मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फ्यूजन… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ फ्यूजन… — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(त्यांनी विश्वेशला, आपल्या मुलालाही फोन लावला. ‘ तुम्हाला मुलगा चांगला वाटत असेल आणि कुसुमदीदीला चालणार असेल तर हरकत नाही, असं म्हणाला तो.) — इथून पुढे —- 

त्यांच्या धाकट्या मुलीने, उमाने मात्र त्यांना बजावलं, ‘ अम्मा, ताईवर कोणतीही जबरदस्ती करू नका. तिला मान्य असेल तरच पुढचा विचार करा. सुरेशकाकांवर विश्वास आहेच. पण शेवटी लग्न करून संसार ताईला निभावायचा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. इतर नातेवाईकांची पर्वा करण्याचं काही कारण नाही. ते नुसती तोंडपाटिलकी करणार आणि दोन्ही बाजूंनी बोलणार. माझ्या लग्नात सगळ्यांचे मानपान केले तरी कुजबूज चालूच होती या लोकांची. जातीपातीच्या गोष्टीला आजकाल कोणी महत्त्व देत नाही. शाकाहारी म्हणवणारे पण सर्रास मांस-मच्छी खातात आणि मांसाहारी असलेले कित्येक जण पूर्ण शाकाहार घेतात.

 कुसुमने मात्र लग्नाला सहमती दर्शवली. विभाताईंनी सुरेशरावांना महेशबद्दल, सगळी खरी माहिती मुलीकडच्यांना द्यायला सांगितली, त्यामुळे तिला त्यांच्याबद्दल विश्वास वाटला. नाहीतर कितीतरी लग्नांच्या बाबतीत झालेल्या फसवणूकीचे किस्से तिने आजूबाजूला आणि दूरदर्शनवर ऐकले होते, पेपरमध्ये बातम्यांमध्ये वाचले होते. शेवटी लग्न म्हटलं की तडजोड आलीच. आजवर कमी का प्रयत्न केले अम्मा-अप्पांनी आपल्या लग्नासाठी? पण कधी आपल्या रंग-रूपा मुळे मुलाकडून नकार तर कधी त्यांच्या होकारासोबत अवास्तव मागण्यांमुळे आपल्याकडून नकार हेच घडत आलं. त्यामानाने हा प्रस्ताव चांगला आहे आणि नशिबात असेल तसंच होणार की! निदान अम्मा-अप्पांच्या डोक्याची चिंताही कमी होईल. शिवाय विश्वेशच्या लग्नाचा मार्गही सुकर होईल, असा विचार तिने केला.

सुधाआंटी आणि बसप्पांनीही मग विचार केला की निदान लग्न झाल्याचं सुख तर मुलीला मिळेल. पुढचं पुढे बघता येईल. सगळं चांगलं दिसत असतानाही आजकाल किती घटस्फोट होताना दिसतात. इथे मुलाची सगळी माहिती असताना काळजीपूर्वक वागलं तर कदाचित कुसुमचं भाग्य उजळेलही!

संध्याकाळी सहा वाजताच मग बसप्पांनी सुरेशरावांना फोन करून आपली संमती कळवली आणि पुढची बोलणी कधी करायची ते सांगा म्हणाले. विभाताईंची निघायची तयारी सुरू होती. सुरेशरावांनी बसप्पांचा निरोप त्यांना दिला, तसं त्या खूष झाल्या. सुरेशरावांनी एजंटला फोन करून त्यांचं रात्रीचं बसचं रिझर्वेशन रद्द करायला सांगितलं. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी बसप्पांसोबत पुढची बोलणी करण्याचं ठरलं. कुसुम आणि महेशची समोरासमोर भेट होणं देखील आवश्यक होतं. कुसुमबद्दल आणि लग्नाबाबत विभाताईंना महेशशीदेखील बोलायचं होतंच. बसप्पांच्या होकारामुळे त्यांना आता हुरूप आला होता.

महेशवर उपचार करणाऱ्या नेहमीच्या डाॅक्टरांशी त्यांनी आधी संपर्क साधला. त्यांनी लग्नाच्या प्रस्तावाला अनुमोदन देत सर्व प्रकारचं मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली. विभाताई मग महेशशीदेखील बोलल्या. लग्नाच्या कल्पनेने त्याच्या चेहर्‍यावरही आनंद पसरला. कुसुमला त्याने लग्नात एकदाच पाहिले होते. पण आपली आई आपल्या भल्याचा निर्णय घेईल यावर त्याचा विश्वास होता. आपल्यातल्या कमतरतेची जाणीवही त्याला होतीच. त्यामुळे त्याने या लग्नाला होकार दिला. मग रात्री उशिरापर्यंत सर्व मंडळी लग्नाविषयी चर्चा करण्यात मश्गुल राहिली.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सुधाआंटी, कुसुम आणि बसप्पा असे तिघेही प्रभाताईंकडे आले. विभाताईंनी सरळ विषयालाच हात घातला.

कुसुम तू आणि महेश, आतल्या खोलीत बसून हवंतर एकमेकांशी बोलून घ्या आणि मग काय ते ठरवा, असं म्हणून त्यांनी दोघांना आत पाठवलं.

महेशबद्दल तुम्हाला सर्व माहिती सांगितली आहेच. तो सुपरमार्केटमध्ये काम करतो, त्याला दरमहा पंधरा हजार पगार मिळतो. त्याच्या वडिलांच्या दोन एल. आय. सी. पेंशन पाॅलिसीचे दरमहा सोळा हजार त्याच्या खात्यात जमा होतात. मला दरमहा ४५०००रू. पेंशन मिळते. शिवाय त्याच्या नावावर मी पोस्टाची एजन्सी घेतली आहे. त्याच्या कमिशनपोटीही किमान दोन-तीन हजार मिळतात महिन्याला. ठाण्यात आमचा तीन खोल्यांचा ब्लाॅक आहे, सातशे चौरस फुटांचा. ब्लाॅक चौथ्या माळ्यावर आहे, ग्रीन व्हॅली काॅम्प्लेक्स, खोपट भागात. घरात मी आणि महेश असे दोघेच आहोत. सात मजली पंधरा इमारतीआहेत या काॅम्प्लेक्समध्ये. दूध, भाजी, किराणा सामान, डाॅक्टर अशा दैनंदिन गरजा पूर्ण होण्याची सगळी सोय तिथे आहे. शिवाय मध्यभागी तरणतलाव आणि बगिचादेखील आहे. एक दीर-जाऊ ठाण्यात राहतात, पण त्यांचा संबंध फक्त सण-समारंभात मिरवण्यापुरवताच. लग्नाचं पक्कं ठरवण्याआधी तुम्ही ठाण्याला आमच्याकडे या. म्हणजे घरही बघता येईल आणि महेशच्या डाॅक्टरांशीही तुमची भेट घालून देईन. तुम्हाला या लग्नाबाबत काही शंका असतील तर त्यांना विचारता येतील.

बसप्पा म्हणाले, आम्ही येऊ तसं, पण तुम्ही एवढ्या प्रामाणिकपणे सगळं सांगितलं आहे तर आपण पुढच्या गोष्टी ठरवायला आमची काही हरकत नाही. हो ना सुधा? सुधाताईंनी हसून होकार भरला.

लग्नसमारंभ विधिवत पण मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करावा असं मला वाटतं. मी कुसुमला मंगळसूत्र आणि दोन सोन्याच्या बांगड्या घालीन. तुम्हाला अजून काय विचारायचं असेल तर निःसंकोच विचारा.

आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत. अंडपण खात नाही आम्ही…. सुधाआंटी म्हणाल्या.

आम्ही तिच्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही त्यासाठी. वयानुसार मी पण आजकाल क्वचितच मांसाहार करते. महेशसाठी आठवड्यातून एक – दोनवेळा बनवते, पण ती भांडी मी नेहमीच वेगळी ठेवते. हां आता मासळीचा थोडाफार वास मात्र सहन करावा लागेल तिला.

बसप्पा म्हणाले, ‘ लग्न बेळगावला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करायला आमची काही हरकत नाही. तुमची किती माणसं येणार ते कळलं तर त्याप्रमाणे सर्व व्यवस्था करणं सोपं होईल. त्यांचे मानपान पण आम्ही रीतसर करू. आम्ही धाकट्या मुलीला दहा तोळ्याचे दागिने घातले, तसेच कुसुमलापण देणार. ‘

विभाताईं म्हणाल्या, ‘ एक सांगू का? नातेवाईकांचा मानपान म्हणजे ४-५ जणांना साड्या – शर्टपीस किंवा तत्सम एवढाच. त्यावर जास्त खर्च करण्याची गरज नाही. मुंबईत सोन्याचे दागिने घालून फिरण्याची काही सोय नाही. त्यापेक्षा ती रक्कम तुम्ही कुसुमच्या नावाने फिक्स डिपाॅझिटमध्ये ठेवलीत तर भविष्यात तिलाच उपयोगी पडेल. ‘

विभाताईंचं हे बोलणं उभयतांना पटलं. मग लग्नाचा मुहूर्त काढून, बाकी तपशील ठरवू असं ठरलं. कुसुम आणि महेशही बाहेर येऊन बसले होते. दोघांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने, त्यांचा होकार निश्चित केला होता.

आणि मग दोन महिन्यानंतर हे लग्न ठरवल्याप्रमाणे पार पडलं. कुसुम ठाण्याच्या घरात सून म्हणून राहायला आली. सुरुवातीला भाषेची अडचण जाणवत होती. विभाताईं मदतीला होत्याच. पण हळूहळू ती कामचलाऊ मराठी बोलायला लागली. डाॅक्टरांशी चर्चा करून तिचं आणि महेशचं सहजीवनही सुरू झालं. ग्रीन काॅम्प्लेक्समधल्या इतर लोकांशीही कुसुमचा परिचय झाला. काही चांगल्या मैत्रिणीही मिळाल्या. कुसुमनं पोस्टाच्या एजन्सीच्या कामातही लक्ष घालायला सुरुवात केली.

कुसुमच्या सुगरणपाचा अनुभव घेतल्यावर, एका मैत्रिणीने तिच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीची आॅर्डर घेशील का म्हणून विचारलं. २५ जणांसाठी वडा – सांबार आणि अननसाचा शिरा बनवून हवा होता. विभाताईंशी बोलून तिने ही आॅर्डर स्वीकारली आणि त्यांच्या मदतीने ती पूर्णही केली. त्या मैत्रिणीकडे आलेल्या सगळ्यांनी या पदार्थांची खूप तारीफ केली. आता इतरांकडूनही तिला अश्या प्रकारच्या आॅर्डर घेण्यासाठी विचारणा होऊ लागली. अर्थप्राप्ती आणि स्वावलंबनाचं हे एक नवं दालन कुसुमसाठी खुलं झालं. तिचा आत्मविश्वास वाढला.

दरम्यान तिच्या संसारवेलीवर पार्थ नावाचं फुलही उमललं. हा सगळा प्रवास खूप अवघड होता. पायातील व्यंगामुळे तिच्या उभं राहण्यावर, हालचालींवर काही मर्यादा होत्या. शिवाय महेशशी जुळवून घेण्यासाठीही तिला खूपच प्रयत्न करावे लागत होते. पण कुसुमने ही आव्हानं समर्थपणे झेलली.

इकडे तिला रोजच नवनवीन आॅर्डर मिळू लागल्या. विभाताईंनी वयोमानानुसार 

तिला मदत करणं कठीण जाऊ लागलं. घरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्व करायचं तर रगडा, मोठी भांडी अशा अनेक गोष्टींची आवश्यकता होती. शिवाय पार्थला सांभाळून सगळं करणं कुसुमसाठी पण अवघड होत होतं. आॅर्डर पोचवण्यासाठी काहीवेळा महेशची मदत व्हायची, पण त्याची नोकरीची वेळ सांभाळून! त्यामुळे आता एखाद्या मदनिसाचीही गरज होती. त्याचवेळी त्यांच्या काॅम्प्लेक्समध्ये एक गाळा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं कळलं.

 मग या तिघांनी थोडा विचार विनिमय करून तो गाळा विकत घ्यायचं ठरवलं. महेशनी नोकरी सोडून या व्यवसायातच मदत करण्याचा निर्णय घेतला. कुसमच्या आई-वडिलांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शविली. लग्नाच्या वेळी विभाताईंच्या सल्ल्यानुसार फिक्समध्ये ठेवलेले पैसे याकामासाठी उपलब्ध करून दिले.

 विभाताईं आता फक्त पार्थला सांभाळतात आणि जमेल तशी कुसुमच्या व्यवसायात देखरेख करतात. महेशच्या जीवनाला अशी कलाटणी मिळेल याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. कुसुमने आणखी तीन बायका मदतीला ठेवल्या आहेत. तिने महाराष्ट्रातील पुरणपोळी, गुळपोळी, अळूवडी, कोथिंबीरवडी यांसारखे पदार्थही शिकून घेतले आहेत. दाक्षिणात्य पदार्थ तर तिची खासियतच आहे. कुसमच्या साथीने महेशचाही आत्मविश्वास वाढला आहे. सुपरमार्केटमधील कामाचा त्याचा अनुभव, मालाची खरेदी – विक्री करताना उपयुक्त ठरतो आहे. आता तिचं हे मराठी-कानडी फ्यूजन एकदम जोरात चालू आहे.

— समाप्त —

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ फ्यूजन… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ फ्यूजन… — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

धाकट्या बहिणीच्या, प्रभाच्या मुलाचं लग्न दोन दिवसांपूर्वी पार पडलं. काल सत्यनारायणाची पूजा झाली आणि नवपरिणित जोडपं आज सकाळी मधुचंद्रासाठी नैनितालला रवाना झालं. विभाताई आणि त्यांचा मुलगा महेश ठाण्याहून या लग्नासाठीच बेळगावला आले होते. तीन वर्षांपूर्वी करोनामुळे विभाताईंचा नवरा गेला, त्यानंतर प्रथमच त्या अशा समारंभाला उपस्थित राहिल्या होत्या. प्रभाने मुळी तसा हट्टच धरला होता, तू जर लग्नाला आली नाहीस तर इथून पुढे आपली कट्टी! मला तरी माहेरचं कोण आहे दुसरं? आणि ती म्हटल्याप्रमाणे करेल याची विभाताईंना खात्रीच होती. विभानं आपलं दुःख विसरून चार माणसात मिसळावं हीच प्रभाची इच्छा होती.

‘आणि लग्न झाल्यावर लगेच घरी पळायची घाई करायची नाही. नंतरचे पसारे आवरायला मला मदत कोण करणार? ‘ असा प्रेमळ दमही भरला होता प्रभानी.

बाकीचे पाहुणे-रावणे पूजा झाल्यावर आपापल्या घराकडे मार्गस्थ झाले होते.

प्रभाचे यजमान सुरेशराव नाश्ता करून, बाहेरची काही कामं पूर्ण करण्यासाठी काही वेळापूर्वीच घरातून बाहेर पडले होते. महेशलाही सोबत घेऊन गेले होते. त्यामुळे कामं करता करता दोघी बहिणींच्या गप्पा रंगल्या होत्या.

‘ताई, महेशही बत्तिशीचा झाला ना? त्याच्याही लग्नाचं बघायला हवं ना! त्याची सुपरमार्केटमधली नोकरी कशी काय चाललीय? ‘

‘नोकरी ठीक चाललीय ग! पण लग्नाचं कसं बघणार? त्याच्यासारख्या गतीमंद मुलाला स्वीकारायला कोण मुलगी तयार होईल! कसाबसा रखडत दहावी पास झालाय. वयानुसार त्याच्यातही शारिरीक बदल होताहेत आणि त्यामुळे काही वेळा खूप आक्रस्ताळेपणा करतो. मला एकटीला हे सगळं नाही ग सांभाळता येत. डाॅक्टर म्हणताहेत की त्याचं लग्न करायला हरकत नाही. कदाचित त्यानंतर त्याची चिडचिड कमी होईल. तसं दैनंदिन व्यवहार तो नीटपणे पार पाडतो. पण आकडेमोड, हिशेब काही जमत नाही. काही गोष्टी पुन्हा पुन्हा समजावून सांगायला लागतात. शिवाय याचा पगारही मोजका, माझं पेंशन व्यवस्थित आहे, म्हणून घर नीट चाललंय. लग्न करायचं तर मुलीकडचे या सगळ्या गोष्टींचा विचार करणारच की! काय त्याच्या नशिबात आहे कोण जाणे! ‘

‘ खरंय तुझं, पण अशी निराश होऊन, हातावर हात ठेवून बसलं तर कसं होईल? त्या दृष्टीने प्रयत्न तर सुरू केला पाहिजे ना! ‘

रंगरूप चांगलं दिलंय देवानं. आता स्वतःचं पोट भरण्याइतपत तर कमवतोय की महेश!

संथ असला तरी वागणं बरंच नाॅर्मल आहे त्याचं. एकदम दहा गोष्टी सांगितल्या तर गोंधळतो. पण सावकाश सांगितलं तर कळतं सगळं नीट!

‘ प्रभाताई, थोडं इडली-सांबार आणलंय, म्हणजे तुम्हाला स्वैपाक करायला नको आज! लग्नाच्या धावपळीनं दमला असाल ना! ‘ आले’, म्हणत प्रभा बाहेर गेली. कोण बरं हे, म्हणून विभाताईंनी डोकावून पाहिलं तर एक साधारण पन्नाशीची स्त्री, घराच्या मागच्या भिंतीपलीकडून प्रभाला दोन मोठे स्टीलचे डबे देताना दिसली. तिचा काळा रंग मात्र अगदी डोळ्यात भरत होता.

डबे स्वैपाकघरात ठेवून प्रभा परत आली, आणि विभाताईंना म्हणाली.. अग या सुधाआंटी, कन्नड ब्राह्मण आहेत. दोन वर्षांपूर्वी शेजारचं घर त्यांनी विकत घेतलं आणि मला छान शेजार मिळाला. मदतीला नेहमी तत्पर असतात. त्यांचा नवरा सरकारी खात्यात नोकरीला होता, नेहमी बदल्या व्हायच्या. आता रिटायर झाल्यावर मात्र त्यांनी इथे राहायचा निर्णय घेतला. बरीच वर्ष हे लोक कर्नाटक, आंध्र प्रदेशात होते. पण सुधाआंटी लहानपणी मुंबईत राहिलीय, त्यामुळे मराठी चांगलं बोलते. दोन मुली आणि एक मुलगा आहे त्यांना. एकीचं लग्न झालंय आणि मुलगा नुकताच इंजिनीअर होऊन बेंगलोरला नोकरीला लागलाय.

पण प्रत्येकाला काही ना काही दुःख दिलंय बघ देवानं! यांची मोठी मुलगी कुसुम, तिशीची आहे ती! जन्मताच तिचा उजवा पाय, डाव्या पायापेक्षा आखूड आहे

त्यामुळे पाय ओढत चालते आणि कमरेचा भागही बेढब आहे.

बारावी पास झालीय जेमतेम, पण शिक्षणात फारशी गती नाही, म्हणून पुढे शिकली नाही. शिवाय रंगही आईसारखा, एकदम काळा. रूपही सामान्यच. त्यामुळे लग्न जमलं नाही. खरंतर बोलणं वागणं खूप छान आहे. सुधाआंटीच्या बरोबरीनं घरातलं सगळं कामही करते. पण फारशी घराबाहेर पडत नाही. आपल्याकडे लग्नाला मोठ्या मुश्किलीने आली आणि लग्न लागताच घरी गेली. धाकटी उमा जरा रंगानं उजळ आणि ग्रॅज्युएट पण झाली. तिचं तिनंच जमवलं लग्न, मग यांनी करून दिलं. धारवाडला असते ती. पण कुसुमची चिंता आहेच दोघांना. असतं एकेकाचं नशीब! ‘

तेवढ्यात सुरेशराव आणि महेश बाहेरून आले आणि यांच्या गप्पा थांबल्या. मग जेवणं उरकली आणि दोघीजणी आतल्या खोलीत आणि ते दोघं दुसर्‍या खोलीत आडवे झाले. चहापाणी झाल्यावर पुन्हा दोघी घरातली आवरा-आवर करत राहिल्या. लग्नघर म्हटलं की पसारा केवढा असतो.

सुरेशरावांनी विभा आणि महेशचं दोन दिवसानंतरचं स्लीपरबसचं रिझर्वेशन करून आणलं होतं. विभाताईला बरोबर काय काय द्यायचं याची प्रभाची जमवाजमव चालली होती. दुसऱ्या दिवशी दोघी बाहेर पडून काही साड्या, कलाकंद आणि इतर सटरफटर खरेदी करून आल्या.

विभाताईंना त्यांच्या सोसायटीतल्या मैत्रिणींसाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या.

उद्या संध्याकाळी सातला निघायचं होतं, साडेआठची बस होती ठाण्यासाठी. बसस्टँड घरापासून तसा तासभर अंतरावर होता. विभाताईंनी पण आपलं सामान गोळा करून बॅग भरली. महेश जेवणानंतर गोळी घेऊन आतल्या खोलीत आडवा झाला होता, त्याला जरा कणकण वाटत होती. रात्रीची जेवणानंतरची आवरा-आवर करून त्या दोघी बाहेरच्या खोलीत येऊन बसल्या.

सुरेशराव म्हणाले, महेशमध्ये खूप चांगला बदल झाला आहे. स्वतःहून चार गोष्टी बोलतो, विचारतो. पूर्वीसारखा बिचकत नाही. अंगानेही भरलाय. खूप बरं वाटलं त्याची प्रगती बघून.

‘हो ना! मी ताईला तेच म्हटलं. आता त्याच्या लग्नाचा विचार करायला हवा. ‘ 

विभाताई, मी एक सुचवू का? महेशसाठी कुसुमचं स्थळ कसं वाटतं? सहज मनात आलं ते बोललो हं. म्हणजे तुम्हाला पटलं तर बघा हं. ‘

‘अहो, काहीतरीच काय बोलता? महेश किती देखणा आहे! शिवाय ते ब्राह्मण आणि आपण मांस-मच्छी खाणारे, कसं जमणार हे? प्रभा पटकन म्हणाली.

‘ दिसण्याचं काय घेऊन बसलीस बाई, त्याच्यातही कमतरता आहेच की! पण

मुलीला आणि तिच्या घरच्यांना असं स्थळ चालेल का? , विभाचा सूर निराशेचा होता.

‘ तुम्हाला चालणार असेल तर मी बसप्पांशी बोलून तर बघतो, नाही पटलं तर राहिलं. पण पटलं तर दोघांचही भलं होईल असं मला आपलं वाटतं ‘, सुरेशराव म्हणाले.

तुम्ही बोलायला माझी काही हरकत नाही. पण मुलीला आणि तिच्या आई-वडिलांना सर्व परिस्थितीची स्पष्ट कल्पना द्यायची. उगाच खोटंनाटं सांगून, मला कोणाची फसवणूक करायची नाही.

हो हो, मी उद्या सकाळीच त्यांच्या कानावर घालतो हे. मग बघू काय म्हणतात ते! योग असेल तर जमून जाईल.

दुसर्‍या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरेशराव बसप्पांकडे गेले. त्यांनी 

कुसुमसाठी महेशचं स्थळ सुचवलं. बसप्पांनी लगेच काही प्रतिक्रिया दिली नाही. सुरेशरावांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे संबंध घरोब्याचे होते. त्यामुळे त्यांनी सुधाआंटींना बाहेर बोलावलं, ‘ हे सुरेशराव काय म्हणतात ते ऐका’. त्या काॅफीचे मग घेऊन बाहेर येतच होत्या. सुरेशरावांनी त्या दोघांना महेशची सर्व माहिती सविस्तर सांगितली. दोघेही विचारात पडले. कुसुमचं लग्न ठरत नव्हतं हे जरी खरं असलं, तरी असं जातीबाहेरच्या आणि ते पण गतिमंद मुलाशी तिची सोयरीक जुळवणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं. कुसुमला मराठी बोलता येत नव्हतं पण बोललेलं बरंचसं समजत होतं.

सुरेशराव म्हणाले, ‘ दोन्ही मुलं आपल्या जवळची म्हणून मी सुचवलं. तुम्हाला पटत नसेल तर सोडून द्या. ‘ तसं बसप्पा त्यांना म्हणाले, ‘तुम्ही आमचे हितचिंतकच आहात. पण आम्हाला विचार करायला थोडा वेळ द्या. कुसुमशीही बोलायला हवं. शिवाय आमच्या गोतावळ्याचाही विचार घ्यायला हवा ना? ‘ 

‘ हो हो काही हरकत नाही. तुम्ही तुमचा वेळ घ्या. ‘ असं म्हणून सुरेशराव तिथून घरी आले.

प्रभाताईंकडच्या लग्नात सुधाआंटींनी महेशला बघितलं होतं. किती छान गोरापान आणि राजबिंडा दिसत होता तो. पण त्याचं गतिमंदत्व नजरेआड करता येत नव्हतं. आपल्या पोटचा गोळा कुरूप असला म्हणून काय झालं? शिवाय आपण कट्टर शाकाहारी आणि हे रोज मच्छी खाणारे. आपल्या घरात तर अंडसुद्धाआणलं जात नाही. त्यांनीआणि बसप्पांनी मग आपल्या बहिण-भावांशीही फोनवरून चर्चा केली. पण कोणी फारसं अनुकूल मत दिलं नाही. त्यांनी विश्वेशला, आपल्या मुलालाही फोन लावला. ‘ तुम्हाला मुलगा चांगला वाटत असेल आणि कुसुमदीदीला चालणार असेल तर हरकत नाही, असं म्हणाला तो.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मले बी रील कराचं हाय – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

🌸 जीवनरंग 🌸

☆ मले बी रील कराचं हाय – – ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

घट बसायचे दिस जवळ आले न सखीनं मिटिंगसाठी शेजारच्या सखु बह्यनींना बबल्याच्या हाती निरोप धाळला. बबल्या तसं इच्चक पोट्टं! पण अशे कामं लय उड्या मारत करे. कमळी, विमली, यशोदी, धुरपदी, माली असा आट-धा जनींचा ग्रुप होता त्यायचा. नवरातीत भजनंयी कराच्या थ्या! कमळीची सासू लयच खराब! दादला बी सासूवानीच! मंग तिचे चारचौगीत उठनं बसनं व्हते मून बोलवेच कमळीले थे.

सगळ्यात पहिली कमळीच दबकत दबकत आली. तं ये सखी मोबाईल पाहत बसलेली! “काय पाहून रायली वं सखे! जंवा पायलं तवा मोबाईल घेऊन बसतं तं? ” कमळी तिले मने.

“अवं ये कमळे! सासू नं बरं लवकर धाळलं तुले” सखी 

“अवं ते कायची धाळते! म्याच आलू नजर चुकवून! थ्या समद्या येऊन राहिल्या बग. आटप तुयी मीटिंग लवकर. ” 

तशी सखीला आयळिया सुचली. ते म्हने; “कमळे! आपन या नवरातीला रील बनवू! पाय जो मोबाईलवर मस्त मस्त रिल टाकतात समदे.

कमळी कशी मनते; ” तुले कायी येळ बिळ तं नायी लागलं वं! नवरातीत देवीचे भजन करावं का रील बनवावं! ” 

“आवं तेच तर म्हणतो मी! आपन भजनाचच रील बनवू. “सखू मनली. तंवर समद्या जमल्या होत्या, त्यायनं बी येक जात ‘होऽऽ… ‘ मनलं.

कमळी काही नवरातीचं भजन सोळून रील बनवायला तयार नवती. परत सासूची भीती! तिनं पायलं म्हंजे!

मंग यशोदी मनली, “आपन अष्टमीले घागरी फुकतात त्याचंच रील बनवू. अन तुया सासूले सांगायलाच कोन चाललं वं? तुझ्या सख्यांना येवळंयी वळखत नाय का तू?

कशीबशी कमळी तयार झाली न् अष्टामीला रील बनवायचं ठरलं. येटाळ्यातल्याच पोट्ट्याला विडिओ काढायला तयार केलं.

थ्या दिवशी उपास म्हनून समद्या घरचं आटपून सखी कडे जमल्या तिच्या देवीपुढे घागरी फुकू लागल्या. फूऽऽ फूऽऽ…..

कमळीच्या सासूला कोन्या पोट्ट्यांनं जाऊन सांगितलं काय जनं? थे खिळकीतून पायत उभी होती अन मागून पोट्टे तिला दाखवत व्हते, आजी कमळी काकीले पायना!

कमळीनयी डोळ्याच्या कोपऱ्यातून तिले आमासक पायलं अन जोर जोरात घागर फुकू लागली. अंगातच आल्यावानी!

आई माय! इच्या तर खरंच अंगात आलं नायी वं! कमळीची सासू बळबळ करतच आत घुसली. कमळीने ऐकलं पन न ऐकल्यासारखंच दावलं. तिची सासू, “आई चुकलं माकलं माफ कर” मनत तिच्या पाया पडू लागली. कमळी तशी हुश्शार! लगेच तिच्या ध्यानात आलं काय करायला पायजे तं!

मोठ्यानं वरडून सासूला मने, “कमळीला नायी आनलं पाया पळायले? सून वायरी व्हंय मून शान दावा साधतो व्हय तिच्या संगं! ” तिच्या सासूची जोऽऽ तंतरली आन खातरीच पटली कमळीच्या अंगात देवीच हाय मून!

कमळीनंयी हुश्शारीनं साडी चोळीले हजार कबूल करून घेतले पयले. आन मंग सासूला म्हनली, “कमळी माझी लय भक्तीन हाय. तिले तरास देशील तं तुवं वाट्टोळं करीन! तिले खायला प्यायला नीट देत जा. अन काय वं! तुया पोराचे हात काय केळी खायला गेले काय वं? पानी भरायले बी तिलेच लावतो तं! कमळीनेयी आपलं समदं साधुनच घेतलं अन कबुल करून घेतलं समदं देवीपुढे. कमळीले त्रास द्यायचा नाय मून! ” 

हिकडं तिकडं पायत पायत अन् अंगात आलेल्या कमळीच्या पाया पडू पडू तिची सासू मनते कशी, “आता नाही तरास देनार वं आई कमळीले मी”.

कमळीच्या नव्या अवताराला अन तिच्या सासूच्या बी नव्या रूपाकडं बगून तिच्या समद्या सख्या टक्का मक्का बगतच रायल्या.

रील झालं तयार! अन फेसबुक वर टाकलं बी! रील टाकल्यावर तं कमळीची सासू लयच शेळीवानी झाली. इकडे नवराती झाल्यावर सखी अन तिच्या मैतरनी मने, “कावं तू तं शिक्सर का काय मनतात थेच टाकला सासूवर! आधी तं रील करायले बी तयार नवती! ” 

कमळीचं काम चांगलंच फत्ते झालतं. थ्ये कायदे बोल्ते आता कायी? निरा दातकाड काडू काडू हसू लागली.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रेश्माची झूल… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ रेश्माची झूल… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

” गेले पंधरा दिवस भुर्रकन निघुन! उद्या तुम्ही पण जाल! मग मात्र सासुबाईशिवाय हे घर मला आणि अविला खायला उठेल हो ताई! ” 

…. एवढं बोलून शरु ढसढसून रडायला लागली,…

ह्या पंधरा दिवसात ती बरीच खम्बीर होती. खरंतर, आईचं पडल्यापासूनच दुखणं या आठ महिन्यात तिनेच केलं होतं! आपण फक्त नावाला लेक होतो. तिच्या कर्तव्याने खरी लेक शरुच झाली होती!

त्यामुळे आपल्याला आईची उणीव जाणवणारच! पण शरुला ती जास्त प्रखर जाणवेल… स्मिताने तिला पटकन जवळ घेतलं.

थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही,.. कारण, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हे आता सगळेच अनुभवत होते,… “

तिघांनी परत मनसोक्त रडून घेतलं.

मग अलगद शरु उठली. कपाटातून तिने सासुबाईचे कानातले जोड आणि बांगड्या नणंदेपुढे ठेवल्या,.. कपाटही उघडच ठेवलं.

ती स्मिताला म्हणाली,

“ताई, आईची आठवण’ म्हणून हे दागिने आणि त्यांच्या ज्या साड्या पाहिजेत, त्या घेऊन जा! “

स्मिता उदास हसत म्हणाली,.. “अग, माणूस आठवणींनी मनात हृदयाच्या कप्प्यात जपलेला असतोच.. ह्या वस्तू, हे दागिने….. हे सगळं गौण आहे ग! मला काही नको ग! असु दे तुमच्याकडेच! आईचा एवढा दवाखाना, खर्च तुम्ही सगळं कसं पेललं असेल ह्याची कल्पना आहे मला. हे दागिने तुमच्याकडेच ठेवा,.. पण एक वस्तु मात्र मी हक्काने मागेन,… आईने रेशीम दोऱ्याची एक सुंदर झुल शिवली होती,.. ती मला दे! त्याच्या फार सुंदर आठवणी आहेत ग, माझ्या मनात! “

शरुने लगेच खालच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुंडाळलेली ती झुल काढली. स्मिताने ती गच्च छातीशी धरली. तिला परत आईची खुप आठवण आली. रडणं ओसरल्यावर ती बोलू लागली… 

“एकदा आमच्या घराच्या मागच्या अंगणात एक गाभण गाय हंबरत उभी होती. आईने तिला बघितलं आणि म्हणाली, “अग बाई इथेच पाडस जन्माला घालते कि काय,..? हिचा मालक कुठे गेला, का ही वाट चुकून इकडे शिरली? ” पण तिला आता हाकलून लावणं शक्य नव्हतं. अवि तुला आठवतंय का? त्या गावी बाबांची बदली झाली होती, तिथं आपलं मागच्या पुढच्या अंगणाचं घर होतं बघ. “

त्यावर अवि म्हणाला, ” फार काही आठवत नाही, पण त्या कच्च्या दुधाच्या वड्या.. खरवसाच्या वड्या आठवतात,.. पोटभर खायला मिळाल्या होत्या बघ! ” 

स्मिता म्हणाली, ” हं sss! तू लहान होतास फार! मला मात्र स्पष्ट आठवत सगळं! आपल्याकडे कामाला येणाऱ्या शामलाबाईंना आईने लगेच बोलवलं. त्यांना सगळी माहिती होती… 

आई म्हणाली, ” मुकं जनावर असलं, तरी त्रास आणि लाज दोन्ही असतातच प्राण्याला. ” 

भिंतीच्या कोपऱ्यात घुसून हंबरत होती ती गाय! मग आईने तिला आडोसा केला. गरम पाण्याचा शेक,…. अगदी जणू लेकीचं बाळंतपण केल्यासारखं केलं. पाडस तर किती सुंदर होतं! आणि काही क्षणात चार पायावर उभं राहिलं.

आई म्हणाली, “देवाला काळजी सगळ्या जीवांची! ह्या मुक्या प्राण्यांना बघा मिनिटात उभं करतो तो. आपली लेकरं वर्षं घेतात,.. “.

शामला बाई आईला म्हणाल्या, “फार जीव लावू नका. कधी मालक येईल आणि घेऊन जाईल तर करमणार नाही,… ” 

…. आईने तेंव्हा त्या पाडसासाठी ही झुल केली,.. अगदी रातोरात जागुन!

 म्हणाली, “आपल्याकडे नव्या लेकराला कपडे करतात त्याला झुल तरी करू! मला फार आवडली होती रेश्मी झुल! सुंदर रंगांची! मऊमऊ! मी पण जागी होते त्या रात्री. सकाळी उठून कधी त्या पाडसावर घालू असं झालं होतं! पण सकाळी जाग आली ती आईच्या रडण्याने! गाय, वासरू निघून गेल होतं आपल्या वाटेने! तू खुप रडला होतास! “बांधलं का नाहीस? ” तिला विचारत होतास.

आई म्हणाली, “ती आपली मालकीची नव्हती. तिची अडचण, म्हणून आडोश्याला उभी राहिली. आपलं मन वेडं! लगेच गुंतल त्यात! ” मी ही झुल छातीशी घट्ट धरून रडत होते.

आई म्हणाली, “रडू नकोस. स्त्री जन्म अगदी असाच असतो, बघ! तुझ्या या वयात ही गाय येऊन तुला काय काय शिकवून गेली बघ! लज्जा, वेदना, मातृत्व! बघितलंस ना, वासराला कशी चाटत होती? आनंदाने दूध पाजत होती! सगळ्या वेदना विसरून… परत आपण दिलेल्या आरामाच्या मोहात रमली नाही. गेली निघून, आपल्या कर्तव्यांचं पालन करायला! असंच असतं स्त्रीचं जगणं! माहेरी दोन दिवस यायचं, लाड करून घ्यायचे, आणि जायचं निघून परत आपल्या भूमिकेच्या युद्धावर! ” 

आईने झुल हातात घेतली. म्हणाली, ” आता येणाऱ्या प्रत्येक चैत्र गौरीला मी ही झुल घालेन. त्यावर माझी गौर बसेल. कारण, ही गाय माझ्या लेकीसारखीच आली माझ्या आयुष्यात, राहिली आणि निघून गेली. पण ह्या रेशमी झुलीवर तिच्या आठवणींच्या पाऊल खुणा सोडून गेली. ” 

…. “ आईने ह्या झुलीतून मला खूप काही शिकवलं, आयुष्यभरासाठी! ही तिची आठवण मात्र मला द्या! “

अविने आणि शरुने स्मिताला जवळ घेतलं. तिघेही आईच्या आठवणीने रडत होते, आणि ‘रेशमी झुल म्हणजे आईनेच हातात हात धरलाय, ‘ असं अनुभवत होते!

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आय लव्ह यू फ्लाय बॉय…. – मूळ हिन्दी लेखक : श्री गौतम राजर्षी ☆ मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ आय लव्ह यू फ्लाय बॉय…. – मूळ हिन्दी लेखक : श्री गौतम राजर्षी ☆ मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

27 जानेवारी : जम्मू-नगरौटा दरम्यान एका ठिकाणचे सैन्याचे हेलीपॅड

दुपारचे चार वाजले आहेत. दिवसभराची धावपळ झाल्यानंतर, धुकं चिरत सूर्यदेव शेवटचं स्मितहास्य करत आहेत. आपलं हेलीकॉप्टर घेऊन, आर्मी एव्हिएशनचे दोन पायलट, एक मेजर आणि एक कॅप्टन, इथल्या हेलीपॅडवरून, मध्य काश्मीरमधील एका भागात असलेल्या आपल्या एव्हिएशन बेसकडे जाण्यासाठी आपल्या कडक, स्मार्ट युनिफॉर्ममध्ये सज्ज आहेत. इथल्या हेलीपॅडपासून ते एव्हिएशन – बेसपर्यंतचा प्रवास सव्वा तासाचा आहे. हे अ‍ॅडव्हान्स लाइट हेलीकॉप्टर ‘ध्रुव’ घेऊन, पीरपंजालची बर्फमय शिखरांची साखळी ओलांडत परवाच तर दोघे इथे आले होते. 26 जानेवारीला मिळालेल्या अनेक धमक्यांना अनुलक्षून अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी ते इथे आले होते.

हेलीकॉप्टरचे पंखे हळू हळू गती घेऊ लागले आहेत. मेजर वर्मा सगळीकडे धावती नजर टाकून कॉकपीटमध्ये येऊन बसले आणित्यांनी हलकेच मान हलवत कॅप्टनला इशारा दिला. कॅप्टनच्या उजव्या हाताचा जॉय- स्टिकवरचा दबाव त्यांनी वाढवला. फूल थ्रॉटल. धुळीची वावटळ उठली. पंखांची फिरण्याची गती, एका मिनिटाला तीनशे पंधरापर्यंत पोचली, तेव्हा ते मोठसं पाच टनी वजन असलेलं हेलीकॉप्टर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला वाकुल्या दाखवत हवेमध्ये उचललं गेलं.

थोड्याशा खालच्या बाजूला रेंगाळणारी भटक्या ढगांची टोळी, मेजर वार्मांच्या कपाळावर आधीच उठलेल्या आठयांमध्ये आणखी एक दोन आठयांची भर घालते. भटक्या ढगांशी खेळ करत हेलीकॉप्टरचे पंखे आता हेलीकॉप्टरला एका सुरक्षित उंचीवर घेऊन येतात… दूरच्या क्षितिजावर क्षणोक्षणी जवळ येणारी पीरपंजालची शुभ्रशी शिखरे दिसू लागतात. बस! एवढी शिखरं पार केली की झालं. मग पुढचं व्हॅली फ्लॉवरचं उड्डाण म्हणजे मुलांचा खेळ. तिकडे पीरपंजालवर लटकलेल्या ढगांची गर्दी जशी काही कुठल्याशा षड्यंत्रात सामील होऊन, येणार्‍या हेलीकॉप्टरकडे बघत हसते आहे. कॅप्टन काहीसा बेफिकीर आहे. या बाजूचं त्याचं बहुतेक पाहीलंच उड्डाण आहे.

मेजरच्या ललाटावर इथे तिथे पसरलेल्या रेषांवर उमटलेले घामाचे बिंदू वेगळंच काही तरी सांगताहेत. धुकं आणि ढग यांच्यामुळे हेलीकॉप्टरची गती अगदी कमी आहे. आदेशानुसार संध्याकाळी साडे पाचपूर्वी बेसवर पोचणं जरूरीचं आहे. या काकडणार्‍या थंडीत दिवसाला लवकर पळून जाण्याची घाई असते आणि रात्र तर जशी कंबर कसून बसलेली असते. सहा वाजतात न वाजतात, तोच येऊन धडकते. म्हणण्यापुरतं हे अ‍ॅडव्हान्स हेलीकॉप्टर आहे, पण रात्री उडण्याची याची क्षमता शून्याबरोबर आहे.

 27 जानेवारी : पीरपंजालच्या खाली द्क्षिण काश्मीरमधील एक जंगल

सकाळचे साडे नऊ वाजले आहेत. पीरपंजालच्या घाटीमधील या जंगलाचा एक भाग अचानक गोळ्यांच्या धमाक्याने गुंजत उठलाय. आदल्या दिवशी रात्री जवळच्याच राष्ट्रीय राइफल्स बटालियनला, चार आतंकवादी जंगलात लपून बसल्याची पक्की खबर मिळाली होती. सूर्यदेवाचं पहिलं दर्शनच चकमकीचा बिगुल वाजवत होतं. दोन आतंकवादी मृत झाले आहेत आणि दोघांचा शोध सुरू आहे. ही सगळी कार्यवाही होता होता सात तास होऊन गेले आहेत. आता पाठलाग करणारी सैन्याची एक तुकडी जंगलाच्या खूप आतपर्यंत पोचलीय. उरलेल्या दोघांपैकी आणखी एक आतंकवादी मारला गेलाय. दुसर्‍याची मात्र कुठे चाहूल लागत नाहीये. तुकडीचा लांस नायक जखमी झालाय. त्याला पोटात गोळी लागलीय. प्राथमिक उपचारानंतर रक्त वाहणं थांबलय, परंतु त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोचवणं गरजेचं आहे. सगळ्यात जवळच्या रस्त्यापर्यंत जायचं झालं, तरी कमीत कमी चार तास लागतील. एव्हिएशन बेसला लवकरात लवकर हेलीकॉप्टर पाठवण्याविषयी वायरलेसवरून संदेश पाठवला गेलाय.

27 जानेवारी : पीरपंजालच्या बरोबर वर

संध्याकाळचे पाच वाजू लागले आहेत. हेलीकॉप्टरचं पूर्ण नियंत्रण मेजरने आपल्या ताब्यात घेतलय. थोड्या वेळापूर्वी बेफिकीर वाटणारा कॅप्टन आता उत्तेजित झालाय. धुकं आणि षड्यंत्री ढगाच्या टोळीशी झुंजत झुंजत हेलीकॉप्टर आता पीरपंजालच्या बरोबर वर आहे. मेजरला बेसकडून, त्याच्या बरोबर खाली चाललेल्या चकमकीविषयी आणि या चकमकीच्या दरम्यान घायाळ झालेल्या जवानाविषयी रेडिओ- सेटवर संदेश मिळतो. बेस अद्यापही अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. अंधारही वाढतोय. मेजरच्या मनात संभ्रम आहे. कायद्यानुसार तो आपल्या बेसच्या दिशेने उडू शकतो. त्याच्यावर कोणताही दबाव नाही. नियम आणि आदेशानुसार त्याला आपलं हेलीकॉप्टर साडे पाच वाजता बेसवर लॅंड करायला हवं. महागडं हेलीकॉप्टर आणि दोन प्रशिक्षित पायलट यांच्या सुरक्षिततेचा विचार करता ते आवश्यक आहे. संभ्रमाच्या या पराकोटीच्या अवस्थेत त्याला आपल्या मेजर दोस्ताची सक्सेनाची आठवण होते. त्यांचा जिगरी दोस्त. तो त्या राष्ट्रीय राइफल्स बटालियनमधेच आहे आणि अचानक हेलीकॉप्टरची दिशा बदलते. पीरपंजालच्या जंगलाच्या दिशेने ते वळतं. कॅप्टनच्या विरोधस्वरूप बडबणार्‍या ओठांकडे दुर्लक्ष करत, मेजर आपल्या कपाळावर डावा हात फिरवत त्यावर उमटलेल्या वाकड्या तिकड्या रेषा, स्लेट पाटीवर आखलेल्या वेड्या-वाकड्या रेषा पुसून टाकाव्या, तसा मिटवून टाकतो.

27 जानेवारी : पीरपंजालच्या खाली दक्षिणी काश्मीरी घाटीचा निबीड जंगलाचा एक भाग 

संध्याकाळचे सव्वा पाच वाजले आहेत. जंगलातल्या या आतल्या भागात संध्याकाळ जरा लवकरच उतरून आलीय. रातकिड्यांच्या किरकिरीत विव्हळण्याचा आवाजही मिसळलाय त्या घायाळ लांस नायकाच्या अवती भवती असलेल्या त्याच्या साथीदार सैनिकांच्या नजरा वारंवार आकाशाकडे वळताहेत. घेरून येणार्‍या अंधारात विव्हळणार्‍या नायकाचा आवाज मंदावत चाललाय. रातकिड्यांच्या करकरीत मधेच एक आवाज आकाशातून येतो. झाडांच्या वर दिसणारं हेलीकॉप्टर, त्याचे मोठे फिरणारे पंख, निराश लांस नायकासाठी संजीवनी घेऊन आले आहेत. पृष्ठभागापासून थोड्या उंचीवर थांबेलेलं हेलीकॉप्टर सगळ्या जंगलाला थरथरायला लवतय. घायाळ लांस नायक आणि त्याचा एक साथीदार, हेलीकॉप्टरमध्ये बसलेले मेजर आणि कॅप्टन यांच्या साथीला येतात. झाडांना, वृक्षांना हलवत, डोलवत हेलीकॉप्टर अंधारात आपला मार्ग शोधत आपल्या बेसच्या दिशेने उडू लागतं. कॉकपिटमध्ये चमकणारं घड्याळ ठरलेल्या वेळेपेक्षा १५ मिनिटे जास्त झाल्याची चेतावणी देतं.

२८ जानेवारी: मध्य काश्मीर घाटीतील एव्हिएशन – बेसची छावणी 

सकाळचे सात वाजलेत. घायाळ लांस नायक तज्ज्ञ चिकित्सकांच्या देखरेखीखाली, गेले बारा तास आय. सी. यू मध्ये सुरक्षित श्वास घेऊ लागलाय.

मेजर वर्मा आपल्या बिछान्यात गाढ झोपलेत. त्यांचा मोबाईल वाजतो. चिडून, वैतागून, अस्वस्थ होत ते मोबाईल स्क्रीनकडे टवकारून पाहतात. स्क्रीनवर त्यांचे जिगरी दोस्त मेजर सक्सेनांचा नंबर फ्लॅश होतो. अस्वस्थ होत ते मोबाईल उचलतात.

मेजर वर्मा : हा! बोल! 

मेजर सक्सेना : कसा आहेस तू?

मेजर वर्मा : थँक्स म्हणायला फोन केलायस का?

मेजर सक्सेना : नाही.

मेजर वर्मा : मग? 

मेजर सक्सेना : आय लव्ह यू, फ्लाय-बॉय!*

मेजर वर्मा : चल… चल…

आणि मोबाईलच्या दोन्ही बाजूंनी एकदमच गडगडाटी हसण्याचा आवाज गुंजत राहातो.

* फ्लाय-बॉय – हेलीकॉप्टर चालवणार्‍याला फ्लाय-बॉय म्हणतात.

मूळ हिन्दी लेखक : श्री गौतम राजर्षी 

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ओटी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ ओटी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

आज सात वाजले तरी मोलकरणीचा पत्ता नव्हता. बरं उशीरा येईन कि येणार नाहीचा फोनही केला नाही. बाप रे, आज नाही आली तर एवढा कामाचा बोजा माझ्यावर, ऑफिसमध्येही कामाचा डोंगर उपसायचा, त्यात हे सणवार, नवरात्र चालू आहे, रोजची माळ व अखंडदिप मी एवढेच करू शकते. आज अष्टमी, सासुबाईंची भुणभुण ‘आज देवीची ओटी भरुन ये ग’. दरवर्षी त्याच जात होत्या पण यावर्षी अर्धांगवायूत पाय जडावलाय, डाॅक्टरी ईलाज, औषधं, फिजिओथेरेपी सगळं चालू आहे. येईल हळूहळू गुण म्हणतात. “यावर्षी मी जाऊ शकत नाही. तू जा बाई, देवीची ओटी भर, माझा नियम मोडू नकोस, देवीला माझं गार्‍हाणंही घाल. पुढील वर्षी पाच सुवासिनींची साडी, खणा नारळानं ओटी भरीन, करशील ना ग एवढं श्रीकला. “

त्यांच्या डोळ्यात अगतिकता, कारूण्य आणि काहीतरी हरवल्याचा भास मला झाला. अश्रूंचे दोन थेंब त्यांच्या गालावरून ओघळले. मी हलकेच त्यांचे डोळे पुसले. ‘आई, काही काळजी करू नका, मी आहे ना, मी भरीन देवीची ओटी, सायंकाळी ऑफिसातून येतांना जाईन देवळात. बरं तुम्ही दात ब्रश करता काय आता. अजून मंगलाही आली नाही कामाला. चहा आणते तुमच्यासाठी. ” 

सासूबाईंनी मान हलविली. अंथरूणात पडल्यावर खरंच माणूस खूप अगतिक होतो. दुसर्‍यावर अवलंबन म्हणजे जणू परमेश्वराने दिलेली शिक्षाच. कर्तव्य भावनेने आपण करतोही, पण सातत्याने सक्रिय असणारी व्यक्ती अंथरूणाला खिळणं ही तिच्यासाठी धक्कादायक बाबच.

दरवाज्यावरची बेल वाजली अन माझी तंद्री भंग पावली. “किती ग उशीर मंगला, बघ साडेसात वाजले, माझ्या घरात आजारपण, रोहनची शाळा, यांचं ऑफिस, माझं ऑफिस. किती तारांबळ उडतेय माझी. “

“वहिनी, आज सकाळी आपली ग्रामदेवता ईच्छादेवीच्या दर्शनाला गेले होते. फुल हार चढविले देवीला, बाकी मी गरीब काय करू शकणार. हिच सेवा माझी देवीला. “

“बरं बरं, चल लाग चटकन कामाला. आईंचीही वेणी, आंघोळ कर. “

“होय वहिनी, ” मंगला चटकन कामाला लागली, तिच्या हाताला उरकही होता.

“वहिनी”

“हं, आता काय? ” 

“वहिनी मला एखादी तुमची जुनी साडी द्या ना. ” 

मागच्याच आठवड्यात बोहारणीला कपडे देऊन सासूबाईंनी तिच्याकडून भांडी घेतली होती. “आता नाही ग माझ्याकडे साडी, सासूबाईंनी मागच्याच आठवड्यात बोहारणीला दिली. “

“मग वहिनी एखादा जुना तुकडा असला पातळाचा तरी चालेल, बघा ही साडी नेमकी कमरेवर फाटलीय. ” 

मला एकदम भडभडून आलं. आज ही स्त्री मला साडी मागतेय आणि मी नवीन साडी चोळी देवीला चढवायला निघालीय. मंदिरात हजारो साड्या येतात देवीला, पुढे त्या साड्या विक्रीसाठी ठेवल्या जातात. आपल्या समोर आपण देवीला वाहिलेली साडी एका सेकंदात बाजूला सारली जाते. यात कोणते समाधान? देवी काही मागत नाही. दोन हात तिसरे मस्तक झुकवून नमस्कार केला तरी देवीला पुरेसा असतो.

“मंगला पटापट कामं आटोपून देवघरात ये. “

मंगलाला बसायला आसन देवून तिचीच मनोभावे मी साडी खणा नारळाने ओटी भरली आणि साडी एकच नाही बरं का, दोन साड्या मी तिला दिल्या. त्या दोन्ही साड्यांवरून ती मायेनी हात फिरवू लागली आणि माझी पूजा सफल झाल्याचा भास मला झाला.

“पण वहिनी, आजी काय म्हणतील? त्या रागावतील, त्यांना काय उत्तर द्याल तुम्ही. ” 

“ते मी पाहून घेईन, तू नको काळजी करूस”.

मंगला प्रसन्न हसली.

मंगला आज सायंकाळी मला कुमारी पूजनही करायचंय. तुझ्याच आळीतील पाच गरीब मुली घेऊन येशील? त्यांना चांगले कपडे व शृंगाराचं साहित्य देईन. पोटभर जेवतीलही. आणि लवकर येऊन स्वयंपाकाला मला मदतही करशील. ” 

“होय वहिनी, येईन मी लवकर. “

धावपळ करत 8. 57 ची लोकल मिळाली. तुडुंब गर्दी, पण कोपर्‍यात खिडकीजवळ माझी मैत्रीण उषा बसलेली. “ये इकडे, तिने खुणेनेच मला बोलावले. रोजचाच प्रवास असल्याने तसे सगळे ओळखीचे चेहरे, माझ्यासाठी सगळ्यांनी दाटीवाटीने जागा केली. नवरात्रीचे दिवस असल्याने प्रत्येकीनेच जरी काठाच्या साड्या तर काहींचे कलरफुल पंजाबी ड्रेस, मॅचिंग ज्वेलरी, मोगर्‍याचे, जुईचे गजरे, इतक्या दाटीवाटीतही नुसता सुगंध दरवळत होता.

खिडकीजवळच्या गार वार्‍याने मला हलकेच पेंग येऊ लागलेली. हळूच मी भूतकाळात शिरलेली. मी नुकतीच तेव्हा नोकरीला लागलेली. कामाची धावपळ पाहाता कमीत कमी भांडी विसळायला तरी मोलकरीण हवी होती. आणि मैत्रीण मीना तिला घेऊन आलेली, एक शाळकरी मुलगी, आठवीत शिकत होती. काम मागत होती. व्यसनी बाप, लहान भावंडं, आईची होणारी ओढाताण ती पाहात होती.

“अगं, तू इतकी लहान, कशी काम करशील, “

“करीन ताई मी काम आणि शाळेतही जाईन. माझी मदत करा, मला काम द्या, नाही म्हणू नका.” 

 माझा नाईलाज झाला. “किती पैसे घेशील कामाचे?” 

तिने सांगितले व मी कोणतीही घासाघीस न करता ते मान्य केले.

“ताई “

“हं बोल, आणिक काय? ” 

“ताई मला खायला काही मिळत जाईल काय? शिळंपाकंही चालेल. ” 

माझा स्वयंपाक मोजकाच राहायचा. अन्न शिळं करण्याची मला सवयच नव्हती. “नाही, माझ्याकडे शिळं अन्न नसतं, पण मी तुला दोन ताज्या पोळ्या व एक वाटीभर भाजी देत जाईन, मी तुला टिफीन बाॅक्स आणून देईन, तो घेऊन तू शाळेत निघून जात जा. “

मुलगी खुश झाली. मलाही समाधान वाटलं. भुकेल्याची भूक आणि तहानलेल्याची तहान जाणण्याचं बाळकडूच मला मिळालं होतं.

“श्रीकला ऊठ, पुढचं स्टेशन आपलं. ” 

आम्ही दरवाज्याजवळ आलो. “काय ग, आज बरं नाही काय? ” 

“तसं नाही गं, पण थकवा जाणवतोय. कामाचा ताण, सासुबाईंचं आजारपण, त्यात हे सणवार, जीव नुसता मेटाकुटीला आलाय. ” 

सायंकाळी कुमारी पूजन साग्रसंगीत पार पडले. यांनीही देवीला नमस्कार केला आणि ऑफिसातून येतांना यांनी माझ्यासाठी आणलेली, माझ्या आवडीचा कलर असलेली भरजरी जांभळ्या रंगाची पैठणी व मोगर्‍याचा गजरा मला दिला. “ही माझ्या घरच्या लक्ष्मीची पूजा।” म्हणत यांनी मला भाळी कुंकू, भांगात सिंदूर भरला. दिवसभराचा माझा सगळा शीण, कामाचा ताण क्षणार्धात मिटला. देव्हार्‍यातील देवीचा चेहराही प्रसन्नतेने उजळला होता. आशीर्वादासाठी उंचावलेला तिचा हात जणू आमच्या शिरावर असल्यासारखा वाटत होता.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन अनुवादित कथा – (१) ‘स्क्रीनच्या अलीकडे.. पलिकडे‘ (२) ‘दिवे, वाती आणि तेल’ – हिन्दी लेखक : श्री हेमंत बावनकर ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?जीवनरंग ?

☆ दोन अनुवादित कथा – (१) ‘स्क्रीनच्या अलीकडे.. पलिकडे‘ (२) ‘दिवे, वाती आणि तेल’ – हिन्दी लेखक : श्री हेमंत बावनकर ☆ मराठी अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

श्री हेमंत बावनकर

[ हिन्दी लघुकथाएँ – (१) देट साइड ऑफ़ स्क्रीन (२) दिया, बाती और तेल ] 

(१) स्क्रीनच्या अलिकडे.. पलिकडे – – 

आता हे नेहमीचंच झालं होतं. जेव्हा जेव्हा एखादा सण किंवा मुलांचे -नातवंडांचे वाढदिवस असे काही खास दिवस असायचे,  तेव्हा सेवकराम आणि त्यांची पत्नी अनुराधा आपल्या परदेशी असणाऱ्या मुलांना फोनवरूनच शुभेच्छा द्यायचे.. पण अशावेळी ते एकमेकांशी फक्त बोलायचे नाहीत,  तर विडियोवर कॉन्फरन्स कॉल लावायचे. कुणाचा वाढदिवस असेल तर त्यावेळी प्रत्येकाच्या मोबाईल स्क्रीनवर एक एक केकही असायचा.. आणि गंमत म्हणजे सगळे केक सगळेजण एकाच वेळी कापायचे … सणही असेच एकत्र.. अर्थात ऑनलाइन.. virtually एकत्र साजरे करायचे सगळे मिळून. असा आभासी का होईना.. पण सगळे मिळून त्या दिवसाचा आनंद साजरा करायचे – ‘ दुधाची तहान ताकावर ‘ म्हणतात ना.. अगदी तसंच.

या वर्षीही नेहेमीप्रमाणे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या मुलाचा फोन आला.. अर्थात नेहेमीसारखाच विडियो कॉल… दोघांनाही खूप आनंद झाला आणि लगेच त्यांनी मोबाईल उचलला.. मुलगा – सून दोघेही स्क्रीनवर दिसत होतेच,  आणि सेवकरामांचा आठ वर्षांचा मोठा नातू आणि अजून तीन वर्षेही पूर्ण न झालेला धाकटा नातूही स्क्रीनमध्ये त्यांना बघण्यासाठी आई-बाबांना बाजूला सारण्याचा प्रयत्न करत होते. दिवाळी म्हणून आजी-आजोबांनी मांडलेली सुंदर पूजा दोन्ही नातू अतिशय उत्सुकतेने बघत होते.. आणि आजी-आजोबांचा आनंद जणू गगनात मावेनासा झाला होता.

– – मोठ्या नातवाने आजोबांच्या घरची दिवाळी.. पूजा.. सगळं काही आधीही पाहिलेलं होतं. पण धाकट्या नातवासाठी ते सगळंच नवीन आणि वेगळं होतं.. आणि त्याचं कुतूहल त्याच्या चेहेऱ्यावर पाहतांना सेवकरामही फार खूश झाले होते. मग मोबाईल हातात घेऊन ते घरभर फिरत होते. बाहेरची रोषणाई.. आणि त्या रोषणाईसोबत आसपास सगळीकडेच जणू झगमगत असलेला सणाचा उत्साह आणि आनंद…. सगळं काही त्यांनी त्या सगळ्यांना दाखवलं. धाकटा नातू.. त्याचं नाव होतं ‘देव’.. तो तर कमालीच्या कुतुहलाने सगळीकडे बघत होता. स्वतः हातात धरून फुलबाज्या उडवणारी लहान लहान मुलं आणि फटाक्यांची आतषबाजी करणारी आसपासची मोठी माणसंही बघून तर त्याचे डोळे कमालीच्या कुतुहलाने भरून गेले.. त्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसायला लागली. आणि ते पाहून सेवकराम त्यांच्याही नकळत म्हणाले.. “ next year we all will celebrate Diwali in India “.. हे ऐकताच मुलगा सून दोघेही आश्चर्यचकित झाले. पण देव मात्र जरा वेळ काहीच बोलला नाही.. आणि मग आजोबांच्या इथली रंगीबेरंगी झगमगती दिवाळी पाहून भारावलेला तो त्यांना म्हणाला.. “ no Ajoba.. I would like to come to that side of screen just now.. “……

– – त्याच्या वडिलांच्या हातातल्या त्या मोबाईल स्क्रीनच्या बाहेर दिसणाऱ्या दुसऱ्या बाजूला येण्यासाठी तो मग हट्ट करायला लागला होता आणि त्यासाठी आता रडायलाही लागला होता… सेवकराम आणि त्यांची पत्नी अनुराधा त्या स्क्रीनच्या या बाजूने.. आणि मुलगा-सून स्क्रीनच्या त्या बाजूने असहाय्यपणे एकमेकांकडे पहायला लागले – – 

…. आणि.. आणि काही क्षणातच तो विडियो कॉल कट केला गेला….. पलिकडून.. आणि अलिकडे मात्र मनात रेंगाळत राहिलं देवचं मुसमुसणं……

मूळ हिन्दी कथा : ‘दॅट साइड ऑफ स्क्रीन’ – कथाकार : श्री हेमंत बावनकर 

अनुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

—

(२) दिवे.. वाती.. आणि तेल – – 

एखाद्या शहरातून खळखळत वहात जाणाऱ्या नदीच्या काठाला हल्ली ‘नदीकाठ’ म्हणत नाहीत बरं का.. तर त्याला मुद्दाम सुशोभित करून ‘ रिव्हर फ्रंट ‘ असं म्हणतात.. आता आधीचे ते हिरव्यागार तजेलदार वृक्षांनी सजलेले सुंदर नैसर्गिक काठ म्हणजे जणू भूतकाळ झाला आहे. निसर्गाची ओढ लावणाऱ्या अशा

नदीकाठांच्या जागी आता दिसतात मुद्दाम सपाटीकरण करून तयार केलेल्या बागा नाहीतर मैदाने,  सिमेंटचे प्रशस्त रस्ते – सगळं कृत्रिम सुशोभीकरण.

सेवकराम रहातात त्या शहरातूनही ‘ पुण्यसलीला ‘ नावाची एक सुंदर नदी वहाते. रोज पहाटे सेवकराम जवळच्याच एका बागेत चालायला जात असत,  आणि संध्याकाळी मात्र त्यांच्या मित्रांबरोबर या नदीच्या 

‘रिव्हर फ्रंट‘ वर फिरायला जात असत. या नदीच्या काठावर एक सुंदर प्राचीन मंदिर आहे,  जिथे भाविकांची आणि पर्यटकांची नेहेमी ये-जा सुरू असते. त्या मंदिरापर्यंतच्या मार्गावरही आता पूजा-सामान आणि इतर काही वस्तूंच्या दुकानांसाठी सोय करून देण्यात आलेली आहे. आणि मंदिरापासून नदीच्या पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्याही बांधलेल्या आहेत… आता त्या पायऱ्यांवरच संध्याकाळची आरती दिमाखाने केली जायला लागली होती… आणि सगळ्यांनी हे सगळे बदल स्वीकारले होते.

नदीच्या दोन्ही काठांवर असलेल्या घरांमध्ये अजूनही पूर्वीसारखाच सकाळ-संध्याकाळ देवासमोर दिवा लावला जातो,  पण त्याच्या जोडीने आता विद्युत रोषणाईमुळे संध्याकाळी तो सगळाच परिसर छान झगमगत असतो… नदीच्या लाटांवर लहरणारा हा प्रकाश बघण्याचा मनमोहक आनंद काही वेगळाच.

लवकरच या रिव्हर फ्रंटवर एकाच वेळी लाखों पणत्या लावण्याचा विश्व विक्रम करण्याची तयारी सुरू असल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली होती. त्या रम्य प्रसंगाचे साक्षीदार होण्याची संधि अजिबात गमवायची नाही असा सेवकरामांचे मित्र हरिभाऊ यांचा फारच आग्रह चालला होता. रात्री १० ते ११ अशी या कार्यक्रमाची वेळ होती. ते दोघेही ठरलेल्या दिवशी,  ठरलेल्या वेळी नदीकाठावर पोहोचले होते. तिथे अगदी कडक सुरक्षाव्यवस्था होती कारण हा सोहळा बघायला प्रचंड गर्दी झाली होती. कितीतरी लोक स्वयंसेवक म्हणून आपणहून काम करत होते. सगळे दिवे एकाचवेळी सहज पेटवता येतील अशा रीतीने मांडून ठेवले होते.

…. ठरलेल्या वेळी सगळे दिवे पेटवले गेले.. ते दृश्य आणि एकूणच सगळा आसमंत अतिशय नेत्रदीपक.. सुंदर वाटत होता. त्या सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी आकाशात ड्रोन कॅमेरे तयारच होते. वेगवेगळ्या कोनांनी त्यांनी लगेच त्या दृश्याचे कितीतरी फोटो आणि विडियो काढले.. आणि थोड्याच वेळात विश्व विक्रम झाल्याची घोषणाही केली गेली. लोकांनी एकच जल्लोष केला आणि मग कार्यक्रम संपल्याची घोषणा केली गेली. या कार्यक्रमाचे साक्षीदार झाल्याबद्दल सेवकराम आणि हरिभाऊ यांनी एकमेकांचे अभिनंदन केले आणि ते जायला निघाले. त्यांना त्या दिव्यांमधूनच वाट शोधत जावं लागणार होतं…

ते जाण्यासाठी वळले आणि….

…. आणि जागीच थबकले.. त्यावेळचं तिथलं दृश्य मन सुन्न करणारंच होतं.. सुरक्षा व्यवस्था संपली होती..

…. इतक्या वेळानंतर सगळे दिवे हळूहळू विझायला लागले होते आणि अचानक कितीतरी बायका-पुरुष आणि लहान मुलांची एक झुंडच घाईघाईने तिथे पोहोचलीही होती … आणि बघताबघता त्या विझलेल्या दिव्यांवर तुटून पडली होती. त्या दिव्यांमधलं जळका वास येणारं उरलेलं तेल हातातल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ओतून घेण्याची घाई करत होते सगळेच… 

– – सेवकराम आणि हरिभाऊ हतप्रभ होऊन ते दारुण दृश्य बघत तिथेच थबकले होते…. इतका वेळ तिथे रेंगाळलेला प्रकाश अचानक गायब झाल्यासारखा वाटत होता त्यांना….

…. प्रतिष्ठितांचं विश्व विक्रम करण्याचं स्वप्न तर पूर्ण झालं होतं.. पण आत्ता इथे गर्दी केलेल्या या लोकांना त्यांच्या त्या स्वप्नाशी काहीच देणंघेणं नव्हतं… ते सगळेही खरंतर एक स्वप्न घेऊनच तिथे आले होते.. पण त्यांचं स्वप्न फारच वेगळं होतं.. ….

‘ कदाचित आता पुढचे काही दिवस तरी आपल्याला घरी जेवण बनवता येईल ’ हे ते स्वप्न …. तेच डोळ्यात साठवून आशेने ते सगळे तिथे घाईघाईने आले होते… विश्वविक्रम या शब्दाचा अर्थही बहुतेक माहिती नसावा त्यांना …तिथलं आधीचं आनंदाचं.. उत्साहाचं वातावरण या लोकांच्या आरड्याओरड्यात पार हरवून गेलं होतं…. फोटो काढणारे आधीचे ड्रोन आणि सगळे कॅमेरेवाले तर मागे वळूनही न बघता कधीच परतीच्या वाटेला लागले होते.. या आत्ताच्या दाहक दृश्यांचे फोटो काढण्याची गरजच वाटली नव्हती त्यांना.. ना त्यांना,  ना आधीच्या त्या नेत्रदीपक कार्यक्रमाच्या आयोजकांना.. आणि ना तिथे झुंडीने जमलेल्या बघ्यांनासुद्धा …….

मूळ हिन्दी कथा : ‘दिया बाती और तेल’ – हिन्दी कथाकार : श्री. हेमंत बावनकर 

अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “हुंदका…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ हुंदका… ☆ प्रा. भरत खैरकर ☆

हुंदका – – – 

‘आपली गुड्डी आता बरीचशी मोठी दिसते! तिला आठवण वगैरे येत नाही.. कारण आम्ही तिची खूप काळजी घेतो.. “दिदी तेरा देवर दिवाना” ह्या गाण्यावर ती चांगली हातपाय हालविते आणि तोंडाने तोतरे बोल काढून नाचायला लागल्यावर साऱ्यांच्या कौतुकाचा विषय बनते! आम्ही सर्वजण म्हणजे मी, गुड्डी आणि ‘हे’ होळीला बैतुलला येणार आहोत. तुम्हीही या. भेट तिथेच होईल.

आपलीच 

अलका.‘

नारायणची ही मागील १५ मिनिटांपासून पत्र वाचायची तिसरी वेळ होती. त्यानं चौथ्यांदा वाचायला सुरुवात केली, तर बाहेर कसलासा आवाज आला. दोन पोरं कंपाऊंडच्या आतल्या ताराचा बंडल काठीने ओढत होते. त्याने दरवाज्यात ठेवलेली काठी संपूर्ण ताकतीने त्या पोट्ट्यांच्या दिशेने भिरकावली. पोरं तार टाकून पळाली.

आता त्याचं मन मात्र पत्रात लागत नव्हतं. कारण तो नुकत्याच गेलेल्या पॅसेंजर गाडीने येणाऱ्या शंकरची वाट पाहत होता. तो मागच्या आठवड्यात, जो गेला तो अजूनही आला नव्हता. आणि आजच्या पॅसेंजरने येतो असं त्यांना सांगितलं होतं. परवाची होळी असल्यामुळे आजच जब्बार सुद्धा उद्या येतो. म्हणून त्या आत्ताच्या पॅसेंजरने गेला होता. पण शंकर परतला नव्हता. तो आलाच नाही.

रेल्वे खात्यात नारायण ठेकेदारीत काम करायचा. शंकर, जब्बारही त्याचे सहकारी होते. ब्रॉड गेजचं काम सुरू असल्याने लाखो रुपयांच सामान शेडमध्ये नि शेडच्या कंपाउंड मध्ये पडलेलं होतं.. त्याची राखण करण्यासाठी सेक्युरिटी म्हणून तीन शिफ्ट मध्ये तिघं काम करत होते आणि एक जास्तीचा होता. शंकर मात्र मागच्या आठवड्यात गेला तो अजून उगवलाच नव्हता. त्यामुळे शंकरची ड्युटी नारायण, जब्बार आळीपाळीने करीत होते.

हे इतकं महागडे सामान आपण दोन- दोन, तीन तीन दिवट्या लागोपाठ करून राखायचं म्हणजे जिकरीचं काम आहे. थोडसं झोपतो म्हटलं तरी बाजूच्या झोपडपट्टीतील पोट्टे काही ना काही पळवायला तयारच असायचे! त्यामुळे नारायण जरा चिडला होता. त्यातल्या त्यात हे पत्र वाचून त्याला ‘कधी गावाला जातो आणि कधी नाही! ‘ असं वाटत होतं.

पण शंकर यायला हवा.. शंकर तर गोंड आहे! त्यांच्यामध्ये होळी आणि दसरा खूप जोशात मनवतात मग दोन दिवसांवर होळी असताना तो येईलच कसा? ह्या विचाराने मात्र शंकरचा नारायणला खूप राग आला. ‘सालं, आपण किती दिवस झाले बैतूलला गेलो नाही. ह्यांचं काय ह्यांना रोज रोज घरचे लोक भेटतात. मला कुठे तसे? धड आठवड्यातून एकदा तरी भेटता येत नाही. रेल्वेशी संबंधित म्हणून बरं! साहेब लोक तिकीट तरी विचारीत नाही. मागे असंच ह्यांच्या अशा सुट्ट्या मारण्याने आपण गावाला जाणार.. पण गेलो नाही. बायकोने तिच्या भावाला अजनी हेडक्वार्टरला ‘कां आले नाही? ‘ म्हणून चौकशी करायला पाठवलं तिथून तो इथे साइटवर भेटायला आला होता.. ह्या खेड्यात.. किती समजावून सांगावं लागलं होतं त्याला आणि हे मस्त उद्या येतो म्हणून चार चार दिवस गायब होतात.. मी तक्रार करीत नाही याचा अर्थ असा थोडीच होतो.. आता मी जर उद्या गावाला गेलो नाही तर काय वाटेल घरच्यांना.. बाबा घरचा कर्ता माणूसच लगोलग कळवून सुद्धा आला नाही! आणि आपल्या लहान भावाला काय वाटेल? तो तर तेवढ्या लांबून डेहराडून वरून येतोय.. सोबत अलका येणार आहे.. गुड्डीला घेऊन.. लग्न झाल्यावर आपली त्याच्याशी भेटत नाही.. सालभर झालं बहुदा.. अलकाच्या लग्नात आपली गुड्डी केवढीशी होती. धड तिचं दूधही सुटलं नव्हतं.. तर अलकानं आपल्या बायकोकडून तिला मागून नेलं होतं.. ‘आम्हांला करमणार नाही म्हणायची… शेखर ड्युटीवर गेला की तिला कॉर्टरवर गुड्डीची साथ मिळणार होती.. आपण ह्यांचं नुकतंच लग्न झालंय कशाला मध्ये गुड्डी.. वगैरे पाठवायला नको.. म्हणून ‘नाही नाही ‘म्हटलं तरी रडून रडून तिला नेली होती.. शेखरही हट्टाला पेटला होता. शेखरचा हट्ट आपल्याला कधीच मोडवत नाही मग आपणच गुड्डीला त्या दोघांच्या स्वाधीन केलं होतं..

शेखर किती लहान होता. तेव्हाच आपले बाबा वारले होते. मधल्या भावाने बैतुलला एमआयडीसीत नोकरी पकडली होती. तिथे बायकोसह स्थायिक झाला होता. त्यामुळे शेखरच शिक्षण, आईचा सांभाळ आणि आपली नोकरी एवढं सगळं सांभाळाव लागायचं आपल्याला! तेव्हाचा आपला पगार फक्त दीडशे रुपये होता आता शेखरला एकदम साडेपाच हजार रुपये पगार आहे. आईच्या मताचं ऐकलं असतं तर शेखर आज मिलिटरीत नसताच!!

बैतुलला त्यावेळी मिल्ट्री कॅम्प लागला होता. शेखर सकाळी तिथे दूध पोचवायचा. आपल्यापेक्षा तो धट्टाकट्टा वाटायचा. एक दिवस त्याच्या पेपरमुळे आपण दूध द्यायला गेलो तर मिलिटरीच्या साहेबांनी शेखर विषयी विचारून त्याला मिल्ट्रीत टाका असं म्हटलं. मी किती समजूत घालून शेखरला मिलिटरीत टाकला. आता पाहता पाहता त्याच सातव वर्ष सुरू आहे मिलिटरीतलं! मागच्या वर्षी त्यानं लग्न केलं. अलका सारखी सोज्वल भाऊसून मिळाली.. शेखरला पाहिजे होती अगदी तशीच ती आहे. आणि आता ते सर्वजण होळीला येणार आहे.. मी येथे अडकून पडलो एकटा.. ‘ नारायणला हे सारं आठवून आठवून हुंदका दाटून आला. तो बिछान्यावर आडवा पडला.. तर लगेच बाहेर पुन्हा कसला तरी आवाज आला.. नारायण चिडला.. त्यान पुन्हा काठी उचलली आणि बाहेर आला.. तर दरवाजा उघडून शंकर आत येत होता. त्याला पाहून नारायणचा दाटलेला हुंदका अश्रूच्या रूपाने बाहेर पडला..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ Life is a game of chess… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ Life is a game of chess… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

काही दिवसांपासून अजय खूप शांत शांत होता. नेहमी प्रमाणे गप्पा नव्हत्या. त्याला शांत बघायची सवयच नाही. अनिताने शेवटी विचारलेच, •••••

काय झाले? बर वाटत नाहीये का? ? की आॉफिस चे काही टेंशन? ? ••••

अजय म्हणाला, •••• तसं काही नाही ग. काल परागला अचानक भारतात जावे लागले. त्याच्या बाबांना बरं नाहिये म्हणून. हे ऐकून मला पण आई बाबांची आठवण येतेय. आता दोघांचे वय झालंय. या तीन वर्षांपासून आपण भारतात जाऊ शकलो नाही. फक्त फोनवर काय तेवढं बोलण होत. तेही आई बरोबरच. बाबांबरोबर तर तेवढंही बोलण होत नाही. मला खूप अपराधी असल्यासारखे वाटतंय. बाबांबरोबर मोकळेपणाने कधी बोलल्याचे आठवतच नाही. प्रत्त्येक वेळी असंच होतं. बाबांच्या मनातही बऱ्याच गोष्टी असतील ना. कधी त्यांच्या मनातलं समजायचा प्रयत्नच केला नाही. त्यांच्या आयुष्यातील चढ उतार, प्रश्न, पैशाचे प्रोब्लेम, ऑफिसचे टेंशन, त्यांना पण कधी ‘बरं वाटतं नाहिये ‘असं झालं असेलच ना. आता नोकरी केल्यानंतर मला कळतंय किती कठीण काम आहे हे. त्यांनी कसे मॅनेज केले असेल? ? ?. माझे व ताईचे कॉलेज शिक्षण साधारण एकाच वेळेस झाले. जेमतेम मिडिल क्लास परिस्थिती, बाबा एकटेच कमविणारे, घरी आई सर्व छान सांभाळत होती. पण बाबा नेहमी मागेच राहिले. त्यांच्याही काही इच्छा असतीलच ना. •••

अग! आई नेहमीच महत्वाची पण बाबांना का विसरलो मी? ? ?. •••••

आईने नऊ महिने पोटात सांभाळले. घरही छान सांभाळले, बाबांनी पण कष्ट केले. नोकरी केली. पैसे कमविले. स्वतः ला मागे ठेवून घराच्या, मुलांच्या आवश्यकता पूर्ण केल्या. मला पंचवीस वर्षे सांभाळले. आपल्या परिस्थिती च्या बाहेर जाऊन अमेरिकेला जायची माझी इच्छा पूर्ण केली. ••••

‘ बाबा म्हणजे पाठीचा कणा. ‘ म्हणून मागे राहून घराला आधार देत होते का? ? पण मी त्यांना का समजू शकलो नाही.? ? ? त्यांनी आपल्या किती तरी इच्छा मागे ठेवून आमचं ऐकलं. ••••

मागे आपण भारतात गेलो, तेंव्हा मी आपल्या मित्रांना जास्त वेळ दिला. आई बाबांनी काही सूचना पण दिल्या होत्या. आई म्हणाली होती… •••”अरे, कुलकर्णी काकांना भेटून ये. त्यांना बरं नसतं आता. तुझी आठवण नेहमी काढतात. ” •••

आईला आपल्या घरी भजन करायचे होते. तिला आपल्या सूनेला मैत्रिणींना दाखवायचे होते. आपण शेजारच्या लोकांना भेटावे, असे तिची इच्छा होती. एकदा सर्वांना घरी बोलवायचे ठरविले होते तिने. पण तेही जमले नाहीच. आई बोलून तरी दाखवते, बाबा मात्र शांत असतात म्हणजे दिसतात. ••••

किती छोट्या अपेक्षा होत्या त्यांच्या आपल्या कडून. पण त्याही आपण पूर्ण करत नाही. काही ही विरोध न करता, तक्रार न करता, आपल्या मनाची सहज समजूत घालतात. याउलट आपल्या येण्याची जय्यत तयारी करून ठेवतात. ••••

आता यावेळेस आपण गेलो की पूर्ण वेळ आई बाबांनाच द्यायचा. काही दिवस घरी राहून, तू तुझ्या आई बाबांना भेटायला जा. तेथे रहा. नंतर मी येईनच. त्यांच्या लहान सहान इच्छा पूर्ण करायच्या त्यांची सर्व कामे मार्गी लावायची. मेडिकल चेक अप, घरातील आवरासावर, ठरवून सगळी कामं करून‌ येऊ. त्यांच्या वयाप्रमाणे, सवयीनुसार घरात काही बदल करुन घेऊ. •••••

यावेळेस अजय अनिताचा ‘ India Visit Plan ‘ ठरला होता. फक्त घर, आई बाबा, मुख्य म्हणजे यावेळेस तो बाबांना वेळ देणार होता. बाबांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी गप्पा मारणार होता. मला तुमच्या बद्दल काय वाटतं? ? तुम्ही आमच्याकरिता जे काही केले, त्याबद्दल तो धन्यवाद म्हणणार होता. त्यांना मिठी मारणार होता. त्यांच्या तब्येतीची चौकशी करणार होता. पेंडिंग कामं पूर्ण करणार होता. ••••

बरोबर आहे, •••••

” Your best teacher is your last mistake. ”

म्हणतात ना, ••••

 

” रिश्ते निभाने के लिए बुद्धि नहीं, दिल की शुद्धि होनी चाहिए ।”••••••

येथे आई बाबा दोघेही अजय अनिता येणार म्हणून खूप आनंदात आहेत. ••••

आई. बाबांना म्हणाली, •••••

यावेळेस आपण आपल्या कडून काही सांगायचे नाही, •••काही काम सांगायची नाही. •••याला भेटा, •• त्यांना फोन करा ••असं काही म्हणायचे नाही. •• एकतर मुलांना वेळ कमी असतो. ••त्यांचे काही कार्यक्रम ठरलेले असतात. •• खरेदी असते, •• ‘ वैशाली ‘ मधे सर्व मित्र जमतात, •• धमाल करतात. एकदा का पुन्हा परत अमेरिकेत गेले की त्यांना तरी कुठे वेळ मिळतो? ? ?. ऑफिसच काम, घरचे काम सर्व त्यांनाच तर करायचे असते. ••••

आपण सर्व साहित्य घरी आणून ठेवूया. त्यांना जेंव्हा वेळ असेल, ते जे म्हणतील तेवढं करायचे. सामान काय नंतर ही वापरता येते. मी त्या वेळेस भजनाला वगैरे काही जाणार नाही. आपण घरातच असायला हवे नाही का? ? ••••

असे आईने ठरवूनच ठेवले. •••

आई बाबांना म्हणाली… ••••अहो, तुम्ही घरी घालायला काही नवीन कपडे घेऊन या. , नवीन टॉवेल, टॉयलेट पेपर, बिसलेरी पाण्याच्या बाटल्या, अशी आईंने लिस्टच बाबांना दिली. अजय अनिताची खोली स्वच्छ करून ठेवली. एअरपोर्ट वर जायला टॅक्सी व नंतर ही येथे फिरायला टॅक्सी ड्रायव्हर बरोबर बोलून ठेवले. ••••

आईने मावशींकडून फराळाचे सर्व पदार्थ तयार करून घेतले. दिवाळीची सर्व तयारी हळूहळू सुरू केली. ••••

यावेळेस अजय अनिताला काय द्यायचे? ? या विचारात आई होतीच, तेंव्हा बाबा म्हणाले, •••• अगं! काही ‘ fixed deposit ‘ आहेत ते, या महिन्यात मॅच्युअर होतील. तेंव्हा तुला काय द्यायचे असेल ते दे. काही प्रश्न नाही. आई ने अगदी दोन पाकिट तयार करूनच ठेवली. ••••

दोघेही एकमेकांना भेटायची आतुरतेने वाट बघत होते. यावेळेस दोघांचा माइंडसेट मात्र वेगळाच होता. ••••

यावेळेस दिवाळी वेगळीच साजरी झाली. दोन्हीकडून एकमेकांना समजण्याचा, काळजी घेण्याचा प्रयत्न होता. आईने घरी भजन ठेवले. सुनेची ओळख करून दिली. अमेरिकेतुन आणलेले चॉकलेट व केसरची छोटी डबी सर्वांना दिली. •• शेजारच्या सर्वांना एकत्र बोलावून अजय अनिता शी ओळख करून दिली. ••• छान पार्टीच केली. अजय अनिता ओळखीच्या काका काकूंना भेटून आले. •••आई बाबांना जेथे एकटं जाण जमतं नाही, तेथे टॅक्सी ने घेऊन गेले. ••• अजयने आईच्या हातचे सर्व पदार्थ खाल्ले. लहानपणी खाल्लेल्या काही पदार्थांची डिमांड केली. ••• अजयने बाबांसाठी T shirts आणले. •• जाताना मला हे सर्व न्यायचे आहे असं म्हणून एक लिस्ट आईच्या हातात दिली. ••••

आईसाहेबांचा उत्साह तर बघण्यासारखा होता. •••

यावेळेस बाबा व अजयला गप्पा मारताना बघून आई चे डोळे सारखे भरून येत होते. हे आनंदाश्रु ती पदराने पुसत होती. मनोमन देवाचे आभार मानत होती. ••••

अजय बाबांना त्यांच्या नोकरी बद्दल, तुम्ही पैशाची गुंतवणूक कसे करत होता? ? त्यावेळचे आॉफिस कल्चर कसे होते.? ? ? एकंदरीत बाबांना बोलतं करत होता. त्यांचे मन समजायचा प्रयत्न करत होता. •••

कुठे तरी अजयला समाधान मिळत होत. बाबा पण खूप खुश होते. ••••

यावेळेस दिवाळी वेगळीच पार पडली. बाहेरच्या दिव्यांच्या प्रकाशापेक्षा, प्रत्येकाचे अंतर्मनात जास्त प्रकाश होता. मन उजळून निघाले होते. ••••

लहानपणी रस्ता पार करताना एक नियम शिकवला होता. ” थोडं थांबा, डावीकडे बघा मग उजवीकडे बघा, मग पुन्हा डावीकडे बघून रस्ता पार करा” ••••

खरंय, हाच नियम आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर पाळावा, सुसाट धावताना, थोडं थांबावं, काही राहिलं का? ? द्यायचे? ? घ्यायचे? ? बोलायचे? ? याचा विचार करावा. वेळेवर मन हलके करून टाकावे. म्हणजे पूढे पश्चात्ताप करायची वेळ येणार नाही. ••••

म्हणतात ना, ••••

” Life is a game of chess. You cannot undo the moves but you can play the next move better. ” •••

” इतरांच्या आनंदासाठी केलेला प्रयत्न स्वतःचा आनंद द्विगुणित करतो. ” ••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सिल्वर लायनिंग – –  लेखिका :  सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

☆ सिल्वर लायनिंग – –  लेखिका :  सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

“ ताई, मी आज लवकर घरी जाऊ? त्यो मेला कालपास्नं पिऊन पडलाय.. घरातच.. जिता हाय का न्हाई ते तरी बघत्ये एकदा” गंगूचे शब्द ऐकताच सुचेतानं लॅपटॉप वरचं काम थांबवून तिच्याकडे बघितलं.

“गंगू, असं काय बोलतेस? जा बरं घरी पटकन आणि बघ त्याच्याकडे! ” सुचेताने गंगूचा पगार तिच्या हातात ठेवला. वर शंभर रुपये जास्त दिले.

“अग, ताई काय वाईट बोलल्ये मी? त्याला सांगितलया..

भाईर पिऊन रस्त्यावर पडण्यापेक्षा घरीच पी. रस्त्यावर पडतोय कुटतरी अन् मग शोधून घरी आनावं लागतं…आता घरीच पितुया. ते फार चांगलय. ” गंगू पगार झाल्यानं खूष झाली होती. मटणाचे भाव लई वाढलेत म्हणत तिनं पैसे तिच्या लाल रंगाच्या चंचीत ठेवले.

सुचेता काही बोलली नाही पण बाबांचं व्यसन आई व आपण गंगूसारखं कधीच स्वीकारू शकणार नाही याची तिला परत एकदा जाणीव झाली. बाबा त्यांच्या उच्च वर्तुळातील मिटींग्ज मध्ये पिऊन घरी आले की ती व आई कोमेजून जात असत. दुसऱ्या दिवशी बाबा “परत कधी घेणार नाही” म्हणत केवळ पुढच्या वेळेपर्यंत! त्याला काहीच अर्थ नव्हता. पण बाबांना घरी पिऊ द्यावं हे आईला कधीच मानवलं नसतं. आईला रडत बसलेली बघून सुचेतालाही रडवेली व्हायची.

गेली पंचवीस वर्षं गंगू सुचेताकडे कामाला होती. दोन मुली व एक मुलगा होता. नवरा असून नसून सारखाच होता. तो दारू पिण्यासाठीच जन्माला आला होता. किराणा मालाच्या दुकानात बरी नोकरी होती पण ती त्याच्या दारूमुळं टिकली नाही..

“ताई, तो मनानं लई चांगला हाय.. आपण दारू पिनाऱ्यास शिव्या देतो.. पन मानूस का प्यायला लागला ह्ये नाही बघत कधी.. हाल झालेत त्याचे.. ” गंगू त्याची कुठली चांगुलकी घेऊन सारवासारव करत बसली होती ईश्वराला ठाऊक. ती त्याला अस्सल ठेवणीतल्या शिव्या मोजत असे पण नंतर मटण भाकरी खायला घालत असे. भुगा झालाय शरीराचा म्हणून दूध पाव देऊन त्याला झोपवत असे.

गंगूच्या संसाराचं वस्त्र छप्पन ठिगळं लावूनही फाटत आलं होतं. पण तरी ती ते पूर्ण फाटू न देण्याचा तिचा निश्चय कधीच डळमळला नाही. कौशल्यानं ती एकेक नवं ठिगळ जोडत राहिली! मोठ्या मुलीनं, मीनाने, एका ख्रिश्चन तरूणाबरोबर पळून जाऊन लग्न केलं तेव्हा सुचेतानं गंगूकडील नव्या शिव्यांचा साठा ऐकून कान झाकून घेतले.. पण त्यानंतर पोरं सासरी गेली.. मी तिची नीट पाठवणी केली नाही.. म्हणून डोळ्याला पदर लावलेलाही सुचेता बघत होती! मीना पळून गेल्याच्या तिसरे दिवशी गंगू कामाला आली ती बदाम वेलदोडा घातलेला शिरा घेऊनच!

“ताई, किरीस्तावाशी लगीन केलं मीनाने एवडं सोडलं तर बाकी समदं उत्तम हाय. प्रामानिक हाय मुलगा. त्याचं हाटेल आहे. भरपूर पैसा मिळिवतो. स्वताचं घर हाय. सासु सासरं न्हाईत मीनाला. काय वाईट हाय? त्यो म्हनं चर्चला घेऊन जातोया मीनाला अन् किरिस्ताची गाणी शिकवतुया! काय बी वाईट न्हाई. समदे देव सारखचं बघ. समदे चांगल्या गोष्टीच करा म्हनतात.. आणि दारू न पिनारा मानूस म्हणजे द्येवच की! छान हाय जावई माजा. ब्येस झालं मीनाचं! ”

दोन दिवसात आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून तिचं तिनं स्वत:साठी जे तत्त्वज्ञान बनवलं ते ऐकून सुचेता चकित झाली होती. धर्म बदलला म्हणून मुलीशी नाळ तोडलेले तिचे काका काकू नातवंड झालं तेव्हा जळाबाहेरील माशासारखे तडफडले होते पण त्यांनी लेकीला माफ केलं नाही की नातू बघितला नाही. सतत पूजा पाठ करणारे काका पारशी माणसाशी लग्न केलेल्या लेकीला कधीच क्षमा करू शकले नाहीत..

आणि ही अडाणी गंगू.. दोन दिवसात लेकीला माफ करून मीनाचं कसं चांगलं झालं साऱ्यांना ऐकवत होती. नात झाली तेव्हा लेकीचं बाळंतपण मनापासून करत होती. “ताई, अळवाचे लाडू करू का मीनासाठी” विचारून दोन लाडू सुचेतालाही खायला घालत होती.

गंगूची धाकटी, शलाका, हुशार निघाली. सरकारी कचेरीत कसलीशी नोकरी करत तिनं तिथल्या एका पोलिसाशी लग्न करून गंगूला सुखाचे चार दिवस दाखवले. पण गंगू सुखानं जगायला जन्माला आलीच नव्हती..

किर्तनाला गेलेला तिचा लेक, सदा, हार्ट अटॅक येऊन जागच्या जागीच गेला अन् गंगू उन्मळून पडली. यातून गंगू सावरणार नाही वाटत असताना मुलाचे दिवस करून कामाला आलेली गंगू सुचेताला म्हणाली, “ताई, बरी हायस नव्हं? डोळ्याखाली लई काळं दिसतया.. भांडलीस की काय सायबांशी? ”

“तापातून उठलेय ग गंगू. तुझा सदा गेला कळलं अन त्याच रात्री एकदम ताप भरला मला. माझ्या जीवाला त्याचं जाणं आणि तुझे हाल झेपले नाहीत. ” सुचेता छताकडे बघत होती..

गंगू खिन्न चेहऱ्यानं हसली. “अगं ताई, मानसाची जन्मायची व जायची येळ ठरलेली असतीया. सदा किरतानाला बसला होता! आवडला विठूरायाला. म्हणाला.. चल रे सदा.. हा तयार झाला. आता इतं राहून तरी कुटलं युध जिंकायचय आपल्याला? चांगलं झालं त्याचं. आपल्याला काय आपलं मानूस हवच असतय. मी कंबर कसून उभी आहे बघ सुनेच्या व नातवाच्या पाठीशी…त्या पोरीचं चांगलं झाल्याशिवाय डोळं मिटनार न्हाई मी.. नातू हुशार हाय माजा!

गंगू डोळे पुसता पुसता हसत होती.. माजं आयुष लई चांगलं गेलं बघ. दु:ख आलं नशीबी पन ताई परत्येक दु:खात ना कायतरी चांगलं दडलं होतं बघ. ते मी शोधाया शिकले म्हनून समदं चांगलं झालं.. नरक नरक मंजे काय दुसरं नाई ताई.. जन्माला येऊन दु:खातलं सुख न दिसनं म्हणजे नरक. लई दिलं देवानं! काय बी तक्रार नाही माझी! ”

तिनं हात जोडले. त्या रापलेल्या चेहऱ्यावरून फक्त कृतज्ञता ओघळत होती. देवावर राग नव्हता की नशीबावर राग नव्हता. कुठल्या तोंडानं ती तक्रार नाही म्हणत होती तिचं तिलाच ठाऊक!

महिनाभरात तिच्या कपाळ्यावरच्या अधेली एवढ्या कुंकवाचा धनी पण दारू पिऊन गेला तेव्हा तिच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब आला नाही. ती त्याच्या तिरडीजवळ शांत बसली होती. मयताला आलेल्या लोकांकडे बघून म्हणाली,

“गेला ते बरं झालं.. दारू तरी सुटली. आपल्या समाजाचा या दारूने लई नाश केलाय.. किती कुंकवं पुसली.. आता तरी शिका आणि सोडा दारू नाहीतर रोज एका मयताला जाऊ आपण सगळे. ” तिचा थरथरणाऱा आवाज तेथील स्तब्धता चिरत गेला. रोज दारू पिणारे काही महाभाग मान खाली घालून उभे होते.. फारशी आशा न ठेवता गंगू काहीबाही बोलत राहिली आणि बाया बापडे ते ऐकत राहिले..

सुचेतानं तिच्या लॅपटॅापकडे बघितलं. एक मेसेज फ्लॅश होत होता. बुध्द तत्वज्ञानाच्या एका कोर्ससाठी ती नाव नोंदवत होती. स्क्रीनवर मेसेज होता..

“बुध्द टिचिंग्ज वर्कशॅाप”

“Be happy not because everything is good, but because you see good in everything”

Register in next 10 mins to save your spot..

गंगू आतून चहा घेऊन आली.

“लई अंधारून आलंय ताई.. चहा घे. काम झालं नव्हं? मुगाची खिचडी टाकू का? खाऊन घे दोन घास! ”

तिनं उठून गंगूला कडकडून मिठी मारली. हे चालतबोलतं तत्वज्ञान समोर असताना तो कोर्स काय नवीन शिकवणार होता? शाळा न शिकलेली गंगू काय बुध्दाकडे कोर्स करायला गेली होती? संकटांच्या सतत धगीतून आणि ती रोज गाणाऱ्या अभंगातून ते तत्वज्ञान साकार झालं होतं!

गंगू गोंधळून गेली होती. ताईला आपल्यासाठी वाईट वाटतंय? गंगू सुचेताची पाठ थोपटत होती..

“ताई, माज्यासाठी नको वाईट वाटून घेऊ. मी छान हाय. तुज्यासारख्या जीवाभावाच्या, नोकर माणसाला समजून घेणाऱ्या म्याडमकडं मी नोकरी करते. उसनं पैसं मागते. काय खाल्लं काय प्यायलं तू कधी काही विचारत नाहीस.. मला धीर देऊन उभं करतेस.. तू आहेस म्हणून बळ येतं पुढचा घाव सोसायला. यापेक्षा काय हवं माणसाला? ”

Every cloud has a silver lining! ते ज्याला बघता आलं त्यानं सारं काही मिळवलं.. कुणाच्या आयुष्यात काळे ढग येत नाहीत? पण त्यामागे लपलेलं इंद्रधनुष्य बघता आलं पाहिजे.. ते बघण्याची इच्छा व सामर्थ्य असावं लागतं.. ते केवळ आपल्या साधनेतून निर्माण होतं! सुचेतानं डोळे पुसले.

लॅपटॅापवरील बुध्दाच्या कोर्सची विंडो केव्हाच बंद होऊन गेली होती.. Expired असा मेसेज दिसत होता..

आकाशात काळे ढग दाटून आले होते.. कधी कोसळेल माहित नव्हतं..

त्या ढगांची चंदेरी कड शोधण्यात सुचेता रमून गेली होती!

(सत्य घटनांवर आधारित)

लेखिका :  सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares