मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “अंतर्मुख करणारी गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “अंतर्मुख करणारी गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

लग्न पार पडलं होतं. आता निरोपाचा क्षण आला होता.

नेहा आपल्या आईला मिठी मारून रडली, मग ती आपल्या वडिलांच्या कुशीत शिरली.

सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते.

ती आपल्या लहान बहिणीच्या सोबत सजवलेल्या गाडीकडे निघाली होती.

नवरदेव अविनाश आपला मित्र विकाससोबत गप्पा मारत होता.

विकास म्हणाला,

“यार अविनाश, एक काम कर…

घरी पोचताक्षणी ‘अमृतबाग’ हॉटेलमध्ये जाऊ आणि मस्त जेवण करू…

इथे तुझ्या लग्नात काही मजा आली नाही जेवणात. “

तेवढ्यात अविनाशचा धाकटा भाऊ राकेश म्हटला, ” पनीरची भाजी पण काही खास नव्हती…आणि रसगुल्ल्यात तर रसच नव्हता. खूपच पांचट जेवण होते रे “

आणि मोठ्याने हसायला लागला.

अविनाशही हसत म्हणाला –

“जाऊ आपण अमृतबागला, जे पाहिजे ते खा…

इथे काही चवच नव्हती… पुऱ्यापण गरम नव्हत्या. ” मामा व मावस भाऊ, मावस बहिणी म्हणाल्या की आपण झोमॅटो वरून काहीतरी इथे चटपट मागून घेऊ.

हे सगळं ऐकून,

नेहा तिचं पाऊल गाडीत टाकणारच होती की ती अचानक मागे वळली,

डोईवरचा पदर काढून कंबरेला खोवत तडक वडिलांकडे आली आणि त्यांचा हात हातात घेत म्हणाली,

“मी या लग्नाला नकार देते बाबा…

माझं हे लग्न मला मान्य नाही! “

सगळे थक्क झाले…

नेहाच्या सासरच्यांना तर धक्काच बसला… कोणालाच काही कळेनासे झाले.. सगळे

तिच्याजवळ जमले.

सासरे श्यामराव पुढे आले.

“अगं सुनबाई, असं झालं तरी काय?

लग्न पार पडलं आहे…

आता अचानक का नाही म्हणतेस? “

अविनाशही धावत आला,

त्याचे मित्र, भावंडं सर्वजण…

नेहा सासऱ्यांना म्हणाली,

“मामंजी, माझ्या आई-वडिलांनी स्वतःच्या इच्छा मारून माझं शिक्षण, माझं भविष्य घडवलं…

वडिलांनी किती रात्रंदिवस जागून

या लग्नासाठी तयारी केली…

आईनं नवीन साडीही घेतली नाही,

दुसऱ्याची साडी घालून लग्नात उभी आहे…

वडील १५० रुपयांचा शर्ट घालून उभे आहेत…

त्या शर्टच्या आत शंभर भोकं असलेलं बनियन आहे!

आणि माझ्या नवऱ्याला पुऱ्या थंड वाटल्या??

त्याच्या मित्राला पनीर आवडलं नाही??

दिराला रसगुल्ला फिक्का वाटला??

ही फक्त अन्नावर टीका नाही,

माझ्या वडिलांच्या त्यागावर, मेहनतीवर आणि इज्जतीवर चिखलफेक आहे…

हे जेवण कॅटररनं बनवलंय.

माझ्या वडिलांनी नाही…

पण त्यांच्या मनानं, मनगटानं, त्यागानं ते अन्न बनलंय…

आणि त्या अन्नाची निंदा करणं म्हणजे माझ्या वडिलांचा अपमान करणं. “

वडिल म्हणाले –

“बाळा, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी…? “

नेहा म्हणाली –

“ही छोटी गोष्ट नाही बाबा…

माझ्या पतीच्या नजरेत जर माझ्या पित्याचा मान नाही,

तर मला असा संसार नको…

माझ्यात तुमचं सर्वस्व आहे,

हे ज्यांना दिसत नाहीत,

त्यांच्याशी माझं नातं मी जोडणार नाही. “

इतकं बोलल्यावर सगळे शांत झाले…

 

अविनाश पुढे आला, हात जोडले सासऱ्यांपुढे,

“माफ करा बाबा… माझी चूक झाली…

मी अज्ञानीपणानं बोललो…”

श्यामराव पुढे आले, डोळ्यात पाणी होतं “बेटा, मी सुन घेऊन जायचो म्हणत होतो,

पण मला मुलगी मिळाली…

माझं नशीब की ईश्वराने तुला माझी कन्या बनवली…

माफ कर मला… मला पूर्ण खात्री आहे की तू माझं घर उजळवशील. “

नेहाने त्यांच्या पायाला स्पर्श् केला…

” मामंजी …”

ते म्हणाले – “नाही, आता फक्त ‘बाबा’ म्हण. “

दोघेही भारावून गेले…

शंकरराव अभिमानानं पाहत होते…

आपली कन्या आज खऱ्या अर्थाने मोठी झाली होती…

आता नेहा सासरी रवाना झाली…

मागे राहिलं फक्त तिचं घराभोवतीचं रिकामं झालेलं अंगण,

आई-बाबांचे अश्रूंनी भरलेले डोळे…

आणि एक मोठा संदेश….

“जेव्हा आपण कुणाच्या मुलीच्या लग्नाला जाऊ, तेव्हा भाजी बेचव, पुऱ्या थंड, रसगुल्ला कोरडा वाटल्यासारखी टीका करू नका…

कारण त्या अन्नासाठी एका वडिलांनी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केलेला असतो,

त्या जेवणाला बनायला केवळ २ तास लागले असतील,

पण त्या अन्नामागे मुलीच्या पित्याचा अनेक वर्षांचा संघर्ष असतो…

“लेक” ही परकं धन नसते,

ती आई-वडिलांची शान असते.

जर ही कथा मनाला स्पर्शून गेली असेल,

तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा…

लेकीचा मान ठेवा…

एका वडिलाच्या स्वप्नांचा आदर ठेवा……

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “एका रुपयात पोटभर आनंद!” – लेखक : श्री रवींद्र पिंगे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

 ? वाचतांना वेचलेले ?

☆ “एका रुपयात पोटभर आनंद!” – लेखक : श्री रवींद्र पिंगे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

घटना घडायच्या असल्या की, त्या ‘अचानक’ घडून जातात.

आता मी ‘अचानक’ हा शब्द वापरलाय खरा, पण तो निव्वळ सवयीने. अचानक वगैरे काहीही नसतं. सर्व काही ठरलेलं, पूर्वनियोजित असतं. महाकवी शेक्सपिअरचे शब्द आहेत, ‘‘कुठली घटना घडायची नि कुठली माणसं तुम्हांला आयुष्यात भेटायची, ह्याचं रोपण अगोदरच झालेलं असतं. ’’

ह्याचा मला प्रत्यय आला.

बाजारात नऊ रुपयांची खरेदी केली. त्यासाठी दहा रुपयांची नोट दिली, तर दुकानदार म्हणाला, ‘‘माझ्याकडे परत करायला एक रुपया सुटा नाही. ’’

आता काय करावं? माझ्या पत्नीने मला केव्हापासून बजावून ठेवले आहे की, कुणाकडेही परत करायला एखादी रुपया नसला, तर त्याला रुपयाच्या मिरच्या घालायला सांगायचं. स्वयंपाकात पावलापावलाला मिरच्या लागतात. त्या मागायच्या म्हणजे दुकानदार यांचंही नडत नाही नि आपलंही काम होऊन जातं. हे खरंच आहे, पण ज्या दुकानदाराकडे परत द्यायला सुटा रुपया नव्हता, ते भाजीपाल्याचं दुकान नव्हतं; वाटलं, आपण त्या रुपयाचा मोह सोडून द्यावा. नाहीतरी आजकाल रुपयाला मोल उरलंय कुठं? असं काय मिळणारंय त्या चिमुकल्या रुपयात? त्यापेक्षा आपण त्या रुपयावर पाणी सोडू या. रिक्षावाल्यांकडे परत करायला सुटे पैसे अनेकदा नसतात, तेव्हा आपण कुठे भांडत बसतो? सोडून देतो ते पैसे. तसंच हेसुद्धा करायचं. पैसे सोडायचे. मग फेरविचार केला, रुपयावर पाणी नाही सोडायचं. पैसे मिळवायला आपल्याला किती कष्ट उपसावे लागतात! आपण थोडा वेळ थांबू, दरम्यानच्या काळात दुकानदाराकडे सुटा एक रुपया नक्कीच येईल. तो घ्यायचा नि नंतरच निघायचं.

सुदैवाने तिष्ठावं लागलं नाही. माझा बाकी रुपया माझ्या ताब्यात घेतला.

पुढचा प्रश्न- ह्या रुपयात अशी काय मोठी खरेदी करता येणाराय? साधे मुरमुरेसुद्धा मिळणार नाहीत. इतक्यात आठवलं की एका रुपयात दोन पोस्टकार्ड मिळतात. ती घेऊ या. घेतली.

लगेच पुढचा प्रश्न – ही कार्डं पाठवायची तरी कुणाला? हल्ली घरोघरी दूरध्वनी यंत्रं बसलेली आहेत. जे काय निरोप द्यायचे-घ्यायचे असतात, ते तिथल्या तिथे वेळ न दडवता फोन वरून दिले-घेतले जातात. लिखापढीची कटकट करतो कोण? मग आता ह्या दोन कार्डांचं करायचं काय?

इतक्यात आठवलं, की आम्हांला साठ वर्षांपूर्वी शाळेत शिक्षक असलेले मुळ्येमास्तर आता नव्वद वर्षांचं पिकलं पान होऊन बोरिवलीला आपल्या नातवाकडे राहायला आले आहेत. त्यांनी मला कोणे एके काळी बीजगणित शिकवलेलं आहे. त्यांना जुनी आठवण काढून पत्र पाठवावं. कृतज्ञता व्यक्त करावी.

दोनांपैकी एक कार्ड मायाळू शब्द पेरून मी मुळ्येसरांना पाठवलं. आठवडाभराने त्यांचं कापऱ्या अक्षरातलं जिव्हाळ्यानं लिहिलेलं उत्तर आलं;

“चि…, तुझं पत्र वाचून आनंद झाला, त्यापेक्षा आश्चर्य वाटलं, कारण गेल्या पंचवीसेक वर्षांत मला कुणीही, कधीही साधं कार्डसुद्धा पाठवलेलं नाही. ही जगरहाटीच आहे. जुनी माणसं कालांतराने अडगळीत पडतात. त्यातून मी तर साधा शिक्षक. तू माझा विद्यार्थी होतास हे मला आठवत नाही, पण तू माझी इतक्या वर्षांनंतरही आठवण ठेवलीस ह्याचा संतोष आहे. कधीतरी समक्ष भेटायला ये. लवकर ये, मी कायम घरीच असतो. येताना भेटवस्तू आणू नये, मला त्याचा काहीच उपयोग नाही. फक्त प्रेम आणावे.’’

मुळ्येसरांचं पत्र वाचून मी गहिंवरलो. वाटलं, मी कृतज्ञतेने त्यांना कार्ड पाठवलं ही लाख मोलाची गोष्ट झाली. अस्ताला चाललेला तो म्हातारा जीव किती फुलला असेल!

दुसरं कार्ड तसंच पड़ून राहिलं. नंतर माझी कोकणात फेरी झाली. तिथे खाड़ीकाठावरल्या बंदरात मी तरीची वाट पाहत रेंगाळलो होतो. बंदरात कोकणी मुसलमान होडीवाल्यांची नि मच्छीमारांची अगदीच रया गेलेली वस्ती आहे. मूर्तिमंत दारिद्र्य, आश्चर्य म्हणजे मी तरीची वाट पाहात असताना बंदरावर माझ्या शेजारी एक गरीब कोकणी मुसलमान बाईसुद्धा तरीची वाट पाहत उभी होती. तिच्यासोबत तिचं तीन-साडेतीन वर्षाचं लेकरू होतं. त्याच्या अंगावर जेमतेम कपडे होते. तरीची वाट पाहणारी ती खेडवळ माता आपल्या त्या मुलाला गाणं म्हणत नाचायला, डुलायला, हावभाव करून कौतुकाने शिकवीत होती, नि ते बाळ आईने दाखवल्याप्रमाणे आपल्या परीने नाच करून दाखवीत होतं. गाणं होतं,

‘नाच रे मोरा…. ‘

मायलेकरांचा तो उमाळ्याचा प्रेमाचा प्रसंग पाहून मला खोलवर दिलासा वाटला. एक कंगाल कोकणी मुसलमान माता, जिला कदाचित मराठीची अक्षरओळखसुद्धा नसेल, ती आपल्या लेकराला एक गाणं तालावर म्हणून नाचायला, डुलायला शिकवते ही किती हृद्य घटना आहे! ह्या गीताचे शब्द गदिमांचे नि तालबद्ध स्वररचना पु. ल. देशपांडेंची. माझ्या मते मराठीतलं अगदी तळागाळापर्यंत झिरपत गेलेलं गाणं म्हणजे पु. लं. नी संगीतबद्ध केलेलं ‘नाच रे मोरा… ‘ अक्षरओळख असो-नसो, गळ्यात सूर असो-नसो, घरोघरच्या आयांनी आपल्या लेकरांना ते गाणं साभिनय म्हणून दाखविलेलं आहे, नि घरोघरचे बोबडे बालगोपाल ते सूर ऐकताना ठेक्यावर डुलले आहेत. गावोगावच्या मातांनी आणि त्यांच्या लेकरांनी ते गाणं गात गात घरीदारी आनंदाचा कल्लोळ अनुभवला असेल. हजार वेळा, घरी परतल्यावर त्या शिल्लक राहिलेल्या कार्डावर हा प्रसंग लिहून मी पु. लं. ना कळवला नि लिहिलं,

‘ज्ञानोबांचे नि तुकोबांचे शब्द समाजात तळागाळापर्यंत पोहोचले असं आपण म्हणतो, ते खरंच आहे. पण गायला सहज-सोपी आणि हावभाव करून दाखवायला त्याहीपेक्षा सोपी, अशी तुमची लयबद्ध चाल तळागाळापर्यंत पोहोचलेली, मी मालप्याच्या तरीवर ऐकली. कोण ती कोकणातल्या बंदरवस्तीतली एक मुस्लीम माउली? पु. ल. देशपांडे हे नावसुद्धा तिला माहीत नसेल, पण तुम्ही विणलेली रेशमी चाल मात्र तिच्या काळजापर्यंत पोहोचली नि ती तिच्या हाडकुळ्या लेकराला सुरावर म्हणते, ‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात… ‘ आणि ते बाळ तसं नाचतं! अशा हजारो-लाखो आया गावोगाव असतील. भाई, तुम्ही जिंकलंत!’ 

भाईंचं कापऱ्या अक्षरात लिहिलेलं कार्ड उलट-टपाली आलं. त्यांनी लिहिलं होतं, ‘‘पिंगे, तू अगत्याने लिहिलंस त्याचा आनंद झाला. स्वर चिरंतन असतात. म्हणून तर भास्करबुवांच्या चाली शंभर वर्षं टिकून आहेत. एका चित्रपटासाठी मी बांधलेली चाल लोकांनी आपली मानली. आपलीशी केली. ती चाल पु. ल. देशपांडेंची आहे हे लोक विसरलेसुद्धा! पण कोमल सूर जिवंत आहेत. मी कसलाही पराक्रम केलेला नाही. फक्त जीव ओतून काम केलं. ते माझ्या हातात होतं. कंपवातामुळे हात थकला. थांबतो. ’’

तुझा,

‘भाई.’

हे पत्रोत्तर हाती पडलं तेव्हा माझं भान हरपलं. कलावंताच्या आयुष्याचे सार्थक कशात असतं, ते पु. लं. नी दोन वाक्यांत सांगितलं. जीव लावून काम करा, बस्स. क्षणभर वाटलं, ते कार्ड फ्रेम करून भिंतीवर लावावं, तेच थोर लेखक, जे अनुभवाचे उत्तर दोन-चार शब्दांत तुमच्या हाताला लावतात. विनोबांच्या नंतर त्या ताकदीचे फक्त पु. ल. देशपांडे!

पुढे व्हायचं तेच झालं. ह्याला दाखव, त्याला दाखव, करता करता पत्राला पंख फुटले. घ आभाळात दूर कुठेतरी ते भटकत असेल. हाती आलेल्या एका रुपयाची दोन पोस्टकार्डं मी सहज म्हणून खरेदली नि ती योग्य ठिकाणी, योग्य संदर्भात निर्हेतुक पाठवली. त्यांच्या बदल्यात मला लाभलेला आनंद केवढा पोटभर ठरला!

तुम्हाला आठवतं का तुम्ही शेवटचं पत्र कधी आणि कुणाला पाठवलं…. तुम्हाला कुणाचं आलं…

धन्यवाद ! आपल्या वाचनाबद्दल !!

 

लेखक : रवींद्र पिंगे

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ’हो… अगदी आत्ताच जागा झालोय’ – लेखक : श्री सचिन श. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ ’हो… अगदी आत्ताच जागा झालोय’ – लेखक : श्री सचिन श. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

” हो… अगदी आत्ताच जागा झालोय “

बर्‍याच दिवसांनी आला होता तो आज, त्याच्या आईकडे. पुण्याहून मुंबईला येणं हल्लीच्या दिवसात, हे एखाद्या फाॅरेन कंट्रीहून येण्यासारखंच झालं होतं. पण तरीही तो आला होता… एकटाच. आतून अगदी खोलातून त्याला वाटलं होतं की, आईला ताबडतोब भेटायला हवं. मग वर्क फ्राॅम होमचं मानगुटीवरचं भुत… दोनेक दिवसांकरता उतरवून, त्याने मुंबई गाठली होती. आई अर्थातच खुश झाली होती प्रचंड, लेकाला जवळपास आठेक महिन्यांनी बघून. आणि लगोलग थोडीशी नाराजही झाली होती… सुन, नातवंडं नं आलेली पाहून. अर्थात ह्या अशा दिवसांत… लहानग्यांना घेऊन प्रवास शक्यतो टाळावाच, हे समजून घेतलं होतं आईने.

तर अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा, चौकशा, हालहवाल झाल्यावर… आई उठली स्वैपाक करायला. लेकाला आवडते म्हणून… डाळींबी भिजवून अगदी स्वतः सोलून ठेवली होती तिने, तिचीच उसळ करणार होती आई आज. जोडीला अर्थातच आमरसही होता. तो मस्त पहुडला होता, बेडरुमच्या खिडकीखाली असलेल्या पलंगावर. इथे पडल्या पडल्या खिडकीतून बाहेर बघत बसणं, हा त्याचा छंद असे कोणे काळचा. त्यावेळी खिडकीतून तो दूरवरचा डोंगर दिसत असे… पण आता झालेल्या दोन – तीन बिल्डिंग्जमुळे, तो डोंगर पार अडला होता. पुर्वी सुर्योदय दिसणार्‍या ह्या खिडकीतून आता, थेट मध्यान्हीलाच त्याचं दर्शन घडत असे. आज डोक्यावरचा सुर्य पाहून हळहळला होता तो.

तेवढ्यात मस्त हापुस आंब्याचा, सुवास दरवळला घरभर… आंबे पिळायला घेतले गेले होते म्हणजे. पाठोपाठ वाजलेल्या कुकरच्या शिट्टीने, शिजलेल्या डाळींबीचा गंध घरभर पसरवला. पोळीवाल्या काकूंनी तव्यावर उपडी केलेली पोळीही मग, मागे न राहता खरपूस घमघमून गेली. पाठोपाठ ‘घर्रर्र’ करुन वाजलेल्या मिक्सरच्या भांड्याचं झाकण… आईने उघडायचीच खोटी होती की, लसूण चटणीचा चटका आसमंतात दर्वळला. तोपर्यंत गॅसवरील पातेल्यातून उकळी फुटलेली आमटीही, हळूवारपणे येऊन नाकाशी हुळहुळली. त्याच्या मनात विचार आला की… “सुख म्हणजे आणिक काय असतं? “. आणि तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं, समोरच्या भिंतीवरच फडफडणार्‍या मराठी कॅलेंडरकडे. पुर्णपणे कोरं – करकरीत दिसत होतं ते. त्याच्या आईला कॅलेंडरच्या प्रत्येक तारखेवर, काही ना काही लिहायची सवय होती. त्याला आश्चर्य वाटलं की… “अरे हे असं इतकं रिकामं कसं? “.

ह्या विचारांतच त्याने उठून… ते कॅलेंडर हूकवरुन काढून हातात घेतलं, नी अगदी जानेवारीपर्यंत मागे गेला तो. पण एकाही तारखेवर, अगदी काहीही लिहिलेलं नव्हतं. तेवढ्यात त्याला दिसलं मागल्या वर्षाचं कॅलेंडरही, त्याच हूकवर टांगलेलं… ज्याच्या वरच हे नवं कॅलेंडर लावलेलं आईने. त्याने ते जुनं कॅलेंडरही काढलं, नी चाळू लागला तो. तर ते ही कोरच होतं. डिसेंबर, नोव्हेंबर, आॅक्टोबर असं एकेक महिना मागे जात जात… तो जुलैवर गेला नी थबकला. जुलै २०२० च्या १ ते १५ तारखा, आईच्या अक्षराने भरलेल्या होत्या. १ तारखेवर लिहिलेलं… ‘ह्यांची अमूक एक गोळी सुरु, पुढील दोन महिन्यांकरीता’. ४ तारखेवर लिहिलं होतं… ‘ह्यांच्यासाठी नवी छत्री नी पावसाळी बुट आणले’. ६ तारखेवर लिहिलेलं… ‘ह्यांच्यासाठी कंबरदुखीच्या डाॅक्टरची अपाॅईंटमेन्ट घेतली ९ तारखेची’. अशा त्या १ ते १५ तारखांपैकी… आठ – नऊ तारखांवर आईने लिहिलं होतं, पण फक्त त्याच्या बाबांबद्दल. त्याने मागे जात आणिक दहा – बारा तारखा चेक केल्या वेगवेगळ्या महिन्यांच्या, तर त्यांवरही बाबांबद्दलच काही ना काही लिहिलेलं दिसलं त्याला आईने. तो पुन्हा जुलै महिन्यावर आला… आणि त्याने १४ तारीख पाहिली, तर ती वर लिहिलं होतं… ‘ह्यांच्या जिभेची चव गेली आज’. लगेच त्याने १५ तारीख बघितली, जी शेवटची तारीख होती काहीतरी लिहिलेली. आणि त्यावर आईने लिहिलेलं… ‘आज ह्यांना कुठलाच वासही येईनासा झाला’.

मघापासून इतके वेगवेगळे सुगंध छातीत भरुन घेणार्‍या त्याच्या, ते वाचून छातीतच चर्रर्र झालं. पुढल्या तीनच दिवसांत… म्हणजे १८ जुलै २०२० ला, त्याचे बाबा गेले होते. आणि कॅलेंडरवरच्या १८ तारखेला होता, एक मोठ्ठा काळा टिंब… अर्थातच फुलस्टाॅप. “म्हणजे बाबा गेले त्या दिवसापासूनच, आपल्या आईचं आयुष्यही थांबलं? … तिला आता फरकच पडेनासा झालाय की, आज काय तारीख आहे? … इतकी रिकामी झालीये ती अंतरातून, ह्या कॅलेंडर्स सारखीच? ” ह्या विचारांनीच गलबलून आलं त्याला. पण त्याने आईकडे मात्र, काहीच विषय काढला नाही ह्या बाबत. दुपारचं आईच्या हातचं मनसोक्त जेवण करुन, तिच्या हातून काही घास भरवून घेऊन… तो तृप्त होऊन झोपी गेला. संध्याकाळी पाचच्या सुमारास, चहाच्या आधणाच्या वासानेच त्याला जाग आली. आणि पुन्हा त्याला ती मागल्या वर्षीची… १५ जुलै तारीख आठवली, नी आठवलं आईने लिहिलेलं… ‘आज ह्यांना वासही येईनासा झाला’. त्याला पुन्हा कसंनूसं झालं, आणि तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं कॅलेंडरकडे आजच्या तारखेवर.

तो चमकलाच… घाईत पलंगावरुन उतरत, तो भिंतीशी गेला. आणि त्याला दिसलं… त्याच्या आईने लिहिलेलं काहीतरी, आजच्या तारखेवर… ‘आज लेकाला हातचं करुन जेऊ घातलं… अचानक पुन्हा जगावसं वाटू लागलं’. हे वाचलं मात्र… एक हुंदका त्याला न जुमानता, जोराने बाहेर निघालाच. आजच्या तारखेवरुन हळूवार बोट फिरवत राहिला तो. तेवढ्यात आईचा आवाज आला स्वैपाकघरातून… “चहा झालाय रे… जागा झालास का? “. तो रडतच ओरडून म्हणाला… “हो… आजच, अगदी आत्ताच जागा झालोय”. उपड्या हातांनी दोन्ही डोळे पुसत उठला तो जागचा, मनोमन निर्धार करुनच की… “आता ह्यापुढे आईला आणि कॅलेंडरातील ह्या तारखांनाही, कधी एकटं पडू द्यायचं नाही”.

 

लेखक : श्री सचिन श. देशपांडे

प्रस्तुती :श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुरेख शब्दकळा म्हणजे नेमकी कशी? – कवी : वसंत बापट ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ सुरेख शब्दकळा म्हणजे नेमकी कशी? – कवी : वसंत बापट ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सुरेख शब्दकळा म्हणजे नेमकी कशी?

याचं एक उत्तम उदाहरण 

 

बाभुळझाड “

*

अस्सल लाकूड, भक्कम गाठ

ताठर कणा टणक पाठ

वारा खात गारा खात बाभुळझाड उभेच आहे

*

देहा फुटले बारा फाटे

अंगावरचे पिकले काटे

आभाळात खुपसून बोटे बाभुळझाड उभेच आहे

*

अंगावरची लवलव मिटली

माथ्यावरची हळद विटली

छाताडाची ढलपी फुटली बाभुळझाड उभेच आहे

*

जगले आहे, जगते आहे

काकुळतीने बघते आहे

खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे

*

टक… ट्क… टक… ट्क…

चिटर फट्क… चिटर फट्क…

सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलतो आहे, शोषत आहे

*

आठवते ते भलते आहे

उरात माझ्या सलते आहे

आत काही कळते आहे, आत फार जळते आहे

कवी – वसंत बापट 

कविता मना-मनातली”

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “२० x २० इंच आकाराचा जीवनपट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

 

☆ “२० x २० इंच आकाराचा जीवनपट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

खेळता खेळता छोटी नात धावतच माझ्याकडे आली आणि साप-शिडीचा पट खाली आपटत म्हणाली….

बाबा, या दुष्ट सापाला मारून टाका… बघा ना… सारखा मला गिळतोय… 

तिची बालसुलभ तक्रार ऐकून हातातली काठी उगारत मी म्हणालो…

थांब हं थोडे…. आता त्या सापाला या काठीनं मारूनच टाकतो. 

मी दिलेल्या आश्वासनामुळे नात निश्चिंत झाली आणि तिनं पुन्हा आपल्या खेळाकडे धूम ठोकली. 

आता माझ्या समोर साप-शिडीचा पट होता. का कुणास ठाऊक पण त्यावरचा लांबलचक साप उगाचच माझ्याकडे बघून हसतोय अस मला वाटलं आणि माझ्या मनात एक प्रश्न डोकावून गेला…

कुणी शोधून काढला असेल हा साप-शिडीचा खेळ…

मग मोबाईल वर नुकताच डाऊनलोड केलेला चाट जीपीटी ओपन केला आणि टाईप केलं…

महोदय, कृपया साप-शिडी अर्थात स्नेक अँड लॅडर या खेळा सबंधीची माहिती द्या.

क्षणार्धात साप-शिडी संबंधी खूप सारी माहीती माहीती माझ्या मोबाईलवर दिसू लागली आणि सगळ्यात शेवटी लिहलं होत स्नेक अँड लॅडर या खेळाचा शोध १३ व्या शतकात भारतात लागला. 

बापरे! 

आता मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहोचली आणि मी वेगवेगळे संदर्भ पाहू लागलो. आश्चर्य म्हणजे वाचता वाचता अस लक्षात आल की ज्याला आपण साप-शिडी किंवा स्नेक अँड लॅडर म्हणतो त्या खेळाचा शोध १३ व्या शतकात लागला हे खरंच होतं, पण या खेळाच्या शोधाच श्रेय संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे जातं.

हो.. तुम्ही अगदी बरोबर वाचताय, आपली ज्ञानेश्वर माऊली या साप-शिडी खेळाची जन्मदात्री आहे. 

कसं घडलं हे सारं…

हे ऐकणही खूप मनोरंजक आहे. म्हणजे त्याच अस झालं की….

एकदा मुक्ताबाई आणि तिची भावंड दुपारच्या प्रहरात अंगणात चेंडू खेळत होती. नेहमी प्रमाणे ज्ञानेश्वर माऊली आपल्या आध्यात्मिक लिखाणात गढून गेली होती. ऊन्ह खूपच वाढू लागलं तशी मुक्ताबाई अस्वस्थ झाली आणि धावतच ज्ञानेश्वर कडे येऊन म्हणाली…

दादा, अरे बघ तर बाहेर, सुर्य कसा आग ओढतोय…

आता तूच सांग असल्या उन्हात आम्ही कसे खेळणार?

त्यापेक्षा तूच अस काहीतर कर ना की ज्यामुळे आम्हाला घरातल्या घरातच खेळता येईल.

आपल्या लाडक्या बहिणीचा हट्ट पुरविण्यासाठी काहीही करायला तयार असणारे ज्ञानेश्वर क्षणभर विचार करतात आणि एक नविनच खेळ मांडून देतात ज्याच नाव होत साप आणि शिडी.. 

कधीही…कुठेही… खेळता येणाऱ्या या साध्या सुध्या खेळात मानवी जीवना सबंधी खूप काही सांगणार तत्त्वज्ञान भरून राहील आहे… 

साप-शिडीचा पट हाच मुळात प्रत्येकाचा जीवनपट आहे. २० X २० इंच आकाराच्या या पटात ५० चौकोनी घरे असतात……. 

पहिलं घर असतं जन्माचे आणि शेवटचे घर असतं मोक्षाचे. जीवनाचं सार्थक खऱ्या अर्थाने मोक्षातच असत, या मध्यवर्ती कल्पनेवर या पटाची मांडणी केलेली आहे. 

या खेळात, स्वतः तुम्ही, साप आणि शिडी ही पात्र केंद्र स्थानी असतात आणि तुम्ही प्रत्येक कवड्यांनी दिलेल्या दानाच्या अधीन असता. या कवड्या म्हणजे जणू काळाच स्वयंप्रेरित रूपच असत म्हणूनच त्या खेळाव्याच लागतात आणि जर तुम्ही खेळला नाही तर तुमचा जीवन प्रवास इथेच संपतो. 

जीवनातील विविध सुखाच्या वळणावर किंवा टप्प्यावर नेणाऱ्या प्रत्येक शिडीला ज्ञानदेवानी वेगवेगळी नावे दिलेली आहेत जशी की… सत्संग, सत्कर्म, दया, क्षमा, शांती, प्रेम, सद्बुद्धी तर यातील सापांना नावे आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. 

या खेळात कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या तर बोनस दान मिळते म्हणजे तुमची कृती अर्थात कर्म उत्तम झाले तर तुम्हाला आयुष्यात पुन्हा एकदा संधी मिळते. 

नेहमीच्या साप-शिडी पेक्षा ज्ञानदेवांच्या साप-शिडीचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ही साप-शिडी चित्रांकित आहेच, परंतु शब्दांकितही आहे.. म्हणजे साप शिडीच्या पटाला संलग्न असणाऱ्या दुसर्‍या पटावर कोणती कवडी कोणत्या घरात पडली तर नेमक कस वागाव यासंबंधीच भावपूर्ण मार्गदर्शन अगदी सहज सुंदर ओव्या मधून केलेलं आढळत.

उदा. तुम्ही क्रोधाच्या घरात गेलात तर तिथे तुम्हाला संयमाच महत्व सांगणारी ओवी भेटेल. तुम्ही विद्येच्या घरात गेला तर विद्या विनयान कशी शोभते या संबंधीचा गुरुमंत्र भेटतो. 

समजा तुम्ही हा साप शिडीचा खेळ, खेळता-खेळता खेळतच राहिलात … तर याचा अर्थ तुम्ही जोपर्यंत शेवटच्या मोक्षाच्या घरासाठी पात्र होत नाही तोपर्यंत जन्म-मृत्यूच्या चौर्‍याऐशी लक्ष योनीत भरकटतच राहणार. 

जीवन प्रवासाचं वास्तविक दर्शन घडविणारा आणि खेळता खेळता नकळत अध्यात्माकडे प्रवाहीत करणारा हा साप शिडीचा खेळ खरोखर अद्भूत आहे याची प्रचिती येते. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी या साप-शिडीच्या खेळाचं मोक्षपट असे समर्पक आणि अर्थपूर्ण नामकरण केलेले आहे. 

काळाच्या ओघात बरेचसे संदर्भ धुसर होत चाललेत हे खरंच आहे. डॉ. एरिक सँड यांचे एक विद्यार्थी सर जेकॉब हे मध्ययुगीन काळात भारतात खेळले जाणारे खेळ या विषया वर संशोधन करत होते त्यावेळी त्यांच्या ध्यानात अस आल की भारतात १३ व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी साप-शिडी खेळाची निर्मिती केली. या सबंधीचा संदर्भ पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात आजही उपलब्ध आहे. 

इंग्रजांच्या भारतातील वास्तव्यात त्यांना बुद्धीबळाप्रमाणेच साप-शिडी हा खेळ खूप आवडला. हळू हळू तो इंग्लंडपर्यंत पोहचला. मग इंग्लंडच्या राणीने त्यात काही बदल केले आणि त्याचं आधुनिक ‘स्नेक अँड लॅडर’ अस नामकरण करून टाकलं. 

माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यतचा प्रवास या मोक्षपटात सामावलेला आहे. जिज्ञासेपोटी माझ्या माहितीत आलेली ही रंजक माहिती मला खूपच उद्बोधक वाटली आणि ती आपल्यापर्यत पोहचावी यासाठीच हा लेख प्रपंच…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाप गेल्यावर जेव्हा आई ‘बाप’ होते – लेखक : श्री सचिन साळुंके ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ बाप गेल्यावर जेव्हा आई ‘बाप’ होते – लेखक : श्री सचिन साळुंके ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

काही घरात वडील खूप लवकर जातात … अचानक… अकस्मात… नियतीच्या अनपेक्षित निर्णयामुळे.

त्यांच्या जाण्याने घर रिकामं होतं, मन कोसळतं, आणि जगणं उध्वस्त होतं.

पण त्या घरात एक व्यक्ती असते.. जी रडत नाही, थांबत नाही, आणि स्वतःसाठी काहीच मागत नाही. कारण तिचं संपूर्ण आयुष्य त्या क्षणापासून केवळ आपल्या मुलांसाठी समर्पित झालेलं असतं.

…… ती म्हणजे – आई … 

– जी त्या क्षणापासून फक्त आई राहत नाही… ती ‘बाप’ सुद्धा बनते.

– वडील गेल्यानंतर ती केवळ रडत बसणारी स्त्री राहत नाही,

– ती आपल्या मुलांसाठी दृढ बापाची जागा घेणारी योध्दा बनते.

– तिच्या हसण्यामागे दुःख लपलेलं असतं,

– तिच्या डोळ्यांत अश्रूंऐवजी संयम असतो,

– आणि तिच्या पायांखालच्या जमिनीवर पुन्हा उभं राहण्यासाठीची एक असामान्य ताकद असते.

 

अशा घरात आईची भूमिका दुहेरी असते

—ती चूल सांभाळते आणि वेळ पडल्यास मजुरी सुद्धा करते.

—ती डबा करते आणि फी सुद्धा भरते.

—ती रडत नाही, कारण तिला माहित असतं.. तिचं रडणं म्हणजे तिच्या लेकरांचं धैर्य ढासळणं.

 

आई म्हणजे अशी शक्ती असते, जी आपल्या लेकरांसाठी स्वतःचा शोक गिळते, आणि त्या वेदनेतून संघर्ष उभा करते.

आईला जेव्हा माणसं विचारतात – “कसं जमवतेस सगळं? ”

ती हसते…

कारण तिला सांगता येत नाही की –

— रात्री मुलांना झोपवल्यावर उशीवर तोंड लपवून ती किती वेळा रडलीये.

तिला सांगता येत नाही की –

— मुलांना दूध प्यायला द्यावं म्हणून ती स्वतः चहा न घेता झोपलीये.

तिला सांगता येत नाही की –

— मुलांच्या शाळेच्या फीसाठी तिनं आपली नवीन साडी घेण्याची इच्छा किती वेळा गिळलीये.

 

ती सांगत नाही — 

पण तिचा प्रत्येक श्वास, प्रत्येक कृती, फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी झिजलेली असते.

ती कधी “बाबा” म्हणून हाक मारून घेत नाही.

— पण ती “बाबा” होऊन जगते –

— ती पाठीवर थाप देते,

— ती अभ्यासाला बसवते,

— ती धपाटेही मारते,

— ती बाजूही घेते,

— आणि मुख्य म्हणजे – ती ” मी आहे ना ” असं म्हणत, बाबांची जागा भरते.

आईला माहीत असतं.. तिचं दुःख सांगायला ती मोकळी नाही, कारण तिच्या अश्रूंनी घराचं छप्पर गळायला लागेल. म्हणून ती भक्कम राहते…– लोहासारखी मजबूत, आणि तरीही आतून पूर्णपणे वितळलेली.

 

एकदा एक मुलगा मोठा झाल्यावर म्हणाला, —

— ” आई, तू मला कधीच बाबांची उणीव भासू दिली नाहीस! “

आई हसली… कारण तिचं खरं यश हे होतं – की तिचा मुलगा कधीच अपूर्ण वाटला नाही.

– ती कधी ‘अधुरी’ नव्हती, कारण तिचं प्रेम संपूर्ण होतं…आई म्हणून मायेचं, आणि बाप म्हणून पाठबळाचं.

… ती रडली, पण मुलांपुढे नाही.

… ती हरली, पण मुलांसाठी नाही.

… ती थकली, पण कधी दाखवलं नाही.

आज जर घरात मुलं डॉक्टर झाली, इंजिनिअर झाली, कोणाचंही नाव मोठं झालं तर त्यामागे ‘ ती ‘ एकच व्यक्ती असते.. “आई”, जिचं स्वतःचं नाव कुठेच गाजलं नाही.

— तीच ती, जिला बाप गेल्यावर संस्कारही द्यावे लागले, आणि संस्कारही शिकवावे लागले.

तिच्यामुळेच घरात देव अजूनही आहे,.. तिच्यामुळेच घराचं दार अजूनही उघडतं,.. तिच्यामुळेच मुलांचं मन अजूनही गाभाऱ्यात आहे.

 

आई हीच ‘वडीलांची जागा घेणारी’ एक अजरामर मूर्ती असते. तिला कधी कुठल्या पावलाने मोजता येत नाही,.. ती कुठल्याच मापात बसत नाही.

– कारण ती देव नसूनही देवाला शिकवणारी असते.

 

आज जर तुमच्या जीवनात वडील नसतील, आणि तरीही तुम्ही हसताय, शिकताय, प्रगती करताय

तर फक्त एकदा तिच्या पायाशी बसा… आणि पोटात साठवलेलं सगळं बोला…

…. कारण ती आई आहे – ती रडत नाही, पण तुमच्या शब्दांवरून समजते.

…. ती मागत नाही, ती तक्रार करत नाही, पण तुमच्या यशावर मनोमन फुलते.

” बाप गेल्यावर जी आई ‘बाप’ होते – तिचं नाव संपूर्ण देवपणाच्या पुढे असावं! “

तिला “आई” म्हणण्याआधी “माझा आधार, माझा शक्ति स्तंभ, माझा ‘बापसुद्धा'” म्हणावं…

कारण काही आई आज फक्त ‘आई’ राहिल्या नाहीत … तर त्या ‘आई-बाप’ झाल्या आहेत!

आई-बापाची दुहेरी भूमिका वठवणाऱ्या प्रत्येक आईला बाप पेज तर्फे समर्पित……..

 

लेखक : श्री सचिन साळुंके

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चतुर्भुज राम मूर्ती…” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

 

☆ “चतुर्भुज राम मूर्ती…” – माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

बऱ्याच वर्षांपूर्वी घडलेली घटना……

मध्यप्रदेशातली मराठी संस्थाने म्हणजे ग्वाल्हेरचे शिंदे, इंदूरचे होळकर व धारचे पवार. धारच्या हद्दीत राम मंदिर येते. ज्यावेळी उत्तर हिंदुस्थानात मुसलमान सत्ता होती तेव्हा मंदिर व मूर्तीची तोडफोड होत असे. तेव्हा पुजारी व भक्त मंडळी देवाची मूर्ती अज्ञात ठिकाणी लपवून ठेवीत असत. पुण्याचे एक रामभक्त ब्राह्मण होते. त्यांना श्रीरामाचा दृष्टांत झाला की तू धारला ये व मला बाहेर काढ. सुरुवातीला त्यांनी लक्ष दिले नाही तेव्हा त्यांना चतुर्भुजरामाचे दर्शन झाले व मूर्ती डोळ्यासमोरून हालेना तेव्हा ते धारला गेले. त्यावेळी धारच्या राणीसाहेब तेथे कुलमुखत्यार म्हणून कारभार पहात होत्या. मोठे वैभव होते व गजांत लक्ष्मी होती. ते गृहस्थ राणीसाहेबांना भेटले व सर्व हकिगत सांगितली. राणीसाहेबांनी आपल्या अधिकाऱ्यांना चतुर्भुज-रामाबद्दल माहिती मिळते का ती चौकशी करण्यास सांगितले. पण माहिती कळेना. तो ब्राह्मण रडकुंडीला आला. तो पुण्यापासून धारपर्यंत खडतर प्रवास करीत आला होता. त्याने रामाचा धावा सुरू केला. तेव्हा त्याला दृष्टांत झाला की मी मांडवगण (मंडू) च्या जंगलात आहे. राणीच्या काही अधिकाऱ्याबरोबर ते गृहस्थ मंडूच्या जंगलात गेले. पण स्थान समजल्याशिवाय खणणार कोठे? तेव्हा पुन्हा श्रीरामालाच साकडे घातले. तेव्हा प्रेरणा झाली की संस्थानचा गजराजच ते स्थान दाखवेल. तेव्हा हत्तीला तेथे आणले. तो जंगलात मुक्त फिरू लागला. एका ठिकाणी तो थांबला व खाली बसला व तेथून तो हालेना. ब्राह्मणाने सांगितले की येथे खणा. येथपर्यंत बराच उपद्व्याप झाला होता.

राणी म्हणाली “समजा, येथे खणून काहीच हाताला लागले नाही “तर..? ” तेव्हा ब्राह्मण म्हणाला, “आपण माझा शिरच्छेद करा, समजा आपण मला मारले नाही तर मी स्वत:च देहांत प्रायश्चित्त घेईन. ” 

खणण्याचे काम सुरू झाले. एका विशिष्ट खोलीवर खणू असा आवाज ऐकू आला. ती एक मोठी फरशी होती. ती अलगद काढली तर, आत भुयार होते त्याला पायऱ्या होत्या. तेथून आत उतरल्यावर चतुर्भुज रामाची मूर्ती दिसली. भुयार स्वच्छ होते व तेथे रामापुढे नंदादीप तेवत होता असे सांगतात. “जानकीजीवनस्मरण जयजयराम अशी गर्जना करीत श्रीरामाला बाहेर काढले. त्याची षोडशोपचार पूजा, पुरुषसूक्त व पवमानयुक्त अभिषेक करून प्रतिष्ठापना केली. धारच्या राणीसरकारांनी तेथे सुंदर मंदिर बांधले. नित्य नैमित्तिक पूजा व उत्सवासाठी पुजारी नेमले व वतन नेमून दिले. मंदिराच्या वरच्या बाजूला दरबारासारखी बैठकीची व्यवस्था केली. भुयाराची जागा जशीच्या तशी व्यवस्थित करून ठेवली.

टीप – आजही ते भुयार आपणास पहावयाला मिळते व इतिहासाची साक्ष देते. तेथे चौकशी करता त्यावेळी एका वृद्ध तेज:पुंज साधूने सांगितले“यहाँ महान रामभक्त दख्खन के साधू आये थे ।” आणि ते दख्खन के साधू आणखी कोणी नसून आपले श्रीमहाराज, (श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज)

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “लाखो इथले गुरू…” – कवी : श्री. ग. दि. माडगूळकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “लाखो इथले गुरू…” – कवी : श्री. ग. दि. माडगूळकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

 

बिन भिंतीची उघडी शाळा 

लाखो इथले गुरू…

झाडे, वेली, पशु, पाखरे 

यांशी गोष्टी करू!

 

बघू बंगला या मुंग्यांचा,

सूर ऐकुया या भुंग्यांचा

फुलाफुलांचे रंग दाखवील 

फिरते फुलपाखरू…

बिन भिंतीची उघडी शाळा 

लाखो इथले गुरू!

 

सुग्रण बांधी उलटा वाडा,

पाण्यावरती चाले घोडा

मासोळीसम बिन पायांचे 

बेडकिचे लेकरू…

बिन भिंतीची उघडी शाळा 

लाखो इथले गुरू!

 

कसा जोंधळा रानी रुजतो,

उंदीरमामा कोठे निजतो

खबदाडातील खजिना त्याचा 

फस्त खाऊनी करू

बिन भिंतीची उघडी शाळा 

लाखो इथले गुरू!

 

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ,

कड्या कपारी पर्‍ह्यात पोहू

मिळेल तेथून घेऊन विद्या 

अखंड साठा करू

बिन भिंतीची उघडी शाळा 

लाखो इथले गुरू!

कवी : श्री. ग. दि. माडगूळकर

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नांदत्या घराची किंमत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “नांदत्या घराची किंमत…” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

दोन दिवसापूर्वी मी एका कंपनीचा सामाजिक उपक्रम म्हणून मेळावा आयोजित केला होता तो एका वृद्धाश्रमात.

त्या कार्यक्रमाचे फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच पेनड्राईव्ह मध्ये पाठवतो असे व्यवस्थापकांनी सांगितले. वाटलं.. कोणी ऑफिसबॉय येईल पेनड्राईव्ह घेऊन म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाट बघत होते.

7.30 ला मोबाईल वरून फोन आला. जरा थकलेला.. पण मार्दवपूर्ण असा एका आजींचा आवाज होता.

“मी आलेय फोटो घेऊन. डेक्कनच्या बस स्टॉप वर उतरलेय. पत्ता समजावून सांगता का? ” 

अरे बाप रे.. एवढ्या वयस्क आजी. मी माझ्या लेकीला गाडीने पिटाळले त्यांना आणायला. झक्कपैकी टू व्हिलर वर बसून आजी आल्या. फिकटसं नऊवारी पातळ, सुपारीएवढा अंबाडा, हसतमुख चेहरा आणि हातात मोबाईल आणि पेनड्राईव्ह छोट्याशा बटव्यात.

ब्रेकफास्ट ची वेळ होती. नवरा ग्राऊंडवरून 10 मिनिटात येणार होता. मी बटाटे पोह्यांची तयारी केली होती. मला कंपनीत फोटो आणि न्यूज पाठवायची होती. लेक पसार झाली काहीतरी काम काढून.

शेवटी मी डाईनिंग टेबलवर लॅपटॉप घेतला नि गॅसवर कढई ठेवली. माझी धांदल पाहून आजी म्हणाल्या, ” मी करते ग पोहे, तू निश्चिन्तपणे फोटोचे काम हातावेगळे कर. ” मी जरा संकोचले पण पर्याय नव्हता म्हणून तेथून बाजूला झाले. माझे काम होईस्तोवर पोहे तय्यार.

भरपूर ओला खोबरं आणि कोथिंबीर घालून आजीनी मस्त पोहे केले होते. हक्कानी पापड मागून घेतले. मी भाजते म्हटलं तर म्हणाल्या ” थांब मी तळते की “.

एव्हाना लेक आणि नवरा घरी आले आणि आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायला घेतला. आजींच्या हातचे चविष्ट पोहे खाऊन घरातले खुश. जाते जाते म्हणत आजी जेवण करूनच निघाल्या इतका आग्रह माझ्या माणूसवेल्हाळ लेकीने आणि नवऱ्याने त्यांना केला. आणि आजीने पण खान्देशी भरीत करून त्यांच्या आग्रहाला पोच दिली.

निघताना मी जरा संकोचून आजींना म्हंटले, ” आजी खूप त्रास घेतलात हो. “

आजी जे उतरल्या त्यात समाधान होते आणि वेदनाही.

त्या म्हणाल्या “नांदत्या घरात खूप दिवसांनी वावरले, अगदी स्वयंपाकघरातही हक्क दाखवला… खूप छान वाटलं ग “

या एका वाक्यात मीच रडवेली झाले. ” पुन्हा याल ना? ” त्या उत्तरादाखल किंचित हसल्या अन म्हणाल्या 

” परमेश्वराची इच्छा “

खरा सांगू.. सणासुदीला पाव्हण्यारावळ्यांचा मर्यादेपेक्षा जास्त राबता झाला कि मी जरा वैतागायचे….. आजींच्या ” नांदत्या ” या एका शब्दाने मला ती किंमत कळली.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “अंत्यसंस्कारानंतर…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “अंत्यसंस्कारानंतर…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

थोड वाईट वाटेल पण हेच सत्य आहे आणि हेच सत्य राहील..

# काही तासांत रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद होईल.

# तुमचे घरचे माणसं पहिले काही दिवस नातेवाईकांनी आणून दिलेले जेवण जेवतील व नंतर हळूहळू पुर्वस्थितीत येतील.

# नातवंडे धावत-खेळत राहतील.

# तुमच्या निघून जाण्यानंतर काही लोक तुमच्याबद्दल काही टिप्पणी करतील!

# दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणात काही नातेवाईक कमी होतील, तर काहीजण भाजीत पुरेसे मीठ नसल्याची तक्रार करतील.

# जमाव हळूहळू पांगू लागेल..

# काही दिवसांनंतर, तुमचे घरचे तुम्ही कमावलेली संपत्ती कशा रितीने वाटून घ्यायची याची चर्चा सुरू करतील.

# येत्या काही दिवसात, तुम्ही मेला आहात हे माहीत नसताना काही कॉल तुमच्या फोनवर येऊ शकतात.

# दोन आठवड्यांत तुमचा मुलगा आणि मुलगी त्यांची आणीबाणीची रजा संपल्यानंतर कामावर परत जातील.

# महिनाअखेरीस तुमचा जोडीदारही कॉमेडी शो पाहून हुळूहळू हसायला लागेल.

# तुम्ही ज्या पदावर होता त्या पदावर आता दुसरा कोणीतरी व्यक्ती असेल.

# प्रत्येकाचे जीवन सामान्य होईल. 

# आपण कशासाठी जगतो आणि मरतो यात काही फरक नसतो.

# हे सर्व इतक्या सहजतेने, इतक्या सहजपणे, कोणतीही हालचाल न करता घडते.

# या जगात विस्मयकारक गतीने तुमचे विस्मरण होईल.

# दरम्यान, तुमची प्रथम पुण्यतिथी, प्रथम वर्षश्राद्ध मोठ्या दिमाखात, दणक्यात केले जाईल, तुम्हाला न मिळालेले खाद्य पदार्थ लोकांना खायला मिळतील

# मोठमोठ्या महाराजांची किर्तने,प्रवचने ५/७ दिवस मोठ्या दिमाखात होतील 

# अतिवेगाने वर्षे उलटून जातील आणि आता तुमची कोणालाही आठवण येणार नाही.

 आता सांगा… 

# लोक तुम्हाला सहज विसरण्याची वाट पाहत आहेत.मग तुम्ही कशासाठी धावत आहात?

# तुम्हाला कशाची काळजी आहे ?…

 # योग्य आणि नैतिक मार्गाने संपत्ती कमवा, गरजेपेक्षा जास्त संपत्ती जमा करू नका.

# आयुष्य फक्त एकदाच मिळते, फक्त ते निस्वार्थी भावनेने व प्रेमळ मनाने जगा.

# इतरांपेक्षा स्वतः च स्वतः ला श्रेष्ठ समजवून इतरांना कमी लेखू नका, त्यांचा अपमान करू नका.

# इत्तरांचे प्रपंच मोडकळीस आणण्याचे पाप करु नका, त्याचा परिणाम आपल्याही कुटुंबांवर होऊ शकतो

# आयुष्यात पद, सत्ता एका विशिष्ट वयानंतर येते आणि एका विशिष्ट वयानंतर निघून जाते,….  

“होय, एक गोष्ट…”

# आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजूला निरपेक्ष प्रेमाने मदत करा,  तो तुमची नेहमी आठवण ठेवेल.

# आपल्या अस्तित्वाचा अहंकार सोडा.

# सत्कर्म करत रहा. हेच खरे जीवन आहे. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares