मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गंजी – –” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “गंजी – –” ☆ सुश्री शीला पतकी 

कामवाली बाई सकाळी आली आणि म्हणाली “बाई नवऱ्याला काही खाता येत नाही…..पाच सहा महिन्यापूर्वी त्याचं कॅन्सरचे ऑपरेशन झाले जबड्याचे… त्याला पुढे फिजिओथेरपी न दिल्यामुळे सगळेच स्नायू आखडलेत त्यामुळे त्याला गिळताना त्रास होतो  काही खाता येत नाही.”

मी म्हणाले,”थांब तुला गंजी करून देते ज्वारीच्या पिठाची”. अर्ध पातेलं गंजी करून तिला मी दिली तिने बागेत काम करत असलेल्या नवऱ्याला ती दिली. थोड्या वेळाने आल्यावर ती म्हणाली,”बाई पोट भरल्यावानी झालं बघा त्यांचं, तुम्हाला कसे येते गंजी वगैरे”. मी म्हणाले, “अगं माझ्या वडिलांचा आवडता पदार्थ होता”… “तुम्ही काय काय शोधून काढता बघा “.. मी म्हणाले, “तुझ्यासारखं नाही, स्वयंपाक शून्य आहेस कि ग नातवंड झाली तरी काही जमत नाही तुला बाईच्या जातीला चार पदार्थ आले पाहिजेत मी कुठे कधी स्वयंपाक केला पण बघून बघून सगळे येते मला” गंजी कुठे बघितली तिने विचारलं आणि मला आठवलं वडिलांनी सांगितलेले गंजीचे किस्से….

मी हुशार असल्यामुळे वडिलांबरोबर नकलांचे कार्यक्रम वगैरे करत असल्यामुळे घरात जरा जास्त लाडकी होते. माझ्या जेवणाच्याही कटकटी खूप असायच्या आणि आताही आहेतच एकदा मी असंच आईला म्हणाले,”काय आहे ग कसलं जेवण आम्ही एवढे बाहेर मर मर कष्ट करायचे घरी साधे जेवण सुद्धा नीट नाही “….खरं तर आज कळते ते किती सुंदर जेवण होते. वडिलांनी मला जवळ बसून घेतले आणि सांगितलं” हे बघ बाळा मी सतरा वर्षाचा होतो तेव्हा तुरुंगात गेलो एका व्यासपीठावरती टिळक चौकात भाषण केलं आणि मला त्याच्यात पहिली सहा महिन्यांची शिक्षा झाली. तुरुंगात सकाळी उठून कैद्यांना झाडलोटेची काम करावी लागायची त्यानंतर त्यांना नाष्ट्यात गंजी हा प्रकार मिळायचा आणि वरिष्ठ नेते  किंवा इन्कम टॅक्स भरणारे माणसं.. त्यांना दूध मिळायचं.  आम्ही गंजी गटात होतो.

गंजी म्हणजे पाण्यामध्ये मीठ आणि जिरे टाकून पाणी उकळवायचे आणि त्यात ज्वारीचे पीठ पाण्यात कालवून शिजवायचे त्याला तिखट नाही फोडणी नाही तेल नाही असाच पटकन होणारा तुरुंगातला सार्वजनिक पदार्थ. सर्वांना एक मोठा वाडगा भरून गंजी मिळायची. त्यानंतर आमच्या बराकितल्या इथल्या दोघा जणांना दररोज सकाळी दोन पायली दळण दळावे लागे मी खेड्यातला राकट होतो त्यामुळे तेवढ्या लहान वयात मी ते दोन पायली दळण दळत असे.एका जात्यावर दोघांनी उभे राहून दळण दळायचे. अडीच तीन तास त्या दळण्यासाठी लागत असत दिवस भर इतकी धडपडीची मेहनतीची कामे केल्यानंतर अगदी तरटावर ही गाढ झोप लागायची आणि सकाळी दिली जाणारी गंजी अमृततुल्य वाटायची त्याचं कारण कोवळ्या वयातली पोटात पडणारी आग आणि ती भूक सतरा अठरा वर्षाच्या त्या पोराला ते शिजलेलं पीठ पोटात घालून काम करावे लागायचं तरीही आम्ही तो आनंद मानायचा कारण…. आम्ही देशासाठी हे सगळं सोसत होतो. देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून हे करत होतो… हे एक उर्मी होती…आणि आमच्यापैकीच काही बांधवांनी बनवलेली ती गंजी होती.

गंजी तुरुंगाच्या पाठीमागच्या मोकळ्या जागेत चुलीवर लाकडं खाली लावून बनवली जायची तीन-चार जण ती घोटत राहायचे कधी त्यात वरच्या झाडाची पानं पडलेली असायची पीठ चांगलं नसेल तर पिठातही अनेक गोष्टी त्यात सापडायच्या त्या सहज बाजूला काढून आम्ही गंजी पिऊन टाकायचं पिणे नाकारणे आम्हाला परवडणाऱ नव्हते… पोटात प्रचंड भूक असायची. पुढे दोन पायलीचे दळण दळावयाचे असायचे त्या श्रमासाठी ती गंजी इतकी गोड लागायची मग पुढे तुरुंगात खूप गर्दी झाली तेव्हा आम्हा अगदी तरुण असणाऱ्या मुलांना बी ब्लॉक मध्ये  टाकलं त्यात यशवंतराव चव्हाण स. का   पाटील यासारखे दिग्गज नेते मंडळी होती त्यांना मात्र दूध मिळायचे कारण पाटील तर इन्कम टॅक्स भरत होते पण आम्हाला गंजीच आवडत होती गंजीने पोट भरत होते ग्लासभर दुधाने नाही तेव्हा जे अन्न मिळतं ते नाव न ठेवता खायचं देश स्वतंत्र झाला असला तरी समृद्ध झालेला नाही! अजून आपल्या सगळ्यांचा विकास व्हायचाय लोकांना हेही मिळत नाही” शेवटची दरडावणी जोरात असायची आणि मुकाट्याने समोर येईल ते आम्ही खात असू!

तुरुंगातली आठवण म्हणून आमच्या घरी कधी वडिलांची खास फर्माईश असे “शांता आज तुरुंगासारखी मस्त गंजी बनव”… आम्ही चेष्टेने त्याला म्हणायचं म्हणजे झाडाची पानं वगैरे टाकू दे का दादा आणि मग तुरुंगातल्या अनेक आठवणी काढत सकाळी प्यालेली ती गंजी सकाळ गोड करून जायची..!आजही वडिलांची कधी आठवण आली तर एक वाटीभर गंज करून पिणे हा उपाय असतोच. पण सतरा अठराव्या वर्षी  भुकेची आग पोटात धगधगत असतानाही देश प्रेमाची ज्योत मनात तेवत ठेवून इंग्रजांनी दिलेली ती निकृष्ट प्रतीची गंजी पोटात घालून देश प्रेमासाठी शिक्षा भोगणाऱ्या माझ्या वडिलांचे स्मरण होते आणि देशा प्रतीच्या कर्तव्याची जाणीव ही…..! अखंड आयुष्य तुमच्या एकेका कृतीचे स्मरण करावे असा बाप आम्हाला लाभला ही परमेश्वराची कृपा आहे तुमच्या या स्मरणाने आम्हाला या देशासाठी या समाजासाठी काही करण्याची प्रेरणा मात्र नक्की मिळते बरं दादा! तुमची ही लाडकी लेक तुमचा हा विचार किंबहुना तुमच्या सगळ्या पिढीचा विचार पुढच्या पिढीत नक्की पेरत राहणार आहे.

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अलीबाबा आणि चाळीस चोर…! ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ अलीबाबा आणि चाळीस चोर…! ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

– – माझ्यावरील पहिला आणि शेवटचाच खटला

आजवरच्या प्रवासात म्युजिक शो प्रोड्युसर, इव्हेंट मॅनेजर, अँकर, पत्रकारिता अशा विविध टप्प्यावरून आलो. त्यात अनुभवलेल्या पडद्यामागच्या काही अनोख्या किश्यांची ही सिरीज….

सुमारे तीस पस्तीस वर्षांपूर्वीची हि घटना आजही आठवली तर जाम हसू येतं… पण तेव्हा मात्र थोडी टरकली होती आणि त्यातून कसा मी कसा वाचलो त्याचीच हि चित्तरकथा….

त्यावेळी पुण्यातील संध्या दैनिकात प्रमुख वार्ताहर म्हणून काम करत होतो. मालक व माझे पत्रकारितेचे गुरु होते भीष्माचार्य वसंतराव काणे. आज पुण्यातले जे जे मोजके नामवंत पत्रकार आहेत त्यापैकी बहुतेकांना तयार करण्याचे काम वसंतरावांनी केलंय! खाजगीत त्यांना आम्ही तात्या म्हणायचो.

त्यावेळी तरुणाईचं रक्त माझ्या अंगात सळसळत असायचं, त्यामुळे फिल्डवर जाऊन धमाकेदार बातम्या मी आणायचो. रचनात्मक आणि समाजोपयोगी कार्य शोधून काढून लोकांसमोर ठेवायचो. त्याबद्दल त्याकाळात राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारही मिळाले

मात्र त्याचबरोबर खटकणाऱ्या गोष्टी, भ्रष्टाचार यावरही बेधडकपणे (मात्र पुराव्यासह) लिहायचो आणि त्याबद्दल त्या त्या लोकांवर कारवाईपण व्हायची.

त्याचवेळी माझ्या हाती एक टीप लागली की पुण्यातील एका प्रसिद्ध देवस्थानात अभिषेकाच्या नावाखाली गोलमाल सुरु आहे. ते खरेखोटे पाहण्यासाठी मी स्वतः तिथं एक साधा भक्त या नात्याने जाऊन अभिषेकाच्या दोन पावत्या फाडल्या. आणि विचारलं की, माझा हा अभिषेक कधी होईल? कारण वेटिंग आहे. त्यावर तो कर्मचारी म्हणाला, “दहा दिवसांनी होईल आणि तुम्हाला प्रसाद घरपोच येईल.”

*

आणि त्याप्रमाणे पोस्टाद्वारे तो प्रसाद बाराव्या दिवशी मला घरी मिळाला.

मी खुश कारण माझ्या हाती आता पुरावा लागला होता. तो असा की, मधल्या काळात मी तिथल्या इतर कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे चौकशी करून माहिती घेत होतो. की इथं एकूण किती पुजारी आहेत? त्यातले अभिषेक कितीजण करतात? रोज सकाळी साधारण किती अभिषेक होतात? इत्यादी इत्यादी!

आणि मग शाळेत शिकवलेलं “काळ – काम – वेग” याच गणित मांडले तर माझा अभिषेक दहाव्या दिवशी होऊच शकत नव्हता तरी बाराव्या दिवशी “तुमच्या नावाने अभिषेक झाला” असं म्हणत प्रसाद घरी आला होता. त्यांच्या वेटिंग लिस्ट आणि रोजचे होणारे अभिषेक याचे गणित मांडले तर माझा नंबर सहा महिन्यांनी लागायला हवा होता जो दहाव्या दिवशी लागला!

याचाच अर्थ कळत नकळत भक्ताची मानसिक फसवणूक होत होती हे उघड आहे. शिवाय मी दोन वेगळ्या रकमेचे अभिषेक मुद्दाम करून पावत्या घेतल्या होत्या. एक पन्नास रुपयांची आणि एक शंभर रुपयांची…. तर पन्नासच्या पाकिटात जे मला आले त्यात फक्त एक वाढीव पेढा शंभरच्या पाकिटात होता म्हणजे वाढीव पन्नास रुपयात वाढीव काय मिळाले तर एक पेढा????

ये बात कुछ हजम नही हुई!

आणि मग मी सरळ त्यावर बातमी लिहिली, तीही फ्रंट पेजवर… ठळक अक्षरात….

“पुण्याच्या xxxx मंदिरातील…. अलिबाबा आणि चाळीस चोर”

*

दुसऱ्या दिवशी पुण्यात सगळीकडे खळबळ….. काही मंदिराचे विश्वस्त माझे मित्र होते त्यांचे धास्तावून मला फोन येणे सुरु झाले की त्या फुल्या फुल्या च्या जागी आमचे तर मंदिर नाही न?”

हसून मी त्यांना नाही सांगायचो. पण ज्या मंदिराबद्दल लिहिले होते त्यांच्याकडून मात्र फोन आला नाही तर थेट चार दिवसांनी वकिलाची नोटीस आली आणि माझ्यावर केस दाखल झाली असून मानहानीचा दहा लाखाचा दावा केला असून त्यासाठी कोर्टात हजर राहा” असं बजावण्यात आलेलं!

खरेतर जे मी छापले ते सत्य होते पण तरी पहिलाच असा नोटीस आणि कोर्टाचा प्रसंग असल्याने थोडासा टरकलो. म्हंटल… आपला पगारच तीन हजार रुपये…. केस हरलो तर दहा लाख देऊ कुठून?

स्वतःला जरी विकलं तरी इतके पैसे कोणी दिले नसते!

*

शेवटी भीत भीत मी तात्यांच्या केबिनमध्ये गेलो. तोवर त्यांच्याही कानावर हे सगळं गेलं होत पण मी आत गेल्यावर पाहतो तर ते शांत होते. मिश्किल हसत म्हणाले, “काय प्रताप करून ठेवला?”

मग मी जे काही घडलं आणि लिहिलं ते सविस्तर सांगितलं. त्यांनीही ते ऐकून घेतलं आणि पाच मिनिटं विचार केल्यावर म्हणाले…..

“कोर्टात जाशील तेव्हा मी सांगतो ते एकच वाक्य म्हण… काम होऊन जाईल अन तू सुटशील”

*

त्यांनी सांगितलेलं वाक्य खरेतर मला खटल्यातून सोडवेल असं वाटत नव्हतं. पण गुरु सांगत आहेत म्हणजे तथ्य असेल असं म्हणत….. कोर्टात हजर झालो.

माझ्या नावाचा पुकारा झाला.

मी उभा राहिलो. समोरच्या विरुद्ध पार्टीचे वकील त्या मंदिराच्या मुख्य अध्यक्षांना घेऊन आलेले. ज्यांनी स्वतः हा खटला भरला होता.

वकिलांनी त्यांची बाजू मांडल्यावर मला कोर्टाने (म्हणजे मा. जज्ज साहेबानी) विचारलं…

“काय हो… हे खरं आहे का? त्यांना तुम्ही चोर म्हटलं आहे “

मी म्हणालो, “हो खरं आहे., पण यात अध्यक्षांची बदनामी कशी काय झाली? मी काय म्हणालो आहे…. अलीबाबा आणि चाळीस चोर…. म्हणजे मी याना अलीबाबा म्हटलं आहे आणि कथेमध्ये तो अलीबाबा तर हुशार असतो. मी याना हुशार म्हणालोय तर बदनामी कशी झाली?

*

कोर्टात एकदम हशा उसळला!

*

यावर समोरचा वकील म्हणाला, “हरकत नाही, पण तुम्ही चाळीस चोर तर म्हणाला न? अन आमच्याकडे चाळीस कर्मचारी आहेत. त्यांना तुम्ही चोर म्हटलं असं गृहीत धरून मग त्यांच्यातर्फे खटला नवा उभा राहू शकतो”

आता माझी झाली पंचाईत… कारण तात्यांनी तर फक्त एकच ते वाक्य दिले होते! ती ढाल वापरून झाली पण आता काय करू? मात्र एकदम मला आठवलं की मधल्या काळात मी तिथं किती लोक काम करतात हे काढलं होत तर कळलं होत की पगारावर (म्हणजे मस्टरवर) पस्तीस असून पाच जण बिगारी (म्हणजे काँट्रॅक्टवर) आहेत.

ते आठवून जज्ज साहेबाना म्हटलं, “साहेब तरीही यांच्याच कर्मचाऱ्यांना मी चाळीस चोर म्हटलं हे लागू होत नाही कारण यांच्याकडे म्हणायला चाळीस जण आहेत पण मस्टरवर पस्तीसच आहेत. बाकी पाच बिगारी आहेत आणि त्यामुळे ते लेबर ऍक्ट नुसार तिथले स्थायी कर्मचारी धरले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे तोही मुद्दा लागू होत नाही! (लॉ शिकणारे माझे काही मित्र होते त्यांच्याशी कायम संपर्क असायचा त्यातून मिळालेले हे एक ज्ञान मला त्यावेळी कामाला आले)

*

माझ्या या उत्तरावर  कोर्टातले उपस्थित लोकही हसायला लागले इतकेच नव्हे तर जज्जला पण हसू आवरेना!

आणि त्यांनी एका क्षणात केस डिसमिस केली…. आणि मी निर्दोष सुटलो!

*

दुसऱ्या  दिवशी या खटल्याची आणि माझ्या नावासह “अलीबाबा चाळीस चोरांचा खटला अशा रीतीने निकाली” अशा बातम्या झळकल्या!

*

मी नंतर ऑफिसवर येऊन तात्याच्या चक्क पायावर सपशेल आडवा होत दंडवत घातला तेव्हा त्यांनी जवळ घेत अजून एक मंत्र दिला,

“अरे कुणाबद्दल कितीही पुरावे असले तर त्याच्या नावासकट बातमी देऊ नये. बातमी तर द्यायची पण  नाव न घेताही कुणाबद्दल ती आहे हे लोंकाना कळलं पाहिजे अशी लिहायची… म्हणजे समोरचा माणूस खटला तर भरू शकत नाही आणि आपलं तर लोकांपुढे सत्य आणायचे काम होऊन जाते! कारण आपल्याला बातमीदारी करायची आहे… कोर्टात हेलपाटे घालत बसायला आपल्याला वेळ आहे का?”

*

आणि हा मंत्र लक्षात ठेवून नंतर मी त्या पद्धतीने बातम्या द्यायला सुरु केल्या.

आणि मग कधी खटल्याची पाळी आली नाही!

अशी हि चित्तरकथा!

कशी वाटली…. आवर्जून सांगा!

© डॉ. धनंजय देशपांडे  

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिकवणारे आम्ही.. शिकलो तिच्याकडे ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ शिकवणारे आम्ही.. शिकलो तिच्याकडे डॉ. माधुरी जोशी 

काल अचानक फोन आला शोभना भिडेचा….आता ती पटवर्धन आहे आणि पंढरपूरला असते.ती माझी कन्याशाळेतली विद्यार्थिनी…. माझ्याकडे काही काळ शिकलेल्या गौरी पाठारेचं पंढरपूरला गाणं झालं…ते रंगलेलं सुंदर गाणं आणि गुरुंच्या नावात माझा उल्लेख ऐकून खूप आनंदाने,प्रेमानं,सुरेल जुन्या बंधानं… आदरानं भारून भिडेनं फोन केला.मला आनंदच झाला…पण तो आनंद शोभना केवळ विद्यार्थिनी होती म्हणून नाही तर तिचा तसा आगळा ठसाच आहे मनावर… खूप खोल…कधी पुसला न जाणारा….कारण ती जे वागली ते थक्क  अचंबित करणारं होतं…तिचं अद्भुत धैर्य, कमाल प्रामाणिकपणा,मनाचा समतोल आणि तिनं शाळेसाठी खेचून आणलेलं यश…त्यांची ही गोष्ट….

१९८५….ना.दा.ठाकरसी कन्या शाळा….तिसऱ्या मजल्यावरच्या हॉलमधे आसनं, सूर्यनमस्कार स्पर्धेची जोरदार,शिस्तबद्ध प्रॅक्टिस चाले.माझी मैत्रीण उज्वला बापट अनेक वर्ष जीव तोडून तळमळीनं प्रत्येक मुलीचं प्रत्येक आसन, सूर्य नमस्कार अगदी बिनचूक करून घेत असे… छान झालं की कौतुक करत असे.तिला अनेक वर्षांचा अनुभव, अभ्यास होता.वाटेल तेवढं कष्टायची तयारी होती.तिच्यामुळे शाळा कायम अजिंक्य राहिली.त्यावर्षी पण तेच घडणार होतं.

ती आसनं, नमस्कार कंडक्ट करायला एक लीडर असे.अचूक लयबद्ध ऑर्डर्स देणारी,सावध,कुणी चुकलंच तर पटकन दुरूस्त करणारी,बनलेल्या आकृतीचा बॅलन्स सांभाळणारी….लीडरचा आत्मविश्वास, धीटपणा, समयसूचकता,तत्परता हे गुण महत्वाचे… आणि या सर्व गुणांनी परिपूर्ण होती शोभना भिडे… सुंदर,गोड चेहऱ्याची,नितळ गोरी, निरोगी गुलाबी गालांची,घारे डोळे,लांबसडक केस….नुसतं दिसणं नाही तर अभ्यासातही हुषार अशी शोभना कष्टांनी,जिद्दीनी, प्रामाणिकपणानी आपली जबाबदारी पार पाडत होती.या स्पर्धेत शाळेला आणि उत्तम लीडरला पुरस्कार असे.कन्याशाळा,बापट आणि चषक असं गणितच होतं जणू‌…

दुसऱ्या दिवशी सकाळी स्पर्धा होती.म्हणजे आजची प्रॅक्टिस अगदी चोख,वेळेत, अचूक व्हायला हवीच होती.नेहमीसारखी शाळा भरली.स्पर्धेच्या मुली प्रॅक्टिससाठी हॉलमधे गेल्या….पण भिडे शाळेत आलीच नाही.खरंतर ती जबाबदारीनं वागणारी शहाणी मुलगी….असं काय हिचं?आजचा सराव तर सगळ्यात महत्वाचा….घड्याळ दुपारकडे सरकलं तरी तिचा पत्ता नाही..बापटचा पारा चढणं स्वाभाविक होतं.काही निरोप नाही…असं कसं वागू शकतात मुली…भिडे शाळेजवळंच रहायची…शेवटी चिडून, वैतागून बापट तिच्या घरी गेली.जेमतेम अर्धा पाऊण तास झाला असेल.बापट शाळेत परत आली…पण तिचा चेहरा पार बदलला होता…हताश,हतबल,दुःखी…..तिनं जे सांगितलं ते ऐकून सगळा स्टाफ गलबलला.बापट  भिडेच्या घरी पोहोचताना तिला जरा वेगळी, गंभीर,शांत गर्दी दिसली.मनात अशुभाची पाल चुकचुकली… वाड्याच्या दाराशी तिला कळलं….भिडेची आई गेली होती आणि नेण्याची तयारी अंगणात चालू होती.बापटला हा धक्का  होता.तिच्या पायातलं बळंच गेलं.भिडेच्या न येण्याचं इतकं गंभीर कारण मनात येणं अशक्यच होतं….बापट उद्विग्न मनस्थितीत परत आली.

मुली वाट पहात होत्या.कारण स्पर्धा तर होणारच होती.आता काय करायचं? दुसरी लीडर कुठून आणायची? स्पर्धा सोडून देणं एवढाच पर्याय होता.तेवढ्यात एक काळी सावळी स्मार्ट मुलगी टीचर्स रूममध्ये आली.शाळेत एव्हाना मुलींना हे कळलं होतं. बापटला म्हणाली,”बाई,मी रोज प्रॅक्टिस पहायला येते.भिडे कधी,कशा,कोणत्या ऑर्डर्स देते ते मला माहिती आहे.मी करू का लीडरशीप….तुम्ही सांगा ना चुकेल ते…मी लक्षात ठेवीन.” हे सगळं खूप अनपेक्षित, अद्भुत,धिटाईचं आणि जरा धोक्याचच होतं.पण ती म्हणत्येय तर एक प्रॅक्टिस पाहू करून असं बापटनी ठरवलं.हा एकच पर्याय हातात होता….आज नाव आठवतं नाही त्या मुलीचं याची खंत वाटते….पण ती मुलगी कमाल होती.तिनं आत्मविश्वासानं, अचूक ऑर्डर्स दिल्या.अगदी परीक्षकांना देतात तसा सॅल्युट देखील ठोकला.हॉलमधे…सगळं शॉकिंगच होतं..पण उद्याची स्पर्धा पार पडू शकणार होती.मुलींना धीर आला.परीक्षकांना हे गंभीर कारण सांगून लीडर बदलायला परवानगी मागायची असं ठरलं…. यशाची मात्र साशंकता होती कारण शाळेत प्रॅक्टिस झाली तरी प्रत्यक्ष मैदानावर काय होईल याचा अंदाज बांधणं अवघड होतं.

स्पर्धा सकाळी होती.रिझल्टही लगेच लागत असे.नेहमीसारखी शाळा भरली.सगळ्यांच्या मनात स्पर्धेचेच विचार होते.तेव्हा मोबाईल वगैरे नव्हतेच….मुली परत आल्याशिवाय काही कळणार नव्हतं…. उत्सुकता शिगेला पोहोचली होती.शाळा भरून तासभर झाला.आणि आनंदानें ओरडत,आरोळ्या देत जल्लोष करत मुली आल्या आणि यशाची बातमी आपोआप दरवळली.शाळेचा पहिला नंबर आला होता आणि बेस्ट लीडरचं पारितोषिक पण मिळवलं पोरींनी….त्या नव्या लीडरचं कौतुक करायला शिक्षक व्हरांड्यात आले….. आणि त्या टीम पुढे होती शोभना भिडे….सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण बेस्ट लीडरचं बक्षिस भिडेला मिळालं होतं.हे कसं झालं?…

झालं होतं असं की आईचा अंत्यसंस्कार करून सारे घरी आले.कुणी दिलेलं भात पिठलं खाऊन सारे आपापल्या घरी गेले.संध्याकाळ अधिकच भयाण झाली.तेंव्हा भिडे भावाशी बोलली..,” दादा आई तर गेली.ती परत येणार नाही कधीच….पण मी उद्याच्या स्पर्धेची जबाबदारी टाळलेली तिला स्वर्गात ही आवडणार नाही.मी जाऊ का सकाळी….माझ्यावर मुली,बापट बाईंच्या आशा आहेत.कोण करील रे लीडरशीप एका दिवसात?” भाऊ पण तिचाच…तिच्यासारखा….घरात सगळं बोलला आणि रात्री दोघं बापट बाईंच्या घरी गेले…बापट चिंतेनं, मनाशी निराश झालेली,थकलेली होती.इतक्या रात्री दार वाजल्यानं वैतागानं तिनं दार उघडलं…दारात भिडेला पाहून ती स्तब्ध झाली.थक्क झाली.भिडेच्या मनातलं भाऊ बोलला.त्या लहानशा,शाळकरी, आई गमावलेल्या मुलीचं बोलणं ऐकून  तिनं भिडेला मिठीतच घेतलं.तिच्या या भूमिकेचं अफाट कौतुक वाटलं तिला.भिडे आणि बापट मायलेकी झाल्या…..

आणि खरंच तो इस्त्रीचा युनिफॉर्म घालून ती शाळेत सकाळी हजर झाली.शांतपणे, जबाबदारीनं,भान ठेवून तिनं लीडरशीप केली.जणू काही काल तिच्या आयुष्यात एवढी मोठी उलथापालथ झालीच नव्हती.सादरीकरण झालं आणि ती बापटांच्या कुशीत शिरून ढसढसा रंगली.इतका वेळ कोंडलेलं दुःख बांध फोडून अक्षरशः बाहेर फुटलं.एका शाळकरी मुलीनं कसं निभावलं एवढं मोठं दु:ख!!!! सारेच थक्क झालो…..

तिच्या आईला मी काही वेळा भेटले होते.मी संगीत शिक्षिका… आणि भिडे सुंदर गातंही असे…त्या स्पर्धा,कार्यक्रम संदर्भात भेटलो होतो असं स्मरतं.एक अत्यंत साधी, खूप न शिकलेली,घरातल्या कामात,मुलांचं करण्यात,कुटुंबाच्या जबाबदारीत बुडालेली, मोजक्या आर्थिक गणितात टुकीनं, निगुतीनं संसार करणारी…एक साधी गृहिणी…

पण तिनं मुलांना किती छान वाढवलं.कसलाही आव न आणता किती देखणे संस्कार केले.आपलं काम चोख करा.जबाबदारी टाळू नका.खूप शिका…प्रामाणिक कष्ट करा….हेच तर संस्कार सहज जातांना आपल्या मुलांना दिले.अगदी नकळतपणे….ही मुलं पण भारी..अगदी सारी शिकवण जपणारी.. अंमलात आणणारी..खरंच गुणी मुलं….

आज ४० वर्ष व्हायला आली..तो प्रसंग,ती घटना आणि भिडेचं धैर्य, कूलनेस प्रचंड थक्क करतं.कठीण प्रसंगात आठवतं.शिकणारी नकळत शिकवणारी झाली आणि हो…त्या ऐनवेळी उभ्या राहिलेल्या लीडरचं पण मनापासून कौतुक….

खरं तर आम्ही त्यांचे शिक्षक… त्यांना शिकवणारे…पण या प्रसंगातून आम्ही पण खूप काही शिकलो असंच वाटतं मला…..

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चिमटे आणि बक्षीस… लेख क्र. १२ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ चिमटे आणि बक्षीस… लेख क्र. १२ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

बर्वेबाई विक्रांतला (नाव बदललेले) घेऊन माझ्याकडे आल्या. त्या वर्गातील सर्व पालकांची तक्रार होती की तो खूप शिव्या देतो. विक्रांत खाली मान घालून माझ्यासमोर उभा होता.

मी त्याला म्हटलं, “तुमच्या बाई शिव्या देतात की मी शिव्या देते रे? कोणाच्या शिव्या ऐकून तू अशा शिव्या देतोस?”

थोडा वेळ तो काहीच बोलला नाही.

त्याच्या पाठीवर हात ठेवून मी म्हटलं, “खरं सांग, मी नाही शिक्षा करणार तुला, आणि खरं बोललास, तर बक्षीससुद्धा देईन.” त्यावर तो म्हणाला, “आईला मारताना बाबा अशा शिव्या देतात.”

काय बोलणार आता याच्यावर?

मला एक कल्पना सुचली. मी म्हटलं, “आता बाबा आईला मारायला किंवा शिव्या द्यायला लागले ना की त्यांना चिमटा काढ आणि सांग की मला नलावडेबाईंनी असं करायला सांगितलं. तू असं केलंस तर मी बक्षीस देईन तुला.”

आठ दिवसांनी तो माझ्याकडे आला, म्हणाला, “बाई, मी बाबांना दोनदा चिमटा काढले. तेव्हा बाबा मला मारायला आले पण चिमटा काढायला तुम्ही सांगितलं – नलावडे बाईंनी सांगितलं, असं सांगितल्यावर हात जोडून म्हणाले – बाईंना नको सांगूस बरं, मी आता शिव्यापण देणार नाही आणि मारणारपण नाही. बाई, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं, आता द्या मला बक्षीस!” असं तो म्हणाला.

मी त्याला दोन चित्रकलेची पुस्तकं आणि रंगपेटी दिली. तो एकदम खुश झाला, म्हणाला, “बाई, आता मी शिव्या देत नाही, अभ्यास करतो.”

घरी आईवडील जसे वागत असतील तसंच मुलं वागतात. दोष कोणाला द्यायचा?

मुलांना विश्वासात घेऊन काय चूक आहे ते समजावून सांगितलं तर ते ऐकतात. एक कौतुकाची थापही मुलांचं वर्तन बदलू शकते, फक्त त्यांना समजेल असं सांगणं गरजेचं असतं.

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भविष्य !!! ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

??

☆ भविष्य!!! ☆ श्री जगदीश काबरे ☆

एकदा एक ज्योतिषी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात आला आणि महाराजांना म्हणाला, “मी तुम्हाला आज तुमचं भविष्य सांगणार आहे. तुमच्या जीवनात उद्या काय घडणार आहे हे मी तुम्हाला आज सांगतो.”

यावर शाहू महाराजांनी त्या जोशीबुवाला अद्दल घडविण्याचे ठरविले.

ते त्या जोतिष्याला म्हणाले, “जोशी महाराज, आज माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही असं करा, उद्या स.११ वाजता या आणि मला माझं भविष्य सांगा.”

जोशी महाराज तेथून निघून गेले. त्याच वेळी महाराजांनी शिपायाला बोलविले आणि त्या जोशीबुवाला जेलमध्ये ठेवण्यास सांगितले. शिपायाने महाराजांच्या आदेशानुसार जोशीबुवाला जेलमध्ये टाकले. जेलमध्ये जोशी बुवाला जेवणाखाण्याची व झोपण्याची व्यवस्था करण्यात आली. रात्रभर मच्छरांनी फोडून काढल्याने जोशीबुवांना रात्रभर झोप लागली नाही. ते विचार करू लागले की, ‘ मी कोणताही अपराध केला नाही; तरीही मला जेलमध्ये का टाकले आहे? ‘ त्यांना काही उत्तर सुचेना. त्या ज्योतिषी बुवांना सकाळी महाराजांच्या आदेशानुसार भविष्य सांगण्यासाठी दरबारात हजर करण्यात आले.

दरबारात पोहोचताच जोशी महाराजांनी रडत, रडत शाहू महाराजांच्या पायावर डोके ठेवले आणि म्हणाले, “महाराज मी काय गुन्हा केला आहे की मला शिपायांनी जेलमध्ये टाकले?”

त्यावर शाहू महाराज गरजले, “जोशी महाराज तुम्ही माझं भविष्य सांगायला आले होता. मग मी तुम्हाला जेलमध्ये टाकणार आहे हे तुमचे भविष्य तुम्हाला का नाही समजले?”

हे ऐकताच भविष्य सांगणारे ते जोशीबुवा मान खाली घालून तेथून निघून गेले.

महात्मा ज्योतिराव फुले प्रश्न विचारतात, ” भविष्य, पंचांग बघतात आणि पत्रिकेत 36 गुण मिळवतात तरीही त्यांच्या बायका विधवा का होतात?”

तेव्हा जन हो, शहाणे व्हा. ज्योतिषाच्या नादी लागू नका आणि त्यांची पोटे भरून आपले आयुष्य बरबाद करून घेऊ नका.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पुढच्या वर्षी लवकर या..!!” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “पुढच्या वर्षी लवकर या..!!” ☆ श्री सुधीर करंदीकर

” गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या “

गणेशोत्सव आपण सगळ्यांनीच खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला आहे.

कालच्या विसर्जन सोहळ्यानंतर गणपती बाप्पा जरी मूर्तीच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये, शेजारच्या घरामध्ये, नातेवाईक, ओळखीचे, यांच्या घरामध्ये नसले, तरी त्यांचं वास्तव्य सगळीकडे कायम असणारच आहे.

काल विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पा आपल्याला हेच सांगत होते: –

‘ माझ्या मूर्तीचे विसर्जन होत आहे, पण मी कायमस्वरूपी तुमच्या इथेच राहणार आहे. त्यामुळे ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’ वगैरे असे काहीही म्हणू नका.’

– – पण डीजेच्या आणि ढोल ताशे यांच्या कर्कश्य आवाजामध्ये आपल्याला हे बाप्पांचे बोलणे ऐकूच येत नव्हते.

बाप्पा इथेच राहणार आहेत म्हणजे गेल्या दहा दिवसांमध्ये जसे आपले एकमेकांकडे आरतीला जाणे, दर्शनाला जाणे, प्रसादाला जाणे, जसे सुरू होते, तसेच या न त्या निमित्ताने आपण एकमेकांकडे जाणे सुरूच ठेवूया आणि एकमेकांशी संपर्कात जरूर राहू या.

…. सगळ्यांशीच कायमस्वरूपी प्रेमाने वागणे, आनंदाची देवाण-घेवाण करणे, हे पण  आपण सुरूच ठेवूया. तेच बाप्पाला आवडते.

आपल्या आयुष्यातील आरोग्य आणि आनंद यांचे सगळ्यात मोठे साधन, हे आपले निकटवर्तीय संबंध आणि मैत्री यामध्येच असते, असे एका जागतिक रिसर्च मधून सिद्ध झाले आहे.

सध्या ‘मैत्रीमधील मंदी’ ही आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन व्यवहारात अतिशय प्रभावीपणे शिरकाव करत आहे. म्हणून परदेशामध्ये एका विद्यापीठामध्ये ‘Design of healthy friendship’  हा विषय अभ्यासक्रमाकरिता सुरू केला आहे.

…. आणि आपल्याकडचा दहा दिवसांचा गणपती उत्सव काही वर्षांपासून हेच साध्य करत आहे, कुठल्याही विद्यापीठात न जाता.

आजपासून रोजच सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा आपण गणपतीची आरती मनोभावे म्हणत राहू आणि मैत्री संबंध वाढवत राहू आणि सगळीकडे प्रसन्न वातावरण पसरवत चलू.

तुमचे पण याबद्दलचे विचार जरूर कळवा.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शिक्षक…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “शिक्षक …” ☆ सुश्री शीला पतकी 

खूप जणांनी खूप व्याख्या केल्यात, खूप मोठी मोठी उदाहरणं समोर आहेत,  शिक्षक कसा असला पाहिजे यासंबंधी अनेक चर्चा ऐकल्या,  त्यानुसार वागण्याचा प्रयत्नही केला. खरंतर हे सगळं आतून असावं लागतं.  हे सगळं वाचताना -ऐकताना -पाहताना असं वाटतं की शिक्षक म्हणजे फक्त शिक्षण देणारा नव्हे…आम्ही काय दहावीपर्यंत शिकवतो.. आमच्या पुढे उभे राहिलेले विद्यार्थी त्यापेक्षा ज्ञानी झालेले असतात… पण आमच्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर अपरिमित कृतज्ञता दिसते. अनेकांचे फोन येतात..  कोणी काही आठवणी सांगतात.  दहावीपर्यंत शिकवायचं तरी काय असतं? खरं तर ते आपोआप शिकतच असतात आणि ते शिकवलेलं थोडंच त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतं… ऑक्सिजन + कार्बन डाय-ऑक्साइड

( a+b) = CO2,  प्रमेय, मराठीच्या कविता, भूगोल हे सगळं विसरून जातं. पुढे फार उपयोगाला येतं  असेही नाही. मग लक्षात काय राहतं असा विचार मी नेहमी करते आणि मग आता हळूहळू काही गोष्टी उलगडत गेल्या आहेत.

पाच सात वर्षाखालची गोष्ट आहे सकाळी साडेसहा वाजता एक फोन आला मी फोन उचलल्यावर पलीकडची मुलगी रडवेली झाली होती ती म्हणाली बाई मी अमुक अमुक माझी आई गेली आज सकाळी सोलापूरला मी पुण्यात असते मला काही सुचत नाही फक्त तुमची आठवण आली आणि ती रडायला लागली. मी तिला समजावले आणि म्हणाले आता तुम्ही निघणार असाल तर जपून या ती तिच्या आई-वडिलांची एकटीच मुलगी होती. तिचे पूर्ण अवसान गेलेले  होते. ती म्हणाली “आम्ही निघालोय सोलापूरला यायला.  नवरा ड्रायव्हिंग करतोय “

मग मी तिला सांगितले “थोडी धीट हो बाळा.. जीवनात या सगळ्या प्रसंगाला सामोरे जावंच लागतं त्याला इलाज नाही… तू रडायला लागलीस तर नवऱ्याचं ड्रायव्हिंगवरून लक्ष उडेल.  प्रवास जपून करायचा आहे तेव्हा मनाला आवर घाल “.

तिच्या पुणे सोलापूर रस्त्यावर मी सातत्याने तिला तासातासाने फोन करत होते.  ती सोलापुरात पोहोचली तिची चुलत भावंड वगैरे सोलापुरात होती त्यामुळे पुढचा कार्यभाग झाला.

या घटनेचा विचार करत होते….  ती माजी विद्यार्थिनी असल्याला बरीच वर्षे झाली होती पण अतिशय दुःखाच्या काळात तिला पहिल्यांदा माझी आठवण झाली कारण तिला माझा आधार वाटला.  मी तिला भेटलेही नाही पण तिला त्या वेळी माझे शब्द धीर देणारे जाणवले..  आणि लक्षात आले शिक्षक असा असतो जो पाठीवर हात ठेवतो, शाबासकी देतो, धीर देतो, आधार देतो.  या सगळ्या गोष्टी आपल्या शिक्षकाकडे आपल्याला मिळणार आहेत याची त्या विद्यार्थ्याला जाणीव असते, आणि अशी जाणीव ज्या शिक्षकाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असते त्यांनी त्या पुस्तकांपलीकडे त्याला काहीतरी शिकवलेलं असतं.

…… शिक्षण कुठे पुस्तकात असतं…ते पुस्तकापलीकडेच असत. अभ्यासक्रमाच्या पानाबरोबर जीवनाचे पान वाचायला शिकवणारे शिक्षक हे त्यांच्या कायम लक्षात राहतात हे मात्र नक्की, आणि असे काम ज्या ज्या शिक्षकाने केलेले आहे त्या शिक्षकांबद्दल विद्यार्थी जन्मभर कृतज्ञ असतात.  आज असंख्य विद्यार्थ्यांचे फोन मेसेज येत आहेत.  मी ज्यांना शिकवले त्या विद्यार्थ्यांचा आता वयोगट 28 ते 65 एवढा आहे.  त्या सर्व वयोगटातले विद्यार्थी आपापल्या अनुभवासह एखादा शाळेतला अनुभव शेअर करून सांगतात..  माझ्याकडून काही मिळालं तेही सांगतात.

..  मला वाटतं हीच पावती असते शिक्षकाला त्याच्या शिकवण्याची आणि मग खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा होतो.

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ५७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ५७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

चारू

।अमित्रस्य कुत: सुखम्।

ही  एक प्रसिद्ध उक्ती आहे आणि ते खरंच आहे.  ज्या व्यक्तीला मित्र-मैत्रिणी नाहीत ते सुखी कसे असू शकतील? सुखी जीवनासाठी चांगले स्नेही हवेतच. या बाबतीत मात्र मी खरोखरच भाग्यवान आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला अगदी सहजपणे मित्र-मैत्रिणी मिळत गेल्या. गंमत म्हणून सांगते, मी चार-पाच वर्षांचीच असेन. जिथे आमची धोबी गल्ली संपायची तिथून टेंभी नाक्यावर जाणारा रस्ता सुरू व्हायचा आणि  तिथेच एका दोन मजली बिल्डिंगच्या खालच्या मजल्यावर “भारती” राहायची. मी तिला पहायचे, तीही  मला पहायची. गोरी गोरी पान,  निळसर डोळ्यांची, कुरळ्या केसांची भारती मला अगदी सुंदर बाहुलीच वाटायची. मला ती फारच आवडायची. कदाचित तिलाही मी आवडले असेन त्यामुळे आमची खूपच गट्टी जमली.जीजी मला  तिच्या घरी सोडायची.तिच्या घरात आम्ही दोघी खूप खेळायचो. लपाछपी, भातुकली, कधी रंगावर रंग (पत्ते) असे छान छानआम्हाला येणारे  खेळ खेळण्यात आम्ही रमायचो. भारतीची आई आम्हाला मधून मधून काही खायलाही आणून द्यायची. भरतीची आई पण मला फार आवडायची कारण ती कधीच आमच्यावर रागवायची नाही. त्यांच्या घराला रस्ता दिसणारी एक मस्त खिडकी होती आणि त्या खिडकीत बसून मला आणि भारतीला गप्पा करता करता दूधपोहे खायला खूपच मजा येत असे. नंतर काही वर्षांनी भारतीची फॅमिली घंटाळी रोडवर राहायला गेली.माझ्या घरापासून दूर. त्या लहान वयात दुःख म्हणजे काय कळत नव्हतं पण मी खूप रडवेली मात्र त्यावेळी झाले होते इतकं आठवतं.

त्यानंतर मी शाळा नंबर १२ मध्ये पहिली ते चौथी अशी शिकले. त्यादरम्यानही मला खूप मैत्रिणी मिळाल्या. पण भारती माझ्या मनात कायम असायचीच आणि कशी गंमत गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल मध्ये पाचवीच्या वर्गात मी आणि भारती पुन्हा एकत्र आलो. आम्हाला दोघींनाही खूप आनंद झाला. पण तेव्हा मात्र जाणवलं होतं बालपणीच्या आठवणी दोघींच्या मनात असल्या तरी काही वर्षांच्या अंतरामुळे थोडं बदललेलं होतं. आता तिची जिवलग मैत्रीण ज्योती होती, मी नव्हते. भारती, मी आणि ज्योती एकमेकींच्या मैत्रिणी होतोच कारण आम्ही एकाच वर्गात होतो पण ज्योती आणि भारतीचं वेगळं विश्व होतं आणि मी, छाया, गीता, आशा, वासंती असा आमचाही मस्त ग्रुप जमलेला होता. मैत्रीचा अगदी जिव्हाळ्याचा. भारतीचं आणि माझं काय नातं असेल ते असो पण आम्ही एकमेकींच्या आयुष्यात आजही आहोत. त्याच निरागस आठवणींसह. तितक्याच घट्ट मैत्रीच्या भावनेने जोडलेले आहोत.

पाहिलत ना?या लेखमालेत, बदललेल्या आयुष्याच्या कितीतरी पुढच्या टप्प्यावर असतानाही पुन्हा पुन्हा माझं मन अगदी नकळत सहजपणे बालपणात जाऊन पाखरासारखं भिरभिरतं.

तर सांगत काय होते की मित्र-मैत्रिणींच्या बाबतीत मी किती भाग्यवान आहे! जळगाव तसं लहानसं गाव.जिल्ह्याचं ठिकाण म्हणून महत्त्वाचं. म्हणजे गावाचं क्षेत्रफळ किती, लोकसंख्या किती या भौगोलिक तपशीलात  न पडता, इतकंच सांगेन की जळगावात सगळेच सगळ्यांना ओळखत असत. शेजारपाजारचे, गल्लीतले, समोरचे, बाजूचे तर असतच पण अगदी दुकानदार, सरकारी ऑफिस मधले, वकील, डॉक्टर, शिक्षक, बँकर्स सगळ्यांशीच एकमेकांचा चांगला परिचय असलेला जाणवायचा.

“चारुशीला पाटील” हे असंच जळगावातलं  एक सर्वपरिचित, गुणी आणि अत्यंत गोड व्यक्तीमत्व. नुसतंच कौटुंबिक नव्हे तर सामाजिकही आणि अशा व्यक्तीशी माझं किती जवळचं नातं होतं आणि तेही अनेक वर्षापासून याची जाणीव झाल्यावर मी सुखावले. कारण चारू… आता मी “चारू” असाच उल्लेख करते.. ही माझ्या जिवलग सखी अंजूची मोठी बहीण.  दीदी. शिवाय माझ्या ताईची कॉलेजमधली एकदम गळ्यातली मैत्रीण. जग किती लहान असतं ना? जळगावात स्थायिक व्हायचं ठरवल्यानंतर मनावर जो एक परकेपणाचा भाव सतावत होता तो,” अगं दीदी जळगावतच असते.” हे अंजूने सांगितल्यावर लगेच ओसरला पण तरी मनात शंका होतीच. लग्नापूर्वीचं आयुष्य वेगळं आणि नंतरचं वेगळं. खूप काही बदल हे अपेक्षितच आणि स्वाभाविक असणारच. चारु आता,” तीच आमची पूर्वीची दीदी असेल का?”आता ती बॅरिस्टर बी.एन. पाटलांची सून,  भल्या मोठ्या हवेली टाईप असलेल्या घरातलं तिचं वास्तव्य, श्री. घनश्याम पाटलांचा मोटार गॅरेज चा नावाजलेला वर्धित व्यवसाय, एकत्र कुटुंबातलं तिची “थोरली सून” ही मानाची ओळख आणि त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटनेतलं तिचं स्थान, पालिकेच्या महिला दक्षता विभागातलं महत्त्वपूर्ण पद आणि कार्य,तिची एक सामाजिक ओळख या सगळ्यांपुढे तिच्यासाठी “तिच्या धाकट्या बहिणीची अंजुची मैत्रीण किंवा तिच्या मैत्रिणीची बहीण” म्हणून नुकतीच जळगावात स्थायिक झालेली “मी” नक्की किती महत्त्वाची ठरू शकते? फार तर एखाद्या वेळेस येईल भेटायला किंवा आम्हाला बोलवेल. एक नागरी कर्तव्य म्हणून. त्याहून अधिक महत्त्व “ती” मला कशाला देईल?  पण हा माझा भ्रम ठरला. कारण एका भेटीपुरताच आमचा संबंध न राहता पुढे अनेक वर्ष आम्ही मैत्रीच्या नात्याने अनौपचारिकपणे घट्ट बांधले गेलो. सहजपणे. आता चारू ही माझ्या मैत्रिणिची दीदी किंवा माझ्या मोठ्या बहिणीची मैत्रीण अशी ओळख  न राहता मी आणि चारू आता सख्या मैत्रिणी झालो होतो. वास्तविक चारू आणि भाई(घनश्याम पाटील.) आम्हा दोघांपेक्षा वयाने मोठे होते पण मैत्री आणि वय यांचे काही मोजमाप नसते. आम्ही चौघंही एकमेकांच्या प्रेमातच पडलो म्हणाना.

वास्तविक आम्ही जळगावला येण्यापूर्वीच चारु भाईंचा एक मैत्री ग्रुप होताच. जयश्री- अनिल कोतवाल, अलका -सतीश गुप्ता आणि मिस्टर अँड मिसेस सरोदे. पण चारुनेच आम्हाला या ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतले आणि एका सुंदर मैत्रीचं बीज आमच्या आयुष्यात अंकुरलं आणि गेल्या ५० वर्षात ते घनदाट बहरत गेलं.

नेहमीच मी चारुमध्ये एक बहुआयामी  स्त्री पाहिली. तिची स्वच्छता, टापटीप,  नीटनेटकेपणा,  जुन्या पद्धतीच्या घराला आधुनिकतेची जोड देऊन जुना न.व्याचा सुंदर संगम साधत सजवलेलं तिचं अत्यंत कलापूर्ण घर मला नेहमीच आकर्षित करायचं.

जळगावात पहिलं ब्युटी पार्लर तिचंच,पहिला जीम आणि योगा वर्ग तिचाच. “सुंदर दिसावं आणि फिट् रहावं या स्वयंस्फूर्तीतूनच तिने हे निर्मिलं.असे हे   विविध व्याप सांभाळत आल्या गेल्यासाठी तितकाच गोड हसतमुख पाहुणचार करताना तिच्यातली “उत्तम सुगरण” मला नवलाईची वाटायची. ती नुसतीच सुगरण नव्हती तर एखाद्यासमोर पदार्थाची थाळी ठेवताना त्याची रचना, मांडणी इतकी कलात्मक असायची की खाणाऱ्याला ते पाहूनच भूक लागावी. चारूचं सुगरणपण हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल.

जसा ती पदार्थ लोभसपणे  सजवायची तसेच ती स्वतःलाही अगदी काळजीपूर्वक सजवायची. घरात असो, बाहेर असो मला तिच्यात कधीही गबाळेपणा दिसलाच नाही.सदैव इस्त्रीत. तिचं मात्र एक म्हणणं असायचं की, “कुठल्याही वयातल्या स्त्रीने नीटनेटकं, रंगसंगती जमवून वेलड्रेस्ड का राहू नये? त्यामुळे मन प्रसन्न राहतं.”

मी एकदा तिला म्हणाले होते,” वेळ कुठे असतो गं!”

तिने मला पार खोडून काढलं होतं. “सवय केली तर वेळ लागत नाही.”

हे मात्र खरं. कारण  तिला स्वतःला तयार व्हायला कधीच वेळ लागायचा नाही. घरातून बाहेर पडण्यापूर्वी घरात असणाऱ्या लोकांची पूर्ण व्यवस्था करून.. म्हणजे कुणाचं जेवणासाठी ताट मांडून ठेवणं, कुणाची औषधं काढून ठेवणं, कुणाचे कपडे लावून देणं, कुणाचा डबा भरून देणं, जाताना प्रत्येकाला सूचना देऊन ती नीट नेटकी तय्यार होऊन प्रसन्न मुद्रेनेच बाहेर पडणार.कपाळावरच्या टिकलीपासून ते पायातल्या चपलेपर्यंत सगळं देखणं,रेखीव.

तिला प्रत्येकाची आवड निवड माहीत असायची. कुणाला भेटायला गेली तर त्या घरातल्या माणसांना काय आवडतं याचा विचार करून त्यांच्यासाठी  डबा घेऊन जायची.छायाच्या सासर्‍यांना तिने बनवलेली सुपारी आवडायची.विलासला पापडाचा चुर्मा,मिरचीचा ठेचा आवडायचा. अनिलला मेथीचं घुब्बड.(एक खानदेशी मेथीच्या भाजीचा रसयुक्त प्रकार.), सतीशला वालाचं बिर्ड हे सगळं लक्षात ठेवून ती आली की हे सर्व सोबत घेऊनच यायची. शिवाय सगळ्यांचं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत भरभरून कौतुकही करायची. प्रत्येकाचे चांगले गुण हेरून त्यास मनापासून दाद देणं हे तिचं स्वभाव वैशिष्ट्यच होतं. त्यामुळेच चारू खरोखरच घराघरात प्रिय होती. कुठे ती चारुमावशी  होती कुठे ती चारुआत्या असेल तर कुठे मामी असेल पण सगळ्यांची आवडती.

पण तरीही एक होतं, आम्हा मैत्रिणींना तिचा धाकही वाटायचा. अर्थात गमतीशीर. ती येणार असली की मी अगदी घराचा कोपरा नि कोपरा स्वच्छ, व्यवस्थित ठेवण्यासाठी मेहनत करायची. एकदाच माझ्याकडे आमच्या ग्रुप करिता जेवण असताना चुकून तडा गेलेला ग्लास ठेवला गेला आणि तो तिच्या नजरेतून मुळीच सुटला नाही. ती काही बोलली तर क्षणभर तिचा रागही यायचा पण तो टिकायचा  मात्र नाही कारण वेळोवेळी तिने अत्यंत मायेने, प्रेमाने, काळजीने आपल्यासाठी काय काय केलेय याची आठवण कशी पुसता येईल?

एकदा माझा, रस्त्यात माझी कायनेटिक” स्किड झाल्यामुळे अपघात झाला होता. मला खूप लागलं होतं. रस्त्यावर मदतीसाठी आसपास कोणीच नव्हतं.  एका रिक्षावाल्याने पाहिलं आणि मला समोरच्या दवाखान्यात अॅडमिट केलं आणि तो तिथून सरळ चारूकडे गेला.त्याला  माझ्याबद्दल एवढंच माहीत होतं की मी चारुताईंची मैत्रीण आहे. चारुनेही कायनेटिक करून जाणारी मीच असणार हे ताबडतोब ओळखलं आणि भाईंना घेऊन ती हातातलं काम सोडून धावत दवाखान्यात आली. तिला पाहिल्यावर मला रडूच कोसळले.मी तिच्याकडे आरसा मागितला. अपघातात माझा एक दात पडला होता आणि वरचा ओठ फाटला होता. पण तिने फक्त माझा हात हातात घेतला. आणि माझ्या हाताला झालेला तिचा तो अलौकिक नरम, मायेचा स्पर्श मी कधीही विसरू शकणार नाही.

तिला स्वतःचं मूल नव्हतं पण तिने घराघरातल्या मुलांवर,नात्यातल्या मुलांवर मनापासून प्रेम केलं. त्यांच्या आवडीनिवडी जपल्या. कोणी आजारी झालं तर पटकन जाऊन इच्छा देवीला ती साकडं घालायची आणि प्रसाद अंगारा वगैरे घेऊन यायची.

चारू आम्हा सगळ्याच मैत्रिणींच्या आयुष्यातला एक अतूट महत्वाचा सांधा होती. ती जाऊन आता बरीच वर्ष झाली पण आमच्या अस्तित्वाच्या कोपऱ्या कोपऱ्यात तिचं वास्तव्य आहे आणि ते तसेच टिकून राहणार आहे.

आयुष्यात महत्त्वाचं काय आहे याचा विचार करताना मला इतकंच वाटतं,”  “तुम्ही सुंदर नसलात तरी चालेल. सुंदर दिसणं आणि सुंदर असणं यात फरक आहे पण थोड्याशा प्रयत्नाने तुम्ही स्वतःला, तुमच्या भोवतालाला प्रसन्न आणि सुंदर नक्कीच करू शकता.”

चारुने  हे कळत नकळत आमच्यावर बिंबवलं  मात्र.

आजही आम्ही मैत्रिणी भेटतो तेव्हा चारुची आठवण निघतेच.तिच्या हातच्या खाल्लेल्या अनेक चवदार पदार्थांचीही आणि चुकून जर कोपर्‍यात कुठे भिंतीवर जाळं राहिलं असेल तर “चारु काय म्हणाली असती” हे आठवून एकाचवेळी हसूही येतं आणि डोळ्यांच्या कडा आपोआप भिजतात.

“स्वत:वरही प्रेम करावे” हा एक महत्त्वाचा विचार चारूने मनात रुजवला हे नक्की..ती वेगळी होती, ती खास होती.

 क्रमशः…५७

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काल मला एक डॉल्फिन भेटला… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ काल मला एक डॉल्फिन भेटला… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे

परवापासून काही केल्या अजिबात झोपच लागली नव्हती. पण सगळा भवताल व्यापून उरलेला कल्लोळ काल एकदाचा संपला आणि काल मात्र फार छान गाढ झोप लागली….. झोपेत एक छान स्वप्न पहात होते बहुतेक .. कदाचित स्वतःशीच हसतही असणार बहुतेक … म्हणजे मी झोपलेली आहे हेच बहुतेक मी विसरलेली असणार ….. एक निळाशार शांत समुद्र … स्वतःचा रंग ल्यालेला तो समुद्र पाहून चंद्रमुखी हास्य उधळणारं निरभ्र आभाळ .. थंडगार पण सुखदशी हवा …. आणि हे सगळं सुरम्य चित्र बघत त्या समुद्रकाठी भान हरपून बसलेली मी …. अहाहा ….

…. किती वेळ अशी भान हरपून एखाद्या पुतळ्यासारखी मी तिथे बसले होते कोण जाणे ….

पण अचानक एका क्षणी त्या शांत समुद्रात कसली तरी खळबळ ऐकू यायला लागली … बघता बघता वाढायला लागली … समोरच्या लाटा अचानक उसळायला लागल्या …. मी भांबावून बघत होते …. इतक्यात …

…. इतक्यात एक मोठा डॉल्फिन त्या लाटांसोबत दिसायला लागला.. बघताबघता समुद्राच्या काठाशी … माझ्या अगदी समोर आला. मी घाबरले … उठायचा प्रयत्न करायला लागले .. पण काही केल्या मला उठताच येईना… आणि पुढच्याच एका लाटेबरोबर तो डॉल्फिन माझ्या अगदी समोरच येऊन वाळूवर पडला… आणि मी डोळे फाडफाडून त्याच्याकडे बघत राहिले. जरा भानावर आल्यावर त्याच्याकडे नीट बघितलं आणि दचकलेच एकदम…. त्याच्या तोंडात काठीसारखं काहीतरी अडकलं होतं .. त्याला खूप वेदना होत असाव्यात .. तो अक्षरशः तडफडत होता. काय करावं मला सुचत नव्हतं. ती अडकलेली वस्तू काढायला हवी हे कळत होतं पण जवळ जाण्याचा धीर होत नव्हता आणि त्याची ती केविलवाणी अवस्था

नुसती बघत बसणंही पटत नव्हतं. त्याची तडफड वाढतच चालली होती …. असहाय्य नजरेने तो माझ्याकडेच बघतो आहे असं मला जाणवायला लागलं .. आणि मी उठून त्याच्या जवळ गेले. त्याच्या तोंडात अडकलेली वस्तू ओढून काढायचा प्रयत्न करायला लागले .. त्याला त्याचा खूप त्रास होतोय .. वेदना होताहेत हे जाणवत होतं .. पण दुसरा काही पर्यायच नव्हता …..

…. सगळी शक्ती एकवटून चिकाटीने मी ती वस्तू बाहेर ओढत राहिले.. त्यात किती वेळ गेला कोण जाणे .. पण एका क्षणी ती वस्तू त्याच्या तोंडातून बाहेर पडली ……. आणि मी …..

…… मी त्या डॉल्फिनसारखीच कोसळण्याच्या बेतात .. मला जी काठी वाटत होती ती जवळ धरून पाहायला लागले … ती काठी नव्हती .. कारण ते एखादं शस्त्र असावं असं त्या काठीच्या एका बाजूचा तुटलेला भाग पाहून वाटत होतं .. काठी सोनेरी रंगाने रंगवलेली होती आणि … आणि ती हातात धरलेला तो एक पुष्ट हात … नक्षीदार तोडे .. कडी अशा आभूषणांनी सजलेला .. तसाच सोनेरी रंगाचा .. नुकताच पाण्यात बुडलेला असावा, कारण अजूनही तो सोनेरी रंग जसाच्या तसा होता .. आणि तो हात कोणाचा असणार हे झर्रकन माझ्या लक्षात आलं  ..  ज्याच्या हातात आपण माणसं विश्वासाने आपला हात सोपवू बघत असतो .. त्याचाच हात असा अचानक आत्ता माझ्या हातात .. ???  ….

…. मी पार भांबावून गेले… त्या थंडगार स्पर्शानेही मी घामाने डबडबले… आणि डोळे खाडदिशी उघडले गेले … त्या डोळ्यांना लागलेल्या अश्रूंच्या धारा माझ्या गालांवरून सरसर ओघळत होत्या… त्या पुसण्याची शक्ती जो एरवी नेहेमी मला देत असतो, त्याचाच तो नेहेमी मला आश्वस्त करणारा हात आज केविलवाणेपणाने माझ्या हातात माझ्याच आसवांनी भिजत राहिला होता…

सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गणराज रंगी नाचतो… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? मनमंजुषेतून ?

☆ गणराज रंगी नाचतो… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

गणराज रंगून नाचतो आहे. नाचण्याच्या नादातच पायातील घागऱ्या रुणुझुणु वाजत, नाचणाऱ्या गणेशाच्या नाचात तल्लीन होऊन त्या मंजूळ नाद करतात आहेत. स्वर्ग लांब असला तरी तल्लीनता व मंजूळ आवाज देवांपर्यंत पोचतो आहे. कुठल्याही कलेमध्ये तल्लीन होण्याचं सार्थक झाले आहे. पृथ्वीवरचे आपले दुःख कुठलीही कला इतके विसरायला लावते की आपण थेट स्वर्गसुखाचा आनंद घ्यायला लागतो.

अंगी नाना कळा असण्यातही असेच स्वर्गसुख मिळत असेल का? माझ्या अंगातल्या नाना कळांना माझा नवरा म्हणतो; “जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ  नन्”.

येवढं मात्र नक्की खरं की कुठल्याही कला निर्मितीत अथवा आस्वादात गुंगून गेल्यास ब्रह्मानंदी टाळी लागते आणि प्रत्यक्ष स्वर्ग सुख, शांती अनुभवायला मिळते.

अगदी गणराज रंगी नाचतो…….

मला भरतकाम व शिवणकामाची खूप मनापासून आवड होती.अजूनही आहे पण आता तितकं होत नाही.या कलांमध्ये गुंतल्यावर मला माझ्या दु:खाची पण आठवण रहात नसे.एकदा तर एका लग्नात गेले होते.एकीकडे लोकांचे शुभमंगल सावधान म्हटल्यावर अक्षता टाकणे चालू आणि माझे मात्र छोट्या मुलीच्या फ्राॅकच्या फॅशन कडे टक लावून बघणे चालू.फॅशन लवकर लक्षात येण्यासारखी नव्हती म्हणून! शेवटी फॅशन लक्षात आल्यानंतरच अक्षदा टाकल्या मी.नवीन फॅशन दिसली की मी लगेच मुलीला शिवत असे मी.या कलेमुळेच जीवनात खूप मोठे धक्के बसत गेले तरी सावरू शकले मी.

या कलेच्या फायद्याबरोबर तोटेही असतात बरं!’येवढी मशीन मारून द्या बरं ‘म्हणताना जुन्या कपड्यांचा गठ्ठा ठेवून जाणे,कपडा शिवल्यानंतर कसा नीट बसला नाही हेच जास्त वेळ ऐकवणे इ.इ.

या कलेच्या संदर्भात आणखी एक छुपी कला दडलेली असते बरं का? थांबा, कोणती ते सांगते….

माझ्याकडे पाहुणे येणार म्हणून बाईकडून एक दोन दिवस जास्तीचे काम पडणार होते.आधीच पैसे किती द्यायचे विचारले तर ‘पैशाचं काही टेन्शन घेऊ नका काकू तुम्ही पैशे पैशच करता गड्या’ म्हणाली.म्हणून पाहुणे गेल्यानंतर मी पैसे विचारले.’पैसे नको काकू मला!’  ती म्हणाली.मला खूप आनंदाच्या उकळ्या फुटल्या.नंतर हळूच म्हणाली,’फकस्त न‌ऊवार पातळ शिवून द्या मले.’…

– – – पडला नं प्रश्न? कोणती कला जास्त श्रेष्ठ याचा?

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares