मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाक – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ बाक – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डॉ. हंसा दीप

(तो त्या सर्वांबद्दल विचार करायचा आणि आनंद व्यक्त करायचा. त्या सर्वांना प्रोत्साहन देत असतांना, आतल्या आत कुठेतरी आणि कधीतरी स्वतःबद्दल विचार करतांना उदास होणे हे तर स्वाभाविकच होते.) – इथून पुढे —- 

 मैदानात पाणी पोहोचवणे, कर्णधाराचा संदेश देणे आणि मैदानातील खेळाडूंना शुभेच्छा देऊन परत येणे हे ठरलेले होते. मग तो दिवस आला जेव्हा संघातील तीन खेळाडूंना एकाच वेळी पेटके यायला लागले. मात्र इतरांचा हा त्रास त्याच्यासाठी संधी बनली. आता मैदानात जायची पाळी त्याची होती आणि ज्या दिवसाची तो गेली कित्येक वर्षे वाट पाहत होता तो दिवस आला. तो नेटवर सतत सराव करीत होता. त्याचे हात चांगलेच स्थिरावले होते. तो इतरांपेक्षा अधिक मेहनत करत होता आणि त्याचे आरोग्यही त्याला चांगल्या प्रकारे साथ देत होते. प्रत्येक खेळाडूच्या कमकुवतपणाची स्थाने त्याच्या मनात घट्ट रुजली होती. शेवटी इतकी वर्षे धीर धरल्याचे त्याला गोड फळ मिळाले.

आतापर्यंत तो इतरांचा जयघोष करीत त्यांना प्रोत्साहित करीत होता, पण आता मैदान त्याच्या जयजयकाराने दुमदुमले होते. पण वर्षानुवर्षांपासून ज्या आनंदासाठी तो अत्यंत आसुसलेला होता, जो आनंद त्याने पूर्णपणे अनुभवला देखील नव्हता, नेमक्या त्याच वेळी एका जबर दुखापतीने त्याला बाकावर तर सोडाच, थेट घरीच बसवले. मात्र याच बाकाच्या कृपेने तो केवळ एक उदयोन्मुख खेळाडूच नाही तर एक लढाऊ व्यक्ती बनला. बाकावर बसून प्रेक्षकासारखा सामना बघणे आणि विरोधी संघाचा सामना करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरणे हे दोन संपूर्णपणे वेगळे अनुभव होते. याच संघर्षशील वृत्तीने त्याच्या नशिबाची दारे सताड उघडली. त्या प्रतिक्षेच्या क्षणांत त्याने दाखवलेली संयमी वृत्तीच त्याचे सर्वात मोठे आणि महत्वाचे संचयित धन बनले. तेव्हापासून आजतागायत त्याने मागे वळून पाहिले नाही. हा बाकच त्याची प्रचंड शक्ती बनली. याच बाकावर बसलेला असतांना तो शगुनला सर्वप्रथम भेटला होता, इथेच शगुनने त्याला तो बाप बनणार आहे, ही गोड बातमी दिली होती आणि याच बाकावर त्याला शगुन गेल्याचे देखील कळले होते. या बाकाभोवतीच त्याच्या आयुष्याचे कित्येक अध्याय लिहिल्या गेले होते, आणि हो! अजून किती लिहिण्याचे शिल्लक होते कोणास ठाऊक!

 तो फक्त कामातून निवृत्त झाला होता, आयुष्यातून नाही. तो अनेक ठिकाणी गेला, पण त्या प्रत्येक ठिकाणी तो बाक हजर असायचा. तो त्याला जणू कांही प्रेमळ साद घालत होता, “ये ना! तुझ्या स्वागतासाठी मी इथेही हजर आहे बरं कां! ” निवृत्तीपूर्वी बाक त्याचा सवंगडी होता आणि आता निवृत्तीनंतर तर तो त्याचा आधारच बनला. त्याच्यासाठी बाक ही निव्वळ चार पायांवर उभी राहिलेली निर्जीव अशी बसण्याची जागा नव्हती. त्याच्या आयुष्यात या बाकाला वेगळाच अर्थ होता. या बाकाच्या प्रत्येक पायाने त्याला किती मोठे योगदान दिले. पहिल्याने व्यवसाय बहाल केला, दुसऱ्याने कुटुंब दिले, तिसऱ्याने त्याला आशेने जगायला शिकवले आणि चौथ्या पायाने त्याचा ध्यास जिवंत ठेवला. अशाप्रकारे, त्याच्या आयुष्यातील आनंदाची प्रसन्न पहाट असो वा दुःखाची कठीण काळरात्र, प्रत्येक प्रसंगी हा बाकच त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.

 कधीकधी तो एकटाच बसायचा. मग त्याच्या जीवनात शगुनने प्रवेश केला. दोनाचे चार हात झाले. त्यांच्या संसारवेलीवर दोन कळ्या उमलल्या आणि मग काय, मुलांसोबत चाराचे आठ हात झाले. दोन्ही मुले मोठी झाली. त्यांना पंख फुटले आणि ते त्यांच्या आसमंतात विहार करायला उडून गेले. पुन्हा एकदा, फक्त ते दोघेच पती-पत्नी असे दोघेच मागे राहिले. काळ पुढे सरकत होता आणि एक दिवस हे वर्तुळ पूर्ण करीत शगुन देखील त्याला एकट्याला सोडून निघून गेली, कधीही न परतण्यासाठी! आता फिरून तो शून्यावर येत एकटाच उरला. इकडे तिकडे भटकत जीवनचक्राचे वर्तुळ पूर्ण करीत जिथून सुरुवात केली होती तिथेच तो परत येऊन पोचला. जणू एखादा मूर्ख माणूस आपल्याच घरापासून फारकत घेत दूर दूर भटकून येत परत त्याच घरी येऊन विसावतो. काळाच्या प्रवाहात जुने इमले ढासळत होते आणि नवीन वास्तू बांधले जात होते. अनेक ठिकाणी बाकडे गायबच झाले होते. वयोमानाने थकल्यामुळे आता तो फार दूर जाऊ शकत नव्हता. त्याने आपल्या मुलांकडे तक्रार केली, “माझी शगुन मला सोडून गेली आणि आता एकाकीपणाच्या या वेदना मला असह्य होत आहेत. ” त्याच्या लाडक्या लेकीने यावर एक कल्पना सुचवली, “बाबा, आता तुमच्या अंगणातच तुमचा आवडता बाक बनवून घ्या बरं. बघा, आपल्या स्वतःचा बाक असला की तुमचे सुख तुमच्याच हाती असेल. हवे तेव्हां आणि हवे तितके बसा, आडवे व्हा, अंमळ एखादी छानशी डुलकी घ्या किंवा मस्त झोप काढा. ” हे ऐकल्यासारशी जणू संपूर्ण जगाचा आनंद एकवटून त्याच्या चेहऱ्यावर झळकला होता. लगेचच एका तयार आरामदायी बाकाची ऑर्डर देऊन तो मागवल्या गेला. त्यावर स्थानापन्न होताच त्याच्या चेहऱ्यावरील हास्य म्हणाले, “ह्यॅ! एवढी लहानशी गोष्ट! हे तुला आधीच कां सुचले नाही? ” 

 मात्र प्रत्यक्षात घडले असे की जसजसे दिवस मंदगतीने पुढे सरकत होते तसतसा त्याचा एकमात्र प्रवास खोलीपासून अंगणातील बाकापर्यंतच सीमित झाला. तरीही हे समाधान होते की, कसा का होईना हा प्रवास सुरु होता. त्याच्या मालकीचा तो बाक भलेही घरात होता तरी त्यावर बसल्या बसल्या तो विचारांच्या वेगवान स्वैर अश्वावर आरूढ होत दूरवर मैलोनमैल फिरून यायचा. वर्षानुवर्षे जपलेल्या आठवणींचे चर्वितचर्वण अनवरत सुरूच असायचे. आणि मग, आपल्या स्वतःच्या बाकावर बसण्याचा अपरिमित आनंद काय वर्णावा! त्यात काय नव्हते! प्रेम-ममता, आदर-सन्मान, संवेदना -धैर्य, मोह-माया सर्व कांही!

 उणीव होती एकच, ती म्हणजे वर्तमान स्वीकारण्याचे धाडस! निष्क्रिय क्षणाची संख्या वाढत वाढत शेवटी असंख्यांवर जाऊन पोहोचली. ते क्षण त्याला टोचून टोचून भयंकर वेदना देत गेले. कधीकधी दगडांचे घासून घासून वाळूत रुपांतर व्हायचे तर कधी वर्षे उलटल्यानंतर त्याच रेतीचे ढीग जमा होत तेच कठोर खडक बनत. इतिहासाच्या पानांचे देखील असेच परिवर्तित होणारे थर असत. सरतेशेवटी, एके दिवशी, त्याच्याच प्रिय बाकावर बसल्या बसल्या तो अनंताच्या यात्रेला निघाला, कधीही परत न येण्यासाठी! निर्जीव बाक तिथेच ठामपणे बसला होता चार पायांवर, कुठल्या तरी अनामिक पथिकाची वाट पाहत! अखेरचे मिटण्यापूर्वी त्याच्या अदृश्य, तरीही सजीव नेत्रांनी बाकाकडे रोखून पाहिले. त्या बाकावर एक धूसर प्रतिमा उमटत होती. त्याने ओळखले! बाकावर तूलीच बसलेली होती!

– समाप्त –

हिन्दी कथालेखिका : सुश्री हंसा दीप 

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाक – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ बाक – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डॉ. हंसा दीप

आज तूली या त्याच्या नातीची व्हॉलीबॉल संघात निवड झाली. त्याला असे वाटत होते जणू आपल्या कुटुंबाची परंपरा पुढे जाते आहे. तो मोठ्या उत्साहाने शेवटचे दोन सामने बघायला गेला, पण प्रत्येक वेळी त्याला त्याची नात बाकावरच बसलेली दिसली. ती कधी तिच्या संघाला प्रोत्साहित करतांना दिसत होती, कधी संपूर्ण संघाबरोबर जयजयकार करताना दिसली, तर कधी संपूर्ण संघात दाटीवाटीने सामील होताना दिसली. त्या निरागस बालिकेला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी तो तळमळत होता. त्याला समाधान याचे वाटत होते की तूली संयमाने आणि संतुलन राखून वागत होती. घरी आल्यानंतरही तिने अजिबात तक्रार केली नाही. त्याला एकाच गोष्टीची भीती वाटत होती की जरी ती काही बोलली नाही तरी तिला मनातल्या मनात या गोष्टीचे शल्य नक्कीच बोचत असणार.

मात्र तूलीला जास्त काळ वाट पाहावी लागली नाही. लवकरच ती खेळू लागली आणि संघातील एक विशेष खेळाडू म्हणून ती ओळखल्या जाऊ लागली. आता मात्र त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. मंडळी, खेळ कोणताही असो, कांही खेळाडू नेहेमीच बाकावर तिष्ठत बसलेले असतातच, आपली पाळी केव्हां येईल याकडे अत्यंत आतुरतेने डोळे लावून बसलेले असतात ते! आजकाल टीव्हीवर क्रिकेट सामने पाहतांना, त्याची नजर मैदानापेक्षा बाकांवर बसलेल्या खेळाडूंकडेच जास्त वळायची. ते कधी मैदानावर पाण्याच्या बाटल्या घेऊन जायचे, तर कधी मैदानात खेळणाऱ्या फलंदाजाची बॅट बदलण्यासाठी. कधी तर कर्णधाराचा शीघ्र संदेश देण्यासाठी सुद्धा त्यांना मैदानावर जावे लागे. त्याने आयुष्यभर हेच तर केले होते. खेळ जीवनाचा असो वा मैदानातला, हा बाक त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून राहिला. एका पतीच्या नात्याने त्याने पत्नीसोबत याच बाकावर बसून प्रेमाचे हितगुज केले. वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर जेव्हां तिची साथ सुटली, त्यानंतरही या बाकावर ती कित्येकदा अवचितपणे येत त्याला लगटून बसल्याचा त्याला भास व्हायचा. दोघांचे संभाषण सुरू व्हायचे, अनवरत चर्वितचर्वण असायचे ते!

तो एक पिता होता, साहजिकच कामे आटोपताच फुरसत मिळाल्याबरोबर तो बागेतल्या बाकावर निवांत बसून विश्रांती घ्यायचा. आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल, त्यांचे आयुष्य स्थिरस्थावर होण्याबाबत आणि त्याच्या नातवंडांच्या संगोपनाबद्दल अखंड विचार सुरु असायचे. जणू काही एका मालिकेप्रमाणे एकामागून एक घटनाचक्र त्याच्या नजरेसमोर तरळत असे. या घटना असायच्या कधी वर्तमानातील, कधी भविष्यकालीन तर कधी भूतकाळात घडलेल्या. कांहीही असो, तो एक असा खेळाडू होता ज्याने बाकावर बसून जीवनाचे तत्वज्ञान आत्मसात केले होते, जणू कांही त्याच्या जीवनात प्रवेश करणारा प्रत्येक बाक त्याच्या प्रत्येक प्रवासाची दशा आणि दिशा ठरवत होता.

निवृत्तीनंतर एक बाक सोडला तर सर्व कांही मागे राहिले! सकाळचे चालणे असो वा संध्याकाळचे, मध्ये अंमळ विश्रांती घेण्यासाठी तो नेहमी बाकावरच टेकायचा. हालचाल करत राहा, थांबा आणि पुढे जा. घराबाहेर पडण्याचे हे लहान सहान प्रयत्नही आता एका लांब लचक प्रवासासारखे वाटायचे. थोडे चालणे, थोडा वेळ उसंत घेणे, तजेला आला की परत पुढे चालणे हे सुरु असायचे. तेव्हां बाकावरील विसावा त्याला नवीन ऊर्जा देत राहायचा, कारण त्याच्या शरीरात ना आता पूर्वीसारखी ताकद राहिलेली होती ना मनामध्ये तशी उभारी! तरीही, प्रत्येक दिवस काहीतरी नवीन अनुभव देऊन जायचा. प्रत्येक दिवसाचा छोटेखानी प्रवास, एक अनवट अनुभव आणि एक अपरिचित भावविश्व घेऊन अवतरायचा, जणू कांही ही नुकतीच घडलेली घटना आहे.

बाकावर बसताच, त्याच्या भूतकाळातील असंख्य स्मृतींच्या रिळांच्या गुंडाळ्या जणू फ्लॅशबॅकसारख्या उलट्या दिशेनं गोल गोल फिरायला लागत. ती स्थळे, चेहरे, घटनाक्रम… सगळे त्याच्या समोर उभे ठाकायचे. भूतकाळाच्या राखेत दबलेले कित्येक स्फुल्लिंग वाऱ्याची चाहूल लागताच अग्निज्वालेचे रूप धारण करण्यास आसुसलेले असत. दैवदुर्विलास असा की बऱ्याच गोष्टी आपल्या समोर असतानाही अदृश्य असतात आणि ज्या नसतात त्या सतत आपल्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचत गात असतात. कदाचित यालाच आपण म्हातारपण म्हणतो, जेव्हा शरीर आणि मन यांच्यातील गुंतागुंतीचे संबंध अधिकच जटिल होत जातात. जणू काही तलम रेशमी धागे एकमेकांत गुंतत आणखीनच विचित्रपणे गुंफले जातात. त्यामुळे पडलेल्या गाठी उलगडण्याऐवजी अधिकच घट्ट होत गुंतागुंतीत भर घालतात आणि त्यांच्यातच विचित्रपणे अडकलेले तन व मन या अस्वस्थतेत भरच टाकीत जाते.

आजही, नेमक्या त्याच गोष्टी जणू त्याला चिडवण्यासाठी मुद्दाम त्याच्यासमोर आल्या होत्या. या त्याच गोष्टी होत्या ज्यांना आयुष्यभरासाठी विसरण्याची त्याची इच्छा होती. त्याने त्या गोष्टींपासून सुटका मिळवण्याचा जितका कसून प्रयत्न केला, तितक्याच इर्षेने त्या त्याचा पाठलाग करीत त्याला आयुष्यभर छळत राहिल्या. जीवनातील खडतर काळातल्या आठवणींच्या उभ्याआडव्या धाग्यांनी विणलेल्या शुभ्र कापडावर पडलेला अमिट डाग कधीही नष्ट होत नाही कापड फाटेस्तोवर धुतला तरी! कित्येक वर्षे उलटून गेली, पण ती घटना जणू काही आत्ताच घडल्यासारखी ताजी वाटत होती. जेव्हां संघात त्याची निवड झाली, तेव्हां त्याच्या आनंदाला पारावर नव्हता. घरच्या, कुटुंबातील इतर सदस्यांच्या आणि गावातील सर्व लोकांच्या आनंदाला उधाण आले होते, अभिमानाने त्यांची हृदये काठोकाठ भरून गेली होती. त्यांच्यापैकीच एक असा मुलगा जन्माला आला होता ज्याने त्यांचे आणि गावाचे नांव गौरवान्वित केले होते. राष्ट्रीय संघासाठी खेळणे ही खरोखरच फारच अभिमानास्पद गोष्ट होती. खेळाडूचा गणवेश घातल्या घातल्या त्याचा फोटो काढल्या गेला. आता सामना सुरू झाला, एक, दोन, तीन. खेळाडूंची मोजणी सुरू होती. पण त्याचे दुर्दैव असे की त्याला खेळण्याची संधी मिळालीच नाही. वाट पाहणाऱ्या बाकावर बसल्या बसल्या तो प्रत्येक खेळाडूचा कमकुवतपणा आणि त्याचे वैशिष्ट्य बारकाईने ओळखू लागला. तो त्या सर्वांबद्दल विचार करायचा आणि आनंद व्यक्त करायचा त्या सर्वांना प्रोत्साहन देत असतांना, आतल्या आत कुठेतरी आणि कधीतरी स्वतःबद्दल विचार करतांना उदास होणे हे तर स्वाभाविकच होते. 

– क्रमशः भाग पहिला 

हिन्दी कथालेखिका : सुश्री हंसा दीप 

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गोऽऽड चकली…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? जीवनरंग ?

☆ “गोऽऽड चकली…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

नाॅक नाॅक रेवा…

…. ‘दिवाळी’ रेवाच्या घराचा दरवाजा नाॅक करत होती.

शेवटी आज रेवानं दरवाजा उघडला. काय करणार? प्रोजेक्टची डेडलाईन. रियाच्या एक्झॅम्स.

निखीलच्या टूर्स… कुठल्या तोंडानं ” आली माझ्या घरी ही दिवाळी.. ” म्हणणार?

दुनिया सोचती है, आयटीवाल्यांची काय? रोजच दिवाळी..

जिसकी जलती है जान…. जान दो. आजचा रविवार कारणी लावायचा. तिघांचं अमेझिंग शॉपिंग दोन दिवसांपूर्वीच झालेलं.. अँमेझाॅनवर.. आँनलाईन. हल्ली शाॅपींग काय, दर आठवड्याला चालायचं.

दिवाली तो बहाना है…

कुठल्यातरी कंपनीवाल्या लोकांनी, घराची सफाई करून दिलेली. रियानं तर रेडिमेड किल्लासुद्धा आणून ठेवलाय गॅलरीत. फराळ सुद्धा आँनलाईन आँर्डर करून ठेवलाय. सिर्फ चकली छोड के..

– – खरं रेवा तशी हौशी कलाकार. ही आँनलाईन दिवाळी तिला फारशी आवडायची नाही. सगळं चकचकीत असलं, तरी तो दिवाळीचा आनंद आँफलाईन झालेला.. ईस बार नही.. निदान चकल्या तरी घरी करायच्या. थोडा तरी दिवाळीचा फील यायला हवा.. रेवाला स्वतःची ईनव्हाॅल्व्हमेंट हवी होती, दिवाली सेलीब्रेशनमध्ये. चार दिवस फोनाफोनी चाललेली. निखिलच्या आईनं सांगितलं तसं मिक्श्चर. कालच भाजणी दळून आणलेली.

‘ गुड माॅर्नींऽऽऽग रेवा.. ‘मिशन चकली’ स्टार्टस्. ’ 

स्टीलच्या सोऱ्यातून सहज गोल गोल चकल्या पडू लागल्या… किती सोप्प झालंय…

रेवाला ती लहान असतानाची दिवाळी आठवली. जड लाकडी सोऱ्यातून, दात ओठ खावून चकली पाडणारी, रेवा…, , रिया आणि निखील पण सपोर्टला होतेच. छोटी रिया बटर पेपरवर, गोल गोल चकल्या पाडू लागली… रेवाला लहान झाल्यासारखं वाटलं. रेवा अन् निखिल चकल्या तळू लागल्या. खमंग वास सुटलेला. रेवाच्या हेअरडूवाल्या काही चुकार बटांनी त्यांची जागा सोडलेली. त्या घुंगराली बटांनी, मध्येच रेवाच्या हातांनी, ओल्या भाजणीचं लोशन लावलं. या अवतारात रेवा क्युटच दिसत होती.

.. प्रिन्सेस रियाचंही चकली करतानाचं सेल्फीसेशन झालं. निखिलसे रहा नही गया.. त्यानं पटकन् रेवाचा अन् त्याचा सेल्फी घेतला.

एकंदर प्रोजेक्ट चकलीचं टीम वर्क जोरात चाललेलं… हसत… खिदळत… आत्ता कुठं दिवाली माहौल वाटत होता… टी. व्ही, लॅपटाॅप, सेलफोन सगळे सगळे पडिक झालेले.. खमंग चकलीचा घमघमाट सुटलेला… सऽही दिवाली माहौल क्रियेट झालेला.

बस… रेवाला हेच तर हवं होतं. आता खरं दिवाळी आल्यासारखं, वाटत होतं. निदान चकल्या तरी झाल्या हे बघून, रेवा चकल्यांसारखी खुशखुशीत झालेली.

रियानं पटकन् डिश घेतली. चकल्या ठेवून खायला सुरवात. एकीकडे चकल्या तळणं चाललेलं. दुसरीकडे आँनलाईन चकली खाणं.. बढिया….

जमली.. चकली छानच झालेली. चटक मटक चकली.. रेवा जाम खुश… तिला ही खुशी कोणाबरोबर तरी शेअर करावीशी वाटू लागली. आईची सवय आठवली.

…. तिनं पटकन् एक डिश घेतली. पाच सहा चकल्या ठेवल्या. अन् शेजारच्या फ्लॅटची बेल दाबली.

साठेकाकू… रेवाच्या शेजारच्याच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या… दोघचं दोघं. त्यांचा मुलगा स्टेटस् मध्ये.

गेल्या सात वर्षात सात मिनटंही बोलणं झालं नव्हतं..

रेवाच्या कामाच्या वेळाच… रेवाचं हे असं वागणं.. खरं तर हे फ्लॅटकल्चरमध्ये न शोभणारं… तरीही..

साठेकाकूंनी दार उघडलं. प्रसन्न हसल्या. ‘ हॅपी दिवाली ‘ झालं. काकांनी पटकन् चकलीचा तुकडा मोडत, चकलीचं तोंड भरून कौतुक केलं..

…. रेवा उडत उडत घरी.

चकली गोऽऽड झाल्यासारखी वाटत होती.

पाचच मिनिटात साठे काका- काकू, साजूक तुपातले बेसन लाडू घेवून हजर.

आहाहा… मस्त चव… निखिल, रिया जाम खूष.

“आम्ही पण फार काही करत नाही फराळाचं. रेडिमेडच आणतो. लाडू तेवढे करते. दोघंच दोघं किती खाणार? “

“ पुढच्या वेळी लाडूचं प्राॅडक्शन डबल करा…”.. निखिल हक्कानी नेटवर्कसारखं बोलला.

“ अन् चकलीचंही.. ” साठेकाकांनी टाळी दिली.

मस्त दोन तास गप्पा चाललेल्या. रिया नवीन आजी आजोबांवर जाम खूष. घर भरल्यासारखं वाटत होतं.

आनंदानं ‘दिवाळी’ रेवाच्या घरात शिरली होती.

खरं सेलीब्रेशन. दिवाली का मजा तो ‘सब’के साथ आता है.. अकेलेमें तो सिर्फ फेसबुक पढा जाता है…

रेवानं केलेली चकली.. दिवाळीला गोऽऽड करून गेली… 

!!! हॅप्पी दिवाली!!! सर्वांनाच…

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देशी विदेशी… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ देशी विदेशी… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(आजोबा सांगत, ’ माझ्या आजारामुळे फार नुकसान झालं माधवचं. म्हणून तर त्याने सगळं लक्ष तुझ्यावर केंद्रित केलं बरं सारंग. तू खूप शिकावंस, घराण्याचं नाव पुढे न्यावंस हे ध्येय होतं त्याचं. त्याने फार सोसलंय रे पोरा. त्याला यश दे.’) – इथून पुढे —– 

…. आजोबा अचानक एक दिवस झोपेतच गेले. त्या घरात मग राहिले फक्त माझे आईवडील. मला त्यांनी रत्नागिरीला वसतिगृहात ठेवलं. माझी तीव्र बुद्धी बाबांच्या लक्षात आली होती. मी बोर्डात दुसरा आलो… मग मी मुंबईला गेलो. अतिशय धडपड करून, शिकवण्या करून, कॉलेजच्या मेसचे हिशेब ठेवून, त्या बदली जेवण फुकट मिळे. असा पैसे मिळवत, पूर्ण स्कॉलरशिपवर डॉक्टर झालो. मला आणि माझ्या गरीब आईवडिलांना अभिमान वाटावा असं यश मिळवत गेलो मी.

…. हे मी प्रौढीने नाही सांगत हो, पण ही वाट सोपी नव्हतीच आम्हा कोणालाच. मग मी न्यूरो सर्जरीत एम एस केलं. बँकेचं कर्ज काढलं आणि इकडे आलो. पुन्हा इथे चार वर्षे शिकलो. शेवटच्या वर्षी मात्र गोल्ड मेडल मिळवणारा एकटा भारतीय विद्यार्थी होतो मी.

…. मग मात्र मला अजिबात कष्ट झेलावे लागले नाहीत. मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये बोलावणी येऊ लागली आणि मी इथे स्थिरावलो. हे शहर फार आवडलं मला. भरपूर पगार सुंदर काम. आता मात्र यशाचे दरवाजे उघडे केले मला देवाने…

…. माझ्याबरोबर माझी सहकारी म्हणून सिल्व्ही होती. अत्यंत गरिबीतून जिद्दीने वर आलेली सिल्व्ही. जमैका सारख्या देशातून आलेली. उपाशी राहून एकवेळ जेवून आपलं शिक्षण पूर्ण करणारी सिल्व्ही. तिलाही न्यूरो सर्जरीची ही फार अवघड ब्रॅंचच हवी होती. ज्यात मुली सहसा जात नाहीत.

पण सिल्व्हीचे यशच इतके उत्तुंग होते की तिला इकडे सहज प्रवेश मिळाला… आम्ही कधीतरी कॅफे टेरियात भेटत असू. लाजरी, अबोल, कायम दडपलेली आणि आपल्या वर्णामुळे सतत कॉम्प्लेक्स बाळगणारी सिल्व्ही फार गुणी होती… कोणात न मिसळणारी, अभ्यासू आणि एकटीएकटी रहाणारी.

…. तो दिवस अजून आठवतो मला… एक अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मी करत होतो. सिल्व्ही माझी फर्स्ट असिस्टंट होती… निम्मी शस्त्रक्रिया झाली आणि अचानकच मला चक्करआली. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी खाली कोसळलो. भूल देणारे डॉक्टर, असिस्टंटस् नर्सेस सगळे घाबरून गेले. पेशंट तर अजून भूलीखालीच होता. अजून थोडी शस्त्रक्रिया बाकी होती. मला पटकन उचलून इमर्जन्सी मध्ये ऍडमिट केलं… सिल्व्ही माझ्या जागेवर आली. शांतपणे तिने ऍनेस्थेशिया देणाऱ्या डॉक्टरांना खूण केली की ‘ ऑल ओके? शाल आय कंटिन्यू? ’

– – तिने ती शस्त्रक्रिया अतिशय कुशलतेने पार पाडली. अतिशय उत्तम रीतीने तिने ही उदभवलेली परिस्थिती हाताळली. शेवटचे टाके घालताना मात्र सर्व थिएटरने टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं.

.. रोज राऊंड घेत असताना ती मला सगळा फीडबॅक देत होती. तो पेशंट उत्तम बरा झाला. बंद थिएटर च्या दाराआड काय काय होत असते याची कोणाला कल्पना सुद्धा येत नसते.

. तो पेशंट पूर्णपणे बरा होऊन घरी गेला.

…. दरम्यान सिल्व्ही माझ्याजवळ मोकळी होत गेली. सिल्व्ही अनाथाश्रमात वाढली. चर्चच्या ऑर्फनेज मध्ये काढलेले दिवस मला सांगताना तिला अश्रू आवरत नसत. अत्यंत तल्लख बुद्धी घेऊन जन्माला आलेली सिल्व्ही अपार कष्ट करून इथपर्यंत आली. तिची रेखीव चर्या, चेहऱ्यावरचं हुषारीचं तेज मला भुरळ घालू लागलं.

…. एक दिवस मला म्हणाली, “ माझी आई नक्की गोरी आणि वडील आफ्रिकन काळे असतील ना? म्हणूनच मी खूप काळी नाही झाले. आणि हे घारे डोळे पण माझ्या गोऱ्या आईचीच देणगी मला दिलेली. ”.. हसून सिल्व्ही म्हणे. माझ्या पोटात अपार प्रेम दाटून येई या मुलीसाठी.

…. मी या गुणी मुलीच्या चक्क प्रेमात पडलो. सिल्व्हीला मी प्रपोज केलं.

तिने मला पटकन होकार दिला नाही. म्हणाली ” तू इंडियन आहेस ना? तुमच्या व्हॅल्यूज वेगळ्या असतात कॅरी…” मला हॉस्पिटलमध्ये करकरेन म्हणता कॅरीच म्हणतात लोक.

.. तर सिल्व्ही म्हणाली “मला पूर्ण आदर आहे इंडियन लोकांबद्दल. पण तुझे आईवडील तयार होणार नाहीत मला स्वीकारायला. आणि तेही सहाजिकच आहे कॅरी. तू तुमच्यासारखी इंडियन मुलगीच बघ. तू जास्त सुखी होशील आणि तुझ्या आईवडिलांनाही सुखी करशील. ”

.. पण मी तिच्या प्रेमात आणि गुणांत आकंठ बुडालो होतो.

.. मी जर भारतात कधीही परत जाणारच नव्हतो तर मला काय फरक पडणार होता सिल्व्ही काळी आहे का गोरी आहे का मिक्स आहे याचा? .. उरला प्रश्न माझ्या आईवडिलांचा. मलाही खूप टेन्शन आलं की कोकणातले दशग्रंथी कर्मठ ब्राम्हण असलेले माझे वडील हे मान्य करतील का? आई काय म्हणेल?

इतर नातेवाईक काय म्हणतील? मी माझ्या आईवडिलांना हे काहीही न सांगता त्यांना अमेरिकेला या असं सांगितलं.

…. शेजारच्या बापू साठेला पैसे पाठवले आणि पासपोर्ट व्हिसा सगळयाला माझ्या वडिलांना मदत करायला सांगितलं. त्यानेही सगळं काही केलं आणि मग मी आईबाबांना तिकीट पाठवलं. बापू साठेने त्यांना मुंबई एअरपोर्टला बसवून दिलं.

– – आईबाबा जन्मात पहिल्यांदा विमानात बसले. मी त्यांना एअरपोर्टवर उतरवून घ्यायला गेलो. मला बघून त्यांना आनंदाने रडूच आलं. माझी मोठी गाडी, घर बघून त्यांना धन्यधन्य झालं. “जिंकलंस रे पोरा. शाबास.! “ बाबांनी पाठीवर हात ठेवून म्हटलं. मला आमच्या कुलदैवताचा नीळकंठेश्वराचाअंगारा लावला.

…. संध्याकाळी आम्ही आधीच ठरवल्याप्रमाणे सिल्व्ही आली. “. नमस्कार आईबाबा. कसा झाला प्रवास? ” तिने हसतमुखाने विचारलं.

“ ही कोण? “ आईबाबांनी विचारलं.

“ मी सिल्व्ही. ” इंग्लिशमध्ये उत्तर देत ती म्हणाली, “ मी कॅरीबरोबर त्याच्याच हॉस्पिटलमध्ये काम करते. आज तुम्ही येणार म्हणून सुट्टी घेतली आम्ही. ” सिल्व्ही म्हणाली.

आईबाबांना तिने तिच्या कारमधून मॉलमध्ये नेलं. सगळं छान दाखवलं. आईला एस्केलेटर मध्ये कसं चढायचं ते दाखवलं. पटापट ग्रोसरी घेतली. आईबाबांना मजा वाटली. तिने त्यांना माझ्या घरी सोडलं आणि ती निघून गेली.

“सारंग ही मुलगी कोण? तू हिच्याशी लग्न तर करणार नाहीस ना बाबा? ही तर धड गोरी नाही की काळी नाही. कशी काय चालणार आपल्या दशग्रंथी घराण्यात? ” बाबांनी क्षणभरही उसंत न घेता विचारलं.

.. त्यांनी बॅगेतून तीन चार फोटो माझ्या पुढे टाकले. “ बघ बघ या मुली. ही परांजप्यांची मेधा, ही भाटे.. डॉक्टरांची अश्विनी. बघ. अगदी योग्य आहेत तुला. उगीच कसले तरी धाडस करू नको बाबा. ”

मला हे सगळं अपेक्षितच होतं.. मी फक्त आईकडे बघितलं. आई हसली. म्हणाली, ” अहो. ठेवा ते फोटो बॅगेतच. या मुली ना, आपल्या कोकणातच ठीक आहेत. त्यांचा इथे निभाव लागणार नाही. ही अमेरिका आहे आणि आपला मुलगा मोठा सर्जन आहे. त्याला या मुलीने किती समर्थपणे मदत केली आणि ते मोठे ऑपरेशन पूर्ण केलं हे सांगितलंय मला सारंगने. कमाल वाटली मला या पोरीची. प्रेम आपुलकी सगळं सगळं आहे हिच्याकडे. शिवाय आपल्या मुलाच्या खांद्याला खांदा लावून शिकलीय सुद्धा. उगीच खोडे घालू नका. गुंतले आहेत हे दोघे मनानं बरं. ”

“ सारंग, तू खुशाल लग्न कर सिल्व्ही शी. आम्हाला पसंत आहे हो ही मुलगी. अरे, मनं गुंतली आहेत ना तुमची? मग आता मागे नको बघू. नातेवाईक आणि लोकांचा कसला विचार करतोस पोरा? आम्ही इथे आलोच आहोत तर बाबा देतील की विधिवत लग्न लावून. काय हो? काय म्हणता? ”.. आईने मला दिलासा दिला.

.. क्षणभर विचार करून बाबा म्हणाले, “ ठीक आहे रे. तू सुखी तर आम्ही सुखी. खुशाल करा लग्न. पार्वतीबाई, पटलं बरं तुमचं म्हणणं. या मुली इथे योग्य नाहीत. त्या कोकणातच ठीक. इथे ही सिल्व्हीच अगदी योग्य आहे हो. ”

पुढच्या महिन्यात आई बाबांनी आमचं विधिवत लग्न लावून दिलं. आणि ते निश्चिन्त मनाने भारतात परत गेले.

– – डॉक्टर सारंग ही हकीगत आम्हाला सांगत होते. ” मावशी, या निर्णयाचा आम्हा दोघांनाही कधीही पश्चाताप झाला नाही. वीस वर्षे झाली आमच्या लग्नाला. दुर्दैवाने चार वर्षांपूर्वी माझी आई अचानकच लहानशा दुखण्याने गेली. आणि मग बाबाही फार राहिले नाहीत. पण मला खूप समाधान आहे की माझं हे वैभव, बायको मुलं बघूनच समाधानाने ते गेले….. मावशी, तुम्हाला त्या लग्नात बघितलं. तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या जावयाशी लेकीशी अगदी प्रेमाने बोलत होतात ना, ते बघून मला माझ्या आईचीच आठवण झाली… ती नसती ना तर कदाचित सिल्व्ही पटली नसती बाबांना. पण माझ्या चतुर आईने हे ओळखून माझं लग्न लावून दिलं… काकू खरंच सांगतो.. तुमच्यात माझी आईच दिसली मला. म्हणून मी बोलावलं तुम्हाला… माझी नाळ तर भारताशी पूर्ण तुटलीच आहे आता. माझं तिकडे कोणीच नाही आता. ” डॉक्टर सारंग स्तब्ध झाले.

– – मी त्यांच्या जवळ बसले… ” हे बघ मुला, खूप छान वाटलं तुला भेटून. अशी कर्तृत्ववान मुलं फार कमी असतात रे. खूप चांगलं केलंस तू आम्हाला भेटायला बोलावलंस, मन मोकळं केलंस ”.

…. सिल्व्ही माझ्याजवळ येऊन बसली. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. भाषेपलीकडची भाषा सिल्व्हीला समजत होती… त्या दोघांनी पुन्हा मला वाकून नमस्कार केला.

“ मावशी, फार बरं वाटलं तुमच्याशी बोलून. माझी आई भेटल्याचं समाधान मिळालं मला. पुन्हा आलात की नक्की नक्की या. ” असं मनापासून म्हणत डॉ सारंग आणि सिल्व्हीने आम्हाला निरोप दिला.

– – नि:शब्द होऊन आम्ही आमच्या घरचा रस्ता धरला.

–  समाप्त –  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देशी विदेशी… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ देशी विदेशी… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

माझा मुक्काम होता अमेरिकेत. आता जायची वेळ जवळ आली होती आपल्या घरी भारतात.

अचानक मुलगी म्हणाली, “ आई एका अगदी जवळच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे. तू इथे आलेली माहीत आहे तिला. तिने खूप आग्रहाने बोलावलंय तुला. पुढच्या शनिवारी लग्न आहे. आपल्याला जायचंय बरं का. नेहमीसारखं म्हणू नको, माझी ओळख नाही मी येत नाही, तुम्ही जा. तू रुपल शहालाओळखतेस ना? तिच्याच मुलीचं आहे लग्न. बघ तरी, अमेरिकेत आपले लोक लग्न कसं करतात ते. ” 

पुढच्या आठवड्यात निमूट तयार झाले छान साडी नेसून. आणि गेले त्या भव्य पंचतारांकित हॉटेलात लेकीबरोबर.

दारात स्वागताला उभ्या असलेल्या रुपलने मला मिठी मारली आणि म्हणाली, ” आलात आंटी? कित्ती छान वाटलं मला तुम्ही आलात म्हणून. ”

रुपल गुजराथमधून आलेली मुलगी. खूप खूप पूर्वी तिचे आईवडील इकडे आले आणि खूप झगडून इकडे सेटल झाले. रुपल आणि तिचा भाऊ इथेच जन्मले शिकले. उत्तम गुजराथी मराठी हिंदी बोलतात… रुपलची मुलगी चारू बिझनेसमध्ये होती आणि चांगली नोकरी होती तिला.

तिने तिचा नवराही शोधला, सुदैवाने तोही गुजराथी होता. रुपल, तिचे व्याही अगदी हौसेने सगळे लग्नविधी अगदी परंपरागत करत होते.

इकडे आता विधिवत लग्न लावणारे मराठी, गुजराथी गुरुजीही उपलब्ध असतात. मला हे सगळं बघून मजा वाटत होती. एरवी बिझनेस सूट घालणारे वधूवर आता पारंपरिक घागरा चोळी आणि शेरवानीत नटून मिरवत होते. पुन्हा वधूला हे एवढे ढीगभर दागिने.

.. लग्न लागलं आणि मग जेवायची व्यवस्था शेजारीच मोठ्या हॉलमध्ये केली होती. केवढा तो थाटमाट. पाच प्रकारची पक्वान्ने, आणि हे एवढे पदार्थ. निरनिराळे काउंटर्स नुसते ओसंडून वहात होते.

निरनिराळ्या जातीधर्माचे काळे गोरे, मराठी, सगळ्या प्रकारचे लोक तिथे हजर होते आणि सगळा समारंभ आनंदाने एन्जॉय करत होते.

मी मुलीशी मराठीत बोलत असताना अचानक एक साधारण पन्नासच्या दरम्यान वय असलेला गृहस्थ माझ्याजवळ आला.

“काकू, तुम्ही मराठीआहात ना? “ 

त्याने मला विचारलं.

“हो हो. मी पुण्याहून आले. या माझ्या मुलगी जावई आणि नातीला भेटायला. आता मी पुढच्या आठवड्यात परत जाणार भारतात. ”

तो म्हणाला, “ मी बसू का इथे? ” 

“अहो बसा ना. विचारता काय? ” आपली प्लेट घेऊन तो आमच्याशेजारी आला.

” काकू मी डॉ सारंग करकरे. मी न्यूरोसर्जन आहे. इथल्या अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये मी काम करतो. ” 

– – हे ऐकून जावई मुलगी उठून उभेच राहिले.

“अहो सर, तुमचं नाव चांगलंच ऐकलंय आम्ही. पण प्रत्यक्ष बघितलं नव्हतं कधी तुम्हाला. सॉरी हं. खूप प्रसिद्ध आहात सर तुम्ही. आमच्या ओळखीच्या एका काकांची सर्जरी तुम्हीच केलीय. खूप छान बरे आहेत आता. खूप आनंद झाला तुमची ओळख झाली म्हणून ”… जावई मुलगी अगदी भारावून जाऊन म्हणाले.

सारंग हसून म्हणाले, ”ते सगळं असू दे हो. या मिसेस रुपल शहाच्या काकूंच्या ब्रेन ट्यूमरची मी सर्जरी केली ना म्हणून मी इथे आलो. नाहीतर सहसा मी लग्न कार्य अशा समारंभाला जात नाही. वेळच नसतो हो मला. ”

मुलगी जावई रुपलला भेटायला गेले हे बघून डॉ सारंग म्हणाले, ” काकू, मुद्दाम तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी आलो. बोलू का? तुम्ही अगदी माझ्या आईसारख्या दिसता हो. अगदी जणू सख्ख्या बहिणी वाटाव्या इतकं साम्य आहे तुमच्यात. मी मगाचपासून बघतोय तुम्हाला. न राहवून आलो मग बोलायला. ” 

मी म्हटलं ”अहो छानच की मग. खुशाल बोला की माझ्याशी. आई नाही पण मावशी म्हणून तर बोलता येईल ना आपल्याला? ”

सारंगच्या डोळ्यात पाणी चमकलं. “मला प्लीज अरे सारंग म्हणा मावशी तुम्ही. आता तर मावशीच म्हणेन तुम्हाला मी….. तर सांगायची कथा अशी या एका भेटीत संपणार नाही. तुम्ही पुढच्याच आठवड्यात जाताय ना? “.. त्यांनी आपल्या भारी अँपल वॉचमध्ये तारखा बघितल्या, कामाचे शेड्यूल बघितलं… “ परवा. परवा मी संध्याकाळी एकदम फ्री आहे. “

माझ्या जावयाला त्यांनी विचारलं, “परवा तुम्ही दोघे माझ्या घरी मावशींना घेऊन याल का? डिनर करूनच मग घरी जा. प्लीज प्लीज. ” सारंग अगदी मनापासून कळकळीने म्हणाले. मी लोकेशन मॅप पाठवतो. मावशींना घेऊन नक्की याल ना? “

“नक्की येऊ सर. ” जावई म्हणाले.

लग्न समारंभ संपल्यावर आम्ही घरी आलो. तेवढ्यात डॉ सारंगचा लोकेशन मॅप आला.

तो बघून लेक म्हणाली. ”बाप रे. या कम्युनिटीत अतिशय श्रीमंत लोक रहातात. चार गराज, स्वीमिंग पूल, आणि अगदी राजवाड्यासारखी असतात इथली घरं. आणि अतिशय महाग सुद्धा. अर्थात इथले डॉक्टर्स तुफान पैसा कमावतात म्हणून त्यांना शक्य होतं हे. कौतुक आहे ना? आपला एक मराठी डॉक्टर याठिकाणी घर घेऊ शकतो याचं. आई तुझ्यामुळे आमची या डॉ करकरेंशी ओळख होतेय. नक्की जाऊया आपण. ”

मी भारतातून अशीच कोणाकोणाला भेट द्यायला होईल, म्हणून नेलेली श्रीकृष्णाची पितळी मूर्ती आणि खाऊ घेऊन आम्ही ठरलेल्या दिवशी त्यांच्या घरी गेलो.

स्वतः डॉ सारंग अगदी साध्या कपड्यात स्वागताला उभे होते. किती साधे आणि हसतमुख.

“या.. या ना मावशी. ” वाकून नमस्कार करत त्यांनी मनापासून आमचं स्वागत केलं.

मी उत्सुकतेने आत बघितलं. त्यांनी हाक मारली, ” सिल्व्ही, मुलांना घेऊन बाहेर ये ना. ” 

– – आतून आली ती कृष्णवर्णीय स्त्री आणि अगदी पूर्ण तिच्याच सारखी दिसणारी दोन मुलं. असतील तेरा आणि पंधरा वर्षांची, पण ती पूर्ण काळी नव्हती. तर काळा पण तांबूस काळा रंग आणि घारे डोळे होते तिचे. पण केस मात्र अगदी अफ्रोसारखे, कुरळे. मुलांचेही केस तसेच आणि डोळे मात्र पिंगे.

सिल्व्ही इकडे दिसतात तशी मिक्स आफ्रो अमेरिकन असणार. काळे वडील गोरी आई. पण अतिशय बांधेसूद आणि मुलंही अगदी तिच्याचसारखी दिसायला.

“हा मुलगा श्याम आणि ही मुलगी मीरा. ” डॉक्टरानी ओळख करून दिली. ’नमस्ते आजी’ म्हणत अस्खलित मराठीत बोलत दोन्ही मुलांनी आम्हाला वाकून नमस्कार केला.

सिल्व्ही म्हणाली, ”बसा ना. कशा आहात तुम्ही? ”

मी तिच्या तोंडून मराठी ऐकून स्तंभित झाले.

ती हसून म्हणाली, “सारंगने मला मराठी शिकवलं आणि इथे दर रविवारी मराठी शाळा भरते तिथे आमची मुलं जातात. त्यांनाही छान येतं मराठी बोलता”. मुलं आत निघून गेली.

सिल्व्ही म्हणाली “ मावशी, जरा कुकिंगचं बघते हं. ” ती आत गेली.

आम्ही या धक्क्यातून अजून सावरले नव्हतो. अर्थात चेहऱ्यावर तसं आम्ही दाखवलं नाही. तिने दिलेलं सरबत आम्ही घेत होतो.

डॉ सारंग म्हणाले “आरामात बसा. घाई नाही ना जायची? मावशी, मुद्दाम तुम्हाला बोलावलं माझं घर 

दाखवायला आणि माझी कहाणी सांगायला. आम्ही एरव्ही असं कोणात फारसे मिक्स होत नाही. वेळच नसतो हो आम्हाला कामातून. ”

“या सिल्व्ही पण तुमच्यासारख्या डॉक्टर आहेत का? ” मी विचारलं

” हो. ती पण नावाजलेली न्यूरोसर्जन आहे. आम्ही दोघेही एकाच हॉस्पिटलमध्ये काम करतो. ” 

आणि डॉ सारंग सांगू लागले… …

अतिशय हेक्टिक दिवस होता तो. मला आधीचे दिवस अतिशय काम होतेच. त्या दिवशी तर जवळजवळ बारा तास मी उभा होतो. अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करताना थकून गेलो अगदी. ते ऑपरेशन संपलं आणि मी अगदी थकून घरी आलो. पुन्हा पुढचे दोन दिवस मला अशीच प्लॅन केलेली ऑपरेशन्स होती. मी तरुण होतो. झाली त्यालाही आता पंधरा वीस वर्षं. असेन तिशीत मी तेव्हा. खूप उत्साह आणि भारतातून आल्याने स्वतःला सिद्ध करण्याची धडपड. माझे बॉस डॉ स्टीफन यांचा मी आवडता शिष्य झालो. खूप शिकलो मी त्यांच्याकडून.

…. मी खरं तर कोकणातला. करकरे कुटुंबाच्या निदान चार पिढ्या तरी पेंढे गावच्या..

रत्नागिरीजवळचं अगदी लहान गाव. शाळा होती ती आधी फक्त सातवीपर्यंत पण नंतर झाली दहावी पर्यंत.. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. माझे वडील दशग्रंथी ब्राम्हण. थोडीशी शेती, आणि उपाध्येपण हाच उदरनिर्वाहाचा मार्ग. माझे आजोबा सांगायचे की.. माधव.. माझे वडील, अतिशय बुद्धिमान. पण आजोबांना अर्धांग वायूचा झटका आल्याने बिचाऱ्या माधवला सगळी संसाराची जबाबदारी अकाली घ्यावी लागली. आणि नाईलाजाने त्याने घरी असलेले गुरुजीपण स्वीकारले. केवळ नाईलाज. त्याला ही खंत कायम राहिली. आजोबा सांगत, ’ माझ्या आजारामुळे फार नुकसान झालं माधवचं. म्हणून तर त्याने सगळं लक्ष तुझ्यावर केंद्रित केलं बरं सारंग. तू खूप शिकावंस, घराण्याचं नाव पुढे न्यावंस हे ध्येय होतं त्याचं. त्याने फार सोसलंय रे पोरा. त्याला यश दे.’

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “नवरात्रीचा सण…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “ नवरात्रीचा सण…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

आज नवरात्र सुरू होतय्. मी एकदम खुश होते. आधीच ठरवलं होतं, की रोज सकाळी ऑफीसला जाण्यापूर्वी, देवीच्या देवळात जाऊन यायचं. मुलगी यायला तयार झाली, तर तिला पण घेऊन जायचं. ह्यांना विचारण्यात काहीच पॉईंट नव्हता. एकदम नास्तिक माणूस आहे. माझ्या जाण्यात पण त्यांनी खो घातला असता.

आज मुद्दामच सकाळी लवकरच उठले. सगळ्या चपला, सॅन्ड्ल्स उचलून मोठया बॅगेत भरून ठेवल्या. उगीच घालायचा मोह व्हायला नको. आता ‘नो फूट् वेअर फॉर नाईन डेज्’. नो स्लीपर्स ऑलसो’.

आजचा रंग निळा होता. निळ्या रंगाची साडी /मॅचिंग ब्लाउज /मॅचिंग पर्स / मॅचिंग गळ्यातले-कानातले घालून तयार झाले. इतर वेळ असती, तर मॅचिंग सॅन्डल्स पण असते, असो. मुलीला येते कां? विचारले, तर चक्क ‘हो’ म्हणाली.

मुलगी : आई, मी येतेय्, पण, साडी बीडी – नो वे, रंगाचे बंधंन – नो वे, आणि मी पायात बुट घालणार. कबूल असेल, तर बोल?

मी : अग, मनू, ९ दिवसांचा तर प्रश्न आहे! इतर वेळा आम्ही तुला काही म्हणतो कां?

मी : (मनात) आणि म्हणूनहि, ही कुणाचं ऐकते कां? ह्यांचे आणि सासूबाईंचे, तिचे नेहेमी अतिच लाड असतात!

मुलगी : अगं, साडीचं फार ओझं होतं. पॅन्ट आणि टी शर्ट नी मोकळं वाटतं. आणि पायात काही नाही, ही तर कल्पनाच करवत नाही. एकतर चालायला सगळीकडे फूटपाथ नाहीत, फुटपाथवरच्या फरश्या बरेच ठिकाणी उखडलेल्या असतात. कुत्री फिरवणाऱ्यांच्या कुत्र्यांनी ठिकठिकाणी शी केलेली असते. परदेशात लोक कुत्री फिरवतात, ते बघून इथे पण लोक कुत्री फिरवायला लागले. ते लोक शी गोळा करायला प्लॅस्टीक पिशवी बरोबर नेतात, पण आपल्याला ते कमीपणाचे वाटते. रस्त्यावर अधे-मधे दारूच्या फुटक्या बाटल्या पडलेल्या असतात. पायात काच गेली म्हणजे संपलेच. आई, अनवाणी चालण्याचं, तू पण जरा जास्तच करते आहेस!

मी विचार केला, मुलगी देवीला यायला तयार झाली, हेच खूप झाले. आम्ही दोघी तयार झालो. निघतांना यांना ‘आम्ही जाऊन येतो’ असे सांगितले. तर, हे म्हणाले, ‘देवीला जाताय, का, फॅशन शो ला जाताय’? मी स्वत:कडे बघितले आणि लक्षात आलं, की गळा आणि पाठ जरा जास्तच मॉडर्न आहेत आणि स्लीव्हलेस प्रकार देवीला आवडेल ना? असा पण विचार मनात डोकाऊन गेला. बाय करून, दोघी बाहेर पडलो. बरेच स्त्री-पुरूष माझ्यासारखेच अनवाणी चालतांना पाहून छान वाटले. दर्शन घेऊन घरी आले. कपाटातली दुसरी निळी साडी काढली आणि ऑफीसला गेले. ऑफीसमधे ८-१० जणी निळ्या साडीत होत्या. अनवाणी मात्र मी एकटीच होते. बॉसनी आणि सगळ्यांनीच त्याबद्दल माझं कौतुक केलं.

सगळ्या म्हणाल्या, सकाळी देवीला अनवाणी जाऊन आलो. बाहेर फारच घाण असते. आता इतर ठिकाणी पायात घातलय, का नाही, हे बघायला देवी कशाला येतेय. त्यामुळे इतर वेळेला आम्ही पायात घालणार.

दिवसभर उपास असल्यामुळे, दुपार नंतर पोटात कावळे काव-काव करायला लागले होते, पण रात्रीपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. संध्याकाळी भाजी आणायला साडी बदलून बाहेर पडले. आज या-ना-त्या कारणानी निळ्या ५ साडयांना बाहेरची हवा लागली. रात्री दिवसांच्या रंगाप्रमाणे, रोज नेसायच्या साडयांचे गठ्ठे करून ठेवले. रोज ५-६ साडया नक्कीच नेसता येतील. अशा रितीनी नवरात्राची सुरूवात छान सुरू झाली.

रोज सकाळी देवी दर्शन, दिवसाच्या रंगाप्रमाणे साडी, अनवाणी बाहेर पडणे, आणि दिवसभर उपास, असे रूटीन सुरू होते. जरा हटके, म्हणून २-३ दिवस छान वाटले. नंतर नंतर, उपास आणि अनवाणी चालणे, याचा त्रास व्हायला लागला. पण आता रेटण्याशिवाय पर्यायच नव्हता.

म्हणता म्हणता नवमी उजाडली. आज गुलाबी रंग होता. आज सुटी घेतली होती. त्यामुळे माझ्या सगळ्या गुलाबी साडया नेसायला, आज भरपूर चान्स होता. सकाळी जरा लवकरच तयार होऊन, देवळात जायला बाहेर पडले. आज मुलीला वेळ नव्हता, त्यामुळे एकटीच होते. देवळात बऱ्याच स्त्रिया दर्शन घेऊन, गाभाऱ्याच्या बाहेर हात जोडून बसल्या होत्या. मी पण पाठ टेकता येईल, अशी जागा बघून, हात जोडून, डोळे मिटून बसले. केव्हा तंद्री लागली समजलेच नाही ~ ~ ~

कोणीतरी डोक्यावर प्रेमानी हात फिरवतय, असा भास झाला. डोळे उघडून बघितलं, तर समोर साक्षात देवी. मी स्वत:ला चिमटा काढायला हात वर उचलला, तर देवी म्हणाली, चिमटा काढून खात्री करण्याची गरज नाही. देवीच तुझ्यासमोर आहे.

देवी : ८ दिवस उपास करून, अनवाणी चालून, खूप दमलेली दिसतेय.

मी : दिवसभर ऑफीसचे काम, नंतर घरचे काम आणि पोटात काही नाही, यामुळे अशक्तपणा वाटतोय आणि अनवाणी चालल्यामुळे टाचा आणि तळवा पण दुखतोय.

देवी : अगं, पण हे सगळं केल्यामुळे मी प्रसन्न होते, असं तुम्हाला कुणी सांगितलं?

मी : देवीमाते, सगळेच सांगतात. पुर्वीपासूनची तशी प्रथा आहे. हे व्रत केल्यामुळे देवी प्रसन्न होते आणि आपले इच्छित प्राप्त होते, असे पण सगळे सांगतात.

देवी : जगामधे असे असंख्य लोक आहेत, की, जे स्वत: करता चप्पल विकत घेऊ शकत नाहीत. महिनों-महिने ते अनवाणी चालत असतात, नवरात्रात पण ते अनवाणीच असतात. नवरात्रात अनवाणी चालण्यामुळे, जर मी प्रसन्न होत असते, तर त्यांच्यावर प्रसन्न झाले नसते कां? कित्येक लोकांना, अनेक दिवस एक वेळचे जेवणच नशीब असते, त्यांचे कायमच उपास घडत असतात, त्यांच्यावर मी प्रसन्न झाले नसते कां? तुम्ही लोक जुन्या परंपरा-रूढी आचरणात आणण्यापूर्वी, त्यावर थोडा विचार का करत नाही?

मी : देवीमाते, मग अशा परंपरा तयार कां झाल्या?

देवी : निरनिराळ्या काळांमध्ये, तेव्हाचा संदर्भ लक्षात घेऊन, लोकांचे त्रास दूर करण्याकरता, लोकांना आनंदात ठेवण्याकरता, तेव्हाच्या संतांनी / ज्ञानी लोकांनी उपदेश केलेले असतात. कांही वेळा असे उपदेश, ज्ञानी लोक मुद्दामच देवतांशी / धार्मिक विधिंशी जोडतात, जेणेकरून लोक उपदेशांचे पालन करतील. काळ पुढे पुढे जात जातो आणि संदर्भ मागेच राहतात. काळाप्रमाणे उपदेशांचे भाषांतर बदलत जाते, त्यातले शब्द बदलतात आणि पुढे काय येते तर — नवरात्रात अनवाणी चाला, रोज उपवास करा, रोज निरनिराळ्या रंगाच्या साडया नेसा, आणि अशा परंपरा-रुढी तयार होतात. आणि हे कां करा, तर देवीला प्रसन्न करण्याकरता.

नवरात्रात अनवाणी चालण्याऐवजी, जो चप्पल विकत घेऊ शकत नाही, अशा कुणाला, तुम्ही चप्पल देऊन, त्याला अनवाणी चे वाणी (अनवाणी च्या विरूध्द वाणी) केले, तर ते मला आवडेल. नवरात्रात उपवास करण्याऐवजी, एखाद्या उपाशी व्यक्तीला अन्न देऊन, त्याचा उपवास बंद करायला मदत केली, तर ते मला खूपच आवडेल. अशा गोष्टी नवरात्रात करा, दिवाळीत करा, गणपति उत्सवात करा, आणि शक्य असेल तर नेहेमीच करत जा. हीच माझी खरी पुजा समजा, हीच मला नेसवलेली साडी समजा, हाच मला चढवलेला भोग समजा.

नवरात्रात तुम्ही रोज निरनिराळ्या रंगाच्या साडया नेसता, हे छानच आहे. नेहेमीच असे कलरफूल रहायला पाहिजे. स्त्री ही प्रेमाचे आणि सौंदर्याचे प्रतिक आहे. निसर्ग जसा रंगांनी भरलेला असतो, तसे मन रंगीबेरंगी ठेवा. जिथे जाल, तिथे आनंद पसरवा, प्रेम पसरवा. तुमचे सौंदर्य तुमच्या कृतिमधून दाखवा, चेहऱ्यावर हास्य ठेऊन दाखवा. त्याकरता अंगप्रदर्शन करण्याची किंवा तू घातले आहेस तसे लो-नेक आणि हाय-बॅक कपडे घालण्याची गरज नाही. स्त्रीयांवरचे अत्याचार वाढत आहेत, त्याचे एक कारण आहे, तुमचे वाढते अंगप्रदर्शन! आजपासून आंधळेपणाचे कोणतेहि अनुकरण थांबवा. रूढी-परंपरा-धार्मिकविधि यामधे दडलेला अर्थ शोधा. जे मनाला पटेल, ज्यानी मन आनंदित होईल, ज्यानी इतरांना आनंद मिळेल, अशाच गोष्टी करा. आणि मग अनुभव घ्या, की परमानंद ही काय चीज असते. आणि परमानंद म्हणजेच ईश्वरप्राप्ति.

असे म्हणून देवीनी माझ्या डोक्यावर हात ठेवला ~ ~ ~ ~

कोणीतरी मला हलवत होते. त्यामुळे माझी तंद्री मोडली. घंटांचा आवाज येत होता. आरतीची वेळ झाली होती. आरती झाली. प्रसाद घेतला. देवीला नमस्कार करतांना असं जाणवलं, की, देवी मंद स्मित करत मला आशिर्वाद देते आहे. देवीनी आज ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवला होता.

उद्यापासून कसे वागायचे, कसे रहायचे, याची मनात उजळणी करत, आणि आपल्याला ईश्वर प्राप्ति झालीच आहे, अशा आनंदात घराकडे निघाले.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “13 / 7…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? जीवनरंग ?

☆ “13 / 7…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

पहिल्यांदाच… गेल्या साडेपाच वर्षांत पहिल्यांदाच.

न सांगता ?.. कधीच नाही.

रोजची सातची गाडी. कराड – चिपळूण. सात वाजता, कराडहून निघणार म्हणजे निघणारच.

अकरा वाजता चिपळूणात पोचायची… चिपळूणला जेवण… तिथनं एक वाजता परत निघायची.

पाच वाजेपर्यंत कराडला परत.

आप्पा कुलकर्णी… ड्रायव्हर. राजू खरमाळे कंडक्टर… आमची जोडी आख्ख्या कराड डेपोत फेमस.

राजूपेक्षा माझी सर्विस बरीच जास्त. जवळपास वीस वर्षे. अजूनपर्यंत एकही अपघात नाही. कृष्णामाईची कृपा….

राजू तसा ज्युनियर. बहुधा दहा बारा वर्षे सर्विस. एसटीच्या सर्विसमधे, आपल्या कामावर मनापासून प्रेम करणारी, फार कमी लोक पाहिलीयेत. त्यात राजू नं 1. खरंच प्रवाशाला देव मानणारा. एखाद्या म्हातारीला हात देवून गाडीत चढवणार. तिचं बोचकं, स्वतः गाडीत घेणार. चिल्लरला कधी नाही म्हणणार नाही. कुणाचा एक पैसा कधी बुडवणार नाही. जीभेवर साखर. सगळ्यांशी गोड बोलणार. कधी कावणार नाही.

तशी आमची ही जनता गाडी… हात दाखवा, गाडी थांबवा.. राजूनं कुठल्या प्रवाशाला, कधीही नाही म्हणलं नाही. गाडीतल्या पोरीबाळींना, पोटच्या पोरींसारखं जपायचा.

चार वर्षांपूर्वीची गोष्ट.

सोमवारचा दिवस. बाजाराचा दिवस. गाडी खचाखच भरलेली. काॅलेजातल्या पोरी. काही ईरसाल पोरं सुद्धा.

चेकाळलेली… आचकट विचकट बोलणं सुरू झालेलं. राजूनं आडवा उभा झाडला त्यांना. त्यांचा म्होरक्या.

उगाच नडायला बघत होता. म्होरक्यानं फोनाफोनी केली. पुढच्या स्टाॅपवर, त्याचे दहा बारा पंटर, हातात दंडुके घेवून ऊभे.

…. मी केबिनमधूनच ओरडलो,

” राज्या, गाडीतल्या म्होरक्याला सोडू नकोस. मी गाडी घेतो पोलीस स्टेशनला. “

.. राजूला त्या म्होरक्याचीच काळजी.

” नको नको. उगा केस झाली तर, साल बरबाद होईल त्याचं. आईबाप रोज रानात राबतात, अन् याची फी भरतात. याला काय नाही, पण आपण फिकीर करायला हवी. काय हुईल ? पाठीत दोन चार रट्टे बसतील.

बसू देत. ह्यो आणि ह्याची गँग.. समजुतीचे चार शब्द सांगून बघतो. नाहीच भागलं, तर होऊन जाऊ दे धूमशान… सरकारी कर्मचाऱ्यावर हात टाकला म्हणूनशान आत जातील पोरं. मंग आपला पण नाविलाज आहे… माझी काळजी करू नकोस. रोज तालमीत जातूया. बाप पैलवान होता माजा. माझा जीव वाचवता येतंय मला… जमलंच तर दोन चार रट्टे मीबी घालीन. “

…. म्होरक्याला अक्कल आली. शब्दांचा मार पुरला. प्रकरण मिटलं.

– – तेव्हापासून गाडीत कुठल्याही पोरीला कधीही, कसलाच त्रास झाला नाही.

.. राजूचा दराराच होता तसा. तो स्वतः रहायचाही अपटूडेट. मस्त इन केलेला शर्ट. पाॅलीश्ड बूट. केसांचा मस्त भांग. इस्त्री केलेला युनिफॉर्म.

‘ एवढ्याशा पगारात कसं काय परवडतं ?’ नाहीच परवडत….

“सौतासाठी नाही, यष्टीसाठी आपण अपटूडेट रहायला हवं. प्रवाशी खूष झालं, तर यष्टीचा इन्कम वाढणार. “

.. पदरमोड करून राजू बरंच काही करायचा. सहा वाजता गडी हजर व्हायचा. डेपो गाठून, गाडीची साफसफाई करून घेणार. स्वतःच्या खर्चाने, गाडीला पडदे लावून घेतलेले. ते वेळच्या वेळी धुवून आणायचा. सीडीप्लेयर लावलेला. चार ताजे पेपर, मासिकं. प्रवाशांना वाचण्यासाठी. गाडीत साईबाबांचा फोटो लावलेला. त्याला मस्त हार घालणार. उदबत्ती लावणार. छान भक्तीगीतांची सीडी लावणार. प्रसन्न वाटायचं. पब्लिक खूष.

 

त्याच्यामुळे मीही बदललो. मीही त्याच्यासारखाच अपटूडेट राहतो. पावणेसातच्या ठोक्याला गाडी फलाटावर लागते. सात म्हणजे सात… गाडी झोकात कराड स्टॅन्डहून निघते. प्रवाशांनी खचाखच भरलेली.

…. साहेब, तुम्हाला सांगतो, आमच्या गाडीची या रूटवर बुंगाट हवा आहे. लोक वाट बघत असतात आमच्या गाडीची. डेपोला सगळ्यात जास्त उत्पन्न मिळवून देते ही गाडी. निम्मे प्रवाशी आम्हाला दोघांना ओळखतात. पब्लिक जाम खुष आहे आमच्यावर.

म्हणून तर…

साडेपाच वर्ष झाली. आमची ड्युटी फिक्स आहे या गाडीवर.. राजू अन् मी. सख्खे भाऊच जणू.

तेरा मेरा साथ.. आणि आमची कराड – चिपळूण. जाऊ दे जोरात…

आजच काय झालं ? एक तर तेरा तारीख. तसा माझा विश्वास नाही. पण..

…. खूप वेळ राजूची वाट बघितली. खूप वेळा मोबाईल ट्राय केला. उचललाच नाही. शेवटी कंट्रोलरनं बदली कंडक्टर दिला. अन् निघालो..

गाडी नेहमीसारखीच झोकात चाललेली. पण गाडीत ‘जीव’ नव्हता.. नेहमीच्या प्रवाशांनी राजूची आठवण काढली.

काय सांगणार ? आम्हालाच ठावूक नाहीये.. बघता बघता पाटण जवळ येवू लागलं. अचानक माझा फोन वाजला. गाडी साईडला घेवून थांबवली.

कंट्रोलरचा फोन.

” आरं, राजूचा एक्सीडेंट झालाय. ड्यूटीवर येताना गाडी स्लीप झाली. डोक्याला मार लागला. अजून बेसुध आहे. काॅटेजला हलवलाय. “

– – मी हादरलो. थांबून चालणार नव्हतं. डोकं बाजूला काढून ठेवलं. उघड्या डोळ्यांनी, गाडी चालवू लागलो. नेहमीसारखा कुंभार्ली ओलांडला. गाडी चिपळूणात शिरली. अकरा वाजलेले. गाडी फलाटावर लावली. भानावर आलो… 

…. ड्रायव्हरचा ‘माणूस’ झालो. नवीन जोडीदारास म्हणलं,

” तू घे जेवून. मी आलो डेपोत जावून. “

चिपळूण डेपोत गेलो. दत्तमंदिरात शिरलो.

” दत्तगुरू, सांभाळून घ्या.

आमच्या राजूला बाहेर काढा या संकटातून. “

* 

अर्धा पाऊण तास झाला असेल. मला वेळेचं भानच नव्हतं. तसाच दत्तगुरूंपुढे बसलेलो. हातात डबा होता.

हिनं राजूभाऊजींसाठी, खास मटकी डब्यात दिलेली. अन् त्याचाच पत्ता नाही.

फोनची रिंग वाजली. दत्तगुरूंचं स्मरण करत, फोन उचलला.

राजूचा भाऊ फोनवर… 

” सुद्धीवर आले हाईती. शीटीस्कॅन केलं. रिपोर्ट चांगले हाईती. धा टाकं पडलं कानामागं. मगाधरनं मागं लागल्याती. आप्पाला फून लावून द्या म्हणूनशान. घ्या बोला त्याच्यासंगट. “

…. माझे डोळे कुंभार्लीतला धबधबा झालेले. बदाबदा वाहू लागले.

राजू खोल आवाजात बोलू लागला.

” आप्पा करमतंय काय ? आज तारीख काय ?”

“ तेरा सात “.

“ आरं, तेरा साथ असा सोडीन काय ? टाकं काढलं की येतू ड्यूटीवर. तोवर सांभाळून घे. “

…. मला पुढे बोलताच येईना. फोन कट केला. आजची तेरा तारीख मला एकदम ‘शुभ’ वाटू लागली.

पुन्हा एकदा दत्तगुरूंचे आभार मानले. जेवून घेतलं. एक वाजता जोडीदारानं, डबल बेल मारली.

” चिपळूण – कराड” निघाली.

.. कधी एकदा कराडला पोचेन असं झालेलं. हायवेला लागलो.

पुढचा ट्रक… त्याच्या पाठीमागे लिहलेलं.

13 मेरा 7

मी मनात म्हणलं…

” हमेशा रहेगा. राजू आलोच रे मी. “

तुम्हालाही… 13/7…. Have a good day!

(कथा काल्पनिक)

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘फुंकर…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? जीवनरंग ?

☆ ‘फुंकर…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

आंघोळ करून आल्यावर कुंकू लावतांना तिचा हात थरथरला. ‘आता हे सौभाग्य लेणं म्हणजे… ‘तिला कापरं भरलं. डोळ्यांची तळी तुडुंब भरली. डॉक्टर म्हणाले होते, “फार हाल होताहेत तुमच्या मिस्टरांचे. त्यांचे हाल देवालाही बघवत नाहीयेत. माझ्याकडून मी प्रयत्न करतोच आहे पण.. बाकी सगळं त्या वरच्याच्या हातात आहे. ” डॉक्टरच ते! स्पष्ट सांगणं त्यांचं काम होतं, पण ते शब्द तिच्या कानात शिसासारखे ओतले गेले. तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

एकांतात ती खूप खूप रडली. पण मुलांकरीता तिने उसनं चंद्रबळ आणलं होतं. एकांतात तिचा बांध फुटायचा, भीषण भविष्याने तिचे हातपाय गळून जायचे. पण सगळ्यांसमोर अश्रू लपवून वरवर अभिनयाचा मुखवटा चढवावाच लागायचा.

दिवस जात होते. भाद्रपद आला. गौराईचा दिवस उगवला. तिच्या मनात काय आलं कोण जाणे, लगबगीने तिने गौरी समोर पांच सुवासिनींची ओटी भरली. ‘गौरायांनो दर वर्षी अशीच संधी, असाच सवाष्णीचा मान मला द्या. मला न्या, पण ह्यांचं आयुष्य वाढू द्या”.

आलेल्या पाचजणींनी मळवट भरून तिची साडी चोळीने ओटी भरली होती. आणि तो मळवट बघून कसे कोण जाणे तिच्या मिस्टरांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ते म्हणाले, “तु अशीच रहा. ” 

पण… पण…. व्हायचं तेच झालं. दुर्दैवाने तिला मागे सोडून 58 वर्षाची साथ सोडून तिला पोरकं करून ते पुढे गेले. दुर्दैव तिचं.

दरवर्षीप्रमाणे तिला माहेरचं सवाष्णीचं बोलावणं भाचेसुने कडून आलं. मनातली खळबळ सांगायला मैत्रिणीसारखी वहिनी पण आता नव्हती. ती पण मैत्रीची साथ सोडून न परतणाऱ्या मार्गावर गेली होती. गौरीचं सवाष्णीचं आमंत्रण द्यायला आलेल्या भाचे सुनेला तिने दाटल्या कंठाने सांगितलं, “हे बघ, आता तू दुसरी सवाष्ण बघ. मी ही अशी ” —

तिला मध्येच अडवत भाचे सून म्हणाली, “आत्या, कोण म्हणतं तुम्ही सवाष्ण नाही, काकांनी तुम्हाला आहे तसं राह्यला सांगितलं होतं, मुलांनी पण मंगळसूत्र ठेवण्याचा आग्रह धरलाय, आणि हो काकांच्या आठवणींचं लेणं हे तुमच्यासाठी सौभाग्य लेणंच आहे नाही का! ते काही नाही, आमचा सगळ्यांचा हट्ट आहे दर वर्षी प्रमाणे माहेरवाशिण म्हणून सवाष्णीचा तुमचा मान चालूच राहणार आहे.

आणि आज गौराईचा प्रसाद घेऊन ती निघाली. हळदी कुंकवाला बायका आल्या होत्या. तिला कुंकू लावतांना एक जण कुजबुजली, “अगं पण आत्या तर…. ” दुसरीने तिला मध्येच दटावलं, पण ते वाक्य ऐकल्यावर ती कावरी बावरी झाली. सकाळपासून गप्पगप्पच होती ती.

भाचेसून हळदी कुंकवाचा करंडा घेऊन तिच्या पुढे उभी राहिली, आणि म्हणाली, “आत्त्या पदर पुढे करा, खणा नारळानी ओटी भरायचीय तुमची. “

क्षणभर ती गांगरली. डोळे पाणावले. कानाशी तिच्या ह्यांचा आवाज आला, ‘कसला विचार करतेस?मी सांगितलं होतं ना तुला, तू आहेस तशीच सवाष्ण म्हणूनच रहाणार आहेस. आणि आता तर नातेवाईकांनी, समाजानी पण ते मान्य केलय. आणि अगं वेडे, तुझ्या मनात, तुझ्याबरोबर तर कायम मी आहेच की. माझ्या आठवणींना, प्रेमाला सौभाग्य लेणंच म्हणायचं. ते तर कायम तुझ्याजवळ असणारच आहे. घे ती ओटी. ‘ 

आणि मग भाचे सुनेने पुढे केलेली ओटी घेण्यासाठी तिने पदराची झोळी केली. ताटकळलेली सून लगबगीने पुढे झाली.

आधुनिक पिढीने पाडलेला तो नवीन पायंडा होता. समाजाने मांडलेल्या जुन्या विचारांना मागे सारून नवीन विचारांची ती मांडणी होती. इतकंच काय, सुनेच्या भगिनी मंडळांनी पण ही प्रथा सुरू केली होती. काही दिवसापूर्वी त्या मंडळाच्या सहवासात तिने हे अनुभवलंही होतं. खरंच त्यांच्या ह्या आधुनिक विचारांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मनात प्रचंड पोकळी निर्माण झालेल्या एकटेपणाच्या भावनेने व्याकुळ झालेल्या दुःखी मनाला तो एक दिलासाच होता असंच म्हणावं लागेल नाही का!

आत्त्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या भाच्याच्या चेहऱ्यावर आत्त्याने परिस्थिती स्विकारली म्हणून समाधानाची रेषा उमटली. कारण आत्याच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघून तोही कावराबावरा झाला होता. प्रसंग वरकरणी साधा पण काळजाला हात घालणारा होता. तिच्या जखमी मनावर घातलेली ती ‘फुंकर’ होती. तिच्या मनात आलं, ह्या जवळच्या माणसांकरीता तरी आहे ते वास्तव आपल्याला स्वीकारायला हवंय, आलेल्या परिस्थितीला सामोरं जायला हवं.

…. गौराईच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याचा, श्रीगणेशाचा आशिर्वादाचा हात उंचावल्याचा तिला भास झाला आणि ती माहेरवाशीण गौरीपुढे नमस्कारासाठी वाकली.

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ केवडा… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ केवडा… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

कपाटातला कडक इस्त्रीचा ड्रेस तिने अंगावर चढवला आणि गाणं गुणगुणत आरश्यात बघत केस विंचरताना तिला मनात विचार आला, .. ’ हा ड्रेस जरा जास्तच भारी दिसतोय, एखादा साधासाच घालू या’ विचारात तिने परत घड्या खालीवर केल्या, .. मग तिची नजर सगळ्यात खाली फारच क्वचित घातलेला आणि माहेरचाच असलेला फिकट गुलाबी ड्रेस जो जास्त वापरलाच नाही गेला त्यावर पडली, …. हाच घालू म्हणत तिने तो घातला आणि परत आरश्यापुढे उभी राहिली, ..

“मुळात रूप सुंदर असल्याने ड्रेस स्वस्त असो नाहीतर महाग जातीच्या सुंदराला काहीही शोभतं त्यामुळे अनु ड्रेस नक्की शिव बरं का.. ” म्हणत मामीने मंगळागौरीला हा ड्रेस देऊन ओटी भरली होती आपली, .. आजी आणि मामी तेंव्हा दोघी गळ्यात पडून खुप रडल्या होत्या, …. “तुझ्या घराण्याला साजेसं प्रत्येकवेळी नाही ग देता येणार आता असं आजी सारखी म्हणत होती, .. “

आपणही किती बदललो खरंच हा ड्रेस ह्या सगळ्या श्रीमंत कपड्याखाली हरवून टाकला, .. खरंतर वर्ष झालं असेल पण आजही आजीचा केवड्याचा गंध आहे याला, … तिच्या त्या छोट्याश्या डबीत महालक्ष्मीला आणलेल्या केवड्याचं अत्तर ती नेहमी बनवून ठेवायची, .. अगदी वर्षभर पुरवायची ते, .. हळदी कुंकू असलं की बायका आवर्जून हात पुढे करायच्या तेंव्हा मामी हलकेच अत्तरदाणीतला कापूस खळखळत्या बांगड्यांच्या साक्षीने त्या सवाष्णींच्या हातावर फिरवायची, … अहाहा अंगणभर दरवळ असायचा, .. आपण रोज खुप मागे लागायचो आजीच्या.. आजी अत्तर दे ना ग.. पण आजी पक्की होती अशी लपवून ठेवायची अत्तरदाणी, .. म्हणायची, ” माझ्या देवीला, गणपतीला, महालक्षुम्यांना राहू दे ग बाई, .. वर्षभर टिकवावं लागतं ग, .. ” आपण रुसलो की मग हळूच झोपताना सुगंधी कापुस मुठीत ठेवायची, .. बाकी मामेभावंड नसायचे ना तेव्हा सोबत, .. सगळी गोधडी मस्त सुगंधी असायची, .. जणू आजीची कुशी म्हणजे केवड्याचं पान आणि आपण त्यात लपलेलं सुगंधी कणीस असंच वाटायचं, ….

आईबापाविणा पोर ह्याचं दुःख मनात ठेवून जीव लावायची ती आपल्याला… सुरकुतलेले हात अंगभर फिरायचे, .. गोष्टीत मध्येच आपण झोपलो असं बघून ती देवाला म्हणायची, .. “केवडा आवडतो रे देवा लेकराला, …. केवड्यासारखं सुगंधी, आनंदी आयुष्य दे माझ्या लेकराला “ म्हणत थंडगार हात आपल्या अंगावर फिरवायची, .. “.. सगळं तिच्या डोळ्यासमोर आलं, .. तेवढ्यात अविने हाक मारली, “अनु अग निघतेस ना, .. लवकर पोहचायला हवं, .. “

मग आरश्यापुढे फार वेळ न लावता अनु निघाली, .. अविने गाडी दारासमोर आणली होती, .. अनुने सासुबाईला नमस्कार केला म्हणाली, “आई शक्यतो रात्रीच परत येतो हं, … ” 

सासुबाई म्हणाल्या, “अग आजीने फार आग्रह केला तर राहा. आजीला बरं वाटत नाहीए.. तू गेलीस तर लवकर बऱ्या होतील, .. एखादा ड्रेस सोबत ठेवा, .. ” बरं म्हणत अनु परत खोलीत गेली, .. तिने परत कपाट उघडलं, .. तिला परत माहेरचीच साडी घेण्याचा मोह झाला, .. ती गुलबक्षी रंगाची जी आजीने पाच गोधड्या शिवून त्या कमाईतून हिला घेतली होती पहिल्या दिवाळसणाला, .. तिने पटकन अविचे कपडेपण घेतले आणि देवासमोर सुपारी ठेवून ती निघाली, .. सासूबाईंनी मोठी पिशवी मागच्या डिक्कीत ठेवली.. म्हणाल्या, “तुझ्या आजीला सांग पौष्टिक खाऊ दिलाय लवकर बऱ्या व्हा आता, .. “

 

 दिवाळीनंतर वर्षभराने अनु गावाकडे आली होती, .. गावाचा रस्ता लागला तसं अनुला त्या मातीची, त्या उडणाऱ्या पाखरांची वेगळीच ओढ वाटू लागली, .. त्या छोटयाश्या टेकडी गणपतीकडून घरंगळत येणारा रस्ता, .. आपण सुसाट पळायचो आजी आणि मामी तोल सावरत, आपल्याला ओरडत खाली उतरायच्या ते आठवून तिला हसु आलं, .. अविचं लक्ष होतंच म्हणाला, “मलाही कळू दे ना आठवणी तुझ्या, .. आवडेल मलाही हसायला, .. “

ती एकदम गडबडली. तिला मनात आलं शहरात श्रीमंत घरात वाढलेला हा, ह्याला काय सांगावं, .. तरी ती बोलायला लागली, .. “अवि आईबाबा मला आठवत पण नाही.. तेंव्हा गेले पण माझं पोरकेपण आजी आणि मामा मामीने झेललं रे, .. गरिबी असली तरी प्रेमाची श्रीमंती सगळं झाकून नेत होती, … संस्काराची शिदोरी इतकी छान दिली त्यांनी की ती आयुष्यभर पुरणार आहेच मला, .. खरंच आयुष्यात प्रेमाची माणसं असली की जग जिंकता येत ना, .. अवि मला छान नोकरी लागली ना की मला आधी त्यांच्यासाठी काही करायचंय रे, .. “

अवि म्हणाला, “अग आताही कर काही करायचं तर, देऊ का पैसे, … ??”

अनु म्हणाली, “तसं दिलेलं तर त्यांना आवडणारच नाही, .. लेकीकडचा रुपया नको असं आजी म्हणते, .. आजोबा लवकर वारले पण स्वतः कष्ट करून आजीने मामा.. माझी आई मोठी केली, .. कष्ट करणं आणि माणसं जपणं हे आवडायचं तिला, .. म्हणायची आयुष्यात आलेली माणसं अत्तरासारखे कुपीत ठेवायची सुगंधी जगणं करायला, .. ए तिच्यासाठी ना वेगळ्या रूपाने काहीतरी करेन मी, .. तिला केवडा आवडतो ना, मग केवडा शेती सुरू करून देईन तिच्या नदीकडच्या जमिनीवर, .. पण नक्की करायचं त्यांच्यासाठी काहीतरी, .. “

अविनाश म्हणाला, ” खरंच त्यांचा खरा आभारी तर मी असायला हवं ना, कारण त्यांनी घडवलेला हा सुंदर विचारांचा केवडा माझं आयुष्य सुगंधी करायला माझ्या आयुष्यात आला ना, .. “अनु एकदम लाजली, ..

गाडी गावात शिरली तश्या कौतुकाच्या नजरा अनुला मोहरून टाकत होत्या, .. गुलबक्षीने वेढलेलं तिचं छोटंसं माहेर आलं, .. जरा गडबड वाटली अनुला दारातच, .. तिला पाहून मामी तिच्या गळ्यातच पडली, ..

” काल रात्रीपासून तब्येत बिघडली ग आजीची, .. डॉक्टरकाका म्हणालेत ग, की आजचा दिवस निघेल फारतर फार, .. ” अनु स्तब्ध झाली, .. क्षीण झालेल्या आपल्या आजीजवळ आली, .. “आजी तुझा केवडा आलाय ग, .. तुझी केतकी मी उठ ना ग, .. “आजी हलकं हसली, … अर्धवट डोळे उघडत अनुला बघत म्हणाली, “तुझीच वाट होती ग, .. “अनुने हात हातात घेतला आजीचा, “आजी तुला काही होणार नाही, … अग आपल्याला केवड्याच्या अत्तराचा बिझनेस करायचा ठरवलंय आम्ही, … शेती देखिल करून देणार तुझा नातजावई, .. आजी तुझ्यासारखं अत्तर नाही ग कुणी बनवत, …. “

आजी म्हणाली, “अनु अग सुगंध, अत्तर हे सगळं मोह आहे ग, .. एक लक्षात ठेव.. जगणं सुगंधी करता यायला हवं, .. माणूस म्हणून आपली आठवण प्रत्येकाच्या मनात सुगंधी असायला हवी. आता मला बोलावणं आलं ग देवाचं, .. सगळ्यांना माझ्या जवळचं सगळं वाटून टाकलं बघ, .. मामामामीला घर, शेती… पोरांना दागिने.. आता माझ्याजवळ तुझ्यासाठी एक गोष्ट जपली आहे मी ती मी फक्त तुलाच देणार होते, ”.. म्हणत आजीने उशीकडे ठेवलेली अत्तरदाणी अनुच्या हातात दिली, .. ” अनु केवडा हे प्रतीक समज.. पण माणूसपणाच्या सुगंधाची शिंपण करत राहा प्रेमानं, .. “ आजी बोलायचं थांबली होती. अनु निःशब्द होऊन फक्त रडत होती, .. केवड्याचा अर्थ नव्याने आजी सांगून गेली असं अविला वाटलं, ..

अनुच्या हातातली अत्तरदाणी घरभर दरवळ पसरवत होती…

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

छत्रपति संभाजी नगर महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मिस्ड काॅल… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ मिस्ड काॅल… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

खिडकीतून उजेड डोळ्यांवर आला तशी माझी झोप चाळवली. अंथरूणातून उठण्याची इच्छा नव्हती. उठवलेही जात नव्हते. चिकुन गुनीयाने माझी सारी हाडे व सांधे जाम झाले होते. वाॅश रूमपर्यंत जाणंही अवघड झालं होतं. पाय जमिनीवरून उठतच नव्हते, जणू फेविकाॅल लावलाय पायांना, इतक्या वेदना, सहनशक्तीच्या पलिकडे. जवळ जवळ बेडरिडनचं झाले होते मी. तापाने अंग फणफणत होतं. खिडकीतून येणारा उजेडही डोळ्यांना सहन होत नव्हता. मी तोंडावरून पांघरूण ओढलं. पण झोप येत नव्हती. घड्याळ पाहिलं, सकाळचे साडेसात वाजले होते. रोज सहा / साडेसहाला येणारी मोलकरीण अजून आली नव्हती. बाहेर पावसाने जोर धरला होता. आज ही कामाला येते कि नाही, मी अंथरूणात, निलेशचं आँफिस, माझ्या निलाक्षीचं काॅलेज, त्यात मोलकरणीची दांडी झाली तर? माझा जीव कातर झाला. उशीजवळचा मोबाईल उचलला, नंबर डायल केला.

फोन नो रिप्लाय झाला तशी माझी चिंता वाढली, पुन्हा डायल केला, काही सेकंदासाठी फोन उचलला गेला, ” अग अनिता केव्हा येतेस. ” फोन मध्येच कट झाला. काही वेळ थांबून पुन्हा फोन केला, तर नाव आले अनिता सांगळे, अरे नामसाधर्म्याने फोन माझ्या मैत्रिणीलाच लागला. मी लगेच फोन बंद केला. अनिताचा दुपारी फोन आला, पण तो दुसरा नंबर होता. माझ्याकडे तो मिस्ड काॅल झाला. नंतर निवांतपणे नंबर डायल केला. ” बोला, कोणाचा नंबर आहे हा. माझ्या फोनवर मिस्ड काॅल होता’. ‘नाही ताई, तुम्हीच मला सकाळी मिस्ड काॅल दिलात ‘ माझी ट्यूब लाईट पेटली ‘ अनिताताई काय ‘ ‘ होय ‘ ‘ अनिताताई सकाळी तुमचा फोन चुकून लागला हो. पण हरकत नाही या निमित्ताने का होईना, आज आपण पुन्हा संपर्कात आलो बघा. कशा आहात तुम्ही? मग आमच्या साहित्यिक घडामोडींवरील गप्पा, विचारांची देवाण घेवणा, क्षेम कुशलता यावर जवळ जवळ दहा मिनीटे बोलणे झाले. तिच्या पतीचे दुःखद निधन, त्यांची जाणवणारी उणीव, तिचा शोक, अति रडण्याने डोळ्यांना त्रास, माझं आजारपण, या संवादातून मन खूप हलकं झालं. औषधांनी ताप कमी झाला होता. त्यात या मिस्ड काॅलचीही सकारात्मक ऊर्जा दडलेली होती.

असेच जुने मित्र मैत्रिणी माझ्या माणुसकी कथेमुळे पुन्हा संपर्कात आले होते. माझी ही कथा प्रचंड व्हायरल झाली होती. ज्याला आवडली त्याने फाॅरवर्ड केली होती. फेसबुकही कोणी पोस्ट केलेली त्यामुळे ही कथा महाराष्ट्रच नव्हेतर कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान एवढेच नव्हेतर परदेशस्थ भारतीय इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, सिंगापूर, टांझानिया, मलेशिया, फिजी, पॅरीस अशा अनेक देशातील वाचकांनीही त्या कथेचा आस्वाद घेतला होता. रोज मला वीस /पंचवीस फोन यायचे. सगळेच फोन काही रिसिव्ह करू शकत नव्हते, ते मिस्ड काॅल व्हायचे. मग माझ्या सवडीने मी संपर्क साधायचे आणि वाचकांशी संवाद साधायचे. प्रत्येकाचे अनुभव, त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना शेअर करायचे, त्यातूनच मग माझ्या कथांचा प्रांत अधिकच समृद्ध होत गेला.

विचारांच्या शृंखलेत माझ्या डोळ्यावर झोपेने पुन्हा अंमल चढवला. ” प्रिया, जाऊन येतो ग ” निलेश रूममध्ये डोकावला. माझा प्रतिसाद न मिळाल्याने त्याने माझ्या कपाळाला हात लावला, ” बाप रे, प्रिया, किती अंग तापलंय तुझं, थांब मी थर्मामीटर आणतो ” थर्मामीटर लावला 103 डिग्री फॅरनहिट. निलेशने लगेच पॅरासिटेमोलची गोळी दिली. ” मी नाही जात आज आँफिसला. तुला हाॅस्पिटलला अँडमीट करतो. घरी बसून नुसत्या गोळ्या घेऊन बरं होणार नाही हे दुखणं ” ” अहो डाॅक्टरांची ट्रिटमेंट चालू आहे ना. एवढे पॅनिक होऊ नका. हा व्हायरल फिवर तीन / चार दिवस घेतोच. नका टेन्शन घेऊ. ” 

अंथरूणात पडूनही कंटाळा येतो. ताप वाढू लागला तसा डोळ्यावरही झोपेचा अंमल चढला. ग्लानी आल्यासारखं झालं नि नेत्रपाकळ्या आपोआप मिटल्या. ऊन/ सावलीसारखं, जाग/ झोपेच्या या लपंडावात स्मृतींचं एक/एक पान उलगडू लागलं. मिस्ड काॅलचं सकाळपासून मनावर गारूड होतंच, त्याला उजाळा मिळाला.

एम ए च्या प्रथम वर्षाला होते मी. सगळे लेक्चर संपले आणि मी ग्रंथालयात जाण्यासाठी निघाले. अर्थशास्त्रासारखा कठीण विषय निवडला होता मी. सिलॅबसमधील प्रिसक्राईब बुक्स आणि रेकमेंडेड बुक्स बरीच होती. सगळीच पुस्तकं घेणं शक्यच नव्हतं ग्रंथालयातही लिमिटेड काॅपीज व विद्यार्थी संख्या अधिक म्हणून घरी नेण्यासाठी लवकर पुस्तकंही मिळायची नाहीत. मग तिथेच रिडींग रूममध्ये बसून अभ्यास करायचा हे माझे धोरण, विशेष म्हणजे ज्या त्या दिवशी शिकवले जाणारे टाॅपिक्सची त्याच दिवशी माझी रिव्हिजन व्हायची.

मी ग्रंथालयाकडे जातांना श्रीमंत बापाची बिघडलेली मुलं, यांनी छेडलं मला. शीळ घालत प्रितम गाणं म्हणू लागला,

व्हाट इज मोबाईल नंबर

व्हाट इज युवर स्माईल नंबर

करनी है प्रायवेट बाते

दे दे कोई प्रायवेट नंबर

ए शट अप

टेक इट ईझी बेबी, मोबाईल नंबर दे, लगेच निघालो मी, बाकी बाते रातमे, क्यो? म्हणत तो विकृत हसला.

एव्हाना मी माझं पायताण काढून हातात घेतलंच होतं आणि एक लगावणार तोच प्रितमने माझा हात घट्ट पकडला.

ए ठीक नही है बेबी, हम आपसे प्रेमसे बात कर रहे है और आप हमे दुत्कार रही है, टोळक्यातील त्याचे इतर मित्रही हसू लागले.

देवकृपेने निलेश तिथून जात होता. ” चल यार, क्या बात है, प्यारकी बाते करना चाहते हो, मुझसे करो, म्हणत निलेशने एक त्याच्या मुस्काटात ठेवली, तसे टोळक्यातील सर्व जण निलेशवर तुटून पडले. नेमके प्रा. पेंडसे व प्रा. शानबाग ग्रंथालयाकडे येत होते. ” हे काय चाललंय इथे ” तशी प्रितम व गँगने काढता पाय घेतला.

पण प्रितमला माझा मोबाईल नंबर कोणाकडून तरी मिळाला. मला रात्री अपरात्री फोन करू लागला. काॅलेजात मिस्ड काॅल देऊन हैराण करू लागला. मी साहजिकच अस्वस्थ झाले. घरी आई बाबांना व निलेशलाही सांगितले, निलेश म्हणाला ‘ प्रिया घाबरू नकोस, माझे काका डी वाय एस पी आहेत. चांगलीच समज देतील त्याला.

माझे आई बाबा, निलेश व निलेशचे डी वाय एस पी काका यांच्या मार्गदर्शनाखाली रितसर मी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. सुरूवातीला प्रितमने उडवाउडवीची उत्तरे दिली. आपल्या श्रीमंत बापाचाही हवाला दिला. पैसे घेऊन तक्रार निकाली काढा असेही त्याने पोलिसांना सुचविले. पण डी वाय एस पी साहेबांनी विशेष लक्ष घातले असल्याने प्रितमची डाळ शिजली नाही. त्याच्या बाबांनीही प्रयत्न केले प्रकरण मिटविण्याचा. पण आम्ही ठाम होतो. शेवटी प्रितमने माफीनामा लिहून दिला.

निलेश त्यादिवसापासून सावलीसारखा माझ्यासोबत होता. प्रितमला चांगलीच समज मिळाली होती व निलेशचा भक्कम आधार यामुळे पुढे त्याने माझ्या वाटेला जाणे बंद केले.

निलेशचं आकर्षक व्यक्तिमत्व, त्याची विनयशीलता, कर्तृत्व, महत्वाकांक्षा, भरारी घेण्याची उमेद, अभ्यासातील प्रगती, नात्यांची जाण, दुसर्‍यांचा आदर करण्याची वृत्ती यामुळेच मी त्याच्याकडे ओढली जात होते, त्याच्या प्रेमात पडले होते. पण निलेशचंही तसंच असेल काय? कसं समजेल? एक मोठं प्रश्नचिन्ह होतं माझ्यापुढे? आणि माझ्या या प्रश्नांसाठी मला एक मार्ग सापडला. 7 फेब्रुवारी, रोझ डे, निलेशला गुलाबपुष्प देऊन भावना व्यक्त कराव्यात काय? पण एवढी हिंमत होईल काय माझी? मन नुसतं धडधड करत होतं.

7 फेब्रुवारीच्या पूर्वसंध्येला माझ्या मोबाईलवर मिस्ड काॅल आला. काॅलर माझ्या काॅन्टक्ट लिस्ट मध्ये नव्हता. माझा जीव कातर झाला. मिस्ड काॅलला, काॅल बॅक मी करूच शकणार नव्हते कारण नंबर परिचयातील नव्हता. उद्या निलेशला सांगू या. रात्रभर मला झोप नव्हती. या गदारोळात मी केलेला रोझ डे चा प्लॅनच फिस्कटला.

आजचा पहिला तास इंटर नॅशनल एकाॅनाॅमिक्सचा संपला व मी क्लास रूममधून काॅरीडाॅर मध्ये आले. तेवढ्यात निलेशही समोर आला हातात लाल गुलाब घेऊन. ” प्रिया, या गुलाबाचा स्विकार करशील? . क्षणभर मी गोंधळले, अरे माझ्या मनातले मी न सांगताच याला कसे कळाले. याची माझी विचार शृंखला जुळली तर? माझ्या चेहर्‍यावरील गोंधळ पाहून व मी लगेच प्रतिसाद न दिल्याने निलेश हिरमुसला. ” साॅरी प्रिया, तुझी इच्छा नसेल तर? ” ” नाही, नाही निलेश, तसं नाही. दे मला तो गुलाब. ” आणि निलेशची कळी खुलली. हा गुलाम सदैव आपल्या सेवेत हजर राहील साहिबा. निलेश पुरे हं. नाहीतर मी रूसेन ” ‘ बाप रे आतापासून रूसवा, माझी तर वाटचं लागेल? ” मग कोणी सांगितलं तुला या वाटेवर यायला. जा तुझ्या मार्गाने ‘ ” साॅरी बाईसाहेब, कान पकडतो “

निलेश एक प्राॅब्लेम झालाय रे. काल मला एकाच फोनवरून तीनदा मिस्ड काॅल आलेत. मी फोन उचलण्याच्या अगोदरच तो बंद व्हायचा. प्रितम आणि गँगने परत डोकं वर काढलं असेल काय? ” ” नाही प्रिया तसं नाही ” ” तू इतक्या ठामपणे कसं सांगू शकतोस ‘. ” कारण प्रिया काल मीच तुला मिस्ड काॅल दिला. मनातील भावना व्यक्त करायच्या होत्या. पण माझी हिंमतच झाली नाही, कारण माहित नव्हते तुझ्याकडून कसा प्रतिसाद मिळेल. म्हणून मी दुसर्‍या नंबरवरून तुला मिस्ड काॅल दिला. “

” अरे, पण मी काल किती घाबरले होते. रात्रभर किती बेचैन होते. “

” साॅरी प्रिया, आय अँम एक्सट्रिमली साँरी ” ” अरे, साॅरी कशाबद्दल? आज मी ही तुला गुलाबपुष्प देणार होते. पण कालच्या मिस्ड काॅलने मी खूप घाबरले होते. मन अशांत झालं होतं, पण आता मनावरचं सगळं ओझं उतरलंय. निलेश थँक्स अ लाॅट, आभारी आहे मी तुझी. तुझी साथ मिळाली तर आयुष्याचं सोन होईल माझं ” ” प्रिया, आपल्या आयुष्यात आलेला हा मणिकांचन योग आपण आपल्या खास ओळखीने, मिस्ड काॅलने साजरा करत जाऊ.

आमच्या दोघांच्याही कुटुंबातून विरोध नव्हताच. कोणत्याही कटकटीं, शिवाय अगदी गुण्या गोविंदाने, आमचे शुभमंगल पार पडले. आयुष्याची रेशीमगाठ बांधली गेली.

निलेश त्यांच्या आँफिस कामासाठी एक आठवड्यासाठी नवी दिल्लीला गेले होते. सकाळी सकाळी फोनची रिंग वाजली. झोपेतच होते मी. फोन घेण्यासाठी हात उशीकडे गेले. रात्री झोपतांना फोन उशीजवळ घेऊन झोपण्याची माझी सवय. फोन उचलणार तितक्यात तो बंद झाला, मिस्ड काॅल झाला. अच्छा तर आज रोझ डे ” यासाठी मिस्ड काॅल होता काय? ” जनाब, आप मिस्ड काॅल देते हो, पर हम भी कुछ कम नही, मिस्ड काॅलका जवाब मिस्ड काॅल ही होगा, समझे आप ” अन मी मिस्ड काॅल देण्यासाठी फोन हाती घेतला.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares