मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई, अजून तू मला हवी आहेस! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “आई, अजून तू मला हवी आहेस!” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

आई,

ठाऊक आहे का तुला?

चिक्‍कार वेळ बेल वाजवल्यावर

बंद दरवाजाआड

तुझी चाचपडत येणारी पावले

थकलेल्या आवाजात म्हणतात,

‘आले रे…’,

तेव्हा अपराधी जीव

श्‍वास रोखून पडतो भांड्यात दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

खिडकीत बसून अंधाऱ्या उजेडात

सुईत दोरा ओवण्याचा तुझा वाढता

खटाटोप पाहून येतात कढ,

कातर कातर होत जाते मन दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

डाव्या कुशीवर कोपराच्या उशीवर

एकार्त झोपलेल्या तुझा,

मंद श्‍वासोच्छवास निरखताना,

किती धडधडते हृदयात दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

काही झालेलं नाही रे मला,

तू झोप… होईन मी बरी! ’’

असा तुझाच रुग्णाईत दिलासा

ऐकण्यासाठी ओठंगून उभ्या असलेल्या

माझ्या तथाकथित निरोगी मनाला

पडत जातात कित्येक घरे दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

तिन्हीसांज टळून गेल्यानंतर

खोलीतला दिवा न लावता

बाहेर टक लावून बघत बसतेस

अज्ञातात काहीतरी,

तेव्हा गलबलते हृदयात दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

आजही ह्या वयात

खरकटे तोंड पुसताना,

तुझ्या वृद्ध पदराचा घुरट वास

घेताना मी होत जातो लहान,

आठवते मला माझेच भूत…

खिडकीच्या गजांतून पाय काढून

तुझी चाकरमानी वाट पाहात

बसणारे माझे बालपण…

आठवते दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

अजूनही आहे मनगटावर मौजूद

तू दिलेला कालथ्याचा डाग…

शेजारच्या डोंगरेकाकूकडे

आशाळभूत खाऊ मागितल्याची शिक्षा म्हणून दिलेले ते

माझ्याच दुर्दम्य लोचटपणाचे प्रमाणपत्र

आताशा धुकट झाले आहे,

निबर कातडीवर,

पण तरीही-

सहज जाते नजर त्या डागावर दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

दोस्तांबरोबर रंगवलेली

बाटलीभर मध्यरात्र उतरते क्षणार्धात

वास्तवाच्या विहिरीत

करकरणाऱ्या रहाटासारखी…

तुझ्या एकटेपणाची सावली

हालत राहाते

रात्रदिव्याच्या मंद उजेडात भिंतीवर…

तेव्हा, कोसळून पडतो मी पुन:पुन्हा दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

*

थकलेल्या देहाने वावरत असतेस

खोल्याखोल्यांतून, पुटपुटत असतेस

काहीतरी देव्हाऱ्याकडे पाहात

उसासून,

तेव्हा तुझ्या डोळ्यांत साकळलेले

संध्याकाळचे गडद रंग

किती उदास वाटतात दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

मटार निवडताना बोटांवर चढलेली

हिरवीजर्द जीजिविषु अळी

तुझ्या अंधुक डोळ्यांना होते दिसेनाशी,

हे पाहून हळवे व्हायला होते दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

 

‘मला मेलीला कशाला हव्यात

साड्या आणखी? ’

असे म्हणत

जुन्या पैठणीवर फिरणारा

तुझा सुरकुतलेला जीर्णशीर्ण हात

पाहून थरथरते काळीज दरवेळी,

हे ठाऊक आहे तुला?

*

एखाद्या संध्याकाळी

“येताना पाच रुपयांची फुलं घेऊन ये रे,

‘त्याच्या’ बोडख्यावर घालायला!”

असे त्राग्याने म्हणतेस,

तेव्हा उगवणाऱ्या उद्याचाही

वाटतो आधार दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

 

थकलेल्या तुझा शरीराचा

कंटाळलेला वावर करतो उदास

सर्वंकष तरीही-

मनात येते की

प्राक्‍तनाचे गणित नाही जुळले,

पण तुझ्या पदराखाली झाकलेले

सुरक्षित बालपण दृढमूल आहे, अजूनही!

 

आई…

अजून तू मला हवी आहेस.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही…  – लेखक : वैद्य सुविनय वि. दामले ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही…  – लेखक : वैद्य सुविनय वि. दामले ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष 

‘इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही.’

हे वाक्य प्रत्येकानं लक्षात ठेवायलाच हवं.

आणखी असंच एक वाक्य आहे, ‘हेही दिवस जातील.’

खूप मोठा अर्थ भरला आहे या वाक्यांमागे.

प्रसंग एक

दवाखान्यात एक माऊली आली. म्हणाली,

“गणेशजी येताहेत, पाळी पुढे जाण्यासाठी काही तरी उपाय सांगा. या वर्षी वरसल आमची आहे. घरात करणारं आणखी कुणीच नाही. कसं होणार सगळं ? त्यात श्री सत्यनारायण महापूजा देखील ठरवली आहे. आणि यांची कामं काही संपत नाहीत.मलाच  सगळं बघायचंय.”

 तिला हे वाक्य ऐकवलं,

“इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही.” तिने एकदम चापकन माझ्याकडे बघितलं, म्हणाली,” अहो,पण कसं शक्य आहे? नैवेद्य कोण करणार ? साफसफाई, आवराआवर मीच करणार.”

म्हटलं,”एक वर्ष बाजूला शांतपणे बसून बघ. कसं होतं साळसूदपणाने ते.. सगळं अगदी साग्रसंगीत होणार नाही, पंचपक्वान्न होणार नाहीत, पण निदान वरणभात आणि गुळखोबर्‍याचा नैवेद्य तरी गणेशजींना मिळेल की नाही ? तेवढं नवरा करू शकेल; नव्हे त्याला करता यायलाच हवं. नाहीतर एवढ्या वर्षात काय शिकला ?”

म्हणाली,” तेही खरंच, कधीतरी करता यायलाच हवं. उद्या कुणाचा काय भरोसा ? आज आहे तर उद्या नसूसुद्धा… म्हणूनच एक वाक्य कायमचं लक्षात ठेवावं,

इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही.

प्रसंग दोन –

“मला लवकर ठीक करा, डाॅक्टर. कॅश काऊंटरची जबाबदारी माझ्यावरच असते. माझ्याशिवाय कुणाला काही माहिती नाही. जरा स्ट्राँग औषध द्या.”

त्यांना म्हटलं,

‘इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही.

म्हटलं, तुला औषध लागूच पडलं नाही आणि उद्या तू बॅंकेत गेला नाहीस तर काय होईल?”

थोडा वेळ विचार करून म्हणाला,” कॅश काऊंटरवर दुसरा कुणीतरी क्लार्क येईल. काम थोडं सावकाश होईल, पण अडणार नाही…. बॅंक सुरूच राहील.”

“म्हणूनच म्हणतोय,

इथे कुणाचंही कुणावाचून अडत नाही.”

“खरं आहे” म्हणाला.

प्रसंग तीन –

“डाॅक्टर, आम्हाला मूल होत नाही.खूप प्रयत्न केले पण यश येत नाही.”

म्हटलं, “मूल कशाला हवंय ? काय फरक पडणार आहे त्याने ?”

“असं कसं म्हणता डाॅक्टर, एखादं मूल तर हवंच ना. पुढील पिढी निर्माण करायला हवीच.” ती म्हणाली.

मी विचारलं,

“आणि तुम्हाला मूल नाही म्हणून जगावर काय मोठ्ठासा फरक पडणार आहे ?”

“असाच विचार जर राजमाता जिजाबाईनी केला असता तर ?” तिचा प्रतिप्रश्न.

“त्यासाठी आधी तुला जिजामाता व्हायची तयारी ठेव.”

” आणि ज्यांना मुलं आहेत, ती कुठे समाधानाने जगत आहेत ?”

यावर ती दोघंही निरूत्तर.

म्हटलं,

” जेव्हा ईश्वर एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा तिला सामोरं जायचं आणि स्वीकारायचं एवढंच आपल्या हाती असतं,

बाकी इथं कुणाचं कुणावाचून अडत नसतं.

प्रसंग चार –

दवाखान्यातील स्टाफ म्हणाली, “मला एक दिवसाची रजा पाहिजे.”

“का, कशासाठी, कोणासाठी असल्या प्रश्नात मी स्वतः कधी गुंतून रहात नाही, कारण मला माहीत आहे, इथे कुणाचं कुणावाचून अडत नाही.”

रजा लगेच मान्य करून मी मोकळा होतो. दवाखानाही त्यादिवशी सुरळीत पार पडतो.

प्रसंग पाच –

दवाखान्यातील एका स्टाफला अचानक  कामावरून कमी करावं लागणार. अशी धर्मबाह्य कृती तिने केल्यावर जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा, तिचे दवाखान्यासाठी झोकून देऊन काम करणं आठवलं.आपलं म्हणून काम करण्याची वृत्ती आठवली.तिचा सेवाभाव, तळमळ, संतुष्टपणा, डॅशिंग व्यक्तिमत्त्व या सर्वापेक्षा जेव्हा तिचा एक दोष ठळकपणे दिसू लागला, तेव्हा माझेच वाक्य मला आठवलं,

“इथं कुणाचं कुणावाचून अडत नसतं.”

लगेचच तिला कामावरून कमी केलं. तिच्या जागी अन्य दुसरी एक मुलगी मिळाली देखील.

प्रसंग सहा –

आमच्यातल्या एकाच्या लग्नाचं निमंत्रण मला जाणीवपूर्वक दिलं गेलं नव्हतं. मनाला फार झोंबलं. रागही आला.मनाला समजावलं,’ तुझ्या न जाण्यानं कुणाचं काही अडत नाहीये. लग्नाला तू गेला नाहीस, म्हणून लग्न लागणं थांबणार नाहीये. विनाकारण वाद वाढवून, तू उगाच स्वतःला नको तेवढं मोठं करवून घेतोयस.. तू नसलास तरी कुणाचं काऽऽही अडणार नाहीये.’पटलं… आणि विचारांची गाडी पुढे निघाली

प्रसंग सात –

चार पुरूषार्थावर आधारीत समाजरचना होती. मोक्षप्राप्तीसाठी जगायचं होतं.

आमच्या घरातील आजोबा, आज्जींची एक अख्खी पिढी स्वर्गस्थ होताना मी पाहिली आहे. त्यानी पुढील पिढीला दिलेले संस्कार, शिकवण घेऊन एक पिढी तयार झाली. कोणत्याही संस्कार वर्ग वा गर्भ संस्कार वर्गात न जाता घडलेली वडिलांची पिढीदेखील खूप उत्तम होती. आर्थिक दृष्ट्या चणचण असतानाही बारा चौदा बहिणभावंडे छान एकत्र नांदत होती. आयोडीनयुक्त नमक न खातादेखील बुद्धिमान होती. वारसा पुढे देण्याचे काम गुरूजींकरवी सुरू होते.

त्याहीनंतरची आमची पिढी तीन चार संख्येवर येऊन थांबली. आर्थिक सुबत्ता होती. पण एकमेकांना द्यायचा वेळ कमी होत गेला. नंतरची पिढी एक किंवा दोन बस्स पर्यंत घसरली. मार्कांचे परसेंटेज मात्र खूपच वाढले. गुरुजीचे रूपांतर सर आणि मॅडममध्ये झाले.  आईवडिलांचे एकत्रित मार्क मुलाला मिळू लागले. पण तोंडदेखलेपणा सुरू झाला. याच पिढीने मोबाईलचे वेड लावले. नातेसंबंध ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन जुळू लागले. आईवडिलांच्या इच्छेविरूद्ध शिक्षण आणि विवाह होऊ लागले. ग्लोबलायझेशन क्रांतीमुळे जग खूप जवळ आले; पण माणसे एकमेकांपासून मनाने लांब होत गेली. सर आणि मॅडमची जागा टीचरनी घेतली. संस्कार वर्ग आणि गर्भसंस्कार वर्ग सुरू झाले.

एवढे सगळे होऊनही जग पुढे जातच रहातं. कुणाचं कुणावाचून फार अडलेलं नसतं.  आपला खास व्यवसाय, कुटुंब काबीला आणि आपलं स्वतंत्र विश्व भिन्न जाती धर्मातही निर्माण होतं.

हे असंच चालायचं…

तसं बघायला गेलो तर

आपल्याकडील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ एकमेकांवर अवलंबून होते. पण काळाच्या ओघात हे सिलॅबसमधूनच गायब झाले.

प्रसंग आठ-

गणेशोत्सव काळात दोन्ही- तिन्ही दिवस दवाखाना सुरू ठेवावा का, असा विचार मनात आला, पण लगेचच विचार बदलला, याच काळात अनेक चाकरमानी कोकणवासीय कोकणात येणार तेव्हा ते माझ्या दवाखान्यात येऊन पुढील औषधोपचार माझ्याकडून ठरवून घेऊ शकतील, म्हणून दवाखाना बंद नको.

पण लगेचच दुसरा विचार आला, की मी माझ्या कुटुंबीयांसाठी माझा वेळ कधी देणार ? तो या निमित्ताने देता येईल, चार नवीन जुने चेहेरे दिसतील,  सुखदुःखाच्या गोष्टी करता येतील, अनेक भाऊबंध गोळा होतील, पारंपारिक भजनं, आरत्या, उसळीचा दरवळ, मोदकांच्या पंगती, चढ्या आणि खड्या आवाजात देवे म्हणणं, सगळ्याचा आनंद घेता येईल.

घरचे मोदक वळायला आणि इतर आवराआवर करायला दुसर्‍या तिसर्‍या पिढीतील माणसं येतच होती.

आणि दवाखाना बंद ठेवून, सणाच्या निमित्ताने घरच्या व्यक्तींसमवेत मिळून मिसळून रहावं हा विचार पण तसा चूक नव्हता. तसं बघितलं तर मी दवाखान्यात नसलो म्हणूनही माझे सगळे रुग्ण काही लगेच देवाघरी जाणार नाहीत, कारण इथं कुणाचं कुणावाचून अडत नसतं.मी मदतीला नसलो तर गावातील, तालुक्यातील, जिल्ह्य़ातील अन्य वैद्य मंडळी आहेतच की…

मोदक करायला मी नसलो तरी मोदक करून होणारच. भजनाचा फेरही होणार, एकमागून एक पंगतीही उठणार..

जरा अहंकार सोडून बघा, किती मजा आहे, एकत्र रहाण्यात, जगण्यात !

आनंदी आनंद गडे

जिकडे तिकडे चोहीकडे

जगात भरला, दिशात उरला

मोद विहरतो चहुकडे.

जग म्हणतं, तू नाही आलास तरी चालेल, इथे कुणाचं कुणावाचून अडत नसतं. आमचा आनंद आम्ही घेणारच. 

जन पळभर म्हणतील हाय हाय

मी जाता राहील कार्य काय ?

जन पळभर म्हणतील हाय हाय…

इथं कुणाचं कुणावाचून अडत नसतं.

जगाचं रहाट गाडगं तसंच पुढे सरकत असतं.

‘हेही दिवस जातील’असं म्हणत पुढे जात रहायचं असतं.

 

लेखक:वैद्य सुविनय वि. दामले

प्रस्तुती: सौ. वर्षा राजाध्यक्ष

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सोनं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सोनं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

काल जे सोनं होतं

ते आज कचरा झालं

दसरा संपला अन्

महत्त्व त्याचं विरून गेलं||१||

 

अरेच्चा! कालच तर सोनं म्हणून

 देवाचरणी वाहिलं होतं,

सोनं घ्या, सोन्यासारखं रहा

एकमेकांस म्हटलं होतं||२||

 

कळलंच नाही मला,

असं काय झालं,

 हे कालच सोनं

आज कचरा कसं झालं? ||३||

 

आपट्यांच्या पानापानांसारखं

आपणही असतो

कोणाच्या तरी गरजेच्या वेळी

आपण त्याचं सोनं होतो,

त्याची गरज संपली की मात्र

आपणही बाहेर काढले जातो,

दसऱ्याच्या सोन्यासारखं

आपणही कचरा होतो||४||

 

कचरा झालाय आज म्हणून,

आपट्याच्या झाडानं हार मानली नाही,

पुढच्या वर्षी परत दसरा येणार आहे,

म्हणून पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही ||५||

 

मग आपण तर माणसं आहोत,

कोणी कचरा समजलं म्हणून खचून जायचं नसतं,

कोणाची तरी मदत करून

परत सोनं व्हायचं असतं,

आपण बावनकशी सोनंच आहोत,

 हे कदापि विसरायचं नसतं ||६||

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आई गेली आणि माहेर संपले…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “आई गेली आणि माहेर संपले…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

आई जोपर्यंत असते, तोपर्यंत कौतुक असते. आराम असतो. एक प्रकारचा निवांतपणा असतो. तिच्यावर आपले मूल सोपवून बहिणींबरोबर, मैत्रिणींबरोबर गप्पांचे फड रंगतात, भटकणे सुरु होते.

एक स्वातंत्र्य असतेच असते.

ते कुठेतरी हरवले हे मात्र खरे… आई गेली आणि त्या दिवशी हे माहेर संपले.

सुट्टीला घरी आले की आवडणारा पदार्थ आवर्जून करणारी आई….

तुपाची-लोणच्याची-आवडत्या गुळांब्याची बरणी भरून बाजूला काढून ठेवणारी आई….

सकाळी उशीरा पर्यंत हाका न मारणारी आई….

‘झोपा गं आता. खुसूखुसू करत बसू नका, ‘असे सांगणारी आणि अलगदपणे आपल्यामध्ये सामील होणारी आपली आई.

दुपारच्या सुखदुःखाच्या गप्पा. त्यात सुद्धा संसाराचे महत्त्व समजावून सांगणारी आई. तडजोडी करूनचं संसार करावा लागतो. तरच तो आनंदाने होतो, नाहीतर नाते तुटते. ते आपल्याला टिकवायचे आहे, तोडायचे नाही असे सांगणारी आई.

संसारात मन शांत ठेवावे.

भांडण तंटा झाला तर विसरून जावा.

नवऱ्याचे चार चांगले गुण लक्षात ठेवावेत आणि आपल्या चांगल्या वागण्याने हळूहळू माणूस बदलतो हे शिकवणारी आई.

दुपारी जेवण झाले की आडवे होऊन सांगणारी आई. मुलाला वाढवताना कसे वाढवावे हे शिकवणारी आई.

दुपारी गप्पा मारता मारता तिच्या पोटावर हात ठेवून झोपताना एक प्रकारच्या शांततेचा मी अनेकदा अनुभव घेतलेला आहे. तिची कितीतरी रूपे आहेत.

त्यानंतर हळू-हळू संसारात रमायला सुरुवात झाली आणि

‘माहेर’ ही जाणीव कमी होत गेली.

कदाचित स्वीकारले असेल मनाने.

‘ती’ गेली…. आणि‌ तिच्या बरोबर इतकी वर्ष असणारी मावशी, मामा, भाऊ ही माहेरची म्हणून आपली असणारी नातीही गेली. पुसली गेली आपल्या आयुष्यातून.

जिच्यामुळे ती जोडलेली होती तिच्या जाण्याने ती नाती पण कुठेतरी हरवली आणि मागे राहिले एकटेपण..

जे दरवर्षी सुट्टी लागली की प्रकर्षाने जाणवायचे.

आजूबाजूच्या मैत्रिणी, मुलीबाळी

माहेरी जाताना बघून आत कुठेतरी तुटायचे, वाईट वाटायचे. आपल्याला असे ठिकाण राहिले नाही, म्हणून वाईट वाटायचे.

पण हळूहळू माणूस सगळ्या गोष्टी स्वीकारतो. मुले मोठी झाली की आपल्यालाही त्याची सवय होऊन जाते. आता मे महिन्यात जाणवणारा एकटेपणा, माहेर नसल्याचे दुःख कमी झाले आहे. तरी सुद्धा कुठे तरी आत त्याचा सल आहेच.

लाड करून घ्यायला वयाची अट नसतेच मुळी, पण प्रत्येकीला एक हक्काचे माहेर मात्र असावं, असे मला कायमचं वाटत आले आहे.

तो जिव्हाळा, आपलेपणा, कौतुक, डोळयांतलं प्रेम, आराम, ती ऊब, काळजी, कुठेतरी हवीहवीशी वाटत असते. उन्हाळ्याच्या सुट्टीतला हा आनंद हरवलाय एवढे मात्र खरे. ‘मामाच्या गावाला जाऊया’, ही संकल्पना हळूहळू लुप्त होऊ लागलीय.

माहेरी गेले होते गं महिनाभर…

हे कुणाला तरी आनंदाने सांगायचे राहूनच गेले आहे. कित्येक वर्षात.

आई वडील आहेत, तोवर त्यांना जपा, एकन्एक दिवस सगळयांनाच जायचे आहे.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘ब्रह्मानंद…’ –- लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘ब्रह्मानंद…’ –– लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

ब्रह्मानंद म्हणजे शेवटी काय ?    

१२ आनंदांची गोळाबेरीज.

०१. आई  होण्यापेक्षाही… आजी  होण्याचा

      आनंद !

०२. नातवंडाच्या  कृपेने  अंगावरील  कपडे ओले झाल्याचा

      वत्सल आनंद! 

०३. नातवंडानी  केलेले  हट्ट  पुरविण्याचा 

      गोड आनंद !

०४. सुनेने, न  मागता  आणून  दिलेल्या  चहाचा व औषध  घेतले  का.. ?

या  प्रेमळ  चौकशीचा 

      सात्त्विक आनंद !

०५. वाढदिवसाला, मुलाने दिलेल्या  शालीचा….

      उबदार आनंद!

०६. आपण  कुटुंबाला  हवे  आहोत……

या  भावनेचा 

      सुप्त आनंद!

०७. दुपारी  जेवणानंतर  पेपर  वाचता वाचता लागलेली  डुलकी…

      परमानंद !

०८. रात्रीची नीरव शांतता..

आराम खुर्चीवर डोळे मिटून

पहुडलेल्या क्षणी..

आपली आवडती गझल..

रेडिओने गुणगुणावी…

    स्वर्गीय आनंद !

०९. एखादा लेख किंवा कविता

आपण पोस्ट करावी..

मित्रांनी त्याला भरभरुन

दाद द्यावी…

     साहित्यानंद !

१०. मन अशांत असतांना….

देवघरातल्या भजनामुळे निर्माण होणारा..

    कैवल्यानंद !

११. भेटलेल्या  जुन्या  सवंगड्यांच्या भेटीमुळे होणारा…

    अपार आनंद!

१२. नकारात्मक  विचार  सोडून  दिले  की  मिळणारा….

    निर्भेळ  आनंद !

आणि या सर्व आनंदाची बेरीज करुन, ती मनाच्या कप्प्यात साठविली  की, पडल्यापडल्या लागलेली शांत झोप म्हणजेच…

    ब्रह्मानंद !

या पोस्टला मिळालेली दाद म्हणजेच 

    आनंदीआनंद!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शून्य आणि अनंत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ शून्य आणि अनंत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

“तुला कसं कळतं की तू श्रीमंत आहेस?”

या प्रश्नाचं एक अद्भुत उत्तर

एका IIT विद्यार्थ्याकडून :

जेव्हा मी माझं B. Tech करत होतो, तेव्हा आमच्याकडे ‘Mechanics’ शिकवणारे एक प्राध्यापक होते.

त्यांची लेक्चर्स खूपच रंजक असायची, कारण त्यांची शिकवण्याची आणि संकल्पना समजावण्याची पद्धत वेगळीच होती.

एकदा वर्गात त्यांनी काही प्रश्न विचारले:

१. शून्य म्हणजे काय?

२. अनंत म्हणजे काय?

३. शून्य आणि अनंत एकच असू शकतात का?

आम्हाला वाटलं की आम्हाला उत्तरं माहिती आहेत आणि आम्ही म्हणालो:

शून्य म्हणजे काहीच नाही.

अनंत म्हणजे कोणत्याही मोजता येणाऱ्या संख्येपेक्षा मोठी संख्या.

शून्य आणि अनंत हे विरुद्ध आहेत आणि ते कधीच सारखे होऊ शकत नाहीत.

त्यांनी आम्हाला प्रतिवाद करत विचारलं – अनंत म्हणजे नेमकं काय? कोणतीही संख्या कशी काय कोणत्याही मोजता येणाऱ्या संख्येपेक्षा मोठी असू शकते?

आमच्याकडे उत्तर नव्हतं.

मग त्यांनी अनंताची संकल्पना एका मनोरंजक पद्धतीने समजावून सांगितली, जी मला आज ३५ वर्षांनंतरही आठवते.

ते म्हणाले – एखादा निरक्षर मेंढपाळ आहे, ज्याला फक्त २० पर्यंत मोजता येतं अशी कल्पना करा.

जर त्याच्याकडे २० पेक्षा कमी मेंढ्या असतील तर तो नेमकी संख्या सांगू शकेल. (जसं की ३, ५, १४ वगैरे).

पण जर संख्या २० पेक्षा जास्त असेल, तर तो म्हणेल – “खूप आहेत. ”

त्यांनी मग समजावलं की विज्ञानात “अनंत” म्हणजे ‘खूप आहेत’ (आणि मोजता न येण्याजोगं नव्हे) आणि त्याचप्रमाणे “शून्य” म्हणजे ‘फार कमी’ (आणि काहीच नाही नव्हे).

उदाहरण म्हणून ते म्हणाले – जर पृथ्वीचा व्यास सूर्यापर्यंतच्या अंतराशी तुलना केला, तर पृथ्वीचा व्यास फारच लहान असल्यामुळे त्याला शून्य म्हणता येईल.

पण हाच पृथ्वीचा व्यास जर एका धान्याशी तुलना केली, तर तोच व्यास अनंत म्हणता येईल.

म्हणून त्यांनी निष्कर्ष काढला की तीच गोष्ट शून्यही होऊ शकते आणि अनंतही, हे पूर्णपणे संदर्भावर, किंवा तुलना करण्याच्या मापदंडावर अवलंबून असतं.

श्रीमंती आणि गरिबी यांचं नातंदेखील शून्य आणि अनंत यांच्यासारखंच आहे.

हे सगळं तुमच्या इच्छांच्या तुलनेवर अवलंबून आहे.

जर तुमचं उत्पन्न तुमच्या इच्छेपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही श्रीमंत आहात.

जर तुमच्या इच्छा तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असतील, तर तुम्ही गरीब आहात.

मी स्वतःला श्रीमंत मानतो, कारण माझ्या इच्छा माझ्या उत्पन्नापेक्षा खूपच कमी आहेत.

 

मी श्रीमंत झालोय ते खूप पैसा मिळवून नव्हे, तर माझ्या इच्छांना कमी करून.

जर तुम्ही तुमच्या इच्छांना कमी करू शकलात, तर तुम्हीही या क्षणी श्रीमंत होऊ शकता.

तुमचं आयुष्य नेहमी चांगल्या विचारांनी, चांगल्या कर्मांनी, चांगल्या लोकांनी आणि सुंदर मित्रांनी श्रीमंत होवो.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘शून्य महत्वाचे की क्षण?’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘ शून्य महत्वाचे की क्षण?’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै 

जीवनाचे 20 वर्षे वाऱ्यासारखी उडून गेली. मग सुरू झाली नोकरीची शोधमोहीम. हे नाही ते, ते नाही हे. अशी धडपड करत करत 2–3 नोकऱ्या सोडल्या, आणि एक ठरली. थोडी स्थिरता सुरू झाली.

हातात आला पहिल्या पगाराचा चेक. तो बँकेत जमा झाला आणि सुरू झाला खात्यात जमा होणाऱ्या शून्यांचा अखंड खेळ. 2–3 वर्षे पुन्हा उडून गेली. बँकेतले शून्य थोडे वाढले. वय 25 झाले.

आणि मग विवाह झाला. जीवनाची रामकथा सुरू झाली. सुरुवातीची 1–2 वर्षे मऊ, गुलाबी, स्वप्नाळू गेली. हातात हात घालून फिरणे, रंगीबेरंगी स्वप्नं पाहणे. पण हे दिवस पटकन उडून गेले.

आणि मग बाळ येणार ही चाहूल लागली. वर्षभरात पाळणा झुलू लागला. आता सारे लक्ष बाळावर केंद्रित झाले. उठणं, बसणं, खाणं, पिणं, लाड कोड…

वेळ कधी निघून गेला, समजलंच नाही.

या दरम्यान माझा हात तिच्या हातातून कधी निसटला, फिरणं-गप्पा मारणं कधी थांबलं, हे दोघांनाही कळलंच नाही.

बाळ मोठं होत गेलं. ती बाळात गुंतली, मी कामात. घर आणि गाडीच्या हप्त्यांची चिंता, बाळाची जबाबदारी, शिक्षण, भविष्याची सोय, आणि त्याचबरोबर बँकेत शून्यं वाढवायची धडपड. तिनंही स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं, मीही.

इतक्यात मी 35 चा झालो. घर, गाडी, बँकेत शून्यं, कुटुंब—सगळं होतं, तरी काहीतरी कमी जाणवायचं. पण काय, हे कळत नव्हतं. तिची चिडचिड वाढू लागली, मी उदासीन होऊ लागलो.

दिवस निघत गेले. वेळ सरकत गेला. मुलगा मोठा झाला. त्याचं स्वतःचं जग तयार झालं. कधी दहावी आली आणि गेली, कळलंच नाही. तेव्हा आम्ही दोघं चाळिशीत पोहोचलो. बँकेतली शून्यं वाढतच गेली.

एका निवांत क्षणी मला ते गेलेले दिवस आठवले. मी प्रसंग पाहून तिला म्हटलं,

“अगं, इकडे ये जरा. हातात हात घेऊन फिरायला जाऊ या. “

तिनं विचित्र नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली,

“तुला काहीही सुचतं, इथे ढिगभर काम पडलंय आणि तुला फिरायचंय! “

कमरेला पदर खोचून ती निघून गेली.

मग आलं पंचेचाळिसावं वर्ष. डोळ्यांना चष्मा लागला. केसांनी काळेपणा सोडला. डोक्यात गुंतागुंत वाढू लागली.

मुलगा कॉलेजमध्ये. इथे बँकेत शून्यं वाढतच होती. बघता बघता त्याचं कॉलेज संपलं. तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्याला पंख फुटले आणि तो परदेशात उडून गेला.

तिचेही केस पांढरे होऊ लागले. कधी कधी डोकं साथ द्यायचं बंद करायचं. तिलाही चष्मा लागला. मी म्हातारा झालो. तीही वयस्कर दिसू लागली.

दोघं पंचावन्न–साठकडे जाऊ लागलो. बँकेतील शून्यांचा पत्ता नाही. बाहेर जाणं–येणं बंद झालं.

आता गोळ्या–औषधं ठरावीक वेळेला घेणं सुरू झालं. “मुलं मोठी झाली की सोबत राहतील, ” म्हणून घेतलेलं घर आता ओझं वाटू लागलं. मुलं केव्हा परत येतील, याच विचारात उरलेले दिवस जात होते.

एके दिवशी मी सोफ्यावर बसून थंड वाऱ्याचा आनंद घेत होतो. ती दिवा–बत्ती करत होती. तेवढ्यात फोन वाजला. मी पटकन उचलला. समोर मुलगा होता. त्यानं सांगितलं की त्यानं लग्न केलंय आणि आता परदेशातच राहणार आहे.

त्याने हेही म्हटलं, “बाबा, तुमचे बँकेतील शून्य एखाद्या वृद्धाश्रमाला द्या आणि तुम्हीही तिथे राहा. “

काही औपचारिक गोष्टी बोलून त्यानं फोन ठेवला.

मी परत सोफ्यावर येऊन बसलो. तीही दिवाबत्ती संपवून जवळ आली. मी हळूच म्हटलं,

“चल, आज पुन्हा हातात हात घालून बोलूया. “

ती लगेच म्हणाली,

“हो आले. “

माझा विश्वास बसला नाही. चेहरा आनंदाने उजळला. डोळ्यांत पाणी आलं. अश्रू गालांवर ओघळले. अचानक डोळ्यांची चमक हरवली आणि मी कायमचा शांत झालो.

ती पूजा संपवून माझ्या जवळ आली. म्हणाली,

“बोल, काय म्हणत होतास? “

पण मी काही बोललो नाही. तिनं माझ्या शरीराला स्पर्श केला. शरीर पूर्ण थंड झालं होतं. मी तिच्याकडे एकटक पाहत होतो.

क्षणभर ती शून्य झाली.

“काय करू? “

तिला काही सुचेनासं झालं.

पण दोन मिनिटांतच ती सावरली. हळूहळू उठली, देवघरात गेली, एक अगरबत्ती लावली. देवाला नमस्कार करून परत आली.

माझा थंड झालेला हात हातात घेतला आणि म्हणाली,

“चल, कुठं फिरायला जायचंय तुला? काय गप्पा मारायच्या आहेत तुला? सांग! “

असं म्हणताना तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. माझं डोकं तिच्या खांद्यावर झुकलं. बाहेर अजूनही थंड वारा वाहत होता.

हेच का जीवन?

सगळे आपलं नशीब घेऊनच जन्माला येतात. म्हणून थोडा वेळ स्वतःसाठीही काढा. जीवन आपलं आहे, तर जगण्याची पद्धतही आपली असली पाहिजे.

सुरुवात आजच करा, कारण उद्या कधीच येणार नाही…

” तुम्हाला काय वाटतं… बँकेतले शून्य महत्त्वाचे आहेत की एकत्र घालवलेले क्षण? “

 लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रूप पाहता लोचनी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रूप पाहता लोचनी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

नवरात्रात देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते. आपण जर आजूबाजूला शोधले तर ही देवीची नऊ रूपे आपल्या घरातच सापडतील. ती अशी:

 

पहिली माळ – ‘मातृदेवतेची’.

जी आपल्यासाठी कष्ट उपसताना दिवस-रात्र, आजारपण, थकवा, तहान-भूक कशाचीही पर्वा करत नाही.

आपल्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करणे सोडत नाही.

मातृदेवते, तुला शतशः प्रणाम!

 

दुसरी माळ – ‘आजी’ नामक ‘मायेच्या सागराला’.

जिच्याजवळ आपल्या दुधावरच्या सायीसाठी प्रेम, माया, ममता, आशीर्वाद यांचा जादूचा खजिनाच दडलेला असतो.

 

तिसरी माळ – ‘माय मरो, मावशी जगो’ या उक्तीला जी जागते त्या ‘मावशीची’.

आईच्या बरोबरीने आपल्यावर मायेची पाखर घालणारे कोणीतरी या जगात आहे याची जाण देणारी.

 

चौथी माळ – लहानपणी आपल्याला कडेवर घेऊन फिरवते त्या ‘आत्याची’.

वडील रागावल्यावर पाठीशी घालून पदराने डोळे पुसणारी…

… प्रेमळ, लाघवी आत्या.

 

पाचवी माळ – मायेच्या ‘बहिणीची’.

लहान असो वा मोठी,

आपली सुख-दुःखं वाटून घेणारी,

गुपिते पोटात लपविणारी.

 

सहावी माळ – लग्नानंतर मिळालेल्या मैत्रिणीची… ‘नणंदेची’.

आपल्याला आलेल्या छोट्या-मोठ्या अडचणींचे निवारण करणारी.

लग्नानंतर नवीन घरात नवखेपणा जाणवू न देता,

अलगद बहिणीची माया देणारी.

 

सातवी माळ – ‘अहों’च्या मातृदेवतेची… ‘सासुबाईंची’.

सासरच्या पद्धती, रीतीरिवाज, आवडी-निवडी शिकविणारी.

ते सारं अंगवळणी पडेपर्य॔त सांभाळून घेणारी.

 

आठवी माळ – जीवाला जीव देणाऱ्या जिवलग ‘सखीची’.

आपले रुसवे-फुगवे सहन करणारी.

आपल्या यशात स्वतःचे यश मानणारी.

चांगल्या-वाईट सवयींकडे दुर्लक्ष करून खरी मैत्री जोपासणारी.

गोड गुपिते सांभाळणारी,

सडेतोडपणे खरे सल्ले देऊन सावरून घेणारी.

 

नववी माळ – आपल्या लाडक्या ‘लेकीची’.

जिच्या जन्मामुळे झालेल्या आपल्या मातृत्वाच्या सार्थकतेची.

आपल्यावर रागावणारी, रुसणारी…

पण वेळप्रसंगी,

कधी आपली आई,

तर कधी मैत्रीण होऊन

आपल्याला समजून घेणारी.

जगातल्या कोणत्याही गोष्टींपेक्षा प्राणप्रिय असणारी…

‘आपला अमूल्य ठेवा, आपला श्वास, आपलीच छोटी बाहुली’.

 

शेवटचा ‘दसरा’ –

‘जो कामवाल्या बाईबरोबर होतो हसरा’.

आपला उजवा हातच जणू.

जिच्या न येण्याने वेळापत्रक कोलमडतं.

वेळप्रसंगी ‘ताई तुम्ही थकलात, मी करते, बसा तुम्ही’,

असं म्हणून आपला शीण घालविणारी.

 

– रोजच्या जीवनातील देवींची ही वेगवेगळी रूपे.

– त्यांना ‘शतशः नमन’!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महापूजा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ महापूजा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. उषा नाईक ☆

‘मी’ ‘माझे’ ‘माझ्यामुळे’ हे शब्द  अहंकारामुळे बंधनात टाकतात.

आपल्याकडून सारे करवून घेतो तो  दयाळू परमात्मा.त्याने जन्मस्थ सारे नीटनेटके अवयव दिले नसते तर आपण काय करू शकणार होतो ?

*मी सुंदर चित्र काढले, कारण मला डोळे आणि हातांची साथ मिळाली. ती देणगी भगवंतानी दिली.

*मी रोज सुखाने जगतोय, कारण प्रभूने प्राणवायू निर्माण केला आहे.

*मी बोलून संवाद करीत आहे, कारण मला जीभ आणि स्वरयंत्राची देणगी दिली आहे.

*मी सर्वत्र भ्रमण करतो, कारण मला चालायला पाय दिले आहेत.

*मला सारे आठवते, कारण मला स्मरणशक्ती दिली आहे

*बालपणी माझी उदरभरणाची सोय झाली, कारण मातेच्या स्तनात देवाने दुग्धनिर्मिती करून ठेवली.

*मला सुमधुर संगीताचा आनंद घेता येतो,व्यवहार करता येतो, कारण मला जन्मस्थ श्रवणशक्ती दिली आहे.

*मी अन्नपाणी गिळू शकतो, कारण माझ्या श्वासनलिकेवर एक पडदा येऊन ते अन्नपाणी परस्पर अन्ननलिकेत पोहोचते.

*जन्मापूर्वीच शरीरात सा-या सुविधा ठेवून गर्भाशयातून माझी सुखरूप सुटका ‘त्या’ ने केली आहे.

मग माझे कर्तृत्व काय आहे ? मी उगाच का मिरवत बसावे ? कर्ता करविता  ‘तो ‘ आहे ही जाणीव नित्य ठेवणे हीच महापूजा आपण करावी.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक गाय, ३३ कोटी देव = २० रु” – सुश्री आशा धनाले ☆ प्रस्तुती – सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा  

? वाचताना वेचलेले ?

☆ “एक गाय, ३३ कोटी देव = २० रु – सुश्री आशा धनाले ☆ प्रस्तुती – सुश्री त्रिशला शहा

★★★

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर. केशवचंद व्यापाऱ्याचं दुग्ध भंडार. त्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची रेलचेल. केशवचंदचा धाकटा मुलगा या दुकानाचा मालक. त्याच्या शेजारी हिरव्या चाऱ्याचं एक लहानसं दुकान. त्यामध्ये चाऱ्याच्या लहान मोठ्या पेंड्या भरलेल्या. त्याचा मालक मोठा मुलगा.

आज त्यांच्या घरी मोठ्या मुलाची सोयरीक करण्यासाठी पाहुणे आलेले. पाहुण्यांना घराची, दुकानांची स्थिती अतिशय समाधानकारक दिसली. पण त्यांच्या मनात जी मोठी शंका होती ती त्यांनी बोलून दाखवलीच. “काय हो शेठ, मोठ्या मुलाचे चाऱ्याचे दुकान आणि धाकट्याचे दुग्ध भांडार. असे का? ” केशवचंदनी समजावून सांगितले, “अहो, खरे तर मोठ्या मुलाच्या दुकानावरच धाकट्याचा धंदा चालतो. म्हणून मोठ्याचाच फायदा जास्त आहे. ” ” आॅं, ते कसे काय? ” “अहो, हे काय, समोरच मंदिर आहे. प्रवेशदाराच्या बाहेर, उजव्या बाजूला दोन गाई हिरवा चारा खात आहेत ना, त्या गाई पण आमच्या आणि चारा पण आमचा आहे. ” शेठ नी सांगितलं.

पाहुण्यांच्या डोक्यात गोंधळ सुरू झाला. गाईंच्या चारा खाण्यापासून दुकानाचा फायदा कसा काय? केशवचंदनी हसत हसत पुन्हा समजावले, “पाहुणे, असं बघा, इथे त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी गाय फार महत्त्वाची आहे. कारण तिच्या अंगात ३३ कोटी देव आहेत. ‘२० रु. ची फक्त एक छोटीशी चारापेंडी गाईला खायला घालून ३३ कोटी देवांना तृप्त करता येते व मोठे पुण्यही कमावता येते. ‘ हे असे आम्हीच भक्तांना सांगतो. त्यामुळे दिवसभर गाईंना चारा खायला घालण्यासाठी प्रचंड रीघ लागते. प्रत्येक एका तासानंतर आम्हाला गाई बदलाव्या लागतात. अशा २० गाई आमच्याकडे आहेत. त्यांची पोटं भक्तगणच भरतात. या गाईंकडून रोज मिळणाऱ्या उत्पादनावर धाकट्याचे दुकानही चालते. जिथे गाई उभ्या आहेत त्या जागेचे भाडे नाही, चारा पेंडी देण्यात मेहनत खूपच कमी, फायदा मात्र दिवसभर आणि वारेमाप. तर काय पाहुणे? आहे ना तुमचा होणारा जावई लाखांचा धनी? मग जमवायची ना सोयरीक? अहो, इथे येणाऱ्या भक्तांच्या भक्तीचा प्रश्न आहे. ती भक्ती अबाधित ठेवली की झालं! पैसाच पैसा. काय समजलं? ” 

“आता सगळं व्यवस्थित समजलं शेठ! आता सोयरीक जमवणार तर त्र्यंबकेश्वरच्या मुलाशीच. कारण इथं भोळ्या भक्तांना कधीच तोटा नाही. ‘जय भोलेनाथ! ‘ “ 

★★★

लेखिका : सुश्री आशा धनाले

मिरज

प्रस्तुती : सुश्री त्रिशला शहा 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares