(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” आज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)
☆ आलेख # १७० ☆ देश-परदेश – Returnable Bottles ☆ श्री राकेश कुमार ☆
गर्मी का सीज़न इस बार भी निर्धारित समय से पूर्व ही आ गया है। दूसरी और पश्चिम एशिया का युद्ध भीषणतम हो कर गर्मी बढ़ाने में वैसा ही कर रहा है, जैसे कि जलती आग में घी करता है।
हमारे घर में विगत कुछ वर्षों से तथाकथित “शीतल पेय” का सेवन व्हाट्स ऐप महाविद्यालय से मिले ज्ञान से बंद हो चुका है। खाना बनाने वाली गैस की कमी के चलते घर में चाय के सेवन पर प्रतिबंध की चर्चा परवान चढ़ चुकी है। इसी क्रम में शीतल पेय की यादें ताज़ा हो गई हैं।
साठ के दश्क में कोका कोला, ऑरेंज (फेंटा नहीं) और सोडा कांच की बोतलों में उपलब्ध रहता था। सोडा दो आने और अन्य चार आने में बिक्री होती थी। दुकानदार कांच की बोतल के नाम से सिक्योरिटी डिपोजिट जमा करवा लेता था। बोतल की सही सलामती पर उस राशि की वापसी संभव हुआ करती थी। बोतल के ढक्कन हटाने पर ज़रा सा भी कांच टूटने से राशि काट कर बोतल ग्राहक को थमा दी जाती थी। कुछ अमीर विवाह आदि कार्यक्रमों से खाली बोतल घर ले आते थे। जब कभी बाजार से शीतल पेय खरीदते तो घर रखी खाली बोतल घर से साथ ही ले जाते थे, और सिक्योरिटी जमा करने से बच जाते थे। इन कांच की बोतलों को खोलने वाले छोटे से यंत्र को ओपनर कहा जाता था। हमारे जैसे किशोर तो मुंह में लगे हुए दांतों की दाढ़ के सहारे ही बोतल खोल लेते थे। पड़ोस के लोग भी हमारी सेवाएं ले कर उसकी एवज में थोड़ा सा पेय दे दिया करते थे।
मोहल्ले के परिचित दुकानदार भी किसी अन्य व्यक्ति की गारंटी देने पर सिक्योरिटी जमा करने की झंझट से मुक्त रहते थे।
अब तो प्लास्टिक युग में शीतल पेय भी विगत कुछ दशकों से प्लास्टिक की बोतलों में विक्रय किया जाता है, हालांकि बोतल खोलते ही इनकी गैस निकल जाती है, वो मज़ा नहीं आता है, जो कांच की बोतलों में हुआ करता था।
इस लेख के माध्यम से अपने मित्रों को संदेश देना चाहता हूं, कि हम जब भी उनके घर पर आएं, तो वो खाने वाली गैस की कमी के नाम पर चाय के स्थान पर शीतल पेय परोस सकते हैं। हमें कोई गुरेज नहीं है।
☆ कोचिंग क्लासेस आणि पालकांची हतबलता… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
आजकाल कोणत्याही शहरात गेले की कोचिंग क्लासेसचे बोर्ड बघायला मिळतात. टॉपर्स आणि रँकर्सचे फोटो. त्यांचे स्पर्धा परीक्षेतील सुयश म्हणजे टक्केवारी ! यालाच तुम्ही आम्ही शिक्षण म्हणतो. परंतु हे शिक्षण नव्हे किंवा संस्कारही नव्हेत. हे फक्त प्रमाणित करणे आहे. एखादा विद्यार्थी एवढं एवढं शिकला आहे किंवा हे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे हेच त्यातून सिद्ध होतं. पण त्याने ज्ञानार्जन किती केले आहे किंवा त्याच्यावर संस्कार किती झाले आहेत, एक माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या काही उपयुक्त गोष्टी आहेत त्या तो शिकला आहे का या प्रश्नांचे उत्तर दुर्दैवाने नकारार्थी येते.
परंतु आजकाल वातावरणच असे निर्माण झाले आहे. या सगळ्या कोचिंग क्लासेसच्या जाहिराती पाहून पालकांना सुद्धा आपल्या मुलांना अशा प्रकारच्या कोचिंग क्लासेस मध्ये घालावे असे वाटते. त्यातही ज्या चांगल्या संस्था असतात त्यांची फी भरमसाठ असते. अनेक पालकांना ती परवडत नाही. प्रसंगी कर्ज काढून पालक आपल्या मुलाला अशा कोचिंग क्लासेसमध्ये दाखल करतात. उद्देश एकच असतो की त्याने परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम प्रकारे यश मिळवून चांगली शाखा किंवा चांगली नोकरी मिळवावी. हे क्लासेस विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनवतात. इंग्रजांच्या काळात इंग्रजांना जसे इंग्रजी मानसिकता तयार झालेले भारतीय कारकून हवे होते तशाच प्रकारचे परीक्षार्थी नोकरीच्या दृष्टिकोनातून हे क्लासेस घडवतात.
शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होत चालली आहे आणि कोचिंग क्लासेस भरभरून वाहत आहेत. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना कितीही चांगल्या पद्धतीने शाळेत किंवा महाविद्यालयात शिकवण्याचा प्रयत्न केला तरी मुलांचे तिकडे लक्ष नसते. त्यांची एकाग्रता होत नाही याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. तर अभ्यासक्रमातील काही भाग शिकवत असताना हे आमच्या क्लासमध्ये शिकवले गेले आहे म्हणून मुले लक्ष देत नाहीत अशी दुर्दैवी परिस्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी तर शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लासेस यांच्या संगनमताने हे कोचिंग क्लासेस सुरू असतात. त्यातून काही संस्थाचालक आपले उखळ पांढरे करून घेतात.
सकाळचे सहा वाजले की गाढ झोपलेल्या मुलाला आईचा आवाज ऐकू येतो. ” उठ रे बाळा, आज टेस्ट आहे ना ?” बिचारा मुलगा डोळे चोळत विचार करतो, ‘शाळेची टेस्ट की क्लासची?’ आता शाळा आणि क्लास या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. फरक फक्त इतकाच की, शाळा ‘ संस्कार ‘ द्यायचा प्रयत्न करते आणि क्लासेस देतात ‘ रँक ‘ आणि घेतात पैसे मोजून ! अशा रीतीने आपला लाडका बाळ रँक होल्डर होतो !
पूर्वी मुलं शाळेतून आली की दप्तर एका कोपऱ्यात फेकून मैदानाकडे धावायची आणि पालकांना त्यांना घरी बोलावून आणावे लागायचे. खेळण्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहायचे. पण आता सगळेच बदलले आहे. शाळेतून किंवा महाविद्यालयातून घरी आल्याबरोबर त्यांना कोचिंग क्लासेसला जावे लागते. या सगळ्या धावपळीत आपल्या मुलाचे बालपण किंवा तारुण्य कोमेजून जात आहे याची जाणीव पालकांना अभावानेच होते. सकाळी शाळा किंवा कॉलेज आणि नंतर कोचिंग क्लासेस यातच त्याचे बालपण, ऊर्जा आणि आनंद हरवून जातो. खरं म्हणजे नवीन ज्ञान शिकण्याचा जो आनंद असतो तो अशा या वातावरणामध्ये कसा मिळणार ?
स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या स्पर्धेत कोचिंग क्लासेसची मदत घेणे इथपर्यंत ठीक आहे. एखादा कठीण विषय समजून घेण्यासाठी किंवा परीक्षेचे तंत्र आत्मसात करण्यासाठी क्लासेस नक्कीच उपयुक्त ठरतात. पण अडचण तेव्हा येते जेव्हा कोचिंग क्लासेस हे शाळा-कॉलेजांना ‘पर्याय’ ठरू लागतात. शाळेची जागा कोचिंग क्लासेस घेऊ शकत नाहीत. शाळा हे ते ठिकाण आहे जिथे आपण जगायला शिकतो, मित्र जोडतो आणि संघभावना शिकतो. जेव्हा क्लाससाठी शाळा बुडवली जाते किंवा शाळा केवळ नावापुरती उरते, तेव्हा शिक्षणाचा मूळ हेतूच हरवतो. क्लासेसने केवळ अभ्यासातील उणिवा भरून काढण्याचे काम करावे, ते शिक्षणाचे ‘मुख्य केंद्र’ बनू नयेत. क्लासेसने त्यांना पूर्णपणे परीक्षार्थी बनवले आहे. ही मुलं विज्ञानाचे नियम तोंडपाठ करतात, पण पावसाचा आनंद घ्यायला त्यांना वेळ नसतो. त्यांना गणितातले ‘प्रॉब्लेम्स’ सोडवता येतात पण आयुष्यातला एखादा प्रॉब्लेम आला की मात्र ते गोंधळून जातात.
पालकांनी हे लक्षात घ्यायला हवे की, मुलाला ‘स्पर्धक’ बनवण्याआधी त्याला एक समृद्ध ‘विद्यार्थी’ म्हणून शाळेत घडू देणे जास्त गरजेचे आहे. शाळा हेच मुख्य व्यासपीठ असायला हवे आणि कोचिंग हे केवळ त्याला दिलेले एक पूरक पाठबळ असावे. पालकांनी मुलांच्या निकालाच्या टक्केवारीपेक्षा त्यांच्या आनंदाची टक्केवारी मोजायला शिकावे. क्लासेस लावण्यापूर्वी त्यांच्या आवडीची ‘क्लास’ ओळखा.
आयुष्याची खरी परीक्षा वर्गाच्या बाहेर असते, तिथे कोणताही क्लास कामाला येत नाही, तिथे फक्त तुमची जिद्द आणि शाळेत शिकलेले मूलभूत संस्कारच कामी येतात. शेवटी, शाळा आपल्याला ‘आयुष्य’ नावाच्या मोठ्या परीक्षेसाठी तयार करत असते! शिक्षण संस्थांनी देखील या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या शाळा महाविद्यालयातून उत्तम प्रकारचे शिक्षण, संस्कार मिळतील याकडे लक्ष द्यावे आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालयांकडे पुन्हा कसे वळतील यासाठी प्रयत्न करावेत.
☆ “तुझा तूच त्याचा..” – कवी : दिवाकर बुरसे – रसग्रहण : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह
प्रतिवर्षी ४ ते १० मार्च या काळात ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह’ देशभर साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात याचे विशेष महत्व आहे. या वर्षीच्या- आजच्या ४मार्चला सुरू होत असलेल्या – सुरक्षितता सप्ताहानिमित्त वाचकांना एका कवितेची अल्पशी भेट आणि सर्वांना सुरक्षित जीवन लाभावे ही ईश्वरचरणी ‘यंत्रदासा’ची मनोमन प्रार्थना.
वरील कवितेचे कौतुक करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया आजवर प्राप्त झाल्या आहेत. त्यातली वानगी म्हणून पुढील रसग्रहणात्मक प्रदीर्घ प्रतिक्रिया वचकांनाही आवडावी. दुर्दैवाने प्रतिक्रिया देणाऱ्या रसिकाचे नाव मात्र ठाऊक नाही. त्या अज्ञात रसिक वाचकाचे मनःपूर्वक आभार!
🪷
“तुझा तूच त्राता” — सजगतेचा जागर
रसास्वाद : अज्ञात
१९९२ साली लिहिलेल्या या कवितेतील विचार आणि संदेश आजच्या काळाशीही सुसंगत आहेत.
ही कविता म्हणजे केवळ शब्दरचना नाही;
ती कारखान्याच्या सायरनसारखी कर्णकर्कश नाही,
तर अंतर्मनात घुमणारी सावधानतेची घंटा आहे.
४ ते १० मार्च या कालावधीत देशभर साजरा होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाच्या भावनेला साजेशी ही रचना, National Safety Council यांच्या ध्येयवाक्याला काव्यरूप देते—
“Safety First” हे केवळ फलकावरचे वाक्य नाही;
ते जगण्याची पद्धत असायला हवी.
यंत्रयुगातील मानवा, थांब क्षणभर!
“मानेवरी बैसली जोखडे” —
ही ओळ वाचताक्षणी आपण स्वतःला एखाद्या वेगवान कन्वेयर बेल्टवर उभे असल्याचे पाहतो.
यंत्रांनी आपले आयुष्य सुलभ केले,
पण वेगाच्या मोहाने आपणच स्वतःला जोखडात अडकवून घेतले नाही ना?
कवी येथे उपदेश देत नाही—
तो आरसा दाखवतो.
वेग, प्रवाह आणि पैलतीर
“मढ्यांना इथे स्वस्थता तेवढी!”
ही ओळ चटका लावते.
जीवंत राहायचे असेल, तर सदैव जागृत राहावे लागेल.
जीवन हा प्रवाह आहे;
परंतु पैलतीर गाठायचे असेल, तर पोहता आले पाहिजे—
आणि पोहताना नियम पाळले पाहिजेत.
सुरक्षितता म्हणजे भीती नव्हे;
तीच खरी शौर्याची जननी आहे.
अग्नीशी खेळणाऱ्यांची प्रार्थना
“वितीचे तुझे पोट! जे जाळण्याला
पडे खेळणे अग्निसंगे इथे”
उद्योगक्षेत्रातील कामगारांचे हे जिवंत चित्र आहे.
उपजीविकेसाठी जोखीम स्वीकारावी लागते;
पण जोखीम आणि निष्काळजीपणा यात फरक आहे.
हेल्मेट, हातमोजे, इशारे, नियम—
हे केवळ औपचारिकतेचे भाग नाहीत;
ते जीवाचे कवच आहे.
Safety First म्हणजे
काम थांबवणे नव्हे,
तर काम जिवंत राहून पूर्ण करणे!
जीवसृष्टी विवेके चाले
गोगलगाय कवच घेऊन फिरते.
मधमाशी शिस्तीत उडते,
भविष्यासाठी अन्नसंग्रह करून ठेवते.
अस्वल साठवण करते.
निसर्गातील प्रत्येक जीव सावध आहे.
मग बुद्धिमान मानवच निष्काळजी का?
प्रश्न टोकदार आहे;
पण तो टोचण्यासाठी नाही—
जागवण्यासाठी आहे.
“तुझा तूच त्राता” — घोष नव्हे, मंत्र
ही कविता शेवटी घोषणेत परिवर्तित होते.
धृपदाची पुनरावृत्ती म्हणजे जणू प्रत्येक शिफ्टच्या सुरुवातीला घेतलेली सुरक्षिततेची प्रतिज्ञा—
“सुरक्षीतता पाहणे काम तुझे
जरी ध्यान कोणी न दे त्याकडे. ”
कोणी पाहो वा न पाहो,
सीसीटीव्ही असो वा नसो,
देवावर श्रद्धा असो वा नसो—
सजगतेची जबाबदारी स्वतःचीच आहे.
“अती दक्षतेने सदा वागतो जो
तयाचीच चिंता हरी वाहतो”
हे वाक्य म्हणजे तर एक सुभाषितच आहे
येथे श्रद्धा आणि शिस्त यांचा सुंदर संगम आहे.
देव सहाय्य करतो—
पण आधी आपण स्वतःच स्वतःला सहाय्य केले पाहिजे.
काव्यवैशिष्ट्यांचा तेजोमय आविष्कार
घोषवाक्यात्मक क्षमता – प्रत्येक कडवे जणू पोस्टरवर उमटावे असे!
प्रातिनिधिक प्रतिमा – यंत्र, वाहन, अग्नी, प्राणी—जीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श.
सरळ पण परिणामकारक भाषा – वाचक थेट संवादात ओढला जातो.
प्रेरणादायी स्वर – भीती नव्हे, आत्मविश्वास जागवणारा.
हो, काही ठिकाणी कविता प्रचारात्मक भासते;
पण सुरक्षिततेसारख्या विषयात तोच तिचा अलंकार ठरतो.
कारण येथे सौंदर्यापेक्षा प्राण महत्त्वाचा आहे.
अंतिम संदेश
ही कविता वाचून मनात एकच ओळ घुमत राहते—
Safety First म्हणजे Life Always.
“तुझा तूच त्राता”
हे केवळ एक शीर्षक नाही,
तो जीवनरक्षणाचा मंत्र आहे.
कारखान्यात, रस्त्यावर, प्रयोगशाळेत, घरात—
जिथे जिथे जोखीम आहे,
तिथे तिथे ही कविता जपमाळेसारखी अंतरात असावी.
🪷
सजग राहूया.
सुरक्षित राहूया.
प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला स्वतःलाच सांगूया—
“सुरक्षीतता पाहणे काम माझे!”
🙏🏽🙏🏽🙏🏽
दिवाकर बुरसे, पुणे
संपर्कः ९५५२ ६ २ ९२ ४ ५
प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ टॅटू… (अनुवादित) इंग्रजी लेखिका : मेलिसा म्याककिनी ☆ मराठी अनुवाद – श्री मकरंद पिंपुटकर☆
(परदेशामध्ये मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन या व्यसनांची तीव्रता भीषण आहे. अनेकजण यातून बाहेर पडण्यासाठी – व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करतात. काहीजण यशस्वी होतात, तर काही पुन्हा पुन्हा त्या व्यसनांच्या विळख्यात सापडतात. आजची कहाणी या व्यसनमुक्तीच्या लढ्याबद्दलची…)
मी एक यशस्वी टॅटू आर्टिस्ट आहे – लोकांच्या अंगावर, त्याच्या आवडीप्रमाणे गोंदवून देतो. पुण्यात कँपात माझा स्टुडिओ आहे. भयंकर बिझी असतो मी. खोऱ्याने पैसा ओढतो, त्याहीपेक्षा महत्त्वाचं, म्हणजे मी अजरामर कलेला जन्म देतो. तुमच्या अंगावरचा मी कोरलेला टॅटू – माझी कला – तुमच्या शरीरावर कायम वास्तव्य करून राहते. एकदा टॅटूचं नक्षीकाम – डिझाईन ठरलं, रंगसंगती ठरली, मी कामाला सुरुवात केली आणि मी माझी सिगारेट शिलगावली, की मग मी माझ्याच धुंदीत असतो.
टॅटू तयार झाला की ग्राहकापेक्षा मलाच जास्त खुशी होत असते. मग ती खुशी सेलिब्रेट करण्यासाठी, सिगारेटचा आणखी एक झुरका ! माणसाला आयुष्यात आणखी काय पाहिजे ?
– – हां, माझ्या गर्लफ्रेण्डला माझं हे असं सिगारेट पिणं आवडत नाही. पण कलाकाराची आणि कलेची नशा काय असते, हे तिला काय समजणार ? आणि अर्थात, मला काही धूम्रपानाचे व्यसन नाहीये. माझा माझ्यावर पूर्ण ताबा आहे. असो.
आज दुपारी ४ वाजता एक महिला माझ्या टॅटू स्टुडिओमध्ये आली. अपॉइंटमेंट नव्हती घेतलेली तिनं. ‘मी तिच्या हातावर एक टॅटू काढू शकतो का ?’ असं तिनं विचारलं.
“कसा टॅटू हवा आहे तुम्हाला ?” थोडा मोकळा वेळ होता माझ्याकडे, म्हणून मी विचारलं.
तिने मला तिच्या फोनवर एक फोटो दाखवला. त्यावर ३९२ आकडा लिहिलेला होता. “ ३९२. माझ्या मनगटावर. साधी काळी शाई. तुम्ही हे आत्ता करू शकता का? ”
– – मी तिच्याकडे पाहिले. ती रडत होती. रडून रडून डोळे लाल झालेले, सुजलेले. हात थरथरत होते.
“ हो, मी ते करू शकतो. पण मी विचारू का – हे ३९२ म्हणजे काय? ”
ती माझ्या खुर्चीवर बसली. तिने एक दीर्घ श्वास घेतला.
– – “ माझी मुलगी – चार दिवस गायब होती, काल मला ती सापडली. ड्रग ओव्हरडोसने तिचा मृत्यू झाला होता. पण मला याची आठवण ठेवायची आहे, की तिने व्यसनमुक्त राहण्याचे खूप प्रयत्न केले होते. तब्बल ३९२ दिवस तिने नशा केली नव्हती. प्रयत्नपूर्वक, संयम ठेवून, ती सलग ३९२ दिवस व्यसनमुक्त राहिली होती. ते ३९२ दिवस – तो निग्रह, ते प्रयत्न महत्त्वाचे होते. ”
काय बोलावे हे मला कळत नव्हते. मी फक्त मान डोलावली. मी टॅटू काढायची तयारी सुरू केली.
– – इकडे ती बोलतच राहिली. तिला मोकळं व्हायचं होतं.
“ बोलणारे बोलतील की तिने पुन्हा ड्रग्स घेतलीच, त्यातच ती मेली. ती अपयशी ठरली. तुम्ही कधीच नशा करणे सोडून देऊ शकत नाहीत. पण ते हे मान्य करणार नाहीत की तिने ३९२ दिवस ड्रग्सना स्पर्शसुद्धा केला नव्हता. ती व्यसनमुक्तीच्या बैठकांना – सभांना गेली होती. तिला नोकरी मिळाली होती. ती पुन्हा चित्रं काढू लागली होती. ३९२ दिवस ती पुन्हा एकदा माझी मुलगी होती. इतरांना फक्त तिचा शेवटचा एक व्यसनाधीन दिवस आठवेल. पण मला तिचे सोबर व्यसनमुक्त ३९२ दिवस आठवतील. ”
… तिचा आवाज कातर झाला. “ हा टॅटू मला तिच्या त्या ३९२ सोनेरी दिवसांची आठवण करून देईल. तिने लढा दिला. हे आकडे मला सांगतील – तिने प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ”
मी टॅटू पूर्ण केला. साधे आकडे… ३९२. तिच्या मनगटाच्या आतल्या बाजूला. जिथे ती दररोज पाहू शकत होती.
तिने माझी फी दिली. आणि त्याशिवाय मला खूप जास्त टिप दिली. ती निघून जाऊ लागली. पण अचानक मागे वळली आणि तिनं विचारलं – “ माझं आणखी एक काम कराल का, प्लीज ? या टॅटूचं हे स्टेन्सिल तुम्ही तुमच्या शो-केसमध्ये ठेवू शकाल का? ३९२? आणि जर कोणी इथे व्यसनाशी झुंजत आला असेल किंवा एखाद्याने व्यसनामुळे कोणाला गमावले असेल, तर त्याला तुम्ही हे टॅटू कमी दरात गोंदवून देण्याची ऑफर देऊ शकाल का? मग तो किंवा ती कितीही कमी दिवस व्यसनमुक्त राहिला असला तरी… १०० दिवस. १० दिवस. १ दिवस. किती दिवस हे महत्त्वाचे नाही. पण मनापासून केलेल्या प्रयत्नांची नोंद घेतली जाते हे जगाला कळू द्या. “
– – मी उत्तर देण्यापूर्वीच ती निघून गेली.
मी ते ‘३९२’ चे स्टेन्सिल माझ्या काउंटरच्या मागे एका फ्रेममध्ये ठेवले. त्याखाली लिहिले :
” तुमचे / जीवलगांचे व्यसनमुक्त दिवस गोंदवून घ्या – मोफत. आकडा कितीही लहान असो वा मोठा असो. कोणताही आकडा. कारण तुमचा प्रयत्न महत्त्वाचा असतो, प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. “
… खरं सांगू, मला अजिबात वाटले नव्हते की कोणी या फोटोकडे गंभीरपणे लक्ष देईल.
एका महिलेने तिच्या मुलीच्या सलग ३९२ दिवस व्यसनमुक्त राहण्याची आठवण म्हणून हातावर ३९२ आकडा गोंदवून घेतला होता. तिच्या विनंतीवरून, कोणाला आपल्या / जीवलगांच्या व्यसनमुक्त राहण्याचे आकडे गोंदवून घ्यायचे असले तर ते मी मोफत गोंदवून देईन असा बोर्ड मी माझ्या टॅटू स्टुडिओमध्ये लावला.
– – – आणि तीन दिवसांनी, एक माणूस आत आला. त्याला तो बोर्ड दिसला. तो हमसून हमसून रडू लागला. मला समजेच ना तो का रडत आहे ते…
” तो बोर्ड – तुम्ही १, २७९ गोंदवून देऊ शकाल का? “.. त्याने मला विचारले.
” नक्कीच. कोणासाठी?”
” माझा सख्खा भाऊ. त्याला दारूचे व्यसन होते. पण त्याने शपथ घेतली होती, त्याने निर्धाराने दारू सोडली होती. सलग १, २७९ दिवस – जवळजवळ चार वर्षे त्याने दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता. दुर्दैवाने गेल्या आठवड्यात एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. दारू सोडलेल्या माझ्या भावाला, एका दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरने उडवले. माझ्या भावाने तिथेच प्राण सोडले. “
… मी मोफत टॅटू काढला. मला मिठी मारून तो ढसाढसा रडला.
– – – बातमी पसरली. इंस्टाग्राम, टिकटॉक, यु ट्यूब, लोकांनी या गोंदवण्याला अमाप प्रसिद्धी दिली.
प्रत्येकाचे वेगळे आकडे, प्रत्येकाची वेगळी कहाणी. ४७ दिवस. ६ दिवस. १, ८२३ दिवस. २ दिवस.
एका महिलेने “१४ तास” टॅटू काढला.
“१४ तास ?” मी आश्चर्याने विचारलं.
“ड्रग्सच्या ओव्हरडोसने मृत्यू होण्यापूर्वी माझ्या मुलाने सलग १४ तास ड्रग्स घेतली नव्हती. प्रत्येकजण म्हणतो की १४ तास हा काही मोठा कालावधी नाही. पण ते खरं नाही. त्याने प्रयत्न केला. १४ तास त्याने प्रयत्न केला. “…
… मी तिच्या खांद्यावर १४ तास टॅटू काढला. ती संपूर्ण वेळ रडत राहिली. काम संपवल्यावर, तिने टॅटू पहिला आणि कुजबुजली, “आता सगळ्या जगाला कळेल की त्याने प्रयत्न केला, त्याने प्रामाणिक प्रयत्न केला. “
काल कोणीतरी आले आणि म्हणाले “शून्य दिवस गोंदवता येईल का ?”
मी चक्रावलो.
“शून्य?”
त्याने होकार दिला.
… “ माझी मुलगी कधीच पूर्णतः व्यसनमुक्त झाली नाही. पण तिने अनेक वेळा ड्रग्स सोडण्याचा मन:पूर्वक प्रयत्न केला. चार वेळा ती व्यसनमुक्ती केंद्रात दाखलही झाली होती. पण तिला ते जमलं नाही. अवघ्या २३ व्या वर्षी तिचे निधन झाले. सगळे म्हणतात की तिने प्रयत्न केले नाहीत. पण तिने केले. तिने खूप प्रयत्न केले. लाखो प्रयत्न. अनंत प्रयत्न. त्या शून्य संख्येखाली एक छोटं इन्फिनिटी (अनंत) “” चिन्ह गोंदवू शकता का? कारण जरी लोकांना दाखवण्यासाठी तिच्याकडे व्यसनमुक्त दिवस नव्हते तरी तिचे प्रयत्न अनंत होते. “
… एरवी मी टॅटू काढायचो, आणि गोंदवून घेणारा रडायचा. आज तो टॅटू गोंदवताना मी रडलो. अनंत चिन्हासह शून्य…. अशा मुलीसाठी जी यशस्वी झाली नाही, पण जिने कधीही प्रयत्न करणे थांबवले नाहीत.
दोन दिवसांपूर्वी एक सतरा वर्षांची मुलगी आली – तिच्या वडिलांसोबत.
“ तुम्ही ९१ दिवस करू शकता का? माझ्यासाठी. मी ९१ दिवस ड्रग्स घेतली नाहीयेत. मला हे लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या वेळी जेव्हा मला ड्रग्स घ्यावीशी वाटतील तेव्हा मी हा टॅटू पाहीन. मी ९१ पर्यंत पोहोचले होते, मग मी ९२ पर्यंतही पोहोचू शकते याचं भान ठेवण्यासाठी. “
… टॅटू काढून झाल्यावर तिच्या वडिलांनी माझे हात हातात धरले. ” तुझ्या शाईने तू लोकांचे जीव वाचवत आहेस, त्यांना निर्व्यसनी राहण्यास प्रेरणा देत आहेस. “
– – ती मुलगी दर ३० दिवसांनी परत येते. मी तिच्या ९१ आकड्याच्या पुढे एक लहान टॅली मार्क जोडतो. ती आता १५१ दिवसांपर्यंत पोहोचली आहे.
– – –
मी हे व्यसनमुक्तीचे टॅटू काढू लागलो त्याला वर्ष होऊन गेलं होतं. जिच्यामुळे या उपक्रमाला सुरुवात झाली, ती ३९२ टॅटूवाली आई काल परत आली.
… ” मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे होते, ” ती म्हणाली. तिने तिचे मनगट दाखवले, त्यावर मी गोंदवलेला ३९२ होता. त्याच्यावर एक नवा नंबर गोंदवला होता, “१. ” फक्त नंबर १.
मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले.
ती अश्रू ढाळत हसली.
” माझी मुलगी वारली, त्याला एक वर्ष झाले. एक वर्ष मी तिच्याशिवाय जगले आहे. मला कोणीतरी सांगितले की मी आता माझ्या स्वतःसाठी टॅटू काढावा. लेकीच्या मृत्यूचं हलाहल मी वर्षभर पचवलं त्याची आठवण म्हणून. “
… ती गेली. मी समोरच्या भिंतीकडे पहात राहिलो. व्यसनमुक्तीच्या आकड्यांचे टॅटू – ० पासून, १४ तासांपासून ते ६, २४७ दिवसांपर्यंतचे आकडे… प्रत्येक आकडा अशा व्यक्तीची कहाणी आहे ज्याने प्रयत्न केला. त्यांच्या लढाईची कहाणी आहे. प्रत्येक आकडा महत्त्वाचा आहे. ज्याने व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठीही आणि त्यांच्या जीवलगांसाठीही.
… आणि ते व्यसनमुक्त दिवस, ते प्रयत्न, तो निर्धार – लक्षात ठेवण्यास पात्र आहेत. चिन्हांकित…. सन्मानित….
मी हे सुरू केले कारण एका दुःखी आईने मला तिच्या मुलीची ३९२ दिवसांची झुंज लक्षात ठेवण्यास सांगितले. आता मला असे शेकडो दिवस आठवत आहेत – अशा शेकडो झुंजी माझ्या मनावर गोंदवल्या गेल्या आहेत. प्रत्येक आकडा मला एकच गोष्ट सांगतो : प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. लढणे महत्त्वाचे आहे. जरी तुम्ही हरलात तरी लढा महत्त्वाचा आहे. फक्त तुमच्यासाठीच नव्हे, तुमच्या जीवलगांसाठीही.
… आणि हा सगळा प्रवास आठवताना, मी स्वतः काय करायला पाहिजे हे अचानक मला लख्ख लक्षात आलं. मी माझ्या गर्लफ्रेंडला बोलावून घेतलं, ती आल्यावर तिला म्हटलं, ” मी एक स्पेशल टॅटू काढतोय, आणि तो काढताना मला तू साक्षीदार हवी आहेस. “
… मी माझ्याच हातावर गोंदवून घ्यायला सुरुवात केली – “१”. तिने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
“ सिगारेट फुंकणे हेही व्यसन आहे. आजपासून मी सिगरेट सोडली. आणि आजच्या दिवसाची आठवण म्हणून हा टॅटू. “
तिच्या डोळ्यातील अश्रू मला दाद देत होते…
… ३९२ ने सुरू झालेला प्रवास एका आणखी महत्वाच्या टप्प्यावर पोचला होता.
(मेलिसा मॅककिनी यांच्या फेसबुक वॉलवरील कथेचा स्वैर अनुवाद)
अनुवादक / लेखक : मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
२५ जानेवारीची संध्याकाळ. आधीच शनिवार-रविवार आणि त्यात पुन्हा राष्ट्रीय सुट्टी आलेली. आजूबाजूची सगळी शोरुम्स आणि मॉल्स गर्दीनं खचाखच भरुन वाहत होते. कुणाला तरी भेटायला गेलो होतो आणि तिथं आम्हाला बराच वेळ लागला, म्हणून जवळच्या एका मॉलमध्ये आम्ही पोट भरण्यासाठी गेलो. पण तिथल्या कॅफेटेरियाचे दर बघून आमचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. पंधरा-वीस स्टॉल्स होते खरे. पण किंमती अवाढव्य होत्या. ८० रुपयांची पाणीपुरी, २०० रुपयांचं सँडविच, १८० रुपयांपासून पुढे सुरु होणारी चाट हे खिशापेक्षा मनालाच परवडत नव्हतं.
मी त्यांना म्हटलं, “जाऊ द्या. आपण टपरीवर चहा घेऊ. ”
ते म्हणाले, “जीबीएस कसा भडकला आहे, बघतोयस ना. उघड्यावरचं काही नको रे बाबा. “
आम्हीं पंधरा वीस मिनिटं तिथं होतो आणि शेवटी काहीही न खाता पिता तिथून निघालो. पण त्या मॉल मध्ये जे दृश्य होतं, ते बघून मला धक्का बसला.
तरुण मुलामुलींची तर गर्दी होतीच, शिवाय शेकड्यांनी परिवारसुध्दा होते. तिथं पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावं लागत होतं. चार-पाच जणांचं बिल एक हजाराच्या वर सहजच जात असेल. कितीतरी लहान लहान मुलं त्या कॅफेटेरिया मध्ये जंक फूड मनसोक्त खात होती. कॉलेजवयीन मुलामुलींच्या जोड्या होत्या.
५०० रुपयाचं सिझलर घेऊन टेबलावर गप्पा मारत बसलेलं एक युगुल दहा मिनिटांनी ती डिश तिथंच तशीच टाकून उठून निघून गेलं. कितीतरी लोक खाणं अर्धवट टाकून उठून निघून जात होते. छोले भटुरे मागवलेल्या एका ग्रुपनं तर निम्मे भटुरे तसेच टाकले. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा अर्धवट टाकून निघून गेलेले लोक मी बघत होतो.
बरं, असला “टाकून माजण्याचा” मस्तवालपणा करणारी जी जनता होती, ती काही मर्सिडीज क्लास नव्हती. सगळेच्या सगळे मध्यमवर्गीयच होते.
“पेट्रोल २५ पैशांनी महागले अन् जनतेचे कंबरडे मोडले” किंवा “कोथिंबीर कडाडली, लोकांनी खायचं काय?” असले मथळे लिहिणाऱ्यांनी मॉलमधले हे मध्यमवर्गीय बघितलेले असतात का? असा प्रश्न मला पडला.
मेसचे डबे लावून जेवणाऱ्या मुलांचं आणि मुलींचं मी अनेकदा निरीक्षण केलंय. आठवड्यातून तीनदा तरी डब्यातलं अन्न जसंच्या तसं कचऱ्यात गेलेलं असतं. घराघरांतून गोळा केला जाणारा ओला कचरा तुम्ही अवश्य पहा. चांगल्या प्रतीचं ब्रँडेड अन्न कचऱ्यात फेकून दिलेलं तुम्हाला दिसेल. हॉटेलमध्ये सँडविचच्या डिशमध्ये कोबी किसून डेकोरेट करुन सर्व्ह करतात. तो कच्चा कोबी कितीजण खातात? मोठमोठ्या कॉफी शॉप्स मध्ये मी पाहतो, मला फार वाईट वाटतं.
पाचशे-सातशे रुपये किंमतीची कॉफी अर्धवट टाकून लोक निघून जातात. पाचशे रुपयांतले तीनशे रुपये आपण कचऱ्यात ओतले, याचं त्यांना भानही नसतं आणि त्याचं त्यांना वाईटही वाटत नाही.
एकदा सोलापूरहून पुण्याला येत असताना एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये आम्ही ब्रेक घेतला. शेजारच्या टेबलावर सात आठ जण बसले होते. आठ जणांनी आठ वेगवेगळ्या भाज्या मागवल्या. इतके स्टार्टर्स, इतक्या डिशेस.. टेबल अख्खं भरलं होतं. पण खाल्लं किती? जितकं मागवलं होतं त्यातलं निम्मंसुद्धा नाही.. ! बिल भरुन माणसं निघूनही गेली.
याला आपण नेमकं काय नाव द्यावं? ‘महागाई किती वाढलीय’ असं ओरडणारी अगदी साधी साधी माणसंसुद्धा वडापाव घेताना पाच सात मिरच्या घेतात आणि त्यातली एखादीच खाऊन बाकीच्या चक्क कचऱ्यात टाकतात.. ! पराक्रम दाखवण्याच्या नादात एकस्ट्रा तिखट मिसळ मागवतात आणि चार घासातच त्यांचा धीर गळून पडतो. अन्न वाया.. ! सँडविचची हिरवी चटणी जास्तीची घेतात आणि टाकून देतात.. ! एखाद्या सँडविचवाल्याची किलोभर हिरवी चटणी दररोज सहजच उकिरड्यावर जात असेल..
गुरुवारी – शनिवारी देवळाबाहेर हात पसरुन बसलेली माणसं सुद्धा आता रुपया-दोन रुपयांचं नाणं, पार्ले बिस्कीट पुडा, एखादा वडापाव असलं काही दिलं तरी तोंड वेंगाडतात. त्यांना दहा रुपयांचं नाणं हवं असतं. ताजी पोळी-भाजी दिली तरी टाकून देणारे सुद्धा भिकारी मी पाहिलेत. मग भीक मागण्यामागची त्यांची नेमकी भावना तरी काय?
आपल्याला आपल्या पात्रतेनुसार किंवा पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मिळतंय, याची जाणीव इथेही दिसत नाही.
न कमावणारे, कमी कमावणारे, भरपूर कमावणारे, आपकमाईवाले, बापकमाईवाले सगळे सगळे या एकाच बोटीत बसलेले आहेत. काहीजणांची ही वृत्तीच आहे आणि काहीजणांना आपलं काहीतरी चुकतंय याची लांबलांबपर्यंत जाणीवच नाही. आणि दुसरं कुणी ह्यांना ही जाणीव करुन द्यायला तयार नाही.
महिन्यातले पंधरा दिवस मेसचा अख्खा डबा कचऱ्यात टाकणारे विद्यार्थी आणि मुलांच्या हट्टापायी भारंभार पदार्थ मागवून त्यातलं निम्म्याहून जास्त अन्न टाकणारे सुशिक्षित पालक दोघेही समाजाचे दोषी नाहीत का ?
महागाई वाढल्याचं ढोंग करणारी माणसं त्यांची जीवनशैली जराही बदलायला तयार नाहीत.
बापकमाईवर घेतलेला ब्रँडेड कपडा जास्तीत जास्त चार पाच वेळा घालून कपाटात कोंबणारे अन् पुढच्या महिन्यात पुन्हा नवे कपडे घेणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा नेमका कसा विचार करत असतील? त्यांचे आईवडील त्यांना दर महिन्याला पैसै पाठवताना काय विचार करत असतील?
कॉलेजच्या ऑफिसात फी माफीचे अर्ज करुन घेणारी मुलं मला जेव्हां त्यांच्या परमप्रिय मैत्रिणीसोबत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये दीडशे रुपयांचा उत्तप्पा खाताना दिसतात, तेव्हां त्यांची गरिबी नेमकी कोणती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण कॉलेजची फी खोटं कारण दाखवून माफ करुन घेऊन हॉटेलात एकावेळी पाचशे रुपयांची नोट खर्च करणं हे प्रामाणिक माणसाचं लक्षण नाही.
आमच्या आजूबाजूच्या परिसरात रात्री बारा वाजता पंधरा वीस बुलेट बाइक्स मोठाला आवाज करत गेल्या आणि अर्धा तास हवेत तीन चार हजार रुपयांची फटाक्यांची आतषबाजी होत राहिली की, आपण ओळखावं – आज कुठल्यातरी बेरोजगार दिवट्याचा वाढदिवस आहे आणि चार घरी धुणीभांडी करुन घराचा गाडा ओढणाऱ्या आपल्या आईच्या कमाईवर फुकट मजा मारणारं पोरगं आज एक वर्षानं मोठं झालं आहे.. ! रेशनचं अन्न आणून जगणाऱ्या घरच्या पोरांचे वाढदिवस रात्री बारा वाजता भर रस्त्यावर दोन-दोन केक आणून कसे होतात?
सर्वच स्तरांमध्ये माणसांच्या जगण्याच्या व्याख्या बदलतायत आणि त्या अमिबासारख्या आकार उकार बदलत चालल्या आहेत, हे स्पष्ट दिसतं. याचा विचार कुणी एकट्यानं नव्हे तर, संपूर्ण समाजव्यवस्थेनं केला पाहिजे आणि तो अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे.
लोकांच्या खिशात पैसा उदंड झालाय? जास्तीचे पर्याय सहज उपलब्ध झालेत? मोकळीक अन् स्वातंत्र्य वाढलंय? की माणसाला कशाचीच किंमत राहिली नाहीय?
जाणिवांचं श्राद्ध घालून कुठल्याशा पोकळ धुंदीत वागण्याची ही रित समाजातल्या सर्वच स्तरांमध्ये जाणवण्याइतपत वाढतेय, हे प्रगतीचं अन् शहाणपणाचं लक्षण मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही.
खरोखरचं सुजाण पालकत्व आणि आपण सुजाण पालक होण्यासाठी करत असलेला अनाठायी खर्च या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत का? संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा निर्माण करुन आपण काय मिळवतो आहोत, याचा हिशोब कधीतरी कुणीतरी लावला पाहिजे की नको?
नादारीचा मुखवटा घालून आतून काजू-बदामावर ताव मारणं हे माणसांच्या खोटारडेपणाचं स्वच्छ लक्षण आहे.
☆ … आणि पायऱ्या बोलू लागल्या… ☆ श्री जगदीश काबरे ☆
राष्ट्रीय विज्ञान दिनी सांगली जवळील जयसिंगपूर येथील ‘अनेकांत इंग्लिश मीडियम’च्या शाळेमध्ये प्रमुख पाहुणे आणि व्याख्याता म्हणून जायची संधी मिळाली होती. त्या शाळेला भेट दिल्यानंतर प्रथमदर्शनी नजरेत एक अशी विशिष्ट गोष्ट भरली की, जी मला संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या शाळांमध्ये गेली 40 वर्षे व्याख्यानासाठी जात असतानाही कुठेही निदर्शनास आलेली नव्हती – अगदी इंटरनॅशनल बिरुद लावलेल्या शाळेतही. ती म्हणजे या शाळेच्या पायऱ्या बोलक्या आहेत. आश्चर्य वाटले ना! बोलक्या पायऱ्या…? त्या तर निर्जीव असतात. मग त्या कशा काय बोलतील? थांबा साथींनो, असे आश्चर्यचकित होऊ नका. सांगतोच तुम्हाला नेमके त्या पायऱ्यांनी मला काय दाखवले ते…
तुम्हाला माहीतच आहे की, जिन्यावर साधारणत: दहा पायऱ्यानंतर सपाटी असते. तर अशा प्रत्येक दहा पायऱ्या विविध रंगात रंगवलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना चढताना शिक्षित करत होत्या. म्हणजे असे की, पहिल्या दहा पायऱ्यांवर ‘2 ते 10’चे पाढे लिहिलेले होते. दुसऱ्या दहा पायऱ्यांवर ‘2 ते 30’चे वर्ग आणि एक ते दहा पर्यंतचे घन लिहिलेले होते. तिसऱ्या दहा पायऱ्यांवर रासायनिक पदार्थांची नावे आणि त्यांची सूत्रे लिहिलेली होती. चौथ्या दहा पायऱ्यांवर वजन, लांबी आणि आकारमानांची मापे लिहिली होती. तर पाचव्या दहा पायऱ्यांवर विज्ञानातील शोध आणि शोधक यांच्या जोड्या लिहीलेल्या होत्या. सहाव्या दहा पायऱ्यांवर देशातील विविध राज्ये आणि त्यांच्या राजधान्या लिहिल्या होत्या. सातव्या दहा पायऱ्यांवर सेकंदापासून वर्षापर्यंतची कालगणना लिहिलेली होती. आठव्या दहा पायऱ्यांवर 11 ते 30 पर्यंतचे पाढे लिहिलेले होते. महत्त्वाचे म्हणजे जिथे फक्त दोन-दोन पायऱ्या होत्या तिथे त्यांनी विषम संख्या आणि सम संख्यांची मांडणी केली होती.
आता मला सांगा, ही अभिनव कल्पना आहे की नाही? कारण दररोज विद्यार्थी त्या पायऱ्या चढत असताना या गणिती संख्या त्यांच्या डोक्यात घट्ट बसतील आणि त्यांची गणिताविषयीची भीती कमी होईल, अशी या पायऱ्यांची तजवीज केलेली आहे. म्हणूनच म्हटले की, या बोलक्या पायऱ्या शिक्षकांची पुस्तकी ज्ञानापलीकडे शिक्षण देण्याची वृत्ती दाखवतात. असे जर संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये घडले तर किती चांगले होईल! नाही? अनेक विद्यार्थ्यांच्या मनातून गणिताची भीती तर पळून जाईलच; पण शिक्षणाची गोडीही त्यांच्यात निर्माण होईल. या शाळेतील शिक्षकांचे त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
(सूचना : छायाचित्रावर क्लिक करून ते झूम करून पहावे म्हणजे पायऱ्या तुमच्याशीही बोलू लागतील.)
☆ कोई मौसम नहीं होता… – लेखिका : वसुंधरा काशीकर ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆
एक इंचसुद्धा अवैध बांधकाम करणार नाही अशा दुर्मिळ तत्ववादी माणसांपैकी एक असलेला तो आर्किटेक्ट. महानगर पालिकेत त्याच्या सहीचा बांधकाम प्लॅन आला की, अधिकारी तो न बघता मंजूर करत. कारण त्याने प्लॅन केला आहे तर त्यात काहीही गैर नसणारच ही खात्री होती.
ती भारतीय शास्त्रीय संगीताची प्राध्यापक. अभिजात-अभिरुचीसंपन्न जोडपं. त्यांना मधुरा नावाची एक गोड, ८-९ वर्षांची चुणचुणीत मुलगी. असं सगळं छान. पण सगळं छान छान राहत नाही… हीच तर जीवनाची खरी गंमत आहे… एक दिवस मधुरा मैत्रिणींसोबत नदीवर खेळायला जाते आणि जे होऊ नये ते होतं… नदीच्या पाण्यात मधुरा वाहून जाते. जीवनात कोणतंही दु:ख चालेल पण अपत्य जाण्याचं दु:ख शत्रूच्याही वाटयाला येऊ नये.
अमरावतीचे गझललेखक, शायर आणि आर्किटेक्ट विश्वजीत तुळजापूरकर यांच्या जीवनात घडलेली ही सत्य घटना. तुळजापूरकरांचं आयुष्य या घटनेनं बदलून गेलं. त्यानंतर तुळजापूरकर यांनी ‘मधुरा’ नावाचा कवितासंग्रह लिहिला जो मौज प्रकाशनानं छापला. ‘किसी पर दिल के आने का कोई मौसम नहीं होता’ ही तुळजापूरकरांनी मुलगी गेल्यानंतर लिहिलेली गझल. तुळजापूरकरांच्या ‘बात ज़रासी’ या गझल संग्रहात ही गझल आहे. ही गझल वेगळ्या दृष्टीनं महत्वाची आहे कारण शायर स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात आत्यंतिक दु:खाला सामोरा गेला आहे. पोटचं मुल जाण्याचं दु:ख शायरनं भोगलं आहे.. अनुभवलं आहे… तरीही शायर म्हणतो ‘’खुशी के लौट आने का कोई मौसम नहीं होता’’… एवढं दु:ख भोगल्यावर असं लिहायला खूप ‘कलेजा’ लागतो… आणि म्हणून या गझलेला वेगळं मूल्य आणि महत्व प्राप्त होतं ते यामुळेच.. सलाम!!
सामान्यत: गझलेबाबत फार कमी गझला या आशावाद दर्शवणाऱ्या असतात असं म्हटलं जातं. पण ही गझल मात्र त्याला अपवाद आहे.
दरिचा एक कमसे कम खुला रखिये सदा घर का
खुशी के लौट आने का कोई मौसम नहीं होता..
दरिचा म्हणजे खिडकी… घराची किमान एक खिडकी कायम उघडी ठेवा. ही खिडकी प्रतिकात्मक वापरली आहे.. ही खिडकी उमेदीचे प्रतिक आहे… शक्यतेचे प्रतीक आहे… सध्याच्या घडीला आयुष्यात कदाचित दु:ख असेल, प्रतिकूलता असेल पण ही परिस्थिती अशीच राहणार नाही. तुम्ही लढाई हरत असाल पण युद्ध जिंकू शकता. भविष्य सुंदर.. आश्वासक असू शकतं.. म्हणून ‘खुशी के लौट आने का कोई मौसम नहीं होता’… अनेकदा आयुष्यात नाती तुटतात. नात्यांमध्ये दुरावा येतो. त्यावेळी होणारी मनाची तगमग, घालमेल भयंकर असते. काही लोक आयुष्यभर ते नात्यांचं तुटलेपण घेऊन जगाशी फारकत घेऊन बसतात. अशा लोकांसाठी शायर म्हणतो… ”ज़रा हँस कर किसी से बात करने में बुरा क्या है”???….
एका नात्यात अपयश आलं म्हणून सर्वच नात्यात अपयश येईल असं थोडंच आहे. आणि नवं नातं जोडणं हा काही गुन्हा असू शकत नाही. ‘नयें रिश्ते बनाने का कोई मौसम नहीं होता’.. या शेरवर मला नारायण सुर्वेंची एक कविता आठवतेय.. कविता पत्नीला उद्देशून आहे. स्वत:च्या मृत्यूनंतर कवी बायकोला तीनं काय करावं याबद्दल काय सुंदर सांगतोय..
जेव्हा
मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन,
तेव्हा तू एक कर,
तू नि:शंक मनाने डोळे पूस.
ठीकच आहे,
चार दिवस धपापेल जीव गदगदेल
उतू जाणारे हुंदके आवर
कढ आवर, नवे हिरवे चुडे भर
उगीचच चिरवेदनेच्या नादी लागू नको !
खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर!
मला स्मरून कर
हवे तर, मला विस्मरून कर !
यातलं चिरवेदनेच्या नादी लागू नको… हे किती महत्वाचं.. जगणं हा कायम उत्सवंच असायला हवा… म्हणून ‘नये रिश्ते बनानें का कोई मौसम नहीं होता’… जे मनात आहे ते सांगून दयावं मोकळेपणाने.. तो राग असेल वा प्रेम.. ’ज़ुबा पर बात लाने का कोई मौसम नहीं होता… ’
ही गझल ऐकताना मला खूपदा Shawshank Redemption या चित्रपटातलं वाक्य आठवतं. नायक म्हणतो, Remember Red, hope is a good thing, may be the best of things, and no good thing ever dies. फारच अप्रतीम सिनेमा… कितीतरी अर्थांच्या शक्यता दाखवणारा हा सिनेमा. पण यातला मला अत्याधिक आवडलेला एक अर्थ म्हणजे आशा.. उम्मीद.. Hope.. आणि प्रयत्नवाद.. बायकोच्या खुनाच्या खोट्या आरोपात अडकलेला नायक… जेलमध्ये गेल्यावर कसल्या कसल्या संकटातून स्वत:ला निभावत नेत तो स्वत:ची सुटका करुन घेतो. त्याचा अतूट आशावाद… प्रयत्नांची पराकाष्ठा हे बघण्यासारखे आहे. मी Spoiler होणार नाही तुम्ही प्रत्यक्ष सिनेमातच ते बघावं.
‘किसी पर दिल के आने का कोई मौसम नही होता’ ही गझल ऐकताना मला हा चित्रपट आठवतो. आयुष्यामध्ये जोवर आपण डाव सोडून उठत नाही तोवर संपलं असं काही नसतंच. आयुष्यात कोणत्याही वयामध्ये तुम्ही नवी इनिंग सुरू करु शकता.
दाजीसाहेब पटवर्धनांनी वयाच्या ५६ व्या वर्षी कुष्ठरोग्यांसाठी अमरावतीला तपोवन सुरू केलं. शरद जोशींनी वयाच्या ४५ व्या वर्षी शेतकरी संघटना काढली. नेल्सन मंडेला २७ वर्ष तुरूंगात राहिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. अगदी आताच उदाहरण घ्यायचं झालं तर मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथीर मोहम्मद हे वयाच्या ९४ व्या वर्षी २०१९ साली मलेशियाचे पंतप्रधान झाले. तेव्हा आयुष्य कुठुनही सुरू करता येतं.
मला स्वत:ला या गझलेची चाल खूप म्हणजे खूपच आवडते. गझल गायक आणि माझा मोठा भाऊ आल्हाद काशीकर याने ही गझल गायली आहे. या गझलेच्या मूडला साजेशी अशी चाल त्यांनी दिलीय. अतिशय सुंदर… मेलोडियस अशी कंपोझिशन आहे.. आणि आल्हाद काशीकर यांनी अतिशय मन लावून ही गझल त्यांच्या सुकुनभऱ्या आवाजात गायली आहे. आत्मस्तुतीचा दोष पत्करुन सांगते मी अक्षरश: हजारो गझला ऐकल्या आहेत. आणि मला त्या तोंडपाठ आहेत. कोणी विचारलं की सगळ्यात आवडती गझल कोणती तर मी निर्विवाद ‘किसी पर दिल के आने का’ ही गझल सांगेन… कारण त्यातील आशावाद आणि तुळजापूरकरांनी ज्या Background वर ही गझल लिहली आहे ती पार्श्वभूमी… क़ैफी आज़मींच्या शब्दात…
जिस तरह से हंस रहा हूं मैं पी पी के अश्क़ो ग़म
कोई दुसरा हसे तो कलेजा निकल पड़े… असं आहे ते…
तुम्ही दु:खात असाल तर ही गझल सांत्वना आहे, तुम्ही विरहात असाल तर दिलासा आहे आणि वर्तमानात अपयशी असाल तर भविष्यातली यशाची आशा आहे… क्यूँ की, ‘’खुशी के लौट आने का कौई मौसम नहीं होता.. नए रिश्ते बनाने का कोई मौसम नहीं होता’’…
नवीन वर्षात खूप देखणी नाती तयार करा… प्रेमात पडा… पडा आणि पुन्हा उभे रहा… कारण ‘किसीपर दिल के आने का कोई मौसम नहीं होता’… शुभेच्छा!
*
किसी पर दिल के आने का, कोई मौसम नहीं होता
के हाले दिल सुनाने का, कोई मौसम नहीं होता
*
दरिचा एक कमसे कम, खुला रखिये सदा घर का
खुशी के लौट आने का, कौई मौसम नहीं होता
*
ज़रा हँस कर किसी से बात करने में बुरा क्या है?
नये रिश्ते बनाने का कोई मौसम नहीं होता
*
बता दे जो बताना है, अभी है वक़्त दीवाने
ज़ुबाँ पर बात लाने का, कोई मौसम नहीं होता…
– – – विश्वजीत तुळजापूरकर
लेखिका : वसुंधरा काशीकर
मुक्त पत्रकार, निवेदक आणि लेखक.
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “स्वतःच बना स्वतःची आई…” – लेखिका: डॉ. शुभदा गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक☆
☆
नमस्कार मी शुभदा गोडबोले. पेशाने मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. माझ्या 27 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे प्रत्येक माणूस वयाच्या कुठल्याही टप्प्यावर का असेना तो प्रेमाला मिस करतो. आता प्रेम म्हटल्यावर लगेच आपल्याला ते हिरो आणि हिरॉईनचं सिनेमामधलं प्रेम आठवतं. पण ते प्रेम नाही म्हणत मी. तर ज्याला आपण माया, ममता, वात्सल्य म्हणतो, ते आईचं प्रेम प्रत्येकाला आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्यावर हवं असतं.
थोडं स्वतःच्या आयुष्यात डोकावून बघा ना… मग तुमच्या लक्षात येईल की, मी काय म्हणते ते. कारण प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणीतरी खूपच प्रेमळ असतं, जे दुसऱ्यांसाठी खूप झटतं, त्यांची जीवापाड सेवा करतं, कारण त्याचा तो स्वभाव असतो. त्याला ते जमतं. ती व्यक्ती स्वतःचे छंद, आवडी निवडी बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी झटते (आणि जास्त करून घरातली स्त्रीच हे करत असते.) पण पुरुषही थोड्या फार प्रमाणात असे असलेले आपण पहातो.
तर सांगायचा मुद्दा हा की, त्या व्यक्तीला दुसऱ्यांकडून तितकसं अटेंशन मिळत नाही. तिला नेहमी गृहीत धरलं जातं. ती व्यक्ती त्याची फिकीरही करत नाही, पण एखादी वेळ अशी येते की, त्या व्यक्तीलाही प्रेमाची गरज असते. मग त्या व्यक्तीला एकाकी वाटतं आणि कुठे तरी आधार हवा, असं वाटतं.
ह्या मनाच्या अस्वस्थतेमुळेच काही व्याधी निर्माण होतात उदा : ऍसिडिटी, डोकेदुखी, डिप्रेशन, रक्तदाब, मधुमेह वगैरे…
तर ह्याला उपाय एकच आहे की, तुम्हीच तुमची आई व्हा. जसं प्रेम तुम्ही तुमच्या मुलांवर, नातवांवर करता तसं स्वतःवर करायला शिका. कारण प्रेम करणं, हा तुमचा स्वभाव आहे. मात्र स्वतःकडे प्रेमाने पाहायला तुम्ही विसरून गेला आहात, आणि सगळं प्रेमाचं भांडं दुसऱ्यांवर ओतता आहात.
एखाद्या स्त्रीची कंबर खूप काम करून दुखली, किंवा गुडघा दुखला तरी ती स्त्री त्या अवयवाचा राग करते आणि ‘काय मेलं झालं ह्याला दुखायला, ‘ असं म्हणून ती अपेक्षा करते की, नवऱ्याने किंवा मुलांनी तरी विचारावं की ‘दमलीस का?’ काही बाम वगैरे लावून देऊ का.. एक तर मूव्हची जाहिरात बघून अपेक्षा दुणावतात. पण प्रत्येक वेळी कोणी वेळ देईलच, असं नाही.
अशावेळी मनात कुढण्यापेक्षा स्वतःच स्वतःची आई बना. थोडा वेळ एकटं बसा, आणि दुखणाऱ्या भागावरून जमल्यास हात फिरवा.. आता पाठ दुखत असेल तरी डोळे मिटा आणि हात फिरवताना फील करा… स्वतःच्या शरीराकडे प्रेमाने बघा, आणि तुमच्या मुलाला किंवा नातवाला म्हणता ना… तसं म्हणा… काय झालं माझ्या बाळाला.. बरं नाही का?
आणि मग स्वतःच्याच डोक्यावरून हात फिरवा. दुखऱ्या भागाला थोडा वेळ गोंजारा.. आणि बघा जादू… दुखणं दूर पळतं की नाही. सुरुवातीला लाज वाटेल, पण हे मनातल्या मनात आपण आपल्याशीच बोलत असल्यामुळे कोणाला ऐकायलाही जात नाही, आणि खूप बरं वाटतं.
ह्या सगळ्यात भावना खूप महत्वाची आहे. तुमच्या मुला-नातवासारखं स्वतःबद्दल प्रेम निर्माण करा. तुम्हाला जो खाऊ खावासा वाटेल, तो सगळ्यांसाठी घेऊन या आणि त्यांच्यासोबत मनसोक्त खा. तुम्हाला आवडणारी भाजी आवर्जून बनवा आणि दुसऱ्यांसाठी काही वेगळं बनवा.
पण स्वतःची आई बना आणि स्वतःचे लाड करा. ते ही दुसऱ्यांना न दुखावता.
कारण हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही आणि मग आयुष्यात हे करायचं राहिलं, ते राहिलं… ह्याची खंत करून दुःख करण्यात काय अर्थ आहे? दुसऱ्यांसाठी प्रेमाचा सागर असणारे तुम्ही स्वतःच कोरडे राहिलात तर काय उपयोग.
विचार करा आणि एकदा का होईना, हे करून पहा. ह्या मुळे आपल्यावर एकटं राहायची वेळ आली, तरी आपली प्रॅक्टिस असते, मग डिप्रेशन येत नाही.
☆
लेखिका: डॉ. शुभदा गोडबोले
प्रस्तुती : शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈