मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बघा… जमतंय का ?… अज्ञात☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ बघा… जमतंय का ?… अज्ञात ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

“भाजीत चिमूटभर साखर घाल गं, म्हणजे उग्रपणाही कमी होतो आणि पदार्थाची गोडीही वाढते” — स्वयंपाक करताना आजी म्हणायची.  भाजीमध्ये चिमटीभर साखर किंवा गूळ हवा म्हणजे पदार्थाची चव वाढते. 

 मला नवल वाटतं आजीवर्गाचं. त्यांना बरोबर माहित असायचं – कशात काय घातलं म्हणजे गोडी वाढते. 

पूर्वी घरोघरी कर्ता पुरुष म्हणजे करारी, थोडा तापट, घराला धाकात ठेवणारा असायचा. कुणाचं कशावरून बिनसलं आणि आजोबांचा आवाज चढला की आजी ,” हो हो बरोबर आहे तुमचं ”  म्हणून होणारा वाद टाळायची. नंतर सावकाशीने आजोबांना मुद्दा पटवून द्यायची. 

‘चिमूटभर समजूतदारपणा दाखवला की कलह टळतो ‘ असं ती म्हणायची .

घरातील मूल चुकलं तरी त्यावेळेस आवाज चढवायचा नाही ,कारण मूलही मग आक्रमक होतं आणि ऐकत नाही. सावकाशीने समजावून सांगायचे ज्यावेळेस ते समजून घेईल. चिमूटभर माया दाखवली तर सांगण्याचा परिणाम होतो असं आई पण म्हणायची. म्हणूनच  त्यांचे संसार विना कलह झाले कामवाल्या बाई बाबतही असंच – तिने कधी दांडी मारली, कधी उशीरा आली, तरी ती पण एक संसारी बाई आहे, आपल्यापेक्षा  तिला आव्हानं असतात जास्त. मग अशावेळेस “का गं आज उशीर झाला ? बरी आहेस ना ? काळजी घे गं बाई– चल दोन घास खाऊन घे“ असं म्हटलं की ती बाई कायम आपल्याला बांधून राहील. 

थोडी माणूसकी खूप मोठं काम करते. थोडा विश्वास ,थोडं प्रेम ,थोडी आपुलकी या गोष्टी माणसं जोडायला हव्यातच संसारात —- आजी नेहमी म्हणायची “ आपण ४ पावलं मागे आलो तरी लहान होत नाही आपण. एखादे वेळेस माघार घेणं हे माणूस म्हणून २ पावलं आपल्याला पुढे घेऊन जातं. “

आताची सतत अरे ला कारे करायची सवय पाहिली की आपण खूप काहीतरी गमावतो आहोत असं वाटतं.

ही एक चिमूट आयुष्यात बदल करू शकते. 

थोडा चिमूटभर अहंकार कमी केला तर आपण आयुष्यात चिमुटभर आनंदाची नक्कीच भर घालू  शकतो.

ले.: अज्ञात 

संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 27 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 27 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

७.

5     वाचताना वेचलेले:

भावार्थ गीतांजली…. प्रेमा माधव कुलकर्णी

गीतांजली भावार्थ

 

४१.

तुझे अस्तित्व नाकारून ते तुला धुडकावतात,

धूळभरल्या पथावरून तुझ्या बाजूने जातात,

पूजासाहित्य पसरून

मी किती वेळ तुझी वाट पाहतोय.

येणारा – जाणारा माझी फुलं घेऊन जातो.

माझी फुलांची दुरडी बहुधा रिकामी झाली.

 

सकाळ गेली, दुपार गेली,

सायंसमयी झोपेनं माझे डोळे

आता जड होऊ लागलेत.

घराकडे परतणारे माझ्याकडे दृष्टिक्षेप टाकतात,

मला हसतात. मी शरमते.

माझा पदर चेहऱ्यावर ओढून मी भिकारणीप्रमाणं बसते.

ते मला प्रश्न विचारतात,

“काय पाहिजे?”

तेव्हा मी नजर वळते.

त्यांना काय सांगू?

 

माझ्या सख्या,या सर्वांमागे सावलीत

तू कुठे आहेस?

त्यांना काय सांगू? ‘येणार’ असं मला आश्वासन दिलंस आणि मी तुझी वाट पाहतेय.

हुंड्यासाठी हे दारिद्र्य मी जपलंय असं कसं सांगू?

ते मनातच मी ठेवलंय, बंदिस्त केलंय.

 

या गवतावर बसून आकाशाकडे

टक लावून पाहत राहते.

सर्वत्र प्रकाश भरून राहिलाय.

तुझ्या रथावर सोनेरी पताका फडफडताहेत.

आ वासून रस्त्याच्या कडेला थांबून

ते सगळेजण पाहताहेत. . . .

आणि तू येत आहेस.

 

तू रथातून उतरून येशील. वासंतिक वाऱ्यानं

थरथरणाऱ्या पाण्याप्रमाणं फाटक्या कपड्यातील ही भिकारी मुलगी धुळीतून उचलून तुझ्या शेजारी

बसवून घेशील.

 हे ते अवाक होऊन पहात राहतील.

 

वेळ सरकत राहतो, पण तुझ्या रथाच्या चाकांचा आवाज नाही!

विजयाच्या घोषणा देत,

गोंगाट करीत किती मिरवणुका गेल्या.

या सर्वांच्या मागे तूच होतास का?

 

निरर्थक इच्छा करीत उरस्फोट करीत,

तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली ती मीच का?

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले  ☆ सुस्वागतम् की स्वागतम् ? – लेखक – श्री अनिल कुमकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ सुस्वागतम् की स्वागतम् ?  – लेखक – श्री अनिल कुमकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ 

हा अनुभव बारामतीतच नाट्यसंमेलनाच्या वेळी आला. त्या नाट्यसंमेलनाचा एक भाग म्हणून विद्याधर गोखल्यांच्या हस्ते कवी मोरोपंतांच्या प्रतिमेचे पूजन आयोजित केले होते. ठरलेल्या वेळी गोखले, जब्बार पटेल वगैरे प्रतिमा पूजनासाठी सिद्धेश्वर मंदिरामागच्या मोरोपंत स्मारकाच्या जागेत आले. त्या वेळी तो जुना वाडा होता. मोरोपंतांच्या खोलीची नि बाहेरची सजावट करण्याचे काम माझ्याकडे दिले गेले होते. मी बाहेर पताका वगैरे लावून रांगोळीने ‘सुस्वागतम्’ असा शब्द लिहून ठेवला होता. 

गोखल्यांनी प्रतिमेचे पूजन केले. नंतर त्यांना ‘चार शब्द’ बोलण्याची विनंती केली गेली. गोखल्यांनी कवी मोरोपंतांबद्दल, स्मारकाच्या व्यवस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. पण त्यानंतर मात्र ” रांगोळी छान काढली आहे, पण मराठीच्या शुद्धलेखनाची किमान मोरोपंतांच्या बारामतीत तरी हेळसांड होऊ नये “, असे शब्द ऐकवले.

रांगोळीत “सुस्वागतम्” हा एकच शब्द होता. त्यात काय चुकले हे मला कळेना. शिवाय गोखल्यांनी ‘चार शब्द’ बोलताना जाहीरपणे हे सांगितल्याने काहीशी अपमानकारक स्थिती झाली होती. शेवटी त्यांनीच खुलासा केला. 

“सुस्वागतम् “या शब्दाचे मूळ ‘ग’ या संस्कृतमधील धातूमध्ये आहे. त्याला व्याकरणाच्या नियमानुसार ‘तम्’ हा प्रत्यय लागून गतम् असा शब्द बनतो. गतम् शब्दाला ‘आ’ हा उपसर्ग लागून ‘आगतम्’ असा शब्द बनतो. त्या आगतम् शब्दाला ‘सु’ हा आणखी एक उपसर्ग लागून तो शब्द ‘स्वागतम्’ असा बनतो. एकदा ‘सु’ हा उपसर्ग लावल्यावर पुन्हा ‘सु’ लावून “सु सु” का करता? ” असे त्यांनी बोलून दाखवले.

त्या वेळी सगळ्यांच्या समोर चूक काढल्यामुळे गोखल्यांचा मनातून राग आला होता. पण पुढे त्यातूनच व्याकरणाचा अभ्यास कमी पडतो आहे, हे जाणवले. माझ्या शुद्धलेखनाबद्दल नि मराठीच्या भाषिक प्रभुत्वाबद्दल कौतुकाचे शब्द अनेक वेळा ऐकायला मिळतात. त्याचे श्रेय कै. गोखल्यांचे आहे. त्यांच्यामुळेच मराठी, संस्कृत व्याकरणाचा अभ्यास नि गुजराथी, कानडी, बंगाली, उर्दू वगैरे लिपी शिकाव्या वाटल्या.  नाट्यसंमेलनाच्या वेळच्या या घटनेला आता निदान २५ वर्षे तरी झाली असतील. पण अजूनही व्याकरणाचा अभ्यास करावा वाटतो. हे सगळे गोखल्यांमुळे घडले. 

लेखक – श्री अनिल कुमकर

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सख्खं म्हणजे काय? ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ सख्खं म्हणजे काय? ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे ☆ 

सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी

नेमकं काय असतं हे “सख्ख प्रकरण?” 

 

सख्खा म्हणजे आपला सखा.

सखा म्हणजे जवळचा

जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केव्हाही, काहीही सांगू शकतो.

त्याला आपलं म्हणावं,

 त्याला सख्ख म्हणावं !

 

सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावर पण पडता नये इतकी खबरदारी घेतली जाते, तिथे सख्य नसते- पथ्य असते.

 

ज्याच्याजवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो, मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदून स्फुंदून रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !

 

ज्याच्याकडे गेल्यानंतर 

आपलं स्वागत होणारच असतं 

आपल्याला पाहून त्याला हसू

येणारच असतं

अपमानाची तर गोष्टच नसते 

फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते !

 

पंढरपूरला गेल्यावर 

विठ्ठल म्हणतो का …..

या या फार बरं झालं !

माहूरवरून रेणुका मातेचा 

किंवा कोल्हापूरवरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरीबालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून !

मग आपण का जातो ?

कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते ….म्हणून !

हाही एक प्रकारचा” आपलेपणाच !”

 

लौकिक अर्थाने, वस्तूच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ? किंवा आपण नेलेले तो काय घेतो?

काहीच नाही.

 

रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का, 

किती रोड झालीस ? कशी आहेस ? 

सुकलेला दिसतोस, काय झालं? —

नाही म्हणत.

 

मग दर्शन घेऊन निघतांना वाईट का वाटतं?

पुन्हा एकदा मागे वळून का पहावं वाटतं ?

प्रेम, माया, आपुलकी, विश्वास म्हणजेच “आपलेपणा !”

 

हा आपलेपणा काय असतो ?—

 

आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ

भेटल्यानंतर बोलण्याची ओढ 

बोलल्यानंतर ऐकण्याची ओढ

निरोप घेण्याआधीच पुन्हा भेटण्याची ओढ !

 

ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं  त्याला आपलं म्हणावं 

मग ते नातं चुलत, मावस असलं तरी सख्ख म्हणावं !

 

मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे …..

म्हणजे ” आपलेपणा! “

 

एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पाहिल्या डोळे भरून येतात

आणि निःसंकोचपणे गालावरून ओघळू लागतात, 

तो आपला असतो , 

” तो सख्खा असतो !”

 

लक्षात ठेवा,

ज्याला दुसऱ्या साठी ” सख्ख ” होता येतं त्यालाच कुणीतरी सख्ख असतं, 

बाकी फक्त परिचितांची यादी असते —-नको असलेल्या माणसांची गर्दी असते !

 

तुम्हीच सांगा…..

फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ?

ज्याला तुमच्या दुःखाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का? 

 

आता एक काम करा —–

 

करा यादी तुम्हाला असणाऱ्या

सख्ख्या नातेवाईकांची 

झालं न धस्सकन 

होतयं न धडधड 

नको वाटतंय न यादी करायला ….

 

रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी 

आणि मानायला लागा सर्वांना आपलं—– कोणी कितीही झिडकारलं तरी—-

 

कारण …रागराग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही 

जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं..

 

संग्राहिका : सुश्री मानसी आपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तो निसर्गच असतो… व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ तो निसर्गच असतो… व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

शिक्षणानं सगळी उत्तरं मिळत नाहीत. मेंदूतल्या आळसावलेल्या पेशींना शिक्षण फक्त जाग आणतं. वस्तू, माणसं, आकडे, इतिहास ह्यांची कोठारं म्हणजे मेंदू. स्मरणशक्ती, स्मृती ह्यांचं प्रचंड गोडाऊन म्हणजे मेंदू. किडलेलं धान्य, विचार, आठवणी फेकून देण्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय शिक्षणाचं ज्ञानात रूपांतर होत नाही. शिक्षण म्हणजे पोपटाचा पिंजरा. ज्ञान म्हणजे राजहंस. नीर-क्षीर भेद समजल्याशिवाय अनावश्यक माहितीनं बेजार झालेला मेंदू टवटवीत राहणार नाही. नव्या शुद्ध विचारांसाठी त्या करोडो पेशी रिकाम्या हव्यात आणि भक्तीसाठी मनाचे, कमळाच्या पानाचे द्रोण निर्लेप हवेत. अशा रिकाम्या जागी जो उतरतो तो निसर्गच असतो.

वपु काळे. ~’ तू भ्रमत आहासी वाया..’ 

संग्राहिका : मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वय असतं का पावसाला? ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ वय असतं का पावसाला?☔ ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

हो असतं की…….

मऊ दुपट्यात आईच्या खांद्यावरून बघताना पाऊस एक वर्षाचा असतो.

वाजणारे बूट मुद्दाम डबक्यात आपटत चालताना पाऊस चार वर्षाचा असतो..

शाळेतून येताना छत्री मुद्दाम वाऱ्याच्या दिशेने धरून उलटी करताना पाऊस बारा वर्षाचा असतो..

ट्रेकिंग करताना चिंब भिजल्यावर टपरीवर चहा पिताना पाऊस टीन एज ओलांडत असतो..

तिला पाऊस आवडतो, रिमझिम गिरे सावन वगैरे गाणी ऐकताना अपरिहार्यपणे पाऊस गद्धे पंचविशीत असतो.

भिजायला नको वाटायला लागलं की पन्नाशी येते पावसाची..

गुडघे दुखू लागले की साठीशांत होते पावसाची..

नंतर नंतर पाऊस  मफलर कानटोपी गुंडाळून काठीच घेतो हातात ,आणि नातवंडांना ओरडतो पण, की अरे भिजू नका रे पावसात..

आपल्यासोबत बदलत जाणारी पावसाची रूपं पाहिली की मनात येतं…

 

किती पहावा पाऊस

धुके चष्म्यात दाटले

किती गेले पावसाळे

थोडे डोळ्यात उरले..

 

वय पावसाला नाही

वय मला भिववीते

अशा सर्दाळ हवेत

संधी वाताला मिळते. 

 

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 26 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 26 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

३७.

प्रवास संपत आला असं वाटलं होतं,

माझ्या शक्तीची मर्यादा गाठली असं वाटलं होतं,

माझ्या समोरचा मार्ग संपलाय असं वाटलं होतं,

शिदोरी संपलीय आणि शांत विजनवासात आसरा घ्यावा असं वाटलं होतं. . . .

 

आता वाटतंय तुझ्या माझ्यावरील मर्जीला

अजून शेवट नाही.

जुने- पुराणे शब्द तोंडातून

बाहेर पडायचे थांबतात,

तेव्हा  ऱ्हदयातून नवी धून निघते,

जुने मार्ग नजरेआड होतात,

तेव्हा आश्चर्ययुक्त  नवा प्रदेश दिसू लागतो.

 

३८.

‘तू मला हवास, तू मला हवास. . . . . ‘

असंच सतत माझं काळीज

चिरंतनपणे घोकीत राहो.

तुझं अस्तित्व विसरायला लावणाऱ्या

सर्व वासना मिथ्या, पोकळ आहेत

 

रात्रीच्या अंधारात

प्रकाशाची विनवणी दडलेली असते.

तसाच तू हवास, फक्त तू हवास. . .

ही हाक माझ्या अजाणपणाच्या

गर्भात दडलेली असावी

 

सर्व शक्तिनिशी वादळ शांततेला धडक देतं

तेव्हा त्याला शांततेची ओढ असते.

तसेच माझी बंडखोरी तुझ्या प्रेमाशी टक्कर घेते,

तेव्हा सुध्दा ‘ तू हवास’ फक्त ‘तू हवास’ अशी

साद ती घालते.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रार्थनेचे शब्द – सुश्री हेमलता फडणीस ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रार्थनेचे शब्द – सुश्री हेमलता फडणीस ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

प्रार्थनेचे शब्द महत्वाचे नसतात, तर त्या मागचा भाव महत्वाचा असतो… ( का इंग्रजी मेसेजचा हा अनुवाद.)

एक लहान मुलगी रोज सकाळी मंदिरात जावून मूर्तीसमोर उभी राही व डोळे बंद करून हात जोडत दोन मिनिटे काहीतरी पुटपुटत असे.

नंतर डोळे उघडून नतमस्तक होई व स्मितहास्य करून धावतपळत बाहेर जात असे.

हा दिनक्रम रोजचाच झाला होता.

देवळातील पुजारी तिच्याकडे निरखून पहात होता. ती रोज काय करीत असते हे समजण्याची उत्सुकता त्याला वाटू लागली. त्याला वाटले, ती मुलगी इतकी लहान आहे की धर्माचा सखोल अर्थ तिला समजणे केवळ अशक्य.

तिला कोणतीही प्रार्थना येत नसेल. मग रोज सकाळी देवळात येण्याचा काय अर्थ !—-असेच १५ दिवस निघून गेले. तिच्या वर्तनाविषयी अधिक जाणून घेण्याच्या जिज्ञासेमुळे त्याची बेचैनी वाढू लागली. एकदा सकाळी ती मुलगी तेथे येण्याच्या अगोदर तो तेथे पोहोचला. तिचा नित्यक्रम संपण्याची त्याने वाट पाहिली. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला म्हणाला, मागील १५ दिवसांपासून तू नियमितपणे येथे येते हे मी पहात असतो. तू काय करतेस ?

ती एकदम म्हणाली, “प्रार्थना”.

पुजाऱ्याने जरा साशंकतेनेच  विचारले, तुला एखादी प्रार्थना येते?

“नाही” असे ती म्हणाली.

“ मग तू डोळे मिटून रोज काय करतेस ?” असे त्याने हसून विचारले.

अगदी निरागसपणे ती म्हणाली, “ मला कोणतीच प्रार्थना येत नाही पण मला,” a,b,c,d पासून z पर्यंत माहित आहे. ते ५ वेळा मी म्हणते आणि परमेश्वराला सांगते की मला तुझी प्रार्थना येत नाही पण ती नक्कीच या alphabets च्या बाहेर असूच शकत नाही.  ही alphabets तुझ्या इच्छेनुसार क्रमश: लावून घे आणि तीच माझी प्रार्थना. “

—ती उड्या मारत बेभानपणे धावत निघून गेली.  ती दिसेनाशी होईपर्यंत निरखून तिच्याकडे पहात पुजारी नि:स्तब्ध होऊन उभा राहिला.

ज्याची आपण मनोभावे पूजा करतो, अशा परमेश्वरावर अतूट असलेली हीच ती श्रद्धा.

@ fb~हेमलता फडणीस

(अगा बावन्न वर्णा परता। कोण मंत्रु आहे पांडुसूता।। —ज्ञानेश्वरी ) 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आभार माना… ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आभार माना… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

जीवनात तुम्हाला ज्या लोकांमुळे त्रास झाला अशा लोकांचे सुद्धा आभार माना, कारण त्याच लोकांमुळे आयुष्यात कसं वागायचं व कसं जगायचं हे अचूकपणे शिकायला मिळतं.

समोरच्या व्यक्तीने तुमच्याबरोबर काय आणि का केले हा विचार करण्यात वेळ दवडू नका. कारण तुमच्या जागी त्याचे कर्मच त्याला उत्तर देईल व त्याला त्याच्या कर्माची फळं भोगण्यासाठी भाग पाडेल. कधीकधी शांत राहणे खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात.

लक्षात ठेवा– जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असता तेव्हा लोक तुमच्या दिशेने दगड फेकतील.  अशावेळी खाली बघू नका, तर अजून उंच उडा. त्यामुळे त्यांनी भिरकावलेले दगड तुमच्यापर्यत पोहोचणारच नाहीत. जर परिणामांचा विचार करत बसाल तर आलेला क्षण निसटून जाईल आणि प्रत्येक क्षण जगून पाहिलात तर परिणाम स्विकारायला सोपं जाईल.

श्री सोमेश्वर व्यसन व मधूमेहमुक्ती मार्गदर्शन केंद्र लोटे ता.खेड जि.रत्नागिरी 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 25 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 25 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

३५.

जिथं मन मुक्त असेल, माथा उन्मत्त असेल,

ज्ञान मुक्त असेल,

 

घरांच्या क्षुद्र भिंतींनी जगाचे तुकडे झाले नसतील,

सत्याच्या गाभाऱ्यातून शब्दांचा उच्चार होईल,

 

अथक परिश्रमांचे हात

 पूर्णत्वाप्रत उंचावले जातील,

 

मृत सवयींच्या वालुकामय वाळवंटात

बुध्दीचा स्वच्छ झरा आटून गेला नसेल,

 

सतत विस्तार पावणाऱ्या विचार

आणि कृती करण्याकडेच

तुझ्या कृपेने मनाची धाव असेल,

 

हे माझ्या स्वामी, त्या स्वतंत्रतेच्या स्वर्गात

माझा देश जागृत होऊ दे.

 

३६.

माझ्या ऱ्हदयातील दारिऱ्द्य्याच्या

मुळावर घाव घाल

 

सुख आणि दुःख आनंदानं सोसायची

शक्ती मला दे.

माझं प्रेम सेवेत फलद्रूप करण्याची शक्ती दे.

 

गरिबापासून फटकून न वागण्याची अगर

धनदांडग्या मस्तवालासमोर शरण न जाण्याची

शक्ती मला दे.

 

दैनंदिन क्षुद्रतेला ओलांडून उंच जाण्याची

शक्ती मला दे आणि

प्रेमभावनेनं तुझ्या मर्जीप्रमाणं तुला शरण

जाण्याची शक्ती मला दे.

इतकीच माझी प्रार्थना आहे!

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares