मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोकळी – भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पोकळी – भाग 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(मागील भागात आपण पाहिले –  सगळेच मोठे होत होते.  रिया,तान्यांचेही ग्रॅज्युएशन झाले. त्यांची राहण्याची गावं बदलली.  हर्षल ,अमिताही आपापल्या व्यापात गुंतत होते, रुतत होते. ब्रुनोही  वाढत होता.  पण या सर्व परिवर्तनाचा, बदलांचा  ब्रुनोही अत्यंत महत्त्वाचा, जवळचा ,एक कन्सर्नड् साक्षीदार होताच. कम्युनिटीतलं कल्डीसॅक वरचं, मागे दाट जंगल असलेल्या त्यांच्या घराचं मुख्य अस्तित्व म्हणजे ब्रूनोचं  भुंकण आणि त्याच्या नाना क्रीडा, सवयी, सहवास हे नि:शंकपणे होतच.

सगळं छान चाललं होतं. मग अचानक काय झालं?- आता इथूंपुढे )

आजकाल ब्रुनोच्या बाबतीत काहीतरी बिनसलं होतं का? त्याच्या वागण्यात काहीतरी नकारार्थी फरक जाणवत होता. त्याला समुपदेशनाची गरज आहे का हाही एक विचार मनात येऊन गेला. अमिता, हर्षल ने त्याच्यासाठी कधीही साखळी वापरली नाही.  त्याला कधीही बांधून ठेवले नाही.  तो मोकळाच असायचा आणि उत्तम प्रकारे त्याला शिक्षित केलेलेही होते. घरात येणाऱ्या जाणाऱ्यांशी तो क्षणात मित्रत्वाच्या नात्याने वागायचा.  येणाऱ्या पाहुण्यांमधले सुरुवातीला बिचकणारे काही थोड्या वेळातच ब्रूनोशी गट्टी करायचे.  त्याचं भय कधीच कुणाला वाटलं नाही.

पण काही दिवसापूर्वी तो अचानक घरातून निघून गेला. खूप शोधाशोध करावी लागली.अमेरिकेत पाळीव प्राण्यांसाठीचे कायदे खूप कडक आहेत. सारं वातावरण चिंतातुर झालं.

संध्याकाळी त्याच्या गळ्यातल्या कॉलर वरच्या पत्त्यावरुन कॉपने त्याला घरी आणले.  पण कॉपने त्यांना चांगलंच बजावलं. अमेरिकन पेट लॉबद्दल खणखणीत सुनावलं. दंडाची रक्कम वसुल करुन तो निघून गेला. 

थोडं चिंतातूर, भयावह  वातावरण मात्र नक्कीच झालं. हर्षलने ब्रूनोला चांगलाच दम भरला.  पण तो फक्त हर्षल च्या पायाभोवती गुंडाळून राहिला. आणि त्याच्या डोळ्यातून टपकणार्‍या  अश्रूंचा स्पर्श हर्षलच्या पायाला जाणवला.

“काय झालं असेल याला?”

अमिता म्हणाली,” अरे! प्राण्यांमध्येही  हार्मोनल बदल घडत असतात.   तेही अस्वस्थ बेचैन होतात.  त्यांना कळतही असेल पण व्यक्त होता येत नाही ना?”

” म्हणजे आपण कमी पडतो का?”

” कदाचित हो.”

अमिताने एकच शंका काढली,” मला वाटतं तो आजकाल जरा आपल्या बाबतीत पझेसीव्ह  झालाय. आपल्या आसपास असलेलं हे इतरांचं कोंडाळं  त्याला आवडत नसेल. आपणही सतत कामात. रिया ,तान्याचे दूर राहणे.  या साऱ्यांचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतोय.  तो थोडा इंट्रोवर्ट होत चाललाय.  आतल्या आत घुसमटतोय तो”

” मग याला आपण काय करायचं?  त्याला कसं नॉर्मल करायचं?”

” बघूया.  वाट पाहूया.”

पण त्या दिवशी मात्र  ब्रूनोने कमाल केली.

दरवर्षीप्रमाणे अमिता— हर्षलने थँक्स गिव्हिंगची पार्टी घरी आयोजित केली होती.  मस्त तयारी चालू होती.  एकीकडे ब्रूनोशी गप्पा आणि एकीकडे पार्टीची सजावट, रचना, खाद्यपदार्थ बनवणे असं चालू होतं.

संध्याकाळी सारे जमले.  सगळे मस्त नटूनथटून आले होते.  प्रफुल्लीतही  आणि एकदम झक्क मूडमध्ये. शिजणार्‍या टर्कीचा मस्त सुगंध घरात घमघमत होता.  गप्पा, गाणी, खाणे,पिणे चालूच होते.

इतक्यात ब्रूनोने  संकर्षणच्या आठ वर्षाच्या मुलीवर झडपच घातली.  तिला फरफटत  त्याने हॉल बाहेर नेलं. ती मुलगी नुसती घाबरून किंचाळत होती.  सगळ्यांची धावपळ झाली.  अमिता, हर्षलही  ब्रूनोला आवरू शकत नव्हते.  पण त्या ग्रुप मध्ये एक डॉग ट्रेनर होता. त्याने परिस्थिती झटकन हातात घेतली.  आणि अत्यंत कुशलतेने ब्रूनोला ताब्यात घेतलं. सुदैवाने त्या मुलीला काही जखमा झाल्या नाहीत पण तिला प्रचंड मानसिक  धक्का बसला होता. ती जोरजोरात रडत होती. “आय हेट ब्रूनो. आय डोन्ट लाईक हिम!”

आणि अर्थातच त्यानंतर पार्टी रंगलीच नाही.  आवरतीच घ्यावी लागली. हळूहळू सगळेच परतले.  हर्षल, अमिता प्रत्येकाला अजीजीने  “सॉरी” म्हणत होते.  तसे सारे  जवळचेच होते. मित्रमंडळीच होती. 

” इट्स ओके रे यार! टेक केअर.”  म्हणून सगळे अगदी सभ्यपणे निघूनही गेले.  फक्त डॉग ट्रेनर मणी मागे राहून हर्षलला म्हणाला,”नो मोअर रिस्क नाऊ.  वेळ आली आहे.  तुम्हाला आता कठोर व्हावंच लागेल. तुला अमेरिकन लॉ माहित आहेत ना?”

नाईलाजाने अमिता, हर्षलला तो निर्णय घ्यावा लागला खूप कठीण,  अत्यंत, सहनशीलतेच्या पलीकडचा, भावना गोठवणारा  पण टाळता न येण्यासारखा तो निर्णय आणि तो क्षण होता.  क्षणभर अमिताला वाटलं,” आपण भारतात असतो तर काय केलं असतं?”

पण या प्रश्नाला तसा आता काहीच अर्थ नव्हता.

पेट कम्युनिटी सेंटरवर तिने कळवलं होतं. सर्व कायदेशीर कागदपत्रे भरून झाली होती.   व्हेटशी —पशुवैद्याशी तिचं बोलणं  झालं होतं. अशा प्रकरणात उशीर चालत नाही. तात्काळ करण्याची ही एक कृती असते. लगेच  वेळही ठरली. आजचीच.

सकाळीच हर्षल निघून गेला होता. जाताना अमिताच्या खांद्यावर हात ठेवून तिला फक्त,” बी ब्रेव्ह” एवढंच म्हणाला होता. 

सकाळपासून ब्रूनो  अमिताच्या पायात घुटमळत होता.  अमिताने गराज उघडलं.  गाडीत बसायलाही तो तयार नव्हता.  अमिताच्या काळजाचे ठोके थाड थाड उडत होते. कसेबसे तिने ब्रूनोला उचलले आणि मागे कार सीटमध्ये त्याला बांधून टाकले.  अमिताला एकच आश्चर्य वाटले तो अजिबात भुंकला नाही. खिडकीच्या काचेवर नेहमीप्रमाणे चाटले नाही.  संपूर्ण ड्राईव्ह मध्ये अमिताच्या डोक्यात एकच विचार होता.” मी चूक आहे की बरोबर?”  तिला इतकंही वाटलं,” मी माणूस कां झाले?  अखेर मी माणसांचा कायदा पाळत आहे.  माणूस जातीची सुरक्षा मला महत्त्वाची आहे.  या देशातलं माझं वास्तव्य मला महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी एका निष्ठावान, प्रामाणिक, निर्मळ, निरागस, निरपेक्ष खर्‍या  प्रेम भावनेला अशा रितीने तिलांजली देत आहे का?”

व्हेटच्या केबिनमध्ये अमिताही ब्रूनो बरोबर आत गेली. व्हेटने  इंजेक्शन तयार केले.  पण ब्रूनो  त्याला अजिबात सहकार्य देतच नव्हता. त्याला आवरणं जमतच नव्हतं. शेवटी अमिताला पहावे ना.  तीच म्हणाली,” डॉक्टर! माझ्याकडेच द्या.  मीच देते त्याला इंजेक्शन.  मीही एक डॉक्टरच आहे.”

वास्तविक हे प्रोटोकॉलच्या बाहेर होते.  पण अमिताने  ब्रूनोला कुरवाळलं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून  गोंजारलं, मांडीवर घेतलं.  ब्रुनोने  तिच्याकडे इतक्या विश्वास पूर्ण नजरेने पाहिलं की  क्षणभर अमिताचे हात थरथरले.  पण मनात ती एवढेच म्हणाली,

” आय एम व्हेरी सॉरी ब्रूनो.  परमेश्वरा! मला क्षमा कर.” हळूहळू ब्रूनोच्या  शरीरात ते औषध पसरत गेलं आणि तो शांत होत गेला.  भयाण  शांत,  नि:शब्द, निश्चेष्ट.

एक पर्व संपलं. नव्हे संपवलं.  एक अध्याय पूर्ण केला आणि एक अनामिक  नातं अनंतात विलीन झालं. 

घरभर ब्रूनो सोबतचे अनंत क्षण विखुरले होते. कितीतरी, त्याच्या सोबत काढलेली  छायाचित्रे.  त्याचं ब्लॅंकेट, त्याची गादी,  भिंतीवर त्याने फेकलेल्या चेंडूचे डाग.  घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात त्याचं अस्तित्व होतं.  ते कसं निपटायचं?

जंगलातल्या झाडावरची ती रंगीत पानगळ बघता बघता अमिताच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओघळल्या.  एक अलौकिक संवेदनांचं, भाव भावनांचं, दिव्य,  वर्णनातीत भावविश्व संपून गेलं.  आणि पाप पुण्याच्या साऱ्या कल्पना भेदून एक भयाण  पोकळी तिच्या जीवनात तयार झाली. 

येईल का ती कधी भरून? 

 – समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोकळी – भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ पोकळी – भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

गराजचं शटर रिमोटने  अलगद उघडलं.  आणि अमिताने तिची पिवळी पोरशे कार गराज मध्ये आणली. शटर बंद झाले आणि अमिता घरात आली. घरात कोणीच नव्हतं.  आयलँड वर बराच पसारा पडला होता.  सिंक मध्ये भांडी साचली होती.  काही क्षण अमिताला वाटलं तिला खूप भूक लागली आहे.  सिरॅमिक बोलमध्ये ब्रुनोचे चिकन ड्रुल्स  पडले होते.  ते तिने पाहिले आणि  क्षणात तिच्या काळजात खड्डा पडला.  तिने घटाघटा पाणी प्यायले आणि काऊच वर जाऊन ती बसली.  एसीचं  तापमान ॲडजस्ट केलं आणि डोळे मिटून शांत बसली. छाती जड झाली होती.  खरं म्हणजे मोठमोठ्याने तिला रडावंसही वाटत होतं.  एकाच वेळी आतून खूप रिकामं, पोकळ वाटत होतं.  काहीतरी आपल्यापासून तुटून गेलेलं आहे हे जाणवत होतं.

मोबाईल व्हायब्रेटर वर होता.  तिने पाहिलं तर जॉर्ज चा फोन होता.

” हॅलो! जॉर्ज मी आज येत नाही.  ऑन कॉल आहे. काही इमर्जन्सी आली तर कॉल कर.”

” ओके. टेक केअर”  इतकंच जॉर्ज म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.

अमिता डेक वर आली.  कल्डीसॅक वरचा त्यांचा कोपऱ्यातला बंगला आणि मागचं दाट जंगल. पिट्स बर्ग मध्ये नुकताच फॉल सीजन सुरू झाला होता.  मेपल वृक्षावरच्या पानांचे रंग बदलू लागले  होते.  पिवळ्या, ऑरेंज रंगाच्या अनंत छटा पांघरून साऱ्या वृक्षावरची पाने जणू काही रंगपंचमीचा खेळच खेळत होती.  पण अजून काही दिवसच.  नंतर सगळी पानं गळून जातील. वातावरणात हा रंगीत पाचोळा उडत राहील कुठे कुठे.  कोपऱ्यात साचून राहील.  वृक्ष मात्र निष्पर्ण, बोडके होतील.  आणि संपूर्ण विंटर मध्ये फक्त या झाडांचे असे खराटेच पाहायला मिळतील.  सारी सृष्टी जणू काही कुठल्याशा अज्ञात पोकळीचाच अनुभव घेत राहील.  अमिताला सहज वाटलं,” निसर्गाच्या या पोकळीशी आपल्याही भावनांचं साध्यर्म आहे.”

या क्षणी खूप काही हरवल्यासारखं, कधीही न भरून येण्यासारखी एक अत्यंत खोल उदास पोकळी आपल्या शरीराच्या  प्रवाहात जाणवते आहे.

हर्षल ला फोन करावा का? नको.  तो मीटिंगमध्ये असेल. सकाळी निघताना म्हणाला होता,” बी ब्रेव्ह अमिता! खरं म्हणजे मी तुझ्याबरोबर यायला हवं.  पण आज शक्य नाही.  आमचा लंडनचा बॉस येणार आहे.”

पण अमिता  जाणून होती हर्षलची भावनिक गुंतवणूक आणि दुर्बलताही.  त्याला अशा अवघड क्षणांचं साक्षी व्हायचंच नव्हतं खरं म्हणजे. 

अमिता त्याला इतकंच म्हणाली होती,” इट्स ओके. मी मॅनेज करेन.”

आणि तिने छातीवर दगड ठेऊन  सारं काही पार पडलं होतं.

विभाला फोन करावा का असाही विचार तिच्या मनात येऊन गेला.  पण तो विचार तिने झटकला.  विभा इकडेच येऊन बसेल आणि ते तिला नको होतं.  तिला एकटीलाच राहायचं होतं.  निर्माण झालेल्या अज्ञात पोकळीतच राहणं तिला मान्य होतं. तो कठिण,दु:खद अनुभव तिला एकटीलाच घ्यायचा होता.  निदान आता तरी. 

संध्याकाळी येतीलच सगळ्यांचे फोन.  तान्या, रिया.  “ब्रूनो आता नाही” हे त्यांना सांगण्याचं बळ ती जणू गोळा करत होती.  सगळ्यांचाच भयंकर जीव होता त्याच्यावर आणि तितकाच त्याचाही सगळ्यांवर.

अशी उदास शांत बसलेली अमिता तर ब्रूनोला चालायचीच नाही. अशावेळी  तिच्या मांडीवर पाय ठेवून डोक्यानेच तो हळूहळू तिला थोपटायचा.  एक अबोल, मुका जीव पण त्याच्या स्पर्शात, नजरेत, देहबोलीत प्रचंड माया आणि एक प्रकारची चिंता असायची. घरातल्या प्रत्येकाच्या भावनांशी तो सहज मिसळून जायचा.  त्यांची सुखे, त्यांचे आनंद, त्यांची दुखणी, वेदना हे सगळं काही तो सहज स्वतःमध्ये सामावून घ्यायचा.  इतकच नव्हे तर साऱ्या ताण-तणावावरती त्याचं बागडणं, इकडे तिकडे धावणं, खांद्यावर चढणं, कुरवाळणं ही एक प्रकारची तणावमुक्तीची थेरेपीच असायची. 

ब्रुनोची  आयुष्यातली वजाबाकी सहन होणं शक्य नव्हतं.  क्षणभर तिला वाटलं की आयुष्यात वजाबाक्या  काय कमी झाल्या का?  झाल्याच की.  कितीतरी आवडती माणसं पडद्याआड गेली.  काही दूर गेली.  काही तुटली.  त्या त्या वेळी खूप दुःख झाले पण या संवेदनांची त्या संवेदनांशी तुलनाच  होऊ शकत नाही.

घरात तसा कुठे कुठे ब्रूनो चा पसारा पडलेला होता. टीव्हीच्या मागे, काऊचच्या खाली, डेक वर,पॅटीओत त्याच्यासाठी आणलेली खेळणी, अनेक वस्तू असं बरंच काही अमिताला बसल्या जागेवरून आत्ता दिसत होतं. मागच्या विंटर मध्ये अमिताने त्याच्यासाठी एक छान जांभळ्या रंगाचा स्वेटर विणला होता. काय रुबाबदार दिसायचा तो स्वेटर  घालून आणि असा काही चालायचा जणू काही राणी एलिझाबेथच्याच परिवारातला!  या क्षणीही अमिताला त्या आठवणीने हसू आलं.

कधी कधी खूप रागवायचा, रुसायचा, कोपऱ्यात जाऊन बसायचा, खायचा प्यायचा नाही.  मग खूप वेळ लक्षच दिलं नाही की हळूच जवळ यायचा.  नाकानेच फुसफुस करून, गळ्यातून कू कू आवाज काढायचा. लाडीगोडी लावायचा. टी— काकाच्या डेक्स्टरचे एकदा हर्षल खूप लाड करत होता.  तेव्हा ते बघून तर त्याने घर डोक्यावर घेतलं होतं. इतकं  की नेबर ने फोन केला,” नाईन इलेव्हन ला बोलावू  का?”

नाईन इलेव्हन म्हणजे अमेरिकेतील तात्काळ सेवा.  त्यावेळी क्षणभर अमिताला वाटले की भारतीयच बरे.  उठ सुट  असे कायद्याच्या बंधनात स्वतःला गुरफटून ठेवत नाहीत. इथे  जवळजवळ प्रत्येक घरात पेट असतो. प्रचंड माया ही करतात, काळजीपूर्वक सांभाळतातही.  पण प्रेमाचे रंग आणि जात मायदेशी चे वेगळे आणि परदेशातले वेगळेच.

तसे  ब्रूनोचे  आणि अमिताच्या परिवाराचे नाते किती काळाचे होते?  अवघे दहा वर्षाचे असेल.  असा सहजच तो त्यांच्या परिवाराचा झाला होता. 

शेजारच्या कम्युनिटीमध्ये एक चिनी बाई राहायची.  एकटीच असायची.  तिचा हा ब्रुनो. तेव्हा लहान होता.  पण अचानक एक दिवस तिने मायदेशी परतायचं ठरवलं. सोबत तिला ब्रूनोला न्यायचं नव्हतं कारण तिथलं  हवामान त्याला मानवणार नाही असं तिला वाटलं.  गंमत म्हणजे रिया,तान्या  येता जाता त्या चिनी बाई बरोबर फिरणाऱ्या ब्रुनोचे  फारच लाड करायच्या.  परिणामी त्यांच्याशी त्याची अगदी दाट मैत्री झाली होती.  हाच धागा पकडून तिने अमिताला,” ब्रूनोला अॅडॉप्ट कराल का?” असा प्रश्न टाकला.

रिया, तान्या तर एकदम खुश झाल्या. तसे हे सगळेच डॉग लवर्स.  त्यांची तर मज्जाच झाली.  आणि मग हा डोक्यावरचा भस्म लावल्यासारखा पांढरा डाग असलेला, काळाभोर, मखमली कातडीचा, छोट्या शेपटीचा, सडपातळ, पण उंच ब्रुनो  घरी आला आणि घरचाच झाला आणि सारे जीवन रंगच बदलले. 

चिनी बाईने मेलवर सगळे डॉक्युमेंट्स स्कॅन करून पाठवले.  त्याच्या वंशावळीची माहिती, त्याचं वय, लसीकरणाचे रिपोर्ट्स, बूस्टर डोस च्या तारखा, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वेळा , त्याचे ग्रुमिंग  या सर्वांविषयी तिने इत्थंभूत माहिती कळवली.  शिवाय त्याच्यासाठी ती वापरत असलेले शाम्पू ,साबण ,नखं, केस कापायच्या वस्तूंविषयी तिने माहिती  दिली. अमिता, हर्षल, रिया, तान्या खूपच प्रभावित, आनंदित झाले होते. ब्रुनोसाठी  जे जे हवं ते सारं त्यांनी त्वरित वॉलमार्ट मध्ये जाऊन आणलंही.  पॅटीओमध्ये चेरीच्या झाडाखाली त्याचं केनेलही बांधलं. 

सुरुवातीला तो थोडा बिचकला.  गोल गोल फिरत राहायचा.  कदाचित होमसिक  झाला असेल. पण नंतर हळूहळू रुळत गेला.  परिवाराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक बनला.  त्याच्या आणि परिवाराच्या भावभावनांसकट एक निराळंच भावविश्व सर्वांचच तयार झालं.

‘ ब्रूनो जेवला का?”

“ब्रुनोला फिरवून आणलं का?”

“आज त्याला  आंघोळ घालायची का?”

” आज का बरं हा खात पीत नाही? काही दुखत का याचं?”

असे अनेक प्रश्न त्याच्याबद्दलचे.   हाच त्यांचा दिनक्रम बनला. 

सुरुवातीला चिनी बाईच्या  विचारणा करणाऱ्या मेल्स यायच्या.  तिलाही ब्रुनोची  ची आठवण यायची.  करमायचं नाही. रिया,तान्याला  तर एकदा असंही वाटलं की ही बाई ब्रूनोला परत तर नाही ना मागणार ?

पण मग दिवस, महिने, वर्ष सरत गेली आणि ब्रूनो हा फक्त त्यांचा आणि त्यांचाच राहिला. सगळेच मोठे होत होते.  रिया,तान्यांचेही ग्रॅज्युएशन झाले. त्यांची राहण्याची गावं बदलली.  हर्षल ,अमिताही आपापल्या व्यापात गुंतत होते, रुतत होते. ब्रुनोही  वाढत होता.  पण या सर्व परिवर्तनाचा, बदलांचा  ब्रुनोही अत्यंत महत्त्वाचा, जवळचा ,एक कन्सर्नड् साक्षीदार होताच. कम्युनिटीतलं कल्डीसॅक वरचं, मागे दाट जंगल असलेल्या त्यांच्या घराचं मुख्य अस्तित्व म्हणजे ब्रूनोचं  भुंकण आणि त्याच्या नाना क्रीडा, सवयी, सहवास हे नि:शंकपणे होतच.

सगळं छान चाललं होतं. मग अचानक काय झालं?

क्रमश: भाग १

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नातं… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ नातं… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“हे बघ दहा पोळ्या झाल्या की गॅस, ओटा स्वच्छ पुसून घ्यायचा… तो खरकटा ओटा आवडत नाही मला… आणि आता इकडे ये हॉलमध्ये… हे बघ हे सगळं फर्निचर स्वच्छ पुसायचं, झाडू, फारशी ठरल्याप्रमाणे करायची आहेच…” काकु तिला सगळं तावतावाने सांगत होत्या. ती मात्र हरखली होती. एवढं सुंदर घर असतं.. किती प्रसन्न वाटतंय इथे, अगदी आपल्या घरी आजी विठ्ठलाची पूजा करायची तेंव्हा वाटायचं तसंच…. गावाकडून येऊन पहिल्यांदाच कामाला लागणार होती ती….”

गावी आजी वारली, मग आजोबांनी त्यांच्या बहिणीकडे पोर आणून सोडली. काहीतरी शिवणकाम शिकवू म्हणाले, पण उरलेल्या वेळात माझ्या ओळखीच्या घरी काम आहे असं बहिणीने सांगितल्यावर आधी आजोबांनी विचारलं, “चिऊ कामं करशील का बेटा..? तशी पोळ्या फार छान करते चिऊ” म्हणत आजोबांनी डोक्यावर हात फिरवला.

चिऊ म्हणाली, “आवडलं तर करेल.”

आत्याआजी हसून म्हटली होती, “काय आवडलं तर? काम की माणसं..?”

चिऊ म्हणाली होती, “घर.. घर आवडायला पाहिजे मला..”

आताही चिऊला ते आठवलं.. घर खरंच छान आहे. एक वेगळाच विश्वास वाटतोय आपल्याला, एक वेगळी प्रसन्नता… नेमकी कशाने?.. चिऊने मनाला विचारलं आणि परत त्या ईशान्य कोपऱ्यात बघितलं… तो आताही मस्त हसत होता… ‘मी आहे’ असं डोळ्यांनी विश्वासाने सांगत होता… 

चिऊचे त्याच्याकडे बघून आताही डोळे भरून आले… तेवढ्यात त्या काकु म्हणाल्या, “बघ तुला नक्की जमतील ना ही कामं? मला उद्यापर्यंत सांग. मी सध्या दुसरी बाई बघत नाही….”

त्याच्याकडे बघतच आणि त्याला हात लावायचा प्रयत्न करत चिऊ काकूंना “हो, जमतील” असं म्हणाली.

तेवढ्यात काकु एकदम ओरडल्या, “ए, त्या विठ्ठलमूर्तीला कशाला हात लावतेस… आमच्या सासूबाईंना नाही आवडत त्याला कोणी हात लावलेलं…. “

काकूंच्या आवाजाने चिऊ एकदम घाबरली. पटकन विठ्ठल मूर्तीजवळून तिने हात बाजूला केला… अजूनही तिला वाटत होतं, ही मूर्ती आपण खुप बघितलेली….

तेवढयात काकूंच्या सासुबाई आल्या परडीत फुलं घेऊन… काकु म्हणाल्या, “आई ही आपली नवी मोलकरीण… अजून नक्की ठरवायची बाकी आहे, पण तिला घर आवडलं तर येईल म्हणाली. तिची आत्याआजी….”

सासुबाई हसत म्हणाल्या, “अगबाई, हो का?.. घर आवडलं म्हणजे नेमकं काय गं? घराचा रंग, घराचं रूप, घराचा दिखावा, घरातली माणसं, घरातला पैसा…. नेमकं काय आवडायचं आहे गं तुला.?”

आजीच्या प्रश्नावर चिऊ हसत म्हणाली, “आजी, ते असं दिसणाऱ्या वस्तूत नसतं…. ते असं जाणवतं…. असं छान, प्रसन्न वाटतं… ते मला आवडायला हवं..”

आजी हसून म्हणाली, “अगंबाई बरीच हुशार आहेस गं,.. चैतन्य म्हणायचं आहे तुला….?”

चिऊला आवडला तो शब्द. ‘चैतन्य’. चिऊ लगेच म्हणाली, “हो, अगदी बरोबर आजी, चैतन्य.. जे आपल्या भक्तीभावाने त्या घरात निर्माण झालेलं असतं… माझ्या आजीकडे होतं ते. आजी गेली आणि सगळं हरवलं” म्हणत चिऊने डोळे पुसले.

“उद्या येते” सांगून चिऊ निघाली…. निघताना चिऊ परत त्याच्याकडे पाहात होती‌‌. ही मूर्ती का आपल्याला आपलीशी वाटते..? मनातलं चैतन्य का वाढवत आहे ही… अगदी मंदिरातला विठोबा आठवतोय. अगदी असाच हुबेहूब, ज्याच्या समोर आपण लहानाचं मोठं झालो… ज्याच्या नक्षी खांबाला एका हाताने धरत गोलगोल फिरत आपण खुप खुप खेळलो, तो विठ्ठल असायचा आपल्यावर लक्ष ठेवून… अगदी तसाच हा इथेही आला की काय आपली काळजी घ्यायला…? चिऊच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले… निघताना ती आजीला म्हणालीच, “आजी मी विठ्ठलाच्या पाया पडू…”

आजीने मानेनेच होकार दिला… आजी त्या विठुरायला हार करण्यात दंग झालेली होती….

आज चिऊ आली कामावर… घरात जरा गडबड जाणवली… काकु येऊन म्हणाल्या, “आजी पडल्या गं काल… आता बऱ्या आहेत. तू तुझ्या पोळ्या करून मग झाडू फारशी कर…”

चिऊने मानेनेच हो म्हंटल. पटापट पोळ्या आटोपल्यावर तिने झाडून घेतलं. हॉलमध्ये ती सारखी त्याच्याकडे बघत होती. डोळ्यातले भाव खुप ओळखीचे… पण गळ्यातला हार सुकलेला… 

चिऊ पटकन आजीच्या खोलीत गेली. आजीने तिला बघितलं आणि म्हणाली, “अरे चिऊ, आलीस का? बघ माझ्या मेलीचं काय झालं…. आषाढी एवढी जवळ आली… वारीला निघायचं होतं तर इथेच पाडलं मला विठोबाने‌… आणि आता तर घरातल्या विठूची सेवा करता यायची नाही… डॉक्टरांनी चालायला नाही सांगितलं…”

चिऊने नेमका विषय पकडला. म्हणाली… “आजी, तुमची हरकत नसेल तर मी करू का सेवा… मला नाहीतरी माझ्या गावाची, म्हणजे पंढरीची आठवण येतच आहे…”

आजी म्हणाल्या, “अगबाई, तू तर ह्याच्याच गावची… बघ तुला वेळ असेल तर कर हो सेवा… तेवढाच माझ्या विठुला आनंद होईल. नाहीतर तसं कोणी त्याला हातही जोडत नाही या घरात.”

चिऊचं काम आता वाढलं होतं… सगळं आवरून झालं की चिऊ बागेतील फुलं तोडून आणायची, त्याचा सुंदर हार करायची. नाजूक जाई, जुईच्या कळ्या आणि मध्ये एक पिवळा सोनचाफा असा सुंदर हार असायचा त्याच्या सेवेत… त्याला उगाळून चंदन टिळा लावायची… तुळशीच्या मंजुळांचा हार असायचा गळाभरून… स्वच्छ घसलेली चांदीची समई तेवत असायची, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तेजस्वी करत…

चिऊ अगदी रमून जायची ह्या सगळ्यात. पण रोज पूजा करताना…. त्याला स्नान घालताना ती मूर्ती तिला खुप आपलीशी वाटायची…. त्याची बोटं, त्याचं नाक, डोळे… ती परत परत त्यावरून हात फिरवायची. त्याचा तो मुकुट… त्यातली एकेक लयदार रेष…. तिला वाटायचं, ही आपल्या अगदी परिचयाची…. ती तल्लीन होऊन पूजा करायची विठ्ठलाची… 

आजी सुखावून जायची रोजची पूजा बघून…. कधीकधी आजी गमतीत म्हणायची, “अगं मी बरी झाल्यावर हा विठ्ठल माझी पुजा आवडून घेतो की नाही काय माहित? चिऊ तू इतकी सुंदर पूजा करतेस… जणू काही तो तुझा हक्काचा विठ्ठल आहे….”

चिऊ म्हणाली, “आजी खरं सांगु, खऱ्या पांडुरंगाला बघत मी लहानाची मोठी झाले… पण ह्या मूर्तीला बघून खुप समाधान मिळतं, मला ही मूर्ती अगदी माझी वाटते. का कुणास ठाऊक, हिच्याशी माझं नातं आहे असं वाटतं…”

चिऊ बोलत होती तेवढयात काकूंनी हाक मारली, “अग चिऊ, तुझी आत्याआजी आलीये बोलवायला तुला…. आज पूजा राहू दे. तुझे गावाकडचे आजोबा आलेत भेटायला… जा तू घरी, आज मी बघेल पूजेचं….”

आजीला जरा वाईटच वाटलं, कारण आजीला सूनबाईची पूजा माहीत होती. निव्वळ उरकण्याचा कार्यक्रम असायचा. चिऊ मात्र अगदी मनलावून पूजा करायची त्यामुळे आजी खुश होती पण नेमकं आज एकादशीला चिऊच्या हातची पूजा नाही. आजी अस्वस्थ झाली….

चिऊ पण जरा हिरमुसली, आज एकादशी आणि नेमकी आजच आपण ह्याची पूजा करायची नाही…. चिऊ म्हणाली, “आत्याआजीला सांगून येते मी मला थोडावेळ लागेल, तुम्ही पुढे व्हा असं….”

चिऊ बाहेर आली तर चिऊचे आजोबा काकूच्या सासऱ्यांशी बागेत बोलत उभे होते…. चिऊ म्हणाली, “आजोबा तुम्ही ह्यांना ओळखता?”

चिऊचे आजोबा म्हणाले, “अगं फार जून नातं आहे ह्यांच्याशी विठ्ठलाने जोडलेलं.”

काकूंनी ते ऐकून सगळ्यांना घरात बोलवलं…. आजोबा चिऊच्या आजोबांना घेऊन घरात आले आणि आजीला म्हणाले, “अहो,ओळखलं का कोण आहेत हे.”

आजीने नीट निरखत एकदम आश्चर्य व्यक्त केलं, “अगबाई तुम्ही..?”

चिऊला कळेचना नेमकं काय सुरू आहे. ह्यांची ओळख काय ? 

आजोबा म्हणाले, “ताई आमचा पांडुरंग कसा आहे हो….?

आजी हसत म्हणाली, “तुमचा पांडुरंग तुमच्याच नातीच्या हाताने सगळं करून घेतो आणि प्रसन्न हसत उभा राहतो…. तो बघा.”

आजीच्या खोलीतून ती प्रसन्न विठ्ठलमुर्ती बघून आजोबांचे डोळे पाण्याने डबडबले… त्यांनी आपले थरथरते हात जोडले. 

चिऊला शेवटी राहवेचना. ती म्हणाली, “मला कळतच नाही ए आजोबा, हा आपला विठ्ठल म्हणजे?मला सांगा ह्या मूर्तीसोबत आपलं नातं काय आजोबा.”

तेवढ्यात काकूने चहा आणला… चहाचा एकेक घोट घेत आजोबा भूतकाळात हरवत बोलू लागले…. “तुझ्या बापाला मूर्ती घडवायचं वेड लागलं. कर्ज काढून मूर्ती बनवायचा कारखाना सुरू केला… कधी गणपती, मारुती, देवी.. अश्या अनेक मूर्ती त्याच्या हातून त्या घडायला लागल्या… पण विठ्ठल मूर्ती काही त्याने घडवली नाही… लग्न झालं आणि तुझी आई निस्सीम विठ्ठल भक्त… तू पोटात असताना तिने तीन महिन्यात तुझ्या बापाच्या मदतीने हा विठ्ठल हट्टाने घडवला… मूर्ती बघून जो तो भारावून जायचा… कितीतरी जणांनी मूर्ती मागितली पण आम्ही दिली नाही… 

तुझ्या जन्माच्या वेळी तुझी आई गेली. माझा लेक सैरभैर झाला… ह्या विठ्ठलावर खुप रागावला… मूर्ती चंद्रभागेत टाकतो म्हणाला…. रागारागात घराबाहेर पडला… काळ आला होता… तो ही अपघाताने गेला…” एवढं बोलून आजोबा रडायला लागले… “परिस्थिती हलाखीची झाली. कर्जासाठी बँकेची लोकं चकरा मारायला लागले…. तू लहान. तुला पोसण्यासाठी मी आणि आजी हतबल झालो… ह्या विठुरायाला घेऊन भजन म्हणत पैसे गोळा करायला लागलो… पोटाची भाकरी तर हरवली होती आणि आता छप्पर जायची वेळ आली….

हे साहेब धावून आले ग तेंव्हा…. जप्तीला ह्यांना बँकेने पाठवलं. ह्यांनी सगळं बघितलं आणि विठुरायावर सौदा करून सगळं मोकळं करून टाकलं…. विठुला निरोप देताना आजी आणि मी तर रडलोच, पण त्याहीपेक्षा तू आकांत केला होता…. कारण बिन मायबापाचं लेकरू त्या माऊलीच्या अंगाखांद्यावर मोठं व्हायला लागलं…. ज्या मायबापाने तू पोटात असताना ही मूर्ती घडवली त्या मूर्तीने जणू तुला प्रेम द्यायला स्वतःला निर्माण केलं असं वाटत होतं.. विठू गेला पण घर वाचलं… खरंतर हे साहेब काहीच देऊ नका म्हणत होते, पण तुझ्या आजीनेच मूर्ती समोर ठेवली….”

काकूंचे सासरे म्हणाले, “हो, तशीही माझी बायको विठ्ठल भक्त. मग मला वाटलं, तिला आवडेल ही मूर्ती. आणि मुख्य म्हणजे तुमचं छत माझ्याकडून ह्या विठ्ठलाला वाचवायचं असेल… मी बँकेत पैसे भरून टाकले.. त्या बदल्यात तुमच्या चेहऱ्यावरचा आंनद आणि हा हसरा विठू मला मिळाला…..”

चिऊ उठून विठूच्या पायाशी जाऊन ओक्साबोक्शी रडायला लागली…. “माऊली तुझं माझं नातं खरंच जन्मापासूनचं ग म्हणूनच मला इथे भेटलीस….”

आजीने चिऊला जवळ बोलवलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला…. “रडू नकोस चिऊ, अगं मी आयुष्यात एवढया वाऱ्या केल्या… यावेळी विठूची वारी चुकली असं वाटलं, पण आता वाटतं, त्याने ती मुद्दाम चुकवली…. ह्या नात्याला पुनर्जन्म मिळायचा होता…. आता हा विठुराया तुझाच… तूच त्याची पूजा करायला रोज ये, आणि तुझ्या लग्नात हीच तुला भेट…. कारण तुझं आणि त्याचं नातं पाठीराख्याचं आहे… ते असंच टिकव….”

कालचीच पूजा असलेली विठाई आताच्या या घडवून आणलेल्या सोहळ्याने अधिकच हसरी दिसत होती…. जणू पाठीराख्याचं नातं टिकवायला पुन्हा नव्याने सज्ज झालेली…

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

मो +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संध्याछाया… भाग – ३ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ संध्याछाया… भाग – ३  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(सुधा म्हणाली,’तुमचं बरोबरच आहे,पण हे यांना नको का पटायला? मी सांगून थकून गेले.तुम्ही आणि ते बघा काय ते ! मी तुमच्या कोणत्याही भानगडीत पडणार नाही.” सविता जरा रागावलीच आणि निघून गेली )  इथून पुढे —

पुढच्या महिन्यात पुन्हा मंदार आणि फॅमिली विश्वासकडे रहायला आले. त्याचा छोटा,सात वर्षाचा मुलगा, विश्वासशी खेळताना म्हणाला, “माझे  खरे आजोबा देवाघरी गेलेत. तुम्ही नाही काही माझे खरे आजोबा ! तुम्ही तर काका आजोबा आहात.  बाबा म्हणत होते, वाडा विकला की तुम्ही दोघेहीआश्रमात राहाल. आश्रम म्हणजे काय हो आजोबा? ” …  त्या निरागस मुलाच्या तोंडून हे ऐकताना विश्वासच्या मनात चर्रर्र झाले. आपल्या मागे हे लोक काय बोलतात आणि  काय ठरवतात हे त्याला एक क्षणात समजले. सुधा कळवळून सांगत होती, ते त्याला आठवले. ती म्हणत होती, “अहो, आपलं ताट द्यावं पण आपला बसायचा पाट देऊ नये माणसाने ! हल्ली कोणाचा भरवसा देता येतो का ? आत्ताच नका देऊन टाकू मंदारला सगळं. आपण गेल्यावर मग करतील त्यांना हवं ते. असलं कसलं मृत्युपत्र करताय? म्हणे ‘ मी गेलो तर सुधाला मंदारने सांभाळावे. किंवा ती गेली तर मला मंदारने शेवटपर्यंत संभाळावे. म्हणजे मी सर्व माझे जे आहे ते त्यालाच आत्ताच देऊन टाकतो. नशीबच, मी जॉईंट विलवर सही केली नाहीये म्हणून ते अजून तरी तसंच राहिलंय.” …. 

…. विश्वासला हे सगळं आठवलं. वडील गेल्यावर या मुलावर आपण जिवापलीकडे प्रेम केलं, त्याला अडी अडचणीला पैसे दिले, आधार दिला. पण तो मात्र  लांब लांबच राहिला कायम. आत्ता तो लहान मुलगा बोलला म्हणून  निदान आपल्याला समजलं तरी की हे लोक आपल्याबद्दल काय विचार करत आहेत ते. कोणी  कुणाचं नाही हेच खरं.  विश्वासला अतिशय वाईट वाटलं. असा कसा आंधळा विश्वास टाकला 

आपण ?  पण देवानेच डोळे उघडले म्हणायचे, आणि नियतीच बोलली त्या लहान मुलाच्या तोंडून ! याही गोष्टीला  सात आठ वर्षं होऊन गेली. विश्वास सुधा.. दोघांची सत्तरी उलटली.  वाडा अजूनही विकला नव्हताच विश्वासने. मंदार येईनासाच झाला होता आताशा या वाडा प्रकरणामुळे. आता मात्र सत्याचा आरसा लखलखीत समोर आला विश्वासच्या ! सुधा सांगत होती ते बरोबर होते, हे लक्षात आले त्याच्या. दोघेही थकत चालले आता. साधं डॉक्टरकडं जायचं म्हटलं तरी त्यांना आता बळ उरलं नाही. सुधा जास्त थकत चालली. गेल्या वर्षभरात मंदार, त्याची आई कोणीच फिरकले नव्हते.

सुधाला हळूहळू पार्किन्सनने घेरले. तिचा तिच्या हालचालींवर  ताबा उरला नाही.जरा जरी कसलाही ताण आला की तिचे हातपाय अनैच्छिकरीत्या हलू लागत, हातातून भांडी पडत. चालताना तिचा तोल जाई, हातपाय थरथर कापत. मान लटलटा हलू लागे. तिला रोजचे व्यवहार करणे जड जाऊ लागले… आणि तिची देखभाल करणे विश्वासला झेपेनासे झाले. आता मात्र त्याने कोणालाही न विचारता एका सज्जन बिल्डरला आपला अर्धा भाग विकून टाकला.  बिल्डर म्हणाला, “ काका, तुम्ही आता त्या पुतण्याच्या अर्ध्या भागाचा विचार करू नका. तुमचे आयुष्य नीट सुखात जाईल हे बघायचं आता. तुमच्या मित्राचाच मुलगा आहे मी, कोणतीही अडचण आली तर मला हाक मारा. मी नक्की येईन. “ जगात माणुसकी आहे याचा विश्वासला पुन्हा एकदा प्रत्ययआला, आणि आपलीच  माणसं आपली नसतात, याचा अनुभवही ! त्या बिल्डरनेच विश्वासला ‘अथश्री ‘ मध्ये चांगला फ्लॅट घेऊन दिला, वर भरपूर पैसे दिले.या दोघांना स्वतःच्या गाडीतून बँकेत नेले आणि ती रक्कम गुंतवून टाकली. त्याचे  दरमहा व्याज यांच्या खात्यात जमा होईल, अशीही व्यवस्था केली. विश्वास आणि सुधा दोघेही अथश्रीत रहायला आले. सुधाची मैत्रीणही अथश्रीत आधीच आली होती. दोघींचा वेळ अगदी छान जायला लागला. रोज उठून  नाश्ता काय करू, स्वयंपाक काय करायचा  ही सगळीच कटकट संपली. विश्वासला समवयस्क नवीन मित्र मिळाले. गप्पा, टेनिस ,ब्रिज खेळणे, हे त्याला आता मनासारखे शक्य होऊ लागले.  सुधाची तब्येतही जरा सुधारू लागली. दर आठ दिवसांनी डॉक्टर येत, औषधं देत. 

दरम्यान एक दिवस, मंदार, त्याची आई, आणि बायको अचानक विश्वास-सुधाला भेटायला आले. सुधा विश्वासने  शांतपणे त्यांचे स्वागत केले. मंदार आणि सविता तणतणत म्हणाले, “छानच केलात हो भावजी व्यवहार ! आम्हाला पत्ता सुद्धा लागू दिला नाहीत. आता त्या बिल्डरने सगळा एफ एस आय वापरल्यावर आम्हाला कमीच येणार किंमत. विचारायचं तरी मंदारला.” विश्वास काहीही बोलला नाही. सुधाही गप्पच होती. सविता म्हणाली, ” इकडे येऊन रहाण्यापेक्षा, मंदारजवळ फ्लॅट घ्या म्हणत होतो ना आम्ही? नसते का मंदारने बघितले तुम्हाला म्हातारपणी? एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला विचारावेसे नाही का वाटले हो? आम्ही काय टाकून देणार होतो का  तुम्हाला.. ” 

आता मात्र विश्वास उसळून म्हणाला , “ हे सगळं कशाला बोलतेस सविता? सगळं समजलंय आम्हाला.  सगळे पैसे स्वतः हयात असतानाच तुझ्या मुलाला देण्याचा मूर्खपणा करणार होतो मी…  आंधळ्या माये पोटी .. माझा भाऊ अकाली गेला म्हणून बापाची माया देऊ केली मी तुझ्या मुलाला, पण किंमत नाही तुम्हा कोणालाच ! देवानेच शहाणपण दिलं मला. तुम्ही माझेच पैसे घेऊन आम्हालाच वृद्धाश्रमाची वाट दाखवण्याआधीच आम्ही सन्मानाने इकडे आलो ते उत्तमच..  नाही का? आपोआप गोष्टी कानावर पडल्या, म्हणून निदान हा निर्णय तरी घेता आला आम्हाला. आता मला कशाचीच खंत खेद वाटत नाही. इथले लोक चांगले आहेत. कोणाच्या दयेवर,आभार उपकारावर आम्ही जगत नाही, हे किती छान आहे. राहता राहिला वाड्याचा प्रश्न ! तुम्ही त्याचे काहीही करा. मला योग्य वाटले ते मी केले.” विश्वास पाठ  फिरवून आत निघून गेला. आणखी बोलण्यासारखे काहीच राहिले नव्हते आता. 

आठ दिवसांनी सुधा विश्वासने वकिलांना बोलावले. सर्व कॅश पैसे ,त्यांनी विचारपूर्वक, ब्लाइंड स्कूल, अनाथाश्रम,  मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, अशा ठिकाणी  आपल्या मृत्यूपश्चात दान देऊन टाकावे असे लिहिले.  मायेपोटी, सुधाने  दागिने मात्र मंदारला द्यायचे लिहून ठेवले, तेवढेच.

वकिलांनाच त्यांनी कुलमुखत्यार नेमले आणि आपल्या पश्चात ते दिलेला शब्द पाळतील, आपल्या इच्छा पूर्ण करतील याची  खात्री होती विश्वासला. आपल्या आई वडिलांच्या नावे, विश्वासने वाचनालये, गरीब विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी ठेवी, अशीही तरतूद केली.

आता मात्र, त्याला कसलीही हळहळ,अपेक्षा, आणि कसल्याच इच्छा उरल्या नव्हत्या. शांतपणे उरलेले आयुष्य आनंदात जगायचे ठरवल्यावर मागचे पाश त्यांनी सोडवून टाकले. ‘ आता हे विसाव्याचे क्षण, आपण निवांत उपभोगूया ‘ असे म्हणत विश्वास सुधा उरलेले आयुष्य शांत आणि निवांतपणे घालवू लागले.

– समाप्त –

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संध्याछाया… भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ संध्याछाया… भाग – २  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(विश्वासला मात्र मंदारची अतिशय मनापासून ओढ आणि माया होतीच.त्यांना तो प्रेमाने आपल्या घरी रहायला बोलावी, बाहेरून चांगले पदार्थ मागवी, त्यांच्या लहान मुलांशी खेळण्यात रमून जाई.)  इथून पुढे —–

मंदार या काकाला जास्त attached होता त्यातल्या त्यात. त्याची आई सविताही बऱ्यापैकी संबंध ठेवून होती सुधाशी. सुधाचं त्यातल्या त्यात सविताशी पटायचं. माहेरची माणसं, बहिणी, अशा सगळ्यांशी सुधाचं नाहीच पटायचं. त्यामुळे घरी सतत ‘ तू तिथे मी ! ‘ तिला  नवऱ्याशिवाय दुसरं  विश्वच नव्हतं. तिने कधी आपला ग्रुप,  पुस्तक कट्टा असं काही कधी निर्माणच नाही केलं. विश्वासने कितीतरी  प्रयत्न केले, पण ही सतत दुर्मुखलेलीच राहिली. 

त्यादिवशी  मंदार आणि त्याचे कुटुंब सुधाकडे राहायला आले. त्यांच्या लहान मुलाने विश्वासला खूप दमवले, आजोबा मला स्कूटरवरून राईड मारून आणा,  बॉल  खेळा, आपण शिवाशिवी खेळूया, म्हणत, मुलगा पळत सुटे आणि त्याच्या मागे धावून,  विश्वास अगदी दमून गेला . कितीही उसने अवसान आणले तरी वय बोलतेच ना.  मंदारही मुलाला रागावला नाही की “ अरे, किती त्रास देतोस आजोबांना. किती चढ उतार करायला लावतोस जिन्यावरून रे !”

शेवटी सुधाच म्हणाली, “ अहो, शांत बसा बघू. आता अजिबात धावू नका त्या पोराबरोबर. काय चाललंय तुमचं?आजारी का पडायचंय?”  लाडावलेली ती मुलं बघून सुधाला अतिशय राग यायचा.पण विश्वाससमोर तिचं काही चालायचं नाही.  विश्वासचं आंधळं  प्रेम होतं या लोकांवर. आपल्याला काही झालं तर हे लोक नक्की धावून येतील याची खात्रीच होती त्याला. पण सुधा ओळखून होती यांना. विश्वासने मृत्युपत्र केले आणि त्यात आपली सर्व मालमत्ता मंदारच्या नावे केली.  पण अजून सुधाने सही नव्हती केली म्हणून ते तसेच रखडले होते..दुसरं होतंच कोण त्याला?  त्या दिवशी असंच झालं. सुधा पाय घसरून अंगणात पडली.  विश्वासने मंदारला फोन केला. मंदार लगेच आला, डॉक्टरला बोलावलं. नशिबाने सुधाला कुठे फ्रॅक्चर झाले नव्हते. 

 मंदारने जुजबीऔषधपाण्याची सोय केली आणि तो निघून गेला. पुन्हा घरी हे दोघेच  म्हातारे उरले. विश्वासला फार वाटले, मंदार आपल्याला घरी रहायला बोलावेल, चार दिवस या म्हणेल. पण तसे झाले नाही. सुधाच आडवी झाल्याने घरची उठबस करून विश्वास थकून गेला. ही तर नुसती झलक होती. पुढे काय?  यांच्या घरी असं कायम रहायला येणारं कोणीही शक्यच नव्हतं आणि मंदारचीच आई त्याच्या घरी असल्याने याना तो बोलावणेही अशक्य होतं. सुधा बरी झाली आणि हळूहळू घरातल्या घरात हिंडूफिरु लागली, कामं करू लागली. विश्वासच्या मानाने सुधा प्रॅक्टिकल होती. तिला कोण कसे आहे हे बरोबर समजत होते. पण लग्न झाल्या दिवसापासून तिला समजून चुकले होते, विश्वास अतिशय हेकट आहे. तो दुसऱ्याच्या मताला अजिबात किंमत देत नाही. मी म्हणेन तेच खरे. सुधाला याचा त्रास होई पण इलाजच नव्हता. रोज उठून वाद घालण्यापेक्षा ती गप्प बसणे पसंत करी. कितीही अवसान आणले, तरी आता संध्याछाया भेडसावू लागल्या होत्याच.  एकेक करत सगळी म्हातारी माणसे कालवश झाली आणि आपणसुद्धा उताराला लागलो, हे सत्य कटू तर होतेच, आणि पचवायला तर फार अवघड होतेच.

सुधाची  मैत्रीण एकदा सुधाकडे आली होती तेव्हा म्हणाली, ” सुधा, कशाला वाईट वाटून घेतेस मूल नाही म्हणून. मला आहेत दोन मुलं ! उपयोग आहे का काही? दोघेही गेलेत अमेरिकेला निघून. मीही एकटीच नाही का रहात घरात? होईल ते होईल. नशिबानं भरपूर पैसा आहे, म्हणून निदान त्यांच्यावर अवलंबून तरी नाही मी ! येते जाऊन वर्षातून एकदा तिकडे, पण मला तिकडे मुळीच आवडत नाही ग कायम रहायला. आपला भारत खरंच महान ! मला तरी कोण आहे ग इथं? मी तर ‘अथश्री’मध्ये फ्लॅट घेऊन ठेवलाय. सध्या दिलाय भाड्याने. मला होईनासं झालं की मी तिकडे जाऊन रहाणार. छान आहे सगळं तिथे.  कसलीही काळजी नाही. पैसे द्या, की सगळ्या सुखसोयी आहेतच. कोणाचे आभार उपकार नकोत.” सुधाच्या मनात हाही विचार घर करून राहिला. कोण कोणाचे नसते हल्ली. पुतण्यावर फार भरवसा आहे विश्वासचा, पण एवढी मी आजारी होते, तर म्हणाला का,या विश्रांतीला? आपल्यालाही ही सोय हळूहळू बघावी लागणार. अगदी घरी बायका ठेवल्या तरी आपल्याला दिवसेंदिवस घर सांभाळणे अवघडच जाणार हे कळून चुकले होते सुधाला ! आता फक्त विश्वासला हे कधी समजणार, याची वाट बघणे तिच्या हातात उरले होते.

त्या दिवशी मंदार असाच विश्वासकडे आला. इकडचं  तिकडचं बोलून झाल्यावर म्हणाला, ” काका, आपण वाडा विकून टाकूया. मला आता पैशाची गरज आहे फार. तुम्ही तरी अशा जुनाट वाड्यात का राहाताय? वाड्याचे दोन्ही भाग एकदम विकले तर किंमत चांगली येतेय ! आपल्याला फ्लॅट्स आणि वर पैसेही मिळतील. किती दिवस असे भावनिक गुंतवणूक करून, माझ्या आईवडिलांची वास्तू आहे ही, असं म्हणत रहाणार? मनावर घ्या आता. जुनी झाली ती वास्तू आणि त्या भावनाही !  मला  आत्ता खरंच गरज आहे पैशाची. बाबा अकाली अचानक गेले,आणि काहीच शिल्लक नव्हती त्यांची. मला आता खूप खर्च आहेत पुढे. मुलांच्या फियाच लाखाच्या घरात असतात हल्ली. तुम्हाला काय कल्पना येणार? बघा विचार करा.” मंदार निघून गेला. विश्वासला हा पहिला झटका होता. सुधा शांतपणे हे ऐकत होती.

नंतर पुढच्या आठवड्यात सविता आली. “वहिनी, काय ठरलं भावजींचं? विकायला आहेत का तयार? बस झालं आता इमोशनली  गुंतून पडणे हो ! किती दुरुस्त्या निघत आहेत वाड्याच्या. नका राहू भुतासारखे इथं दोघेच्या दोघे. मंदार म्हणतो तसं आपण वाडा विकून टाकू आणि तुम्ही आमच्याजवळच एखादा फ्लॅट घ्या. म्हणजे  मंदारलाही बरे पडेल तुमची देखभाल करायला. सारखा कसा येणार तो तरी इतक्या लांबून !”  सुधा म्हणाली, ‘तुमचं बरोबरच आहे, पण हे यांना नको का पटायला? मी सांगून थकून गेले. तुम्ही आणि ते बघा काय ते ! मी तुमच्या कोणत्याही भानगडीत पडणार नाही.” सविता जरा रागावलीच आणि निघून गेली.. 

– क्रमशः भाग दुसरा. 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संध्याछाया… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ संध्याछाया… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले

कोणता तरी अगदी फालतू सिनेमा  टीव्हीवर लागला होता. निरर्थकपणे चॅनल बदलताना  सुधाचं लक्ष कशातच नव्हतं. उगीचच चाळा म्हणून ती  रिमोटची बटणे दाबत होती. मनात दुसरेच विचार घोळत होते..आज चार वाजता तिचा पुतण्या, त्याची बायको मुलं सगळे रहायला  येणार होते चार दिवस. सुधाला हल्ली हे सगळे नकोसे वाटायचे. 

तो लहान मुलांचा दंगा, तो पसारा, ते लोक गेले की आवरताना जीव  दमून जायचा तिचा.  पुन्हा जास्त स्वयंपाक, काही गोष्टी बाहेरून आणा, गोडधोड करा ! त्यात मदत कोणाचीही नाही,आणि येणारी मंदारची बायको तर आळशी आणि काहीच कामाची नाही !

आताशा सुधाला  ही उठबस होतच नसे. पण विश्वासला हे लोक येणार म्हटले की अगदी उत्साह यायचा आणि न झेपणारी शंभर कामे तो करायला धावायचा.. सुधाला हे अजिबात  पसंत  पडायचे नाही. आधीच एक तर ती संथ,थंड, होती. तिला उरक म्हणून नव्हता आणि मूलच न झाल्याने संसारात त्यासाठी कुठलीच तडजोड तिला कधी करावीच नाही लागली. तिचा नवरा  विश्वास आणि दीर विकास, दोघेच भाऊ. विकास आणि विश्वास मध्ये वयाचे अंतर खूप होते. सासूबाईंना खूप उशिरा झाला विकास– त्यांची अगदी चाळीशी उलटून गेल्यावर.  त्यामुळे कदाचित, त्यांचे विकासवर जास्तच प्रेम. विकास आणि त्याची बायको सविता मात्र आईजवळ राहिले कायम, ती असेपर्यंत ! सुधाचं सासूबाईंशी कधी  पटलं नाही आणि ती वेगळी राहू लागली. सासूबाईंचा रागच होता जरा सुधावर !  सविता मात्र सासूबाईंशी पटवून घेई. ती लाडकी होतीच सासूबाईंची !लाडक्या लेकाची बायको म्हणून !  विकासचं आईवर अतिशय प्रेम होतं आणि तो कधीही वेगळा राहिला नसता, म्हणूनही असेल कदाचित !

सुधाने मूल होण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण कोणातच दोष नसूनही तिला कधी दिवस गेलेच नाहीत. त्यामुळे तिचा आधीच घुमा,आतल्या गाठीचा असलेला स्वभाव आणखीच कडवट झाला. सुरवातीची सगळी हौस अशीच विरून गेली. तरीही विश्वास चांगल्या पोस्टवर होता, म्हणून ते दोघे अनेक परदेश प्रवास करून, खूप जग हिंडून आले होते. तेही विश्वासचीच हौस म्हणून ! सुधाला ती तरी कुठे हौस होती? परत आल्यावर  कोणी विचारलं असतं ना, तर आपण काय बघितलं हेही तिला नसतं सांगता आलं ! केवळ विश्वासचा आग्रह म्हणूनच तिने ते परदेश प्रवासही केले, तेही निरुत्साहानं ! सुधाचा एकूणच निरुत्साही   चेहरा, कशातच नसलेला उत्साह, तिला माणसे  जमवायला मारक ठरे. तिला मैत्रिणीही फार नव्हत्या आणि हिने कधी बाहेर पडून, चार लोकांत मिसळून, नोकरीही केली नाही.  वडिलोपार्जित वाडा होता,

त्याचा अर्धा भाग विश्वासला, अर्धा भाग विकासला अशी वाटणी आईवडील असतानाच झाली होती. आपल्या वाट्याला आलेल्या भागात विश्वासने दोन मजले बांधले होते, त्यालाही झाली तीस पस्तीस वर्ष. कोणासाठी आता परत नवीन बांधायचे आणि ठेवायचे? बिल्डर यायचे,त्यांना विश्वास परतवून लावायचा !.त्या जुन्या गढी सारख्या एकाकी, उदास घरात आणखीच  खिन्न वाटायचे, संध्याकाळ झाली की.  

विकासची बायको सविता, मुलगा  वागायला ठीक ठीक  होते. मुलगा मंदार  इंजिनीअर झाला आणि त्याने लग्नही केले. अचानक एक दिवस, मुंबईहून कारने परत येत असताना विकासला ऍक्सिडेंट झाला आणि विकास जागच्याजागी गेलाच. तरुण, फक्त पन्नाशीच उलटलेला मुलगा असा अचानक गेलेला बघून, आईवडिलांनी हायच खाल्ली. विकासचा मुलगा मंदार नुकताच  नोकरीला लागला होता. त्याची बायको गृहिणी आणि आईही घरातच असायची . वडिलांनी  काही फार पैसे मागे ठेवले नव्हते . या जुन्या वाड्यात रहायला नको म्हणून विकास केव्हाच बाहेर फ्लॅट घेऊन रहात होता तेवढीच काय ती त्याची कमाई. सगळा भार मंदारच्या खांद्यावर येऊन पडला. मंदार फारसा कर्तबगार तर नव्हताच. त्याची नोकरीही बेताची, बायकोही अगदी सामान्य कुटुंबातली आणि साधी बीकॉम, आणि कसलीही जिद्द नसलेलीच ! आजपर्यंत आई वडिलांनी  मंदारला एकुलता एक म्हणूनच वाढवले, जमेल तितके कौतुक केले, माफक लाड पुरवले इतकेच. कसाबसा डिप्लोमा करून त्याला जॉब मिळाला इतकंच. सगळ्या बाजूने अशी संकटे आली असताना, त्याचा विश्वासकाका नेहमी त्याच्या पाठीशी उभा असायचा. पण मंदार कधीही मोकळेपणाने त्याच्याशी बोलला नाही, की कधी त्याला सल्ले विचारले नाहीत त्याने. त्याचा वाड्यातील भागही तसाच ठेवला त्याने. त्याला तो विकताही येईना. असा अर्धाच भाग बिल्डर कसे घेणार? ते म्हणत, सम्पूर्ण वाडा द्या म्हणजे आम्हाला नीट बांधता येईल, तुम्हालाही आम्ही फ्लॅट्स, वर पैसेही देऊ. पण विश्वास त्याला कधीही  तयार नव्हता. त्याला हे  मान्यच नसायचे. त्या जुन्या, कोणीही नसलेल्या वाड्यात दोघेच नवरा बायको रहाताना बघून लोकांना आश्चर्यच वाटे. आणखी आणखीच तो वाडा जुनाट होत चालला. विश्वासचं मात्र मंदारवर निरपेक्ष प्रेम होतं. तो त्यांच्या घरी राहायला जायचा, त्यांना बोलावायचा. विश्वासची नोकरी चांगली होती,आणि काटकसरीची  राहणी असल्याने विश्वास पैसे बाळगून होता.  पुन्हा मुलं बाळं नसल्याने खर्च तरी कुठे होते? निरनिराळे छंद, वाचन, यात विश्वास स्वतःला रमवत असे. सुधाला कधी तेही जमले नाही.   सतत  घरात बसून बसून एकलकोंडी झाली होती सुधा. शिवाय  मूल नसल्याचे शल्य कायम होतेच. लोक काय म्हणतील, या भीतीने ती कधी कोणाच्या डोहाळजेवण,  बारसं अशा साध्यासुध्या समारंभालाही जायची नाही. कधी गावी माहेरी गेली, तर भाऊ भावजय म्हणत , “ ताई, कशा राहता बाई त्या गढी सारख्या वाड्यात तुम्ही? रात्री भीति नाही का हो वाटत? किती एकाकी आणि जुनं घर झालंय ते. भावजीना म्हण की, टाका विकून आणि बिल्डर देत असेल तर छान फ्लॅट तरी घ्या ! काय ताई ! बरोबरच्या लोकांची घरं बघ आणि तुमचा किल्ला बघ.जुना पुराणा ! “

सुधा भावाला म्हणाली, “अरे मी सांगून थकले बाबा. माझ्या नशिबी हेच जुनाट घर दिसतंय कायम. जाऊ दे ना. मग आमच्यात भांडणे  होतात आणि पुन्हा त्यातून निष्पन्न काहीही होत नाही. इथेच होणार आमचा शेवट. मला तर त्यात काही नवीन आणावं, कधी हौसेने सजवावे असं सुद्धा वाटत नाही. किती केलं तरी जुनाट ते जुनाटच. आणि नंतर तरी कोणाला द्यायचंय ते? जाऊ दे ना ! आप मेला जग बुडाला.”  विश्वासला मात्र मंदारची अतिशय मनापासून ओढ आणि माया होतीच. त्यांना तो प्रेमाने आपल्या घरी रहायला बोलावी, बाहेरून चांगले पदार्थ मागवी, त्यांच्या लहान मुलांशी खेळण्यात रमून जाई.

–क्रमशः भाग पहिला

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सावित्री ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ सावित्री ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सकाळी दहा-साडेदहा वेळ होती माधवजी डोळे मिटून आरामखुर्चीत बसले होते.

पत्नीच्या वियोगाचं दुःख त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे जाणवत होतं.  माधवजींची मुलगी निशा आणि मुलगा मुकेश, बाजूलाच सोफ्यावर बसले होते.

नयनाबेनचं दहा दिवसांपूर्वीच निधन झालं होतं . ते कळल्यावर निशा आणि मुकेश दोघेही परदेशातून इकडे आले होते. पण आता त्यांना परतायचे वेध लागले होते. अचानक यावं लागल्याने ते एकेकटेच आले होते. त्यांचे कुटुंबीय तिकडेच होते.

नयनाबेन गेली चार वर्षे अंथरुणालाच खिळून होत्या. पॅरॅलिसिसमुळे त्यांच्या शरीराचा डावा भाग लुळा पडला होता. एका नातेवाईकाच्या लग्नाला जात असताना वऱ्हाडाच्या बसला अपघात झाला, नयनाबेनच्या मेंदूला मार बसला आणि हे अपंगत्व आलं. पण त्यावेळी दोन्ही मुलं काही येऊ शकली नव्हती अथवा नंतरही फिरकली नव्हती. फोनवरून कधीमधी बोलणं, चौकशी व्हायची फक्त.

माधवजींचं नयनाबेनवर मनापासून प्रेम होतं. तिच्या उपचारात त्यांनी कोणतीही हयगय केली नाही. तिच्या सेवेसाठी चोवीस तास बाई–वासंतीला ठेवलं होतं, तरी ते स्वतः देखील शक्य होईल ते तिच्यासाठी प्रेमानं करत होते. आपल्या ‘नयन ज्वेलर्स’ मध्ये जाण्याआधी, रोजचा चहा- नाश्ता, ते नयनाबेनच्या रूममध्येच घ्यायचे, तिच्याशी बोलत. सुदैवाने नयनाबेनच्या बोलण्यावर या आजाराचा फारसा परिणाम झाला नव्हता. बोलताना किंचित अडखळायला व्हायचं, एवढंच!

बहुतेक सगळे सगे-सोयरे येऊन भेटून गेले होते. त्यामुळे घरात आता वर्दळ नव्हती. दहा दिवस सुतक पाळण्याव्यतिरिक्त, कोणतंही कर्मकांड करण्याची रूढी माधवजींच्या समाजात नव्हतीच.

देशमुख वकिलांना  आलेलं  बघून मुलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. पण माधवजींना काही आश्चर्य वाटलं नाही, कारण ते त्यांचे जवळचे मित्र होते आणि दोन्ही कुटुंबांचा चांगला घरोबाही होता. ते मुकेशनं पुढे केलेल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले आणि त्यांनी आपल्या येण्याचं कारण सांगताच, मुलांइतकेच माधवजीही चकित झाले. नयनाबेननी मृत्युपत्र केलं होतं, आणि मुलांच्यासमोरच त्याचं वाचन व्हावं,यासाठी देशमुख वकील मुद्दाम आले होते. त्यांनी वासंतीलाही तिथे येऊन बसायला सांगितलं, तेव्हा वासंतीसकट सगळेच बुचकळ्यात पडले. पण देशमुख वकिलांचा मान राखून, ती तिथेच पण जरा दूर खुर्ची ओढून बसली.

देशमुख वकिलांनी बॅगेतून एक सीलबंद पाकीट बाहेर काढून सर्वांसमक्ष उघडले आणि वाचायला सुरुवात केली….

‘ मी गेल्या चार वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहे. माधवजींनी माझ्या उपचारात कोणतीच कसूर केली नाही. स्वतःही प्रेमाने माझी सेवा केली, म्हणूनच कदाचित मी इतके दिवस जिवंत राहिले. पण माझं आयुष्य संपत आलंय असं मला आतून जाणवतंय. माझ्या परिस्थितीत काहीच सुधारणा होत नाहीये. अश्या परावलंबी जिण्याचा खरं तर मला कंटाळाही आला आहे. पण माधवजींची प्रेम आणि वासंतीनं मनापासून केलेली सेवा मला जगायला लावते आहे.  या जगाचा निरोप घेण्याआधी मला माझ्या मनातलं काही सांगायचं आहे.

साधारण तीन वर्षांपूर्वी वासंती आमच्याकडे आली. आमच्या शेजाऱ्यांच्या कामवालीच्या दूरच्या नात्यातली. साताऱ्याजवळ तिचं गाव.

तिला जवळचं कोणी नातेवाईक नाही, म्हणून ती पोटापाण्याचा उद्योग शोधायला इकडे आली. तशी दहावीपर्यंत शिकलेली. आम्हाला चोवीस तास रहाणारी बाई हवीच होती. म्हणून हिला ठेवून घेतलं.

वासंती अगदी प्रेमानं माझं सगळं करायची. शिवाय घरातली इतर कामंही ती स्वतःहून करते. ती खरंतर अबोलच, पण सतत बरोबर राहिल्याने माझ्याशी बोलू लागली. तिची कहाणी ऐकून मी तर सर्दच झाले.

तिचे वडील ती सातवीत असतानाच गेले. साप चावल्याचं निमित्त झालं आणि खेड्यात उपचार वेळेवर मिळू शकले नाहीत. घरची थोडीफार शेती पोटापाण्यापुरती. एकच भाऊ पाचेक वर्षांनी मोठा. तो  शेती बघू लागला आणि आई घर सांभाळायची. हिची दहावीची परीक्षा झाली आणि एकाच मांडवात भाऊ आणि बहिणीचं लग्न उरकण्यात आलं.

वासंतीचा नवरा पण दहावीपर्यंत शिकलेला, घरची शेती आणि भाजीचा मळा होता. आई-वडील आणि ही दोघं असं छोटसं कुटुंब.. खाऊन-पिऊन सुखी. मोठी बहिण लग्न होऊन सासरी साताऱ्यात राहात होती. वासंतीचा नवरा मोटरसायकल घेऊन साताऱ्याला बाजारात जायचा. कधी भाजीचं बियाणं, खतं आणायला, कधी भाजीचे पैसे आणायला. मळ्यातली भाजी रोज साताऱ्याला टेंपोने पाठवली जायची.

आणि एक दिवस बाजारातून घरी येताना, त्याला ट्रकनी उडवलं. बाईकचाही चक्काचूर झाला आणि तो जागीच…

जेमतेम सहा महिने झाले होते लग्नाला. दिवसकार्य झाल्यावर रीत म्हणून भाऊ वासंतीला माहेरी घेऊन आला. आईसोबत, भावजयीनंही तिचं दुःख समजून महिनाभर सगळी खातिर केली. महिनाभरानंतर भाऊ तिला सासरी पोचवायला गेला, तर सासरच्यांनी तिला पांढऱ्या पायाची, अवलक्षणी म्हणून घरात घ्यायचंच नाकारलं.’ आमचा सोन्यासारखा मुलगा गेला आता आमचा हिचा काही संबंध नाही.’

ही भावासोबत परत आली. वर्ष होऊन गेलं तसं भावाने हिचं दुसरं लग्न करून देण्याचा प्रयत्न केला. पण आधीची हकीकत कळली की नकार यायचा. हिचा पायगुण वाईट म्हणून.

अश्या बाबतीत लोकं मागासलेलेच! नणंद कायमचीच इथं राहणार ,या विचारानं भावजयीचं वागणंही बदललं. घरातलं सगळं काम तर वासंती करतच होती. पण तरी भावजय काहीतरी खुसपट काढून वाद घालत होती. आई होती तोवर जरा तरी ठीक होतं. पण आई गेल्यावर तर घरात रोजच भांडणतंटा सुरू झाला. त्याला कंटाळून हिनं भावाचं घर सोडलं आणि इथे आली.

एवढ्या लहान वयात असं झाल्याने, बिचारीला काहीच हौसमौज करता आली नाही. विधवा म्हणून साधं फूल-गजरा माळायची पण चोरी.

माधवजी माझ्यासाठी न चुकता गजरा आणायचे मी आजारी होते तरीही. माझ्या केसात तो माळण्याआधी वास घेताना, वासंतीच्या चेहऱ्यावरचे भाव मी अनेकदा वाचले होते.
काल वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी, नेहमी प्रमाणे माधवजींनी माझ्या हातात नवीन साडी ठेवली. मी माधवजींनी म्हटलं, ‘ यावर्षी मला एक छानसं मंगळसूत्रही हवंय बरं का!’ त्यांना आश्चर्य वाटलं, कारण मी कधीच कोणत्या दागिन्याची मागणी आजवर केली नाही. पण संध्याकाळी येताना ते घेऊन आले. उद्या पूजा करताना घालेन, म्हणून मी त्यांना कपाटात ठेवायला दिलं.  सकाळी माझी तब्येत एवढी बिघडली की मी फक्त पडल्याजागी हात जोडूनच पूजा केली. दरवर्षी या दिवशी दानधर्म करण्याचा माझा नेम.  पण तोही चुकला.  मी मनाशी काहीतरी ठरवलं,आणि देशमुख काकांना बोलावून त्यांचा सल्ला घेतला आणि नंतर मृत्यूपत्र बनवलं. कारण  या जगातून जाण्याआधी  मला माझा विचार प्रत्यक्षात आणणं शक्य नव्हतं,कायद्याच्या आडकाठीमुळे. म्हणून तुम्ही ते  करावं अशी माझी शेवटची इच्छा आहे.

मी सौभाग्यदान करायचं ठरवलं आहे. माझी इच्छा आहे वासंती आणि माधवजी यांनी लग्न करून एकत्र रहावं. अर्थात त्या दोघांनी आनंदाने संमती दिली तरच. माधवजींचं वय बावन्न  आणि वासंतीचं अडतीस.  जरा वयात  अंतर आहे. पण माधवजींची काळजी ती नीट घेवू शकेल. त्यांच्या आवडीनिवडी तिला नीट माहिती झाल्या आहेत तीन वर्षांत! ती त्यांना नक्कीच सुखात ठेवेल. माधवजींनीदेखील पुढील आयुष्य आनंदात, समाधानात घालवावं , एकटं राहू नये असं मला वाटतं.

दोन्ही मुलं तशीही परदेशातच राहात असल्याने, हे समजून घेतील , अशी मी अपेक्षा करते. निशा-मुकेशच्या शिक्षणासाठी, परदेशी जाण्यासाठी आणि लग्नातही जे द्यायचं ते देऊन झालं आहे. त्यामुळे माझं स्त्रीधन – सर्व दागदागिने वासंतीला द्यावे. जर तिची माधवजींशी लग्न करण्याची इच्छा नसेलच तर दुसरा एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न करून द्यावं आणि त्यासाठी माझं स्त्रीधन वापरावं. सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडे मागून त्याला जिवंत केलं होतं. मीही माझ्या सत्यवानाला-माधवजींना नवजीवन लाभावं यासाठीच विनंती करते आहे. ‘

‘…… मृत्यूपत्रावर तारीख होती सहा महिन्यांपूर्वीची… वटपौर्णिमा होती त्या दिवशी.

देशमुख वकिलांनी वाचन संपवलं.

वासंतीला हुंदका आवरता आला नाही. या आगळ्यावेगळ्या मृत्यूपत्रानं सगळ्यांना निःशब्द केलं होतं.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘‘आयडेंटिटी‘…’ ☆ सुश्री हर्षदा बोरकर ☆

सुश्री हर्षदा बोरकर

(आजची कथा सुश्री हर्षदा बोरकर यांची आहे. त्या लेखिका, नृत्य-नाट्य दिग्दर्शिका कीर्तनकार, समाजसेविका आहेत.)

? जीवनरंग ❤️

☆ ‘‘आयडेंटिटी ‘…’ ☆ सुश्री हर्षदा बोरकर

पुस्तक : गुंफियेला शेला – कथा ४ : आयडेंटिटी – सुश्री हर्षदा बोरकर

“आयडेंटिटी कार्ड प्लिज!?”

एअरपोर्टवरच्या बोर्डिंगपास देणाऱ्या कर्मचाऱ्यानी मागणी करताच हातात तयारच ठेवलेलं आयकार्ड नीट निरखून,हसून स्टेलानं पुढे केलं. तपासणी प्रक्रिया पूर्ण होऊन स्टेलाचा ‘प्रवास’ सुरू झाला……

नऊ वर्षापूर्वी आरशात पाहताना जेव्हा कपाळावर ,केसांजवळ पांढरा डाग दिसला तेव्हा हादरून गेलेली स्टेला आज निर्धास्तपणे विमानातल्या बिझनेस क्लासमधल्या खूर्चीवर सेफ्टीबेल्ट लावून   खिडकीबाहेरचं जग काचेतून न्याहाळत होती.

…..

“कोड…!”

….कपाळावरचा डाग जसा जसा पसरू लागला तसा स्टेलाचं तारुण्यसुलभ मन व्यापू लागला. गोऱ्यारंगाच्या त्या डागासोबत काळी काळजी तिच्या व्यक्तिमत्वाला घेरून टाकू लागली आणि स्वत:ला लपवू लागली स्टेला रंगबिरंगी दुनियेपासून.

पण जसा जसा तो पांढऱ्या रंगाचा डाग चेहराभर पसरला आणि स्वत:चच अर्धगोरं आणि अर्धकाळं शरीर तिला दिसलं तसा एक विलक्षण विचार तिच्या मनात चमकून गेला.

….
… मनमिळाऊ शाळकरी स्टेला स्मिथला जेव्हा मित्र-मैत्रिणी ,शेजारीपाजारी ब्लॅकस्मिथ म्हणून हिणवू लागले होते तेव्हा आपल्याच काळोख्या कोषात गुरफटून राहू लागली स्टेला. अत्यंत कुशाग्र   बुद्धीच्या, कुशल आणि महत्वाकांक्षी वृत्तीच्या स्टेलाला पदवी प्राप्त झाल्यावर नोकरी-व्यवसायात डावलले गेले होते ते केवळ ती कृष्णवर्णीय असल्यामुळेच..! कायमच क्षमता पातळीच्या खालच्या दर्जाची      कामे स्वीकारावी लागली तिला…

…..

आता मात्र, गोऱ्या रंगाचा डाग शरीरभर पसरत जात असताना एका अनोख्या नियोजनाचा पाठपुरावा करू लागली स्टेला. स्वत:ची छोटेखानी नोकरी सांभाळत, ह्या डागाळलेल्या नऊ वर्षात , तिने     अनेक अवघड परिक्षा प्रयत्नांनी व अक्कलहुशारीने पूर्ण करत नव्या पदव्या मिळवून स्वत:चा सीव्ही तगडा बनवला . रंगपरिवर्तन करणारं कोड तिने सकारात्मकतेनी पसरवून घेतलं अंगभर..!!

वकिलामार्फत ॲफेडेव्हीट नावाच्या कागदानी बदलून घेतलं स्वत:चं नाव आणि अस्तित्व! आता नव्या नावानी आणि नव्या रुपानी परदेशातील तिच्या गुणांलायक नोकरीसाठी अर्ज भरू लागली *’मेरी    फिनिक्स’*!!

शरीरभर पसरलेलं हे कोड स्टेलासाठी कात टाकणं होतं. वर्ण-रंगावरून माणूस जोखणाऱ्या जगाला स्वत:चा खरा रंग दाखवायला सज्ज झाली मेरी फिनिक्स!!

विमान आकाशात झेपावलं होतं कॅनडाच्या दिशेनी, जिथे नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी त्यांच्या नव्या प्रोजेक्ट मॅनेजरच्या स्वागतासाठी उत्सुक होती. पहाटेच्या वेळी विमानाच्या छोट्या खिडकीतून सूर्याची     कोवळी किरणं चराचर उजळवून टाकताना मेरी पहात होती, एअर होस्टेस अदबीनं विचारत होती,” विच कॉफी यू विल प्रिफर मॅम?”

मेरी हसून म्हणाली,”ब्लॅक, प्लिज!”

❤ ❤ ❤ ❤ ❤

टीप – कथा वाचून आणि चित्र पाहून वाचकांना जर त्या चित्रावर आधारित नवीन कथा, कविता, लेख वगैरे सुचलं, तर त्यांनी ई-अभिव्यक्ती आणि सुश्री सोनाली लोहार यांच्याशी संपर्क साधावा.

चित्र साभार – फेसबुक पेज

©️ सुश्री हर्षदा बोरकर

मो 9867380694

ईमेल – Harshadaborkar22@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘‘फिलोमेला‘…’ ☆ सुश्री निर्मोही फडके ☆

सुश्री निर्मोही फडके

(आजची कथा सुश्री निर्मोही फडके यांची आहे. त्या लेखिका, व्याख्यात्या, संपादिका आणि भाषेच्या अभ्यासक आहेत.)

? जीवनरंग ❤️

☆ ‘‘फिलोमेला‘…’ ☆ सुश्री निर्मोही फडके

पुस्तक : गुंफियेला शेला – कथा 3 : फिलोमेला – सुश्री निर्मोही फडके

जीव मुठीत घेऊन ती वेगानं धावत होती, खाचखळग्यांतून, काट्याकुट्यांतून, दगडपाण्यातून. अचानक तिला पंख फुटले आणि तिनं एका पायानं जमिनीला जोर देत दुसरा पाय दुमडून आपले हात पंखांना समांतर करत हवेत उंच भरारी घेतली.

‘ऊड फिलोमेला, ऊड, मिळालेल्या संधीचं सोनं कर,’ तिचं मन तिला आदेश देत होतं. अफाट आकाशात वारा अंगावर घेत उडताना तिला वाटत होतं, खूप जोरात ओरडून जगाला सांगावं, ‘मी फिलोमेला, राजकुमारी फिलोमेला, मी स्वतंत्र झालेय.’ 

हं, पण ओरडणार कशी? वाचा गमावली होती तिनं, त्या नराधमानं केलेल्या अत्याचारात.

फिलोमेलाच्या अलौकिक लावण्यावर, कोमल मनावर अनन्वित अत्याचार करून तिला मुकी, असहाय करून अज्ञातवासात बंदिवान करणारा तो, तिच्या सख्ख्या बहिणीचाच नवरा, राजा टेरिअस. 

‘ऊड राजकुमारी फिलोमेला, दूर जा इथून… पंख होती तो उड आती रे… मिळालेत तुला पंख,मूव्हींचं वेड असणारी निशा अगदी भान हरपून मूव्ही बघत होती. ग्रीक पुराणातली एक शापित सौंदर्यवती, तिच्या कथेवरचा मूव्ही, ‘फिलोमेला –  द नाइटिंगेल’. 

थिएटरमध्येच हा भव्य मूव्ही पाहायचा असं निशानं ठरवलंच होतं नि ती एकटीच मूव्ही पाहायला आली.

‘वाह् काय मस्त जमलाय मूव्ही, स्टोरीच दमदार. मेहुण्याकडून अत्याचार सहन करणारी फिलोमेला, हातमागावर चित्र विणून, मोठ्या शिताफीनं बहिणीला त्यातून संदेश पाठवून सुटका करून घेते. जीभ छाटल्या गेलेल्या फिलोमालाचं न गाणा-या नाइटिंगेलमध्ये झालेलं रूपांतर, वाह्, सो सिम्बाॅलिक. स्क्रीन प्ले, डायरेक्शन, अॅक्टिंग, सिनेमाटोग्राफी, ग्राफिक्…परफेक्ट, या वर्षीची दोन ऑस्कर नक्की, लिहायला पाहिजेच या मूव्हीबद्दल.’ 

निशामधला चित्रपट-आस्वादक एकेक मुद्दे मनात नोंदवण्यात गर्क असताना तिला जाणवलं, थिएटरमधल्या अंधारात आपल्या शेजारच्या सीटवरचे दोन डोळे पल्याला न्याहाळतायत नि एक हात पुढे सरकतोय.

‘फिलोमेला… फिलोमेला…’ ती मनाशी पुटपुटली.

अंगाशी सलगी करू धजावणारा तो हात तिनं कचकन पिरगळला तशी अंधारात एक अस्फुट पुरुषी आवाजातली किंकाळी उमटली नि विरली. फिल्मच्या क्लायमॅक्सच्या गोंधळात कुणालाच काही कळलं नाही.  

निशानं आपल्या आर्टिकलचं शीर्षक मनात पक्कं केलं, 
‘अजूनही लढतेय आधुनिक फिलोमेला’.

चित्रपट संपल्यावर पडद्यावर अक्षरं उमटली,

…A New Beginning.

❤ ❤ ❤ ❤ ❤

टीप – कथा वाचून आणि चित्र पाहून वाचकांना जर त्या चित्रावर आधारित नवीन कथा, कविता, लेख वगैरे सुचलं, तर त्यांनी ई-अभिव्यक्ती आणि सुश्री सोनाली लोहार यांच्याशी संपर्क साधावा.

चित्र साभार – फेसबुक पेज

©️ सुश्री निर्मोही फडके

मो. 9920146711

ईमेल – nirmohiphadke@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘‘अंधार‘…’ ☆ सुश्री सोनाली लोहार ☆

सुश्री सोनाली लोहार

(आजची कथा अंधार सोनाली लोहार यांची आहे. त्या लेखिका, कवयित्री, ऑडिओलॉजिस्ट व स्पीच लॅंग्वेज पॅथॅलॉजिस्ट, उद्योजिका आहेत.)

? जीवनरंग ❤️

☆ ‘‘अंधार‘…’ ☆ सुश्री सोनाली लोहार

पुस्तक : गुंफियेला शेला – कथा : अंधार – सुश्री सोनाली लोहार

“मला एक आयफोन हवाय, नवीन मॉडेल..तुम्ही द्याल का आणून कुठून  जरा कमी किंमतीत..?”

त्यानं नवलानं वत्सलाकडे बघितलं.

कोपऱ्यात पडलेल्या तिच्या नोकियाच्या मळकट फोनकडे बघत तो म्हणाला, “एकदम आयफोन…कशाला?? पैसे वर आलेत का तुझे! “

तिनं मान खाली घातली.

“दिपूचा वाढदिवस येतोय पुढच्या महिन्यात, पंधरा पूर्ण होतील..गावाहून आईचा फोन होता, म्हणाली त्याला हवाय.”

त्यानं डोक्याला हात लावला,” पागल आहेस का गं तू!अगं स्वतःकडे बघ जरा काय अवस्था करून घेतलीयस !अंगावर नावाला तरी मांस शिल्लक आहे का?? आणि हे असले महागडे हट्ट पुरवत       बसशील तर पोरगा हातातून कधी गेला ते कळणार पण नाही हां!”

तिच्या डोळ्यात तरारून पाणी आलं , ” हातातून जायला आधी हातात तर असला पाहिजे नं!”

अंधारात तिचं अंग हुंदक्यांनी गदगदून गेलं..न राहवून त्यानं तिला जवळ ओढली. तिच्या पोलक्याची सुटलेली बटणं लावत तो पुटपुटला,” पोराच्या आयुष्यात रंग भरता भरता रिकामी होत    चाललीयस वच्छी, मरशील अशानं एकदिवस! आणतो मोबाईल, पण पैशाचं काय?”

“पैशाची हुईल व्यवस्था, तुम्ही तेव्हढं जरा स्वस्तात मिळतो का बघा देवा”, ती हुशारून म्हणाली.

दारावर बाहेरून थाप पडली. कपडे झटकत तो विटलेल्या गादीवरून उठला आणि पत्र्याची कडी काढून तिच्याकडे न बघता बाहेर पडला. दाराबाहेर थांबलेलं दुसरं किडमिडं गिर्‍हाईक आत शिरलं.

दरवाजा लावताना बाहेर बसलेल्या संभ्याला ती म्हणाली,” आंटी को बोल, जेव्हढी पाठवता येतील तेव्हढी पाठव, पंधरा मिनटाला एक पण चालेल…मैं लेगी.”

त्या सहा बाय चार फुटाच्या पत्र्याच्या खोक्यातला अंधार तिला गिळताना पाय पसरून दात विचकत हसत होता….

❤ ❤ ❤ ❤ ❤

टीप – कथा वाचून आणि चित्र पाहून वाचकांना जर त्या चित्रावर आधारित नवीन कथा, कविता, लेख वगैरे सुचलं, तर त्यांनी ई-अभिव्यक्ती आणि सुश्री सोनाली लोहार यांच्याशी संपर्क साधावा.

चित्र साभार – फेसबुक पेज

©️ सुश्री सोनाली लोहार

मो. – 9892855678

ईमेल- sonali.lohar@gmail.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares