तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या आप्तेष्टांना, मित्रमंडळींना, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि **** यांच्याकडून.
*** यांच्याकडून’ म्हणजे कुणाकडून हे लक्षात यायला जरा कठीण आहे पण त्याचे झाले असे–
मी रोजच सकाळी घराच्या टेरेसवर नऊच्या सुमारला जातो. व्यायाम करत करत वरच्या आकाशाकडे बघताना /झाडांकडे बघताना आणि त्यांच्याशी आणि स्वतःशी गप्पा मारताना मजा येते, ऊन पण छान असतं त्यामुळे डी विटामिन पण मिळतं. मधून मधून ३ – ४ कावळ्यांची गच्चीत जा ये सुरु असते /थोडी काव काव असते. मी पण त्यांच्याशी नेहमीच थोड्या गप्पा मारतो- हाय हॅलो म्हणतो, मजा येते.
आजची घटना – आज सकाळी गच्चीत गेलो आणि थोड्याच वेळात एकदम भरपूर कावळे गच्चीतल्या कठवड्यावर जमा झाले. आणि सगळेच कावळे जोरजोरात काव- काव- काव- काव एका विशिष्ट सुरात करायला लागले. मी पण थोडा बोलायचा प्रयत्न केला. पण त्यांची नॉन स्टॉप काव काव थांबेचना.
मनात विचार आला की असा प्रकार आधी कधी झाला नव्हता. ३-४ कावळे रोजच यायचे थोडी काव काव करायचे, मी पण त्यांना हाय हॅलो म्हणायचो आणि ते काव काव करत उडून जायचे. आणि अशी जा ये रोजच सुरू असायची.
आज नॉन स्टॉप काव काव आणि ते पण गच्चीत एकदम इतके कावळे एकदम आले आहेत, कशामुळे/ काय कारण असेल, असा विचार करत होतो. आणि डोक्यात ट्यूब पेटली.
अरे – बहुदा यांना मला हॅपी न्यू इयर म्हणायचं असणार. आणि त्यांच्या भाषेत एका सुरात सगळे काव काव करत ते मला शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत असावेत.
लगेच मी सगळ्या कावळ्यांकडे बघत थँक्यू थँक्यू म्हणालो, तुमच्या शुभेच्छा मिळाल्या असे म्हणालो आणि तुम्हाला पण सगळ्यांना हॅपी न्यू इयर असं म्हटलं, आणि गंमत म्हणजे सगळ्या कावळ्यांचे काव काव एकदम थांबले.
आणि लगेचच थोड्या वेळात पुन्हा कावकाव सुरू झाली पण थोडा वेगळा टोन होता. लगेच माझी ट्यूब पेटली, की, यांना असं सांगायचं असणार की आमच्या शुभेच्छा तुमच्या सगळ्या ग्रुप्स वरच्या सगळ्यांना पण कळवा.
मी लगेचच कावळ्यांकडे बघत म्हणालो तुमच्या शुभेच्छा नक्कीच सगळ्यांना कळवतो.
अशा रीतीने हॅपी न्यू ईअर शुभेच्छांची आमच्यामधली देवाण घेवाण पूर्ण झाली आणि एकदम सगळे कावळे काव काव करत आनंदात निघून गेले.
अशा रीतीने आज नवीन वर्षाची अशी पण एक आगळीवेगळी आणि कल्पनेच्या बाहेरची छान सुरुवात झाली. चक्क कावळ्यांकडून म्हणजेच निसर्ग देवतेकडून आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा मिळाल्या, म्हणजेच नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना अगदी सुरेख आणि आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असे जाणार हे नक्की.
काल एक शाळेतला मित्र भेटला. ‘यशवंत जोशी ‘ नाव त्याचे. यशवंत,म्हणजे शाळेपासूनच खूप हुषार,खूप sincere, खूप शांत,नाकाच्या सरळ रेषेत चालणारा, अशी त्याची व्यक्ती रेखा. ••••
पण आज तो खूप मोठा ‘ well known personality ‘आहे. ••••
दर दोन वर्षांत प्रमोशन. बुध्दी व आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कंपनी चा MD झाला. कंपनी ची कार, मोठ्ठं छान आधुनिक सुखसोयी असलेले सुंदर घर, घराच्या गेट वर दोन मोठे ‘ lights ‘जळत असतात. त्यामुळे रात्री देखील ‘यशवंत जोशी’ नावाची ची पाटी दुरून चमकते. दारावर ‘watch man’ पण असतोच. कोणी आल्या वर आधी आत फोन करुन तो येणाऱ्या चे नाव,गाव सांगतो. त्यानंतरच आत प्रवेश मिळतो. घरी बायको व मुलगी. अशी त्याच्या बद्दल ची माहिती कळली होती. एका ‘ high Profile status ‘चे घर. मोठ्या हुददा वर असणार्या माणसाची कल्पना घराच्या बाहेरूनच येते. ••••
आमच्या मित्रमंडळी तर यशवंत च्या प्रगती ची बातमी होतीच. एखाद्याला सोडून बाकी कोणी त्याला collage नंतर भेटलेच नव्हते. त्यामुळे पुढच्या आठवड्यात होणाऱ्या आमच्या. Batch चे ‘get-together ‘ म्हणजे यशवंत जोशी ला भेटायला मिळणार हे, one of the attractions होतेच. ••••
आमच्या Batch चे पन्नास मित्र मैत्रिणी आम्ही एकत्र जमणार होतो. तशी overall आमची Batch हुषार म्हणूनच सर्वांना माहीत होती. 73 Batch,म्हणजे एक वेगळीच Batch, लक्षात राहण्यासारखी. mejority सर्व मुलं well placed आहेत, अशी चर्चा शाळेत नेहमी होत असे. ••••
73 Batch चे Get-together एक मोठा ‘Event ‘. एक दिवसाचा कार्यक्रम. सुरवात ‘ self introduction ‘ ने झाली. पन्नास वर्षांनंतर सर्व एकमेकांना ओळखायचा प्रयत्न करत होते. काही छान ‘well maintained ‘, तर काहींच्या चेहऱ्यावर वय दिसत होते. ••••
प्रत्त्येक जण जून्या आठवणी,नवीन भेट यांचा ताळमेळ जमविण्याचा प्रयत्न करत आहे,असं वाटत होत. •••••
थोडक्यात सर्वांनी आपली, आपल्या परिवाराची माहिती व आता पर्यंत च्या
आयुष्याचे प्रगती पुस्तक वाचले/ सांगितले. सर्व आनंदात, उत्साहात व तयारीत आलेले दिसत होते. आता यशवंत जोशी ओळख देणार होता. सर्वांच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव होते. काय सांगतो??? किती सांगतो???? कसं सांगतो??? यावर सर्वांचे लक्ष होते. यशवंत ने त्याचा आजपर्यंत चा प्रवास अगदी सहज सांगीतला. कुठे ही ‘ मी कोणीतरी खास ‘ असा भाव नव्हता. सर्वांना हायसे झाले. आपला मित्र अजूनही तसाच आहे, बघून छान वाटले. नाही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे खूप लोक आतापर्यंत बघीतले होते. ••••
पूर्ण दिवस गप्पांत गेला. कोणी कसा मार खाल्ला होता,आणि कोणामुळे मार मिळाला होता. ह्या गोष्टी तर खूपच रंगल्या. सर्व हसुन हसुन ‘ recharge ‘झाले.
संध्याकाळी,शाळेतल्या बारावी च्या Batch बरोबर एक Tea Party होती. विद्यार्थ्यांना भेटायचा कार्यक्रम होता. अर्थातच मुलांचे जास्त लक्ष यशवंत जोशी कडेच होते. त्यांनी त्याचे फोटो वर्तमानपत्रात बघीतले होते. व TV वर त्याच्या मुलाखती बघीतल्या व ऐकल्या होत्या. प्राध्यापकांनी यशवंत ला स्टेज वर येऊन बोलायची विनंती केली. ••••
यशवंत स्टेजवर गेला. व त्याने सर्वप्रथम शाळेचे आभार मानले.
तो म्हणतो,••• माझ्या या प्रवासात शाळेचा खूप मोठा वाटा आहे. मला शाळेने मेहनत करायला शिकवले. त्या वेळेस ‘संत सर ‘ नेहमी म्हणायचे,•••
” तो माझ्या पूढे कसा गेला??? असा विचार करण्यापेक्षा, मी मागे का राहिलो???
याचा विचार करा व त्यावर काम करा. आपला वेळ व energy दुसऱ्याला मागे ओढण्यात वाया घालवू नका. तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर जास्त काम करावेच लागेल. दोन पुस्तके extra वाचावीच लागतील.. हे संत सरांचे उपदेश
” are the key words for success. ” Regular, consistent hardwork, time management and dedication कामाचा sequence / priority जर तुम्हाला ठरविता आली, तर तुम्ही सर्व कामे वेळेत व वेळेवर करू शकता.
सर्वांनाच चोवीस तास मिळतात. ••••
हुषार खूप लोक असतात. माझ्या बरोबर ही माझ्या पेक्षा जास्त हुशार मुले होती. पण मेहनत करणे,हा गुण तुम्हाला पूढे नेतो. तुम्हाला तुमच्या ‘comfort zone ‘मधून बाहेर निघावे लागेल. व आपल्या कामाकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल. जेव्हा तुम्ही काम करता,तेव्हा अडथळे येतातच,पण न घाबरता प्रामाणिकपणे काम करत राहिल्यास मार्ग नक्की मिळतो. सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यास मदतही मिळते व आपल्याला शिकायलाही मिळतं. ••••
शिक्षण कधीच पूर्ण होत नसत. ••••
all the best तुमच्या परिक्षेकरीता. खूप अभ्यास करा. खूप मोठे व्हा. आणि मुख्य म्हणजे चांगले नागरिक व्हा. ••••
सर्वांना धन्यवाद म्हणुन यशवंतने प्राचार्यांना शाळेकरिता एक चेक दिला. ••••
कार्यक्रम संपला होता. यशवंत आमच्या सगळ्यांत वेगळाच होता. ते वेगळेपण त्याने टिकवले होते. यशवंतबद्दलचा सर्वाचा आदर वाढला होता. ••••
आज सकाळीच माझा कॉलेजमधील कुलकर्णी नावाचा जुना मित्र माझ्याकडे पुष्पगुच्छ घेऊन आला. कालच्या रात्रीच्या आमच्या मित्रांच्या एकत्रीकरणामुळे मी पहाटे आठ वाजता डोळे चोळत चोळतच दार उघडले आणि कोण पाहिजे म्हणून विचारले.
तशी एक सणसणीत शिवी हाणत त्याने माझे स्वागत केले.
“कमाल आहे इतक्या वर्षाची दोस्ती विसरलास? “
त्याची ओळख विसरण्याचे कारणही तसंच होतं कारण हा पठ्ठ्या तब्बल 4 वर्षानंतर मला भेटला आणि बदल तर इतका झाला होता की जवळपास पाप्याचं पितर असणारा हा कुलकर्ण्या छान गुटगुटीत झाला होता.
मला आठवते काही दिवसापूर्वी मी याच्या वर एक गोष्ट लिहिली होती. कारण ते व्यक्तिमत्वच असं आहे की काहीतरी वेगळं करायचं (थोडंसं आचरट म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही) अशीच त्याची लाइफस्टाइल होती.
एकूण काय आज नवीन वर्षाचा पहिला दिवस खूप आनंदात सुरू झाला.
रिटायर झाल्यापासून शक्यतो मी कुणाला तब्येतीविषयी विचारत नाही कारण त्याला असणाऱ्या व्याधींची परत परत त्या माणसाला उगाचच आठवण येते आणि आपल्यालाही Negative wibes येतात.
तरी देखील थोडसं औपचारिक पणे… “अरे तुझ्या या शारीरिक बदलाचं रहस्य काय? इतका उत्साही, गोलमटोल तू कसा काय झालास” म्हणून न राहवून शेवटी विचारलंच.
अरे, आता माझा नवीन उपक्रम… तू ही करून बघ… खूप फरक पडेल म्हणून शांतपणे त्याने उत्तर दिले.
एकूण काय तर आज एक काहीतरी विचित्र गोष्ट मला ऐकायला लागणार याची मानसिक तयारी करून मी मस्त सोफ्यावर बसलो आणि चहा पिता पिता गप्पा चालू झाल्या.
आमच्या या बडबड्या कुलकर्ण्याला “सांग आता” असं म्हणण्याची कधी वेळच येत नाही.
तुझ्या मोबाईल मध्ये मित्र, ओळखीचे, नातेवाईक यांचे किती कॉन्टॅक्ट आहेत रे?
आणि खरंच मी मोबाईल उघडून बघितला तर तब्बल 2, 500 लोक माझ्या संपर्कात होते, म्हणजे त्यांचे नंबर माझ्याकडे saved होते इतकंच. संपर्क जवळ जवळ नाहीच.
(Basically कुलकर्णी रिटायर झाला Accounts Department मधून.
हा Accounts मधला किडा. तो कसा गुटगुटीत असणार? प्रत्येक गोष्ट डिटेल मध्ये बघायची, किस काढायचा असाच त्याचा स्वभाव आणि आणि त्याला साजे स त्याचे Department. असो).
अरे संजू, एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. Relax रहा आणि ऐक… माझे तर 4, 000 कॉन्टॅक्ट आहेत.
तुला माहितीच आहे की कोरोना मध्ये माझे आई-बाबा गेले, लोक प्रत्यक्ष संपर्क करायला कचरत होते, घाबरत होते. तेव्हापासूनच मी एकटा पडल्याची जाणीव मला सतत होत होती कारण बोलणं, गप्पा मारणं हा माझा प्राण आणि तोच मी गमावला रे.
बरेच दिवस विचार केला आणि ठरवले वर्षातून एकदा तरी आपल्या मोबाईल मधील संपर्कात असणाऱ्या माणसाला फोन करायचाच आणि तोही त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी.
जवळजवळ प्रत्येक माणसाला फोन करून मी त्याची DOB, wedding anniversary, त्याच्या आवडीनिवडी वगैरे चा डेटा घेतला आणि ठरवले की वर्षातून एकदा तरी या सगळ्यांशी वाढ दिवसाच्या निमित्ताने बोलायचेच आणि ते सुद्धा थोडक्यात.
Strictly whatsapp message करायचे नाहीत हे माझं प्रिन्सिपल.
कारण, आजकाल कोणाशी बोललो तर यांना वाटतं हा काय रिटायर झालाय… वेळ जात नाही म्हणून फोन करतोय. आज काल फोन करायला काय पैसे लागत नाहीत. (माझे तरुण मित्र देखील खूप आहेत म्हणून हा आटापिटा).
मी न राहून विचारले अरे एवढा सगळा डेटा तू कसा काय Date wise sort केलास?
बरोबर आहे तुझं… खूप अवघड/किचकट काम होतं तसं ते, आणि आपण जुन्या पिढीतले… Computer शी तेवढीशी जवळीक नाही रे.
अरे शेवटी कितीही computerisation झाले ना तरी आपली गावठी पद्धत कोणाला ऐकणार नाही.
काही नाही रे मी 2020 सालची जुनी डायरी विकत घेतली अगदी फुल पेज वाली. डायरी 2020 ची असल्यामुळे Leap Year चा problem देखील solve झाला.
प्रत्येक पानावर महिना आणि तारखेप्रमाणे ज्या त्या व्यक्तीचे नाव, फोन नंबर, आणि बाजूला Group चे नाव असे लिहिले.
Group म्हणजे मी फोन सेव्ह करताना नातेवाईक, सोसायटी, college, नाका, Yoga class, गाडीतला मित्र etc. etc. असे save करून ठेवले आहे.
(अरे Group म्हणजे काय असे मी विचारणार त्याच्या आधीच कुलकर्णी चे हे स्पष्टीकरण).
बस, या डायरीत त्याच्या नावापुढे त्या ग्रुपचे नाव टाकायचे की झाले काम. कुठला मित्र म्हणून आठवण्याचा प्रश्नच नाही.
जवळजवळ 6 महिने गेले हा डेटा गोळा करण्यात आणि नुसते DOB च नाही तर त्या मित्राचे आवडीचे क्षेत्र, त्याची श्रद्धास्थाने, त्याचे गुरू, Roll model, वगैरे माहिती देखील हळूच मी माझ्याकडे सेव करून ठेवली आहे.
त्याच्या related काही मला updates आले तर ते मी त्यांना पाठवतो तेही फक्त whatsapp वरून Strictally No Call.
अरे संजू, माणूस कितीही मानाने/पैशाने मोठा झाला, वय वाढले तरी त्याला वाढदिवसाचे दिवशी आठवणीने कॉल केला की खूप बरे वाटते. मी शक्यतो सकाळी लवकर कॉल करतो. बहुतेक वेळा माझाच पहिला कॉल असतो. माझे जे खास मित्र आहेत त्यांना तर रात्री बारालाच माझा कॉल जातो. अरे या वाढदिवसाच्या दिवशी माणसे spam कॉल सुद्धा घेतात हा माझा अनुभव आहे.
आपले जरी त्या माणसाशी मतभेद असले तरी ते आपोआप कमी होतात आणि दोस्ती असली तर ती आणखीन घट्ट होते.
“वर्षातून एकदा तरी
‘कसा आहेस? ’ विचारावं… आणि
त्या दोन शब्दांतच
आयुष्य सावरावं. ”
अजून काय हवे आपल्याला?
थोडासा वेळ जातो इतकेच.
माझा आपला typical प्रश्न…
“अरे मग तुझी मुलं, बायको शिव्या घालत नाहीत का तुला “बाबा सारखे मोबाईल मध्ये असतात म्हणून” “
“अरे सुरुवातीला झालं तसं, त्याचं काही फार चुकलं नाही पण हळूहळू त्यांनाच त्याचा अनुभव यायला लागला.
माझ्या सगळ्या तक्रारी दूर झाल्या. कोणे एकेकाळी मला ब्लडप्रेशर आणि थोडीशी शुगर होती याचा देखील विसर पडला.
मागच्याच वर्षी Full body check up झाले. सगळ्या टेस्ट ओके आल्या. माझे दहा हजार रुपये मात्र फुकट गेले रे. “
आता काय म्हणावं या कुलकर्णीला?
काय बोलावे हे मला सुचेना.
हळूच खूण करून मला आमच्या होम मिनिस्टर ने आत बोलावले आणि जो प्रश्न माझ्या डोक्यात आला नव्हता तो तिच्या डोक्यात आला आणि म्हणाली “अहो दोन वर्ष त्याचा हा उपक्रम चालू आहे तर तुम्हाला का नाही आला फोन त्याचा कधी”
कुलकर्णी तसा चाणाक्ष आणि Sharp. त्याने बायकोचे संभाषण ऐकले की काय कोण जाणे.
मी बाहेर हॉल मध्ये आल्यावर म्हणाला, “खरं तर आज मी तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला आलोय आणि तुझी DOB आणि wedding Anniversary विचारायला तसंच तुझा नवा नंबर देखील update करायला “
आता मला आठवले माझा जो नंबर होता तो पाच वर्षांपूर्वीचा होता त्याच्याकडे. मग तो तरी बिचारा कसा कॉन्टॅक्ट करणार मला.
आणि एवढे बोलून त्याने एक सुंदर Key Chain मला भेट म्हणून दिली त्यावर त्याचे नाव आणि फोन नंबर होता आणि लिहिले होते “संपर्कात रहा”.
एव्हाना माझी बायको देखील बाहेरच्या खोलीत येऊन बसली होती.
म्हणाला, “वहिनी ही Key Chain खास तुमच्यासाठी… याच्यावर माझ्या बायकोचे नांव आणि नंबर आहे. “
म्हणाला, “येतो मी. आपली पुढील भेट याच वेळी तुझ्या वाढ दिवसाच्या दिवशी. पुन्हा एकदा नववर्षाच्या शुभेच्छा.
… का कोण जाणे पण आता त्याने दिलेल्या पुष्पगुच्छातील फुले मला खूपच टवटवीत वाटत होती.
☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. २ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)☆
बायको, पत्नी, भार्या, सहचारिणी, अर्धांगिनी अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीला हल्ली wife असेही म्हटले जाते…
सामान्य मनुष्याची एक खोड आहे. त्याला असे नेहमी वाटतं असते की समोरच्या मनुष्याने कायम आदर्श वागले पाहिजे…! आणि खास करून ते सुनेच्या आणि बायकोच्या बाबतीत तर हमखास वाटत असते…
काही वर्षांपूर्वी एक मालिका येऊन गेली, त्यात असे म्हटले होते की सर्वांना आपली अक्कल आणि दुसऱ्याची बायको नेहमी चांगली वाटतं असते…
.. यातील विनोदाचा भाग सोडून दिला तरी यातून बोध घेण्यासारखे खूप काही आहे…
एक मुलगी आपले घर, परिवार आणि बालपणीचे भावबंध सोडून दुसऱ्याचे घरी जाते ती फक्त त्या नवऱ्यापासून प्रेम, माया, आधार, पाठिंबा, प्रोत्साहन मिळेल या आशेने…
डीएनए मध्ये असलेल्या स्वतःचे विश्व (कुटुंब) निर्माण करण्याच्या स्वाभाविक ओढीने ती मुलगी हे सर्व स्वीकारते… स्वतःचे विश्व निर्माण करण्यासाठी नवऱ्याची निवड केली की तिला त्यावर त्याचे अख्खे कुटुंब आणि परिवार सुद्धा स्वीकारावा लागतो…
सध्याच्या काळात तर त्रिकोणी कुटुंब असल्याने आणि समाजात मिसळण्याची सवय नसल्याने किंवा तशी सवय न लावण्याने मुली सासरी जरी पुष्कळ माणसे असतील तर एकदम गोंधळून जातात… , ज्याच्याशी लग्न केले तो सुद्धा नुकताच नवरा झाला असल्याने तो सुद्धा तिला समजून घेण्यात आणि उचित मार्गदर्शन करण्यात कमी पडतो… , मग ती गोंधळून जाते…
सुदैवाने घरातील मोठ्या माणसांनी तिला नीट पार्श्वभूमी समजून सांगितली आणि तिने ती सजगतेने समजून घेतली तर ती मुलगी तिथे हळूहळू रुळते, त्या घराला आपले घर मानते, आपलेसे करते…
आमच्या घरात असे चालत नाही असे सांगण्या आधी, आमच्या घरात काय काय चालते हे सांगितले तर आलेल्या नवीन मुलीला त्या त्या घरात राहणे सोयीचे होऊ शकेल…
… याची दक्षता मात्र दोन्ही कडून घेतली गेली पाहिजे…
बायको म्हणून आलेली मुलगी आधी सून होते, कोणाची वहिनी होते, कोणाची मामी होते, कोणाची आत्या होते, त्यामुळे बायकोच्या भूमिकेत शिरायला आणि ती भूमिका सर्वार्थाने वटवायला वेळ लागतो…
तोपर्यंत नवऱ्याच्या मनात बायको नावाचा वेताळ (बायकोने अमुक अमुक पद्धतीनं वागले पाहिजे…) जागृत झालेला असतो…
– – आणि वेताळ जागृत झाला की तो काय करतो याचा अनुभव प्रत्येकाने कमीअधिक प्रमाणात नक्कीच घेतला आहे, घेतला असेल… मग तिथेच बारीकशी ठिणगी पडते…
ती ठिणगी जर वेळीच मायेच्या, समजुतीच्या अग्निरोधकाने विझविली नाही तर ते नवरा बायको नावाला राहतात, ते कधीच एकमेकांचे सहचर होत नाहीत… , त्यांना मुले होतात, प्रपंच होतो पण जेवणात मीठ नसलेला त्यांचा संसार होतो…
एका छताखाली राहिलो म्हणून कोणी हे आमचे कुटुंब आहे असे म्हणू शकत नाही…
जसा काडी काडी जोडून संसार केला जातो, तसे नवरा बायकोने परस्परांचा एकेक गुणावगुण पाहून, आवश्यक तिथे लक्ष आणि दुर्लक्ष करून नाते घट्ट केले पाहिजे, जोडीदाराचे न्यून पाहून ते जगाला न दाखवता, ते न्यून नकळत कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे…
विवाह पत्रिकेवर विघ्नहर्त्याचे चित्र छापून सुरुवात जरूर करावी, पण शेवट चांगला होण्यासाठी दोघांनी अथक आणि अविरत प्रयत्न करावे… , इच्छा चांगली असेल तर मार्ग मिळतोच…
*सांधा मजबूत होण्यासाठी कोणीतरी मोठे व्हावे लागते आणि कोणीतरी स्वतःला तासून घ्यावे लागते… *
बायको कडून असलेल्या अपेक्षा त्या त्या नवऱ्याने स्पष्ट करून सांगाव्या आणि आपल्या बद्दल असलेल्या तिच्या अपेक्षा शांतपणे विचारून घ्याव्यात…
त्यासाठी आवश्यक तो वेळ द्यावा…
कालपर्यंत फक्त मुलगी म्हणून असलेली तिची ओळख, तिला विसरायला आणि बायको म्हणून झालेली नवीन ओळख अंगिकारायला तिला पुरेसा वेळ
द्यायला हवा…
बीज पेरले की दुसऱ्या दिवशी त्याचे रोप होत नाही आणि संध्याकाळी त्याला फळे येत नाहीत… , नाही का?
मनुष्य दुसऱ्याकडून असलेल्या अपेक्षा मनमोकळेपणे आणि समोरच्याचा आदर ठेवून सांगू शकला तर त्याच्या मनात असलेले वेताळ त्याला त्रास देणार नाहीत…
मग ते नातं सासू, सून, सासरझ नणंद, दीर, जाऊ, नवरा, बायको, कोणतेही असो…
– – सुस्पष्ट आणि माफक अपेक्षा – संवाद – सहवास – पारदर्शकता – बांधिलकी – जबाबदारी –
अकृत्रिम स्नेह – आणि समर्पण….. या काही गुणांचा उपयोग करुन मनुष्य कोणतेही नाते संवर्धित करू शकतो, उबदार करू शकतो… आपण तसा प्रयत्न करू…
– – –
आज काळ बदलला, त्यामुळे अनेक नात्यांचे संदर्भ आणि कमीअधिक प्रमाणात बदलत गेल्या…
सुनेच्या भूमिकेत शिरणाऱ्या मुलीच्या आणि सून म्हणून ज्या घरात ती मुलगी जनरल आहे, त्या घरातील लोकांच्या अपेक्षाही बदलत गेल्या असे म्हणता येईल…
१९९१ पासून भारतात आर्थिक बदलांना सुरुवात झाली आणि मागील ३०_३५ वर्षात याचे बरेवाईट परिणाम समाजमनावर झाले. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर याचे परिणाम झाले…
महान तत्त्ववेत्ता *रेने देकार्त* म्हणतात, त्याप्रमाणे “जुने कितीही सदोष वाटू लागले, तरी अगदी निर्दोष नवे हाती येइपर्यंत शहाण्याने हातच्या जुन्याचा त्याग करू नये. भारतीय समाज मात्र नवनवीन प्रयोग मागील ३० ते ३५ वर्षे करीत आहे…!
– – जागतिकीकरणामुळे कुटुंबव्यवस्था बदलली. कुटुंबाचा आकार बदलत गेला, थोडक्यात कमी कमी होत गेला…! ! मनुष्याचे स्टेटस सिम्बॉल आणि त्याची व्याप्ती बदलत गेली…! कुटुंबाचा आकार कमी होत असताना, पगाराचे आकडे, गॅजेट्स आणि घरापुढे वाहनांची संख्या मात्र वाढत गेली…
पारंपरिक *”विवाह ते लिव्ह इन रिलेशनशिप”* हा प्रवास मागील ३० ते ३५ वर्षातील आहे…
*याच काही वर्षात space, privacy, आणि अशा अनेक संकल्पना येणारी नवीन पिढी आत्मसात करीत गेली… *.
एखादे नाणे हातात घेतले की त्यांच्या दोन्ही बाजू आपल्या हातात अलगद येतात, या न्यायाने प्रत्येक व्यवस्थेत असलेले गुणदोष असतातच. पारंपरिक विवाह पद्धतीत सुद्धा गुणदोष होते, आहेत आणि त्याला पर्याय म्हणून पुढे आलेल्या अनेक पद्धतीत सुद्धा कमीअधिक प्रमाणात गुणदोष आहेत. हे अगदी स्वाभाविक आहे. इथे समर्थ रामदास स्वामी सांगतात त्याप्रमाणे विवेक करण्याची गरज आहे. पण जागतिकीकरणाचा रेट्यापुढे याचा विचार करायला आणि त्यानुसार काही आराखडा तयार करण्यात आपली समाजव्यवस्था कमी पडली असे खेदाने म्हणावे वाटते. एकेकाळी समाजाचे प्रबोधन करणारी, सामाजिक सभ्यता समजून सांगणारी व्यवस्था अडगळीत पडली आणि प्रसारमाध्यमे सांगतील, दाखवतील त्याला समाजाने सभ्यता मानण्यास प्रारंभ केला. याचा परिणाम असा झाला की भारतीय मनुष्याला भारतीय सभ्यता पूर्णपणे सोडणे शक्य झालं नाही आणि परदेशी सभ्यता मनापासून अंगीकारता आली नाही, यातून एक वेगळीच संस्कृती (?) भारतीय समाज मानसाला स्वीकारणे क्रमप्राप्त झाले…
आधी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे जागतिकीकरणाचा परिणाम जसा समाजावर झाला, तसा तो नातेसंबंधांवर नसता झाला तर नवल…
बायकोने पैसे कमवून घरी आणले पाहिजेत, तसे घरातील सर्व कर्तव्ये सुद्धा तिने तितक्याच निगुतीने करायला हवीत अशी अपेक्षा समाजात आपल्याला पहायला मिळतात… , तसेच दुसऱ्या बाजूला मुली जास्तीत जास्त करिअरच्या मागे लागलेल्या आढळतात. कधीकधी या अपेक्षा स्पर्धेचे रूप घेऊन जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा विवाहाचा मूळ हेतू आपण विसरून गेलो की काय असे म्हणावेसे वाटते…
आपल्या सारखा नवीन जीव निर्माण करणे, ही प्रत्येक जीवाची मूलभूत इच्छा मानली जाते. आणि यातूनच विवाह संस्था निर्माण झाली असे आपल्याला म्हणता येईल…! पूर्वी असलेली मुलांची संख्या आता शून्यावर येऊ घातली आहे…! याचे सामाजिक आणि विविध क्षेत्रावर बरेवाईट परिणाम होत आहेत… , याचाही विचार समाज म्हणून प्रत्येक घटकाने करण्याची गरज आहे…
*मनुष्य समाजशील प्राणी आहे असे आपण मानतो. मनुष्य एकटा राहूच शकत नाही. जर तो एकटा राहू शकत नसेल तर त्याला समाजाच्या आधाराने रहावे लागेल. जर समाजाच्या आधाराने रहायचे असेल तर समाजाच्या हिताचे, पर्यायाने आपापल्या हिताचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य नव्हे काय? *
*भारतीय समाजाचा डीएनए पुढील पिढीत चांगल्या अर्थाने जपणे, संवर्धित करणे आणि पुढील पिढीकडे सोपवणे हे प्रत्यकाचे आद्यकर्तव्य आहे…! *
*हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मनात मनात दडून बसलेले जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा, व्यावसायिक जीवघेणी स्पर्धा, अनावश्यक स्टेटस सिम्बॉल, आपल्या जमिनीशी असलेली नाळ तोडणारे असे विविध वेताळ आपल्याला जाणीवपूर्वक झटकून टाकावे लागतील…! मग यातूनच एकसंघ, एकरस आणि सर्वसमावेशक असा सदृढ समाज निर्माण होईल असा मला विश्वास वाटतो…! *
☆ मागे वळून पाहताना…! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
आज एक जानेवारी 2026! नवीन इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस! आता सत्तरी ओलांडल्यावर वाटतं,’ वर्षा मागून वर्षे गेली, ऋतू मागूनी ऋतू, जिवलगा… ‘जिवलगा बरोबरचं आयुष्य संपलं! पण जगायचं तर शिल्लक उरले. ते तर जगलं पाहिजे आणि ते ही आनंदात जगायचंय!
आयुष्यात करायचं ते सर्व करून झालं!
बालपण, तरूणपण आणि वृद्धावस्था तिन्ही भोगून झाल्यानंतर आता एक प्रकारची निवृत्ती आलेली असते. आताचे 70 ते 80 वयाचे लोक वृद्ध म्हणत नाहीत तर ज्येष्ठ म्हणतात!
माझे एक दीर म्हणत, “आयुष्याचा ग्रंथ तर संपत आलाय! उपसंहार राहिला आहे. आता हा ग्रंथ कधी संपणार याची वाट बघायची.
पण ग्रंथापेक्षा उपसंहार च अधिक मोठा चालला आहे! त्याची किती पाने उरली आहेत देव जाणे! अशीही उपसंहाराची फेज आता माझ्याही आयुष्यात आली आहे. काही करायचं तर उमेद वाटत नाही, शरीर साथ देत नाही किंवा मूड लागत नाही! भोवतीचे विश्व त्याच्या त्याच्या गतीत चालू आहे. आपल्या असण्याने- नसण्याने त्यात काही फरक पडत नाही!
मागे वळून पाहताना…! ।काळ काट्याच्या चक्रावरचे बिंदूमात्र आपले जीवन जिवाची क्षणभंगुरता अधिकच जाणवून देते!
उपसंहार म्हणजे कादंबरीचा शेवटचा भाग असं आपण म्हणतो, तो आधीच्या भागांशी निगडित तर असतो पण ती एक अलिप्तता येण्याची किंवा एखाद्या गोष्टीचा शेवट करण्याची अवस्था असते.. संसारातून अलिप्तता येणे अनेकांना चटकन जमत नाही. ती एक हळूहळू चालणारी प्रोसेस असते.
अशावेळी मन अलिप्त करताना अळवावरचे पाण्याचे थेंब जसे सूर्यप्रकाशात मोत्यासारखे चमकतात, तसे हे आठवणींचे टपोरे मोती चमकून उठतात! पण ते
क्षणभंगुरतेची जाणीव करून देतात.
मागे वळून पाहताना आठवतात ती कित्येक नवीन वर्ष! पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी हे Happy New
Year चे प्रस्थ आतासारखं
रंजक नव्हतं! चैत्र पाडवा ही
आपल्या नवीन वर्षाची सुरुवात असे. जानेवारी सुरू झाला की शालेय आयुष्या नुसार नवीन वर्षाची सुरुवात विविध संकल्पनांनी होत असे. रोज इतका अभ्यास करेन, शुद्धलेखन काढेन, व्यायाम करेन किंवा संक्रांत आली की मित्र मैत्रिणीं बरोबरची जुनी भांडणे तिळगुळ देऊन सोडवेन इतकंच काय ते!
नंतरच्या कॉलेजच्या सोनेरी दिवसात नवीन वर्ष नवीन आशा आकांक्षांचे रावे घेऊन येई. ते रंगीबेरंगी रावे उडत-बागडत आपल्याला रमवत असत!
पुढे लग्न झाल्यानंतर संसारात पडले की प्रत्येक वर्ष नवीनच काहीतरी संकल्प घेऊन येत असे.. मग मुलांसाठी त्यांचे प्रकल्प आखावे लागत, बारापर्यंत जागायचं,केक करायचा,वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ करायचे, एखादी छोटीशी थंडीची ट्रिप आखायची आणि पुन्हा मागील पानावरून पुढे असं आयुष्य चालू राहायचं!
एकंदर आपल्या आयुष्याचा हा मध्यम काळ सर्वांच्या संसारात अशाच प्रकारे गुंतलेला राहतो. काही वेळा त्याला सुखदुःखाची झालर ही लागते, पण ते पार करताना आपण आयुष्याचे सिंहावलोकन करू लागतो. साठी नंतर तृप्ततेने परमार्थाला लागण्याची क्रिया ही हळूहळू सुरू होते. मन अध्यात्मिक, परमार्थिक पातळीवर थोडा विचार करू लागते. अजूनही प्रत्येक नवा दिवस नव्या आशेवर घालवत असतो.
प्रत्येक नवीन वर्ष वेगवेगळ्या कामांमध्ये उजाडत राहते. स्वप्नपूर्ती बऱ्यापैकी झालेली असते. अधूरी स्वप्नं आता खुणावत नाहीत!
“प्राप्त ते इष्ट मानून घ्यावे”.. या भावनेने मन आयुष्याचा मागोवा घेत राहते.
मागे वळून पाहताना…
असं वाटतं की, मागची वाट तर धूसर होत चालली आहे. पुढची तर दिसत नाही, पण एक जानेवारीला आपण नवीन वर्षात पदार्पण केले आहे! येणारे नवीन वर्ष सर्वांनाच आनंददायी, सौख्याचे, समृद्धीचे जावो आणि आपल्या सारख्या ज्येष्ठांना नवीन वर्षातही आपली तब्येत चांगली राहू दे, मनस्वास्थ्य लाभू दे आणि उर्वरित आयुष्यात जेवढे म्हणून चांगले करता येईल त्यासाठी बुद्धी मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना!
लग्न म्हणजे काय? “लग्न तेव्हाच जमतं जेव्हा योग येतो. योग यावा लागतो. ”
मुलींची लग्न जमवताना ‘योग’ या शब्दाचा अर्थ मी अगदी कसोशीने धुंडाळला होता. ‘योग’ म्हणजे ध्यान धारणा प्रणालीतील मनःशांती मिळवण्यासाठी करावयाची एक शारीरिक आणि मानसिक कृती इतकंच मला माहीत होतं. म्हणजे तसा अनेकांच्या मुखातून येता-जाता, इकडून तिकडून, योग या शब्दाचा उच्चार वेळोवेळी कानी पडतच होता पण “योग यावा लागतो” याचा शब्दशः अर्थ शोधावा असे मला कधी गांभीर्याने वाटले नव्हते आणि योग शब्दाचा संबंध हा जन्म कुंडलीतल्या बारा घरांशी आणि त्यात वस्ती करून बसलेल्या ग्रहांशी घनिष्ठ आहे हे कळल्यानंतर मी पत्रिका या विषयावर जरा लक्ष केंद्रित केले.
ग्रहमैत्री, गण, नाडी, चंद्रबळ, मंगळ दोष, ग्रहांची एकमेकांवरची कृपादृष्टी, वक्रदृष्टी, दोन ग्रह विरोधात असले तरी एखादा मित्र ग्रह परिस्थिती कशी सावरून धरतो वगैरे वगैरे वाचताना मी खरोखरच एखाद्या चमत्कारयुक्त विश्वाची सफर करत आहे असेच मला वाटले आणि एक सकारात्मक विचार माझ्या मनात रुजला की खगोलशास्त्र आणि इथे कागदावर आकाशातल्या ग्रहांना आणून त्यांच्याद्वारे मानवी जीवनाचा अभ्यास करणे या दोन्हीमध्ये साम्य नसले तरी शास्त्राचा अभाव नक्कीच नाही. ठोकताळे असले तरी अगदीच निष्प्रभ, कुचकामी नाहीत फक्त त्यांच्या ताब्यात अथवा त्यावर किती विसंबून राहायचं हे मात्र वैयक्तिक आहे. मनाच्या एका कोपऱ्यात या सर्व ग्रहांना कोंबून ठेवताना दुसऱ्या कोपऱ्यात मात्र व्यावहारिक आणि तार्किक बुद्धी शाबूत ठेवण्याची कसरत मी मुलींचे विवाह जमवताना अनुभवली. दोघींच्याही जन्मवेळा, जन्मस्थान आणि तारखा या पुरेशा डेटावरून पत्रिकाही बनवून घेतल्या. त्यावेळी प्रकर्षाने आठवण झाली ती पप्पांची. आम्हा सर्व बहिणींच्या, आमच्या मुलांच्याही पत्रिका पप्पानी त्यांच्या जन्माच्या वेळी स्वतः बनवलेल्या होत्या कारण त्यांचा याही विषयाचा अत्यंत गाढा आणि सखोल अभ्यास होता. त्यांनी त्या पत्रिका अभ्यासल्याही असतील पण चुकूनही कधीही या सगळ्यांच्या “पत्रिका काय सांगताहेत” हे कुणालाच सांगितले नाही.
“बिल्ड युवर ओन स्टार्स” असंच ते म्हणायचे. एक दिवस मी पप्पांना विचारले होते, ” मग कशाला पत्रिका बनवण्यात इतका वेळ घालवता?” त्यावेळी मला त्यांनी काही उत्तर दिले नाही. असो!
थोडं विषयांतर झालं असेल पण मूळ मुद्दा असा होता की माझ्या गुणी, गोजिरवाण्या, देखण्या, उच्चशिक्षित, सक्षम, स्वावलंबी, चि. सौ. कां. कन्यांच्या वर संशोधनाच्या क्षेत्रात मी जय्यत तयारीनिशी उतरले होते हे नक्कीच.
पुन्हा “मॅरेजेस आर मेड इन हेवन” किंवा “लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात” हा ही एक कल्पना विश्वात रमवणारा विषय डोक्यात घर करून होताच.
आणि अशातच एक दिवस अमेरिकेहून ज्योतिकाचा फोन आला.
“मम्मी मी एक लिंक तुला पाठवली आहे. ती बघ. एका “एलिजिबल बॅचलर” विषयी ती आहे. गेले काही दिवस आम्ही ऑनलाईन चॅटिंग करत आहोत. जरा बरा वाटतोय मला. जेनुइन वाटतोय पण तू बघ आणि काय ते सांग. ”
“जरा बरा वाटततोय मला, ” हे ज्योतिकाचं वाक्यं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. तिचं “जरा बरा” म्हणजे माझ्या मते “उत्तम” हेच स्केल. पुन्हा एकदा ‘जेन ऑस्टीनची’ एलिझाबेथ बेनेट माझ्या अंगात संचारली.
मी कम्प्युटर सुरू केला. माझं ईमेल अकाउंट उघडलं आणि इनबॉक्स मध्ये येऊन पडलेला ज्योतिकाचा मेल अपार उत्सुकतेने आणि मनाच्या अत्युच्च भावनाविवशतेने उघडला. असा की “जणू काही प्रत्यक्ष पांडुरंगच माझ्या उंबरठ्यावर “करकटी ठेवूनिया उभा” राहिला असावा. ”
मी विलासलाही मेल दाखवला. दोघांनी त्या “बरा वाटला” हा ज्योतिकाचा शेरा मिळालेल्या मुलाचा फोटो आणि संपूर्ण प्रोफाइल अनेक वेळा वाचला आणि विलास जेव्हा म्हणाला, ” हरकत नाही पुढे जायला. बघू तर या! ” आणि शिवाय हा मुलगा ज्योतिकानेच शॉर्टलिस्ट केला होता त्यामुळे नंतर पलटून माझ्यावर वार होण्याचा(महत्त्वाचं नसलं तरी दुखावणारं असं काहीतरी) संभव कमी असल्यामुळे मी ज्योतिकाला “गो अहेड” असा उत्तरादाखल मेलही पाठवला. त्यावरही तिचे उत्तर होतेच, ” मम्मी! इतकी काय एक्साईट वगैरे होऊ नकोस. आम्ही प्रत्यक्ष भेटायचं ठरवलंय. भेटल्यावर काय ठरतंय ते बघूया. आतापुरतं इतकंच! ”
कितीही ताण घ्यायचा नाही असे ठरवले तरी स्ट्रेस हा येतोच. सर्वात वाईट असते ती ही ‘तळ्यात मळ्यातली अवस्था. ’ एक प्रकारची “नो मॅन लँड” असते.
आमच्यासारखंच ४५०किलोमीटर दूरीवरचं आणखी एक दाम्पत्यही याच अवस्थेत असावं.
रात्रीचे साडेअकरा वाजले असतील. त्यावेळी फोन खणखणला. इतक्या रात्री कुणाचा फोन असेल? पुन्हा भय, चिंता उत्सुकता सगळं काही.
फोन विलासनेच उचलला. लँडलाईन असल्यामुळे “स्पीकरवर टाक ही भानगड नव्हती. विलासने उत्तरादाखल बोललेली दोन-तीन वाक्यं ऐकलेली अशी..
“नमस्कार”
“ हो बोलतोय. ”
“हं हं बोला ना?”
चौथं वाक्य फार महत्त्वाचं.
“तुम्ही माझ्या मिसेसशीच बोला. ” तेव्हाच मी समजून गेले, ” हा टेक्निकल फोन आहे करंट विषयावरचा. काहीतरी निर्णय घ्यावा लागणारा असणार आणि माझा अनेक वर्षांचा विलासच्या बाबतीतला अनुभव.
घेतला मी फोन. पलीकडून अगदी छान आवाजात मृदू शब्दांची उलगड झाली.
“मी शिरीष वाघमोडे बोलतोय. पार्ल्याहून. त्याचं असं आहे आमचा मुलगा साकेत काही दिवसांसाठी मिलवाॅकीला म्हणजे शिकागो जवळच्या गावात जात आहे. तुमची मुलगी ज्योतिकाही तिथेच असते. काय योगायोग आहे बघा! साकेत ज्योतिकाला तिथे भेटणार आहे तर तुम्हाला हे चालेल का?”
तशी पार्श्वभूमी मला माहीतच होती. प्रथमत:च “शिरीष वाघमोडे” या व्यक्तीबद्दल माझं मत एकदम चांगलं झालं. एक तर त्यांचा आवाज. सभ्य बोलणं आणि अशा रीतीने परवानगी पर काही विचारणं हे मला खूपच अर्थपूर्ण, योग्य वाटलं. पारंपरिक पद्धतीने थोरा मोठ्यांच्या सहवासात या दोघांचा बघण्याचा…भेटण्याचा म्हणूया.. कार्यक्रम होणे हे साकेत ज्योतिकाबाबत शक्यच नव्हते. त्यामुळे हा पर्याय, ” काय हरकत आहे? या सदरात अगदी सहजपणे गेला. त्यानंतर मी, विलास शिरीष आणि सुवर्णा वाघमोडे आलटून पालटून एकमेकांशी खूप वेळ गप्पा करत बसलो. त्या अर्ध्या एक तासातच आम्ही इतके मनमोकळे झालो की जणू काही आमची वर्षानुवर्षांची मैत्री आहे. ” योग यावा लागतो” याचं प्रात्यक्षिकच जणू काही आम्ही अनुभवत होतो.
२५ एप्रिल २००५ ही तारीख होती. फोनवरच आम्ही त्या दिवशी साकेत ज्योतिकाशी बोललो. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. २५ एप्रिलला सुवर्णाताईंचा (साकेतच्या आईचा) वाढदिवस आणि २६ एप्रिलला विलास चा वाढदिवस त्यामुळे दोघांनाही मुलांकडून मिळालेली ही अतिशय गोड, अनमोल भेटच होती. सुवर्णाताई तर लगेचच पार्ला देवीच्या देवळात जाऊन नवसही फेडून आल्या.
डेट्राॅइटला तुषार -पिंकाने (माझ्या बहिणीच्या मुलाने आणि सुनेने) त्यांच्याच घरी साकेत ज्योतिकाच्या एंगेजमेंटचा अगदी गोड, प्रेमळ सोहळा पार पाडला. अमेरिकेतली सर्व भावंडे तिथे जमली. मयुरा तर होतीच. तिचा आनंद काय वर्णावा? त्याचवेळी या कार्यक्रमासाठी काही मित्रमंडळीही उपस्थित होती आणि त्यात *मोनिका पिंगे* जी ब्रुकबाँड कॉलनीतली जळगाव मधली ज्योतिकाची बालमैत्रिण होती. हा शानदार सोहळा आम्ही चौघांनी (आम्ही दोघे आणि आमचे भावी व्याही) आमच्या जळगावच्या सुंदर बंगल्यात स्काईपर अॉनलाईन अनुभवला. अगदी सुटा बुटात पैठण्या परिधान करून! बंगल्यालाही सजवले होते. आयुष्यातले खरोखरच अविस्मरणीय क्षण ते!
२० डिसेंबर २००५ रोजी ज्योतिका साकेतशी विवाहबद्ध झाली. लग्नाच्या काहीच दिवस आधी ती भारतात आली होती, धडाम धुडूम खरेदी आणि लग्न सोहळ्याची धामधूम.. सारेच मनोरंजक आणि न विसरता येण्यासारखे.
साकेतला आम्ही पाहिले ते लग्नाच्या अदल्या दिवशीच.
उंच, गोरा, देखणा, हुशार, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत जावयावरून मीठ मोहर्या ओवाळताना आम्ही दोघे भरून पावलो.
जळगावीच लग्नाचा सोहळा अत्यंत बहारदारपणे पार पडला. देव देवक, मेहंदी, हळद, बांगड्या भरणे, संगीत, शुभमंगल सावधान आणि स्वागत सोहळा सर्व सर्व अगदी लक्षात राहण्यासारखेच पार पडले. भांडारकर कुटुंबियांसमवेत, आणि माझ्या माहेराने आमचा संपूर्ण ऐसपैस बंगला गजबजला. प्रवेशद्वारीच्या केळीच्या घडयुक्त खांबांनी अतिशय मंगलमय वातावरण निर्मिती केली. आमचं घर फुलापानांनी सजलं, दिव्यांनी प्रकाशलं. वर्हाडी मंडळींनी “ओम”कार्यालयातल्या सुसज्ज वास्तव्याचा प्रसन्न अनुभव घेतला.
या कार्याच्या निमित्ताने आमचे कुटुंबीय, आमचा जळगावचा घट्ट मित्रपरिवार, गावातले सारेच वेंडर्स यांनी जी कमालीची साथ आम्हाला दिली.. तेव्हा जाणवले ते एकच “आपण किती भाग्यवान आहोत! ” आमच्या कुंडलीतल्या बारा घरात स्थित असलेल्या सर्वच ग्रहांनी आमच्यावर जणू काही सुगंधित फुलांची बरसात केली. वधू-वरांना आशीर्वाद दिले
।।शुभास्ते पंथान: सन्तु।।
“नांदा सौख्यभरे!”
या विवाह बंधनातल्या काही ठळक बाबी मात्र सांगायलाच हव्यात. यात “तुमची जात कोणती?” हा प्रश्न नव्हता. देण्या घेण्याच्या याद्या नव्हत्या. मानपान, तुमचे आमचे, तुमच्यात आमच्यात, असे काहीही प्रकार नव्हते. सगळा अत्यंत मुक्त, मोकळा, मैत्रीपूर्ण सोहळा होता. “तुम्ही जावयाला न पाहताच कसे काय लग्न ठरवले?” या प्रश्नांची उत्तरेही विचारणाऱ्यांना लग्न समारंभातल्या खेळीमेळीच्या आणि आमच्या व्याही मंडळींशी झालेल्या संवादातूनच मिळाले असावे.
मान्य आहे रिस्क फॅक्टर्स दुर्लक्षून चालत नाहीत पण “वही होता है जो खुदा चाहता है! ”
“अच्छी सोच अच्छे फल” ही टॅगलाईन स्वीकारली.
मयुराच्या लग्नाचीही गोष्ट अशीच सुरस आहे. ती आपण पुढच्या भागात वाचूच पण गंमत सांगते आजकाल मी सुद्धा लग्नाळू मुलांच्या चिंतित आई-वडिलांना दिलासा देण्यासाठी म्हणते.
हे दोन्ही शब्द अर्थाच्या दृष्टीने सारखेच भासले तरीही त्यांच्यामध्ये फरक आहे. वर्षात व्यावहारिकता आहे, करारमदार याचा संबंध आहे, त्रयस्थपणा, तटस्थपणा आहे. तर वयात भावनिकता, आठवणी आणि अनुभव आहे.
वर्षभराच्या नोंदी या शक्यतो जास्त करून व्यवहारिकदृष्ट्या वापरल्या जातात किंवा अगदी मोठ्या प्रमाणात सामूहिक पातळीवर, संस्थात्मक पातळीवरुन काम करायचं असेल तर त्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींची नोंद ही वर्षाच्या दृष्टिकोनातून केली जाते. पण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात वय जास्त महत्त्वाचं असतं. वयागणिक माणसाच्या शरीरात, मनात, विचारांत बदल होत असतो. आणि हा बदल आपल्या जगण्याला निरनिराळी दृष्टी देत असतो. गंमत म्हणजे आपल्या जन्मापूर्वीच्या सगळ्या घटनांना आपण सहजपणे वर्ष या कॅटेगरीत बसवून बघू शकतो. पण आपल्या जन्मानंतर घडलेल्या घटनांना मात्र आपण आपल्या वयाच्या संदर्भानुसार आणि जाणिवेनुसार बघतो.
एखाद्या देशाच्या, संस्थेच्या नोंदीमध्ये वर्षाला स्थान असणं महत्त्वाचं आहे. कारण एकूण परिस्थिती आणि त्याचा होणारा सामुहिक परिणाम या दृष्टिकोनातून व्यक्तिपेक्षा सामूहिक गणना ही तिथे महत्त्वाची ठरेल. पण आपल्या व्यक्तीगत जीवनामध्ये मात्र वर्षापेक्षा वयाच्या आठवणी खूप विशेष ठरतात.
अगदी बोलतानासुद्धा आपल्याला त्या वयाच्या संदर्भात आठवतात. साल कुठलेही असलं तरी आपल्याला आपलं वय, आपला अनुभव आपल्याबरोबर त्यावेळेला असणारी इतरांची वयंच लक्षात राहतात.
माझ्या आयुष्यात माझं शिक्षण, नोकरी, लग्न या गोष्टी माझ्या वयाच्या ज्या टप्प्यावर घडल्या तर टप्प्यातून त्या वर्षांकडे मी बघते. त्या घटनांकडे मी बघते. केवळ अमुक एक साली लग्न झालं म्हणून त्या घटनेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन ठरत नाही.
– – म्हणजे वय आणि वर्ष दिसताना सारखेच दिसत असले आणि काही प्रमाणात सारखेच वाटत असले तरीसुद्धा किती भिन्न पातळीचा अनुभव देतात नाही का? असो.
आता येणाऱ्या वर्षाच्या स्वागताचा विचार करताना हे असंच मंथन झालं.
… तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा! येणार नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धी घेऊन येणारं ठरो.
… आणि येणाऱ्या प्रत्येक वाढत्या वयागणिक आणि वर्षागणिक आपला स्नेह कायम राहो.
कॅलेंडरची पाने वाऱ्यावर फडफडतात. पक्षी उडून जावेत तसे दिवस, आठवडे आणि महिने भराभर निघून जातात. भिंतीवरच्या कॅलेंडरची पाने पलटत जातात. मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील ओळी आठवतात.
.. रंगांच्या रानात हरवले ते स्वप्नांचे पक्षी…
खरोखरच पक्षी उडून जावेत तसे भराभर महिने निघून जातात आणि वर्ष संपत येते. या गेलेल्या महिन्यांसोबत उडून जातात ते आठवणींचे पक्षी! या आठवणींनाही रंग असतात. पक्ष्यांसारखे, फुलपाखरांच्या पंखावरील विविध रंगछटांसारखे! रंग जसे विविध तशा आठवणी सुद्धा! आठवणी गोड आणि कडू, सुखद आणि दुःखद. आठवणी मनावर हळुवार फुंकर घालणाऱ्या आणि आठवणी अनामिक भावनांच्या… वेढून टाकणाऱ्या.
एखादी आठवण नको तेव्हा जखमेवरची खपली उचकटून काढते आणि मग रक्ताळलेल्या, वेदना देणाऱ्या आठवणी जाग्या होतात. पण दुसऱ्याही आठवणी असतातच की त्या मनाला आश्वस्त करतात, जखमेवरती मलमपट्टी करतात आणि सांगतात की असा दु:खी होऊ नकोस कारण हेही दिवस जातील.
तुमच्या आणि माझ्या आयुष्यातील अशी कितीतरी वर्षे फुलपाखरासारखी उडून गेली आहेत, आपल्या कडू गोड आठवणी मागे ठेवून! पण प्रत्येक वेळी जेव्हा वर्ष संपत येते तेव्हा नव्या वर्षाची स्वप्ने मनात जागी होतात. घरातील प्रिय व्यक्तीच्या दूर जाण्याने जसे डोळ्यात नकळत पाणी येते, तसेही जाणारे वर्ष सुद्धा आपल्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावते. आठवत राहते यावर्षी केवढा तो पाऊस! नद्या नाले दुथडी भरून वाहिलेले, अनेकांचे घर संसार उध्वस्त झाले. अनेकांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. पुन्हा आठवतात कुसुमाग्रजांच्या कणा कवितेतील ओळी…
सर पैसे नकोत
थोडा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार
तरी मोडला नाही कणा
पाठीवर हात ठेवून
फक्त लढ म्हणा…!
या ओळी आपल्याला परिस्थितीशी सामना करण्याची शक्ती देतात.
हा पाऊस, हे वर्ष बरेच काही देऊन गेले आणि खूप काही घेऊन गेले. अनेकांचे सुहृद त्यांना सोडून गेले आणि नव्याने अनेक व्यक्ती जोडल्याही गेल्या. खरंतर सोडून गेलेल्या व्यक्ती किती आणि जोडल्या गेलेल्या आणि त्यानिमित्ताने आपल्या आयुष्यात नव्याने आलेल्या व्यक्ती किती असा हिशेब करायचा नसतो. करायची असते ती दुःखांची वजाबाकी आणि सुखाचा गुणाकार!
प्रत्येक नवीन वर्ष घेऊन येते नव्या आशा आणि नवी स्वप्ने! क्षितिजाच्या उंबरठ्यावर सूर्यकिरणांच्या रूपाने स्वप्नांचे सोनेरी दूत उभे असतात. तुमच्या हाकेला ओ द्यायला ते तयारच असतात. फक्त तुम्ही किती मनापासून त्यांना हाक मारता त्यावर त्यांचे येणे अवलंबून असते. तुम्ही आनंदाने बोलवाल तर आनंदाने येतील आणि सोबत घेऊन येतील सुख, समृद्धी आणि आनंद सुद्धा! अशा वेळी पुन्हा कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवत राहतात…
कशास आई भिजविसी डोळे
उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात
उद्याचा असे उषःकाल
रात्र आहे तर पहाट होणारच! अंधाराला भेदून सूर्यकिरणे येणारच! हे सोनेरी कवडसे तुमच्या माझ्या दारात, खिडक्यांवर आणि घरात येणार. त्यांना मनातही प्रवेश करू द्या. आतला अंधार संपून जाईल. जाणारे वर्ष आणि येणारे वर्ष यात तुलना करा. मी कुठे आहे? ये कहाँ आ गये हम, युहीं साथ चलते चलते…? पण तुलना दुसऱ्याशी करायची नाही. ती करायची ती आपल्या स्वतःशीच! ताडून पाहायचं स्वतःला, जोखून पाहायचं स्वतःला आणि ठरवायचं मनाशी की खरोखरच भूतकाळापेक्षा वर्तमानातला मी अधिक समृद्ध झालो आहे का? भावनांनी, विचारांनी…? केवळ पैशांनी नव्हे. नसेल तर मला त्यासाठी आणखी काय करायला हवं? माझं कुठे चुकत आहे का? हीच ती वेळ आत्मपरीक्षणाची! म्हणून तर जरा विसावू या वळणावर…!
जीवनाची गती खूप वाढली आहे. त्याबरोबर आपण वेगाने फरफटत जात आहोत. आपल्याला स्वतःसाठी देखील वेळ नाही. कुटुंबासाठी वेळ नाही. आयुष्याचा आनंद घ्यायचाच आपण विसरून जातो आहोत. जीवनातील छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांना पारखे होत आहोत. खरोखर इतकी ऊर फुटेस्तोवर धावपळ करण्याची गरज आहे का याचाही विचार करूया आणि क्षणभर थांबूया.
काल मी स्वप्नं पाहिली होती पण ती पूर्ण नाही झालीत. काही हरकत नाही पण प्रयत्न तर केलेत ना त्यासाठी! म्हणून निराश व्हायचं नाही, घेतला वसा टाकायचा नाही. पुन्हा मोठी स्वप्नं बघायचीआणि त्यासाठी त्या वाटेवर चालत राहायचं, अविरत…! तुझको चलना होगा…
मला शेतकऱ्याचे उदाहरण फार आवडतं. शेतकरी कधी हताश, निराश होत नाही. यावर्षी निसर्गाने दगा दिला तरी पुढचं वर्ष नक्कीच चांगलं असेल ही त्याच्या मनामध्ये तीव्र आशा असते. तो उद्याची स्वप्न पाहणं थांबवत नाही. भविष्यात पीक चांगलं यावं म्हणून आज तो जमिनीची मशागत करतो, पेरणी करतो, पिकाची काळजी घेतो नको असलेले तण तणकूर काढून टाकतो. आपल्यालाही तसेच करायला हवं ना! तरच उद्याचं उज्वल भविष्याचं पीक हाती येईल. त्यासाठी वर्तमान आपल्या हातात आहे.
म्हणता म्हणता हे वर्ष कसं गेलं हे समजलं पण नाही. आणि आज चक्क वर्षाचा शेवटचा दिवस उगवला आहे.
व्हाट्सअप/ फेसबुक / मेसेजेस आणि फोन यामुळे आपल्या भरपूर गप्पा झाल्या. छान विचारांची देवाण-घेवाण झाली. कुणाच्या काही छान वाचण्यात आलं तर त्याची पण देवाणघेवाण झाली. गाण्यांची देवाण-घेवाण झाली. व्हिडिओंची देवाण-घेवाण झाली. हसण्याची देवाणघेवाण झाली.
आणि प्रत्यक्ष आपल्या भेटीगाठी झाल्या नसल्या तरी मस्त मज्जा आली. माझ्या नेहमीच्या अशा या गप्पांमध्ये बरेच मित्र मैत्रिणी असे आहेत की ज्यांची बऱ्याच वर्षांमध्ये भेट नाही आणि काही जणांना तर अजून बघितले पण नाही. पण गप्पांकरता प्रत्यक्ष भेटणे हा विषय गौण असतो आणि मनं जुळणे हा विषय महत्त्वाचा असतो.
आज थोडा वेळ काढून आपण प्रत्येकाने हे मात्र जरूर करायचे आहे —
– – आपल्याला वर्षभरात निरनिराळ्या कारणांकरता ज्यांची ज्यांची मदत झाली असेल अशांची नावे एका डायरीमध्ये लिहून ठेवायची. आपण कोणा कोणाला मदत केली ते पण लिहून ठेवायचे. हे लिहिण्याचा उद्देश एवढाच, की येणाऱ्या वर्षांमध्ये या दोन्ही याद्या भरपूर मोठ्या करण्याकरता आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि आपण देणाऱ्यांची यादी मोठ्यात मोठी करायची आहे. आपण देणाऱ्यांच्या यादीमध्ये काही सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांची नावे पण अवश्य यायलाच पाहिजेत.
– – वर्षभरात आपल्या वागण्यामुळे / बोलण्यामुळे / वर्तनामुळे कोणालाही त्रास झाला असेल / दुःख झालं असेल / वाईट वाटलं असेल, तर अशा आपल्या वागण्याची पण नोंद करून ठेवायची आहे. उद्देश एवढाच की अशा प्रकारची वर्तवणूक येणाऱ्या वर्षात आपल्याला शंभर टक्के टाळायची आहे. भेटणाऱ्या प्रत्येक समोरच्याचा चेहरा आनंदीत करणे हा देवाचे लाडके होण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे.
आज सगळ्यांनीच अजून थोडा वेळ काढून हे पण करायचे आहे —
– – आज संपणाऱ्या वर्षातल्या छान छान आठवणी डायरीमध्ये लिहून काढायच्या आहेत, चांगली केलेली कामे लिहून काढायची आहेत. आणि येणाऱ्या वर्षांमध्ये या लिहिलेल्या छान आठवणी अधून मधून जरूर वाचायच्या आहेत, त्यामुळे आपला उत्साह नक्कीच वाढतो आणि आपण तरुण राहतो. काही वाईट घटना घडल्या असतील तर त्या मात्र पूर्णपणे विसरून जायचे आहे. आणि हो, त्यापासून काही शिकण्यासारखे असेल तर ते मात्र आवश्य आचरणात आणायचे आहे.
** चला तर मग, २०२५ या जाणाऱ्या वर्षाला वर्षभरात आपल्याला खूप काही दिले त्याबद्दल धन्यवाद देऊ या… आपल्या नवीन बोलीभाषेत Bye Bye करूया.