☆ “सेवानिवृत्ती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
☆
नोकरीनंतर निरुपयोगी म्हणजेच ‘रिटायर्ड’ झाल्यानंतर सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर वेळ घालवणे ही एक भीषण समस्या बनली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लोकांनी विविध मार्ग आणि पद्धती शोधून काढल्या आहेत.
काही ‘कष्टाळू ब्रँड’चे लोक निवृत्ती नंतर लगेचच चित्रपटातील ‘रामू काकां’च्या भूमिकेत येतात आणि सकाळी लवकर उठून खांद्यावर टॉवेल टाकून घराची साफसफाई आणि स्वयंपाकघर साफ करायला लागतात.
उरलेल्या दिवसात ते त्यांच्या बायकोसाठी ‘वाहन चालक’ म्हणून सेवा देतात आणि बाजारात खरेदी किंवा चित्रपट वगैरे दाखवतात. अशा लोकांच्या पत्नींनी पूर्वजन्मात काही चांगले कर्म केले असावे, ज्याचे फळ म्हणून त्यांना ही सुखासीन परिस्थिती प्राप्त झाली आहे.
असेही काही लोक आहेत जे निवृत्तीनंतर अचानक अतिधार्मिक बनतात आणि ते यापूर्वी कधी मंदिरात डोकावलेही नसले तरीही सकाळ संध्याकाळ दोन दोन तास विविध मंदिरात पूजा आणि भजन कीर्तन करण्यात घालवतात. अशा लोकांना आपण नोकरीस असताना केलेल्या सर्व गैरकृत्यांच्या पापांतून आता निस्तरले जात असल्याची भावना होत आहे.
सेवानिवृत्तांचा असा आणखी एक वर्ग आहे, ज्यांच्यामध्ये निवृत्तीनंतर अचानक वाल्मिकी आणि तुळशीदासांचे आत्मे प्रवेश करतात आणि ते रातोरात ‘कवी’ च्या भुमिकेत येतात. हे लोक सोशल मीडियावर असे विचार लिहितात की त्यांचे मित्र या काव्य-प्रदूषणाने त्रस्त राहतात पण नाइलाजाने ‘व्वा व्वा’ म्हणणं भाग पडतं.
अशी काही थोर माणसे सुद्धा बघायला मिळतात, ज्यांच्यात ‘राजकारणाचा किडा’ नेहमी धुमाकूळ घालत राहतो आणि नोकरीच्या कार्यकाळात ‘आपण जनतेत खूप लोकप्रिय होतो, ‘ असा त्यांना भ्रम निर्माण होतो आणि निवृत्त होताच ते एखाद्या राजकीय पक्षाशी किंवा नेत्याशी हातमिळवणी करतात व एखाद्या गटात सामील होऊन निवडणूक लढवतात आणि निवडणुकीत आपटले की ते खूप संतापतात, पण त्यांना हे क्वचितच माहीत असते की नोकरीत असताना त्यांची होणारी विचारपूस किंवा त्यांना ‘मिळणारा मान, होणारा आदर’ हा त्यांच्या आसनस्थ पदामुळे त्यांच्या लाळघोटेपणा करणाऱ्या चमच्यांनी पसरवलेला खोटा आभास होता. मग ते अनेकदा पक्षाच्या कार्यालयाबाहेर लाह्या किंवा चणे खात असताना दिसतात.
निवृत्त वृद्धांचा एक मोठा वर्ग असा देखील आहे जे कुटुंबात कदाचित ‘नकोशे झालेले’ आहेत आणि म्हणूनच त्यांना घराबाहेर पडण्याचा एक अनोखा मार्ग सापडतो. सकाळी दहा वाजता ते स्वत:ची व कुटुंबातील सर्वांची बँकेची पासबुके जमा करतात आणि कुठल्यातरी बँकेत प्रवेश करून त्या पासबुकांच्या नोंदी काढण्यात आणि बँकेच्या वातानुकूलित वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी दिवसाचे एक दीड वाजवतात. हे लोक बँकेच्या ग्राहकांपेक्षा जास्त तेथील कर्मचारी असल्यासारखे दिसतात आणि बँक कर्मचाऱ्यांचे जगणे ते कठीण करुन सोडतात.
वरील सर्व श्रेण्यांव्यतिरिक्त, मोठ्या संख्येने सेवानिवृत्त लोकांची आवडती ठिकाणे म्हणजे शेजारची उद्याने, जिथे ते सकाळ-संध्याकाळ फिरण्याच्या बहाण्याने जमतात आणि त्यांच्यापैकी कोणीही नोकरीत असताना आपापल्या क्षेत्रात कधीही सकारात्मक काम केले नाही, हे साफ विसरून सरकारला शिव्याशाप देण्याचे त्यांचे आवडते कार्य करत राहतात व दीर्घकाळ हळहळ व्यक्त करत असतात.
आमच्या अनेक सेवानिवृत्त बांधवांना हे सर्व अजिबात आवडत नाही आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ घरातच राहायला आवडते. अशा लोकांसाठी त्यांच्या सुना व मुलांनी वेळ घालवण्याचे चांगले साधन शोधून ठेवले आहे. आपल्या लहान मुलांना त्यांच्याकडे सोपवून सर्व काळजींपासून मुक्त होऊन ते ऑफिस, मार्केट आणि थिएटरमध्ये जातात आणि हे निवृत्त भाऊ लगेच ‘आजोबा’ च्या भूमिकेमध्ये येतात आणि आपल्या मुलांसाठी ते अत्यंत उपयुक्त आणि कामाचे व मौल्यवान असल्याचे सिद्ध करतात.
ज्यांची मुले-मुली कुठेतरी परदेशात आहेत, तिथे गेल्यावरही हे लोक महिनोनमहिने उत्तम ‘बाळ संगोपन’ सेवा दिल्याबद्दल कृतज्ञ होत आहेत.
यांतील असेही काही आहेत की निवृत्त झाल्यावरही ज्यांचे चेहरे मोहरे अजूनही तेजस्वी, ओजस्वी आणि समाधानाच्या ओघवत्या तेजाने चमकत आहेत. अशांच्याभोवती त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी ते सतत लोकांच्या गर्दीने वेढलेले आहेत. त्यांना आदराने, भेटवस्तू दिल्या जात आहेत.
काही सेवानिवृत्त लोक त्यांचे नोकरीत असतानाचे ‘कारनामे’ ऐकवण्यासाठी ‘श्रोते’ शोधत बागेत फिरतात, कारण बायको त्यांच्या या भाकडकथांना कंटाळालेली असते आणि मुलगा व सून मोबाईलमधून डोकंही वर काढत नाहीत.
काही सेवानिवृत्त लोक कार्यालयातील सवय झालेल्या फुकट चहाची तलफ भागवण्यासाठी जवळपासच्या चौकातील चहाची टपरी आणि जुन्या मित्रांच्या शोधात फिरत आहेत. घरात तर शुगर आणि वाढत्या वयाचे दाखले देत त्यांच्या चहा पिण्यावर बंधन घालण्यात आले आहे.
मला आशा आहे की आपण या वर्णनात स्वत: कुठे बसतो ते शोधत आहात.
मी स्वतः माझी जागा आणि काम निवडण्यासाठी प्रत्येक युक्तीचा अवलंब करत आहे. उंट कोणत्या बाजूवर बसणार हे बघू या..
तुम्हा सर्वांचे निवृत्ती नंतरचे जीवन सुखमय, आनंदी व स्वास्थ्यपूर्ण राहो
हीच सदिच्छा…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर
☆ आलोच पहा… कविवर्य ग. ल. ठोकळ – संकलनकर्ता – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
कविवर्य ग. ल. ठोकळ ह्यांची माझ्या बालपणी खेड्यातील शाळेत ऐकलेली कविता विस्मृतीत गेली होती आणि फक्त पहिली ओळ आणि पायजमा, अर्ध्या बटनपट्टी चा फुल शर्ट आणि गांधी टोपी अश्या वेशातील गुरुजींनी मदर इंडिया तल्या दुनिया में हम आये हैं तो जीना ही पडेगा ह्या गाण्याची चाल लावून दिलेली आठवत होती. खूप काळ अनेक ठिकाणी शोधल्या नंतर सापडली एकदाची.
लाही लाही करायला लावणाऱ्या, शरीराची काहिली करणाऱ्या ह्या उन्हाळ्यात कविवर्य ठोकळांचा शब्द न शब्द मनाला भिडतो.
☆ जतन करून ठेवण्यासारखे काहीतरी… ☆
☆
आलोच पहा ग्रीष्म अशी दे ललकारी
ओतीत सुटे आग नभी सूर्य दुपारी
या ऊन झळा या करिती तप्त शरीरा
आता कुठला शितळसा विंझण वारा
कासाविस हो जीव, ती सूर्य करांनी
घामेजूनी अंगांग निघे चिंब भिजोनी
देई फिरताना चटके ऊन फुपाटा
अंगात भरे पूर्णपणे शीण गाळाठा
एकेक तरू लागतसे पार झडाया
कोठून मिळावी हिरवी पाखर माया
खाऊन उन्हाळा सुकली ही वनराई
दृष्टीस पडेना हिरवे चार कुठेही
काळी ठिकळे आणिक हे कुंपण काटे
या वाचून शेतात दुजे काही न भेटे
या शुष्क तृणांनी भरल्या पाऊल वाटा
रानात दिसे जीर्ण उभा लाकूडफाटा
बारीक ढगाळी दिसती सुन्न आभाळी
रोडाऊनी ओढ उघडी होत लव्हाळी
झाडांवर पक्षी दिसती केविलवाणी
आणिक पिकांची सरली साखरराणी
ओहोट कधी घेईल हा तीव्र उन्हाळा
देईल कधी पाणकळा सुख जीवाला…
☆
कविवर्य ग. ल. ठोकळ (१९३१)
संकलक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मृत्यू गरजेचा आहे का?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
एका राजाने शहराबाहेर, एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारले, _
“साधूमहाराज, मला अमर करू शकेल अशी दिव्य वनौषधी किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का?“
साधू म्हणाला, “ हे राजा, हा समोरचा व त्यापलीकडील असे दोन पर्वत ओलांडून गेलास की, तुला एक सरोवर लागेल. त्याचे पाणी तू पी, म्हणजे अमर होशील. “
ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला. त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची ओंजळ करून सरोवरावर तो वाकला. तेवढ्यात त्याच्या कानावर कुणी तरी कण्हत असल्याचा आवाज आला. पाणी पिणे बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने गेला. एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कण्हत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. राजाने त्याला कण्हण्याचे कारण विचारले. तो म्हणाला, या सरोवराचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आले. परंतु वयाची शंभरी ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हकलून दिले. गेली पन्नास वर्षे मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलो आहे. आता माझी मुलं तर मेलीच, पण नातवंडेही मरायला टेकली असतील. हे बघावे लागू नये, म्हणून गेली पाच वर्षे मी अन्नपाण्याचा त्याग केला आहे. तरीही मी मरत नाही. ” त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला, “ छे! नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही. म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं, तरच त्यात मजा आहे. आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू. “
त्याने साधूकडे पर्याय मागितला. साधू म्हणाला, “ ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्यापुुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास, तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल. त्या वृक्षाचे एक फळ तोडून तू खा. म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल. ”
साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला. त्याने एक पिवळे धमक फळही काढले. आता तो ते फळ खायला सुरुवात करणार, तोच जवळपास भांडण सुरू झाल्याचा आवाज कानावर पडला. एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल, या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला. तिथे त्याला चार तरुण आढळले. त्यातल्या एकाला राजाने भांडणाचे कारण विचारले, त्यावर तो म्हणाला, “आता मी अडीचशे वर्षांचा आहे. तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले तीनशे वर्षांचे माझे बाबा, पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत. मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करु.? “
राजाने त्या युवकाइतक्याच तरुण दिसणाऱ्या दुसऱ्या युवकाला विचारले, तर तो म्हणाला, “ अहो, माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले हे माझे साडेतीनशे वर्षांचे वडील आहेत. ते मला संपत्ती देत नाहीत, तर मी तरी मुलाला कुठून संपत्ती देऊ सांगा. ”
साडेतीनशे वर्षांच्या तरुणाकडे राजाने प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले असता, तो म्हणाला, “ मी तरी संपत्ती कुठून देणार? ही चूक माझ्या वडिलांची आहे. ते आता ४०० वर्षांचे आहेत. ”
यावर राजा म्हणाला, “ पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगर दऱ्यांमध्ये का वास्तव्य करताय? ” यावर पणाजोबा म्हणाले, “आमच्या घरात दिवसरात्र मालमत्तेवरून भांडणे होत असल्याने, गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिले आणि आम्हाला इथे राहावे लागत आहे. ”
तो प्रकार पाहून राजा म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळाले, तर तेही नकोच. कारण ते जास्त भयंकर आहे. राजा साधूजवळ परत आला आणि म्हणाला, “ तुम्ही मला मृत्यूचे महत्त्व पटवून दिलेत.
मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे, अन्यथा जवळचीच माणसे आपल्याच माणसांच्या जीवावर उठली असती. ”
साधू म्हणाला, “ मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे. त्यातच खरा आनंद आहे आणि मृत्यूनंतर उत्तम गतीही आहे! “
स्वतः बदला, जग बदलेल!!
१) स्नान करताना नाम घेतले तर ते ‘तीर्थस्नान’ होईल!
२) भोजन करताना नाम घेतले तर तो ‘प्रसाद’ होईल!
३) चालताना नाम घेतले, तर ती ‘तीर्थयात्रा’ होईल!
४) स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो ‘महाप्रसाद’ होईल!
५) झोपताना नाम घेतले तर ती ‘ध्याननिद्रा’ होईल!
६) काम करताना नाम घेतले तर ते कर्म ‘भक्ती’ होईल!
७) घरात नाम घेतले, तर ते घर ‘मंदिर’ होईल!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत वाचताना आज एक ओळ फार आवडली, की महाराज करतल भिक्षा घेत असत.
करतल म्हणजे हाताच्या तळव्यावर मावेल इतकी!!
मला हा शब्द खूपच आवडला. प्रत्येक गोष्टीत समाधान मिळण्यासाठी परमेश्वराने जास्तीत जास्त माप म्हणजे ‘करतल’ दिले असावे असे मनात आले.
करतल म्हणजे ओंजळभर!
आता हेच पहा ना…. खूप तहान लागली असली तर फक्त ओंजळभर पाणी प्यायले तरी तृप्ती होते. इतकंच काय.. ओंजळभर फुलांचा सुगंध मन व्यापून टाकतो.
आपल्या प्रियजनांचे हात आपल्या ओंजळीत घेतले की एक वेगळीच अनुभूती होते.
खुप दुःख झाले की आपल्याच ओंजळीत चेहरा झाकून मुक्तपणे अश्रूंना वाट करून दिली की मन हलके झालेच म्हणून समजा….!!
तर कधी एखादी सलज्ज ललना ओंजळीत आपला चेहरा झाकून आपला संकोच व्यक्त करू शकते.
बाप रे… केवढे महत्व आहे ना ह्या ओंजळीचे….!!
म्हणजे परमेश्वरानेच खऱ्या समाधानाचे हे परिमाण आपल्याला ठरवून दिले आहे. त्याचा आपल्याला विसर पडता कामा नये असे पटकन मनात आले.
दोन्ही करतल एकत्र केले की होतो नमस्कार. किती छान पद्धत आहे भारतीयांची हात जोडून अभिवादन करण्याची!!
समोरच्याचे मन जिंकायला दोन करतल पुरेसे आहेत. कोणाला धीर देतांना त्याचे दोन्ही करतल आपल्या दोन्ही करतलांनी घट्ट धरले तर समोरच्याला किती मोठा दिलासा मिळतो ते शब्दांत सांगणे कठीण आहे.
अर्घ्य देतात तेही ह्याच करतलांच्या ओंजळीने आणि एखाद्या स्वमालकीच्या गोष्टीवर पाणी सोडतात तेही ह्याच ओंजळीने!!
ज्ञानेश्वर महाराजांनी देखील समस्त विश्वाच्या शांती साठी परमेश्वराकडे दोन्ही करतल जोडून प्रार्थना केली आणि ‘पसायदान’ मागितले… l!
खरंच परमेश्वराने केलेल्या या छोट्या छोट्या योजना माणसाला आत्यंतिक समाधान देऊन जातात. आणि मन जेव्हा असे समाधानाने भरून जाते, तेव्हा आपोआपच शब्द ओठी येतात……….
तेथे कर माझे जुळती!!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “पुणे स्पेशल दवाखाना!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
— जराशी गंमत हं 🤪
:: डॉ…., सदाशिव पेठ यांची नियमावली ::
उधारी अजिबात नको! आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील!
लिहून दिलेली पूर्ण ट्रिटमेंट घ्यावी! अपूर्ण उपचार घेणारे अतिशहाणे पेशंट गुण न आल्यास डॉक्टरांचेच नाव बदनाम करतात!
प्रत्येक आजार आमच्याकडेच बरा होईल असा काही नियम/नवस नाही! मी डॅाक्टर आहे, तुमचे कुलदैवत नाही!
पेशंटने लुंगी/बनियन/बरमुडा घालून दवाखान्यात येऊ नये! आपण चेन्नई मध्ये राहत नाही!
सांगितलेल्या तपासण्या लवकरात लवकर कराव्यात!
(तुमच्या सवडीने तपासणी केली तर आमच्या सवडीने बरे केले जाईल)
एका पेशंटसोबत एकाच जबाबदार व्यक्तीने सोबत यावे!
इष्टमित्र सहपरिवार यायला इथे आम्ही लग्नाची पंगत बसविलेली नाही! तसेच सोबत आलेल्यांनाही मध्ये-मध्ये आपल्या स्वतःच्या कंप्लेटस् सांगू नयेत! आपणास प्रत्येक व्यक्तीची वेगळी फी द्यावी लागेल! एका पेशंटवर त्याच्या अख्ख्या घरादाराची तपासणी फ्री, ही योजना आमच्या दवाखान्यात तरी नाही,
इंजेक्शन घ्यायचे असल्यास मनाची तयारी घरूनच करुन यावी, ऐनवेळी लहान मुलांसारखा आकांडतांडव करण्यासाठी हा बालवाडीचा वर्ग नाही!
कोठल्यातरी अर्धवट नातेवाईकाच्या सल्ल्याने आणलेल्या औषधी, दवाखान्यात दाखवायला आणून त्या घेऊ का असे विचारुन डॅाक्टरांचा वेळ घेऊ नये!
(घरीच परस्पर खाऊन तिकडेच खपावे)
कन्सलटंट कडून तपासून आल्यावर ती फाईल फॅमिली डॅाक्टरकडे परत दाखवायला आणायची नाही! (तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल डॅाक्टर कधीही गॅासीपींग करत नाहीत)
कुठल्यातरी डॅाक्टरकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग इतर डॅाक्टरांवर काढू नये! (इतर पेशंट्सकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग डॅाक्टर्संनी पण आपल्यावर काढला, तर आपल्याला अनंतात विलीन व्हावे लागेल)
तुम्ही ग्राहक बनला, तर डॅाक्टर दुकानदार बनेल!
तुम्ही आधी ‘माणूस’ बना, मग डॅाक्टर अवश्य ‘देवमाणूस’ बनतील…!
-ट्रिटमेंट पुरता आपला डॉक्टर!
धन्य ते पुणेकर!!
लेखक : अज्ञात
संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈