मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पांढरीशुभ्र बनवाबनवी” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ “पांढरीशुभ्र बनवाबनवी” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

“बापाचं नाव? “

“येशा. मयत. ” 

‘धर्मा कोर्टाबिर्टात जाऊन आला असावा. त्याला ते सगळं माहिती होतं. ‘

पुलं ची म्हैस कथा ऐकली आहे का? त्यातला हा धर्मा मांडवकर. म्हशीचा मालक. कोर्टात, पंचनाम्यात काय काय विचारतात हे ठाऊक असलेला धर्मा मांडवकर आजच्या कौन बनेगा करोडपतीच्या दृष्टीनं टॅलेंटेड माणूस आहे. त्याच न्यायानं “चि. व चि. सौ. कां. ” चित्रपटातील टिल्ल्या आठवतो का? हा सुद्धा कौन बनेगा करोडपतीच्या दृष्टीनं टॅलेंटेड मुलगा आहे.

“रिॲलिटी शो” या नावाखाली जो प्रकार चालतो, तो जंगलात पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोरासारखा आहे. पिसारा फुलवून नाचणारा मोर फक्त पुढूनच पहायचा असतो, असं म्हणतात.

खूप वर्षांपूर्वी सारेगमप लिटिल चॅम्प्स ची पहिलीच आवृत्ती होती, त्यावेळची एक वारंवार केली गेलेली कृती आजही माझ्या लक्षात आहे. त्या लहान मुलांमध्ये एक मुलगा होता. गाण्यात कितपत कुशल होता हा आजही प्रश्नच आहे. त्याची आर्थिक परिस्थिती कशी बेताची आहे आणि तरीही तो इथपर्यंत कसा पोचला आहे यावर निवेदिका खुमासदार आणि प्रभावी निवेदन करत असे. मग अश्रू वाहत असणारे डोळे दाखवले जात. प्रेक्षक रडत असत. हा प्रकार खूप चालला. असो.

हिंदी सारेगमप मध्ये एकदा संगीतकार बप्पी लाहिरी परीक्षक म्हणून आले. ते येतानाच त्यांचा तबला सोबत घेऊन आले होते की काय? त्यांनाच ठाऊक. त्यांनी एका स्पर्धकाला त्यांचा तबला भेट म्हणून दिला, त्यांच्या गळ्यातली सोन्याची साखळी दिली. अभिनेत्री रेखा तर येताना घरूनच खाऊचा डबा घेऊन आल्या होत्या. स्पर्धकांना स्वतःच्या हातानं भरवत होत्या. स्पर्धा सुरु असताना असले प्रकार चालवले जातात, ते स्वाभाविक असतात की तो त्यांच्या स्क्रिप्टचा भाग असतो?

अनेकांनी हे स्पष्ट केलं आहे की, ‘रिॲलिटी शो’ हे नुसते नावालाच रिॲलिटी शो असतात. वास्तवात, त्यातली प्रत्येक गोष्ट हेतुपूर्वक आखूनच घडवून आणलेली असते. काही दिवसांपूर्वी प्रख्यात बासरी वादक श्री. अमर ओक यांच्या एका मुलाखतीत त्यांनी रिॲलिटी शो चं महाभयंकर खेदजनक आणि उबग आणणारं वास्तव सांगितलं आहे.

‘रिॲलिटी शो’ या प्रकारात अनेक तथाकथित आणि मुळातच अत्यंत भंपक प्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल आहे. सांगितिक स्पर्धा, नृत्य स्पर्धा, स्टँड अप कॉमेडी हे जसे आहेत तसेच ‘कौन बनेगा करोडपती’ सारखे कार्यक्रम सुद्धा याच श्रेणीत आहेत. ‘कॉमेडी शो’ मध्ये समीर चौगुले ऑफिसात परकर घालून येतो, तबला फोडतो, ए आर रहमानच्या गाण्याची टर उडवतो हे सगळं स्क्रिप्टेड असतं. स्क्रिप्टेड असतं म्हणजे काय? तर कुणाच्या तरी सुपीक (? ) डोक्यातून या कल्पना उगवलेल्या असतात. दिग्दर्शक नामक व्यक्ती अभिनेते आणि अभिनेत्री यांच्याकडून त्यानुसार काम करवून घेतात. ते सगळं चित्रिकरण एडिट केलं जातं. त्यातलं जेवढं दाखवून जास्तीत जास्त टीआरपी उकळता येईल तेवढंच दाखवलं जातं.

‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’, ‘डब्ल्यू डब्ल्यू एफ’, हे सुद्धा त्यातलेच प्रकार आहेत. चोवीस तास घरात कोंडून ठेवलेली माणसं कशी वागतात, याचा एपिसोड एका तासात दाखवतात. मग उरलेल्या तेवीस तासांमध्ये काय काय घडलं याची माहिती कुठंय? म्हणजे रिॲलिटी शो या नावाखाली अत्यंत प्रामाणिकपणे, शुद्ध, निर्भेळ फसवणूकच करण्याचा धंदा चालतो.

एका कॉमेडी शो मध्ये गौरव मोरे या अभिनेत्याच्या तोंडी “अरे म्हाताऱ्या, फ्रिज उघडला तरी तुझी कोळंबी होते” हे वाक्य आहे. त्यावर प्राजक्ता माळी, प्रसाद ओक, सई ताम्हणकर हे गडाबडा लोळून हसताना दाखवले आहेत. जर हा खरा विनोद असेल आणि इतका हसण्यासारखा असेल तर प्रसाद ओकांच्या मुलानं त्यांना असं म्हटलेलं चालेल का? प्राजक्ता माळी वैयक्तिक आयुष्यात हा डायलॉग वापरेल का? बाकीच्यांचं सोडा, गौरव मोरे तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात असे डायलॉग वापरेल का? नाही ना..

इथेच सगळ्यांना वेड्यात काढून शो ची चर्चा वाढवून त्या मुलाच्या व्हिडिओला व्हायरल करण्यात ‘कौन बनेगा करोडपती’ची पब्लिसिटी टीम यशस्वी झाली आहे. हा संपूर्ण शो स्क्रिप्टेड आहे. प्रत्येकाच्या तोंडचं प्रत्येक वाक्य आधीच ठरवून लिहिलं गेलेलं आहे.

टॅलेंटेड मुलांसाठी ”कौन बनेगा करोडपती’ची ही विशेष मालिका सुरु आहे. ही मालिका लाईव्ह नाही. रेकॉर्डेड आहे. इशित भट्ट हा मुलगा इयत्ता पाचवीत आहे. वयाच्या सहाव्या वर्षी पहिलीत घातलं असेल तर आता त्याचं वय किती असेल? दहा वर्ष तरी असेलच. दहा वर्षं वयाच्या मुलाला लाखो रुपयांच्या बक्षिसासाठी कोणते प्रश्न विचारले गेले, हे पाहा – 

१) दिलेल्या संख्यांचा उतरता क्रम लावा. (हा होता निवडीचा प्रश्न)

२) सकाळी जो आहार घेतात त्याला काय म्हणतात? उत्तर आहे नाश्ता. हे उत्तर दिल्यावर मिळणार पाच हजार रुपये.

३) दुसरा प्रश्न दहा हजार रुपयांसाठी. चित्रात एक कुलूप दाखवलं आहे. आणि प्रश्न आहे की, चित्रात दाखवलेल्या वस्तूचा उपयोग सांगा.

४) तिसरा प्रश्न पंधरा हजार रुपयांसाठी. टँगो, कथक आणि ब्रेक हे कशाचे प्रकार आहेत?

५) चौथा प्रश्न वीस हजार रुपयांसाठी. बुद्धिबळाच्या पटावर खेळाच्या सुरुवातीला किती राजे असतात?

पाचवा प्रश्न पंचवीस हजार रुपयांसाठी विचारला गेला आणि तिथे हा इशित भट्ट चुकला. तो चुकला की, त्याला चुकायला लावलं हा सुद्धा एक प्रश्न आहे. कदाचित प्रसिद्धी मिळवायला चार प्रश्नांची प्रसिद्धी पुरेशी होईल असं वाटल्यावर हा प्रकार आवरता घ्यायचा अशी योजना ठरलेली असेल. कारण ही परीक्षा नव्हती, हे पूर्ण मनोरंजन होतं. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट..! बस्स..!

देशभरातून निवडण्यात आलेल्या टॅलेंटेड मुलांना हजारो रुपयांसाठी या अशा दर्जाचे प्रश्न विचारले जातात? तिसरीच्या ज्ञानपीठ परीक्षेत किंवा चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेतले प्रश्न पहा आणि स्कॉलरशिपची रक्कम पहा. हजारो रुपयांसाठी असले फालतू प्रश्न विचारुन त्यालाच टॅलेंटेड मुलगा म्हणण्याचं पिल्लू सोडून मजा बघण्याचा हा धंदा आहे. इशित भट किंवा त्याच्यासारखीच सो कोल्ड टॅलेंटेड मुलं मुली निवडली जातात की मुद्दाम योजली जातात? हा प्रश्न कुणालाच कसा काय पडत नाही? ‘कौन बनेगा करोडपती’ची “टॅलेंटेड” या शब्दाची व्याख्या नेमकी काय आहे?

“अशी ही बनवाबनवी” पहिल्या डायलॉग पासून शेवटपर्यंत तोंडपाठ असलेली शेकडो मुलंमुली आमच्या पिढीत होती. आजही त्या सिनेमाचे बहुतेक सगळे कॉमेडी संवाद बऱ्याच जणांना पाठ आहेत. पुलं च्या कॅसेट्स पाठ आहेत. म्हणजे ही सगळी माणसं टॅलेंटेड झाली का? एखादा सिनेमा दहा वेळा पाहिला की डायलॉग पाठ होतात. त्यात टॅलेंट असतं का? कुठेही हा सिनेमा लागला की, कुणीही माणूस अगदी उत्स्फूर्तपणे यातले संवाद अचूक म्हणू लागतो, याला टॅलेंट म्हणायचं का?

आज इशित भट च्या संस्कारांविषयी आणि पालकांविषयी भरभरून बोललं जातंय. पण मग ह्याच इशित भट च्या वयाची एक छोटी मुलगी अशाच एका रिॲलिटी शो स्पर्धेत “ही पोरगी साजूक तुपातली” हे गाणं गायली तेव्हा संस्कारांविषयी का बोललं गेलं नाही? परीक्षकांनी “हे गाणं तुझ्या वयाला योग्य नाही” असं का म्हटलं नाही?

महाराष्ट्रात गौतमी पाटील नामक एक कलावंत बाई आहेत. त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्या लहान मुलामुलींना स्टेजवर बोलावतात आणि त्यांना स्वतःसारखं नाचायला लावतात. त्याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतात. त्यावेळी या लहान मुलांच्या संस्कारांविषयी काहीच बोललं जात नाही?

एका नामांकित शाळेच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाला गेलो होतो. तिथं लहान गटातल्या मुलांचा “लव्ह इज वेस्ट ऑफ टाईम” या गाण्यावर डान्स बसवला होता. पालक मोठ्या कौतुकाने शूटिंग करत होते. शिक्षक टाळ्या वाजवत होते. त्यावेळी संस्कारांचा विचार कुणाच्याच मनात कसा काय आला नाही? हे सगळं एक नागरिक म्हणून प्रत्येकानं विचार करण्यासारखं आहेच.

मनोरंजनाच्या नावाखाली वाट्टेल तशा स्क्रिप्ट लिहिल्या जातात आणि कुणाच्याही तोंडून त्या वदवून घेतल्या जातात, हे मनोरंजन क्षेत्रातलं उघड सत्य आहे. “इतक्या लहान वयात अमिताभ बच्चन समोर बसायला मिळतंय हे त्या मुलाचं भाग्यच आहे आणि तो अमिताभ बच्चनशी असं बोलला” हे लोकांच्या दुखावण्याचं खरं कारण आहे.

” तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका”, “मला लेक्चर देऊ नका”, “मला अक्कल शिकवू नका” हे घरोघरी आपल्याच मुलांच्या तोंडून रोज ऐकून घेणारे पालक आहेत. त्यांचं काय? जर खरोखरच त्या मुलानं स्वतःहून अमिताभ बच्चन यांच्याशी असं वर्तन केलं असतं तर काय झालं असतं, याचा विचार करा. असं झालं असतं तर, त्याचा हा एपिसोडच आला नसता. वाहिनीने त्या मुलाला काढून टाकलं असतं. पण तसं झालेलं नाही. उलट हा एपिसोड मुद्दाम दाखवण्यात आला आहे.

दारु पिऊन कॉलेजच्या प्राचार्यांच्या बंगल्याबाहेर लघुशंका करणारा राजू रस्तोगी लोकांनी सहकुटुंब सहपरिवार सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहिला आहे. एका जाहीर कार्यक्रमात भाषणातले शब्द बदलून अर्थाचा अनर्थ करुन कार्यक्रम कसा उधळता येतो, हे लोकांना सिनेमा थिएटरमध्ये मोठ्या आकर्षक पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. अशी हजारो उदाहरणं इथं सांगता येतील. पण तात्पर्य हेच आहे की, मुलाचं वागणं चुकीचं ठरवलं गेलंय, कारण तो अमिताभ बच्चनशी तसं वागला आहे. तो अन्य घरातल्या अन्य कुणाशी असा वागला असता तर मीडियानं त्याच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असतं का? एका रात्रीत ऐंशी हजार रुपये दारूवर उडवून, अडीच कोटी रुपयांच्या गाडीने दोन जणांना उडवून मारणाऱ्या मुलाच्या बाबतीत हा कौटुंबिक संस्कारांचा मुद्दा मिडिया का लावून धरत नाही?

प्रश्न अनेक आहेत, कितीतरी आक्षेप आहेत. मनोरंजन आणि ज्ञानरंजन हे दोन वेगळे विषय आहेत. पण “मनोरंजनातून ज्ञान मिळतं” या खुळचट थेरापायी, कोट्यवधी प्रेक्षकांना नादी लावून स्वतःच्या आर्थिक लाभाची तुंबडी भरुन घेणाऱ्या वाहिन्यांना, स्क्रिप्ट रायटर्सना, दिग्दर्शकांना कुणीच धारेवर का धरत नाही, हा खरा प्रश्न आहे. या सगळ्या प्रकरणात इशित भट हा तर एक कठपुतळी आहे. त्या कठपुतळीच्या दोऱ्या भलत्याच कुणाच्या तरी हातात आहेत. ती बाहुली नाचवून पैसे गोळा करणारा भलताच कुणीतरी आहे. आणि या खेळाला सत्य मानून प्रेक्षक फसले आहेत…!

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र २६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

फलरूपत्वात् ॥ २६ ॥

अर्थ : पराभक्ती स्वतःच फलस्वरूप असल्याने ती कर्म ज्ञान,  योग यापेक्षा श्रेष्ठ आहे.

विवेचन: मागील सूत्रात भक्ती ही कर्म-ज्ञान-योग यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगितले. कर्म-ज्ञान-योग इत्यादि साधनांना भक्तीची अपेक्षा आहे,  पण भक्ती ही स्वतः निरपेक्ष आहे. सहसा मनुष्याची विषय सेवनाकडे प्रवृत्ती असते. ती दूर करून मल म्हणजे पापवासना या दोषातून मुक्त होण्याकरिता वेदाने विहित कर्माचे विधान सांगितले आहे.

भक्ताचे चित्त सदैव भगवंताच्या ध्यानात,  चिंतनातच असते. ज्याची सर्व कायिक,  वाचिक,  मानसिक कर्मे भगवंताप्रीत्यर्थच होतात त्याला पुन्हा वेगळे विहित कर्म करण्याची आवश्यकताच काय?

संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात,

भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारूनि ॥०१॥

विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे जन धन माता पिता ॥०२॥

निर्वाणीं गोविंद असे मागेंपुढें । कांहींच सांकडें पडों नेदी ॥०३॥

तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साह्य । घातलिया भय नर्का जाणें ॥०४॥

(संदर्भ: अभंग क्रमांक ७४८,  सार्थ तुकाराम गाथा,  धार्मिक प्रकाशन संस्था)

जो अखंड नामस्मरणात आहे,  त्याच्या प्रत्येक क्षणावर नामाची सत्ता काम करीत असते,  तो श्वास घेताना नाम घेतो,  श्वास सोडताना नाम घेतो,  नव्हे श्वास म्हणून नाम घेत आणि नामच बाहेर सोडत असतो….! अशी स्थिती अन्य मार्गांमध्ये येईलच असे नाही,  पण भक्तिमार्गात मात्र खात्रीनं येऊ शकते,  असे नारद महाराज आपल्याला सांगत आहेत. संत तुकाराम महाराज आपल्याला वरील अभंगात त्याची साक्ष देतात.

भक्तीचे अनेक मार्ग आहेत. आपण उदा. म्हणून नामस्मरण भक्ति पाहू. नाम घेणारा मनुष्य सुरुवातीला नाम घेऊ लागतो,  त्यावेळी तो निव्वळ नाम घेत असतो. जसजशी त्याच्या मनात नामाची व्याप्ति आणि खोली वाढू लागते,  तसतसे त्याचे स्मरण दृढ होऊ लागते. एकवेळ अशी येते की नाम सुद्धा सुरू असते आणि त्याचवेळी स्मरणही असते. तो साधक ज्याचे नाम घेत असतो,  त्या आराध्याचे,  सद्गुरुंचे सान्निध्य त्याला जाणवू लागते. याची परमोच्च सीमा अशी असते की सर्व सदगुरूच सर्व करत आहे आणि हा निवांत बसला आहे… (असा साधक देहाने सर्व कर्म करीत असतो,  पण त्याच्या चित्तात मात्र अतिव शांतता,  स्थिरता असते…!)

संत कबीर एका ठिकाणी म्हणतात,

“माला जपूँ ना कर जपूँ,  मुख से कहूँ ना राम राम हमारा हमें जपे है,  हम पायो विश्राम ।”

…. आता मला सांगा,  ज्याचा जप स्वतः भगवंत करतो,  (विचार केला तर तोच सर्व काही करत असतो,  त्याची जाणीव साधना केल्याने होत असते…..) त्याला कसली ददात?

इथे भक्ति हेच साधन आणि साध्य असते. सर्व संत म्हणून भगवंताकडे मागणी करतात की जन्मोजन्मी आम्हाला गर्भवास दे आणि तुझ्या नामाचे प्रेम दे. कारण तुझी भक्ति करताना होणारा आनंद तुला सुद्धा कळणार नाही. मुक्ति दिलीस तर तुझी भक्ति करता येणार नाही देवा!!

हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥२॥

न लगे मुक्ती आणि संपदा । संतसंग देई सदा ॥३॥

तुका म्हणे गर्भवासीं । सुखें घालावें आह्मासी ॥४॥

(संदर्भ: अभंग क्रमांक २२२२,  सार्थ तुकाराम गाथा,  धार्मिक प्रकाशन संस्था)

भक्ती ही केवळ आनंदाचे साधन नसून ती स्वतः आनंदरूपच आहे; म्हणजे साध्यस्वरूप,  पुरुषार्थस्वरूप म्हणून फलस्वरूप आहे. भक्ति म्हणजे बीज,  कोंब,  रोपटे,  झाड,  फांद्या,  पान,  फुल,  फळ आहे….! सर्व एकच आहे. भक्तीचे बीज रोवले की यथावकाश भक्तीची फळे खात्रीने मिळणार….!

संत एकनाथ महाराज सांगतात,

भावें करितां माझी भक्ती । भाविकां कोण पां अप्राप्ती । विवेकवैराग्यज्ञानसंपत्ती । पायां लागती मद्भक्तांच्या ॥ ४०४ ॥

माझे निजभजनें तुटे भेद । स्वयेंचि प्रकटे अभेदबोध । तेणें वोसंडे परमानंद । स्वानंदकंद स्वयंभ ॥ ४०५ ॥

(संदर्भ एकनाथी भागवत अध्याय २६)

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. – २६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “दुर्जनांवर चालून जाणारा सज्जन सुभेदार सैनिक!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “दुर्जनांवर चालून जाणारा सज्जन सुभेदार सैनिक!” ☆ श्री संभाजी बबन गायके

सुभेदार सज्जन सिंग यादव

सुबाह म्हणजे एक प्रांत. हा शब्द मुघलांनी प्रचलित केला. पुढे याचे सुबा असे रूप झाले आणि या सुब्याची किंवा सुभ्याची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारा अधिकारी सुबेदार/सुभेदार म्हणून ओळखला जाऊ लागला. जीवाचे दान देऊन किल्ले कोंढाणा काबीज करून दाखवणारे तानाजी मालुसरे हे सुभेदार या महत्त्वाच्या आणि मानाच्या पदावर होते,  हे आपल्याला ठाऊक आहे.

१८६६ पर्यंत भारतातल्या ब्रिटीश सैन्यात एक शिपाईगडी पोहोचू शकेल असे हे सर्वोच्च पद होते. भारतीय सैन्याने हे पदनाम विशिष्ट अर्थाने कायम ठेवले असले तरी आता संदर्भ बदलला आहे. पण या पदावर पोहोचणे काही सोपे काम नाही. वयाच्या साधारण १८व्या वर्षी एखादा तरुण ‘जवान’ म्हणून सैन्यात भरती होतो तेंव्हा त्याला शिपाई संबोधन असते. (not to be confused with the peon= शिपाई in Marathi language! ) पाच वर्षांनी हे शिपाई लान्स नायक,  आणखी चार-पाच वर्षांनी नायक आणि आणखी पाच-सहा वर्षांची उत्तम सेवा बजावल्यावर हवालदार पदी बढती मिळू शकते. हवालदार यांना दहा सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व करण्याची संधी मिळते. हवालदार हे N. C. O. अर्थात नॉन कमिशन्ड ऑफिसर्स म्हणून संबोधले जातात. इथपर्यंत आपल्या या सैनिकाची सुमारे पंधरा वर्षांची सेवा झालेली असते. बहुतांश जवान सतरा वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होतात. हवालदार पदाच्या पुढची पदे प्राप्त करणारे J. C. O. अर्थात ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स होऊ शकतात… अर्थात अनेक परिक्षांमधून तावून सुलाखून निघाल्यावरच…. ’साहब’ या संबोधनास पात्र ठरतात! नायब सुबेदार ते सुबेदार आणि अखेरीस सुभेदार मेजर अशी ही बढती असते. , , ,  हे JCOs सुमारे तीस ते चाळीस सैनिकांची तुकडी सांभाळण्याची जबाबदारी खांद्यावर घेतात. या पदापर्यंत पोहोचता पोहोचता या सैनिकांनी अनेक सशस्त्र संघर्ष पाहिलेले असतात,  लढाया लढलेल्या असतात,  खात्यांतर्गत अनेक परीक्षा दिलेल्या असतात… थोडक्यात सैनिक ते सुबेदार ही मोठी मजल असते! सुबेदार साहब आपल्या सैनिकांच्या कल्याणाची काळजी वाहतात,  वरिष्ठ आणि आपले सैनिक यांच्यात समन्वय राखतात,  शिस्त पाहतात,  प्रशिक्षण सांभाळतात…. आणि मुख्य म्हणजे प्रत्यक्ष लढाईत पुढे राहून नेतृत्वही करतात…! आपले आजचे कथानायक सुबेदार पदी कार्यरत होते. यांना लहानपणापासून केवळ सैनिकच व्हायचे होते. शालेय वयात हॉकी खेळाचे वेड होते. भरतीयोग्य वयात येताच साहेब थेट सेनेत भरती झाले आणि ‘जवान’ बनले. तीस मार्च १९५३ रोजी जन्मलेले सज्जन सिंग यादव अठरा वर्षे एक महिना आणि अठ्ठावीस दिवसांनी म्हणजे सत्तावीस मे १९७१ रोजी भारतीय सैन्यात दाखल झाले होते… १३,  कुमाउ रेजिमेंट!

लगेचच त्यांनी १९७१ची भारत-पाक लढाई लढली… भरतीनंतर केवळ सहाच महिन्यांत हे सोनं आगीत जोखलं गेलं होतं. अंगभूत शौर्य,  उत्तम संवाद कौशल्य,  प्रामाणिकपणा,  प्रशासन कौशल्य आणि एकूणच सैनिकी जीवनाबद्दल कमालीची आस्था असलेल्या या सैनिकाला पराक्रम खुणावत असे. विविध सीमा,  विविध जबाबदा-या सांभाळत सांभाळत साहेब चाळीशी पार करते झाले. आणि सव्वीस सप्टेंबर,  १९९४ हा दिवस उजाडला. साहेब त्यावेळी कुपवाडामध्ये तैनात होते. अनेक अतिरेक्यांना त्यांनी यमसदनी धाडण्यात यश मिळवले होते. त्यादिवशी तर फार मोठी खबर होती. पाच अतिरेकी.. त्यात काही स्थानिक तर काही पाकिस्तानी जलुराह गावाजवळ असलेल्या एका अत्यंत घनदाट,  डोंगरी भागात लपून बसलेले आहेत… आणि कधीही भारतीय सैन्यावर हल्ला करण्याच्या बेतात आहेत… ते हल्ला चढवण्याची वाट न पाहता…. त्यांचा शोध घेऊन त्यांना नष्ट करणे आवश्यक होते. ऑपरेशन म्हणजे अत्यंत नियोजनपूर्वक,  धोक्याची कल्पना आणि तयारी ठेवून केली गेलेली कृती… जिची फलश्रुती निश्चित असते… बलिदान गृहीत धरलेले असते! सैनिकाच्या भाषेत ‘नुकसान’ म्हणजे बलिदान! ऑपरेशन ईगल सुरु झाले. बिळात लपलेल्या कालसर्पांना शोधून टिपण्यासाठी गरुड निघाले.

युद्धाक्षेत्राची समुद्रसपाटीपासूनची उंची ५३०० फूट… पाकिस्तान व्याप्त काश्मीरची सीमा अगदी खेटून… अर्थात पाकिस्तानी कीटक आपल्या सीमेत घुसू शकण्याची शक्यता प्रचंड… कारण इथलं जंगल या कीटकांना आश्रय देतं… पोसत राहतं…. फुटा-फुटावर पहारा ठेवणं अशक्य असतं… तरीही डोळ्यांत तेल घालून रात्रं-दिन युद्धाचा प्रसंग मनात चितारला जातो…

हे पाच-सहा अतिरेकी लपले होते ती जागा म्हणजे उभी चढण असलेला पहाड… त्यांच्या लपण्याच्या ठिकाणाच्या सर्व बाजूंना दाट झाडी. वेडावाकडा वाहणारा नाला… मात्र त्यांच्या अड्ड्याशेजारी मोकळी जागा… जिथून ते झाडीतून त्यांच्या दिशेला येऊ पाहणारी हालचाल सहज टिपू शकायचे. वरिष्ठ अधिका-यांनी योजना आखली… सहकारी अधिकारी,  कनिष्ठ अधिकारी यांनी ती समजावून घेतली. ठरल्याप्रमाणे वीर निघाले. काही सैनिक पायी तर काही वाहनामधून त्या जागेला वेढा घालायला सरसावले. रात्र संपता संपता शोध सुरु करायचा होता…. पहाडाच्या वरच्या बाजूने खाली येत येत सर्व जंगल पिंजून काढायचे होते. तोवर वाहनातून आलेले सैनिक त्या भागावर वेढा आवळत आणणार होते.

सकाळचे नऊ वाजलेले… सुभेदार सज्जन सिंग यादव…. आपल्या सैनिकांचे नेतृत्व करीत सर्वांत अग्रभागी… कित्येक वर्षांची अनुभवी पावले जंगल तुडवत होती…. सज्जनसिंग साहेबांचा भेदक नजरेने दोन अतिरेकी पाहिले….. साहेब सावध पावलांनी पुढे सरकत राहिले… केवळ दहा मीटर्सचे अंतर राहिले…. अतिरेक्यांनी साहेबांना पाहिले आणि धडाधड गोळीबार सुरु झाला…. त्यांचा नेम काही चुकत नव्हता…. अतिरेकी केवळ याचाच तर सराव करीत असतात… त्यांना पाकिस्तानी सैन्य प्रशिक्षित करीत असते. सज्जन सिंग साहेबांनी आडोसा घेतला आणि जवाबी फायरींग आरंभले. तेवढ्यात त्यांनी पाहिले… कॅप्टन केकेएस कोयराह साहेब आणि त्यांचे साथीदार सैनिक त्याच दिशेने पुढे पुढे येत होते…. काहीच क्षणांत ते सर्व त्या अतिरेक्यांच्या अचूक गोळीबाराच्या टप्प्यात पोहोचतील… आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता…. छातीचा कोट केला तरच कॅप्टन साहेब आणि अन्य सहकारी बचावू शकतील…. सज्जन सिंग साहेब हातात्तील रायफल सरसावत त्या गोळीबाराच्या पावसात नहायला सज्ज झाले… दुसरा पर्याय नव्हता…. शिपाई मुकेश चंद यांना कवर फायर देण्याची आज्ञा दिली आणि सज्जनसिंग यांनी पुढे मुसंडी मारली…. कवर फायर तुटपुंजे होते… पहिल्या अतिरेक्याच्या अगदी पाच मीटर्स अंतरावर पोहोचू शकले… गोळीबाराची एक सबंध फैर पोटात घुसली…. कवर फायर देणा-या मुकेश चंद यांनाही गोळ्या लागल्या…. सज्जन सिंग साहेब तसेच पुढे जात राहिले… रायफल आग ओकत राहिली….. एक न अर्धा…. पाचही कीटक खतम झाले… जणू आगीच्या एका मोठ्या गोळ्याने शत्रूची शेकोटी विझवून टाकली होती…. राख उरली होती फक्त… हिजबुलचा बटालियन कमांडर इम्तीयाज ही एक मोठी शिकार होती! मरणा-या अतिरेक्यांनी त्यांच्या जीवाच्या आकांताने झाडलेल्या काही गोळ्या सज्जनसिंग साहेबांचे हेल्मेट भेदून डोक्यात शिरल्या…. आता जीव वाचणार कसा?

तिथे तीन एके-५ रायफली,  एक स्नायपर रायफल,  असंख्य काडतुसे,  हातगोळे,  रेडीओ सेट असा मोठा शस्त्रसाठा होता. याच शस्त्रांनी हल्ला करण्याची संधी ते अतिरेकी शोधत होते… सज्जन सिंग साहेबांनी त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले…. स्वत:च्या जीवाची कुरवंडी करून! हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेबांच्या मातोश्री जिजाऊ साहेबांनी राजांन कोंडाणा घेतला पाहिजे अशी इच्छा प्रकट केली…. राजांचे सुभेदार तानाजीराव थेट उदयभानुला भिडले…. पडले पण शत्रूला धुळीस मिळवूनच. त्यांच्याच पराक्रमाची याद यावी असा सुभेदार सज्जन सिंग यादव साहेबांचा पराक्रम…. मृत्यूकडे झेप घेणारा… आणि अंती विजयश्री खेचून आणणारा!

दुर्जनाचा कर्दनकाळ ठरलेल्या या सज्जन सैनिकाच्या स्मृतींना वंदन. जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ धैर्य आणि करुणेची कथा…  ☆ अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

☆ धैर्य आणि करुणेची कथा…  ☆ अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

(विविध माध्यमांतील इंग्रजी व हिंदी भाषेतील माहिती एकत्रित करून मराठी भाषांतर) 

जीवनाच्या धावपळीत, जिथे अनेकदा गोंधळाचे वातावरण असते, तिथे असे काही क्षण येतात जे आपल्याला मानवी करुणेच्या आणि जलद विचारसरणीच्या असाधारण शक्तीची आठवण करून देतात. असाच एक क्षण व थरार नाट्य रेल्वेच्या एका फलाटावर बघायला मिळाले.

रेल्वे स्थानकावर बहुतेक लोक फक्त तिथून जात असतात, त्यांचे डोळे घड्याळावर असतात, मन दुसरीकडे असते, घरी जात असते किंवा त्यांना कुठेतरी जायचे असते. झाशी स्थानकानेही, इतर कोणत्याही स्थानकाप्रमाणे, अशा हजारो कथा येता-जाता पाहिल्या आहेत. पण ५ जुलै २०२५ च्या दुपारी, ते क्षणभर थांबले. आणि त्या क्षणी, काहीतरी अनपेक्षित घडले.

भारतीय सैनिकांच्या स्वास्थ्यासाठी व युद्धभूमीवर आपात्कालीन वैद्यकीय मदत व औषधांमध्ये प्रशिक्षित आणि झाशीच्या लष्करी रुग्णालयात तैनात असलेले ३१ वर्षं वयाचे लष्करातील वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी मेजर रोहित बचवाला हे ५ जुलै २०२५ रोजी, त्यांच्या गावी, हैदराबाद येथे आपल्या कुटुंबियांकडे एक महिन्याच्या रजेवर जाण्यासाठी विरांगणा लक्ष्मीबाई झांशी रेल्वे स्थानक येथे त्यांच्या गाडीची प्रतिक्षा करीत होते. त्यावेळी ते सैन्याच्या गणवेशात ही नव्हते किंवा त्या वेळेस कुठल्या कर्तव्यावर जाण्यासाठी नियुक्त ही नव्हते. इतर प्रवाशांप्रमाणेच सोबत बॅग घेऊन घरच्यांच्या भेटीला आतुर, त्यांच्या आठवणीत मग्न असे साधे प्रवासी होते.

मेजर रोहित बचवाला हे भारतीय हवाई दलातून स्काय डायव्हिंग प्रशिक्षक म्हणून निवृत्त झालेले लघु चक्रधारी (ज्युनिअर वारंट ऑफिसर) बी. आर. विनोद यांचे चिरंजीव आहेत. कुटुंबाच्या संरक्षण क्षेत्रातील देशसेवेची परंपरा ते अभिमानाने पुढे चालवत आहेत.

रेल्वे स्थानकावर पनवेल गोरखपूर एक्स्प्रेस (15066) ने उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे जाण्यासाठी प्रवास करीत असलेल्या अश्वरफलक कुरेशी नावाची महिला तिच्या कुटुंबासोबत प्रवास करताना तिला अचानक तिव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिचे पती मुहम्मद जुबेर कुरेशी यांनी रेल मदत ॲपद्वारे एसओएस पाठवला होता आणि उत्तरादाखल रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना झांशी येथे उतरण्यास सांगीतले होते. तेथे तिला वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न करणार होते.

एका गर्भवती महिलेला तीव्र प्रसूती वेदना होत असल्याचे दिसल्याने व जवळपास कोणतेही रुग्णालय नसल्याने परिस्थितीची गंभीरता ओळखून त्वरित हस्तक्षेप करीत मेजर रोहित बचवाला स्वयंस्फूर्तीने मदतीला धावले व कोणताही संकोच न करता, आणि जवळ कोणतेही वैद्यकीय उपकरण उपलब्ध नसताना, त्यांनी त्वरीत निर्णय घेऊन महिलेची यशस्वी प्रस्तुती करून खिशातील साध्या चाकूने नाळ कापली आणि केसांना लावण्याच्या चिमट्याने (क्लिपने) ती घट्ट बांधली. हे सर्व स्वच्छता आणि गोपनीयतेचे ध्यान राखत केले. त्यांच्या या जलद कृतीमुळे व वेळ न दवडता त्वरित निर्णय घेतल्यामुळे आणि मुख्य तिकिट पर्यवेक्षक लिली कुशवाहा व इतर महिला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने एका निरोगी कन्येला जन्म देण्यात ते यशस्वी झाले. सुरुवातीला बाळाने प्रतिसाद दिला नाही पण डॉ. रोहित यांच्या प्रयत्नामुळे ते जीवनात परत आले. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.

या प्रक्रियेत एका महिलेला सुरक्षितपणे बाळंत होण्यास मदत करण्यासाठी फक्त खिशातील चाकू, केसांची क्लिप आणि धोतर वापरून त्यांनी एका सामान्य रेल्वे प्लॅटफॉर्मचे आपत्कालीन प्रसूती कक्षात रूपांतर केले.

मेजर रोहित यांच्या धाडसाचे देशभरातून कौतुक झाले. संरक्षण प्रमुखांच्या कौतुकापासून ते ऑनलाइन सार्वजनिक कौतुकापर्यंत, त्यांच्याविषयी “डॉक्टर सतत ड्युटीवर असतात, रजेवर असले तरीही” असे म्हटले गेले.

मेजर रोहित स्वतः म्हणाले की, “डॉक्टर म्हणून, आपण नेहमीच आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार असले पाहिजे, अगदी प्रवासातही. मी दोन जीव वाचवण्यास मदत करू शकलो हे मला मिळालेले आशीर्वाद आहेत असे मी मानतो. “

मुख्य तिकिट पर्यवेक्षक लिली कुशवाहा यांनी नंतर रुग्णालयात या कुटुंबाला भेट देऊन जेवण व बाळाला कपडे आणि इतर उपयोगी वस्तू देऊन सहृदयता व माणूसकी दर्शवली.

मेजर रोहित बचवाला यांची कथा ही केवळ वैद्यकीय कौशल्याबद्दलची नाही – तर निस्वार्थीपणा, समयसूचकता आणि प्रतिकूल परिस्थितीत मानवतेबद्दलच्या कणवेची आहे. ती आपल्याला आठवण करून देते की खरे नायक हे परिस्थिती परिपूर्ण होण्याची वाट पाहत नाहीत – ते त्यांच्याकडे जे काही उपलब्ध आहे ते घेऊनच प्रसंगाला सामोरे जातात.

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मेजर रोहित बचवाला यांना त्यांच्या असाधारण धैर्य आणि निस्वार्थ सेवेबद्दल सन्मानित केले. मेजर रोहितचे कौतुक करतांना ते म्हणाले की “हे भारतीय सैन्याच्या भावनेचे आणि सेवेचे एक उत्तम उदाहरण आहे. आपले सैन्य यासाठीच ओळखले जाते. ” ते पुढे म्हणाले की, “मेजर रोहितने जे केले ते केवळ कर्तव्य नव्हते तर ते मानवतेचे आणि सैन्याच्या खऱ्या परंपरेचे प्रतीक होते. भारतीय सैन्याचे सैनिक केवळ देशाची सेवा करत नाहीत तर ते सामान्य लोकांना प्रत्येक परिस्थितीत मदत करतात. “

मेजर रोहित यांच्या करुणेने त्या दिवशी दोन जीव वाचवले. त्यांची कहाणी ही आपल्या सर्वांना वेळप्रसंगी पुढाकार घेण्याची, उत्स्फूर्तपणे इतरांना मदत करण्याची आणि धाडसाला कधीही कमी लेखू नये यासाठी प्रेरणा देवो.

सैन्याला नावे ठेवणाऱ्यांनो, बघा जरा शौर्य, करुणा आणि व्यावसायिकतेचे हे खरे प्रदर्शन – मेजर रोहित यांचे हे कृत्य भारतीय सैन्याच्या सर्वोच्च मूल्यांचे प्रतिबिंब आहे.

जय हिंद। जय हिंद की सेना 🇮🇳

या लेखातील काही भाग तेलंगणा चे माजी सैनिक वुज्जीनी रविंद्र राव यांच्या फेसबुक वाॅल वरून व इतर सैनिकी आणि सामाजिक माध्यमांतून हिंदी व इंग्रजी भाषेतील माहिती एकत्रित करून भाषांतरीत केली आहे.

मराठी अनुवाद व प्रस्तुती : मेघःशाम सोनवणे, नाशिक.

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पाऊणशे वर्षापूर्वीची पुणेरी विद्यार्थ्यांची दिवाळी – – ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पाऊणशे वर्षापूर्वीची पुणेरी विद्यार्थ्यांची दिवाळी – –‘ ☆ श्री दिवाकर बुरसे

अदमासे सत्तर-पंच्चाहत्तर वर्षापूर्वी पुण्यात दिवाळीच्या आधी घरपोच फटाके आणि दिवाळीच्या अभ्यंगाचे साहित्य उदा. सुगंधी तेले, उटणी, अत्तरे, उदबत्त्या वगैरे विकण्याचे काम विद्यार्थी उत्साहाने करत असत. त्यावेळी ‘पाॕकेट मनी’ ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. मुलांना सहसा हातखर्च करावासा वाटत नव्हता. त्यांच्यासमोर फारशी प्रलोभने नव्हती. पालकही त्याला प्रोत्साहन मिळेल असे वागत नव्हते.

दिवाळीच्या आधी काही दिवस मुले वही पेन घेऊन घरोघर फिरून ऑर्डरी घेत. ग्राहकांच्या एकूण मागणीनुसार घाऊक बाजारातून माल खरेदी करून तो नंतर घरोघर पोचवला जात असे. यात आगाऊ नोंदणी, मालाची खरेदी, मागणीप्रमाणे प्रत्येक ग्राहकाच्या सामानाचे स्वतंत्र संच करणे, पॕकिंग, वितरण इ. प्रक्रियांचा समावेश असे.

ह्यात केवळ होतकरू, गरीब विद्यार्थीच असत असे नाही. सुस्थितीत असलेल्या घरांमधली मुलेही हा व्यवसाय करत. त्यांचे पालक याला प्रोत्साहन देत. शाळांमधून यासाठी उत्तेजन दिले जायचे. मुलांच्या या उद्यमशीलतेला प्रतिष्ठा होती.

यातून मुलांमध्ये धीटपणा, वाणिज्य, व्यवहारचातुर्य, संभाषणचातुर्य, पैश्यांची हाताळणी, हिशेब ठेवणे, प्रामाणिकपणा, समयाचे नियोजन व महत्व, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, उद्यमशीलता, स्वाभिमान, स्वयंपूर्णता अशा अनेक चांगल्या जीवनोपयोगी सवयींचे व श्रेष्ठ जीवनमूल्यांचे प्रशिक्षण मिळत असे.

पुणे आणि पुणेकरांची टवाळी करणारांनी पुणेरी सर्वसामान्य पेठक-यांची शिक्षणाविषयीची जाण आणि भान लक्षात घ्यावे. पुण्याला ‘शिक्षणाची पंढरी’ का म्हणत असत ते समजून घ्यावे.

शुभ दीपावली!!!!!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अनंत कान्हेरे…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “अनंत कान्हेरे…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी

अनंत कान्हेरे!

वयाच्या १८ व्या वर्षी मातृभूमीसाठी आपल्या प्राणांचे बलीदान करणारे अनंत कान्हेरे!

कोकणातील एक युवक माध्यमिक शिक्षणासाठी संभाजीनगरला (औरंगाबादला) जातो काय, तेथे क्रांतीकार्यात भाग घेतो काय, त्याच्या हातात स्वा. सावरकरांनी लंडनहून पाठवलेले पिस्तुल पडते काय आणि तो एका कपटी आणि उच्चपदस्थ इंग्रजाचा वध करतो काय, सारेच अतक्र्य आणि अशक्य! पण हे अशक्य कृत्य शक्य करून दाखवणार्‍या युवकाचे नाव होते, अनंत लक्ष्मण कान्हेरे!

अनंतरावांचा जन्म १८९१ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आयनी-मेटे या गावी झाला. इंग्रजी शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाकडे औरंगाबादला गेले. काही वर्षांनी ते गंगाराम मारवाडी यांच्याकडे भाड्याची खोली घेऊन राहू लागले. नाशिकच्या स्वातंत्र्यवादी गुप्त संस्थेच्या काशीनाथ टोणपे यांनी गंगाराम आणि अनंतराव यांना गुप्त संस्थेची शपथ दिली. मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीच्या घेतलेल्या प्रतिशोधानंतर अनंतरावही अशा कृतीला अधीर झाले. मग गंगाराम यांनी एकदा अनंतरावांच्या हातावर तापलेला लोखंडी चिमटा ठेवून आणि एकदा पेटलेल्या चिमणीची तापलेली काच दोन्ही हातांनी धरायला सांगून त्यांची परीक्षा घेतली. दोन्हीही दिव्ये करूनही अनंतरावांची मुद्रा निर्विकार होती!

जॅक्सनला ठार मारण्याचा कट रचणे

याच सुमारास नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर आणि ढोंगी अधिकारी होता. त्याने खरे वकील, कीर्तनकार तांबेशास्त्री, बाबाराव सावरकर आदी देशभक्तांना कारावासात धाडले होते. अशा अनेक कुकर्मांनीच जॅक्सनने आपला मृत्यूलेख लिहिला. या कामी नियतीनेच अनंतरावांची निवड केली. जॅक्सनला ठार मारण्यासाठी अनंतरावांनी पिस्तुलाच्या नेमबाजीचा सराव केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी जॅक्सनला नीट पाहून घेतले. ‘जॅक्सनला मारल्यावर फाशी जावे लागेल, तेव्हा निदान आई-वडिलांकडे आठवणीसाठी आपले एखादे छायाचित्र असावे’; म्हणून त्यांनी स्वतःचे एक छायाचित्रही काढून घेतले.

जॅक्सनवर चार गोळ्या झाडल्या!

२१ डिसेंबर १९०९ या दिवशी जॅक्सनच्या सन्मानार्थ नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर नाटक मंडळींचा ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. जॅक्सन दरवाजातून नाट्यगृहात प्रवेश करत असतांनाच आधीच येऊन बसलेल्या अनंतरावांनी जॅक्सनवर गोळी झाडली. ती त्याच्या काखेतून निघून गेली. चपळाई करून अनंतरावांनी जॅक्सनवर समोरून चार गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच कोसळला. अनंतराव शांतपणे आरक्षकांच्या स्वाधीन झाले.

फाशीची शिक्षा

जॅक्सनवधाच्या आरोपाखाली अनंतराव आणि त्यांचे सहकारी अण्णा कर्वे अन् विनायक देशपांडे यांना फाशीची शिक्षा झाली. १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात सकाळी ७ वाजता हे तीन क्रांतीकारक धीरोदात्त वृत्तीने फाशी गेले. त्यांच्या नातलगांच्या विनंतीला न जुमानता ब्रिटीश सरकारने ठाण्याच्या खाडीकिनारी या तिघांच्याही मृतदेहांना अग्नी दिला आणि त्यांची राखही कोणाला मिळू नये, म्हणून ती राख खाडीच्या पाण्यात फेकून दिली.

वयाच्या १८ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणांचे बलीदान करणार्‍या हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्यासारख्या अनेकांच्या बलीदानांमुळेच आज आपण स्वतंत्र आहोत.

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मधुमती सूक्तम्… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मधुमती सूक्तम्‘ — भावानुवाद ☆ श्री दिवाकर बुरसे

मधुमती सूक्त” हे वैदिक साहित्यातील एक अत्यंत सुंदर आणि रहस्यमयी स्तुति है, ज्यात “मधु” अर्थात् मधुरता, आनंद आणि सौम्यतेचे गुणगान केले आहे. हे सूक्त ऋग्वेदातून घेतले आहे. विशेषतः ऋग्वेदाच्या नवम मंडलाशी (सोम मंडल) संबंधित आहे जिथे सोमरस आणि त्याच्या दिव्यतेचे वर्णन केले आहे.

आध्यात्मिक अर्थ

हे सूक्त “मधु” म्हणजे सकारात्मकता, शुभता आणि समरसतेची सर्वत्र कामना करते. ब्रह्मांडाच्या प्रत्येक अंगाने आमच्या जीवनात मधुरता आणि सौम्यता यावी. हे सूक्त मुख्यतः शांति, आनंद आणि संतुलनाची प्रार्थना आहे.

☆ मधुमती सूक्तम् ☆

(ऋग्वेद १/१०/६-९)

ॐ मधुवाता ऋतायत l। मधु क्षरन्तु सिन्धवः।

माध्वीर्नः सन्त्वोषधी। मधुनक्ततुतोषसि। मधुवत् पार्थिवं रजः। मधु द्यौरस्तुनः पिता। मधुमान्नोवनस्पतिः। 

मधु माँ अस्तु सूर्यः। माध्वीर्गावो भवन्तु नः।।

ॐ शांति शांति शांतिः।

भावानुवाद

समीर मंद मंदसे असेच नित्य वाहु दे।

सलील या नद्यांतुनी असेच गोड वाहु दे।

अशाच औषधी अम्हा रस मधूर देउ दे।

निशा-प्रभातही अशाच सौख्यदायि राहु दे।

अम्हासवे असेच लोक नम्र गोड वागु दे।

नीर सिंचुनी जगा नभ असेच रक्षु दे।

वृक्षवल्लरीतुनी रस मधूर वाहु दे।

नभातला रवी अम्हास रोगमुक्त ठेउ दे।

गोधने अम्हा सदा मधुर दूध देउ दे।

सौख्यदायि हे असेच सकल विश्व होउ दे।

ॐ शांति शांति शांतिः।।

भावानुवाद : श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “This is the Indian Army… Once again!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “This is the Indian Army… Once again!” ☆ श्री संभाजी बबन गायके

मेजर डॉक्टर रोहित बच्वाला

This is the Indian Army…. once again! We deliver!

जन्मगावापासून दूरच्या शहरात राहणारी ती पोटुशी बाळंतपणासाठी बहुदा माहेरी निघाली होती. नऊ महिने भरलेले होतेच… फक्त उरलेल्या नऊ दिवसांचा प्रश्न होता. निसर्गाचा हिशेब कुणाला कधी कळलाय का? तिला वाटलं होतं… बाळ घरी पोहोचल्यावर येईल या जगात त्याला हवं तेंव्हा. पण तसं व्हायचं नव्हतं. प्रत्येक जीवाची या जगात येण्याची घटका आणि स्थळही ठरलेलं असतं. जगाचा पोशिंदा नाही का कारावासात प्रगटला?

१५०६६ डाऊन पनवेल-गोरखपूर एक्स्प्रेस रेल्वेगाडीत तिला बी-३ बोगीत आसन मिळाले होते. सोबत अर्थात तिचे नातलगही होतेच. आणि तिला अस्वस्थ वाटू लागले. काहीतरी गडबड होणार असे ध्यानात येताच तिच्या नातलगाने भारतीय रेल्वेच्या रेल मदद या हेल्पलाईनवर तात्काळ मदत मागितली आणि झांशी रेल्वे स्टेशनवर आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली. वीरांगना राणी लक्ष्मीबाई रेल्वेस्टेशनवर डॉक्टर सुजित राय आणि त्यांचे वैद्यकीय साहाय्य पथक तयार झाले. गर्दीतून वाट काढत ही सेवाभावी मंडळी बी-३ बोगीत पोहोचली. डॉक्टर सुजित राय यांनी तिला तपासले आणि सांगितले की प्रवास इथेच थांबवा… कोणत्याही क्षणी प्रसूती होऊ शकते. पण तिच्या नातेवाईकांना वाटले की औषधे मिळाली तर त्याच्या जोरावर घरापर्यंत जाता येईल. परंतु डॉक्टरसाहेबांनी त्यांना समजावले. व्हीलचेअरवरून तिला लिफ्टपर्यंत आणण्यात आले. रेल्वेस्टेशनवर रुग्णवाहिका तयार होती. परंतु व्हीलचेअर दादरवर आणली जात असतानाच तिने जोरदार किंकाळी फोडली. कुणाला क्षणभर काही सुचेना! पण ‘भगवान के हिसाब’ एक देवदूत तिथूनच जात होता. देवदूताचे नाव होते भारतीय सैनदलाच्या वैद्यकीय विभागाचे मेजर डॉक्टर रोहित बच्वाला.. झांशी येथील सैन्यकेंद्रावर कर्तव्यावर होते. आणि त्यावेळी ते त्यांच्या मूळगावी हैदराबादला सुट्टीवर येथे निघाले होते… त्यांच्या रेल्वेगाडीला आणखे काही मिनिटे अवकाश होता!

मेजर डॉक्टर साहेबांनी ती किंकाळी ऐकली आणि ते अक्षरश: वायुवेगाने त्या महिलेच्या दिशेने धावले.. साध्या वेशात असलेल्या मेजरसाहेबांनी संबंधित डॉक्टर आणि कर्मचा-यांना त्यांची ओळख सांगितली आणि तो रुग्ण हाती घेतला.

ती होऊ घातलेली माता आणि जन्माला येऊ घातलेले बालक… दोघांच्याही जीवाला प्रचंड धोका होता… तिथून तिला हलवणे अशक्यप्राय होते. अगदी काही क्षणांतच बाळ या जगात प्रवेश करणार होतं… पण त्याचा मार्ग सुकर नव्हता! निष्णात वैद्यकीय हातांची गरज होती… अन्यथा दोन्ही जीव या जगाचा निरोप घेणार होतेच.

मेजर डॉक्टर रोहित… रोहित म्हणजे सूर्याचे पहिले किरण… लालबुंद लोहगोल. या दोघांच्याही जीवनात यांच्या रूपाने सूर्योदय होणार होता… असा भगवान का हिसाब होता!

मेजरसाहेबांनी त्याच ठिकाणी तात्पुरते रुग्णालय, शस्त्रक्रियागृह उभारले. रेल्वे वैद्यकीय पथक आणि रेल्वे पोलिस मदतीला होतेच. मेजरसाहेबांनी त्यांच्याजवळचा pocket knife चाकू उपयोगात आणायचे ठरवले… आणि केस एकत्रित ठेवण्यासाठी महिला वापरतात त्या क्लिप्स. रेल्वेतील बेडशीट्स पडद्यासारख्या उभारल्या गेल्या… बघे हटवले गेले… आणि सुरु झाली वेळ आणि काळ यांच्यातील शर्यत. देर से आनेवाली गाडीयां कुछ समय मिला सकती है.. या चालीवर मेजरसाहेबांनी अत्यंत वेगवान हालचाली केल्या. त्यांनी प्राप्त केलेले सर्व वैद्यकीय कसब आणि मुख्य म्हणजे सैनिकांच्या अंगी बाणवलेलं धैर्य, समयसूचकता प्रत्यक्ष या ;operation’ मध्ये दाखवायला विलंब लावला नाही. काही क्षणांतच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नगरीत कन्यारत्न अवतरले… पण रडण्याचा आवाज काही कानी येईना! मेजरसाहेबांनी पुन्हा जोरदार प्रयत्न केले आणि त्या बालिकेने तिच्या येण्याची ललकारी सबंध platform दणाणून गेली. दूरवर उभ्या असलेल्या लोकांनी बहुदा टाळ्याही वाजवल्या असतील…. पण फक्त डॉक्टर साहेबांनाच समजू शकेल अशी वैद्यकीय गुंतागुंत झाली होती… कोणतीही साधने हाताशी नसताना त्यांनी कशीबशी त्या महिलेची सुटका केली होती खरी… मुलगी वाचली होती… पण आईचे प्राण तिच्या गर्भात अडकून राहिले होते. तोवर कुणीतरी हातमोजे आणून दिले… आणि केवळ हातांनी मेजर साहेबांनी तिचा जीव मोकळा केला. नाळ कापण्यासाठी तो चाकू आणि नाळ बांधण्यासाठी हेअरपिन… क्लिप्स! एका अर्थाने त्यांनी त्या मुलीची आणि भारतीय सेनेची नाळ जोडून दिली होती.

आता सांगायला सोपे वाटत असले तरी तेवढी मिनिटे म्हणजे एक लढाईच होती… आणि मेजर साहेबांनी त्यात फत्ते हासील केलीच. डॉक्टर साहेब नेमक्या वेळी नेमक्या ठिकाणी उपस्थित होते… ही तर देवाचीच कृपा असे ते म्हणालेत… सब कूच भगवान के हिसाब से हुआ असे त्यांनी आवर्जून सांगून श्रेय स्वत:कडे घेतले नाही. बाळाच्या, मातेच्या चेह-यावरील हास्य हेच धन्यवादाचे द्योतक मानून मेजर डॉक्टर रोहित बच्वाला तिथून निघाले… त्यांची रेल्वे निघण्याच्या बेतात होती! त्यांने अक्षरश: चालती गाडी पकडली! जणू आपण काही केलेच नाही, अशा अविर्भावात त्यांनी प्रवास सुरु केला.

.. भारतीय सैन्यदलाचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ माननीय श्री. उपेंद्रजी द्विवेदी साहेब यांच्यापर्यंत या ‘Operation Jhaansi’ ची माहिती आणि महती गेली… आणि त्यांनी अर्थातच मेजर डॉक्टर रोहित बच्वाला यांचा विशेष पुरस्कार (commendation) प्रदान करून गौरव केला! मेजर साहेबांचे वडील भारतीय वायुसेनेतून निवृत्त झाले आहेत.

मेजर साहेबांनी त्यांना साहाय्य केलेल्या सर्वांनाच धन्यवाद दिले… लिली कुशवाहा या रेल्वे कर्मचारी महिलेनेही या कामी त्यांना मोठी मदत केली. नवजात बालिकेला त्यांनी नवे कपडे घेऊन दिले.. माता आणि नातलग यांची व्यवस्था पहिली. महिलेचे नातलग मोहम्मद जुबैर कुरेशी यांच्याकडे तर मेजर साहेबांचे आभार मानायला पुरेसे शब्दही नव्हते.

– – भारतीय सैन्य जीव देतेही, घेतेही, वाचवतेही आणि जन्मालाही घालते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही!

…. मेजर डॉक्टर रोहित बच्वाला साहेब… आम्हांस आपला अभिमान वाटतो. जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आमच्या डोळ्यांनी जग बघाल? – लेखक : श्री हर्षद जाधव ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ आमच्या डोळ्यांनी जग बघाल? – लेखक : श्री हर्षद जाधव ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

 (१५ ऑक्टोबर हा जागतिक पांढरी काठी दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त….)

अंधत्व हा दैवी शाप आहे, पूर्वजन्मीचे पाप आहे, अशा पूर्वापार समाजधारणा होत्या. समाज अंध व्यक्तींना तुच्छतेची, तिरस्काराची वागणूक देत असे. पापक्षालनार्थ प्रार्थना स्थळांसमोर प्रार्थना करून भिक्षा मागणे हाच काय तो उपजीविकेचा मार्ग त्या काळात अंधांकडे होता. अंधांना दानपात्र म्हणूनही बघितले जाई. मध्ययुगात विदुषकांसारखा किंवा इतिहास कथेकऱ्यांसारखाही अंधांचा उपयोग केला जात होता.

१६व्या शतकात अंधांच्या या दयनीय परिस्थितीचा विचार काही विचारवंत करू लागले होते. ‘अंध व्यक्तींची बुद्धीमत्ता, इतर इंद्रियांची कौशल्ये व कार्यक्षमता ओळखल्या गेल्या पाहिजेत, ‘ असे विचार वॉल्टेअर यांनी मांडले होते. १७४९ मध्ये पॅरिसचे डॅनेस डिडेरो यांनी दृष्टिवान व्यक्तींसाठी दृष्टिहीनांशी संबंधित एक लेख प्रसिद्ध केला. त्यातून त्यांनी अंधांची बुद्धिमत्ता, कार्यक्षमता आणि इतर इंद्रियांच्या कुशलतेकडे समाजाचे लक्ष वेधले आणि त्याबरोबरच समाजाला आवाहनही केले. या लेखात ते म्हणतात, ‘दृष्टीअभावी अंधजनांची इतर इंद्रिये अधिक तीक्ष्ण बनत नाहीत, तर अंधत्व त्यांना आपल्या उर्वरित इंद्रियांना अधिक प्रयोगशील बनण्यासाठी प्रवृत्त करते. परिणामी, ती नक्कीच कार्यक्षम व कुशल बनतात. त्यामुळे जे काही अंध व्यक्तीकडे आहे, त्या आधारे त्याला शिकवले गेले पाहिजे, जे नाही त्याची चिंता करण्यात अर्थ नाही. दृष्टिवान समाजासोबत दृष्टिहीन व्यक्तींचे सक्रिय संबंध निर्माण झाले पाहिजेत.

आज आपण एकविसाव्या शतकात आहोत. परिस्थिती बदलली आहे, पण अंधांविषयीचे समज-गैरसमज मात्र बऱ्याच प्रमाणात आजही टिकून आहेत. वॉल्टेअर आणि डिडेरोला जे सोळाव्या शतकात समजले होतं, ते आपल्याला आजही पुरेसे समजलेले नाही. म्हणूनच आपण अंध-अपंगांना, ‘दिव्यांग’ असा एक अतार्किक, अवैज्ञानिक आणि अर्थशून्य शब्द त्यांनी न मागताच बहाल केला आहे. या दिव्यांग शब्दामागे दडलेले एक धादांत खोटे वाक्य म्हणजे, ‘अंधांना सहावे इंद्रिय, सिक्स्थ सेन्स असतो. ‘ हा एक फार मोठा गैरसमज आहे. असे कुठलेही अधिकचे इंद्रिय किंवा सिक्स्थ सेन्स आमच्याकडे नसतो. डोळ्यांनी पाहता न येण्याची मर्यादा भरून काढण्यासाठी आम्हाला अत्यंत प्रयत्नपूर्वक इतर इंद्रियांना अधिक कार्यक्षम बनवावे लागते.

आमच्या एकूणच जगण्याचे अविभाज्य अंग असलेली ब्रेल लिपीच घ्या. ही लिपी शिकायची म्हटले म्हणजे बोटांच्या स्पर्श संवेदना तीक्ष्ण असणे अत्यावश्यक ठरते. त्यासाठी मग लहानपणापासूनच प्रयत्न केले जातात. एका वाटीत विविध कडधान्यांचे दाणे देऊन त्यांतून मूग, मसूर, मटकी, वेगळी करण्याच्या कृतींसारख्या अनेक कृती करवून घेतल्या जातात. मला स्वतःला सुरुवातीला ब्रेल नीट लिहिता-वाचता न आल्यामुळे दोनवेळा नापास व्हावे लागले होतं. पण नंतर मात्र एमएपर्यंतच्या शिक्षणात आणि आजही मी ब्रेल लिपी स्वतःला स्वावलंबी आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी वापरतोच. आज लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील माझे आरक्षित आसन मी याच ब्रेल लिपीच्या सहाय्याने सहज शोधू शकतो, कारण आसनाच्या मागील भिंतीवर ब्रेल लिपीत आसन r क्रमांक लावलेले आहेत. मुंबईतल्या काही रेल्वे स्थानकांवरील पुलांवर अंधांना फलाट क्रमांक समजावेत म्हणून पुलांच्या रेलिंग्सना फलाट क्रमांकांच्या ब्रेल पट्ट्या लावल्या आहेत. अलीकडे काही लिफ्ट्समध्येही बटनांवर ब्रेल लिपीत क्रमांक व नावे लिहिलेली असतात. मुंबईच्या रेल्वे फलाटांवर पिवळ्या रंगाच्या मूळ पृष्ठभागापेक्षा थोड्या ठळक पृष्ठाच्या लांबलचक पट्ट्या टाकलेल्या असतात. या पट्ट्या आमच्यासारख्या अंध प्रवाशांना फलाटावर सरळ रेषेत चालता यावे, फलाटाच्या कडेला जाऊन आम्ही खाली पडू नये, यासाठी आहेत. तसेच, आमच्यासाठीचा विशेष डबा जिथे येतो, त्या ठिकाणीही लादी लावलेली आहे. पायांना सहज जाणवेल, अशा ठळक पृष्ठभागाची

अंधांना ऐकूही येत नाही, असा अनेकांचा गैरसमज असतो. खरे तर डोळ्यांची उणीव भरून काढण्यासाठी आम्हाला सतत ऐकण्यावाचून पर्याय नाही. शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणाची पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध नसल्यामुळे आमच्या शिक्षणाचे साधन हे रेकॉर्ड केलेले ऐकणे हेच होऊन जाते. संवाद आणि पार्श्वसंगीताच्या आधारे चित्रपट, नाटक, टीव्ही मालिकांचा आस्वाद घेणे, रस्त्यावर चालताना रहदारीचा अंदाज घेणे, यासाठी आम्हाला आमची श्रवण संवेदना सतत जागती ठेवावी लागते. रेल्वे फलाटावर आपल्यासाठीचा डबा कुठे येणार, हे जसे पायाखालच्या फरशीवरून समजते, तसेच त्या ठिकाणी लावलेल्या बीपरमुळेही समजते. आता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही मोबाइल, कम्प्युटरसारखी साधने त्यातल्या ‘टेक्स्ट टू स्पीच सिंथेसिस सिस्टीम’च्या म्हणजेच आवाजाच्याच आधारे सहज वापरतो.

आता इतकी सततची श्रवणसाधना करून तयार झालेल्या आमच्या कानांना, पीठ खाणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येणार नाही का? ‘हत्ती आणि आंधळे’ सारख्या अनेक जुन्या लोककथा, ‘आंधळं दळतय कुत्रं पीठ खातंय’, ‘आंधळीपेक्षा तिरळी बरी’, किंवा ‘आंधळा मारतोय डोळा’ यांसारख्या म्हणी आणि वाक्प्रचारांतून अंधांची चुकीची प्रतिमा समाजमनात निर्माण केली गेली आहे. आपल्याकडच्या नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांमधूनसुद्धा अंधांचे भिकारी, असहाय्य, परावलंबी असे पारंपरिक चित्रणच केलेले बहुतांश वेळा दिसते. त्यामुळे समाजमनही तसेच घडते. आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अंध व्यक्तीसुद्धाp विविध कामे कुशलतेने करीत आहेत, जिथे जीवघेणी स्पर्धा असते अशा कॉर्पोरेट जगतातही स्वतःला सिद्ध करत आहेत.

अलीकडे तर जे जे वाईट किंवा गैर, त्यासाठीही ‘अंध’ या शब्दाचा सर्रास वापर होऊ लागला आहे. अंधश्रद्धा, अंधभक्त, अंधानुकरण, आंधळेपणा असे शब्द, ‘आंधळ्यासारखं काय करतोस करतेस’, ‘आंधळ्यासारखं वागू नकोस’… असे वाक्यप्रयोग अगदी सहज केले जातात. विचारी म्हणवले जाणारे पुरोगामी तर ‘अंधभक्त’ हा शब्द सर्रास वापरतात. खरेतर श्रद्धा आणि भक्ती या दोन्ही शब्दांना ‘अंध’ हा शब्द विशेषण म्हणून लावण्याची काहीही गरज नाही. ते दोन्ही शब्द स्वयंसिद्ध आहेत त्यांचे अर्थ सांगायला. पण अंधत्व ही एक शारीरिक अवस्था आहे, ती बौद्धिक किंवा मानसिक अवस्था नाही, हे अजिबातच लक्षात घेतले जात नाही.

इथल्या धार्मिक परंपरांनी तर अंधांना दाणे टाकण्यासाठीची कबुतरे किंवा श्राद्धाची पाने खाणारे कावळेच करून ठेवले आहे. आजही अंधांसाठीच्या विविध निवासी शाळा आणि कार्यशाळांमध्ये जेवणावळी घालून पापक्षालन करवून घेणारी मंडळी आहेतच. छान स्वच्छ कपडे घालून ऑफिसबॅगसह रेल्वे गाडीत प्रवास करताना, केवळ अंधाला काहीतरी दिले म्हणजे आपल्याला पुण्य मिळेल या भावनेतून मिटल्या हातात पैसे कोंबणाऱ्यांचेही अनुभव आमच्यातल्या अनेकांना आलेत. ते पैसे नाकारले की, ‘लक्ष्मी को ठुकराना अच्छा नहीं’ असे ऐकावेही लागले आहे.

‘तुम्ही काय, सरकारचे जावई. तुम्हाला नोकऱ्या सहज मिळत असणार, ‘ अशी मुक्ताफळे उधळणारेही भेटतात आम्हाला. त्यांना हे माहीत नसते की, आमच्यासाठीच्या राखीव जागांवर डल्ला मारणाऱ्या अनेक ‘पूजा खेडकर’ प्रवृत्ती आज व्यवस्थेत आमच्या जागा बळकावून बसल्या आहेत. आता शासकीय नोकऱ्या कंत्राटी झाल्यामुळे तर आमच्या नोकऱ्यांचे प्रश्न अधीकच जटिल होत चालले आहेत.

शासन स्वतःच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करते, त्यातले काही खर्चुन शासनाने आधी आपल्या अधीकारी-कर्मचाऱ्यांतील अंधांविषयीचे विविध गैरसमज दूर करायला हवेत आणि मग जनमानसातील गैरसमज दूर करण्यासाठीही काही जाहिराती, रिल्स, लघुपट बनवायला हवेत. आमच्यासाठीच्या सोयी आम्हाला नीटपणे वापरता याव्यात यासाठी तरी शासनाने लोकप्रबोधन करणे गरजेचे आहे. म्हणजे, रेल्वे फलाटावर, आम्ही ट्रॅकमध्ये पडू नये म्हणून पट्ट्या लावल्या आहेत, त्यांच्यावर आपली जनता खांबासारखी उभी असतेच, पण अनेकदा त्यांच्या बॅगाही नेमक्या त्यांवरच विसावलेल्या असतात. काठीचा आवाज करून कितीही वाट मागितली तरी काही फरक पडत नाही. रेल्वे स्थानकांवरील लिफ्ट्स नेमक्या कुठे आहेत, हे अंध प्रवाशांना कळण्याची कोणतीच सोय नाही. तिथे बीपर असण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक ठिकाणी आमचा प्रवास सुगम्य होईल अशा सोयी सर्वत्र व्हायला हव्यात.

नेमके हेच सगळे सांगण्यासाठी आजचा हा जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिन किंवा जागतिक अंध दिन योजलेला आहे. त्याचे प्रयोजन संपेल तोच आमच्यासाठी सुदिन.

 

लेखक : श्री हर्षद जाधव

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सैनिकांना काय हवे?…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “सैनिकांना काय हवे?…” ☆ श्री संभाजी बबन गायके

वीर चक्र विजेते कर्नल (निवृत्त) ललित राय साहेब

पलटणीत विजयी जल्लोष सुरू आहे. पण सैन्य नायकाच्या काळजात एक वादळ घोंघावत आहे.. त्याने पाहिलेली दृश्ये त्याच्या नजरेसमोरून काही केल्या हटत नव्हती. रात्रीचा प्रचंड काळोख, जीवघेणी थंडी, धुकं! प्रचंड गोंधळाची स्थिती. चोहीकडे यमदूत तयारीत. त्यात त्याच्या कित्येक सैनिकांच्या छातीत गोळ्या घुसलेल्या होत्या.. पण लढाईच्या धुमश्चक्रीत त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देता येत नव्हती…. सतरा हजार फूट उंचीवरल्या त्या पहाडांवर त्यावेळी मदत पोहोचवणं अशक्यच होतं. नायकाने त्या पोरसवदा पोरांच्या भळभळणाऱ्या जखमांवर बर्फाचे गोळे दाबून बसवले… शून्याच्या कितीतरी सेंटीग्रेड खाली गेलं होतं तापमान… सर्वकाही गोठून गेलेलं… बधीर झालेलं. मी येतो.. तोवर तग धरून रहा.. पोरा! इथून बसल्या जागेवरून जमेल तशी फायरिंग करीत रहा.. आम्हां वर चढत जाणाऱ्या सैनिकांना कव्हर फायर देण्याचा प्रयत्न कर! आपण जिंकण्याच्या अगदी जवळ आलो आहोत! पहाटेचा सूर्य उगवायचा अवकाश… पहाडावर तिरंगा लावतो आणि परत येताना तुम्हांला खाली घेऊन जातो! …

त्या जवानांचा आणि सेना नायकाचा परिचय केवळ तीस दिवस जुना… पण रक्ताचे नाते मात्र आधीपासूनच होते. साहेब त्यांच्याच इलाख्यातील मूळचे. ते नुकतेच पलटणीमध्ये रुजू झाले होते अगदी तातडीने. कामच तसे होते. साहेबांनी योजना आखली… पण ते काम सोपे नव्हतेच. शत्रू अतिशय भरभक्कम स्थितीमध्ये होता. अगदी मन मानेल तेव्हढा गोळीबार करू शकत होता आणि तोही अचूक. मिनिटाला हजार गोळ्या डागणारी शस्त्रे होती… बाकी हत्यारे तर होतीच. पलटण जिथून वर चढण्याचा प्रयत्न करीत होती त्या जागेवर शत्रू अक्षरशः चारही बाजूंनी गोळीबार करीत होता… कारण शत्रू अशाच ठिकाणी बसला होता जिथून सर्वकाही दिसू शकेल.

साहेब स्वतः एका तुकडीसोबत वर चढत होते. इथपर्यंत पोहोचायला सहा सात तास लागले होते… हवेत प्राणवायू नव्हता… शत्रूने डागलेल्या गोळ्यांच्या, गन पावडरचा वास मात्र पुरेपूर भरून उरला होता. एरव्ही सपाटीवर शंभर किलोचे वजन सहज उचलणारे जवान पाठीवरच्या वीस पंचवीस किलोच्या वजनाने मेटाकुटीला आले होते. या पोरांनी अन्नाचे वजन नको म्हणून अन्नापेक्षा दारूगोळा जास्त नेणे पसंत केले होते! काहींनी तर इतरांकडून गोळ्या, हातबाँब चक्क मागून घेतले होते. शत्रूच्या त्या मरण वर्षावात न्हात न्हात छोट्या छोट्या गटांत सैनिक आणि अधिकारी वर चढत गेले. थोड्याशा सपाटीवर असलेल्या शत्रूच्या खंदकाजवळ जायचे तर जमिनीवर लोळण घेऊन.. सरपटत जावे लागते… डोक्यावर गोळ्या आवाज करीत.. “वाचलास यावेळी, तुझं नाव नव्हतं माझ्यावर” म्हणत पुढे निघून जात होत्या.

आडबाजूला शत्रूचे चार बंकर आहेत, असा नायकाचा अंदाज होता.. त्याच्या एका आदेशावर एक तरुण अधिकारी पुढे सरसावला… हातगोळे भिरकावत त्याने तीन बँकर्समधले शत्रू टिपले… पण तिथे चार नव्हे सहा बंकर होते… त्यातील एका बंकर मधून आलेल्या गोळ्यांनी या अधिकाऱ्याच्या थेट कपाळाचा वेध घेतला…. मोहरा कोसळला.. पण प्राण सोडताना म्हणून गेला… छोडना नहीं! मग उर्वरित जिवंत देह त्या आगीत शिरले…. काही मिनिटांत बंकर मधील श्वापदे मारली गेली! पण नायकाच्या डोळ्यांदेखत एक तरणाबांड सिंह बळी पडला होता… हा विजय खूप काही हिरावून घेणारा होता! पण मागे हटलेला शत्रू पुन्हा मोठ्या संख्येने चालून आला… कारण त्याच्या तोंडचा मोठा घास आपल्या सैनिकांनी हुसकावून घेतला होता. त्यांच्याशी मुकाबला करण्यात दोन दिवस गेले! थोडी शांतता झाल्यावर, खालून आणखी कुमक आल्यावर साहेब खाली उतरू लागले!

‘मी येतो माघारी’.. म्हणून ते ज्यांना त्या दगडांमागे ठेवून आले होते, त्यांना पाहिल्याशिवाय साहेबांच्या जीवात जीव येणार नव्हता.. साहेब सरसर खाली उतरत होते…. त्या जागी पोहोचतात तो त्यांना ते तिघे दिसले…. गोळीबार करण्याच्या पवित्र्यात दगडावर टेकून उभे होते… रायफल्स वरच्या बाजूला नेम धरलेल्या अवस्थेत रोखलेल्या होत्या… बोटं ट्रिगर मध्ये होती… रायफल मधील सर्व गोळ्या डागल्या गेलेल्या होत्या… शरीर बर्फाचे झाले होते… थिजलेले सैनिक… आणि पुतळे बर्फाचे.. वाटलं.. आता आदेश कानी पडताच ताठ उभे राहतील… जयहिंद साब म्हणतील! पण तसे होणार नव्हते… त्या देहांत प्राण उरले नव्हते! फार मोठी किंमत अदा केल्यावरच विजय पदरात पडला होता… आणि पदर विदीर्ण झाला होता!

साहेब त्यांच्या कार्यालयात विषण्ण अवस्थेत बसलेले आहेत. आपण कुणासाठी, का लढलो? कुणाला याचं काही घेणं देणं आहे का नाही? त्यांच्या मनात रागाची भावना दाटून आली होती… जवान पोरांचे छिन्नविछिन्न देह दिसत होते! साहेबांच्या हृदयात पडलेला खड्डा अधिकाधिक खोल होत होता!

एवढ्यात साहेबांचा सहाय्यक सैनिक सेवक साहेबांना त्यांची परवानगी विचारून आता आला! “साहेब, तुमच्यासाठी पत्रं आली आहेत, आणू का आपल्याला दाखवायला? “

साहेबांनी मानेने होकार देताच तो सैनिक दोन मोठ्या सुटकेस घेऊन आता आला!

“एवढी पत्रं? ” साहेबांनी एक सुटकेस उघडायला लावली… शिगोशिग भरलेली होती सुटकेस. साहेबांनी एक लिफाफा उघडला!

– – कुठल्याशा शाळेतील एका मुलीने लिहिले होते… “अंकल, आप थे इसलिये हम है! हम यहाँ आराम से रह सकते है.. क्योंकी आप सीमा पर खडे हैं… हम ने टीवी पर देखा आपका पराक्रम! हम बडे आभारी हैं.. जय हिंद! “

साहेबांच्या चेहऱ्यावरील भाव बदलत गेले! साहेबांनी सर्वच्या सर्व पत्रं नजरेखालून घातली. एकेक पत्र त्यांना एकेका मेडल सारखे वाटत होते. आपल्या पोरांचे बलिदान या नव्या पिढीला माहीत आहे, त्याचे महत्त्व त्यांना समजले आहे, या विचाराने त्यांच्या मनावरील ताण कमी झाला.. हृदय अभिमानाने भरून आले!

आपल्या जवानांच्या कहाण्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवल्याच पाहिजेत.. असा त्यांनी निर्धार केला… ते सेनापती, सेनानायक आहेत…

दोन जुलै १९९९ रोजी कारगिल येथील खालुबार हे शत्रूने ताब्यात घेतलेले सैन्य ठिकाण, १/११ गोरखा रायफल्स/रेजिमेंटचे नेतृत्व करून, स्वतः लढून, प्रचंड पराक्रमाने परत मिळवण्यात यश मिळवलेले 

वीर चक्र विजेते कर्नल (निवृत्त) ललित राय साहेब.

निवृत्तीनंतर कर्नल साहेबांनी देशभर विविध ठिकाणी कारगिल युद्धाबाबत अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली आहेत. आपल्या शूर वीरांच्या कथा कर्नलसाहेब मोठ्या उत्साहाने सांगतात आणि श्रोत्यांच्या मनात देशप्रेम जागृत करतात!

– – जनतेने सैनिकांच्या पराक्रमप्रती किती जागरूक असायला हवे, त्यांच्याबद्दल किती आदर व्यक्त करायला पाहिजे, हे कर्नल साहेबांच्या उदाहरणावरून सिद्ध होते.

एका मुलाखतीत साहेब म्हणतात… जवान शत्रूशी लढतो ते शत्रूशी वैरभाव असतो म्हणून नव्हे.. तर आपल्या देशातील नागरिकांविषयी अत्यंत प्रेमभाव असतो म्हणून. सैनिक फार काही मागत नाहीत… फक्त कौतुकाचे चार शब्द, थोरामोठ्यांचे आशीर्वाद!

अन्यथा.. भगवद्गीता आश्वासन देते त्यानुसार… सैनिक हुतात्मा झाला तर स्वर्ग भोगतो आणि जिंकला आणि जीवित राहिला तर पृथ्वीचे राज्य त्याचेच असते!

या वर्षी सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय सव्वीस वर्षांचा झाला आहे. हुतात्मा सैनिक, त्यांचे नातेवाईक, सध्या कार्यरत असलेले सैनिक, त्यांचे कुटुंबीय यांसाठी आपण काय करू शकतो? यावर निश्चित विचार करूया! जय हिंद!

– – शाळकरी मुलांनी सैनिकांना पत्र लिहिणे, राख्या पाठवणे हे उपक्रम खरोखरीच उत्तम परिणाम घडवून आणतात!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares