त्यावर विचार करण्यात काही ही फायदा नाही. ज्यां गोष्टींचा त्रास झाला. व अजून ही होतोय म्हणजे आजही आपण त्याला महत्व देतोय. अशा सर्व गोष्टींवर ‘फूली ‘ मारता आली पाहिजे. मनावर बिंबलेल्या काही गोष्टी delete करता आल्या, खोड रबराने खोडता आल्या तर किती छान होईल. , …

तरी बरं, भविष्य काळातील भानगडी माहीत नसतात.

म्हणतात ना, …

“किसी को इतना भी हक़ मत दो कि वो फैसला करें की कब आपको हंसना हैं, और कब आपको रोना हैं।” 

“रात गई बात गई ।” हे सर्व कळत पण वळत नाही. येथेच Problem येतो.

आता मात्र ठरवलंय वर्तमान काळात रहायचा प्रयत्न करायचा.

एक उपाय सुचलाय, आता ठरवलंय, …

” Not to build a prison for myself with the opinion of others towards my life. I will listen to myself. ” 

स्वतः च स्वतः शी बोलून बोलून हे करायचे. मन काही एकदा सांगितले तर ऐकणाऱ्या पैकी नाही. त्याला बंधनात ठेवायला शिकावेच लागेल. कधी समजावून तर कधी रागवून. खूप दा तोच तोच विचार करत आपण स्वतः ला ‘victim’ समजून, त्यात रमत जातो. असे विचार नकळत दुसऱ्या रोगांना आमंत्रण देतात. …

भांडून गोष्टी सुटत नाही. हे नक्की. म्हणून खूप उगीच अनावश्यक बोलायचे नाही. सडेतोड उत्तर देणे सर्वांना जमत नाही व ते प्रत्येकाला देणे योग्य ही नसते. आपले विचार’ filter ‘करायचे. एक दोनदा संधी द्यायची. नाही तर त्यांच्या कव्हरेज क्षेत्रातून हळूच बाहेर पडायचे. नेटवर्क बदलायचे. पूढच्या भानगडीत पडायचे नसेल तर स्पष्ट नकार द्यायचा. … 

एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे मला काय हवंय??? मी काय शोधतेय?? हे मला माझं स्पष्ट माहित असेल तरच हे करता येईल. …

म्हणतात ना, …

“बीत जाती हैं जिंदगी ढूंढने में कि ढूंढना क्या हैं??? …

जबकि ये भी मालूम नहीं जो मिला हैं, उसका क्या करना हैं।” … 

सूख, आनंद, शांती मी कशात शोधतेय?? हे माझं मला स्पष्ट झाले तर तशी रूपरेषा आखता येईल व त्याप्रमाणे मनाला ‘instructions’ देता येतील. प्रत्त्येक वेळेस मनच घोळ घालतो, असं नाही. मीच त्याला ‘confuse’ करत असते. कारण माझ्याच विचारांत स्पष्टता नसते. …

हे लक्षात आलय माझ्या. …

आता ठरवलंय, …

मनाच्या अफाट शक्ती ने आपल्या पायांचा उपयोग पूढे जायला करायचा. दुसऱ्या च्या पायात पाय घालून पाडायला किंवा पडायला नाही. रोज मनाची स्वच्छता करायची. हळूहळू सवय होईल. उशीरा का होईना पण उपाय मिळालाय असं वाटतंय. रोज स्वतः ला सांगायचं, …

“तुझ्यात प्रचंड साहस आहे. छोट्या मोठ्या कारणांमुळे डगमगू नको. तू खूप खास आहेस. स्वतः ला जप. आनंदी रहा. …

बघूया जमतंय का?? “

“उद्या वेळ मिळाला की बघू, या भ्रमात रहायचे नाही. ” …

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भाताचे विविध अवतार… –  लेखक : श्री सुबोध गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुनीला वैशंपायन ☆

सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ भाताचे विविध अवतार… –  लेखक : श्री सुबोध गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुनीला वैशंपायन ☆

आज ब्रेकफास्टमध्ये हातसडीचा मऊ भात आला. वर मेतकूट, मीठ, मिरपूड. बरोबर लिंबाचं लोणचं. भात चाटमाट करून खाल्ला. आणि शेवटी अगदी अनाहूतपणे ताटलीही चाटून साफ केली! हो, हे थोडं असंस्कृत वाटेल. पण काही पदार्थ खाल्ल्यानंतर चमचा खाली ठेवून सभ्यपणे उठता येत नाही. ताट स्वच्छ चाटल्याशिवाय आत्मा तृप्त होत नाही.

आणि तिथेच डोक्यात विचार आला, भात हा नक्की पदार्थ आहे का? कारण एवढी रूपं दुसरा कुठला पदार्थ घेतो?

आज हातसडीचा मऊ भात. कधी वरणात विसावलेला. कधी दह्यात शांत झालेला. कधी गुळात गोड झालेला. कधी मसाल्यात रंगलेला. कधी पेज होऊन आजारी माणसाच्या उशाशी बसलेला.

मला म्हणूनच भाताकडे पाहिलं की विष्णूची आठवण येते. मूळ तत्त्व एकच. प्रसंग बदलला की अवतार बदलतो.

कोकणात पहिला पाऊस पडला की भूकही बदलते. कौलांवर पाऊस, अंगणात पाणी, हवेत मातीचा वास. अशा दिवशी गरम भातावर कुळथाचं पिठलं आणि बाजूला लोणचं आलं की बाहेर कितीही पाऊस कोसळू दे, घर सुरक्षित वाटतं.

आणि त्याच पावसाळ्यात घरात कुणाला ताप आला की हा भात सगळी नाटकं बंद करतो. तो पेज होतो. पातळ. गरम. साधी. थोडं मीठ. कधी लोणच्याचा खार. पेज फार चविष्ट नसते. पण तापात तिचा पहिला घोट जो दिलासा देतो, तो 5 Star जेवणात मिळेलच असं नाही.

काही पदार्थ आनंद देतात. काही पदार्थ पथ्य सांभाळतात. आणि ताप उतरू लागला की पेजेची बढती होते, मुगाच्या डाळीची खिचडी. भात, मुगाची डाळ, हळद, मीठ. वर साजूक तुपाची धार.

तब्येत जरा जास्त सुधारली असेल तर बाजूला पापड आणि लोणचं.

खिचडीची गंमत अशी की ती आजारी माणसाचं अन्नही आहे आणि कंटाळलेल्या घराचं सार्वत्रिक उत्तरही.

“आज काही करायचा मूड नाही. ” “खिचडी टाकूया का? ” बस. जेवणाचा प्रश्न संपला.

आणि मग घरात एखादं लग्न.

साड्या, पत्रिका, मंडप, पाहुणे, फोटोग्राफर, या सगळ्या गोंधळात एक प्रश्न मात्र अत्यंत गांभीर्याने विचारला जातो, “जेवण कुणाचं आहे? ”

पंगतीत मसालेभात येतो. वर काजू दिसला की प्रतिष्ठा वाढते. आपण दोनदा घेतो आणि ठामपणे म्हणतो, “बस. आता काही नको. ” 

पाच मिनिटांनी वाढपी विचारतो, “साधा भात? ” मान आपोआप डुलते. वर वरण. तूप. लिंबू किंवा ताक-भात

एवढ्या थाटामाटाच्या जेवणाचा शेवट पुन्हा साध्या भाताने. हे लग्नासारखंच असावं बहुधा. दिवसभर कपडे, फुले, फोटो, लाईट्स…शेवटी संसार साधाच करायचा असतो.

उन्हाळ्यात भाताचा सूर पुन्हा बदलतो. सकाळचा भात दह्यात जातो. थोडं मीठ. कधी फोडणी. दहीभात. दोन घास खाल्ले की जीव शांत.

पण तांदळाने फक्त भातच व्हायचं ठरवलंय असं समजू नका. त्याचं पीठ झालं की घावन. कधी आंबोळी. कधी तांदळाची भाकरी. कधी सांदणं.

एकाच तांदळाने एवढे Profession बदलणं पाहून आजच्या Career Counsellorलाही न्यूनगंड यावा.

आणि मग घरात गणपती येतात. कोकणात गणपती म्हणजे देवाबरोबर घर भरायचं निमित्त. मुलं परत येतात. गाद्या जमिनीवर पडतात. रात्री गप्पा रंगतात. एखाद्या दिवशी भजनी फड येऊन दणका उडवतो.

आणि तांदूळ? तो पुन्हा गायब. त्याचं पीठ होतं. उकड होते. पारी होते. आत नारळ-गूळ भरतो. आणि थोड्या वेळाने गणपतीसमोर उकडीचे मोदक.

तोच तांदूळ नारळी पौर्णिमेला गूळ, नारळ, वेलची घेऊन नारळी भात होतो.

विष्णूला मोहिनी अवतार घ्यावा लागला. भाताला नारळ आणि गूळ पुरतो.

आणि अर्थातच कोकणात भाताची कथा मासळीशिवाय पूर्ण होणार नाही.

गरम भात. ताजं मासळीचं कालवण. बाजूला तळलेला बांगडा, सुरमई, तारली किंवा पापलेट. सोबत सोलकढी.

पहिला घास घेतल्यावर घरातल्या चर्चा मंदावतात. EMI उद्या.

काम उद्या. बाजारभाव उद्या. आत्ता कालवण थंड होण्यापूर्वी भात संपवायचा.

मासळी बदलते. मसाला बदलतो. घरोघरी कालवणाची चव बदलते. पण त्या सगळ्यांना सामावून घेणारा भात तिथेच असतो.

आणि मग एखादा दिवस असा येतो की घरातला आवाजच बदलतो. श्राद्ध असतं. तांदळाचा रवा काढला जातो. त्याची खीर होते. प्रसादात वाढली जाते. गणपतीसमोर मोदक झालेला तोच तांदूळ आता पूर्वजांच्या स्मृतीत खीर होऊन येतो.

तेव्हा जाणवतं हा पदार्थ फक्त स्वयंपाकघरात नाही. तो संस्कृतीत शिरलेला आहे.

लग्नात अक्षता. देवाला नैवेद्य. बाळाच्या पहिल्या घासात. श्राद्धाच्या प्रसादात. आणि आयुष्य संपल्यावरही, दहाव्याला पुन्हा तांदूळच. पिंडाच्या रूपात.

कदाचित म्हणूनच हिंदू संस्कृतीत दहाव्याला पिंडांना कावळा शिवल्याशिवाय आत्म्याला मुक्ती मिळत नाही असं मानत असावेत! जन्मापासून मृत्यूनंतरच्या विधीपर्यंत एखाद्या धान्याने माणसाची साथ द्यावी हे विलक्षणच आहे.

आणि या सगळ्या अवतारांमध्ये मला सर्वांत आशावादी वाटतो तो आधल्या दिवशीचा भात. पूर्वीच्या घरात अन्न टाकून देणं हा जवळजवळ गुन्हा.

कढई चढते. मोहरी तडतडते. हिंग. मिरची. कढीपत्ता. कांदा. आणि कालचा थकलेला भात अचानक फोडणीचा भात होऊन पुन्हा उभा राहतो.

आयुष्यात माणसालाही अशी फोडणी मिळाली असती तर किती बरं झालं असतं! काल सगळं बिघडलं तरी दुसऱ्या दिवशी थोडी मोहरी, दोन मिरच्या, कढीपत्ता टाकून पुन्हा नव्याने सुरुवात.

बहुधा म्हणूनच मला भात पुराणातल्या विष्णूसारखा वाटतो. पण त्याचे दशावतार मोजायला बसू नका. गणित हमखास चुकणार. एका घरातच पेज, खिचडी, वरणभात, दहीभात, मसालेभात, नारळी भात, फोडणीचा भात, खीर, घावन, आंबोळी, भाकरी, मोदक…

पुढच्या घरात अजून काही. पुढच्या गावात आणखी काही. प्रत्येक आजीच्या हातात तर स्वतंत्र पुराण.

पण मला भाताची एक गोष्ट सर्वांत जास्त आवडते. तो स्वतःची ओळख गमावूनही हरवत नाही. मेतकूट मिळालं तर साधा. मुगाची डाळ मिळाली तर खिचडी. दही मिळालं तर शांत. गूळ मिळाला तर गोड. मसाला मिळाला तर झणझणीत. मासळीचं कालवण मिळालं तर त्याला पूर्णपणे सामावून घेणारा. काहीच नसेल तर मीठाबरोबरही समाधान देणारा. ज्या घरात जे आहे, जसा प्रसंग आहे, तसा तो होतो.

म्हणून कोकणात भाताला फक्त staple food म्हणणं मला फारच तोकडं वाटतं. तो रोज खाल्ला जातो म्हणून महत्त्वाचा नाही. तो प्रत्येक प्रसंगात आपल्याबरोबर राहू शकतो म्हणून महत्त्वाचा आहे.

आनंदात. आजारपणात. लग्नात. सणात. श्राद्धात. गर्दीत. एकटेपणात. जन्मात. आणि अगदी मृत्यूनंतरच्या विधीतही.

पुराणात विष्णूने जगाच्या गरजेनुसार अवतार घेतले म्हणतात.

कोकणात तांदूळही तेच करत आला आहे.

फरक एवढाच, विष्णूच्या अवतारांच्या कथा पुराणात लिहून ठेवल्या गेल्या. भाताच्या अवतारांची कथा मात्र आपल्या घरात रोज शिजत राहते.

लेखक : सुबोध गाडगीळ

प्रस्तुती – सुनीला वैशंपायन 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मदत आणि सहकार्याची सूक्ष्म सीमारेषा – लेखक : अनिल उदावंत ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ मदत आणि सहकार्याची सूक्ष्म सीमारेषा – लेखक : अनिल उदावंत ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

अलीकडेच पोलीसात भरती झालेल्या एका गिऱ्हाईकाची कटिंग सुरू होती, ते गिऱ्हाईक न्हाव्याच्या चांगल्या ओळखीतलं असावं. कटिंग करता करता न्हावी त्या गिऱ्हाईकाशी मनमोकळं बोलत होता. त्याला हिताच्या चार गोष्टी सांगत होता.

बोलता बोलता न्हावी म्हणाला, “हे बघ, तू आता पोलीसात आहेस. अनेक लोकं तुझ्याकडं मदत मागायला येतील. काहीजण तुझं सहकार्यही मागतील. पण तू हे कायम लक्षात ठेव. मदत सर्वांना करायची; पण एखाद्याला सहकार्य करताना मात्र खूप काळजी घ्यायची. उठसूठ कुणालाही सहकार्य करायचं नाही. अन्यथा एखाद्या दिवशी तू स्वतःच अडचणीत येशील! ”

न्हाव्याच्या या शब्दांनी मी चकित होऊन विचारात पडलो. मदत आणि सहकार्य हे दोन्ही शब्द आपल्या नेहमीच्या वापरातले. वरकरणी दोन्हींचा अर्थ जवळजवळ एकच वाटतो. मग त्या न्हाव्याने मदत आणि सहकार्य यांच्यात एवढा फरक का केला असेल?

मदत आणि सहकार्य हे दोन वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत का? आणि असतील, तर त्यांच्यात नेमका फरक काय आहे? हा फरक नव्यानं समजून घेण्याची गरज आहे.

मदत आणि सहकार्य या दोन्ही संकल्पना परस्परावलंबन, सामाजिक संवेदनशीलता आणि सामूहिक जीवन यांवर आधारलेल्या आहेत. मदत ही प्रामुख्याने एखाद्याच्या गरजेच्या वेळी दिलेला आधार असतो, तर सहकार्य हे एखाद्या समान उद्दिष्टासाठी केलेले सक्रिय सहभागाचे काम असते.

मदत म्हणजे अडचणीत असलेल्या व्यक्तीला त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी हात देणे, आधार देणे किंवा तिची गरज पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणे. ही मदत भावनिक, आर्थिक, शारीरिक किंवा वैचारिक स्वरूपाची असू शकते. एखाद्या शेजाऱ्याच्या आजारपणात औषध आणून देणे, संकटात असलेल्या कुटुंबाला अन्न देणे किंवा एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाच्या नोट्स देणे ही मदत होय.

सहकार्य मात्र त्यापेक्षा वेगळे आहे. दोन किंवा अधिक व्यक्तींनी एखादे समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र येणे, जबाबदाऱ्या वाटून घेणे आणि आपल्या सामर्थ्याचा एकत्रित उपयोग करणे म्हणजे सहकार्य.

उदाहरणार्थ, गावातील एखाद्या कुटुंबावर संकट आले असता शेजाऱ्यांनी त्यांना जेवण देणे, औषध आणून देणे किंवा आर्थिक आधार देणे ही मदत. पण त्याच गावातील शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करण्यासाठी, विहीर साफ करण्यासाठी, रस्ता दुरुस्त करण्यासाठी किंवा दूध-संकलनाची व्यवस्था उभी करण्यासाठी एकत्र काम करणे हे सहकार्य.

म्हणून साध्या शब्दांत सांगायचे तर, मदत म्हणजे दुसऱ्याच्या अडचणीत आपण दिलेला हात; तर सहकार्य म्हणजे एखाद्या कामात आपण दिलेला हातभार. दोन्हीमध्ये दुसऱ्याच्या गरजेकडे लक्ष देणे हा समान धागा आहे. दोन्हीमुळे आपुलकी, विश्वास, सलोखा आणि माणुसकी वाढते. मात्र मदत अनेकदा तात्कालिक असते; सहकार्यामध्ये सहभाग, समन्वय आणि जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते.

माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याचे जीवन एकाकी नसून कुटुंब, समाज, संस्था आणि राष्ट्र यांच्या सहवासात घडत असते. त्यामुळे सहानुभूती, परस्परावलंबन, सुरक्षिततेची गरज आणि समूहात जगण्याची प्रवृत्ती यांमधून मदत आणि सहकार्य या दोन्ही वृत्ती विकसित होतात.

मदत माणसाला संकटातून सावरण्यासाठी आधार देते; सहकार्य सामूहिक प्रगतीचा मार्ग मोकळा करते. सहकार्यामुळे सामाजिक ऐक्य, समस्या-निवारण, आर्थिक स्थैर्य, आत्मनिर्भरता आणि सामाजिक जबाबदारी वाढते. म्हणूनच व्यक्ती, कुटुंब, गाव आणि राष्ट्र या सर्व स्तरांवर या दोन्ही मूल्यांची गरज आहे.

मदत करण्यामागे काही मानसशास्त्रीय प्रेरणा असतात. दुसऱ्याचे दुःख पाहून निर्माण होणारी सहानुभूती, सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये, कर्तव्यभावना आणि संस्कार यांमुळे माणूस मदतीसाठी पुढे येतो. काही वेळा मात्र स्तुती, सामाजिक मान्यता, अपराधीपणापासून सुटका किंवा भविष्यात आपल्यालाही मदत मिळेल अशी अपेक्षा यांसारख्या प्रेरणाही त्यामागे असू शकतात.

म्हणून प्रत्येक मदत पूर्णपणे निःस्वार्थ असेलच असे नाही.

मानसशास्त्रात मदत करणाऱ्या वर्तनाला व्यापकपणे ‘समाजाभिमुख वर्तन’ म्हटले जाते; त्याच्या अधिक निःस्वार्थ स्वरूपाला परोपकारी वर्तन म्हटले येते. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी—मदत म्हणजे काहीही करून, कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्याच्या पाठीशी उभे राहणे नव्हे. जसं की, एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीला त्याच्या व्यसनासाठी पैसे देणे ही मदत नव्हे.

एखाद्याच्या चुकीच्या कृत्यावर पांघरूण घालणे ही माणुसकी नव्हे. एखाद्याला अडचणीतून बाहेर काढताना आपण त्याला पुढच्या अडचणीत ढकलत नाही ना, याचाही विचार करावा लागतो. याच ठिकाणी मदत आणि सहकार्य यांच्यातील सूक्ष्म सीमारेषा अधिक स्पष्ट होते.

सहकार्याची संकल्पना दुधारी आहे. ‘सहकार्य’ हा शब्द ऐकला की आपल्या मनात लगेच चांगल्या गोष्टींचीच प्रतिमा तयार होते. पण प्रत्येक सहकार्य सकारात्मक असेलच असे नाही. एखाद्या चांगल्या कामासाठी एकत्र येणे हे सकारात्मक सहकार्य; तर चुकीच्या किंवा गुन्हेगारी कामात कळत-नकळत, संपूर्ण किंवा अंशतः सहभागी होणे हे नकारात्मक सहकार्य असते.

उदाहरणार्थ, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येणे हे सकारात्मक सहकार्य आहे. पण एखाद्याने केलेले गैरकृत्य लपवण्यासाठी काही लोकांनी एकत्र येणे हेही एका अर्थाने सहकार्यच आहे; मात्र ते नकारात्मक आणि समाजघातक सहकार्य आहे.

म्हणून सहकार्य करताना केवळ ‘आपण कोणाला सहकार्य करतो आहोत? ’ एवढाच प्रश्न पुरेसा नाही. त्याबरोबर ‘आपण नेमक्या कशाला सहकार्य करतो आहोत? ’ हा प्रश्नही विचारला पाहिजे.

एखाद्या व्यक्तीशी सहकार्य करणे आणि त्या व्यक्तीच्या चुकीच्या कृतीशी सहकार्य करणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.

आता लेखाच्या सुरुवातीला आलेल्या न्हाव्याच्या बोलण्याचा अर्थ आपल्याला सहज लक्षात येतो. पोलीसाच्या नोकरीत असलेल्या त्या तरुणाकडे अनेक लोक मदतीसाठी येतील. कुणाला हरवलेली कागदपत्रे मिळवून देण्यासाठी मदत हवी असेल, कुणाला कायदेशीर मार्गदर्शन हवे असेल, कुणाला संकटाच्या वेळी आधार हवा असेल. अशा वेळी मदतीचा हात देणे हे त्याचे कर्तव्यच आहे.

पण एखादा माणूस त्याच्याकडे एखादे चुकीचे काम करून देण्यासाठी, नियम बाजूला सारण्यासाठी, पुरावा लपवण्यासाठी किंवा एखाद्याला अन्यायाने वाचवण्यासाठी सहकार्य मागत असेल, तर तेथे त्याने थांबले पाहिजे. कारण माणसाला मदत करणे आणि चुकीच्या कृतीला मदत करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तसंच, माणसाशी सहकार्य करणे आणि त्याच्या गैरकृत्याशी सहकार्य करणे यांतही मूलभूत फरक आहे.

‘एकमेका साह्य करू अवघे धरु सुपंथ’ असं म्हणत एकमेकांना मदत करण्याचं आवाहन केलं जातं. ‘विना सहकार नाही उद्धार’ असं म्हणत सहकार्याची गरजही अधोरेखित केली जाते. या दोन्ही विचारांचा आशय सकारात्मक आहे. समाजहिताच्या, माणुसकीच्या आणि विकासाच्या कामासाठी एकत्र येण्याची प्रेरणा त्यातून मिळते. मात्र इथे एक गोष्ट आपण विसरता कामा नये—सहकार्य स्वतःमध्ये चांगले किंवा वाईट नसते; ज्या उद्दिष्टासाठी ते केले जाते, त्यावर त्याचे नैतिक मूल्य ठरते.

म्हणूनच, मदत माणसाला करावी; पण चुकीच्या कृतीला नाही.

सहकार्य माणसाशी करावे; पण अन्यायाशी नाही. कदाचित म्हणूनच त्या साध्या न्हाव्याला आपल्या पोलीस गिऱ्हाईकाला “मदत सर्वांना कर; पण सहकार्य करताना विचार कर! ” असं सांगावंसं वाटलं असेल.

न्हाव्याच्या त्या सहज बोललेल्या वाक्यात माणुसकीची अन् कर्तव्याची शिकवण होती. मदतीची दारे उघडी ठेवायची; पण विवेकाचे दार कधीच बंद करायचे नाही. आपण कुणाला मदत करतो आहोत? आणि कशाला सहकार्य करतो आहोत? या दोन प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे शोधून माणुसकी आणि विवेक यांचा योग्य समतोल साधणं आवश्यक आहे. हेच त्याच्या बोलण्याचं खरं सार आहे आणि तेच अधिक महत्त्वाचं आहे.

☆

लेखक : अनिल वत्सला आत्माराम उदावंत

संग्रहिका / प्रस्तुती – उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमेरिकेतील स्वयंपाकघरे शांत झाली आणि…? – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ अमेरिकेतील स्वयंपाकघरे शांत झाली आणि…? – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

अमेरिकेस ठेच लागली आहे, भारतीय कधी शहाणे होतील? कधी विचार केला आहे का…. की एका शांत झालेल्या स्वयंपाकघराने संपूर्ण देशाचे भविष्य बदलू शकते?

अमेरिकेत तसे घडले. १९७० च्या दशकात बहुतेक घरांत आई-वडील, मुले, आजी-आजोबा एकत्र राहायचे. संध्याकाळी सगळे डायनिंग टेबलावर बसायचे. घरातली पोळी, ब्रेड, सूप, पाय (pie) फक्त पोट भरत नव्हते, तर त्यांच्यातील नातीही घट्ट करत होते. पण १९८० नंतर हळूहळू दृश्य बदलले. फास्ट-फूड, टेक_अवे, रेस्टॉरंट यांनी त्यांच्या स्वयंपाकघरावर ताबा मिळवला.

आई-वडील कामात व्यस्त झाले, मुले पिझ्झा-बर्गरमध्ये रमली आणि आजोबांचा आवाज कमी झाला.

त्याच वेळी काही तज्ज्ञांनी चेतावणी दिली होती –

“जर तुमच्या घरातील जेवणाचे नियंत्रण कंपन्यांकडे गेले, आणि मुलं-वृद्धांची जबाबदारी सरकारवर टाकली, तर कुटुंबे उद्ध्वस्त होतील. ” लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि खरेच तसेच झाले.

१९७१ मध्ये अमेरिकेत… ७१ % कुटुंबे “पारंपरिक” होती – आई, वडील आणि मुले एकत्र. आज ती संख्या फक्त २०% आहे.

उरलेले काय? – वृद्धाश्रमात गेलेले आजोबा-आजी, भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये एकटे जगणारे तरुण, तुटलेली लग्नं, एकाकी पडलेली मुले. घटस्फोटाचे प्रमाण पहिल्या लग्नात ५० %, दुसऱ्यात ६७ % आणि तिसऱ्यात तब्बल ७४ %.

अमेरिकेतील हा अपघात नाही. ही किंमत आहे – शांत झालेल्या स्वयंपाकघराची आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या समाजाची!!

कारण घरचे जेवण हे फक्त अन्न नाही.

ते ऊब आहे.

ते आईच्या हाताचा स्पर्श आहे.

ते दादांच्या गप्पा आहेत.

ते आजीच्या गोष्टी आहेत.

ते घराला “कुटुंब” बनवणारी जादू आहे.

पण आज जेवण स्विगी, झोमॅटो वरून येते, आणि घर हळूहळू “गेस्टहाऊस” बनते.

याचे दुसरे भयंकर रूप म्हणजे बिघडणारे आरोग्य! फास्ट-फूडच्या व्यसनामुळे अमेरिकेत स्थूलता, मधुमेह, हृदयरोग एवढ्या वेगाने वाढले की आज संपूर्ण आरोग्य उद्योग “आजारी पिढ्या”वर नफा कमावतो.

पण अजून आपली वेळ गेलेली नाही. स्वयंपाकघर पुन्हा पेटवायला हवे. आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी.

जगातल्या अनेक संस्कृतींनी हे सिद्ध केलंय. जपानी अजूनही एकत्र स्वयंपाक करतात, जेवतात, म्हणून ते दीर्घायुषी आहेत. भूमध्य समुद्रातील लोक जेवणाला पवित्र मानतात, म्हणून त्यांची नाती मजबूत आहेत.

अमेरिकेची ही कहाणी आपल्याला सावध करण्यासाठी आहे!! आज भारतातही बाहेरचे खाणे, फूड-डिलिव्हरी, व्यस्त जीवन — सगळे तसेच सुरू आहे, अमेरिकेसारखे.

उद्या आपल्या घरातही स्वयंपाकघर शांत होऊ नये, म्हणून… चूल पुन्हा पेटवा. जेवण बनवा. कुटुंबाला टेबलावर आणा; कारण शयनकक्ष घर देतो, पण स्वयंपाकघर कुटुंब घडविते.

आपल्या घराला कुटुंब बनवायचे आहे की, गेस्ट हाऊस हे आता आपणच ठरवा!! 

☆

लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ युटोरी..! – लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ युटोरी..! – लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

सुयश गेल्या वर्षभरात कामात पूर्ण बुडून गेला होता. एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी लागली तेव्हा तो किती आनंदात होता! नवीन शिकायचं, काहीतरी स्वतःचं निर्माण करायचं, हे त्याचं स्वप्न होतं; पण प्रोजेक्ट्स, डेडलाईन्स, मिटिंग्ज आणि सततचा ताण वाढतच होता. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरचा तजेला कमी होऊ लागला. तब्येतीच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. चिडचिड तर फारच वाढली होती.

एके दिवशी त्याची बायको शर्वरी त्याच्या समोर येऊन उभी राहिली. “सुयश, कितीही काम असलं तरी अर्णवसाठी वेळ काढावाच लागेल. हे बघ अर्णवनं काय लिहलंय ते! ” तिनं एक कागद पुढे केला. आठ वर्षांच्या अर्णवनं लिहलं होतं..

‘माझे बाबा सतत कामात असतात. ते हसत नाहीत.. काही विचारलं की ते ओरडतात.. ‘सुयश हताश झाला.

“आपण पुढच्या आठवड्यात हिल स्टेशनला जाऊया. बस्स तीन दिवस. तुलाही चेंज होईल! ”शर्वरीनं सुचवलं.

सुयश आधीच थकलेला होता. तो उखडला. शर्वरीशी त्याचा

वाद झाला.

“मी कोणासाठी काम करतो? अर्णवसाठीच ना?”

तेवढ्यात अर्णव खेळून घरी आला.. त्याचा बारीक झालेला चेहरा पाहून सुयशनं नाईलाजाने होकार दिला.

दुसऱ्या दिवशी तीन तासांनी ते नेपच्यून हॉटेलमध्ये पोचले. थंड हवा, मंद वारा, आणि पर्वतांवर उतरणारा तांबूस सूर्य बघून सुयशला हुशारी वाटली.

“सुयश, ” शर्वरी म्हणाली, “इथे झेन सेंटर आहे. उद्या डॉ. योशिनावा यांचं प्रवचन आहे. प्लीज, काम बाजूला ठेवून ये. ” सुयशने काही न बोलता मान हलवली.

दुसऱ्या दिवशी ते झेन सेंटरमध्ये पोचले. डॉ. योशिनावा शांतपणे बसले होते. डोळे मिटलेले, चेहरा इतका समाधानी की जणू काही वेळ त्यांच्याजवळ थांबला होता. त्यांना कशाचीही घाई नव्हती. त्यांनी माईक हातात घेतला.

“आज मी तुम्हाला जपानने मला शिकवलेली एक अमूल्य गोष्ट शिकवणार आहे.

या गोष्टीचं नाव आहे “युटोरी”

युटोरी म्हणजे मोकळी जागा.

घरातली, मनातली, नात्यांमधली, कामातली.

ही जागा निर्माण करण्याची कला म्हणजे युटोरी.

यासाठी काहीही लागत नाही.. फक्त थोडा वेळ… एक शांत कोपरा आणि स्वतःला भेटण्याची तयारी..

घरातील, बाहेरील, ॲाफिसमधील एक कोपरा निवडा. तिथे फोन, स्क्रीन, आवाज, गाणी काहीही नको.

तिथे बसायचं…

आणि काहीही करायचं नाही.

Do nothing.

१५–२० मिनिटं बसा. डोळे उघडे ठेवा.. वाटलं तर कपभर चहा प्या. याव्यतिरिक्त काही करायचं नाही.

फक्त शांतता. मनाला काही काम देऊ नका. कामांची लिस्ट बघू नका.

हळूहळू एक चमत्कार घडू लागेल..

मन स्वतःच स्वतःला दुरुस्त करू लागेल. ”

प्रवचन संपलं. सुयशला थोडा रागही आला“यांचं काय जातं सांगायला? ” पण त्याचा फोन तासभर बंद होता…आणि त्या शांततेने त्याच्या मनात काहीतरी बदललं होतं. योशिनावांचे शब्द ऐकून युटोरी करून बघावं असं वाटत होतं..

घरी परतल्यावर त्याने सकाळी २० मिनिटं युटोरी व Do nothing आपल्या कॅलेंडरमधे लिहिलं आणि चहाचा कप घेऊन तो घराच्या एका कोपऱ्यात शांत बसू लागला. काही दिवसांनी त्याला त्या कोपऱ्याची ओढ लागली.

आणि मग चमत्कार घडला.. कामातली चिडचिड कमी झाली.

कोड लिहताना होणारा गोंधळ गायब झाला.

क्रिएटिविटी वाढली.

तब्येत सुधारली.

बॅास त्याचं काम बघून खूष झाला..

ऑफिसमधले लोकही म्हणू लागले, “सुयश, तू बदललास. नक्की काय केलंस? ” तो हसला..

असाच एका रविवारी सकाळी सुयश त्याच्या युटोरीच्या कोपऱ्यात बसला होता. अर्णव हळूच त्याच्या शेजारी येऊन बसला. दोघेही शांत बसले.. दहा मिनिटांनी अर्णवनं बाबाच्या गळ्यात हात घालून त्याला घट्ट मिठी मारली..  

“बाबा… तुम्ही आता मला जास्त आवडता. कारण तुम्ही आता माझ्यासोबत काहीही करत नाही…पण मला ओरडत नाही. फक्त जवळ बसता. आणि मला तेच खूप आवडतं. ”

सुयशच्या डोळ्यांत पाणी आलं.

त्याला अचानक जाणवलं की युटोरी म्हणजे फक्त स्वतःसाठी स्पेस नव्हे तर आपल्या प्रियजनांसाठीही आपल्या मनात मोकळी जागा निर्माण करणं.. ज्यामुळे त्यांना आपल्याजवळ बसायला, मन मोकळं करायला भीती वाटणार नाही.. काम सतत असणार आहेच पण त्यात वाहून जायचं कारण नाही. हे कळण्यासाठी कुठेतरी थांबावं लागतं.. मनाला वेळ द्यावा लागतो.. सतत धावणारं मन त्याला जे हवं ते करू दिलं की विसावतं..

शर्वरी त्यांच्याकडे कौतुकाने बघत होती.. योशिनावा असेच एका मोठ्या कंपनीतले इंजिनिअर होते.. तिथल्या ताणाने त्रस्त होऊन त्यांनी युटोरी वापरायला व शिकवायला सुरूवात केली होती.. तिनं मनोमन त्यांना हात जोडले!

त्या दिवशी सुयशनं कॅलेंडरमध्ये कायमस्वरूपी लिहून ठेवलं, ‘युटोरी – माझ्यासाठी, माझ्या मनासाठी, आणि माझ्या लोकांसाठी.. रोज २० मिनिटं! ‘

आपणही कितीही गडबड असेल, कितीही डेडलाईन्स असतील तरी स्वतःला पंधरा वीस मिनिटं युटोरी द्या. जपानमधील मोठमोठ्या कंपनींमधे आता युटोरी रूम्स आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढत आहे!

फक्त पंधरा मिनिटं.. रोज.. युटोरी करून काय फरक पडतो त्याची नोंद करा!

☆

लेखिका : ज्योती रानडे

प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares