मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ महालय… ☆ सुश्री स्वप्नजा घाटगे ☆

सुश्री स्वप्नजा घाटगे

? मनमंजुषेतून ?

☆ महालय… ☆ सुश्री स्वप्नजा घाटगे

महालय चालू झाला आहे. कावळे आणि त्यांच्यावरचे जोक्स सोशल मिडीयावर फिरु लागलेत.परंपरा, कर्मकांड हा आजचा विषय नाहीच…

सकाळपासून रात्रीपर्यंत भाजी काय करायची,तिथपासून सगळ्यांना आवडेल असं काय करायचं..हेच प्रश्न बाईंच्या भोवती फिरत असतात…

एखादा पदार्थ आवडला की घरातले चाटूनपूसून फस्त करतात…हिला राहिलय की नाही हे कोण पहातही नाही…मग ही पोळी चटणी,लोणचं या तोंडी लावण्याबरोबर संपवते..तिला राग नसतो..,असतं ते समाधान…!!!

पण तिला कळतच नाही या समाधानावर शरीराचे पोषणभरण होत नाही हे तिला कळत नाही…कमी खाणे,शिळं खाणे यामुळं आयुष्याच्या संध्याकाळी तिच्या शरीरात कॕलशियम, लोह, हिमोग्लोबिन अशा कितीतरी आवश्यक घटकांची कमीच भासते.

तिची हाड ठिसूळ होतात.सारे आपआपल्या व्यापात असतात ही निमूटपणे सारं का सहन करते..

अनेक घरातील ती अशीच मूकपणे मरुन जाते….मग समाजातील लोक तिसऱ्या दिवशी अरे तिच्या आवडीचे पदार्थ ठेवायला हवेत म्हणून घरातली लोकांना आग्रह करु लागतात….

आई मेली, तिसऱ्याला लोक म्हणाले,

नैवद्यावर ठेवा तिला काय आवडतं ते….!

नव-याने उडविले खांदे,मी असतो व्यस्त

मला नाही माहित तिला काय आवडतं ते….!

मुलगा म्हणाला, ‘ आमच्याच आवडीनिवडीचं  ती शिजवायची.. मला नाही माहित तिला काय आवडतं ते…!! ‘

मुलगी म्हणाली, ‘ मला चालतं ग म्हणून ती उरलंसुरलं खायची.. मलाही  नाही माहित तिला काय आवडतं ते….!!!’

काय काय ठेवलं,मेवा न् मिठाई

पिंडाला कावळा शिवलाच नाही

तुम्ही म्हणाल असं नाही घडतं आमच्या घरात…पण कांही घरात हे अजूनही घडतं आहे.तिच्या खाण्यापिण्याची आबाळ होते आहेच.

तिच्या गरजा,तिच्या आवडीनिवडी,इच्छा कुठे कुठे विचारात घेतल्या जात नाहीत.घरातील आर्थिक व्यवहार तिला चोरून केले जातात.

…. जणू ती सासरची इस्टेट माहेरी नेऊन देणार असते….!!!

अशा मूक वेदना कितीतरी घरांच्या भिंतीत चिनून जात असतील….

जिवंतपणी तिची अवहेलना नंतर ह्या परंपरा, कर्मकांड ह्यात खरोखरच अर्थ आहे का….!!!

माझ्या मैत्रिणीचे वडिल…. पत्नी निवर्तली आहे. सुना अक्षरशः शिळं अन्न त्यांना वाढतं असतात.ते निमूटपणे पोटाच्या भुकेसाठी खातही असतात.आपणही म्हातारे होणार आहोत हे माणसं का विसरतात.नंतर कार्यालयं घ्यायची.. थाटात गेलेल्यांची कार्य करायची.. हे सारं दिखाव्यासाठी….!!!

अशांना मनाची तरी लाज वाटते की नाही कुणास ठाऊक?

आपल्याच प्रथांचे आता आत्मपरीक्षण व्हायची गरज आहे.काही नव्याने अधोरेखित व्हायला हवं….!!!

मागे कोरोनामुळे कितीतरी ओळखीचे चेहरे काळाच्या पडद्याआड गेले…कर्मकांड नाही झाली म्हणून कांही प्रकोप झालाय असं वाटतं नाही…!!!

माणसं जिवंत आहेत तोवर आपली…त्यांना पोटभर खाऊ घालणं हेच खर प्रेम….!! मातीआड झाली त्यांची राख झाली.  त्यानंतर या नैवद्याला काही अर्थ  आहे असं मला वाटतं नाही….

तुम्हाला काय वाटतं???

(कविता – मन व्याकूळ व्याकूळ या संग्रहातून-2015)

© सुश्री स्वप्नजा घाटगे

लेखिका आणि संपादक – सखीसंपदा दिवाळी अंक, अध्यक्ष – सखीसंपदा महिला मंच, सामाजिक कार्यकर्त्या

कोल्हापूर

मो 8888033332

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्यसनमुक्ती… लेख क्र. १२ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ व्यसनमुक्ती… लेख क्र. १२ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

विक्रांत (नाव बदललेले) माझ्या शाळेतला गुणी मुलगा. पालकसभेच्या निमित्ताने, स्नेह संमेलनाला, किंवा या ना त्या कारणाने, त्याची आई अधून मधून कधीतरी शाळेत यायची तेव्हा मी त्यांना पहायचे – त्या माऊलीला मी कधी निवांत असलेलं असं पाहिलंच नाही. सदैव घाईगडबडीत असायच्या. अंगावर साधीशीच, किंबहुना थोडी विरलेली साडी असायची. त्याच्या वडिलांना मात्र कधीच शाळेत आलेलं पाहिलं नव्हतं.

चौकशी केल्यावर कळलं की या काही घरी धुणीभांड्यांचं काम करतात, नवरोबा मात्र दारूच्या नशेत रात्रंदिवस धुंद होऊन ऐदीपणाने पडलेले असतात. मला त्या माऊलीचे हाल बघवेनात.

मी विक्रांतबरोबर घरी चिठ्ठी पाठवली, आई वडिलांना दोघांनाही समक्ष भेटायला बोलावले. मुख्याध्यापकांची चिठ्ठी आली म्हटल्यावर त्याची आई घाबरली, आणि लगेच दुसऱ्या दिवशी मला भेटायला आली.

पण एकटीच आली होती. नवरा नव्हता सोबत.

मग मी आधी तिला आश्वस्त केलं, आणि तिच्याशी बोलून सगळी माहिती घेतली. “ते नाही यायचे,” मान खाली घालून ती म्हणाली. “काय सांगू तुम्हाला मी माझी कर्मकहाणी? चांगले ड्रायव्हर आहेत, पण न जाणो कुठून ही अवदसा आठवली, आता काम ना धाम, सतत दारू पिऊन पडलेले असतात.” मान खाली घालून ती सांगत होती.

मी दर दोन तीन आठवड्यांनी चिठ्ठी पाठवायचे, पण वडिल कधीच आले नाहीत. मग शेवटी मी “तुम्ही आला नाहीत, तर मीच तुमच्या घरी येईन,” असा निरोप पाठवला, त्याची शरम वाटली आणि अखेर विक्रांतचे वडील शाळेत आले.

आले ते मान खाली घालूनच उभे राहिले, नजरेला नजर काही मिळवत नव्हते.

मी त्यांना सर्व परीने समजाऊन सांगितलं, दारू पिणं वाईट, संसाराची कशी राखरांगोळी होते या व्यसनाने, बायकोची काय दशा झाली आहे, विक्रांत कसा गुणी आहे, वगैरे सगळं सांगितलं. पण ना ते मान वर करायला तयार होते, ना काही बोलायला.

त्याची आईच म्हणाली, “बाई, तुम्हाला काही उलट उत्तर देणार नाहीत ते, पण तुमच्या या सांगण्याचा काही उपयोग नाही. मी हातापाया पडले आहे त्यांच्या, हजारदा विनवण्या केल्या आहेत. काही फरक नाही पडला. इथून घरी गेले की परत बाटली काढतील आणि सुरुवात करतील.”

मी हतबुद्ध झाले. काय करावं, कसं सांगावं – काहीच सुचेना.

अचानक कसं सुचलं ठाऊक नाही, पण मी माझ्या खुर्चीतून उठले. विक्रांतच्या वडिलांच्या समोर जाऊन उभी राहिले, विचारलं, “तुमचं वय किती?”

या एकदम वेगळ्या प्रश्नाने ते गोंधळले. पहिल्यांदाच मान वर करून त्यांनी त्यांचं वय सांगितलं. ते माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होते.

मी त्यांना म्हटलं, “इतका वेळ तुमच्याशी बोलत होती ना, ती विक्रांतची शाळेतली मुख्याध्यापिका होती. आणि आता बोलत आहे ना ती तुमची मोठी बहीण बोलते आहे. आज तुम्ही घरी गेलात, पुन्हा दारू प्यायलात आणि रस्त्यात पडलात, तर लोकं काय म्हणतील माहिती आहे? ते म्हणतील, तो बघा, नलावडे बाईंचा भाऊ दारू पिऊन पडलाय.”

त्यांनी चमकून माझ्याकडे बघितलं. काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होते का ते?

पण काही बोलले नाहीत, पुन्हा मान खाली घालून बसले. मी असंच काही पुढे बोलले, पण कितपत परिणाम झाला, कोण जाणे!

विक्रांतची आई हिरमुसली होऊन घरी परतली.

आठ दिवसांनी त्या एकट्याच शाळेत आल्या. चेहरा उजळला होता त्यांचा, “बाई, काय चमत्कार झालाय ठाऊक नाही. पण शाळेतून परतल्यापासून यांनी दारूला स्पर्शही केलेला नाही. आज सकाळी तर काम शोधायला बाहेर पडले आहेत.”

मी स्वामींच्या तसबिरीला हात जोडले. स्वामी अशक्य ते शक्य करून दाखवत होते.

आणि मग तिथून उत्तरोत्तर त्याच्या वडिलांची प्रगतीच होत गेली. काही महिन्यांनी समजलं की एका शाळेच्या विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या बसवर ड्रायव्हर म्हणून त्यांची नेमणूक झाली होती.

विक्रांत आता मोठा झाला होता, माध्यमिक शाळेत गेला होता, पण अधून मधून मला भेटायचा, त्याची आई दिसायची. आता जरा त्या तरतरीत दिसू लागल्या होत्या.

एके दिवशी त्या आल्या, हातावर पेढा ठेवला. नवऱ्याने कर्ज उभे करून एक मिनी स्कूल बस विकत घेतली होती.

व्यसनमुक्तीने एक घर बरबाद होण्यापासून वाचलं होतं.

एक छान नवी आशादायक सुरुवात झाली होती.

एक विफल होऊ घातलेली कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होऊ लागली होती.

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मेरा देश बदल रहा है… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ मेरा देश बदल रहा है… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

काल एका ऑटो रिक्षाच्या मागे अजित दोवाल भारताचे NSA म्हणजे  *National Security Advisor यांचा फोटो असलेला एक sticker /poster  बघितला..  खाली लिहिलेले होते.•••••

” My Hero ” ••••

अजित दोवाल म्हणजे ••• अद्भुत व्यक्तिमत्त्व, विलक्षण बुद्धी, चाणाक्ष चतुर, Risk घेणे व त्यासाठी  perfect planning for any operations. हे त्यांच्या स्वभावातच  आहे. शत्रुच्या घरात घुसून मारायची हिम्मत ठेवणारे.••यांच्या नावानेच थरथर कापतात शत्रू.कोणतेही operation दोवालांच्या  नेतृत्वाखाली होणार,  असे समजल्यावर  दुश्मन तेथेच ढेर होतात.••••

” Real life Real HERO”

भारताचे जेम्स बॉन्ड आहेत‌. वयाची  पंचाहत्तरी  पार केली असली तरी कमालीची बुद्धी व कौशल्य.

मी रिक्षा वाल्यांला विचारले.•••हे poster कोणी लावले??? तेंव्हा तो म्हणाला…

* मॅडम एक कॉलेज का लडका लगाया ये ।  मुझे बोला ये सीनेमा के हिरो का poster निकालो। और ये लगाओ। ये असली हिरो है।और  उसने ‘दोवाल  सहाब ‘के बारे में  बहुत जानकारी भी दिया। मैं तुरंत तैयार हो गया ।अभी मैं अपनी सवारी को भी   poster के बारे में जितना  मुझे पता है मैं बताता हूं ।*•••

मला त्या मुलाचे तर कौतुक वाटलेच. व या रिक्षावाल्याचे पण. •••त्याला सुध्दा खरा हिरो कोण??? हे लगेच लक्षात आले. ••खरी आणि चांगली गोष्ट कोणालाही कळते.•• फक्त सांगणाऱ्याचे  सांगणे दमदार असले पाहिजे.  मार्गदर्शन करणारा बरोबर असला,तर गोष्टी पटतात.•••आणि  विचारही  बदलतात.•••

“मेरा देश बदल रहा है “

हे आजकाल ऐकू येणार वाक्य. देश नक्कीच बदलत  आहे. •••जगाची भारताकडे बघायची नजर बदलली आहे.••••कोरोनानंतर आपली संस्कृती किती चांगली आहे.हेही जगाला कळले आहे.••• Hello  म्हणत ‘Shake hand’ची  जागा  आता ‘नमस्ते’ नी घेतली आहे.•••

देश‌ अचानक बदलत नसतो.••••तो प्रयत्न करून बदलावा लागतो.•••ज्या देशात तरूणांची संख्या जास्त आहे,   तेथे सर्व शक्यही  आहे.••••

याची सुरुवात प्रत्येकाने करायला हवी. अगदी प्रत्त्येक घरात, शाळेत, नोकरी च्या जागी,प्रसार माध्यमे /मिडिया  सर्वांच्या सहकार्याने देश नक्की बदलू शकतो.••••

सध्याची परिस्थिती थोडी वेगळी आहे. तेवढी चांगली नाही. दिवसभर  breaking news च्या  नावाने  TV  वर ओरडून ओरडून त्याच त्याच बातम्या  सांगत असतात. शंभरापैकी पहिल्या पन्नास काय त्यापेक्षाही जास्त बातम्या negative  असतात. खून,  मारामाऱ्या  बलात्कार,चोऱ्या,गोळीबार, एकमेकांना शिव्या देणे.मानहानी करणे.हे सर्व बघून/ ऐकुन आपल्या  देशात फक्त अशाच गोष्टी घडतात का?????     हेच मनात येत.••

आपल्या देशात चांगल्या गोष्टी घडतच नाही का???? देशात सर्व वाईटच घडत असतं का???

बातम्या मधे जर पहिल्या पन्नास बातम्या चांगल्या सांगितल्या,तर त्याचा प्रभावी  परिणामही  दिसेल. Freedom of speech चा योग्य,सकारात्मक   उपयोग ही करता येतो.••••

या भोवऱ्यातुन बाहेर पडणे,म्हणजे  पहिली कठीण परिक्षा.•••एकशे  चाळीस करोड लोकांचा हा देश आहे. आपल्या देशात  काही तरी,कुठे तरी रोजच चांगलं नक्कीच घडत असणार.      शंभर बातम्या मधे चांगली बातमी केंव्हा येते आणि जाते कळतही नाही.•••.

चांगली बातमी  काहीही असू शकते.•• ••एखाद्या सामान्य माणसाचे  असामान्य कार्य. •••

एखाद्या विद्यार्थ्याने मिळविलेले  असामान्य  यश‌. जसे 2020  च्या NEET परिक्षेत ओडीसा च्या Soyeb  Aftab व दिल्ली ची  आकांक्षा सिंग ने 720/720  असे perfect 720  marks मिळविले.•••

हरियाणा मधील ‘किरोडी’ नावाच्या एका गावाने एक नवा इतिहास रचला.•• त्या गावात असलेल्या एकुण  २५० पैकी प्रत्त्येक  घरावर मुलीच्या  नावाची पाटी  लावली आहे.••• हरियाणा  सारख्या राज्यात   उचलेले हे पाऊल खूप कौतुकास्पद, सकारात्मक, आणि   अनुकरणीय  आहे.••••

‌एका सोळा वर्षांच्या   Priyavrath Patil‌ नावाच्या मुलाने संस्कृत च्या सर्व  महापरिक्षा पास केल्या.••••He is the youngest ever to pass all exams. ••••

ओडिशा च्या तटावर पृथ्वी ll  मिसाइल चे successful  परिक्षण झाले.,••••

उत्तराखंडची   मशरूम  queen  नावाने प्रसिद्ध   ‘दिव्या रावत’   जगभरात आपला व्यवसाय करते. किती तरी लोकांना तिने रोजगार  दिला आहे. ••••

‘,BRO ‘  Border Road organisation ने एका वर्षात 54  पूल बांधले.••••

‘ Breaking news:म्हणून चांगली बातमी पण लोकांना आकर्षित करू शकते.

अशा चांगल्या  बातम्या कुठे तरी एका कोपऱ्यात दडून  असतात. बहुतेक  फक्त बातम्यांचा  शंभर आकडा पूर्ण करण्यासाठी त्यांचा समावेश होतो. पण पत्नीने प्रिकराच्या मदतीने पतीला मारून,त्याचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरले,ही बातमी मात्र  आठवडाभर  चघळली जाते.•••

एका आंतरराष्ट्रीय   खेळाडूची मेहनत  discipline, dedication,  regular practice त्यांचे training अशा कितीतरी गोष्टी बातम्या मधे  चर्चेचे विषय असू शकतात.यांचा परिणाम/ प्रभाव वेगळा पडेल. एक positive उर्जेचा संचार होईल. अशी स्वप्ने बघणाऱ्या अनेक मुलांना दिशा मिळेल.••••

नवीन पीढीला मार्गदर्शन मिळेल.•••

तुम्हाला  तुमच्या देशाबद्दल काय वाटतं?? आपला देश कसा प्रगती करू शकतो??   देशात काय बदल करावासा वाटतो?? असे प्रश्न तरूण पीढ़ी ला विचारले तर त्यांच्या  विचारांना   चालना  मिळेल.दिशा मिळेल.

विचारांची direction बदलेल..••••

आणि कौतुक म्हणजे,एवढा मोठा देश सांभाळणारे आमचे माननीय प्रधानमंत्रीना हे सर्व माहिती असतं. •••आपल्या मन की बात    कार्यक्रमात ते अशा सर्व गोष्टींचा उल्लेख न विसरता  आवर्जुन  करतात. व त्या सर्वांचे  अभिनंदन ही करतात.••••

कोणता देश किती श्रीमंत आहे???? हे  त्या देशाची  प्राकृतिक संपदा, व त्या देशातील जनतेचे आचार  विचार , संस्कृती, सवयी,त्यांचे  देशप्रेम   यावर  अवलंबून असते ••••.

देश सर्वोपरी आहे ही भावना असली  तर सर्व  सहज शक्य आहे.••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझे हस्ताक्षर आणि चित्रकला… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ माझे हस्ताक्षर आणि चित्रकला… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

माझी शाळा रविवार पेठेतील ‘विद्या प्रसारिणी सभेची, तेव्हाची भारत हायस्कूल, सध्याची सराफ हायस्कूल’. शैक्षणिक वर्ष १९५८. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा सुरू झाली. शाळा तीच असली तरी नवी इयत्ता, नवा वर्ग, नव्या मित्र-मैत्रिणी, नवा गणवेष, नवे विषय, नवे शिक्षक, नवी वह्या-पुस्तके, नवे दप्तर, नवी कंपासपेटी, पेन, पेन्सिली, नवे संकल्प आणि नवी स्वप्नेही!

तसा मी अभ्यासात बरा विद्यार्थी. चित्रकलेत उत्तम. ड्राँईंगच्या दोन्ही परीक्षा ‘ए’ ग्रेडमधे उत्तीर्ण केलेल्या. इतर उपक्रमातही माझा उत्साही सहभाग असायचा. सायन्स क्लबचा सेक्रेटरी, पी.टी. लीडर, स्काऊटचा पथकनायक, वर्गाचा प्रतिनिधी इ. पदांवर मी सहज वावरायचो. केवळ वक्तृत्व आणि वार्षिक संम्मेलनाच्या विविध गुणदर्शनात, म्हणजे नाटक, नाच, गायन, नाट्यछटा, कथाकथन इ. रंगमंचावरून सादर करण्याच्या कलांविषयी मात्र माझे ‘शेपुट आत’ असायचे. स्टेजवर जायची विलक्षण भीति वाटायची.

तर शाळा सुरू होऊन तीन-चार दिवस झाले होते. सर्व शिक्षक तसे परिचयाचे होते. सर्व विषयांचे शिक्षक कळले होते. विविध विषयांच्या अभ्यासाचा श्रीगणेशा झाला होता. बहुतेक विषयांच्या वह्यांची चार-पाच पाने लिहिली गेली होती.

आज पहिल्या तास मराठीचा झाला. तास संपवून शिक्षक निघून गेले. दुसरा तास इंग्रजीचा, म्हणजे श्री मुळे सरांचा होता. त्या विषयाची वह्या-पुस्तके बाकावर ठेऊन आम्ही मुले सरांची वाट पहात होतो. पाच मिनिटे झाली पण सर आले नाहीत. ही संधी मिळताच वर्गातील मुले बडबड, गडबड करू लागली. गोंगाट वाढू लागला. काहींनी आपल्या जागा सोडून इकडे तिकडे जायला, फिरायला सुरुवात केली.

तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती, वय अदमासे पंचवीस वर्षे, गौर वर्ण, गोल गुबगुबीत चेहरा, मध्यम शरीरयष्टी, अंगात बदामी रंगाचा बुशशर्ट चाँकलेटी पँट, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा, काळे कुळकुळीत केस व्यवस्थित विंचरलेले, मुखावर सात्विक भाव. ते वर्गात येऊन सरळ शिक्षकांच्या खुर्चीवर बसले. मी माँनिटर होतो वर्गाचा. कोणी अनोळखी शिक्षक आले आहेत हे माझ्या लक्षात येताच मी मुलांना खुणेने शांत व्हायला सांगू लागलो. एक दोन मिनिटात मुलांचा गोंगाट विरला. मुले आपापल्या जागेवर येऊन शांत बसली.

ती व्यक्ती हे सारं थंडपणे न्याहाळत होती. सगळा वर्ग शांत झाला. आता मुले शांत आणि ती व्यक्तीही शांत. हे कोण असावेत याचा मी अंदाज घेत होतो. पूर्वी शाळेत कधी पाहिले नव्हते त्यांना. कोणी नवीन शिक्षक असावेत. कदाचित मुळेसर आज येणार नसावेत म्हणून हे तासावर आले असतील किंवा मुळेसरांऐवजी हेच आपल्याला यापुढे इंग्रजी शिकवणार असतील. काहीही असो. पण ती शांतता आता बोचायला लागली.

मी उभा राहून उगाचंच आगाऊपणा करीत त्यांना विचारले, “सर, आपल्याला यापूर्वी आम्ही पाहिलेले नाही कधी शाळेत. मुलांना आपलं नाव समजून घ्यायची उत्सुकता आहे.” त्यांनी बसल्या बसल्या हाताने मला खाली बसाण्याची खूण केली. मी पटकन आसनस्थ झालो.

सरांनी सारा वर्ग एकदा न्यहाळला. हातातली खडूची पेटी उघडली. एक खडू उचलून त्याचे अग्र मोडून जवळच्या टोपलीत टाकले. बसल्या बसल्याच, काहीही न बोलता, मागे वळून ते फळ्यावर काही लिहू लागले. ती लिहित असलेली एकेक अक्षरे मी मनातल्या मनात वाचू लागलो. ती अशी होती… “शं. ना. नवलगुंदकर”.

(हो, हेच पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शं. ना. नवलगुंदकर. ‘स्वा. सावरकर’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पुढे डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. नुकतेच ते कालवश झाले.)

एकूण सरांचे नाव वाचले, समजले. शं. ना. नवलगुंदकर. पण खरं म्हणजे मी आवाक् झालो ते सरांचे सुंदर हस्ताक्षर बघून. इतके सुरेख हस्ताक्षर ही प्रथमच पहात होतो. नावातले प्रत्येक अक्षर अत्यंत डौलदार, सम उंचीचे, वळणदार, घोटीव, जणू मोत्याची माळच! प्रत्येक अक्षरामधील अंतर समान. माथ्यावर सरळ रेषा. फळ्यावर लिहितानाची सहजता वाखाणण्यासारखी. ते हस्ताक्षर पाहून मी थक्क झालो होतो. सरांच्या हस्ताक्षराच्या तुलनेत मला माझ्या हस्ताक्षराची लाज वाटली. मी मनोमन ओशाळलो.

सर बोलू लागले. “माझं नाव शंकर नागेश नवलगुंदकर. या शाळेत मी शिक्षक म्हणून आलोय नव्याने. मी इंग्लिश आणि गणित विषय शिकवतो. आज तुमचे नेहमीचे शिक्षक श्री मुळेसर काही कारणामुळे येऊ शकत नसल्याने तुमच्या वर्गावर आलोय”. येवढे प्रास्ताविक सांगून त्यांनी त्या तासाला ‘दि लिटिल मँच गर्ल’ हा इंग्रजी पाठ आपल्या ओघवत्या वाणीत शिकवला. सारा वर्ग भाराऊन गेला सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे. हा तास कधी संपला ते आम्हाला कळलंही नाही.

सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीपेक्षाही त्यांचे सुंदर अक्षर पाहून मी मात्र दिवसभर अस्वस्थ होतो. मधल्या सुट्टीत डबा खाण्याची आणि खेळण्याची इच्छाच झाली नाही. संध्याकाळी शाळा सुटल्यावर वाटेत कुठेही न रेंगाळता सरळ घरी आलो. मुकाट्याने रात्रीचे जेवण केले. अंरुणावर तळमळत पडलो. कधी डोळा लागला ते कळलंच नाही.

सकाळी लौकर उठलो तो काही निश्चय करूनच. सरळ सर्व विषयांच्या वह्या काढल्या आणि प्रत्येक वही पाहू लागलो. काय ते गबाळं अक्षर माझं, शीः! अगदी रडवेला झालो. क्षणभर थांबलो आणि ठरवलं, लिहिलेली सर्व पानं फाडून टाकायची आणि पुन्हा लिहायची.

मागचा पुढचा विचार न करता, बघता बघता, मी सगळ्या वह्यांमधली लिहिलेली सगळी पानं टराटरा फाडली आणि बाजूला विषयवार लाऊन ठेवली. डोळे मिटून घेतले. सरांचे ते सुंदर अक्षर अंतःचक्षूने न्यहाळू लागलो. काही क्षण गेले. डोळ्यातून अश्रु टपकू लागले.

भावनावेग काहीसा ओसरला तसा सावरलो. आता मी विद्येची देवता श्री गजाननाला आळवून म्हटले, “देवा, मी असा दुर्गुणी का झालो? माझं हस्ताक्षर इतके वाईट का रहावे? लाज वाटते मला माझ्या अक्षराची. देवा, मला सुंदर हस्ताक्षर दे. मनोहर शब्दसंग्रह दे.”

काही क्षणानंतर मी डोळे पुसून उठलो. पेन उघडून त्यातील निळी शाई ओतून दिली. पेन धुतले आणि त्यात काळी शाई भरली. सतरंजीवरच लेखनासन जमवले आणि एक कोरा कागद पुढे आढून एकाग्र चित्ताने समर्थांच्या ‘मनाचा श्लोका’तील पहिला श्लोक लिहिला…

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा

मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा

नमू शारदा मूळ चत्वारवाचा

गमू पंथ आनंत या राघवाचा॥

जय जय रघुवीर समर्थ!

श्लोक लिहून पूर्ण झाला आणि थांबलो. कसा लिहिला गेलाय हे पाहिले आणि काय आश्चर्य, श्लोकाच्या सर्व ओळी एकसारख्या, सुडौल अक्षरात कागदावर उतरलेल्या! सगळी अक्षरे एक सारख्या उंचीची, वर्तुळाकार, ठोस, भरीव, एकमेकांपासून सारख्याच अंतरावर लिहिलेली. श्लोकाचे चारही चरण म्हणजे चार मोत्याच्या माळाच जणू!

ते पाहून मी आश्चर्यचकित झालो. हे मी लिहिलंय यावर माझाच विश्वास बसेना. माझे हस्ताक्षर क्षणात इतके कसे सुधारले? खरंच हे मीच लिहिलंय का?

मित्रहो, त्या एका क्षणी माझे हस्ताक्षर संपूर्ण बदलले आहे, सुधारले आहे, सुंदर दिसते आहे याचा मला साक्षात्कार झाला!

मला आत्मविश्वास आला आणि पुढील काही तासात मी सर्व वह्या पुन्हा लिहून काढल्या. सर्व वह्यातील सर्व पानांवर उतरलेली सर्व अक्षरे एकसारखी तशीच सुंदर उतरली होती!

दसबोध दशक ८ समास ६ च्या आरंभी श्रोता वक्त्याला विचारतो, “सत्संग महिमा कैसी? मोक्ष लाभे कितां दिवसीं? हे मज निरोपावे॥ धरिता साधूची संगती। कितां दिवसां होते मुक्ती?” त्यावर ठामपणे वक्ता उत्तरतो, “मुक्ती लाभे तत्क्षणी। विश्वासतां निरूपणीं!

मलाही माझ्या गचाळ हस्ताक्षराच्या अवगुणातून तत्क्षणी मुक्ती मिळाली, ज्याक्षणी मी समर्थांच्या ‘निरूपणा’वर विश्वास ठेवला आणि मला आदरणीय गुरुवर्य श्री शं. ना. नवलगुंदकरांसारख्यांचा सत्संग मिळाला!

सर्व वह्या पुन्हा मनासारख्या लिहून झाल्यामुळे मी अत्यंत उत्साहाने, उल्हासाने, आनंदाने, आत्मविश्वासाने शाळेत गेलो. कालच्या सारखाच आजही दुसरा तास इंग्रजीचा, म्हणजे मुळे सरांचा. पण आज ते स्वतः वर्गावर आले.

मी नेहमी पहिल्या पुढच्या बाकावर बसणारा विद्यार्थी. वर्गात सरांचा प्रवेश झाला. मुलांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले आणि सारे खाली बसले. “काल वर्गावर आलेल्या नव्या शिक्षकांनी काय शिकविले रे तुम्हाला” असा प्रश्न मुलांना विचारत असताना त्यांनी सहज माझी वही उचलून चाळायला सुरवात केली. मुलांनी एका स्वरात सांगितले, “काल ‘दि लिटिल मँच गर्ल’ हा लेसन झाला सर.” “ओ, आय सी” म्हणत, माझ्या वहीचे प्रत्येक पान सर निरखून पहू लागले. माझ्या छातीची धडधड वाढली. वही घेऊन सर वळले, खुर्चीवर बसले आणि त्यांनी आपल्या कोटाला लावलेले पेन काढून माझ्या वहीवर काहीतरी खरडले. मी नर्व्हस. त्यांनी वही पुन्हा एकदा भरभर चाळली आणि ती मिटून माझ्या हातात दिली. मी ती घेऊन मटकन् खाली बसलो आणि थरथरत्या हाताने उघडून पाहिली तो काय, त्यावर त्यांनी रिमार्क लिहिला होता, “Excellent!”

तो शेरा पाहून मी शहारलो. नुसता एकटक पहात बसलो. सर मला म्हणले, ” बघत काय बसलायस नुसता. Read the remark loudly. Let the whole class know.”

माझ्या तोंडून शब्द फुटेना. तशी त्यांनी माझ्या हातातून वही हिसकाऊन घेतली आणि उंच करून साऱ्या वर्गाला दाखवीत म्हणाले, “See this presentation, quality of work, handwriting, neatness. असं काम पाहिजे, असं सुबक अक्षर पाहिजे. बघा एकदा सगळ्यांनी नीट.” मग माझ्या पाठीवर हात फिरवित म्हणाले, “Good job done. I am proud of you my boy. Keep it up.”

मित्रहो, मला सांगायला अभिमान वाटतो कि, यानंतर पुढील आयुष्यात, विद्यार्थिदशेत, व्यावसायिक जीवनात हस्ताक्षर, सादरीकरण (presentation) यासाठी मी ‘Excellent’, ‘outstanding’, ‘great’, wonderful’, ‘उत्कृष्ट’, ‘अफलातून’, ‘वाँऊ’, ‘क्या बात है’ या सारख्या शेऱ्यांखेरीज सहसा दुसरा कोणताही शेरा मिळवला नाही! या साऱ्याचा प्रेरणास्रोत मात्र होता माझे गुरुवर्य डॉ. शं. ना. नवलगुंदकर, माजी कुलगुरु, पुणे विद्यापीठ. त्यांचा मी सदैव ऋणी आहे.

सतत लिहून लिहून आणि रंगांचे कुंचले फिरवून फिरवून, पुढे वयाच्या पन्नाशीनंतर माझे उजव्या हाताचे मनगट दुखू लागले. तीव्र वेदना होऊ लागल्या. मनगटाच्या हालचाली करणेही अशक्य झाले. निरुपाय होऊन अखेर चित्रे काढणे, लिहिणे मला थांबवावे लागले. काय करणार?

अखेर उजव्या मनगटावर, आंगठ्याच्या खालील भागावर पुढील शस्त्रक्रिया करावी लागली.

De-Quervain’s release surgery or Surgery for De Quervain’s Tenosynovitis मनगटावर आंगठ्याच्या तळाशी करावी लागणारी शस्त्रक्रिया.

त्याने वेदनातून सुटका झाली. मनगट वर्तुळाकार फिरू लागले. पण तरीही घात झालाच.

शस्त्रक्रिया करताना हाताच्या पंज्याच्या काही भागातील त्वचेचे ज्ञानतंतू कापले गेले. आंगठा, तर्जनी आणि मध्यमा या तीन बोटांच्या अग्रांवरील त्वचेच्या स्पर्शसंवेदना सदाच्या गेल्या! ज्या बोटांमधे रंगाचा कुंचला किंवा पेन धरायचे ती बोटेच चित्रकारितेसाठी आणि लेखनासाठी निरुपयोगी झाली. खूप प्रयत्न करूनही पूर्वीसारखे चित्र काढणे, सुडौल लिहिणे जमेना. मी खूप निराश झालो. माझी चित्रकला आणि लेखनकला मला सदा सदाची सोडून गेली!

आता मी पूर्वीसारखी चित्रे काढू शकत नाही कि सुंदर हस्ताक्षरात लिहू शकत नाही.

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परंपरा.. जुन्या,नव्या स्वरूपात!… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? मनमंजुषेतून ?

☆ परंपरा.. जुन्या,नव्या स्वरूपात!… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

श्रावण सोमवारी मी ह्यांना सांगून पूजेला बसले. ह्यांना म्हटलं “बाहेर कोणी आलं, बेल वाजली तर जरा दार उघडायला उठाल.”

हे म्हणाले; “ठीक आहे.”

पूजा सुरू झाली आणि थोड्या वेळातच बेल वाजली. यांनी दार उघडलं तर वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते नितीनजी आलेले होते. आमच्याकडे नेहमी येणं जाणं होतं त्यांचं. यांना म्हणाले काय करतायेत वहिनी? ह्यांनी सांगितलं ती पूजा करते आहे. महादेवाला शिवा मुठ वगैरे वाहण्याचा कार्यक्रम चालू आहे. थोडा वेळ लागेल तिला. आपण बोलत बसुयात.

तर ते म्हणाले

”आज आम्हाला वहिनींशीच काम आहे. बसतो आम्ही त्यांची पूजा होईपर्यंत.”

माझी पूजा आटोपली आणि मी समोर येऊन बसले. पूजा करत होते तरी बाहेर काय चाललंय इकडे माझं लक्ष होतच. त्यांना म्हटलं काय काम काढलंय माझ्याकडे? तर ते म्हणाले;

“वहिनी दरवर्षी आमच्या कल्याण आश्रमातर्फे आम्ही महिलांकडून शिवामूठ गोळा करत असतो आपल्या धर्माचाच कार्य आहे हे पण एक. आमच्या वनवासी आश्रमात असणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय आम्हाला करावी लागते. आम्ही समाजाकडूनच मागून ते करत असतो आणि घराघराला आमच्या कामाची माहिती मिळावी याकरता आम्ही फूल ना फुलाची पाकळी गोळा करत असतो. समाजाने दिलेले आम्हाला हवेच असते. म्हणून आम्ही दरवर्षी महिलांना आवाहन करत असतो की श्रावणात तुम्ही शिवा मूठ वाहता ती आमच्या कल्याण आश्रमासाठी देत जा. मूठ मूठ धान्य तुम्ही परिसरातल्या महिलांकडून शिवा मुठीच्या स्वरूपात गोळा करून दिलं तर आम्हाला आमच्या काही विद्यार्थ्यांची सोय करता येईल. तुम्ही चार महिन्यात पण असा नेम करू शकता की रोज मूठभर धान्य एका पिशवीत त्यांच्या नावाचं वेगळं काढून ठेवायचं आणि चार महिने आटोपल्यावर ते आम्हाला द्यायचं.”

मला त्यांची कल्पना एकदम आवडली.मला आठवले; माझ्या माहेरी पण परंपरा आणि नवता याचा संगम साधल्या जात असे. माझ्या माहेरी महालक्ष्म्यां करता दोन सवाष्णी सांगितल्या जायच्या. त्यातली एक खालच्या वर्गातली सवाष्ण रहायची. माझी आई आणि काकू आमच्या काम करणाऱ्या बाईलाच सवाष्ण सांगायच्या. आणि पंक्तीत सुद्धा तिला बरोबरीचा दर्जा देऊन, मान देऊन जेवू घालायच्या. मी स्वतः सुद्धा शुक्रवारची सवाष्ण माझ्या काम करण्याऱ्या बाईलाच व्यवस्थित पुरणाचं जेवू घालून चांगल्या कपड्याची ओटी भरून करायचे. मला काही खूप देवाचं करण्याचं वेड नसलं तरी आपली परंपरा जपावी ही आवड मात्र आहे.

म्हणून  नितीनजींनी सुचवलेली कल्पना मला फार आवडली.  मी म्हटले,”मला तुमची कल्पना खूप आवडली आहे.मी नक्की तुम्हाला मैत्रिणीकडून धान्य गोळा करून देईन.”

माझा प्रतिसाद बघून त्यांनी पुढे मला सांगितले,

“वहिनी, पितृपक्षामध्ये पण आमच्या छात्रावासातील मुलांना एक दिवस जेवू घालून आमचा भार हलका करू शकता.जुन्या परंपरांचं नव्यात रुपांतर करून तुम्ही आपली परंपराही जपून, नवे काहीतरी प्रस्थापित करून समाजकार्य करण्याचे पुण्यही पदरात पाडून घेऊ शकता.”

ही कल्पना पण मला एकदम आवडली.

मी समविचारी मैत्रिणी, शेजारी, यांच्यापुढे कल्पना मांडली. एक-दोघींनी विरोध केला.त्यांना घरातल्या पद्धतीप्रमाणे साग्रसंगीत केले नाही तर काहीतरी अनिष्ट घडेल असे वाटत होते.पण बाकी सगळ्यांनी उचलून धरली.आम्ही सगळ्यांनी मिळून जवळपास दोन पोते धान्य गोळा करून दिले.

नितीनजी ते न्यायला आले.त्यांच्या चेहेऱ्यावर आनंद मावत नव्हता.ते म्हणाले,

“वहिनी, तुमच्या सगळ्यांच्या रुपात कृष्णच नवा धर्म स्थापन करायला आला आहे असे वाटले.”

मी म्हटले; “नितीनजी आम्ही फक्त येवढाच हातभार लावला.तुम्ही तर तुमचे पूर्ण जीवन या कार्याकरता खर्ची घातले आहे.”

त्यावर ते म्हणाले; “तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद वहिनी.”

माझ्या मनात विचार आले – – –” खरोखर आपले सण कोणाचं ना कोणाचं ऋण व्यक्त करणारे आहेत.पूर्वीची साजरा करण्याची पद्धत बदलून आपण नव्या स्वरूपात साजरा करू शकतो.पोळा साजरा करतो पण आपल्या कडे शेती पण नसते व बैल पण नसतात.मग एखाद्या गरीब शेतकऱ्याला बैल अथवा शेतीची अवजारे घेऊन देऊनही पोळा साजरा करू शकतो.

माणूस उत्सव प्रिय असतो.सण साजरे करणं सोडू शकत नाही.फावल्या वेळात ‘पब’ संस्कृती अंगिकारण्यापेक्षा आपल्याच परंपरांमध्ये नवता शोधून साजऱ्या करणे मला खूप आवडेल.आपली नाळ आपल्याच संस्कृतीशी जोडलेली रहायला हवी नं!”

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची…! – भाग -२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची…! – भाग -२☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(“तुझी पत्नी कशी दिसत असेल, असं तुला वाटतं?”

“ती खूप सुंदरच असणार सर, दुसर्‍याला सावरणारी कोणतीच गोष्ट कधीच कुरूप नसते!”

…. काठीला छातीशी लावत तो कसानुसा हसला. मनगटावर पडलेला डोळ्यातला थेंब, मागं हात नेऊन त्यानं पँटला पुसला.

माझ्याही अंगावर शहारा आला!) इथून पुढे ——

जिला पाहिलंही नाही, ती त्याला सुंदर भासते… यानं काही पाहिलंच नाही, म्हणून याच्या डोक्यात तुलना होतच नाही! हे छान, ते घाण… हे सुंदर, ते कुरूप… हे पांढरं, ते काळं… हे मोठं, ते छोटं… असं काही वाटतच नाही. यांच्या नजरेत सारंच एकरुप… एकजीव… आणि एकाच रंगाचं!

तुलना केली की त्रास होतो…! तराजुत तोललं, की कमी जास्त होणारच… एकदा हा तराजू बाजुला ठेवला, की तुलना संपते… तुलना थांबली, की छोटं-मोठं, छान-घाण, उच्च-नीच, हे भावच नष्ट होतात… आणि मग सगळंच समसमान दिसायला लागतं…  एकदा हे समसमान दिसायला लागलं की समजावं, आपण आत्ता ‘डोळस’ झालो!….  तोपर्यंत डोळे असूनही आपण ‘अंध’च…!!!

“तुला आणि तुझ्या बायकोला काहीच दिसत नाही, याचं वाईट नाही वाटत तुला? आपण चारचौघांसारखे नाही, याची खंत नाही वाटत तुला?” डबे बॅगेत भरत मी विचारलं.

“खंत कशाची सर? प्रत्येकाला निसर्गानं डोळा, कान, नाक, कातडी आणि जीभ अशी पाच साधनं दिली आहेत… आमच्याकडे डोळे नाहीत… पण बाकी चार साधनं आहेतच की! आम्ही ती पूर्ण ताकदीनं वापरतो… आम्ही मन लावून ऐकतो, जीवाच्या आकांतानं सुगंध भरून घेतो, स्पर्शातून सुख दुःख अनुभवतो आणि कमीत कमी बोलून दुसर्‍यांचं जास्त ऐकतो!.. डोळे नाहीत, हे एका अर्थानं बरंच झालं… त्यामुळं इतर साधनांचा जास्तीत जास्त वापर करता आला!…. आम्ही डोळ्यानं नाही मनानं पाहतो सर्व!”

…. हे ऐकून मी चाट पडलो. याला कशाचंच दुःखं नाही. जे आहे, त्यातच सारा आनंद… नव्हे परमानंद!

आयुष्य एकदाच मिळतं असं म्हणतात…

साफ झूठ आहे हे…!

एकदाच मिळतं ते मरण…!

आयुष्य रोज मिळत असतं…!!!

ते फक्त जगता यायला हवं… अंध असुनही खर्‍या डोळस असलेल्या या मुलासारखं!

“अजून एक प्रश्न… तुझ्या बाळाला दिसतं?”

“सर, डॉक्टर म्हणाले, मुलगी पण पूर्ण अंध आहे…!”

.. यावेळी त्याला हुंदका आवरला नाही. दोन्ही मुठीत काठी घट्ट धरुन इकडे तिकडे तो चेहरा फिरवत होता… जणू मुलीला पहायला आसुसलेला बाप, शोधत होता तिला या दुनियेत…!

.. विचारानं माझ्या अंगावर सर्रकन् काटा आला…

हा अंध,

याची बायको अंध,

त्यांना नुकतंच झालेलं बाळही अंध!

.. कोण कुणाची कशी काळजी घेत असेल, याची कल्पनाही करवत नाही!

.. निसर्ग का अशी परीक्षा घेत असेल यांची? येणारा प्रत्येक दिवस, यांच्यासाठी अग्नीपरिक्षा आहे, आणि आपण रडत राहतो, छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी…!

हे दोघंही नवरा बायको एकमेकांची काठी झाले आहेत…

…. इथं प्रत्येकजण दुसर्‍यासाठी चिखल होतोय… दुसर्‍याला फुलवतोय…!

कागदावर नुसतंच ‘पाणी’ असं लिहून चालत नाही, पाऊस पाडायला आभाळच व्हावं लागतं…!

.. एकमेकांना न पाहताही, एकमेकांना जपायला माणूसच व्हावं लागतं!

.. फुलांना उमलू द्यायचं असेल, तर स्वतः चिखलच व्हावं लागतं!

“सर, मिळेल आम्हाला काम?” त्याच्या या प्रश्नानं माझी तंद्री भंगली!

या कुटुंबाचं काय करता येईल, याचा मी मनात विचार करायला लागलो. अनेक हितचिंतक मंडळींनी मला या अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की काम करणारं एखादं जोडपं तुम्हाला जर कधी भेटलं, तर आमच्याकडे काम करण्यासाठी पाठवा. पण हे दोघंही अंध… आता यांना त्यांच्याकडे काम करायला पाठवायचं कसं? हा प्रश्न पडला.

एकेका हितचिंतकाचं नाव आठवायला लागलो.

आणि आठवलं… माझे एक ज्येष्ठ स्नेही! पंधरा दिवसांपुर्वी यांचा फोन आला होता, त्यांनी मला सांगितलं होतं,

“अभिजीत, तुला तुझ्या कामात जर कोणी अंध-अपंग अशी व्यक्ती किंवा जोडपं सापडलं, तर त्यांना माझ्याकडे पाठवून दे. माझं एक फार्महाऊस आहे. तिथं एक छानशी खोली सुद्धा आहे. मी त्यांना त्या खोलीमध्ये राहायला जागा देईन आणि त्यांचा संसारही लावून देईन.”

“पण सर, तुम्ही असं का करताहात?”

पलीकडून ते हसत म्हणाले होते…“अभिजीत, आयुष्यभर स्वतःसाठी जगलो. स्वतःचा पैसा स्वतःसाठीच वापरला, घासातला घास कधी कुणाला दिला नाही… खूप आनंद मिळाला पण समाधान नाही रे!”

.. खरंय, आपण स्वतःसाठी काही मिळवतो तेव्हा होतो तो ‘आनंद’, आपण जेव्हा दुसर्‍याला काही द्यायला लागतो, तेव्हा मिळतं ते ‘समाधान’!

.. आता दुसर्‍याचं पोट भरल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचा होणारा आनंद मला बघायचाय…

.. आयुष्यात गाढव होऊन इतरांना खूप लाथा मारल्या… एखाद्याला हात देऊन, मरायच्या आधी एकदा ‘माणूस’ व्हायचंय…’

.. आयुष्यात ‘कुत्रा’ होऊन भुंकलो, खुप जणांना चावलो… पण कधी कुणाशी इमान नाही राखलं… आता मरायच्या आधी, एकदा इमानदार व्हायचंय रे…!

“देशील का संधी, मलाही…??? हवं तर तुझा भिकारी समज मला…”

…. काय म्हणू या माणसाला? त्यांच्या या वाक्यांनी मला गलबलून आलं!

काठावर नुसतं उभं राहून सल्ले देतात ते ‘सामान्य’… बुडणार्‍याला हात देतात ते ‘असामान्य’…!

…. हा असामान्य माणूस, किती प्रांजळपणे सगळं कबूल करतोय? देर सही… दुरुस्त आये…!

माझ्या बाबतीत घडणाऱ्या काही गोष्टींचं मलाच खूप आश्चर्य वाटतं…

.. माझ्या या जेष्ठ स्नेह्यांनी बरोबर पंधरा दिवसांपूर्वी मला त्यांचं हे मनोगत सांगितलं होतं आणि आज बरोबर पंधराव्या दिवशी त्यांना हवं असणारं जोडपं आज मला येऊन धडकलं होतं, त्याच्याही नकळत आणि माझ्याही…!

.. ही लीला कुणाची…???

.. कोण खेळ खेळतंय हा?

.. कशासाठी…???

मला काही वेळा खरंच कळत नाही!.. कुणीतरी कुणाचीतरी इच्छा पूर्ण करतंय…

आणि या सर्वात ‘माध्यम’ म्हणून माझी निवड होते…

कोण ठरवतंय हे सारं…?

मी झटकन त्या स्नेह्यांना फोन लावला. सर्व सांगितलं आणि हसत म्हणालो,

“सर, तुमची ‘विच्छा’ आज कुणीतरी पूर्ण केलीय, आज माणूस व्हायची तुमची वेळ आलीय…!”

फोनवर ते काहीच बोलले नाहीत… पण हुंदका मात्र ऐकू आला.

…. या हुंदक्यामध्येच सुरू असलेली गणपतीची आरती फोनवर स्पष्ट ऐकू येत होती…

‘सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची…!’

‘मी’ आणि ‘माझा’ म्हणून आपण स्वतःपुरतं पाहतो, ती ‘नजर’… या ‘नजरे’ला दुसरं कुणी ‘दिसायला’ लागतं तेव्हा होते ती ‘दृष्टी!’.. आज या माणसाला ‘दृष्टी’ प्राप्त झाली…!

काल फोन करून मी यांना म्हणालो, “सर, मी या तिघांना स्वतःच घेऊन येतोय तुमच्याकडे…”

ते म्हणाले, “छे… छे… डॉक्टर, तुम्ही कशाला वेळ घालवताय? मी माझी गाडी पाठवतो ना या तिघांना आणायला!”

मी म्हटलं, “सर, काय हो हे… येऊ द्या की त्यांच्यासोबत… आज तुम्ही माणुस व्हायला निघालात… मला किमान एक दिवस आंधळ्याची काठी तरी बनू द्या की…!”

फोनवर पुन्हा तेच हुंदके… आणि पुन्हा तीच आरती…

…. ‘सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची…!’….

– समाप्त –

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ५८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ५८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

ट्रॉफी

त्यादिवशी संध्याकाळी फोनवर बोलता बोलता मयुरा म्हणाली,” सानवीला न थोडा ताप आलाय.”

त्यावर मी तात्काळ आणि अत्यंत काळजीने तिला विचारले, “डॉक्टर कडे घेऊन जा तिला. अजून पर्यंत का नाही नेलंस?”

त्यावर ती म्हणाली, “अगं! मम्मी लो फीवर आहे. डॉक्टर लगेच तर काय तिला औषध देणारच नाही. तीन दिवसाने बघेन. नाहीच उतरला ताप तर घेऊन जाईन डॉक्टरकडे. इथे हीच पद्धत आहे. भारतात लगेच अँटिबायोटिक्स सुरू करतात. त्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते आणि सध्या इथे “स्टमक फ्लू”ची साथच आहे. काही दिवसांनी आपोआपच इन्फेक्शन जातं फार तर काही घरगुती उपाय करायचे.बाकी काही नाही.”

काळजी करण्यासारखे नसेलही काही. पण लांबलचक भौगोलिक अंतर कधी कधी काळजीला जन्म देते.

मयुरा शांत होती. अर्थात तिचा समंजस, शांतपणा, अजिबात न घाबरणं आणि पॅनिक न होणं हे नक्कीच प्रशंसनीय होतं. शिवाय ही आजकालची पिढी! यांना गुगलवर  कुठल्याही विषयावरची चटकन माहिती मिळते. अनंत शंकांचं प्राथमिक निरसन तरी गुगलमुळे नक्कीच होतं. अशी ही शास्त्रीय पद्धतीने,विकसित माध्यमाने ज्ञानी झालेली माझ्या मुलींची पिढी आणि आठ आठ मुलं वाढवणारी माझ्या सासूबाई, माझी आई यांची एक पिढी.

एक दिवस माझ्या सासूबाई मला म्हणाल्या होत्या,” कशी वाढवली असतील आम्ही इतकी मुलं? तेही एकत्र कुटुंबाच्या जंजाळात, अगं कोणकोण सतत आजारी असायचंच मग निळू वैद्य नाहीतर कोपऱ्यावरचा डॉक्टर कोठारी ठरलेलाच.हिरवट  काचेच्या चपट्या बाटलीवर चार किंवा पाच टक दाखवणारा कागद चिकटवलेला आणि बाटलीतलं गुलाबी, कडू, तुरट औषध. सकाळ संध्याकाळ त्या टकप्रमाणे घेतलं की दुखणं गायब.

आमची आई सुद्धा आम्ही आजारी झालो की पालिका हॉस्पिटलच्या डॉक्टर कोटस्थानेकडे घेऊन जायची.गळ्यात लोंबकळणारा स्टेथोस्कोप,शर्ट पँट आणि ऐटदार टाय. पण  बोलणं कमी त्यातून अत्यंत हळू,कान देऊन ऐकावं लागायचं. “लांब श्वास घ्या,सोडा,जीभ दाखवा,उपडे व्हा” वगैरे झाल्यानंतर तशीच चपटी बाटली, त्यातलं गुलबट पांढरं औषध आणि बाटलीवर चिकटवलेली ती डोस निर्देशित कागदाची कातरलेली पट्टी! अगदीच बदल असेल तर कधी कधी पुड्या बांधून पांढऱ्या रंगाची पावडरही दिलेली असायची.  पण तेवढ्याने व्याधी गायब व्हायचीच.

दोन पिढींच्या मधली आमची पिढी. पालकत्वाचं काही ज्ञान मागच्या पिढीकडून नक्कीच झिरपलेलं होतं पण पालकत्व या विषयावरचा जाणीवपूर्वक, जागरूकतेचा एक आवश्यक दृष्टिकोन आमच्या पिढीपासून विकसित होत होता. त्यात “आम्ही दोघे आमची दोन” ही गोजिरवाणी चौकटही प्रचलित होत होती आणि मुलांच्या बाबतीत मागच्यांनी,(पण त्यांना न वाटणार्‍या) केलेल्या चुकाही जाणवू लागल्या होत्या आणि आपल्या मुलांच्या बाबतीत हे घडू द्यायचं नाही हा एक निर्धार पालकत्व निभावताना त्या वाटेवर सतत होता. डोळ्यात तेल घालून मुलांना वाढवायचं, सर्वस्व पणाला लावायचं, आदर्श आईबाप होण्याच्या वाटेवरचे सगळे टप्पे त्यांच्या समृद्ध भविष्यासाठी डोळसपणे ओलांडायचे.मागच्या पिढीपेक्षा या मधल्या पिढीचे आर्थिक बळ काहीसे वरचढ होते.स्त्रियाही मिळवत्या झाल्या होत्या.

ज्योतिका तीनच महिन्याची होती.ज्योतिका  म्हणजे माझं आणि विलासचं एक अत्यंत गोंडस स्वप्न! ती हसली, काहीतरी मजेदार मधुर आवाज तिच्या ओठातून उमटला, ती कुशीवर वळली, ती उपडी झाली..तिच्या अनेक बारीक-सारीक हालचाली टिपताना आम्ही खरोखरच खूप हरखून जायचो. वास्तविक तिच्या जन्माने आम्ही फक्त आई-बाबा झालो होतो पण पालक व्हायला मात्र वेळ होता.

याच दरम्यान एक दिवस रात्री ज्योतिका अचानक तापाने फणफणली. घरात आम्ही दोघेच कोणी वडीलधारी नाही.रात्रीची वेळ असल्यामुळे काॅलनीत अशा भलत्यावेळी कुणाला कसे उठवणार? त्यावेळी मोबाईल काय फोन सुद्धा नव्हते. आम्ही दोघं रात्रभर ज्योतिकापाशी बसून होतो पहाट होण्याची वाट पाहत. सकाळ झाली की विलास डॉक्टर केळकर यांना घेऊनच येणार होता.

डॉक्टर सुनंदा केळकर, विलास च्या चेहऱ्यावरची काळजी पाहून लगेच घरी आल्या. तोपर्यंत ज्योतिका मस्त गादीत खेळत होती, मजेदार आवाजही काढत होती.तापही पळाला होता, केळकर डॉक्टरांनी तिला झटकन उचललं आणि हातातल्या हातातच उंचावत म्हणाल्या,” किती हसरं खेळतं निरोगी बाळ आहे! भांडारकर किती काळजी करताहो? लहान मुलं आजारी पडतातच इतकं नसतं घाबरायचं.”

डॉक्टर सुनंदा केळकर म्हणजे हसरं, स्वतःच्या वैद्यकीय ज्ञानाविषयी पूर्णपणे आत्मविश्वास असणारं, अभ्यासू, मृदू आणि कणखर बोलकं व्यक्तिमत्त्व त्यांच्या नुसत्या बोलण्यानेच माणसाचं अर्ध दुखणं पळून जायचं. पण यावेळेस जेव्हा त्या बोलत होत्या तेव्हा मनातल्या मनात मी मात्र म्हणाले,” या घरी येईपर्यंत ज्योतिकाचा ताप उतरला म्हणून पण त्यापूर्वी आमच्या काळजाचा ठोका चुकला होता हे त्यांना कसं कळणार?”

पण त्या दिवशी डॉक्टरांनी आम्हाला काही उपयुक्त टिप्स दिल्या. घरात नेमकी कुठली औषधं कायम  असावीत, कधी कुठली द्यावीत आणि मूल जोपर्यंत खेळत असतं ना तोपर्यंत  काळजी करू नये वगैरे वगैरे अगदी अनुभवी व्यक्तीच्या मायेने त्यांनी आम्हाला सांगितले. रात्री झोपताना बाळाने त्रास दिला तर खिडक्यांचे पडदे टाकून किंचित निळसर शांत प्रकाश असू द्यावा आणि कुठलंही छान हळुवार संगीत लावावं, अंगाई गीत गावं. मग माझ्याकडे वळून त्या म्हणाल्या,” आईला गाता आलेच पाहिजे असा काही नियम नाही बरं का आईच्या आवाजातलं कुठलंही लडीवाळ गीत बाळाच्या मनाला शांत ठेवतं,झोपवतं.” असं बरंच काही त्या सांगत होत्या. मातृत्वाची चाहूल लागताच आम्ही बालसंगोपनाची, गर्भ संस्कारांची बरीच पुस्तकं आणली होती,वाचलीसुद्धा पण खरा बालसंगोपनाचा पहिला धडा डॉक्टर केळकरांकडूनच मिळाला,”मुळीच घाबरायचं नाही.” आणि तेव्हा आणि त्यानंतरही हळूहळू जाणवत गेलं की मातृत्व- पितृत्व- पालकत्व या पुस्तकातून वाचण्याच्या संज्ञा नाहीतच तर त्या अनुभवण्याच्या बाबी आहेत प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि त्या मुलाला वाढवताना कसलेही पुस्तकी निकष न लावता ते वाढताना बघणं, आणि त्या बघण्यातून त्या नव्याने घडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आई-बाबांना करून घ्यावी लागते आणि त्यानुसार आपल्यालाही घडावं लागतं.  मला अगदी आजही वाटतं आपण मुलांना घडवत असतोच पण एकाच वेळी मुलंही आपल्याला घडवत असतात आणि याचा अनुभव आनंदाने, गृहीतकांना सोडून तुम्ही घेतलात तरच तुम्ही चांगले पालकही बनू शकाल. मी आणि विलासने अगदी एकमताने तसेच वागायचे ठरवले.

मात्र त्या क्षणी विलासच्या खांद्यावर रात्री तापाने फणफणलेली आणि आता बरी झालेली ज्योतिका शांत झोपली होती. मिटलेले डोळे,गालावरची पापण्यांची सावली, तिचा गोड, पौर्णिमेच्या चांदोबा सारखा  गरगरीत  गुलाबी रंगाचा  चेहरा आणि दुमडलेला ओठ पाहून माझं उर इतकं भरून आलं होतं! किती विश्वासाने हा निरागस, निष्पाप गोळा आमच्या खांद्यावर विसावला आहे! तिच्या आयुष्यात आमच्यावरचा हा विश्वास कुठल्याही कृतीतून कधीही ढळू द्यायचा नाही हे आमच्या दोघांच्या जीवनातलं एक अधोरेखित ध्येय ठरलं.

आज हे लिहिताना आणि संसारात कर्तृत्व सिद्ध करून  रमलेल्या माझ्या दोन्ही कन्यांना मला विचारावेसे वाटते,” आम्ही चांगले आईबाबा झालो का??

आयुष्यात तुम्ही कितीही बक्षीसं मिळवा, कितीही ट्रॉफी जिंका पण खरी ट्रॉफी तीच असते जेव्हा आपली मुलं म्हणतात, “तुमच्यासारखे आई बाबा लाभले किती भाग्यवान आम्ही!” या इतकी श्रेष्ठ ट्रॉफी जगात कुठलीही नाही.

– क्रमशः भाग ५८ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची…! – भाग -1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची…! – भाग -1☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नेहमीप्रमाणेच मागच्या आठवड्यात अशाच एका रस्त्याच्या कडेला बसलो होतो…

संपूर्ण दवाखाना रस्त्यावर मांडला होता, औषधांचे डबे उघडून ठेवले होते, काही डबे एकावर एक रचून ठेवले होते. या डब्यांच्या शेजारी मी आणि माझ्या आजूबाजूला याचक आजी-आजोबांचा घोळका!

नुकताच पाऊस पडून गेला होता, रस्त्यावर चिखल झाला होता. पाणी आणि माती दोघंही आपापलं स्वतंत्र अस्तित्व सोडून एकमेकांत मनोमन मिसळून जातात, तेव्हा होतो तो चिखल!

…. ‘मी’पणा सोडून चिखल व्हायचं, यालाही धारिष्ट्य लागतच असेल की!

…. मग पाणी आणि माती का सोडत असतील आपापलं अस्तित्व?

त्यांनाही माहित असावं, नाजुक आणि मनमोहक फुलं चिखलातच फुलतात… फुलांना उमलू द्यायचं असेल तर कुणाला तरी चिखल व्हावंच लागतं!

…. आयुष्यात फुलणार्‍या प्रत्येकानं हे लक्षात ठेवावं… माझ्या फुलण्यासाठी कुणीतरी स्वतःचं अस्तित्व संपवलंय आणि ते पडले आहेत चिखल होऊन… तुमचं फुलणं पहात!

…… यापेक्षा भव्य दिव्य प्रेम कोणतं असू शकतं…???

तर, आमची रस्त्यावर नुसती गडबड सुरू होती. अशातच कुणीतरी एक व्यक्ती आली आणि सरळ माझ्या डब्यांवर पाय देऊन चालण्याचा प्रयत्न करू लागली. एकावर एक मांडलेले डब्बे कच्च्या बांधकामाच्या पुलासारखे कोसळले. आतल्या सगळ्या गोळ्या सांडून रस्त्यावर बेवारशासारख्या पसरल्या… पुरात कुटुंबं उध्वस्त होतात तश्या! डब्बे रस्त्यावरच पालथे पडले. त्यांची झाकणं वादळात छप्पर उडालेल्या घरासारखी उघडली गेली….. रस्त्यावर पडलेल्या एकेका गोळीत, आक्रोश करणारा चेहरा मला दिसत होता…

आणि मी नुसताच बघ्याची भुमिका घेत, सेल्फ्या काढणार्‍या मुर्दाडासारखा त्यांच्याकडे पहात होतो!

माझं खूप नुकसान झालं… मला राग आला चालणाऱ्या त्या व्यक्तीचा.

त्या व्यक्तीला मी रागानं म्हटलं,

“दिसत नाही काय रे तुला?”

…. ती व्यक्ती गडबडली, शरमली. आपल्या हातून काय झालंय ते त्या व्यक्तीला कळल्यावर हात जोडून माफी मागत म्हणाली,

“माफ करा सर, मी खरंच अंध  आहे!”

त्याचं हे वाक्य ऐकून मलाच मेल्याहून मेल्यासारखं झालं. तो खरंच ठार आंधळा होता. हातात अंधांची काठी आणि डोळे पूर्ण बंद.

चूक खरं तर माझीच होती, मी रस्त्याच्या कडेला असा उघड्यावर बसलो होतो… चालणाऱ्यानं चालायचं कुठून? उठून मीच त्याची माफी मागत, त्याचा हात धरून त्याला वाटेला लावण्याचा प्रयत्न केला.

बिचारा तोही पडता पडता वाचला होता… त्याच्या निर्जीव काठीनं त्याला सावरलं होतं!

म्हटलं, “कुठं जायचंय भाऊ? नीट सांभाळून जा!”

यावर तो म्हणाला, “ते भीक मागणार्‍यांसाठी काम करतात, ते डॉक्टर इथंच कुठंतरी बसतात आजच्या दिवशी; असं मला समजलं, म्हणून मी त्यांना भेटायला आलो होतो. कुठं भेटतील ते?”

मला आश्चर्य आणि गंमत वाटली.

माझं नाव न सांगता मी म्हणालो, “काय काम आहे त्या डॉक्टरांकडे तुझं?”

तो म्हणाला, “मला थोडं बोलायचं होतं त्यांच्याशी…”

माझी उत्सुकता वाढली. काय बोलायचं असेल याला माझ्याशी?

माझी ओळख सांगून म्हणालो, “बोला, काय काम आहे माझ्याकडे?”

हातातलं काम आटोपून मग त्याच्याशी बोलायला सुरुवात केली…

जन्मापासूनच हा अंध!

रेल्वे आणि बस स्टॅन्डवर काहीबाही वस्तू विकायचा. अशाच एका अंध मुलीशी त्याचं लग्न झालं. कालांतरानं याला एक गोड मुलगी झाली. कुठल्याशा एका कंपनीमध्ये त्याची पत्नी पॅकिंगचं काम करायची.

तसं सुरळीत चालू होतं…

पण मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा कहर झाला. रेल्वे, एस.टी. बंद पडली आणि याचं कामही.

एकट्या बायकोच्या जीवावर कसातरी संसार चालू होता. पण मधल्या काळात ही छोटी कंपनीसुद्धा बंद पडली, आणि तिचाही जॉब गेला. पैशाची आवक सगळीकडून बंद झाली. उपासमार होऊ लागली.

ज्या रूममध्ये ते भाड्यानं राहत होते त्या रूमचं भाडं थकलं. ‘अंध’ म्हणून घर मालकानं दोन महिन्यांचं भाडं घेतलं नाही, परंतु त्या पुढच्या महिन्यात तडजोड करण्यास घरमालकानं नकार दिला आणि हात जोडून दुसरीकडे कुठंतरी व्यवस्था करायला सांगितलं.

…. अचानक कुठं करायची व्यवस्था? काही कळेना…तिघांनी जगायचं कसं? काही कळेना…खायचं काय? काही कळेना…१४ महिन्यांची मुलगी… तिला जगवायची कशी? काही कळेना…

आणि मग सगळे मार्ग थकल्यावर, अनेकांच्या डोक्यात येतो तोच विचार याच्याही डोक्यात आला…

‘भीक मागावी का…???’

दोन-चार ओळखीच्या लोकांमध्ये हा विचार त्यानं बोलून दाखवला… आणि यातच त्याला माझं नाव कुणीतरी सुचवलं.

“अमुक वारी, अमुक ठिकाणी डॉक्टर असतो, त्याला भेट…”

.. आणि म्हणून आज हा इथं!

“सर, मला आणि माझ्या बायकोला काहीतरी काम द्या हो… नाहीतर भीक मागावी लागेल आम्हाला.” तो हातातली काठी मुडपत म्हणाला.

माझ्या डोळ्यासमोर अंध बांधवांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आल्या.

म्हणालो, “काय काम करू शकशील तू? म्हणजे तुला दिसण्याचा त्रास आहे ना…?” मी चाचरत विचारलं.

माझ्या आवाजाच्या रोखानं माझ्याकडं अंदाजानं बघत तो हसला; म्हणाला,

“सर, काम करायचं असेल तर डोळ्यांची काय गरज…? मी आणि माझी बायको आम्ही हाती पायी धड आहोत. एकदा आम्हाला काम शिकवलं की ते आमच्या मनात फिट्ट बसतं… मग आम्हाला डोळ्यांची गरजच उरत नाही!”

…… सर्व काही असूनही रडत बसणाऱ्या लोकांना हा फार मोठा फटका होता.

त्याच्याशी बोलताना माझ्या मनात अनेक प्रश्नांची गर्दी झाली…

“एक विचारू…? तुला अज्जिबात दिसत नाही?”

“नाही सर, मी जन्मापासून अंध आहे.”

“तु हे जग कधीच बघितलं नाहीस? माणसं… जनावरं… डोंगर… नदी… कधीच पाहिली नाहीस? तुला पांढरा, हिरवा, निळा हे रंग माहित आहेत?”

“नाही सर, मी हे कधीही पाहिलं नाही… पण इतरांच्या सांगण्यावरून ते कसे दिसत असतील, याची कल्पना आहे मला. रंगांची नावं फक्त ऐकली आहेत. पण ते ‘दिसतात’ कसे हे माहित नाही मला.”

.. काठीशी बोटांचा चाळा करत तो पुढं म्हणाला, “सात रंगांची नावं मी ऐकली आहेत… पण मला एकच रंग आवडतो– काळा! कारण डोळ्यापुढं सतत तोच असतो.”

…… तो भकास हसला, तिसरीकडे पहात.

“तुझी काठी कोणत्या रंगाची आहे माहितीये?”

“त्यानं काय फरक पडतो सर? ती मला साथ देते हे महत्त्वाचं!”

“तसं तर मी माझ्या बायकोलाही पाहिलं नाही, पण ती सुद्धा साथ देते…माझ्या आयुष्यात दोन बाबी महत्त्वाच्या… ही काठी आणि ती जीवनसाथी!” अंगठ्यानं जमिनीवर काहीतरी उकरत तो म्हणाला.

“तुझी पत्नी कशी दिसत असेल, असं तुला वाटतं?”

“ती खूप सुंदरच असणार सर, दुसर्‍याला सावरणारी कोणतीच गोष्ट कधीच कुरूप नसते!”

…… काठीला छातीशी लावत तो कसानुसा हसला. मनगटावर पडलेला डोळ्यातला थेंब, मागं हात नेऊन त्यानं पँटला पुसला.

माझ्याही अंगावर शहारा आला!

– क्रमशः भाग पहिला

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गणपती बाप्पांच्या मनातलं…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “गणपती बाप्पांच्या मनातलं…” ☆ श्री सुधीर करंदीकर

नुकताच आपण सगळ्यांनी गणपती उत्सव खूप आनंदाने आणि मजेत साजरा केला.

ह्या वेळच्या उत्सवाची माझी एक छान आणि believe it or not अशी आठवण ————-

गणपती उत्सव सुरू होण्याच्या आदल्या दिवशीची ही घटना आहे. उद्याची  सगळी तयारी झाली होती. सकाळी लवकर जाऊन बाप्पांची मूर्ती पण घेऊन आलो होतो.

माझ्या नित्य नियमाप्रमाणे सकाळी सकाळी टेबलवर चार वर्तमानपत्रे आलेली होती. माझे वर्तमानपत्रांचे पारायण सुरू होते, अधून मधून फेसबुक आणि वॉट्सअप कडे पण भटकंती सुरू होती. आणि गरमागरम चहा पण घेत होतो.

अचानक स्वयंपाक घरातून मस्त गोडसर असा सुंदर वास यायला लागला. बायकोला आवाज दिला आणि विचारलं – आज काय स्पेशल आहे? सुंदर गोड वास येतोय.

बायको – अहो उद्यापासून गणपती उत्सव सुरू होतोय.  रोजच्या संध्याकाळच्या प्रसादाकरता पंचखाद्य करते आहे.

मी सहजच मनात म्हटलं – गणपती बाप्पा तुम्हाला गोड आवडतं म्हणून प्रसादाकरता सुंदर पंचखाद्य तयार होतय, आणि रोजच्या सकाळच्या प्रसादाकरता मोदक, शिरा असे गोड पदार्थ असणारच आहेत.

आपल्या दारावर जसा टकटक आवाज येतो, तसाच काहीतरी आवाज देवघरामधून येतोय असा मला भास झाला. माझ्या काही लक्षात येईना. मी इकडे तिकडे बघत होतो, तेवढ्यात देवघरातून कुणीतरी बोलतय असं वाटलं, म्हणून देवघराकडे गेलो, आणि माझी शंका खरी ठरली. तिथूनच बोलण्याचा आवाज येत होता.

देवघरा मधून: मी गणपती बाप्पा बोलतोय

मी चांगलाच गडबडलो. मी स्वतःला दोन-तीन ठिकाणी चिमटे काढून बघितले. सगळ्याच ठिकाणी चिमटे जाणवत होते, म्हणजे मी शुद्धीवर नक्कीच होतो. म्हणजे देवघरातली आज आणलेली गणपतीबाप्पांची मूर्तीच बोलत असणार. मी वाकून नमस्कार केला.

देवघरातून: सुखी राहा. तुझा अंदाज बरोबर आहे. मीच गणपती बाप्पा बोलतोय.

मी पुन्हा वाकून नमस्कार केला.

गणपती बाप्पा: तुला कोणी सांगितलं की मला गोड आवडतं म्हणून

मी: तसं सांगितलं कोणीच नाही. पण फोटोमध्ये तुमच्या समोर मोदकांचं आणि गोड पदार्थांची ताटे असतात, सगळ्या गणपतीच्या देवळांमध्ये उत्सवाच्या वेळेस आणि रोजच गोड पदार्थांचा प्रसाद असतो, बऱ्याच पौराणिक कथांमध्ये पण तसा उल्लेख आहे. आम्ही आपलं तेच खरे मानून सुरू ठेवतो. आमचं काही चुकत असेल तर सांगा

गणपती बाप्पा: तुम्ही प्रसाद म्हणून मोदकाचे ताट माझ्यासमोर ठेवता, पण पूजा झाल्यानंतर किंवा आरती झाल्यानंतर मी खाल्ल्यामुळे काही मोदक कमी झाले आहेत कां?  किंवा लाडू कमी झाले आहेत, शिरा कमी झाला आहे, असं कधी बघितलं आहे कां ?

मी: नाही, तसं दिसलं कधीच नाही. आणि कुणी तसा विचार केला असेल असे पण वाटत नाही. सगळेच जण  देवासमोर नैवेद्य दाखवतात, आणि आरती संपली की लगेच त्याचे वाटप आणि खाण्यास सुरूवात होते. तुम्ही खाल्लाय का नाही, हा विचारच कोणाच्या मनात येत नसावा. तुम्हाला गोड खरोखरच आवडत नाही का!

गणपती बाप्पा:  आवडत नाहीच, असं नाही, पण मला गोड पदार्थांपेक्षा गोड माणसं जास्त आवडतात. माणसं  म्हणजे  स्त्री – पुरुष – मुलं – मुली असे सगळेच त्यामध्ये आले. गोड माणसे म्हणजे काय ते लक्षात आलं ना!

मी:   अर्थ समजेल असं लक्षात येत नाहीये

गणपती बाप्पा: गोड माणसं म्हणजे –

नेहमी गोड बोलणारी माणसं मला आवडतात. नुसतं वरवर गोड बोलणारी माणसं घराघरात आणि समाजात सगळ्याच थरांमध्ये आहेत. आपल्या बोलण्यामुळे समोरची व्यक्ती दुखावल्या जात असेल, तिला कमी लेखण्याचा प्रयत्न आपल्या बोलण्यात असेल, बोलण्यात अहंभाव म्हणजे मी आहे म्हणून सगळे आहे – असा भाव असेल,  तर या बोलण्याला गोड बोलणे म्हणत नाहीत. गोड बोलणं हे मनापासून असलं पाहिजे.

आपापसात गोडी निर्माण करणारी माणसं मला आवडतात. कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्याकडून होईल तेवढी मदत इतरांना करणारी माणसं सभोवार गोडी निर्माण करत असतात, ती मला आवडतात.

गोड स्वभावाची माणसं मला आवडतात. यांचा स्वभाव स्वच्छ असतो, मनामधे घमंड नसते, मनात कपट नसतं. मनात कुणाला फसवणे किंवा कोणाला फसवून आपला फायदा करणे हा विचार नसतो. कुणाला त्रास देणे,  मारहाण करणे, अशी यांची विचारसरणी नसते.

मला गोड हसणारी माणसे आवडतात. काही माणसांचे चेहेरे कायम एरंडेल तेल प्यायल्या सारखे असतात. मी त्यांना आतून सुचवत असतो, कि काळजी माझ्यावर सोडा, थोडे मोकळे व्हा, पण कुणाचं माझ्या सांगण्याकडे लक्षच नसत. खोटे हसणारी माणसे पण भरपूर आहेत. पण अशा लोकांच्या हसण्यात खळखळणारा गोडवा नसतो कारण त्यांच्या मनात गोडवा नसतो.

सर्वांगाने गोड असणारी माणसं मला आवडतात. प्रसाद – पूजाअर्चा – देवदर्शन हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. देवळामध्ये किंवा मूर्तीमध्ये देव बघण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्हाला देव बघता आला, तर तो तुमच्या मनाचा गोडवा, आणि ती तुमची खरी उंची.

माझ्या करता प्रसाद गोड ठेवला काय, किंवा तिखट ठेवला काय, किंवा आंबट ठेवला काय, मला काहीच फरक पडत नसतो, कारण मी यामधलं काहीच खाणार नसतो. तुम्हीच तो प्रसाद संपवणार असता. उत्तम तब्येतीकरता खरंतर गोड तिखट कडू आंबट खारट तुरट अशा सगळ्याच चवी थोड्या थोड्या प्रमाणात पोटात जाणे जरुरी असते. म्हणून नेहेमी अशा विविध चवींचे प्रसाद असावेत.

सार्वजनिक गणेशोत्सवामुळे लोक एकत्र येतात, मंडळांचे गणपती बघण्याकरता एकत्रपणे बाहेर पडतात, निरनिराळ्या क्षेत्रांमधल्या कलाकारांना आपली कला लोकांपुढे सादर करण्याची संधी मिळते. लोकांना पण आनंद मिळतो. काही मंडळांचे, काही सोसायटीं मधले कार्यक्रम खरोखरच सुंदर असतात आणि मला ते आवडतात. जिथे सगळेच लोक आनंदी असतात तिथे मला राहायला नक्कीच आवडते.

दुसरा विचार म्हणजे चतुर्थीला तुम्ही आपापल्या घरी माझी स्थापना करता आणि दीड दिवसांनी/५ दिवसांनी/अनंत चतुर्दशीला माझे विसर्जन करता. विसर्जन का करता हे मात्र मला समजत नाही, माझी तर राहण्याची इच्छा असते. सगळेजण विसर्जन करताना “गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या” गर्जना करत करत विसर्जन करतात. तुमच्या ‘लवकर या’ ह्याला प्रतिसाद म्हणून बऱ्याच वेळा तुमच्याकडे लवकर जावं अशी माझी इच्छा होते, पण येता येत नाही कारण पुढच्या वर्षीच्या भाद्रपद महिन्यातली चतुर्थी उजाडते तेव्हाच तुम्हाला माझ्या येण्याचे वेध लागतात.

विसर्जन करताना बरेच जण “गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला” अशा गर्जना करतात. खरं तर मला गावाला जायचंच नसतं कारण मलाच चैन पडणार नसते. असो,

माझी किंवा कुठल्याही देवतेची स्थापना तुमच्या घरात उत्सवाच्या स्वरूपात कायमस्वरूपी असावी असे मला वाटते, कारण त्यात तुमचाच फायदा आहे.

आता बघा, घरात दोघेजण असले तरी त्यांची तोंडे विरुद्ध दिशेला असतात, संवाद नसतो. घरात चार जण असले, तर तोंडे चार दिशेला आणि संवाद शून्य. अशा घरपणाला काय अर्थ आहे. गणपतीच्या दिवसात घरातली सगळी मंडळी आरतीच्या निमित्ताने एकत्र येतात, जवळपासचे नातेवाईक/मित्रमंडळी पण मुद्दाम घरी येतात, मनोभावे देवाची पूजा होते, आरती होते, पौष्टिक पदार्थांच्या प्रसादाची देवाणघेवाण होते, एकमेकांची चौकशी/ विचारपूस होते. आणि त्यावेळेस सगळ्यांच्याच चेहऱ्यावरती मला निख्खळ आनंद दिसत असतो. आणि यालाच घराला घरपण आहे असे म्हणतात. किती मोठा प्लस पॉईंट आहे हा तुमच्याकरता.

तुम्ही घरामध्ये वर्षभर म्हणजे कायमस्वरूपी गणपतीची स्थापना ठेवली, तरी, मी घरात आहे म्हणून तुम्हाला वेगळे असे काहीच करावे लागणार नाही. तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल, तर नेहेमीप्रमाणे तुम्ही घराला कुलूप लावून जाऊ शकता. मला घरातून बाहेर जाण्याकरता किंवा आत येण्याकरता घराचे दार उघडे पाहिजे असं काहीच नाही. रोज आरती/पूजा/फुले/प्रसाद पाहिजेच असे पण काही बंधन नाही. मी उत्सवाच्या स्वरूपात कायम  घरात असलो, कि, घरातल्या सगळ्यांच्या सोयीने ठराविक वेळेला सगळेजण रोज एकत्र येतील, महिन्यातून एक दिवस/पंधरा दिवसातून एक दिवस मित्रमंडळी, गावातले नातेवाईक एकत्र येऊ शकतील. संवाद होईल, गप्पा होतील. सगळेजण मोबाईल, टीव्ही बंद करून पूजा/आरती करतील, एकमेकांची विचारपूस करतील. सगळ्यांना आवडेल असं काहीतरी प्रसाद म्हणून एकत्र बसून खाणे होईल. आणि याच बांधिलकीनी तुमच्या घराला कायमस्वरूपी घरपण येणार आहे.  घराला घरपण आलं की तुमच्या मध्ये आपोआपच गोडी निर्माण होईल. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे मला गोड पदार्थांपेक्षा गोड माणसं आवडतात. ट्यूब पेटते आहे का?

मी: बाप्पा, असा विचार माझ्या तर कधी डोक्यात आलाच नाही. मी तर नक्की यापुढे असेच करणार आणि यावर थोडं लिहून ते ओळखीच्यांना पण कळवणार हे नक्की

गणपती बाप्पा: तथास्तु

मी एकदम तंद्रीतून जागा झाल्यासारखा जागा झालो. गणपती बाप्पा ने सांगितलेले सर्व  विचार माझ्या डोळ्यासमोरून जायला लागले.

मी माझे गणपती बाप्पा बरोबरचे हे बोलणे बायकोला/मुलींना सांगितले, काही मित्रांना फोन करून सांगितले. पण घरातले गणपती बाप्पा बोलले आणि ते पण चक्क माझ्याशी, ही विश्वास न बसण्यासारखीच गोष्ट असल्यामुळे कोण विश्वास ठेवणार! तुमचाही कदाचित विश्वास बसणार नाही.

असो, आपल्या घरातल्या सगळ्यांनी गोड व्हावे हे तर नक्कीच सगळ्यांना पटण्यासारखे आहे. बरं  गोड माणसं सगळ्यांनाच आवडतात हे सत्य आहेच. आणि जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला हे पण आपण जाणतोच. आणि याकरता करायचे काय आहे? तर घरामध्ये बाराही महिने गणपतीची स्थापना! आणि ती कशी! तर, घरातल्या सगळ्यांनी कायम गोड बोलून, गोड वागून, गोड हसून.

चला तर मग –

गणपती बाप्पा मोरया…

नेहमीच आमच्या घरात राहा…

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रंगांच्या रानात हरवले… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? मनमंजुषेतून ?

☆ रंगांच्या रानात हरवले… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

खरंच! आपल्याला नुसत्याच काळ्या-पांढऱ्या,किंवा कुठलाच रंग न ल्यायलेल्या जगात वावरायला आवडेल का? नाही नं! बरोबरच आहे.अशा बेरंगी आयुष्यात रमायला कुणाला बरं आवडेल? कारण मानवी जीवनच मुळी रंगीबेरंगी नवरसांनी नटलेले आहे.

आकाशाच्या निळ्या रंगाचे तर लहानपणापासून कोण कौतुक! चित्रकलेची वही घेऊन बसल्यावर वेडे वाकडे का होईना निळ्या आकाशाचे ब्रशचे फर्राटे मारल्याशिवाय समाधानच मिळत नसे.उगवतीचा केशरी सूर्य, हिरव्या डोंगरामधून उगवला की मगच निळ्या आकाशाचे चित्र पूर्ण होत असे.हळूहळू त्या आकाशात प्रेमाचे गुलाबी रंग केव्हा भरल्या गेले ते कळलेच नाही.

कृष्णाचा रंगही निळासावळाच नाही का? कृष्णाच्या बालरूपा पासून,राधा, द्रौपदी सोबत असलेल्या सगळ्या रुपातला कृष्ण आवडतोच नं!त्या निळ्याने रुक्मिणी, सत्यभामे सोबत केलेली प्रीती ही आवडते आणि अर्जुनाला सांगितलेली गीताही आवडते.कृष्णाच्या जीवनात तरी किती रंग भरलेले होते! म्हणूनच त्याला विविध रंगांची उधळण केलेलं मोरपीस आवडत असेल.आपल्यालाही आवडतंच नाही का?

नेहमीच्या करड्या रंगातल्या पक्षापेक्षा निराळ्या रंगाचा पक्षी दिसला की त्याच्या मागे धावतोच आपण! पृथ्वीवरच्या येवढ्या मोठ्या बागेत नाना रंगांचे पक्षी आकर्षित करतात आपल्याला मग आपणही आपल्या छोट्याशा बागेत,घरात बंदिस्त करू बघतो त्यांना! हरवून जातो सगळ्या रंगात!

आपण कितीही म्हटले ‘श्रावणात घन निळा बरसला’ तरी निळा घन मात्र कधी बरसत नाही.त्याला काळं सावळं व्हावचं लागतं! ‘घनश्याम श्रीधर’  पण सुंदरच असतो नं!तो मेघश्याम घन घनदाट होऊन काळ्याभोर धरणीला प्रेम सरींनी न्हाऊ घालतो तेव्हाच हिरवे हिरवे अंकुर जन्माला येतात आणि ते काळ्या आईच्या अंगावर डोलत झुलत खेळताना बघून आपल्यालाही किती आनंद होतो नाही!

पावसाळ्यात तर अवघी सृष्टी  हिरवाईने नटलेली असते.जिकडे तिकडे निसर्गात भरलेले हिरवे रंग बघून आपल्याही मनात स्वप्नांचे पक्षी उडायला लागतात.तो हिरवा रंग आणखी कशा कशात रंग भरतो? उगवलेल्या भाज्या, धान्य इ.त निरनिराळे रंग भरून क्षुधेच्या यज्ञकुंडाला शांत करतो.

क्षुधाग्नी एकदा शांत झाला की मनात प्रीतीचे एकेक रंग तरंगायला लागतात.मग हेच रंग लेखक, कवींच्या झरणीतून झरायला लागतात आणि निरनिराळे सुंदर शब्दचित्र आपल्यापुढे उभे करतात.काव्य, शास्त्र,विनोदात रमणारे मन प्रफुल्लित होते.तर कुणी तेच रंग ब्रशवर घेऊन प्रति निसर्ग चितारून आपल्याला नेत्रसुख देण्याचा प्रयत्न करतात.आपल्याही मनाचा पक्षी  त्यात हरवून आणि हरखून जातो नं!

जीवनाचा शेवटचा रंग आपल्याला उचलून नेणारच असतो.तोपर्यंत परिसरातील अवघे रंग वेचून आपल्या मागे सगळ्यांना आपली आठवण राहील असे काही तरी चितारून जाता येते.आता ते चित्र चांगले रंग घेऊन सुंदर करायचं की वेडे वाकडे ब्रश फिरवून कुठलाही रंग कुठेही मिसळून कुणाचं सुंदर असलेलं रंगविश्व उधळून जायचं, हे मात्र ज्याच्या त्याच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares