मराठी साहित्य – चित्रपटावर बोलू काही ☆ राकेट्री (हिंदी सिनेमा) – दिग्दर्शक – आऱ्. माधवन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
श्री उदय गोपीनाथ पोवळे
चित्रपटावर बोलू काही
☆ Rocketry (हिंदी सिनेमा) - दिग्दर्शक - आऱ्. माधवन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
आज Rocketry हा हिंदी सिनेमा बघण्याचा योग आला. योगच म्हणावे लागेल कारण गेल्या आठवड्यापासून तो सिनेमा बघण्याचे मनात असले तरी वेळ काढता आला नाही. आज मात्र ठरवून रॉकेट्री सिनेमा बघितला.
डॉक्टर विक्रम साराभाईंनी ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम केलं, ज्यांच्या प्रचंड बुद्धीमत्तेवर विश्वास ठेवला, ज्यांचा विक्षिप्तपणा सांभाळून घेतला, तेच डॉ. नंबी नारायणन ह्यांच्या आयुष्यावर चित्रित केलेला हा सिनेमा. आर. माधवन ह्या अभिनेत्याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे , आणि स्वतःच डॉ. नंबी नारायणन ह्यांची भूमिका केली आहे. हा सिनेमा बनवून, त्याने आपल्या भारत देशातील सगळ्या देशवासीयांसमोर एक असा काही नजराणा ठेवला आहे की तो आपण प्रत्येकाने स्वीकारून त्याचा नुसता आस्वाद न घेता, त्याचे स्मरण आपल्या आयुष्यात कायम राहील ह्याची खात्री बाळगली पाहिजे.
डॉ एस. नंबी नारायणन (जन्म १२ डिसेंबर १९४१ ) हे रॉकेट वैज्ञानिक आणि एरोस्पेस अभियंता होते , ज्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) इथे काम केले आणि विकास रॉकेट इंजिनच्या विकासात योगदान दिले. २०१९ मध्ये...